Sunday, January 26, 2020

जाणता अजाणता

Image result for Y B CHAVAN SHARAD PAWAR

जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण ।
गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे

या काव्यपंक्ती एकनाथी भागवतामध्ये आढळतात. त्या आठवण्याचे कारण म्हणजे शरद पवार. मध्यंतरी स्वत:ला जाणता राजा म्हणू नका असेही आपल्या अनुयायांना कधी खंबीरपणे सांगायला धजावले नाहीत, अशा शरद पवारांचे उदगार! कोणा दिवट्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या युगातले शिवाजी महाराज ठरवणारे पुस्तक लिहून काढले आणि त्यावरून वाद सुरू झाला होता. त्यात आपले काही मुद्दे वा आक्षेप नोंदवण्यापेक्षाही पवारांनी अकारण त्यात समर्थ रामदास स्वामींवर दुगाण्या झाडल्या. शिवरायांच्या गुरू जिजाऊ महाराज होत्या आणि रामदास नक्कीच गुरू नव्हते; असे मतप्रदर्शन केले. त्याचे औचित्य काय होते? गुरू म्हणजे तरी काय असतो? आज शिवरायांचा गुरू कोण हे सांगण्यापेक्षा पाच वर्षापुर्वी तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला आले असताना इतका परखड खुलासा करायची हिंमत पवारांनी करायला हवी होती. कारण तिथे दोन आक्षेपार्ह विधाने झालेली होती. पण दोन्ही बाबतीत साहेबांनी मौन पाळण्यात धन्यता मानलेली होती. एक म्हणजे त्या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी पवारांचा उल्लेख ‘देशाला न लाभलेले पंतप्रधान’ असा केला होता. त्यात कितीसे तथ्य होते? आपण प्रयत्न खुप केले, पण तिथपर्यंत मजल मारू शकलो नाही, हे सत्य पवारांना अजून पचवता आलेले नाही. म्हणूनच बजाज यांच्या विधानाला विरोध करणे त्यांना शक्य झाले नाही. त्यापेक्षा निमूट गप्प बसून त्यांनी मिळालेला ‘लाभ’ पदरात पाडून घेतला. पण तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक आक्षेपार्ह विधान केले. मोदींनी पवारांनाच आपले गुरू म्हणून प्रशस्तीपत्र देऊन टाकले. त्यात किती तथ्य होते? ती इतिहासातील नव्हेतर वर्तमानातली गोष्ट होती आणि साक्षात पवारांच्या साक्षीने घडत होती. त्याविषयी तात्काळ खुलासा कशाला केला नाही? तर आपण ज्याचे गुरू नाही, त्याच्या यशाचे फ़ुकटचे श्रेय मिळत असेल, तर नाकारण्याचे धैर्य पवारांपाशी नसावे.

शिवरायांचे गुरू कोण, हा आज ऐतिहासिक वाद आहे. पण गुरू तो असतो ज्याच्यापासून शिकण्यालाच अधिक महत्व असते. त्याचे नेमके वर्णन एकनाथी भागवतामध्ये आलेले आहे. त्याच पंक्ती आरंभी उधृत केलेल्या आहेत. त्याचा बारकाईने अभ्यास केला तरी गुरू शब्दाची व्याप्ती व आशय लक्षात येऊ शकतो. मग जगात आपले गुरू कोण आणि कोणापासून काय शिकावे; याचे प्राथमिक ज्ञान होऊ शकते. तिथूनच खरीखुरी शिकायची सुरूवात होत असते. पण बहुधा पवारांना तसे काही करायची गरज केव्हाच वाटलेली नसावी. त्यामुळे शिकण्यापेक्षा त्यांना आरंभापासूनच शिकवण्याची अधिक हौस असावी. अन्यथा आपल्याला कोणी राजकारणाचे धडे दिले; त्या गुरूचे शब्द त्यांनी मनावर घेतले असते. शिवरायांच्या गुरूविषयी वाद होऊ शकतात. पण पवारांच्या गुरूविषयी मतभेद होऊ शकत नाहीत. कधीकाळी महाराष्ट्रात कॉग्रेसचा अभेद्य किल्ला उभा करणारे यशवंतराव चव्हाण, हेच पवारांचे राजकीय गुरू आहेत ना? की त्याची खातरजमा करण्यासाठी पवारांना आजच्या जमान्यात श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाची पाने चाळावी लागणार आहेत? राजकारणात वा सार्वजनिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपली वाणी कशी वापरावी, याविषय़ी यशवंतरावांनी दिलेला धडा खुप मोलाचा आहे. पण शिष्यांना तो ऐकता आला पाहिजे. समजून घेता आला, तरच त्यानुसार अनुकरण करणे शक्य होईल. अलिकडेच एका वाहिनीवर विधानसभा निकालापुर्वी आपले राजकीय अनुभव कथन करताना पवारांचे समकालीन दुसरे पवार त्याचा दाखला देत होते. त्यांचे नाव उल्हास पवार असे आहे. त्यांनी जुन्या आठवणी व आपले राजकीय शिक्षण उलगडून सांगताना यशवंतरावांची एक मोठी आठवण सांगितली. किंबहूना नेत्यांनी काय व कसे बोलावे, यापेक्षा काय बोलू नये; याचा तो उत्तम वस्तुपाठ आहे. पण तेवढाच धडा घ्यायला शरद पवार विसरून गेलेले असावेत, किंवा त्यांनी तोच धडा मनावर घेतलेला नसावा.

राजकिय वा सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना काय बोलावे, यापेक्षा काय बोलायचे टाळावे, याला खरे महत्व असते, ही यशवंतरावांची शिकवण होती, असे उल्हासरावांनी सांगितले. जे त्यांना इतक्या वर्षानंतरही आठवते, त्याचा शरद पवारांना विसर कसा पडलेला आहे? अलिकडल्या कालखंडात पवारांची वेळोवेळी केलेली विधाने आठवली, तरी यशवंतरावच त्यांचे गुरू वा मार्गदर्शक होते काय, अशी शंका येते. कारण नको त्यावेळी नको त्या प्रसंगी पवार नको तितकेच बोलत असतात. शिवरायांच्या गुरूविषयीचे विधान त्यापैकीच एक आहे. शिवरायांचे गुरू कोण हे सांगण्याचे काहीही प्रयोजन नव्हते. युगपुरूष अवघ्या जगाकडून कायम शिकत असतात. कुठल्याही अनुभवातून शिकत असतात आणि अगदी शत्रूकडूनही शिकत असतात. आपल्या चुकांमधूनही शिकत असतात. शिवराय इतक्या उंचीवर पोहोचले व त्यांनी इतिहास घडवला, कारण ते गुरू कोण ते ठरवित बसलेले नव्हते. तर प्रत्येक दिवसाच्या अनुभवातून शिकत होते. यातला एक मोठा दाखला इथे सांगणे भाग आहे. त्यांच्या आधीच्या इतिहासात भारतातल्या वा कुठल्याही हिंदू राजाने लढवय्याने नि:शस्त्र वा माघार घेतलेल्या शत्रूवर हल्ला करण्याचे टाळलेले होते. गाफ़ील शत्रूवर हल्ला करणे भारतीयांच्या स्वभावात नव्हते. त्याचाच फ़ायदा घेत इस्लामी आक्रमण सहजशक्य झाले. त्याला मुस्लिम आक्रमकांच्या गद्दारी व विश्वासघाताचे डावपेच कारणीभूत होते. अशावेळी आपल्या जुन्या परंपरांना फ़ाटा देऊन शिवरायांनी नवे युद्धतंत्र तयार केले, त्याला आपण गनिमी कावा म्हणून गौरव करतो. पण मुस्लिम धार्मिक युद्धशास्त्रात त्यालाच ‘तकिया’ म्हणतात. त्याचा बिनधास्त अवलंब महाराजांनी आपल्या डावपेचातून केलेला आहे. आधीचे भारतीय राजे व शिवराय यांच्यातला सर्वात मोठा फ़रक गनिमी कावा आहे. मग ते युद्धशास्त्र त्यांनी कुणाकडून आत्मसात केले? आपल्या शत्रूकडून ना?

थोडक्यात शत्रू गुरू नव्हता, की कोणी स्वामी वा संतही गुरू नव्हता. जगातल्या विविध अनुभवातून महाराज शिकू शकले. आपला गुरू कोण त्याचा डंका पिटण्याची त्यांना गरज वाटली नव्हती. त्यापेक्षा हाती घेतलेले कार्य पुर्ततेला घेऊन जाण्याला प्राधान्य असते, हा सर्वात मोठा धडा त्यांच्या जीवनक्रमातून आजही शिकण्यासारखा आहे. पण जाणता राजा म्हणवून घेताना काहीही शिकायचे नाही, हा पवारांचा बाणा राहिला आहे. अन्यथा त्यांनी अकारण नसत्या विषयाला हात घातला नसता. किंबहूना शिवरायांचा काळ इतिहासाचा आहे. यशवंतराव तर पवारांना जवळून बघता आले व त्यांच्याकडून शिकण्याची संधीही मिळाली. पण चार हात दुर राहून उल्हास पवार जितके शिकू शकले, तितकेही शरदरावांना आपल्या घोषित गुरूपासून शिकता आले नाही. परिणामी चतुराई दाखवायला जाऊन त्यांनी प्रत्येक बोलण्यातून आपलेच नुकसान कशाला करून घेतले असते? मोदींनी गुरू ठरवल्याचे खोटे कौतुक ऐकून सुखावण्याची वेळ त्यांच्यावर कशाला आली असती? अनुयायांनी ‘जाणता राजा’ म्हणून कौतुकाचे शब्द वापरल्यावर गप्प कशाला बसले असते शरदराव? ज्यांना अगत्याने शिवरायाचे गुरू रामदास नसल्याचे कथन केल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांना त्याच समर्थांच्या ‘जाणता राजा’ उपमेचे कौतुक कशाला असावे? चिंचवड किंवा तशाच कुठल्या जागी व्यासपीठावरून आपल्या पक्षाच्या जाहिर कार्यक्रम समारंभात पुणेरी पगडी घालायचे टाळून महात्मा फ़ुल्यांचे पागोटे घालावे; असे अगत्याने सांगायची उबळ येते ना? मग आपल्यालाही ‘जाणता राजा’ असली उपाधी लावू नका, असे सांगताना शब्द कशाला अडतात? तर शब्द कोणाचे का असेनात, आपले गुणगान करीत असतील, तेव्हा गुदगुल्या होतात. हवेहवेसे असतात. पण गुदगुल्या संपल्यावर मुळ स्वभाव उफ़ाळून येत असतो. की असे फ़क्त जाणता अजाणता घडत असते?

पुणेरी पगडी वा छत्रपती संभाजी राजांना राज्यसभेत मिळालेली नेमणूक; यावेळी पवारांना सुचलेल्या उक्ती केवळ जातिवाचक नव्हत्या, असे कोणी म्हणू शकतो का? प्रामुख्याने पुणेरी पगडीला आक्षेप घेताना त्यांना महात्मा फ़ुले यांची तरी कितपत ओळख होती? कारण त्या समारंभात त्यांनी अगत्याने वेगळी फ़ुले पगडी मागवून घेतली आणि यापुढे असलीच पगडी सन्मानार्थ द्यावी, असा आग्रह धरलेला होता. पण फ़ुले पगडी नसते, तर त्याला पागोटे असे म्हटले जाते, त्याचीही गंधवार्ता पवारांना नव्हती की मंचावर उपस्थित असलेल्यांना नव्हती. मग पगडी पागोट्याचा वाद जातीशी संबंधित असल्याचे लपून रहात नाही. विषय पगडीचा असो वा गुरूच्या जातीचा असो. महापुरूष गुरूचेही मिंधे नसतात, तर जगाकडून शिकत असतात. त्यांना गुरूची गरज नसते. कारण ते अनुभवातून शिकत असतात. लहानमोठ्याचा विचार करून शिकण्याची संधी गमावत नसतात. नुसते शिकून थांबत नाहीत, तर त्या शिकण्याचा जीवनात व कार्यात उपयोगही करून घेत असतात. त्यातून अशा महान व्यक्ती इतिहास घडवतात. ते जातीपातीत अडकून रहात नाहीत. त्यांची ख्याती व किर्ती जाती प्रदेशाच्याही मर्यादा ओलांडून जात असते. शिंदे, होळकर, गायकवाड महाराष्ट्राच्या भौगोलिक मर्यादा काही शतकापुर्वी ओलांडून इतिहासाला घडवू शकले. पण आजच्या जमान्यातही पवारांना महाराष्ट्राच्या सोडा, बारामती परिसराच्याही सीमा ओलांडून पराक्रम गाजवता आलेला नाही. जाणता अजाणता, पवार आपल्या जातीचक्रात अडकून पडलेले आहेत आणि मोदींसारखा तुलनेने नवा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधानही होऊन गेला आहे. कारण त्याला गुरूची व्याख्या उमजलेली आहे. गुरूची जात नव्हेतर शिकवण मोलाची असते; त्याचे भान आहे. अवघे जगच गुरू असते. आपण विद्यार्थी शिक्षणार्थी असायला हवे, याचे भान मोलाचे असते. जे पवारांना कधीच नव्हते, ही अडचण राहिलेली आहे.

23 comments:

  1. अप्रतिम लेख गुरूवर भाऊ सर धन्यवाद शिकण्यासारखे खूप या लेखात.

    ReplyDelete
  2. पवार यशवंतरावांचे नाते मानसपुत्राचे होते.. आता पुत्र वडिलांच्या विचार,आचार आत्मसात करतोच असे नाही आणि पुत्रमोहामुळे त्याच्या दुर्गुणांकडे बाप डोळेझाकही करतो किंबहुना बाप बेरजवजाबाच्या गणितात कसा कच्चा आहे हे सांगू लागतो आणि म्हातारा बाप विचार करत बसतो. शेवटी बोट धरून मोठ्या झालेल्या पुत्राचे बोट धरण्याची वेळ म्हातारपणी येते ना? मग बापाला बाजूला करून जाणता मुलगा कारभार करू लागतो. आताच्या फ्रस्ट्रेटेड म्हातार्‍या बापाचे बोट धरून सांभाळून न्यायला समर्थ वारस कुठे आहे? 😁

    ReplyDelete
  3. भाऊ पुण्यात कधी येणार आहेत! पाया पडावयाचे आहे या लेखाबद्दल !

    ReplyDelete
  4. KHUP chaan, parantu, gadhwapudhe wachli geeta aani, kalcha gondhal barach hota.

    ReplyDelete
  5. व्वा भाऊ ! लय भारी

    ReplyDelete
  6. भाऊ "जाणता राजा'चे वाभाडे काढणारा सडेतोड लेख. यांनी केवळ आणि केवळ जाती पातीचे राजकारण आयुष्यभर केले व दोन समाजामध्ये फुट पाडून आपला स्वार्थ साधला. पाठीत खंजीर खुपसण्यात व आपल्या सहकार्यांंना तोंडघशी पाडण्यात त्यांचा हात कोणी धरु शकत नाही.या दुर्गुणा मुळे त्यांच्या वर कुणी फारसा विश्वास ठेवत नाही.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमाणे वसंत दादा पाटील यांना पण दगा दिला.नवाकाळचे संपादक निळुभाऊ खाडीलकर यांनी पवारांचे वर्णन तेल लावलेला पहेलवान असे केले होते व त्यांच्या वरील कोणतेही आरोप खरे वाटतात व पवार असे करु शकतात असेच प्रथम दर्शनी बहुतेक लोकांना वाटते हीच पवारांची कमाई आहे व दुर्दैवाने हे सत्य आहे.

    ReplyDelete
  7. पवार जातीपातीच्या राजकारणानेचआपल्याच जातीला मातीत घालायला निघाले आहेत नव्हे त्यांनी तसा चंगच बांधला असावा.
    या जाणत्या राजाने श्रीमंत कोकाट्यांचा गंडा बांधला असल्याने गुरु वचने अधून मधून उधृत करावी लागतात, म्हणजे आपण गुरुच्या मार्गवरुन चाललो आहोत याची प्रचिती जनतेला येत असते.
    एका दृष्टीने ते चांगलेच म्हणायला हवे,कारण जनता जनार्दन या सर्वाचा हिशेब मतदानात दाखवत असते.

    ReplyDelete
  8. खरं तर अजाणता राजा हेच बिरूद मिरवायला हरकत नाही

    ReplyDelete
  9. Khoopach Marmik ani sarvanach vichar karayla lavnare

    ReplyDelete
  10. भाऊ,
    स्वतःची शून्य लायकी असताना, कसलीही नीतिमत्ता नसताना, निष्ठा, कर्तव्यपरायणता, उदात्त ध्येयनिष्ठा, निःस्पृहः जीवन, निःस्वार्थी परोपकारी स्वभाव, विनम्र रुजुता, शौर्य, धैर्य, समर्पण या पैकी नावालाही कुठला गुण नसताना निर्लज्जपणे कोडगेपणाने स्वतःला जाणता राजा (!!!!!!!!) म्हणवून घेण्यामधे कमालीची नीच वृत्ती दिसून येते. जन प्रक्षोभाचा यदाकदाचित उद्रेक जर झालाच तर हे नीच आप्तांना तुडवून देखील स्वतःचा कवडीमोल जीव वाचवून सर्वप्रथम पलायन करतील. हे अश्या लोकांचे वास्तव आहे.


    - पुष्कराज पोफळीकर

    ReplyDelete
  11. शरद पवारांच्या राजकारणाचे काही टिपिकल पैलू
    आहेत.
    1. शरद पवारांना दिसते, तेव्हडेच असते. उदाहरणार्थ
    शरद पवारांना सोनिया परदेशी दिसल्या मग सोनिया
    परदेशी झाल्या. पुन्हा काही दिवसांनी पवारांना सोनिया
    देशभक्त वाटल्या. सोनिया देशभक्त झाल्या

    2. पवारांना प्रश्न करणार्यांना लगोलग उत्तर द्यायचेच असतेच

    3. संकुचित संदर्भ व व्यापक संदर्भ ह्यात संकुचित संदर्भ देण्याच्या कलेवर पवारांचे भारी प्रेम. तरुणपणी नाशिकला एका मराठा शिक्षणसंस्थेत पवार तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून
    आलेले. संपूर्ण मराठा गर्दीपुढे प्राथमिक शिक्षण व त्याचा
    प्रसार किती महत्वाचा अशी टकळी लावणारे पवार भाषणाच्या शेवटी मराठा शिक्षणसंस्थेला मेडिकल कॉलेज ची
    परवानगी देउन गेले.

    4. कारण हेतू अवलोकन न करता जमातवादाने ओथम्बलेला
    कारण हेतू प्रक्षेप पवार साहेब करतात. उदाहरण द्यायचेच
    तर पुणेरी पगडी व फुलेंचं पागोटं ह्यात भेद करण्यासाठी कोणताही कारण हेतू नसताना जमातवादाने ओथम्बलेला इश्श्यु पवारांनी बनवून त्यांचा जमातवादाचा कारणहेतू प्रक्षेपित केला व जमाती जमातीत पगडी पागोट्यावरून मेख
    मारलीच

    5. दीर्घकालीन सार्वत्रिक सुसंगतीस फाक्यावर कोलून देउन जमातवादाचे श्रेय उपटण्यासाठी स्थानिक आणि प्रासंगिक बोलून दाखवून प्रेडिक्टिव्ह न राहता स्वतःचे नेरेटिव्ह
    ठासून बोलणे. उदाहरण द्यायचेच तर कोरेगाव भीमा खटला.
    पवारांनी कोरेगाव भीमा खटला या विषयाला हात घालताना त्याची नव्याने चौकशी करावी अशी मागणी केली. किंबहूना राज्यात तिघाडी सत्ताबदल झाल्यापासून ह्या विषयाचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्याच चौकशीची चर्चा पवारांनी लावून
    धरली

    6. राजकारण करताना समाजकारण करावे लागते. समाजकारण करताना समाजातील प्रश्न सूत्रांकित करावे लागतात. पवारांच्या राजकारणाचा एक पैलू म्हणजे राजकारणालाच ते समाजकारण समजतात व
    एकदाका राजकारणालाच समाजकारण समजलं कि समाजातील प्रश्न सूत्रांकित करावे लागत नाहीत. आहे त्या प्रश्नाला गोलगोल घुमवले कि झाले. उदाहरण द्यायचं तर
    शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल च उदाहरण घ्या. सरकार स्थापनेपर्यंत पंचनाम्याशिवाय शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, म्हणून शरद पवार बांधावर जाऊन भेटीगाठी करीत होते. फोटो सेशन करत होते. विदर्भातील झाडावर सडलेल्या
    संत्र्यांच्या बागातील निवडक शेतकऱ्यांचे भेटीचे फोटो
    ट्विटर वर पोस्ट करीत होते. नगरला शरद पवार बांधावर जाऊन शेतकऱयांची द्राक्ष कशी सडली आहेत ह्या
    बद्दल हेडलाईन्स व्यापत होते. पावसात भिजताना
    तेव्हा त्यांना कोरेगाव भीमा वगैरे काही आठवत नव्हते. पण सत्तेत जाऊन बसल्यावर शेतकरी किंवा त्याची दुर्दशा फाक्यावर मारली आहे आणि सगळी चिंता शहरी नक्षलवादी ठरलेल्यांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सुरु आहे.

    7. विरोधाच्या/वादाच्या दोन्ही बाजूंत कमीअधिक तथ्यांश असू शकतो. प्रश्न त्यांतील नको त्या 'जोड/संयोग' शोधण्याचा असतो. 'एकच खरे' हे चूक असते. पवार साहेब स्वतःचेच खरे मानून चालतात. तोंडानी म्हणायचे कि निवडणुकीत राष्ट्रवादीस विरोधात बसण्याचा जनादेश मिळाला म्हणून विरोधात बसू पण विरोधात न बसता नको त्या वयात नको त्यांचा संकर घडवून नको ते सरकार राज्यावर लादण्याचे घाणेरडं राजकारण पवारच करतात.

    8. विधायक स्वरूपाचा विरोधी पक्ष निर्माण व्हायला हवा आहे असे म्हणत 'आप'सारखा ममता ह्यांचा तृणमूल ह्यांचा
    भंपक पणा डोक्यावर मिरवणे

    भाऊ तुमच्या सक्षम लिखाणास हे जोड टाचण


























    ReplyDelete
    Replies
    1. एकनाथी भागवताचा आपण उल्लेख केलात म्हणून मलाही आठवले कीं अवधूतांनी यदुला गुरंची लक्षणे सांगतानाच असा उपदेश केला की गुरु दोन प्रकारचे असतात ती ओवी सातव्या अध्यायात ३२वी आहे. "जे मी गुरु सांगेन म्हणे | ते नीजप्रज्ञेचेनि लक्षणे | हेयोपादेयउपायपणे | घेणे त्यजणे सविवेके ||३२||" म्हणजे मोदींजींनी जे सांगितले त्यात हे लक्षात घ्याला हवे की "घेणे - त्यजणे" म्हणजे त्याज्यगुरु पण असतात. आणि मोदी साहेब तेवढे सुज्ञ आहेत काय घ्यायचे आणि काय त्यागायचे हे त्यांच्या इतके उत्तम दुसरे कोण सांगणार?

      Delete
  12. Please write on yashvant rao chavan, he is the only marathi manaus, reached highest post in politics. Please write on his biography

    ReplyDelete
  13. भाऊ खूपच छान. शालजोडीतले लगावलेले अप्रतीम.

    ReplyDelete
  14. श्री भाऊ मला वाटत तुम्ही पवारांवर लिहिणं सोडुन द्या त्यापेक्षा अजुन कितीतरी विषय आहेत उगाच आपली बुद्धी आणि ऊर्जा कशाला वाया घालवायची

    ReplyDelete
  15. भाऊ अप्रतीम लेख,
    उद्या मला जरी जगातले सगळे गुरु लाभले तरी माझ्यासारखा सामान्य माणूस एखाद्या मावळ्याच्या पण जवळपास जाऊ शकणार नाही.फारतर नोकरीत आणखी थोडी प्रगती होइल.

    महाराज समर्थाना गुरु मानतात का नाही हे चाफळच्या सनदेचा अभ्यास करून ठरवता येइल पण बहुतेक कुणालाच वाद मिटवायचा नाही. अगदी सनद अस्सल आहे का नाही ह्याच सुद्धा संशोधन केल पाहिजे.

    ReplyDelete
  16. नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये केलेल्या विधानामुळे खरंतर शरद पवारांचा तिळ पापड झाला होता . मी पवारांचे बोट धरून राजकारणात आलो या एका वाक्यात सगळे सार सामावले आहे . करण पवार साहेब ज्यांचे ज्यांचे बोट धरून राजकारणात आले त्या सर्वांना त्यांनी पूर्णपणे झोपवले . आणि मोदींना तेच सांगायचे होते की मी देखील तुम्ही तुमच्या गुरूंच्या बाबतीत जे केले तेच तुमच्या बाबतीत आता करणार आहे .समझनेवालों को इशारा मिल गया

    ReplyDelete
  17. भाऊ सर, आपला प्रत्येक लेख मी वाचतो. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे खरोखरच मागासलेले आहेत, व हे तेच वेळोवेळी सिद्ध करित असतात.
    आपल्या लेखनामुळे मला नवी दृष्टी मिळाली आहे. आपण ज्या तर्क बुद्धीने लेखन करिता त्याच्या जवळपास ही आजचे वार्ताहर नाहीत याचे दुःख होते.
    जे खरे आहे ते मांडण्यापेक्षा पेड न्युज जास्त दिल्या जातात.
    सध्या महाराष्ट्रात असलेल्या तीन पायाच्या सरकारचे सध्या एकच काम चालू आहे, आधीच्या सरकारच्या सर्व योजना बंद करणे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा करण्यापेक्षा ते र्निदोष कसे सुटतील हे पाहणे.
    शेतकरयांचे भले करणार सांगुन काहीही न करणे.
    चांगल्या सरकारी अधिकारी, पोलीस यांना कारवाईची धमकी देणे. एकीकडे कांदा दीडशे रुपये झाला म्हणून गळा काढणे, व दुसरीकडे शेती तोटयात म्हणून आत्महत्येस प्रवृत् करणे.
    मुंबईत मेट्रोचे कामास गती देण्याऐवजी नाईट लाईफची चर्चा करणे. बाजार समितीत मतदानाचा शेतकऱ्याचा हक्क हिरावून घेणे. एकाच जातीच्या लोकांना त्यांच्या बुध्दीसमोर आपण कमी पडतो म्हणून लक्ष्य करणे.
    एका पक्षला मुख्यमंत्रीपदाचे मधाचे बोट दाखवून सर्व अधिकार आपल्याकडे ठेवणे. महाराष्ट्राचे चांगले करण्यापेक्षा भिमा कोरेगाव, शिर्डी, समर्थ रामदास असले बाष्कळ वाद पेटवणे. ज्या वयात लोक रिटायर होतात ते उलटून गेले तरी सत्ता आपल्याच हातात राखण्यासाठी नको त्या गोष्टी करणे. स्वतःच्या घरच्या माणसांवर सुद्धा विश्वास नसणे, कारण आपण कसे वागलो स्वतःला चांगले माहित असल्यामुळे कायम साशंक राहणे ही औरंगजेबाची लक्षणे आहेत असे मला वाटते.
    सध्याचे सरकार चालणार पण ते महाराष्ट्राला मागे नेणार हे नक्की, कारण पंधरा वर्ष दोन पक्षाची सत्ता असताना नको ते करणारी मंडळीच पुन्हा सत्तेत आहेत. दुःख याचे वाटते की माझ्या सारखी सर्वसामान्य माणसे या स्थितीमध्ये काही करू शकत नाही, पुढील मतदानाची वाट पाहण्याशिवाय.
    आपण असेच लिहीत रहावे व सत्य आम्हाला कळवावे ही विनंती व जो दृष्टीकोन आपण देत आहात त्यासाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  18. मी सहसा भाऊंच्या लिखाणावर कॉमेंट लिहीत नाही. कारण त्यात कांही त्रुटी असत नाहीत. उलट दोन ते तीन वेळेस लेख वाचावा लागतो. पण अभ्यास चांगला होतो.

    ReplyDelete
  19. यशवंतरावांना देखील महाराष्ट्राचे प्रतिशिवाजी म्हटले जात असे.(जुनी वृत्तपत्रे चाळून बघा.) विषेश म्हणजे ह्या गुरूंनी देखील त्याचा इनकार केलेला नाही.

    ReplyDelete
  20. भाऊ हल्लीच पुण्याच्या शिवराम कार्लेकर या इतिहास चा शोध घेणाऱ्या माणसाला समर्थच शिवाजी महाराजांचे गुरु होते याचा अस्सल पुरावा लंडन ला मिळाला आहे.

    ReplyDelete