Wednesday, January 29, 2020

रातोरात लंबी दाढी ?

निर्भया सामुहिक बलात्काराच्या प्रकरणातील सर्व चार आरोपींना अखेरीस फ़ाशी देण्याचा मार्ग मोकळा झाल्याची बातमी वाचनात आली आणि हसावे की रडावे, तेच कळेना. कारण गेले दोन महिने तरी अशाच आशयाची बातमी सातत्याने येत असते. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फ़ाशीचा मार्ग मोकळा झाला, कोर्टाचे शिक्कामोर्तब असा साधारण मजकूर असतो. हे शिक्कामोर्तब आतापर्यंत किमान डझनभर वेळा झालेले आहे आणि कोर्टाने मार्गही तितक्याच वेळा मोकळा केलेला आहे. मग घोडे अडते कुठे? असा सामान्य माणसाला प्रश्न पडणारच. कारण मार्ग मोकळा असेल तर घोड्याने दौडायला हवे. पण घोडा उभा राहून दौडू लागणार असे वाटत असतानाच बातमी येते, की कोर्टाने शिक्कामोर्तब केलेल्या निर्णयाला आव्हान दिले गेले आणि सुनावणी होणार आहे. मग निर्भयाच्या मातेला कोर्टातच वा अन्यत्र कुठेतरी कसे रडू कोसळले, त्याचीही वर्णने येतात. पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होते आणि फ़ाशीचा मार्ग मोकळा होतो. हे गेले काही महिने अखंड चालू आहे. अशा बातम्या देणार्‍यांना घटना वा त्यातला तपशील कळत नाही, की एकूण माध्यमांनाच वेड लागले आहे, असे सामान्य माणसाला वाटल्यास नवल नाही. कारण शिक्कामोर्तब ह्या शब्दाला अगदी सुप्रिम कोर्टाच्या किंवा राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फ़ेटाळण्यालाही आता अर्थ उरलेला नाही. कोणी उपटसुंभ वकील गुन्हेगाराच्या वतीने सुप्रिम कोर्टात येऊन उभा रहातो आणि फ़ाशीत नवा अडथळा सहजगत्या उभा करीत असतो. त्यामुळे देशातील सर्वोच्च कोर्टाचा निकाल आल्यावरही त्याला काहीही पक्का अर्थ आता उरलेला नाही. ज्या दिवशी त्या चौघांची फ़ाशी अंमलात येईल, तेव्हाच त्याबद्दल माध्यमांनी बातमी देणे योग्य ठरेल. कारण असल्या शब्दांना किंवा न्यायनिवाड्यांची कसलीही शाश्वती राहिलेली नाही. असल्या बातम्या वाचून बालपणीच्या शालेय शिक्षणातला एक धडा आठवला, रातोरात लंबी दाढी!

१९६० च्या आसपास शाळकरी वयात असताना मुंबईत राष्ट्रभाषा प्रचार समिती नावाची संस्था हिंदी भाषा परिक्षा घेत असे. शाळेतल्या मुलांना ऐच्छिक पातळीवर अशा परिक्षांना बसता येत असे. त्यांचे काही अभ्यासक्रम होते आणि सहा महिन्यांनी वगैरे चढत्या क्रमाच्या परिक्षा व्हायच्या. त्यांची वेगळी क्रमिक पुस्तके होती. त्यापैकी एका पुस्तकातला हा धडा आठवतो. पुढे पाचवी किंवा सहावीला शालेय हिंदी पाठ्यपुस्तकात सुद्धा तोच धडा आलेला होता. फ़क्त त्याचे शीर्षक वेगळे होते. ‘सांड का निशान’. कुणा मोठ्या हिंदी लेखकाने लिहीलेली ती मजेशीर कथा होती. एका नशाबाज माणसाच्या वेंधळेपणावर रंगवलेले छान कथानक होते्. हा नशाबाज माणूस दिवसरात्र नशेत धुंद असतो. गांजा वा अफ़ूची नशा करणार्‍या त्या इसमाला एका संध्याकाळी उशिरा बदाम खाण्याची लहर येते. म्हणून तो घराबाहेर पडतो आणि बाजारात येतो. तर दुकाने बहुतांश बंद झालेली असतात. एखाद दुसर्‍या दुकानात दिवा दिसत असतो. त्यापैकी बदाम वगैरे सुकामेवा विकणारे दुकान शोधताना आणखी कालापव्यय होतो. पण एक दुकान बंद होता होता गडी तिथे पोहोचतो. तो दुकानदार आगंतुकाचा अवतार बघूनच नकार देतो. पण हा इसम खुप मागे पडतो, अजून पुर्ण दुकान कुठे बंद झाले वगैरे हुज्जत करतो. काहीही करून आठ आण्याचे बदाम देण्याचा हट्ट करतो. समोर रुपया धरतो. तर दुकानदार म्हणतो, सुट्टे काढायला वेळ नाही. तर ग्राहक साहेब म्हणतात, उरलेले आठ आणे उद्या दे पाहिजे तर. पण बदाम आताच हवेत. डोक्याला ताप नको म्हणून दुकानदार ते मान्य करतो आणि आठ आण्याच्या बदामाची पुडी बांधून मोकळा होतो. आपला हेतू सफ़ल झाल्याने तो नशाबाजही समधानी होऊन निघतो. दहा पावले चालल्यावर त्याला अचानक आठवण येते, की उद्या दुकान ओळखायचे कसे? तो माघारी वळतो, पण तेवढ्यात दुकान बंद झालेले असते आणि दुकानदारही निघून गेलेला असतो. आता उद्या आठ आणे मागायचे कुणाकडे? मोठा यक्षप्रश्न नशाबाजासमोर उभा रहातो.

त्या अंधुक प्रकाशात तो आसपास काही खुणेला सापडते का बघतो. पण दुकानावर कसली पाटी नसते व सगळीच दुकाने सारखी दिसत असतात. बराच वेळ तो दुकानाची काही खुण शोधतो. पण धुंदीत असल्याने त्याला काहीही खुणेसाठी सापडत नाही आणि त्यातही अंधार माजलेला. अखेरीस तिथून निघण्यापुर्वी पुन्हा एकदा नशाबाज नजर फ़िरवतो आणि खुश होतो. दुकानासमोरच एक तगडा बैल बसलेला असतो. त्याचे मन सुखावते. काहीतरी खुण सापडली एकदाची. ज्या दुकानासमोर बैल बसलेला आहे, तेच सुकामेवा विकणारे दुकान. उद्या त्याच्याकडून आपले आठ आणे वसुल करायचे, असे मनाशी ठरवून नशाबाज घरी परत येतो. इथपर्यंत सर्व ठिक असते. सकाळी उशिरा उठल्यावर त्याला अन्य काही आठवत नसले तरी बैलाची खुण आणि वसुल करायचे आठ आणे आठवत असतात. तो भर दुपारी बाजारात आपले पैसे परत मागण्यासाठी प्रयाण करतो. एक एक सुकामेवा विकणारे दुकान शोधतो. पण त्याला काहीही आठवत नाही. शिवाय त्यापैकी कुठल्याच दुकानासमोर त्याला बैल बसलेला दिसत नाही. आता काय करायचे, म्हणून तो बाजारभर फ़िरू लागतो आणि दीडदोन तासांनी त्याला ओळखीची खुण सापडते. एका दुकानासमोर बैल बसलेला असतो आणि जसाच्या तसा कालचाच बैल असतो. नशाबाजाची कळी खुलते. आपण कितीही नशा केली तरी व्यवहाराला पक्के आहोत, याने त्याची छाती फ़ुगते आणि बैल बसला त्यामागच्या दुकानात तो शिरतो. तर त्याच्या आश्चर्याला पारावार उरत नाही. कारण ते सुकामेवा विकणारे दुकानच नसते. तिथे दुकानात जागोजागी नवे शिवलेले कपडे टांगलेले असतात आणि जमिनीवरही कापडाचे तुकडे पडलेले असतात. एक टोपी घातलेला लांबलचक दाढीचा टेलर मास्टर मशीनवर काही शिवत असतो. रातोरात हा इसम आपला धंदा कशाला बदलून कपडे शिवत बसलाय, असा प्रश्न आपल्या नशाबाजाला पडतो. तरीही हिंमत करून तो त्या शिंप्याला जाऊन भिडतो व आपल्या आठ आण्याची मागणी करतो.

आता प्रसंग आपल्याही लक्षात येऊ शकतो. ते दुकानच भलते असते आणि शिंपी नशाबाजाला खुळ्यात काढतो. पण हा गडी माघार घ्यायला तयार नसतो. रात्री बदाम घेऊन निघालो, तेव्हा हाच बैल तुझ्या दुकानासमोर बसला होता आणि तो आपले आठ आणे देणे लागतो, म्हणून शिंप्याशी भांडत असतो. आपण सुकामेवा कधीच विकला नाही आणि अशा दुकानातही कधी कामाला नव्हतो; म्हणून शिंपी त्याला झटकून टाकत असतो. हे भांडण ऐकून अनेक लोक जमा होतात आणि नशाबाजाचा युक्तीवाद ऐकून हसू लागतात. बैल ही खुण कशी असेल? बैल थोड्या वेळाने उठून अन्यत्रही बसू शकतो. आठ आण्यासाठी कोणी रातोरात धंदा बदलू शकत नाही. लोकही नशाबाजाला समजावू लागतात. पण तो कुणाचे ऐकत नाही. हाच दुकानदार होता आणि याच्याकडूनच बदाम घेतले, असा त्याचा हेका चालू असतो. आपले आठ आणे लुबाडण्यासाठीच त्याने रातोरात धंदा-माल बदलला असाही त्याचा दावा असतो. तो अन्य कोणालाही पटणारा नसला तरी नशाबाज आपल्या मतावर ठाम असतो. पण तोही अखेरीस युक्तीवाद करून दमतो आणि त्या गर्दीसमोरच शिंप्याला आठ आणे एका अटीवर माफ़ करायला तयार होतो. शिंप्यापाशी जाऊन नशाबाज म्हणतो, यार आठ आण्याचे काय मोल तुझ्या कलेसमोर? एका रात्रीत तू धंदा बदललास, शिंपी झालास. सगळा माल बदलून जादूच केलीस. त्याच कलेला आपण आठ आण्याचे बक्षीस देऊन टाकले. फ़क्त एका प्रश्नाचे खरेखुरे योग्य उत्तर मात्र तुला द्यावे लागेल. सगळ्या गोष्टी लबाडीसाठी करणे शक्य आहे. पण एका रात्रीत तू इतकी लांबलचक दाढी कशी वाढवू शकलास, त्याचे रहस्य तितके सांग. तुला आठ आणे माफ़ केले. आता जमलेल्या लोकांनाही कपाळावर हात मारायची पाळी येते. कारण हा इसम बैल आपली जागा बदलू शकतो, हे साधे सत्य मानायला राजी नव्हता आणि तितक्याच आधारावर शिंपीच सुकामेवा विकणारा दुकानदार म्हणून वाद घालीत होता.

त्या शाळकरी बालवयातही आम्हा मुलांना त्यातली गंमत कळली होती. मग आजच्या सुप्रिम कोर्टात नवनव्या याचिका घेऊन जात बलात्कार्‍यांना वाचवू बघणार्‍या महान वकीलांना न्यायनिवाड्याचा अर्थ समजत नसेल काय? आपण त्या कथेतल्या नशाबाजासारखा पोरकट विनोद करतोय, खुळेपणा करतोय, इतकेही भान अशा वकीलांना उरलेले नाही काय? बैल आपल्या बसायच्या जागा बदलतो म्हणून त्याला खुण म्हणून वापरता येत नाही. तसाच यांना हायकोर्ट वा सुप्रिम कोर्टाचा न्याय वाटतो काय? राष्ट्रपतींकडे शिक्षा कमी करण्यासाठी केलेला दयेचा अर्ज वा त्यावरील आलेला निकाल, यांना त्या कुठेही बसणार्‍या बैलासारखा आशय बदलणारा वाटतो काय? नसेल तर हा कसला खेळ चालला आहे? सुप्रिम कोर्ट ही देशातील न्यायनिवाड्याची अंतिम जागा असेल, तर त्याच्या निवाड्यांना इतक्या सहजपणे सतत आव्हाने दिली जाऊ शकतात काय? इतक्या लागोपाठ त्याच त्याच विषयावर फ़ेरविचार करायचे अर्ज येऊ शकतात काय? सुप्रिम कोर्ट तरी अशा पोरखेळाला कितपत प्रोत्साहन देणार आहे? निर्भयाचे बलात्कारी सात वर्ष जीवंत आहेत, कारण त्यांना त्या नशाबाजाप्रमाणे कायद्याशी मोकाट खेळू देण्यात आले आहे. सतत नवनवे अर्ज करून ही फ़ाशी अडवण्यात आली. पण आता हैद्राबादच्या तशाच घटनेनंतर चकमकीत ते आरोपी मारले गेल्यावर लोकांना तो ‘न्याय’ आवडला, तेव्हाच अंतिम  निकाल म्हणून फ़ाशीचा दिवस ठरलेला होता. पण २२ जानेवारीवरून पुन्हा तारीख १ फ़ेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली गेली. कारण कोणा आरोपीच्या वकीलाने नवा अर्ज केला होता. अजून अर्ज चालू आहेत आणि अशा विनोदी बातम्याही चालू आहेत. यातला पोरखेळ सुद्धा माध्यमांना व न्यायालयीन कामात गुंतलेल्यांना समजत नाही काय? असे अर्ज करणारे व त्यावरून युक्तीवादाचे नाटक रंगवणारे, त्या कथेतील नशाबाजापेक्षा किंचीत वेगळे असतील तर जरूर सांगा.

3 comments:

  1. दुर्दैव आहे आपल भाऊ की हे लोकं आपल्या देशात नंगानाच करू शकतात.निर्भयाच्या आईला पोच नसलेले सल्ले देऊ शकतात आणि परत सरकारच्या नावाने बोंबा मारायला मोकळे

    ReplyDelete
  2. भाऊ, कहाणी पढकर मजा आया!... मलाही प्रश्र्न पडतो ,वारंवार,सुप्रिम कोर्टात जायला या रस्त्यावरील गुन्हेगारांना पैसा कोण देते आहे, की हे मोठे रॅकेट आहे.कृपया लिहावे. धन्यवाद. गुड डे

    ReplyDelete
  3. श्री भाऊ मी उल्हासनगर ला रहातो, आमच्याकडे रस्ता रुंदी चे काम गेली 25 वर्षे रखडले आहे निव्वळ कोर्ट बाजी करून हे काम अक्षरशः रखडले आहे

    ReplyDelete