महायुती मोडून शिवसेनेने दोन्ही कॉग्रेसच्या आघाडीशी घरोबा केला. त्यामुळे बहूमत मिळून वा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या जागा मिळाल्या असताना भाजपाला विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की आलेली आहे. त्याचा सल असणे स्वाभाविक आहे. हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्याचे दु:ख सोपे नसते. त्याहीपेक्षा युती करणार्या दोस्तानेच दगा दिल्याने पारंपारिक शत्रूचे यश खुपणारे असते. अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नव्या सरकारचे लहानमोठे दोष दाखवून टिका करण्याचा भाजपाला होणारा मोह चुकीचा म्हणता येणार नाही. पण राजकारणात अनेकदा योग्य संधीची वाट बघण्यालाही तितकेच महत्व असते. किंबहूना त्यासाठी प्रतिस्पर्ध्याने आपल्याला हवी तशी संधी निर्माण करून देण्यास त्याला प्रोत्साहीत करण्यालाही राजकारण म्हणतात. आपल्या देशातले अनेक राजकीय पक्ष तिथेच तोकडे पडतात. ते आपल्या स्पर्धकाला चुकायची संधी देण्यात कमी पडतात आणि म्हणूनही अनेकदा त्यांना पोषक अशी स्थिती निर्माण व्हायला खुप वेळ लागतो. महाराष्ट्रात तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजपाने विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे सरकारवर सुरू केलेली सरबत्ती, चुकीचे राजकारण म्हणावे लागेल. कारण आज भाजपाने कितीही चुकीच्या भूमिका वा धोरणावर बोट ठेवले, तरी त्यांकडे वैफ़ल्यग्रस्त चिडचीड म्हणूनच बघितले जाणार आहे. त्यापेक्षा काहीकाळ नव्या नवलाईच्या सरकारला मनसोक्त सत्ता भोगून चुका करण्याची मोकळीक दिली पाहिजे. किंबहूना विरोधी पक्षाने नामानिराळे राहून जनतेतून आवाज उठण्याची प्रतिक्षा केली पाहिजे. ती वेळ दुर नसते. कारण तुमच्या विरोधाला जनतेचा प्रतिसाद मिळायची परिस्थिती नसते, तेव्हाचा विरोध वांझोटा असतो. निरूपयोगी असतो, तसाच सत्ताधारी पक्षाला उपकारक ठरत असतो.
ताजे उदाहरण कर्नाटकातले आहे. तिथे विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, तरी त्याचे बहूमत थोडक्यात हुकलेले होते. त्याला खिजवण्यासाठीच कॉग्रेसने जनता दलाच्या कुमारस्वामींना लहान पक्ष असूनही मुख्यमंत्रीपद देऊन टाकले. त्यापुर्वी येदीयुरप्पांनी सरकार स्थापन करून अवमानित मार्गाने माघार घेतली होती. पण त्यानंतर जे आघाडी सरकार बनले्, त्याला आपल्याच ओझ्याखाली कोसळण्यापर्यंत त्यांनी वाट बघितली. एकाहून अधिक पक्षांची सरकारे बनतात, तेव्हा तिसर्या कुणाला तरी सत्तेपासून वंचित ठेवण्याची सक्ती त्यांना एकत्र आणत असते. पण अशा तिसर्याचा वा स्पर्धकाचा धोका संपला, मग त्यांची आपसातील मूलभूत भांडणे उफ़ाळून येऊ लागतात. कर्नाटकात भाजपाचे सरकार कोसळल्यावर कॉग्रेस जनता दलाचे सरकार सत्तेत आले आणि निर्वेधपण्वे बहूमत सिद्ध झाल्यावर वर्षभरात कोसळले. कारण आपले आमदार अधिक असूनही ज्या पक्षाच्या अनेकांना मंत्रीपदे मिळालेली नव्हती, त्यांच्या कुरबुरी सुरू झाल्या. त्यातही कॉग्रेसची मोठी आमदार संख्या असूनही सत्तेच्या बाहेर बसलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या नव्या मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याची संधी कायम शोधत राहिले. त्यांचेच अनेक सहकारी संयुक्त सरकार पाडायला सिद्ध झाले. अशा असंतुष्टांना सत्ता व पदाचा मोह आवरता येत नसतो आणि त्यांना आमिष दाखवून सरकार पाडायला वापरता येत असते. कॉग्रेस व जनता दलातले असे दिड डझन आमदार आपली आमदारकी सोडून स्वपक्षीय सरकार पाडायला भाजपा सोबत आले. कारण ते आपल्या पक्षामध्ये वा पक्षाने केलेल्या राजकीय तडजोडीमुळे निराश नाराज होते. आताही इथल्या तीन पक्षीय महाविकास आघाडीतले आंतर्विरोध थोडेथोडके नाहीत. ते उफ़ाळून येण्यासाठी काहीकाळ जायला हवा आहे. त्यासाठी पोषक परिस्थिती यायला हवी आहे.
पाच आठवड्यांनी कालपरवा या आघाडी सरकारचा विस्तार करणे नव्या मुख्यमंत्र्यांना शक्य झाले. कारण तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवणे असा असला, तरी मुळचा उद्देश सत्तेत अधिक हिस्सा मिळवण्याचाच होता. त्यासाठी मग प्रत्येक पक्षाला सौदे करावे लागतात आणि त्या सौद्यामध्ये आपल्यातल्या अनेक नेत्यांना निराश करावे लागत असते. मग त्यात कोणाला निराश ठेवूनही आघाडी टिकू शकेल, असा विचार प्राधान्याचा होतो. कुठला पक्ष कमाल हट्ट करतो आणि कुठला किमान वाट्यावर समाधान मानतो, यावरच आघाडी टिकत असते वा चालत असते. मात्र जोवर त्यांना सत्ताच हातातली जाईल अशी भिती वाटत राहिल, तितका काळ आघाडीची विण पक्की असते. तो धोका संपला, म्हणजे एकमेकांच्या उरावर बसण्याला प्राधान्य मिळणार असते. कर्नाटकात वा अन्यत्र तेच वारंवार घडलेले आहे. आघाडीची सत्ता जाण्याची वेळ आली, तोपर्यत त्यातला कुठलाही पक्ष आपल्यापैकी कुणाही असंतुष्टाला किंमत द्यायला तयार नव्हता. पण त्या आमदारांनी सभापतीकडे राजिनामे देऊन टोकाची भूमिका घेतली, तेव्हाच सत्तेतले मोठे नेते आपल्या नाराजांना मंत्रीपदे देण्यापर्यंत शरणागत झालेले होते. पण तेव्हा माघारीची वेळ गेलेली होती. येदीयुरप्पा यांनी ती नाराजी उफ़ाळून येण्यापर्यंत संयमाने प्रतिक्षा केली, हे मोठे राजकारण होते. तुम्ही सरकार बनवले आहे, तर चांगले चालवा; म्हणुन त्यांनी कॉग्रेस जनता दलाला मोकळीक दिली आणि हळुहळू त्यांच्यातली भांडणे चव्हाट्यावर येत गेली. ती भांडणे विकोपास जाईपर्यंत भाजपा शांत होता आणि त्याने त्यात ढवळाढवळही केली नाही. सत्ताधारी आघाडीतले नाराज भाजपाकडे न्याय मागायला आले नाहीत, तोपर्यंत कळ काढण्याला खरा डावपेच म्हटले पाहिजे. महाराष्ट्रातली ही सत्तेसाठी एकवटलेली तीन पक्षांची आघाडी, किंचीतही वेगळी नाही. फ़क्त तिला आपल्या गतीने व ओझ्याने पडायची संधी द्यायला हवी आहे.
शिवसेनेसारख्या आक्रमक संघटनेला कितीकाळ संयम राखता येईल व किती सोशिकता दाखवता येईल? आधीच त्यांना जाचक अटी घालून कॉग्रेसने शरणागत केलेले आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्याच्या बदल्यात शिवसेनेने आपले हिंदूत्व पातळ केलेले आहे. बाळासाहेबांच्या नावाला जोडलेली ‘हिंदूहृदयसम्राट’ ही उपाधी गुंडाळून ठेवली आहे. इतकी शरणागती सहकारी पक्ष सोडतो, तेव्हा जोडीदारांना अधिक हिंमत येत असते आणि ते अधिकाधिक किंमत मागू लागतात. आताही सर्वाधिक मंत्रीपदे सेनेला असा बेत होता. पण राष्ट्रवादी सर्वात जास्त मंत्रीपदे घेऊन गेलेला आहे. शिवाय अपक्ष आमदारांना सेनेच्या कोट्यातून मंत्रीपदे द्यायला भाग पाडण्यात आलेले आहे. सेनेच्या दिग्गज नेत्यांना सत्तेबाहेर बसायची वेळ आलेली आहे आणि त्यांच्यासहीत इतर पक्षातले व मित्रपक्षातले नाराजीचे आवाज उठूही लागले आहेत. त्यातून कुठल्याही आघाडी वा युती सरकारची सुटका नसते. मात्र त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागत असतो. या आघाडीचे शिल्पकारच शपथविधीला अनुपस्थित रहातात, यातून येऊ घातलेल्या भविष्याची चाहुल लागत असते. यात अडथळा आणणे अनावश्यक आहे. भाजपा जितका हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करील तितका तो आघाडीला अधिक सुरक्षा देईल. बाहेरचा धोका असेपर्यंतच आतली एकजुट कायम असते. बाहेरचा धोका नसला, मग घरात कुटुंबातही हेवेदावे उफ़ाळून येत असतात. त्यापेक्षा आघाडी युतीचे राजकारण वेगळे नसते. ज्यांना त्यात बाधा आणायची असते, त्यांनी काड्या घालण्यापेक्षा आतला बेबनाव बाहेर येण्याची प्रतिक्षा करण्याला राजकारण म्हणतात. मुद्दा इतकाच, की तीन पक्षांनी जे सरकार बनवले आहे. त्यांना सत्तेची मस्ती करू देणे व आत्मघातकी कृत्ये करायला मोकळीक देण्यात भाजपाचे राजकारण सामावले आहे.
भाऊ, मस्त! "शिवसेनेने आपले हिंदुत्व पातळ केले" हा शब्द प्रयोग मनापासून आवडला, व एकटाच खूप हसलो. इतके दिवस माया पातळ होते ते माहीत होते.
ReplyDeleteसंयम ठेवायला हवाय हा मुद्दा माझ्याही डोक्यात सतत घोटाळत होता व त्याला आपण अंजाम द्याल अशी खात्री होतीच. आपण हा मुद्दा अतिशय प्रभावी पणे ह्या लेखातून मांडला आहे. भाजपाने त्यावर प्रयत्नपूर्वक व अत्यंत शांत डोक्याने विचार करायला हवा. बारिक सारिक चुका दाखवत विधानसभेचा वेळ खावू नये. उलट त्यामुळे ही आघाडी अधिक पक्की होण्याचा धोका त्यातून संभवतो. खरोखरीच एखादा चांगला प्रयत्न हे सरकार करित असेल तर त्याला मोठ्या व मोकळ्या मनाने पाठींबा पण द्यायला हवा. जनमानसात शिरून अधिक प्रभावी मुद्दे गोळा करायला हवेत. सत्तर टक्क्याला बाजूला बसवून तीन चाळिसवाले एकत्र येवून ...वगैरे मुद्दॆ आता बाद आहेत. मुख्य म्हणजे तॊंडपाटीलकी बंद करायला हवी. एखादे शॅडो कॅबीनेट बनवून नवीन सरकारच्या कारभारावर बारीक लक्ष असावे पण त्याची वाच्यता नसावी. आपण सांगत आहात तशी एखादी मोठी संधी आपोआपच येईल तेव्हा घाला घालणे इष्ट ठरेल. भाजपा ला जनमानसाचा कानोसा घ्यायला आयती आलेली ही संधी वाया घालवू नये. एका चांगल्या मुद्द्याचा उहापोह भाऊ आपण केलाय. बघुया भाजपा त्याचा कसा लाभ घेतो.
ReplyDelete"बाहेरचा धोका असेपर्यंतच आतली एकजुट कायम असते. बाहेरचा धोका नसला, मग घरात कुटुंबातही हेवेदावे उफ़ाळून येत असतात"
ReplyDeleteअतिशय मार्मिक...
फडणवीस विसरलेले असावेत "शत्रू चुका करत असताना, त्याला थांबविण्याची चूक करु नका"...
पण मुंबईत ' गेट वे ऑफ इंडिया ' वर काश्मीर स्वतंत्र करा म्हणून बोर्ड़ लागले तरी सहन करायचे का ? .... उद्धवा अजब तुझे सरकार.
ReplyDeleteमाननीय भाऊ
ReplyDeleteतुम्ही लिहिता ते खरे आहे . फडणवीस अलीकडे सतत शिवसेनेने आमचा घात केला असं जेव्हा म्हणतात तेव्हा केविलवाणे वाटतात . समर्थ विरोधी पक्षनेते वाटत नाहीत . आता जे होऊन गेलं त्यावर काथ्याकुट करत बसण्यात अर्थ नाही . या सरकारला योग्य पध्दतीने ( सूड उगवण्यासाठी नव्हे ) कोंडीत पकडणे आणि त्यांना उघडे पाडणे हा एकच उपाय आहे . आणि तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे चुका करण्यास मोकळीक देणे ज्यामुळे ते स्वतःच कोसळतील !
प्रशांत केतकर _
Well said Bhau wait at least up to 6month no sharp critisizm allow them to run. Differences will automatically surface and common man will b also disillusioned which will b right time to attack.
ReplyDeleteएकदम खरंय भाऊ
ReplyDeleteखूप चांगला लेख
ReplyDeleteअगदी समर्पक सल्ला भाजपला।
ReplyDeleteपण त्यांनी ऐकला पाहिजे
अगदी मनातलं बोललात भाऊ तुम्ही. तुमचा हा लेख देवेंद्र जी ने वाचायला हवा
ReplyDeleteराज्यात निवडणूक पूर्व युती होती. भाजपा शिवसेनेस संपूर्ण बहुमत होते अश्यावेळी शरद पवारांच्या नादी लागून शिवसेनेने फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याच्या स्वप्नाच्या पायजम्याची नाडी सोडली व त्यातून जी राजकीय
ReplyDeleteपरिस्थिती भाजपा व फडणवीसांवर कोसळली त्यातून
रँडमनेस-भाग्य, विसंगती, दुविधांमुळे अंग्विश, अनॉमी म्हणजे नियमरहितता, एलियनेशन आत्मवियोग, अब्सर्डिटी असंबद्धता, पर्पजलेसनेस प्रयोजनशून्यता, बोअरडम कंटाळा, हे राजकीय जाणीवेतल्या अस्तित्वाला भेडसावणारे प्रश्न आपल्या समोर आहेत ह्याची फडणवीसांना व पर्यायाने भाजपाला झाली असावी. भाऊ सयंम हे कारण असू शकते सयंम का राखला पाहिजे हे यशस्वी व्यक्ती सयंम राखला म्हणून यश मिळाले असे कारण सांगू शकते. सयंम हे प्रयोजन नाही. जो उगवता राज्यकर्तावर्ग असंतुष्ट सत्तालोलुपांमधील इच्छुकांची वाट मोकळी करतो, त्याच्या बाजूने उभे राहण्यात इच्छुकांना फायदा असतो. कारण सत्ता मिळण्याची शक्ती वाढली, की रिकामंटेकडेपण सौम्य होते; सत्तेशिवाय झेपवणे फार अवघड असं असताना भाजपा सक्षम विरोधी पक्ष म्हणून उद्धवरावांच्या काड्या करणार. खरं तर भाऊ फडणवीस ह्यांच्या समोर काय केले पाहिजे? हा प्रश्न वेगळा म्हणून आ वासून उभा आहेच आणि "आहे "ते आपल्याला मत देणाऱ्या मतदारांच्या कमीत कमी मानसिकऱ्हासानिशी कसे स्वीकारायचे? हा अगदी वेगळा प्रश्न फडणवीस ह्यांच्या प्रचंड मोठा आ वासून उभाआहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या विचारक्रिया लागतात. नॉन-झेप मोडमध्ये न जाता झेप-मोडमध्ये रहाणे हे फडणवीसांना अत्यंत आवश्यक असेल. ज्याला तुम्ही संयम म्हणता तो संयम राजकारणातील मानसिक ऊर्जेचे अर्थशास्त्र सांभाळत नाही. गोची होऊन बसण्याअगोदर ती होऊच नये म्हणून काळजी घेणे ज्याला प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणता येईल, ती घेण्यात फडणवीस कमी
पडले. प्रिव्हेंटिव्ह थेरपी केलीच नाही. बर फडणवीसांनी तुम्ही म्हणता असा संयम पाळलाच तरी यशाची खात्री कुठेय? आहे त्या लादले गेलेल्या सत्ताहीन परिस्थितीचा
स्वीकार फडणवीसांना आला की परिवर्तनवाद गेलाच असे होणारच. नैतिकता ही फक्त कर्तव्यांपर्यंत पोहोचते असे म्हणतात. विरोधी पक्ष म्हणून फडणवीस उद्धवरावांना आडवे
लावणारच. संयम कुठे असणार? वास्तवात असणे म्हणजेच अस्तित्वात असणे हाच विचार फडणवीसांना ग्रासणार. भाऊ
समोर पवार आहेत. ढोंगीपणा वाईटच. पण तथ्यात्मक आणि मूल्यात्मक असे दोन ढोंगीपणा असतात. व्यायाम करायचा नाही पण मारुतीला नमस्कार करायचा हे अप्रामाणिक आहे उद्धवरावांना आतापर्यंत मारुतीला नमस्कार करायचा व मातोश्रीवरून आदेश द्यायचा हेच जमले आहे. आता शरद पवारांच्या फिटनेस शेड्युल साठी उद्धवरावांना व्यायाम करावा लागेल. सिल्व्हर ओक वरून आदेश सुटतील मातोश्री
महती गुंडाळून सिल्व्हर ओक वरून सुटलेले आदेश पाळता
पाळता उद्धवराव जेरीस येतील. बिलीफ खरा की खोटा यापेक्षा विल टू बिलीव्ह किती स्ट्रॉग आहे हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो. बिलीफ मधली हवा काढून घेण्याचे ‘खरे की खोटे?’ याहून वेगळे मार्ग असतात. बघू या फडणवीस
संयम राखतील कि विल टू बिलीव्ह राखतील? भाऊ काय म्हणजे चांगले? हे सांगायला खूपजण आहेत. वाईटातून कमी वाईट कमी वाईटातून आणखी कमी वाईट असे ओढत आणावे लागते. फडणवीसांनी तुमचे लेख वाचले तर फडणवीसांच्या राजकीय उदयाचा अस्त अकाली होणार नाही
सुरुवात शिकणाऱ्याच्या धारणांपासून करावी लागते शिकवणाऱ्याच्या नव्हे. तुमचे लेख नेमके शिकणाऱ्याच्या धारणांचे नकळत ऑडिट करतात. तुम्ही लिहीत राहावे म्हणून हे बोललो. विरोध करायचा म्हणून नाही.
अगदी बरोबर, संध्या पुष्कळ मिळतील, परवाचं गेटवेच आंदोलन, त्यात अकारण देशविघातक धोरण दर्शवणारी महक आणी तिच केविलवाणे समर्थन करणारे हेडमास्तर.संयम आवश्यक आहे, पोरकट आक्रस्ताळेपणा करुन काही साध्य होणार नाही. धन्यवाद.
ReplyDeleteहिंदूहृदयसम्राट ही उपाधी ... दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात .उपाधी या शब्दाचा पदवी या अर्थाने वापर हिंदीत केला जातो. मराठीत नव्हे .मराठीत उपाधी म्हणजे नस्ता त्रास , ब्याद .दुसरे स्वा. सावरकर याना ही पदवी प्रथम लावली जात असे नंतर हिंदू महासभा जवळजवळ अस्तंगत झाली आणि सावरकर यांचे नष्टचर्य अजूनही संपलेल नाही.वेगवेगळ्या कारणांनी ते वादविषय होत असते. त्यांचे कर्तृत्व उपेक्षितच राहिले .
ReplyDelete