दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात जो हिंसाचार झाला, त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतही काही विद्यार्थी संघटना म्हणवून घेणार्या घोळक्यांनी निदर्शने केलेली होती. ही आजकाल फ़ॅशन झालेली आहे. कुठलेही निमीत्त काढून अशा टोळीची निदर्शने होत असतात. त्यांचा हेतू कुठूनही प्रसिद्धीच्या झोतात रहाणे असाच असतो. कारण हेतू वा उद्देश कसला, याच्याही त्यांना तीळमात्र कर्तव्य नसते. ह्या नाटकाला इतकी प्रसिद्धी मिळू लागली आहे, की आता तिथेही आपल्या सिनेमाचे प्रमोशन करायला कलावंतही घुसू लागले आहेत. अन्यथा आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामासाठी झाडे तोडण्यावरून रंगलेल्या नाटकाला श्रद्धा कपूर कशाला धावली असती? नंतरच्या नागरिकत्व निदर्शनाच्या जमावात ती कुठे झळकली नाही. जेव्हा आली, त्याच्या जवळपास तिचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता आणि कालपरवा, दीपिका पादुकोण ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्तकाळ शोधूनच दिल्लीतल्या नेहरू विद्यापीठात धडकली होती. म्हणून त्याला फ़ॅशन म्हणायचे. नंतर त्या झाडांचे काय झाले वा कारशेडच्या बाबतीत कसली प्रगती अधोगती आहे, त्याकडे श्रद्धाने ढुंकून पाहिले नाही, की आता दीपिकाची नेहरू विद्यापीठाचे प्रकरण विसरून गेली आहे. मात्र या मुख्य कलावंतांना सोडल्यास अशा घोळक्यातले अन्य कलावंत नेहमीचेच असतात. त्यांना डावे पुरोगामी वगैरे म्हटले जाते. आजकालच्या चित्रपटात एखादे संदर्भहीन चटकदार गाणे असते व त्यावरचा शरीर हिंदकळून सोडणारा नाच असतो. त्याला आयटेम सॉन्ग म्हणतात. तशी ही निदर्शने झाली असून, त्यामध्ये मुख्य कलावंतांच्या आसपास नाचणारे शोभेचे नाचे असतात, तशी ही कायमची यशस्वी पुरोगामी गर्दी झाली आहे. मात्र आपल्यावरही थोडाफ़ार प्रकाशझोत पडावा, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यातून मग त्यामध्ये काही चमत्कारीक वेडगळ कृती करण्याचीही स्वतंत्र स्पर्धा चालू असते. ‘फ़्री काश्मिर’ हा त्यातलाच प्रकार आहे.
दिल्लीतल्या नाटकानंतर मुंबईत असाच प्रकार झाला होता आणि त्यात मुख्य कलावंत बाजूला पडून एका भलत्या मुलीने गेटवेच्या ‘आयटेम’मध्ये माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आणि आता तोच नवा आयटेम होऊ लागलेला आहे. म्हणूनच त्याला आयटेम म्हणावे लागते. नागरिकत्व कायदा वा नेहरू विद्यापीठाच्या हिंसाचाराचा आणि काश्मिरचा काय संबंध आहे? पण गेटवेजवळ तसा फ़लक घेऊन एक मुलगी उभी राहिली व पोलिसांना तिच्या त्या आक्षेपार्ह घोषणा फ़लकासाठी गुन्हा दाखल करावा लागला. कारण नाचगाणी करणार्यांना त्यात आयटेम दिसत असला, तरी जागतिक घटनाक्रमामध्ये त्या शब्दांना व तशा सादरीकरणाला वेगळा राजकीय अर्थ असतो. त्याकडे बोट दाखवून पाकिस्तानची माध्यमे किंवा जगभरचे भारतद्वेषी पत्रकार; त्याला भारतात होत असलेल्या काश्मिरी जनतेच्या गळचेपीचे नाव देऊन गलका सुरू करतात. म्हणूनच अशा शब्दांना वा प्रचाराला गुन्हा मानले जात असते. तितकेही ठाऊक नसलेल्यांना आपल्या देशात तरूणाई वा विद्यार्थी असे संबोधणारेही दिवाळखोर आहेत. त्यामुळेच गेटवेच्या नाचगाण्यात फ़लक घेऊन नाचणार्या त्या तरूणीची गोची झाली. त्यामागे कोणते कारण आहे, ते तिला सांगता येईना आणि मग तिने पळवाटा शोधायला सुरूवात केली. काश्मिरमध्ये ३७० कलम रद्द केल्यापासून अनेक निर्बंध लागू करण्यात आले, ते हळुहळू उठवले जात आहेत. त्यापैकी इंटरनेटवर निर्बंध असाही एक विषय होता. इंटरनेट सुरू करावे आणि तिथल्या स्वातंत्र्यावरचे निर्बंध उठवावेत, म्हणून तसला फ़लक झळकवला, अशी लंगडी भूमिका मुंबईच्या मुलीने अंगाशी आल्यावर घेतली. थोडक्यात आपण झळकवला तो फ़लक वा त्यातून निघणारा आशय, देशद्रोह वा गुन्हा असल्याची जाणिव तिला झालेली असावी. अन्यथा ठामपणे तिने आपला पवित्रा पुढे रेटायला हवा होता. पण शेपूट घातले म्हणजे देखावा उभा करण्यासाठीच असले नाटक केल्याची निर्लज्ज कबुली तिने दिली.
आता मुद्दा असा, की एकदा असे घडल्यावर आणि त्यातली चुक अप्रत्यक्षपणे मुंबईच्या मुलीने मान्य केल्यावर किमान तितके ज्ञान तरी म्हैसूरच्या पुरोगामी विद्यार्थ्यांना असायला हरकत नसावी ना? म्हणजे ज्यांना दिल्लीतल्या हिंसाचार व मुंबईतल्या निदर्शनापासून प्रेरणा मिळते, त्यांना तिथला किमान घटनाक्रम व परिणाम तरी माहिती असायला नको काय? नसेल तर त्यांना सामान्य ज्ञानही नाही म्हणावे लागते आणि म्हणूनच निर्बुद्धही म्हणणे भाग आहे. हे सामान्य ज्ञान असते, तर म्हैसूरच्या निदर्शन नाट्यामध्ये आणखी एका मुलीने ‘फ़्री काश्मिर’चा ठळक फ़लक झळकावला नसता. तेच झाले आणि तिथेही त्या मुलीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदलेला आहे. जामिनावर तिची मुक्तता झाली आणि आता पुढल्या संकटात ती सापडली आहे. जामिनापुरता एक वकील तिच्या मदतीला उभा राहिला. पण आता पुढला मामला हाताळण्यास त्या वकीलाने नकार दिलेला आहे. कारण त्या घटनेला माध्यमांनी डोक्यावर घेऊन कौतुक केलेले असले, तरी न्यायालयीन कामात माध्यमांची मखलाशी चालत नाही. तिथे कायद्याची जाण असलेला व्यावसायिक वकील मदतीला घ्यावा लागत असतो. ह्या म्हैसुरच्या मुलीला जामिन मिळवून देणार्या वकीलाने आता तिचे वकीलपत्र सोडलेले असून, नवा वकील मिळताना मारामार झालेली आहे. कारण तिथल्या बार कौन्सील म्हणजे वकील संघटनेने ठराव करून या मुलीचे वकीलपत्र घेण्यास आपल्या सदस्य वकीलांना प्रतिबंध घातला आहे. मग तिला अक्कल आली आणि आपण काश्मिरची ‘आझादी’ नव्हेतर इंटरनेटच्या बंदीपासून मुक्ती, अशा हेतूने फ़लक झळकवला अशी मखलाशी तिने सोशल मीडियात टाकलेल्या व्हिडीओतून केली आहे. ह्याला निव्वळ भामटेगिरी म्हणतात. कारण तितकी वा तशीच मागणी असेल तर त्या दोन शब्दांच्याही पुढे एक क्षुल्लक इंटरनेट असा शब्द टाकता आला असता ना? इतकीच कंजुषी कशाला?
अर्थात ही भामटेगिरी आहे आणि त्यातही नवे काहीच नाही. अशा भंपकबाजीचा मेरूमणी कन्हैयाकुमार यानेही काही वर्षापुर्वी अशीच मखलाशी केलेली होती. अफ़जल गुरूच्या पुण्यतिथी निमीत्ताने जमवलेल्या गर्दीकडून घोषणा वदवून घेताना त्यानेही अशीच भारतसे आझादी नव्हेतर भारताची आझादी, असल्या कोलांट्या उड्या मारलेल्या होत्याच. आता त्या म्हैसूरच्या मुलीचे अनेक आश्रयदाते निघतील. म्हैसुर बाहेरून तिची बाजू मांडायला डाव्या वकीलांची फ़ौज तिथे धाडली जाईल. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन म्हैसुरच्या वकील संघटनेला संघवादी वा हिंदूत्ववादी म्हणून हेटाळणी सुरू होईल. पण म्हणून बिथरून जाण्याचे कारण नाही. ही देखील एक फ़ॅशनच झालेली आहे. काहीही गुन्हा करायचा आणि त्यासाठी कायद्याच्या कचाट्यात आले; मग आपण पुरोगामी असल्याने सूडबुद्धीने कारवाई झाल्याचाही डंका पिटण्याचा भारतीयांना आता सराव झाला आहे. तरूण तेजपाल याने एका मुलीचा विनयभंग करीत बलात्काराचा प्रयास केला होता. तर त्याने आरोपाचा इन्कारही केला नव्हता. पण पोलिस यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारल्यावर मात्र पोलिसांनाच प्रतिगामी ठरवण्यात धन्यता मानलेली होती. थोडक्यात पुरोगामी राजकारणाचा अजेंडा ठरलेला आहे. त्यात कुठलाही गुन्हा पुरोगाम्याने केलेला असेल तर त्याला निर्दोष मानायचे असते. सहाजिकच याही मुलीला निर्दोष ठरवण्यासाठी पोलिसांसहीत वकील संघटनेवरही आरोप होऊ शकतो. पण त्यामुळे गडबडून जाण्याचे कारण नाही. अशा कोणाला तरी कठोर शिक्षा एकदा व्हायला हवी आहे. कदाचित गुन्हा किरकोळ आहे म्हणून माफ़ी मिळता कामा नये. कारण ही घातक फ़ॅशन बोकाळत चालली आहे आणि त्याच्या आडोशानेच भयंकर गुन्हेगारी सोकावत असते. म्हणतात ना? म्हातारी मेल्याचे दु:ख नसते. काळ सोकावता कामा नये. तसेच इथेही एका मुलीच्या उतावळ्या कृतीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. तरच कायद्याचा धाक निर्माण होतो आणि फ़ॅशन वा विरंगुळा म्हणुन जनजीवन अस्ताव्यस्त करण्याच्या प्रवृत्तीला पायबंद घातला जाऊ शकतो. निदान त्यांना सोकावण्यापासून रोखले जाऊ शकते.
बरोबर आहे भाऊ, पण शिक्षेबरोबरच शिक्षेची प्रसिद्धीही व्हायला हवी. तरच कायद्याचा धाक बसेल
ReplyDeleteजागतिकीकरण झाल्या पुढच्या नवीन पिढीने
ReplyDeleteदैनंदिन जीवनात संघर्ष हा कधी बघितला नाहीये. अन्न,वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा आणि नंतर जीवनमानात झालेली सुधारणा त्यामुळे आधुनिक सुखसोयी ह्या त्यांना सहज मिळाल्या आहेत. त्यामुळे ह्या स्वातंत्र्याची त्यांना किंमत कळत नाही. म्हणून ही असली थेर सुचतात.
perfect analysis.
Deleteयोग्य मुद्दे.एन आर सी चा विचार केला नाही,असे पंतप्रधानांनी जाहीर सांगितले. तरीही सीएए-एन आर सी एकत्र प्रयोग करून धूळफेक करीत आहेत.डावे यात आघाडीवर आहेत. त्यामुळे चांगला लेख. शेअरिंग
ReplyDeleteBedhund ani bejababdar vagne mhanje Kahi tari great ashi aaj kalchya tarunsichi vrutti zali ahe. Titok videos pubg game he tyache udaharan ahet.
ReplyDeleteMulat ghar ya sansthela ji gharghad lagli tyatun vyabhichar ani bechutpana vadhla. Desh dev ani dharm yache sanskar Sampat chalet. Hindu kiwa hindustani asnyachi jababdari tyana sangitlich jaat nahi
Nuste adhikar pahijet swair swatantra pahije pan basic kartavya hi nakot.
बाकी सर्व बरोबर असले तरीदेखील तुमचा एक मुद्दा मलापटलेला नाही भाऊ .ज्या सिने कलाकारांची नावे आपण घेतलीत ते काही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चळवळीमध्ये सहभागी होत नाहीत .तर अशा डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांची कलाकार म्हणून उभी केलेली एक मोठी फळी भारतामध्ये आजही कार्यरत आहे
ReplyDeleteअगदी खरय
ReplyDeleteभाऊ ,अपेक्षेप्रमाणे निर्भिड लेख लिहुन या ढोंगी व प्रसिद्धी लोलुप अशा प्रदर्शनिंचे वाभाडे काढले आहेत.आता या लोकांचे फार लाड झाले आहेत व याला जबाबदार टीआरपी साठी हपापलेल्या वाहिन्या आहेत.दिल्ली येथे गेले महिनाभर रस्त्यावर ठिय्या मांडुन नागरी कायदा सुधारणा व येऊ घातलेल्या NRC ला विरोध करण्याकरता महिला व मुले बसत आहेत. सरळ सरळ ही सर्व मंडळी पैसे देऊन भाड्याने आणली आहेत हे लहान मुल देखिल सांगु शकेल . केवळ मोदी व आमित शाह यांना विरोध या एकाच गोष्टी साठी तौयाःना केजरीवाल यांचे शासन बसु देत आहे.या रस्त्याचा वापर करणार्या लाखो लोकांचे अनन्वीतहाल होत आहेत ते पोलिस व न्यायालयाला दिसत नाही काय?रोज वाहिन्या या निदर्शकांच्या मुलाखती घेतात व आकारण प्रसिद्धी देतात हे बघुन तळपायाची आग मस्तकात जाते.न्यायालय निदर्शकांचे हक्क मान्य करते पण रस्ता न वापरु शकणार्या सामान्य माणसांचे हक्क कसे विचारात घेत नाही? या निदर्शकांना व त्यांच्या समर्थकांना पोलिसी हिसका दाखवून शासन केले पाहिजे व त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे म्हणजे हे भंपक निदर्शक व त्यांचे प्रायोजक वढणीवर येतिल. आपण या अशा प्रायोजित निदर्शनांवर व त्यांच्या मागे उभ्या राहात असलेल्या प्रायोजकांची पोल खोलणारा लेख लिहावा ही नम्र विनंती .
ReplyDelete"प्रदर्शनी" हा उत्तम शब्द आहे. हे कसले कलावंत प्रतिभावंत? हे केवळ प्रदर्शनी आहेत. दुसरे काही नसेल तेव्हा पैश्या साठी देह प्रदर्शन करणारे.
Deleteपुष्कराज पोफळीकर
शिक्षा, लोकांनी तात्काळ जागेवरच दिली पाहिजे. कोर्टाचे काही खरे नसते.
ReplyDeleteसडेतोड विष्लेशण भाऊ.अतीरेक झालाय या तथाकथित विचारवंतांचा आणी त्यांच्या तथाकथित प्रसिध्दीभंपक आंदोलनांचा.परवा शाहीनबाग च्या नाटकांतील " जीना वाली आजादी" या पाक प्रेमी घोषणेबद्दल विचारणा केली तेव्हा केविलवाणे समर्थन दिले की जीनावाली नाही जीनेवाली.केवढा भंपकपणा आणी कातडीबचाऊपणा !
ReplyDeleteश्री भाऊ अजून एक मुलीवर अशी कारवाई झाली पाहिजे तिने फलक धरला होता "मी गाईला मारली कारण तिने माझी file खाल्ली" मग उद्या डुकरांने खाल्लं म्हणून त्याला मारलं असा फलक लावला तर हेच पुरोगामी कसा गदारोळ घालतील
ReplyDelete