Showing posts with label फ़ाशी. Show all posts
Showing posts with label फ़ाशी. Show all posts

Saturday, August 1, 2015

पाकिस्तानी सेनानीचे भारतीय अनुयायी



   ‘दहशत माजवा, पण दहशतीखाली दबू नका. जिहादी युद्धाची व्याप्ती अखेरीस मानवी हृदय, मन, आत्मा व श्रद्धा यांच्यापुरती असते. जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही. म्हणूनच दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करणे अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’

उपरोक्त उतारा पकिस्तानी ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या पुस्तकातून घेतला आहे. कोण्या एका पाकिस्तानी सेनाधिकार्‍याचे मत वा पुस्तक अशी समजून करून घेण्याचे कारण नाही. मलिक हे शेकडो पाकिस्तानी निवृत्त अधिकार्‍यांपैकी एक नव्हेत. सोवियत युनियनने अफ़गाणिस्तान बळकावल्यानंतर तिथे मुक्तीयुद्ध आरंभले गेले त्याची प्रेरणा पाकिस्तानात होती व अमेरिकन चिथावणीने त्या गमिनी युद्धाच्या झळा अफ़गाण सोवियत सत्तेला सोसाव्या लागत होत्या, अफ़गाण ही इस्लामची भूमी आहे आणि ती बिगरमुस्लिमांच्या तावडीतून मुक्त करणे, हे पृथ्वीतलावरच्या प्रत्येक मुस्लिमाची धार्मिक कर्तव्य आहे, अशी त्यामागची मूळ संकल्पना होती. त्याला अमेरिकेने खतपाणी घातले की आणखी कोणी ते पाप केले, हा विषय अलाहिदा आहे. त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागत आहेत, त्याला प्राधान्य व महत्व आहे. म्हणूनच याकुब मेमन वा आज जगाला भेडसावणार्‍या इस्लामी दहशतवादाचे विश्लेषण करताना, मलिक यांचे पुस्तक महत्वाचे आहे. कारण अफ़गाण जिहादसाठी जी वैचारिक व धार्मिक भूमिका मांडली गेली, तिचे निरूपण याच पुस्तकात आलेले आहे. म्हणूनच मलिक यांच्या ‘कोरनिक कन्सेप्ट ऑफ़ वॉर’ या पुस्तकाला तेव्हाचे पाक लष्करशहा व सेनाप्रमुख जनरल झिला उल हक यांची प्रस्तावना लाभलेली आहे. याकुबच्या निमीत्ताने जो तमाशा मागले आठदहा दिवस चालला, त्यातले अनेक हेतू त्या पुस्तकात आढळतात व त्यापैकीच एक दाखला उपरोक्त परिच्छेदात आहे. जिहाद ही शस्त्राने जिंकण्याची लढाई नाही. जिहाद हे हिंसाचार माजवून जिंकायचे युद्ध नाही. शारिरीक वा शस्त्रास्त्रांच्या बळावर भूमी पादाक्रांत करण्याचा संघर्ष म्हणजे जिहाद नव्हे. तर मानवाच्या मानसिक व भावनिक भूमीवर दहशतीचे राज्य उभे करणे, म्हणजे जिहाद होय. विजय पराभव मानवी श्रद्धांचा होत असतो, याचे इतके नेमके विवेचन क्वचितच कुणा सेनापतीने केलेले असेल. याकुबने काय केले ते अगदीच नगण्य आहे. पण त्याला फ़ाशीच्या दोरापासून वाचवण्याचा जो तमाशा चालला होता, तो जिहादपेक्षाही भयंकर आहे. त्यात कुणी मुस्लिम मुल्ला मौलवी अथवा जिहादी मानसिकतेचा आढळत नाही, हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

याकुबला मूळ खटला चालवणार्‍या कोर्टाने फ़ाशी फ़र्मावून काही वर्षे उलटली आहेत. तेव्हापासून आजपर्यंत त्याने व त्याच्या आप्तस्वकीयांनी सुटकेचे डझनावारी प्रयास केलेले होते. पण शेवटच्या क्षणी त्याच्या मदतीला जी फ़ौज येऊन उभी राहिली, त्यापैकी कोणीच इतकी वर्षे त्यासाठी कशाला पुढे आले नाहीत? आणि नसतील तर मग आजच त्यांना याकुबविषयी इतका मायेचा पान्हा कशाला फ़ुटलेला आहे? मग हिंदूत्ववाद्यांना त्यात मुस्लिम लांगुलचालन दिसेल किंवा अन्य कुणाला सेक्युलर भूमिका दिसेल. पण वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले तर यापैकी कोणाला कुठल्याच धर्माचे वा कुठल्याही राष्ट्राविषयी आत्मियता नसल्याचे दिसून येईल. त्यांना याकुबविषयी सुद्धा आत्मियता नाही. त्यांची लढाई वेगळीच आहे. ते कुठल्या हिंदू श्रद्धेच्या विरोधात उभे ठाकलेले नाहीत. त्यांना हिंदू विरोधी मानणेही चुक आहे. कारण हिंदूंमध्ये कोणीही आपल्या धर्मासाठी वा श्रद्देसाठी लढायला पुढे सरसावणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. कितीही तोंडाळपणा केला तरी शेकड्यांनी हिंदूत्ववादी साध्वी प्रज्ञा वा कर्नल पुरोहित यांच्या समर्थनाला मैदानात उतरले, असे एकदाही दिसलेले नाही. कारण हिंदू कधीच धार्मिक श्रद्धेसाठी लढत नाहीत हा इतिहास आहे. पण तेच बहुतांश हिंदू कायदा, संविधान व राष्ट्रीय एकात्मता यासाठी मात्र प्राणाची बाजी लावायला धावून येतील, याची तितकीच खात्री देता येते. थोडक्यात आज ज्यांना हिंदू म्हणून ओळखले जाते, त्यांच्यासाठी धर्मापेक्षा राष्ट्र, त्याची एकत्मता वा राष्ट्रीय स्वाभिमान हीच प्रभावी श्रद्धा झालेली आहे. तोच एक धर्म बनला आहे. मग त्यासाठी लढायची त्यांची हिंमत खच्ची केल्याशिवाय त्या राष्ट्राला पराभूत करणे शक्य आहे काय? सीमेवर लढणारा सैनिक असो किंवा कसाबला थेट जाऊन भिडलेला तुकाराम ओंबळे असो, त्यांची श्रद्धा आपल्या धर्मापेक्षा संविधान, कायदा वा राष्ट्र या संकल्पनेशी निगडीत दिसेल. तीच श्रद्धा भारताचे खरे बळ आहे. तीच श्रद्धा खच्ची करायची म्हणून याकुबच्या निमीत्ताने कायदा, न्याय याविषयीच्या श्रद्धेवर आघात करायला जे समोर आले, त्याला जिहादचे नवे रूप म्हणून बघायला हवे. या तमाम लोकांनी कुठे हिंदूंना शिव्या घातल्या नाहीत की इस्लामचा गौरव केला नाही. पण त्यांनी न्यायप्रिय भारताची विटंबना करण्याचा अट्टाहास केला आहे.

आज जगभर ज्याला भारत म्हणून ओळखले जाते, त्याला मुठभर पुरोगाम्यांनी हिंदूत्वाचा रंग भले दिलेला असो, पण या उपखंडाचा धर्म नेहमी व आजही ‘राष्ट्र’ हाच राहिला आहे. त्याच ‘धर्म’श्रद्धेने इस्लाम वा अन्य कुठल्या आक्रमणाला दाद दिली नाही. परक्यांशी झुंज धर्माच्या आधारे दिली नाही. इथल्या बहुसंख्यांचा व्यक्तीगत जीवनातील हिंदू हे कर्मकांड राहिले असेल. पण त्यांचा सामुहिक धर्म कायम राष्ट्र हाच राहिला आहे. आणि तीच ‘राष्ट्र’धर्मश्रद्धा कुणाला पराभूत करता येत नाही. जोवर ती श्रद्धा भक्कम आहे, तोवर पाकिस्तान काय किंवा अन्य कोणीही या खंडप्राय राष्ट्राला पराभूत करू शकत नाही. शतकानुशतके आक्रमणे पचवून इथे राष्ट्रीय श्रद्धा टिकून राहिली, ती हिंदू नामक धर्मश्रद्धा नव्हती व नाही. तीच राष्ट्रश्रद्धा होती. आणि ती जितकी भक्कम आहे तितके भीषण हल्ले पचवण्याशी कुवत अधिक आहे. दहशतीला आपण भीक घालत नाही, त्याचे तेच एकमेव कारण आहे. ती श्रद्धा व्यक्त करण्याचा आजचा मार्ग पूजापाठ नसून कायदा, घटना व न्यायाचा आदर होय. याकुबच्या निमीत्ताने कशावर हल्ला झाला? त्याच न्याय व कायद्याच्या श्रद्धेवर हल्ला झालेला आहे. कारण ती भारतीयांची धर्मश्रद्धा बनलेली आहे. इतके गुन्हे सिद्ध होऊनही याकुबच्या अंत्ययात्रेला हजारो मुस्लिमांनी गर्दी केली, त्याला इस्लामवरची श्रद्धा म्हणता येईल. उलट साध्वी वा पुरोहित यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा अजून सिद्ध झालेला नसला, तरी त्यांच्या समर्थनासाठी मुठभरही हिंदूलोक पुढे येत नाहीत. कारण ती त्यांची धर्मश्रद्धा नाही. तो धर्म त्यांच्या व्यक्तीगत श्रद्धेचा भाग आहे. उलट राष्ट्र हा धर्म आहे. म्हणून पुरोगामी हल्ला कुठे केला जातोय? न्याय, कायदा व राज्यघटनेवर. आणि चवताळून प्रतिक्रिया त्याचसाठी उमटल्या आहेत. साध्वी वा कर्नलसाठी उठत नाहीत, इतक्या संतप्त प्रतिक्रिया न्यायपालिकेविषयी शंका घेतल्यावर उमटल्या. आणि त्याच श्रद्धा खच्ची केल्यास दहशत माजवता येईल, असे ब्रिगेडियर मलिक सांगतात. मग याकुबला वाचवायला सरसावले तो पुरोगामी जिहाद नाही काय? त्यांना इथली राष्ट्रभावना, राष्ट्राभिमान खच्ची करायचा आहे? हा विषय हिंदू मुस्लिम असा नाहीच. तो राष्ट्र विरुद्ध पुरोगामी जिहाद असा आहे. म्हणून हल्ले सतत तुमच्या राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद अशा संकल्पनांवर होत आहेत आणि होणार आहेत. त्यात याकुब वा कसाब, अफ़जल यांचे मुडदे प्यादे-मोहरे म्हणून वापरले जात असतात.


Friday, July 31, 2015

पुरोगामी जिहाद संपलेला नाही



मुंबई बॉम्बस्फ़ोटातला आरोपी आणि एक महत्वाचा सुत्रधार याकुब रझ्झाक मेमन याच्या फ़ाशीवरून उठलेले वादळ त्याला फ़ासापासून वाचवण्यासाठी होते अशी अनेकांची समजूत आहे. म्हणूनच त्याचे कुटुंबिय वा वकीलांनी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल शंका घ्यायचे काही कारण नाही. त्यांचे ते कर्तव्यच असते. पण त्यांच्या व्यतिरीक्त अखेरच्या क्षणी ज्यांनी याकुबला वाचवण्याचा तमाशा मांडला होता, त्यांना याच्याशी काय कर्तव्य होते? तर हे लोक स्वत:ला फ़ाशीच्या शिक्षेचे विरोधक मानतात. फ़ाशी ही आधुनिक युगात व जगात रानटी शिक्षा असल्याच्या समजुतीने भारावलेला एक वर्ग जगभर असून इथले तमासगीर त्याच पंथाचे होते. त्यात आणखी याकुब मुस्लिम असण्याने व विद्यमान सरकार हिंदूत्ववादी असल्याच्या पुर्वग्रहाची भर होती. पण हा सगळा तमाशा तिथेच संपणारा आहे काय? त्यात अन्य काही हेतू वा उद्दीष्ट नाही, असे ठामपणे म्हणता येईल काय? हेतू असेल तर तो शोधण्याची गरज आहे. कारण याकुबने दोन दशकापुर्वी घडवलेल्या बॉम्बस्फ़ोटापेक्षा असा हेतू अधिक घातक असू शकतो. म्हणूनच अशा लोकांच्या नावे शिव्याशाप देत बसण्यापेक्षा त्यांचे कुटील हेतू ओळखायला हवेत आणि त्यांच्या मागे फ़रफ़टत गेलेल्या अन्य वेंधळ्या मुर्खांना त्यापासून वेगळे काढणे भाग आहे. म्हणूनच नुसता अशा तमासगीरांच्या नावाने शंख करण्यापेक्षा त्यांचे चेहरे व मुखवटे ओळखण्याची गरज आहे. यात एका बाजूला असाउद्दीन ओवायसीसारखे थेट कट्टरपंथी मुस्लिम नेते आहेत तर दुसर्‍या बाजूला नक्षलवादी हिंसेला न्यायाची लढाई असा मुखवटा लावणारेही आहेत. तिसर्‍या बाजूला नुसत्याच हिंदूत्ववादाने बिथरलेल्यांचा एक गट आहे, तर चौथ्या बाजूला अशा सेक्युलर गोतावळ्यात आपणही आहोत असे दाखवायला उथळपणा करणार्‍यांचा गट आहे.

शत्रुघ्न सिन्हा भाजपाचा खासदार असून त्याने अशा गोतावळ्यात कायम येजा राखलेली आहे. मंत्रीपदाला वंचित राहिल्यापासून त्याची कायम चलबिचल होत असते. तर कॉग्रेस वा अन्य पक्षातले काही नेते कट्टर संघद्वेषाने अशा सह्याजीरावांच्य गोतावळ्यात वावरत असतात. ह्यांना आपण काय करीत आहोत त्याचा थांगपत्ता नसतो. पण तसे नक्षलवाद्यांचे समर्थक वा ओवायसीचे पाठीराखे यांच्याविषयी म्हणता येणार नाही. ही मंडळी जाणिवपुर्वक काही कुटील हेतूने अशा संधी शोधत असतात आणि त्यात मग बाकीच्या बावळटांना ओढून आणत असतात. जयचंद राठोड हे नाव वाचल्यावर अनेकांना तो इतिहास आठवला. पण त्यामागची मनस्थिती किती उमगली? पृथ्वीराजच्या द्वेषाने जयचंद पेटलेला होता, त्याचे हेतू भिन्न तर महंमद घोरीचे उद्दीष्ट वेगळे होते. पण घोरीने आपले हेतू साध्य करण्यासाठी जयचंदाचा कुटीलपणे वापर करून घेतला. आज त्याचप्रमाणे नक्षलवादी व जिहादी प्रवृत्ती सेक्युलर मुर्खांचा आपल्या हेतूसाठी वापर करून घेत आहेत. त्यातून मग सेक्युलर व जिहादी अशा दोन्हीतला मुखवटा कुठला व चेहरा कुठला याचा अंदाजच येत नाही. तिथे मग आपण त्या सर्वांना शिव्याशाप देत बसतो. पण त्यामागचे हेतू शोधत नाही. त्यातली लबाडी वा बनवेगिरी तपासून बघत नाही. नक्षलवाद्यांना भारतीय लोकशाही व घटनात्मक शासनव्यवस्था खिळखिळी करून टाकायची आहे. मग नुसत्या शस्त्राच्या धाकाने भारतीय लोकसंख्येवर राज्य करता येईल, असे त्यांचे स्वप्न आहे. तर जिहादी मानसिकतेचे ओवायसी व त्यांचे पाठीराखे हिंदू असलेल्यांच्या मनात कायम अपराधगंड निर्माण करून दुसरीकडे मुस्लिमांना चिथावण्या देण्याचे धोरण राबवत असतात. त्या दोन्ही गटांना भारतीय शासन व कायदा व्यवस्था आडवी येते आहे. अकबरुद्दीन ओवायसी काय म्हणाला होता आठवते?

‘फ़क्त चोविस तास पोलिस बाजूला काढा, मग बघा हिंदूंचा कसा फ़डशा पाडतो’, हीच त्याची धमकी होती ना? ती खोटी समजण्याचे कारण नाही. हिंदू आपल्या धर्मासाठी रक्त सांडायला उभे रहाणार नाहीत, पण मुस्लिम प्राण पणाला लावून हिंदूंना ठार मारतील, असेच त्याला म्हणायचे होते. किंबहूना त्यांनी तशी शिकवणच जिहादी संकल्पनेतून दिलेली आहे. सगळेच मुस्लिम तसे नाहीत. पण जे राजकीय व सार्वजनिक जीवनात पुढे असतात, ते अशाच हिंसक मानसिकतेने भारवलेले आहेत. त्यांच्या वतीने अकबरुद्दीन बोलत होता. मात्र पोलिस, कायदा व न्यायव्यवस्था कार्यरत असेपर्यंत तशी थेट लढाई शक्य नाही, ही त्याची अडचण आहे. नेमकी तीच अडचण नक्षलवाद्यांची आहे. जोवर घटनात्मक कायदेशीर राज्य भक्कम आहे, तोवर नुसत्या शस्त्रबळाने सत्ता गाजवता येणार नाही,. ही नक्षलवाद्यांची समस्या आहे. जोवर तथाकथित सेक्युलर मानले जाणारे सरकार देशात होते, तोवर अशा दोन्ही मनोवृत्तींना हातपाय पसरायला कुठला अडथळा नव्हता. त्याचेच लाभ उठवून त्यांनी आपला प्रभाव वाढवला आहे. जेव्हा कृती केली आणि कायदा आडवा आला, तेव्हा त्यांचे छुपे सुत्रधार ‘प्रतिष्ठीत’ मुखवटे लावून असेच बचावाला सरसावले आहेत. असे मान्यवर पत्रके काढणार, बैठका घेणार, निदर्शने करणार आणि जनमानसात नेहमी कायदा व न्यायव्यवस्थेच्या विषयी शंका निर्माण करणार, हाच त्यांचा जिहाद बनून गेला आहे. एका बाजूला हेच लोक गुजरातच्या दंगलीत कायदाव्यवस्था नव्हती म्हणणार आणि तेच दुसरीकडे कायद्याने दिलेला न्यायही शंकास्पद आहे असे म्हणणार. यातला दुटप्पीपणा ओळखण्याची गरज आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नसतो, तर लोकांच्या मनातला कायदा व न्यायावरील विश्वास ठार मारायचा असतो. एकप्रकारे हा नजरेत न भरणारा जिहाद आहे.

जिहाद किंवा दहशतवाद म्हणजे हिंसाचार अशी आपण एक चुकीची समजूत करून घेतली आहे. याकुबपासून अफ़जल गुरूपर्यंत कोणालाही निरपराधांना ठार मारण्यात रस नसतो आणि नव्हता. त्यांना मुठभर लोकांना ठार मारून करोडो लोकांच्या मनात दहशत निर्माण करायची होती किंवा असते. दोन दशकांपुर्वी मुंबईत पहिले बॉम्बस्फ़ोट झाल्यापासून आपल्या नित्यजीवनात किती आमुलग्र बदल झालाय, त्याकडे आपण कधी गंभीरपणे बघितले आहे काय? विमानतळ व मंत्रालय अशा महत्वाच्या स्थळी सुद्धा त्यापुर्वी तपासणी यंत्रे नव्हती. आता तर रेल्वे बसस्थानकातही स्फ़ोटके शोधणारी यंत्रे तैनात केलेली दिसतात. त्याला दहशत म्हणतात. जनतेचा अथवा कायदा सुव्यवस्था राबवणार्‍यांना कुठेही केव्हाही स्फ़ोट होऊ शकतात, अशी कायम भिती वाटत असेल, तर याकुबने दहशतीची योजना यशस्वी केली ना? लोकांना त्या स्फ़ोटाची वा जीवानिशी मरण्याची भिती केव्हा वाटते? जेव्हा कायदा व्यवस्थेने सुरक्षा देण्याविषयीची लोकांना खात्री वाटत नाही. तो विश्वास मारणे म्हणजेच जिहादी युद्ध जिंकणे असते. याकुब वीस वर्षापुर्वी बिनधास्त शेकडो निरपराध लोकांना ठार मारायची योजना आखतो व अंमलात आणतो. पण त्याला कायद्यानुसार दोषी ठरवल्यानंतर बंदिस्त तुरूंगात फ़ाशी देतानाही सरकारला बाहेर गडबडी होऊ नयेत, याची खास दक्षता घ्यावी लागते. ह्याला आत्मविश्वास म्हणायचा की दहशत? ही दहशत याकुब वा त्याच्या माथेफ़िरू मुस्लिम अनुयायांनी निर्माण केलेली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत त्याला वाचवायला उजळमाथ्याने फ़िरणार्‍यांनी आपल्या मनात तशी दहशत निर्माण केली आहे. त्यांना याकुबला वाचवायचा नव्हताच. तुमचा-आमचा व सामान्य माणसाचा न्याय व कायद्यावरील विश्वास खच्ची करायचा होता. शिव्यशाप देण्यापेक्षा आपण हे कुटील हेतू ओळखणे व त्याच्याशी दोन हात करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाकिस्तानी सेनाधिकारी ब्रिगेडीयर एस, के. मलिक यांनी समजावून दिलेला जिहाद जाणून घ्यावा लागेल.

Wednesday, July 15, 2015

याकुब मेमनच्या फ़ाशीच्या निमीत्ताने



अखेर २२ वर्षांनी मुंबई बॉम्बस्फ़ोट मालिकेतील एका महत्वाच्या आरोपीला फ़ाशी होणार आहे. म्हणजे आज तरी आपण छातीठोकपणे त्याची हमी देऊ शकत नाही. कारण आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. सहाजिकच गळफ़ास आवळून माणूस मेला याची खातरजमा, फ़ाशी झाली असे म्ह्णायची कोणाची या देशात बिशाद नाही. अर्थात महाराष्ट्र सरकारने तशी तारीख जाहिर केली आहे. पण म्हणून ती पाळली जाण्याची अजिबात शक्यता नाही. कारण अजून सुप्रिम कोर्टात याकुब मेमनची एक फ़ेरविचाराची याचिका पडून आहे. तिची सुनावणी कुठल्या दिशेने जाते, त्यानुसारच राज्य सरकारला फ़ाशीची अंमलबजावणी करता येऊ शकेल. हा खेळ कित्येक वर्षे चालू आहे आणि तो अफ़जल गुरू व कसाबच्याही बाबतीत झाला होता. दोन्ही वेळी अगदी तारखाही लपवून ठेवल्या गेल्या आणि या कानाचे त्या कानाला कळू देण्यात आलेले नव्हते. त्याचेही कारण आहे. जितक्या जिद्दीने अफ़जलची केस इथल्या मानवतावाद्यांनी जिव्हाळ्याने लढवली होती, तितका ओलावा कसाब किंवा याकुबच्या बाबतीत दाखवलेला नव्हता. पण त्यापैकी अफ़जल हा काश्मिरी होता आणि त्यावरून तिकडे काही प्रतिक्रीया उमटण्याचे भय सरकारला वाटत असावे. कसाबची गोष्ट वेगळी होती. त्याला कोणी वालीच नव्हता. ज्यांनी इथे पाठवले, त्यांना त्याची ब्याद नको होती. तरीही त्या दोन फ़ाशीचा गवगवा खुप झाला होता. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून शिवसेनेचा पाठींबा मागायला प्रतिभाताई पाटील मातोश्रीवर गेल्या, तेव्हा बाळासाहेबांनी अफ़जलची थकलेली फ़ाशी उरकून घेण्याचा आग्रह धरला होता. पण पाच वर्षाच्या कारकिर्दीत प्रतिभाताई शब्द पुरा करू शकल्या नाहीत. मात्र प्रणबदांच्या तत्परतेने अफ़जलचा विषय निकालात निघाला होता. त्याच्या कुटुंबियांपेक्षा मानवाधिकाराचे आप्तेष्टच आक्रोश व मातम करत सुटले होते.

याकुबची कहाणी खरे तर शोकांतिका आहे. कारण तो अतिशय सुशिक्षित व सभ्य माणुस होता. धर्मभावनेच्या आहारी जाऊन स्मगलर भावाच्या नादी लागल्याने याकुब यात फ़सलेला होता. त्याला घातपातानंतर सुखरूप कराची पाकिस्तानातही नेण्यात आलेले होते. पण मुंबई व इथल्या वातावरणाशी जडलेले नाते त्याला तिथल्या पिंजर्‍यात राहू देईना आणि त्याला मुंबईचे डोहाळे लागले होते. त्याच्या परिणामी त्याच्या गळ्याभोवती फ़ास आवळला गेला आहे आणि त्यातले खरे सुत्रधार, त्याचाच भाऊ टायगर मेमन आणि दाऊद मात्र कराचीत मौज करीत आहेत. एकविस वर्षापुर्वी याकुबचा त्याच लोकांनी खरा घात केला. अधूनमधून दाऊद शरण येण्याच्या ज्या गप्पा चालतात, त्या खेळीतला याकुब एक मोहरा होता. दाऊदच्या अटी मान्य होतात किंवा नाही, त्याची चाचपणी करण्यासाठी ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला भारताच्या हवाली करण्यात आलेले होते. पण अशा गोष्टी अधिकृत नसतात. म्हणूनच ज्यांच्याशी दाऊदने बोलणी केली होती, त्यांनी अभय मिळण्याची कुठलीच हमी दिलेली नव्हती. पण शक्यता व्यक्त केली होती. ती शक्यता कितपत खरी आहे त्याचीन चाचपणी करण्यासाठी बळीचा बकरा दाऊदला हवा होता. मुंबईची ओढ लागलेल्या याकुब मेमनने ती ऑफ़र स्विकारली आणि तो नेपाळला येऊन भारतीय गुप्तचरांच्या हवाली झाला. मग त्याची पुरेशी चौकशी व छाननी केल्यानंतर दिल्ली रेल्वेस्थानकावर त्याच्या अटकेचे नाट्य रंगवण्यात आलेले होते. त्यावर विसंबून दुबई मार्गे काही मेमन कुटुंबिय भारतात दाखल झाले. मात्र कोर्टाने त्यापैकी कोणालाही कसलीच सवलत द्यायचे नाकारले आणि पुढला दाऊदला अभय देवून भारतात आणायचा प्लान फ़िसकटला. याकुबने त्यासाठी आपल्याच विरोधात वापरली जाऊ शकणारी माहिती दिली होती आणि आपल्याच हाताने गळ्यात फ़ास बांधून घेतला होता.

आता महाराष्ट्र सरकारने ज्या फ़ाशीची तारीख नक्की केली आहे, त्याची सुरूवात १९ जुलै १९९४ रोजी नेपाळमच्ये काठमांडू येथील विमानतळावर झालेली होती. तिथे पाकिस्तानातून आलेल्या विमानातून याकुब मेमन उतरला आणि भारतीय गुप्तचरांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याच सांगण्यावरून बाकीचे कुटुंबिय दुबई मार्गे भारतात आलेले होते आणि सर्वांनाच मग आरोपी करण्यात आलेले होते. त्यातल्या काहीजणांना कोर्टाने पुरावे तपासून मुक्तही केले. पण याकुब मात्र फ़सला. आपण निव्वळ भावाच्या बोलण्याला फ़सून त्यात सामील झालो असा त्याचा दावा होता. म्हणूनच आपल्याला शिक्षा झाली तरी फ़ाशी होणार नाही, अशी त्याला खात्री होती. मात्र टाडा कोर्टाने त्याचा दावा फ़ेटाळून लावला आणि त्याला दोषी ठरवून फ़ाशी दिले. इतकी वर्षे झाल्यानंतरही गुप्तचर विभाग व याकुब यांच्यात नेमके काय करारमदार झाले होते, त्याविषयी कमालीची गुप्तता दोन्ही बाजूंनी पाळलेली आहे. सरकारी पक्षाने टाडा कोर्टात त्याविषयी मौन पाळणे समजू शकते. कारण कोर्टातल्या मामल्याविषयी सरकार वा पोलिस कुठल्याही आरोपीशी सौदेबाजी करू शकत नाहीत. म्हणूनच याकुबला गुप्तचर विभागाने काही हमी दिलेली असली, तरी त्यला नुसता शब्द म्हणता येईल. आपण फ़सलो असे त्याला वाटले असते, तर त्याने उर्वरीत कुटुंबाला मायदेशी यायला सांगितले नसते, की त्यांच्या आणण्याची व्यवस्था भारतीय गुप्तचर विभागाकडून करून घेतली नसती. विषय कुठलाही असो, सख्खा भाऊ टायगर व दाऊदने यात याकुबचा बळी दिलेला आहे. कारण सौदा दाऊदचा होता आणि त्यात ‘ट्रायल रन’ म्हणून याकुबला धाडण्यात आलेले असणार. आजपर्यंत त्याच्या अटकेविषयी दिलेल्या माहितीतील तफ़ावत भरून काढण्याचे कष्ट याकुब व गुप्तचर विभाग अशा कुठल्याही बाजूने घेतलेले नाहीत हे नक्की.

आता सवाल इतकाच आहे की पुन्हा एकदा सुप्रिम कोर्टात असलेल्या फ़ेरविचाराच्या याचिकेचे काय होणार? २१ जुलै रोजी त्याची सुनावणी व्हायची आहे. त्यात पुढली तारीख मिळाली तरी याकुबला आणखी एक जीवदान मिळून जाईल. पण आहे तशीच याचिका फ़ेटाळली गेली, तर राज्य सरकारने जाहिर केलेल्या तारखेला पृथ्वीतलावर याकुबचा तो शेवटचा दिवस असेल. कारण मग फ़ाशी जाण्याला पर्याय शिल्लक उरत नाही. त्याच्या फ़ाशी जाण्याने ज्यांचे आयुष्य उध्वस्त झाले किंवा जे हकनाक मारले गेले, त्यांची कुठलीच भरपाई होऊ शकणार नाही. पण यानिमीत्ताने याकुब वा टायगर कशाला निर्माण होतात आणि त्यांच्यात असा सैतान कशामुळे संचारतो, त्याचा नव्याने विचार होईल, अशी अपेक्षाही बाळगता येत नाही. झालेल्या दंगलीने वा त्यातल्या हिंसाचाराची आग अशा लोकांच्या मनात भडकते, हा फ़सवा युक्तीवाद आहे. दंगलीने मने दुभंगतात आणि ती एकत्र सांधली जायला दिर्घकाळ लागतो. पण अशा अनुभवातून जाणार्‍यांच्या दुखावलेल्या मनाच्या होमकुंडात जे सतत अन्याय होत असल्याचे तेल ओतत रहातात, तेच मग सूडाची आग भडकवत असतात. त्यातून टायगर वा याकुबसारखे सैतान निर्माण होतात. जखमेवर मीठ चोळण्यातून वेदना कडव्या प्रतिकाराला व प्रतिहल्ल्याला चिथावणी देत असते. भारतातील मुस्लिमांना सातत्याने इथल्या खोट्या राजकीय सहनुभूतीदारांनी अशा सूडाच्या आगीत ढकललेले आहे. त्यातून मग अन्यथा सामान्य समंजस वाटणार्‍या धर्मश्रद्ध मुस्लिमात हिंसेचा अग्नी प्रज्वलीत होतो आणि त्यातून दंगली भडकतात. जिहादी दहशतवादाला खतपाणी घातले जात असते. म्हणून मग अफ़जल गुरू कायद्याने पुराव्यानिशी गुन्हेगार ठरला असला तरी त्याचे उदात्तीकरण अलिगड विद्यापिठातले मुस्लिम विद्यार्थी करू धजले. त्यातूनच मग याकुब जन्माला येतात.