Wednesday, August 14, 2013

तिसर्‍या पिढीचे कथासार


   चारपाच शतकांपुर्वी होऊन गेलेला इतिहासकार इब्न खाल्दून म्हणतो, की कुठल्याही साम्राज्य वा संस्कृतीच्या विनाशाची बीजे तिच्या घराणेशाहीतच पेरलेली असतात. त्यामुळे अशी संस्कृती वा साम्राज्ये तीन पिढ्यांपेक्षा अधिक तग धरू शकत नाहीत. चटकन खाल्दूनचा हा दावा चमत्कारिक वाटेल. पण आपल्या डोक्यातल्या समजूती व भ्रम बाजूला ठेवून त्याला समजून घ्यायला गेले; तर त्याच्या विधानाचे सुत्र लक्षात येऊ शकते. त्याच्या काळात अनेक संस्कृती व साम्राज्ये उदयास आलेली वा रसातळाला गेलेली त्याने बघितली व अभ्यासलेली होती. कालपर्यंत भक्कम व अभेद्य वाटणारे सोवियत साम्राज्य किंवा त्याच्याही आधी ज्याच्यावरच सुर्य मावळत नाही असे म्हटले जायचे; ते ब्रिटीश साम्राज्य आज नामशेष होऊन गेले आहे. पण जोवर त्यांची सत्ता होती तोवर कुठला विद्वान अभ्यासक त्यांच्या विनाशाचे भाकित करू शकला नव्हता. अगदी काही दिवसात बघताबघता ही साम्राज्ये उध्वस्त होऊन गेली. पण ती उध्वस्त होण्याची कारणमिमांसा कितीशी झाली? सर्वसाधारणपणे साम्राज्ये वा संस्कृती या स्वत:लाच ओझे होऊन लयास गेल्या असे भासवले व समजवले जाते. पण बारकाईने अभ्यास केला, तर त्यांचा विध्वंस चालू असताना प्रत्यक्षात तो विध्वंस करणारेच त्याचे सर्वात मोठे राखणदार असल्याचे भासवत होते, असेच आढळून येईल. आणि असे विध्वंसक कोण असतात, तर आपल्या अतीव पराक्रम, कष्ट वा मेहनतीतून ज्यांनी त्या साम्राज्याची उभारणी केलेली असते, त्यांचेच हे विध्वंसक वारस असल्याचे दिसतील. किती चमत्कारिक बाब आहे ना? आपल्याच पुर्वजांनी कष्टातून उभे केलेले साम्राज्य हे वारस कशाला बुडवतात? त्याची कारणमिमांसाच इब्न खाल्दून याने केलेली आहे.

   कष्ट व मेहनत यांच्या सोबत निर्दयता, रानटीपणा व जुगारी वृत्तीने लढण्याच्या कर्तबगारीतून साम्राज्ये उभी रहातात. त्यात आपले सर्वस्व पणाला लावून कर्तृत्व दाखवायला पुढे येणारी माणसे वा त्यांची टोळी साम्राज्य निर्माण करीत असते. त्यात कदाचित मारले जाणे, संपून जाणे, नष्ट होणेही शक्य असते. थोडक्यात कर्तबगारी गाजवायला निघालेला माणूस वा त्याचे सवंगडी; आपले स्वस्थ जीवन झुगारून अस्मितेसाठी वा कर्तृत्वासाठी अवघे जीवनच त्या जुगारात पणाला लावतात. त्यात विजयी होतात, तेव्हा साम्राज्य उदयास आलेले असते. त्यात जो नेता असतो, तो आपल्या सवंगडी व साथीदारांशी सन्मानाने वागत असतो. पण नेता म्हणून त्याच्या हाती सत्ता आल्यावर पुढल्या पिढीत मात्र त्यांच्यात तो परस्पर सन्मान व समता शिल्लक उरत नाही. जन्माला आल्याने अधिकार हाती आलेला नवा नेता सत्ताधीश आपल्या सहकार्‍यांना दुय्यम वागणूक देतो आणि त्यांच्यातही सुखवस्तू जीवनाने स्वाभिमान पांगळा झालेला असतो. मग कर्तृत्वाशिवायची सत्ता औदासिन्य आणते आणि लढण्याचा कमीपणा वाटू लागतो. सत्ता व त्यातून मिळालेली सुबत्ता टिकवण्यासाठी भाडोत्री लढवय्ये गोळा करावे लागतात. सहाजिकच लढण्याची व अस्मितेसाठी सर्वस्व पणाला लावण्याची इच्छाच मरत जाते. किंबहूना लढणेच कमीपणाचे भासू लागते. तिसरी पिढी सत्तेवर येते, तिला आपला पुर्वज लढला, त्याने कष्ट केले, अंगातला घाम गाळला वा जखमा करून घेतल्या, हेच लज्जास्पद वाटू लागते. थोडक्यात त्याला अस्मिता, स्वाभिमान हे सुखवस्तू जीवनापुढे फ़डतूस कल्पना वाटू लागतात. परिणामी लढणे, झुंज देणे, प्रतिकार यांचीच भिती वाटून कर्तृत्वाचीच शरम निर्माण होते. अशारितीने तिसरी पिढी साम्राज्याच्या सुरक्षेला निकम्मी बनून जाते.

   खरीखुरी हिंमत, धाडस, कर्तबगारी, शौर्य यापेक्षा अधिकारपदे, गणवेश, पदव्या, अधिकारपत्रे यातून आपली शक्ती येते; अशा समजूतीमध्ये ही तिसरी पिढी मशगुल होऊन जाते आणि नेमक्या त्याचवेळी सत्ताधारी परिघाच्या बाहेर कोणीतरी दबलेले, चेपलेले, पिडीत वा अन्यायग्रस्त आपल्या जगण्यातल्या अगतिकतेच्या विरोधात उभे रहायला धडपडत असतात, त्यांच्यासाठी नवी संधी निर्माण होत असते. आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी व अगतिकता, गुलामी झुगारण्यासाठी; आपले सर्वस्व पणाला लावायला असे काही लोक, त्यांचा समुह प्रयत्नशील असतो. कर्तृत्व दाखवायला सज्ज होत असतो. त्याच्यासाठी मग निष्क्रिय, कर्तृत्वहीन, नाकर्ते सत्ताधीश हे सोपे लक्ष्य होऊन जाते. तिथेच त्या साम्राज्याचा विनाश अटळ होऊन जातो. कारण सत्ता हाती असली, तरी ती राखण्यासाठी लढायची हिंमत गमावून बसलेले ती सत्ता टिकवू शकत नाहीत. त्यासाठी सर्वस्व पणाला लावायची हिंमत गमावलेले व तीच बळकावायला सर्वस्व पणाला लावण्यास सज्ज झालेले; अशी ही विषम लढाई असते. त्यात मग सुखवस्तूपणावर लाथ मारायला घाबरलेले पराभूत होतात आणि सुखवस्तू नसलेले, बाजारबुणगे वा रानटी निर्दयी लोक आपल्या क्रौर्याच्या बळावर विजयी होऊन जातात. सत्ता त्यांच्याकडे येते आणि आजवरचे सत्ताधीश नष्ट होऊन जातात. सोवियत क्रांती तिसर्‍या पिढीने बुडवली. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणार्‍या पुढार्‍यांची व तिची फ़ळे चाखणार्‍या वर्गाची तिसरी पिढी आज आपल्या देशात नेमकी त्याच दिशेने वाटचाल करताना दिसते आहे. राष्ट्रवाद, वंदेमातरम, देशप्रेमाची टवाळी करण्यात धन्यता मानणार्‍यांची तुलना खाल्दूनच्या सुत्रात आलेल्या नातवाशी होऊ शकते ना? पाकला धडा शिकवायला खुळेपणा म्हणणारा वर्ग कुठला आहे?

   अलिकडेच सीमेवर पाच जवानांची पाक सेनेने हत्या केली. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे, असे उघड बोलले जाऊ लागले; तेव्हा युद्ध म्हणजे उपाय नाही, असे सांगायला हिरीरीने पुढे आलेला वर्ग कुठला आहे? युद्धाला व त्यासाठी देशप्रेमाच्या प्रक्षोभक भाषेला विरोध करणारा वर्ग कुठला आहे? हे लोक उलटा सवाल करतात, कितीजण सैन्यात भरती व्हायला तयार आहेत? याचा अर्थच त्यांच्यापैकी कोणीही तयार नाही, याची ती कबुली आहे. पण त्याचवेळी ज्या जवानांचे बळी गेले, त्यांच्या गरीब दरीद्री कुटुंबातील लोकांनी मात्र तितक्याच आग्रहाने पाकिस्तानला धडा शिकवा असा आग्रह धरलेला होता. आम्हाला भरपाईचे दहा लाख रुपये नकोत, तर पाकिस्तानवर हल्ला करा, असे हे कुटुंबिय म्हणतात. त्यांच्यापैकी किती गरीबांच्या वाट्याला या देशाच्या स्वातंत्र्य व विकासाची फ़ळे आलेली आहेत? कुठलेही सुखवस्तू जीवन त्यांच्या वाट्याला आलेले नाही. ब्रिटीश राज्यात, पारतंत्र्यात वा मोगल काळातही त्यांच्या पुर्वजांनी असेच गरीबीत जीवन कंठलेले आहे. ती गुलामी झुगारण्याच्या लढाईत त्यांना नेतृत्व द्यायला पुढे आलेल्या व परिणामी सुखवस्तू झालेल्या संस्थानिक, सरंजामदार व पुढल्या काळातील नेता अधिकारी वर्गातील लोकच आज युद्धाचे विरोधक झालेले दिसतील. तेव्हाच्या संस्थानिकांनी तनखे स्विकारून लढायचे टाळले, अस्मिता गुंडाळून ठेवली होती. आजचे सुखवस्तू काय वेगळी भाषा बोलत आहेत? आजच्या ऐषारामी जीवनाला धक्का देणारी अस्मिता त्यांना हास्यास्पद वाटणारच. कॉग्रेस व स्वातंत्र्योत्तर काळात उभे राहिलेले एक साम्राज्य व राजकीय संस्कृती रसातळाला जात असल्याची हीच चाहुल आहे. योगायोग म्हणजे त्याच प्रस्थापित राजकीय परिघाबाहेरचे आव्हान मोदींच्या रुपाने उभे ठाकलेले आहे.

Tuesday, August 13, 2013

पाठ फ़िरवून भागेल?




   बर्डफ़्लू किंवा स्वाईनफ़्लू यांच्याशी आमचे काही भांडण नाही. त्यांनी त्यांचे जीवन खुशाल जगावे आणि आम्ही आमचे जीवन खुशाल जगू; असे आपण म्हणू शकतो काय? पुण्यात वा आणखी कुठे जगात, अशा प्राणघातक रोगराईचा प्रादुर्भाव झाला; मग इथे आमची धावपळ कशाला सुरू होत असते? दिसेल त्याला लस टोचणे कशाला सुरू केले जाते? त्या धावपळीला काय म्हणायचे? त्या रोगजंतू वा विषाणूंनी तुमच्यावर कुठला हल्ला अजून केलेला नसतो, त्याच्या आधीच तुम्ही त्याच्या बंदोबस्ताची धावपळ कशासाठी करू लागलेले असता? त्याला युद्धाची हिंसेची खुमखुमी म्हणायचे काय? अशा घातक रोगबाधेशी आम्हाला दोन हात करायचे नाहीत, असे म्हणून तुम्ही त्यापासून सुटू शकता काय? दहशतवाद किंवा जिहाद त्यापेक्षा वेगळी गोष्ट नाही. त्यात आजवर जी माणसे बळी पडली आहेत, त्यांच्याकडे बारकाईने बघितले, तर त्यापैकी कुणाही बळीला युद्धाची खुमखुमी नव्हती. त्यापैकी क्वचितच कोणी माओवाद वा जिहादच्या विरोधात भाषणे दिलेली असतील. म्हणून त्यांच्यावर येणारे संकट टाळले गेले काय? कारण युद्ध ही एकतर्फ़ी बाब नसते. तुम्हाला युद्धाची खुमखुमी असो किंवा नसो; ते युद्ध लादले जाते तेव्हा त्यापासून तुमची सुटका नसते. त्याला सामोरे जाऊन स्वत:चा बचाव करणे अथवा त्या युद्धात हकनाक मारले जाणे, इतकाच आपल्या पुढला पर्याय असतो. कसाब टोळीच्या हातून मारले गेलेले किंवा अनेक स्फ़ोटात बळी पडलेले, असेच निरपराध दिसतील. म्हणूनच अशा लादलेल्या युद्धापासून पळ काढता येत नाही. त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग असतो; तो म्हणजे युद्धाची ज्याला खुमखुमी आहे, त्याला नामोहरम करण्याची पावले उचलणे. तशी पावले उचलण्याला युद्धाची खुमखुमी म्हणत नाहीत, तर सावधानतेचा उपाय म्हणतात. 

   आज देशासमोर जी परिस्थिती पाकिस्तानने निर्माण करून ठेवली आहे; ती नेमकी तशीच आहे. तुम्ही ती नाकारली म्हणून त्यापासून सुटका असू शकत नाही. जे कोणी शहाणे असली शांततेची प्रवचने देत असतात, त्यापैकी काही २६/११ च्या हल्ल्यात कसाब टोळीच्या तावडीत सापडलेले होते. त्यांनी सरकार वा सेनेकडे, पोलिसांकडे मदत मागण्याची काय गरज होती? त्यापैकी कोणाला युद्धाची खुमखुमी नव्हती. त्या हल्ल्यात आपले प्राण धोक्यात घालायला पुढे झालेल्या पोलिस व जवानांना युद्धाची अजिबात खुमखुमी नव्हती. मग त्यांच्या वाट्याला तो प्रसंग कशामुळे आला? तर असा हल्ला होण्याची ती पहिलीच घटना नव्हती. जेव्हा इथेच आपल्या हस्तकांकरवी स्फ़ोट घडवूनही तुम्ही युद्धाला सामोरे येत नाही असे दिसले; तेव्हा तोयबा व पाक जिहादींची हिंमत वाढली. त्यांनी थेट इथेपर्यंत आपले मारेकरी पाठवून किडामुंगीप्रमाणे नागरिकांचे हत्याकांड घडवून आणले. जेव्हा रोगजंतूंची पैदास थोपवण्याचे उपाय करण्यालाच मुर्खपणा ठरवणारा बुद्धीवाद बोकाळतो, तेव्हा अशी स्थिती येत असते. इथल्या पाक व तोयबा हस्तकांचा निर्दयपणे बंदोबस्त झाला असता, तर तिथून इथे मारेकरी व हल्लेखोर पाठवण्याची हिंमत त्यांना झाली नसती. नाक दाबले मग तोंड उघडते असे म्हणतात. पाकिस्तान वा त्यांनी जोपोसलेले ते तोयबा, तालिबान वा जिहादी इत्यादींना पोसणारे, सोसणारे इथे असतात; तेव्हाच त्यांच्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत असते. आमचे ज्येष्ठ नेतेच ‘सुडभावनेने गुन्हा करणे रास्त’ असल्याचे हवाले देत असतील, तर तोयबांना इथे हस्तक पैदास करायला पोषक स्थिती निर्माण होणारच ना? आम्ही इथे घाणीचे उकिरडे, डबकी निर्माण करायची, बुजवायची नाहीत आणि त्यात रोगराईची पैदास झाल्यास गळा काढून उपयोग आहे काय?

   युद्धाची खुमखुमी हा फ़सवा शब्द आहे. युद्ध लादले जाते, तेव्हा त्याच्या प्रतिकाराची भूमिका म्हणजे युद्धाची खुमखुमी नसते. प्रत्येक युद्धात पाकिस्तानचा पराभवच झालेला आहे, पण म्हणून त्यांची मस्ती जिरलेली नाही. कारण खुमखुमी त्यांच्यात आहे. ती कायमची संपवली गेली नाही. त्या खुमखुमीचे निर्मूलन झाले असते, तर ही वेळ आलीच नसती. आज किश्तवाड किंवा सीमेवर जिथे हिंसा चालू आहे, तिथे शांततावाद्यांनी जाऊन उभे रहावे आणि आपली शांततेची प्रवचने तिथे समोरून गोळ्या झाडणार्‍यांना द्यावीत. आपल्या तत्वज्ञानावर किंवा विचारधारेवर ज्यांची इतकी गाढ श्रद्धा आहे; त्यांनी त्यासाठी तोंडाची वाफ़ इथे दवडण्यापेक्षा आपल्या विचारांची ताकद सीमेवर सिद्ध करावी. त्यासाठी ही उत्तम संधी आहे. एका बाजूला हकनाक मारल्या जाणार्‍या भारतीय जवानांचे प्राण त्यामुळे वाचतील आणि आपल्याला एका नव्या बचावात्मक सुरक्षा तंत्राची साक्षही मिळून जाईल. पर्यायाने संरक्षण खात्यावर होणारा करोडो रुपयांचा खर्च कमी करून लोकांच्या कल्याणासाठी ती मोठी रक्कम वापरता येईल. सैनिक भरती व शस्त्रास्त्र खरेदी बंद करून त्या जागी मोठ्या प्रमाणात अशा शांततावाद्यांची भरती करता येईल. पण त्यासाठी अशा युद्ध खुमखुमी विरुद्ध बोलणार्‍यांनी आपले तंत्रज्ञान प्रात्यक्षिकातून सिद्ध करायला नको का? तिथे युद्धप्रसंग ओढवला, मग हे तमाम लोक बिळात दडी मारून बसणार आणि ओंबळे वा उन्नीकृष्णन यांच्यासारख्या खुमखुमी नसलेल्यांना मरायला पुढे करणार. सगळी गफ़लत तिथेच तर होत असते. कारण युद्ध असो की शांतता असो, त्यावरच्या गप्पा या बुद्धीवाद्यांच्या पुस्तकातल्या व शिळोप्याच्या गप्पा असतात आणि सामान्य माणसाला त्यासाठी जीवाचे मोल मोजावे लागत असते.

Sunday, August 11, 2013

डोके ठिकाणावर आहे?



   ‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. पाटील यांच्याशी बोललो. की, मला ही गोष्ट पटत नाही की, मुस्लिम समाजातील मुलं शुक्रवारच्या दिवशी मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट घडवतील. ते इतर कुठेही स्फोट करतील मात्र मस्जिदमध्ये नाही करणार.’ हे विधान महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांचे आहे. गेल्या अर्ध्या शतकापासून पुर्ण वेळ सक्रिय राजकारणात वावरणार्‍या शरद पवार यांनी असे विधान केले, हे वाचून आधी हसू आले होते. पण नंतर त्यांच्या केविलवाण्या बडबडीची कीव करावी असेच वाटले. कारण असे कोणी दुसरा नेता म्हणाला असता, तर गोष्ट वेगळी होती. पण पवार आपल्या चौकस व चाणाक्षपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी असे अत्यंत खुळचट विधान वा युक्तीवाद करावा, याचे अत्यंत वाईटही वाटले. कारण पवार अनेकदा अत्यंत धुर्तपणे बोगस वा अर्धसत्य विधान करतात. पण खुळेपणाचे प्रदर्शन कधी करीत नाहीत. यावेळी त्यांचे हे विधान त्यांनी शहाणपणा व समंजसपणाला सोडचिठ्ठी दिल्याचा पुरावा वाटला. म्हणून त्यांची दया आली. आपण कोणतीही थाप मारावी आणि आपल्या सहकारी अनुयायांसह पत्रकारही डोळे झाकून त्या थापा ऐकून घेतील, असे त्यांना वाटते की त्यांना आता दिग्विजय सिंग यांच्याशी स्पर्धा करायची दुर्बुद्धी सुचली आहे? कारण त्यांच्या उपरोक्त विधानातून त्यांचा वर्तमानकाळाशी किती संपर्क तुटला आहे, त्याचीच साक्ष मिळते. शुक्रवारी मालेगावच्या मशिदीत स्फ़ोट झाला आणि म्हणूनच त्यात पकडले गेलेले मुस्लिम तरूण निष्पाप आहेत, हा दावा निव्वळ बिनबुडाचा आहे. की गेल्या काही वर्षात पवारांनी बातम्याच ऐकायचे वाचायचे सोडून दिलेले आहे?

   गेल्या दोन चार वर्षात भारतच नव्हेतर तर पाकिस्तानपासून इराक अफ़गाणीस्तानपर्यंत प्रत्येक मुस्लिम देशात मशिदीतून बॉम्बस्फ़ोट होत आहेत आणि पाचदहापासून शंभर सव्वाशे मुस्लिम त्यात मारले जात असतात. हे स्फ़ोट कधी, कुठल्या दिवशी व कुठे होतात, त्याच्या बातम्या सतत वाहिन्यांवर व वृत्तपत्रातून येत असतात. हे स्फ़ोट करायला (पवारांच्या भाषेतले) जातीयवादी म्हणजे हिंदूत्ववादी तिथे असतात काय? अफ़गाणीस्तान वा इराकमध्ये बॉम्ब फ़ोडणे सोडून द्या, जे कोणी चुकूनमाकून दोनचार हिंदू, बौद्ध असतील त्यांना आपल्या धर्मस्थळी जाण्याची तरी मुभा आहे काय? मग मशिद असलेल्या परिसरात फ़िरकणे तरी शक्य असेल काय? मग त्या ‘जातीयवाद्यांनी’ शुक्रवारी मशिदीत स्फ़ोट करणे शक्य असेल काय? पण तिथे शुक्रवारीच नेहमी स्फ़ोट होतात आणि त्यात इतके मुस्लिम मारले जातात, त्या बातम्या पवारांनी वाचलेल्याच नाहीत काय? असे स्फ़ोट इराक, अफ़गाण वा पाकिस्तानच्या भूमीत मुस्लिमच कशाला करतात? आणि करतात, त्या मशिदीत जाणारे मुस्लिम कुठले असतात? गेल्या दोन वर्षात तर एकही शुक्रवार असा उजाडलेला नसेल, की ज्या दिवशी पाकिस्तान इराकमध्ये मशिदीत स्फ़ोट होऊन मुस्लिम मारले गेलेले नाहीत. फ़रक एकच आहे, की तिथे पवार म्हणतात ते जातीयवादी हिंदुत्ववादी स्फ़ोट करत नसतात. तर सुन्नी मुस्लिम असे स्फ़ोट करतात आणि त्यात मारले जाणारे मुस्लिम शिया पंथाचे असतात. की पवारांना इस्लाम धर्मात असे दोन भिन्न पंथीय मुस्लिम असतात हेच ठाऊक नाही? की त्यांना जगाच्या पाठीवर मुस्लिम जगतामध्ये काय चालले आहे, त्याचाच थांगपता नाही? असेल तर त्यांनी असे बिनबुडाचे विधान मालेगाव प्रकरणात कशाला केले असते?

   इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे, की हा पंथीक हिंसाचार केवळ पाकिस्तान अफ़गाण वा इराक भूमीतच चाललेला नाही. आपल्या देशात उत्तरप्रदेश नामक राज्यातही कायम चालू असतो. शिया सुन्नी एकमेकांच्या जीवावर उठण्याच्या अनेक घटना इथेही घडत असतात. आणि मालेगावच्या ज्या मशिदीत स्फ़ोट झाला, ती मशिद कुठल्या पंथाची होती याची तरी गंधवार्ता पवारांना आहे काय? नसेल तर निदान त्यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ मुस्लिम नेते तारीक अन्वर यांच्याकडून तरी त्याची माहिती करून घ्यायची होती. मालेगावच्या स्फ़ोटात जी मशिद बाधीत झाली, ती शिया पंथीय मुस्लिमांची होती. त्यामुळेच शुक्रवारी तिथे सुन्नी मुस्लिम तरूणांनी स्फ़ोट करायला काहीच हरकत नसते. कारण सुन्नी मुस्लिमांच्या कट्टर भूमिकेनुसार शिया हे मुस्लिमच नसतात. आणि म्हणूनच त्यांचा काटा काढण्याला असे स्फ़ोट होत असतात. पाकिस्तानात तर अहमदीया पंथाच्या मुस्लिमांना कायद्यात दुरूस्ती करून गैरमुस्लिम ठरवण्यात आलेले आहे. म्हणूनच त्यांना मशीद बांधायलाही परवानगी मिळत नाही. त्यांनी स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेण्यालाही गुन्हा ठरवण्यात आलेले आहे. म्हणूनच मग शिया वा तत्सम सुन्नी नसलेल्या कुठल्याही मुस्लिमांना मारणे वा स्फ़ोटात संपवणे शक्य असते. पवित्र कार्य सुद्धा असू शकते. मालेगावच्या स्फ़ोटासाठी जातीयवाद्यांवर खोटे आरोप करायला अजिबात हरकत नाही. कारण अजून त्यांच्या विरोधात एकही साधे आरोपपत्र पाच वर्षात दाखल करता आलेले नाही. पण असले धडधडीत अज्ञान बोलून दाखवताना हास्यास्पद ठरू नये; याची काळजी पवारांनी घ्यायला हवी होती. नसेल तर लोक म्हणतील तुमचे डोके ठिकाणावर आहे काय?

इतका ओरडा कशाला?



  

   शुक्रवारपासून दाऊद कुठे आहे, त्याचा सर्वच वाहिन्या शोध घेत आहेत. पकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांचे खास दूत असलेले शहरीयार खान यांनी, दाऊद आता पाकिस्तानात नाही आणि त्याला पाकिस्तानातून पळवून लावले, असे वक्तव्य करताच, इथे गदारोळ सुरू झाला. जणू पाकिस्तानने तो तिथेच असल्याचे कबुल केल्यास त्याला भारत उचलूनच आणणार आहे, असा एकूण चर्चेचा सूर होता. शहरीयार खान असो, की पाकचे पंतप्रधान असोत त्यांच्या नावातच शरीफ़ असा शब्द असतो. बाकी त्यांनी शराफ़त कधीच सोडून दिलेली आहे. त्यामुळे असल्या वांझोट्या चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. अमेरिकेने ज्याप्रमाणे पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या ओसामाला पाकसेना व गुप्तचर खात्याचेच संरक्षण मिळाले असल्याचे ओळखले आणि पाकच्याच मदतीने त्याला पकडायचा नाद सोडून दिला होता. पुढल्या काळात त्यांनी ओसामाचा शोध चालूच ठेवला होता, पण हाती लागलेली माहिती पाकिस्तानला न देता त्यांच्यापासून लपवलेली होती. पक्की माहिती हाती येताच पाकला अंधारात ठेवून पाक हद्दीत जाऊन ओसामाचा मुडदा पाडला होता. नुसता ओसामाला मारलाच नाही, तर त्याचा मृतदेहही अमेरिकन सैनिक घेऊन गेले होते. मग जगाला ओसामा मारला गेल्याचे कळले; तेव्हाच पाकिस्तानलाही समजले होते. त्यांच्या अतिशहाणपणाचे नाक मग जगासमोर कापले गेले होते. पाकला जी भाषा समजते, त्याच भाषेत मित्र अमेरिकेने त्यांच्या लबाडीला उत्तर दिले होते. दाऊद प्रकरणात भारताला तेच करावे लागेल आणि ते अशक्य अजिबात नाही. भारतीय गुप्तचर खाते कराचीत जाऊन दाऊदला ठार मारू शकेल. सवाल त्याला शोधण्याचा व ठार मारण्याचा नसून सरकारच्या इच्छाशक्ती व हिंमतीचा आहे.

   आपला जीव धोक्यात घालून पाकिस्तानच्या इथल्या हस्तकांना संपवण्याच्या कारवाया करणार्‍या आपल्याच गुप्तचरांना जे सरकार स्वदेशातच कायदेखटल्यात गोवू बघते आणि मतांच्या राजकारणासाठी गुप्तचर कारवायांचे पितळ उघडे पाडते; त्या सरकारवा विसंबून कुठला सैनिक वा गुप्तचर देशासाठी आपले प्राण पणाला लावू शकतो? एकवेळ आपला सैनिक वा गुप्तचर, शत्रू असलेल्या पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकेल, पण आजच्या राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवू शकणार नाही. मतांच्या गठ्ठ्य़ासाठी इथले राज्यकर्ते कुणाचाही गळा फ़ासात अडकवू शकतात. इशरत प्रकरणाने तेच सिद्ध केलेले आहे. पण अमेरिकेन सेना किंवा त्यांचे गुप्तचर अशा कारणाने घाबरत नाहीत. डेव्हीड हेडलीला भारताच्या हाती सोपवला, तर अमेरिकन गुप्तचर खात्याचे पितळ उघडे पडेल म्हणून तिथल्या सरकारने हेडलीला भारताच्या हवाली करण्यास साफ़ नकार दिला होता. आणि आमचे सरकार पाक हस्तकांना चकमकीत मारले, म्हणून आपल्याच गुप्तचर अधिकार्‍यांना चव्हाट्यावर आणायचे गलिच्छ राजकारण करते आहे. अशा सरकारवर विसंबून कुठला अधिकारी वा सैनिक पाक हद्दीत जाऊन दाऊदचा काटा काढू शकेल? असे काम हेरगिरी वा गुप्तचरांचे असते, म्हणजे ते प्रत्यक्षात बेकायदेशीर स्वरूपाचे काम असते. त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रकार सरकारी यंत्रणेकडून होणार नाही अशी हमी असते. त्याच विश्वासार्हतेला आजच्या युपीए सरकार व राज्यकर्त्यांनी तडा दिलेला आहे. मग दाऊदचा काटा कोणी कसा काढायचा? इशरत प्रकरणाने भारतीय गुप्तचर खात्याचे मनोबल किती खचले आहे, त्याचेच परिणाम आपण काश्मिरातील नियंत्रण रेषेवर बघत आहोत. घुसखोरी व वारंवार होणारे हल्ले गुप्तमाहिती अभावी होत आहेत.

  पाकिस्तानचे खुले समर्थन करणारे व शांततेचा आग्रह धरून भारतीय सेनेबद्दल गुप्तचरांवर उघड संशय घेणारे, इथे उजळ माथ्याने वावरत आहेत. एकप्रकारे तेच पाकचे हितसंबंध इथे बसून जपणार असतील, तर पाकला इथे वेगळे हस्तक शोधण्याची गरज काय? भारतीय कैदी सर्वजीतचा खटला चालवणार्‍या पाक वकीलावर तिथे हल्ले होतात. आणि इथे पाक हल्ले व सैनिकांच्या कुरापतीचे समर्थन करणारे उजळमाथ्याने वावरतात. मग दाऊद इथे असला वा तिकडे पाकिस्तानात असला, म्हणून काय फ़रक पडतो? बिहारचे जवान सीमेवर मारले गेले आणि सरकारनेही पाकसेनेच्या कारवाईत मारले गेले असे स्पष्टपणे सांगितले असताना; बिहारीमंत्री पाकसेनेचे समर्थन करतात, तेव्हा पाकने कोणाला हाती धरले आहे, त्याचीच साक्ष मिळते ना? मग दाऊद तिकडे लपवून ठेवायची पाकिस्तानला गरजच काय? त्याला भारतात आणले म्हणून त्याच्या कारवाया थांबणार आहेत काय? चुकून त्याचा चकमकीत मृत्यू झाला, तर मग बघायलाच नको. त्याला हुतात्मा ठरवायला इथे आकाशपाताळ एक केले जाण्याचा धोका आहे. आजच्या एका राष्ट्रीय वाहिनीचा संपादक वीस वर्षापुर्वी मुंबईत बॉम्बस्फ़ोट झाल्यावर त्यात दाऊदचे नाव गोवले गेले; म्हणून ओक्साबोक्शी रडला होता. दाऊदच्या राष्ट्रप्रेमावर शंका घेतल्याबद्दल त्याने जाहिरपण नाराजी व्यक्त करणारा लेख लिहिला होता. शुक्रवारी तोच संपादक दाऊदच्या पत्त्याबद्दल चर्चा रंगवत होता. अशा देशात पाकिस्तानला वेगळे हस्तक व घातपाती शोधायची गरज आहे काय? दाऊदचे असे उजळमाथ्याने वावरणारे प्रतिष्ठीत समर्थक असताना, त्याला लपून रहाण्याची गरजच काय? तो पाकिस्तानात कशाला भारतातही उजळमाथ्याने वावरू शकेल. त्याबद्दल ओरडा करायचे कारणच काय?

Friday, August 9, 2013

खरे तेच बोलले ना?

   पाच भारतीय सैनिकांचे हत्याकांड नियंत्रण रेषेवरच्या चौकीत झाले, त्यावरून देशभर काहूर माजले असताना, राजकीय पक्षांचा बधीरपणा संतापजनक आहे. आधीच संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या चुकीच्या विधानामुळे संसदेत गदारोळ उठला होता. पण नंतर त्या जवानांचे मृतदेह सन्मानाने त्यांच्या जन्मगावी कुटुंबियांकडे रवाना करण्यापुर्वी झालेल्या सोहळ्याविषयीची राजकीय उदासिनता धक्कादायकच होती. ज्या कश्मिरच्या सुरक्षेसाठी हे जवान आपले प्राण पणाला लावतात, त्याच काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला त्या मृतदेहांच्या शवपेट्या रवाना होताना विमानतळाकडेही फ़िरकले नाहीत. अखेरची वंदना देण्याच्या समारंभाकडेही त्या राज्यसरकारने पाठच फ़िरवली होती. झिंबाब्वेच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आलेल्या रसूल नामक काश्मिरी क्रिकेटपटूला एकाही सामान्यात अकरा खेळाडूंमध्ये सहभागी करून घेतले गेले नाही; यामुळे ओमर अब्दुल्ला विचलीत झाले होते. क्रिकेट संघातल्या समावेशाबद्दल इतका संवेदनाशील असलेला हा मुख्यमंत्री आपल्याच राज्याच्या सीमा राखताना प्राण गमावणार्‍या जवानांबद्दल इतका उदासिन राहू शकतो काय? असेल तर मग त्याची संवेदनशीलता कशी मोजायची? धर्मानुसार की प्रांतीय अस्मितेनुसार? कारण अशी वेळ प्रथमच आलेली नाही. राज्यात कोणीही संशयित जिहादी दहशतवादी मारला गेल्यास त्याच्या अंत्यविधीला अगत्याने तिथले राजकारणी हजेरी लावतात. पण पोलिस वा जवान मृत्यूमुखी पडला तर तिकडे उपचार म्हणूनही फ़िरकत नाहीत. ताज्या घटनेनंतर त्याचीच साक्ष मिळालेली आहे. अर्थात त्यासाठी एकट्या ओमर अब्दुल्ला यांनाच दोषी मानण्याचे कारण नाही. इतरत्र तोच अनुभव आहे.

   मारल्या गेलेल्या सैनिकात पाचपैकी चारजण बिहारचे सुपुत्र होते. पण त्यांचे मृतदेह जम्मू येथून दिल्लीला विमानाने आणले गेले; तेव्हा योगायोगाने कामासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार राजधानीत आलेले होते. चारपाच किलोमिटर्स दूरच्या विमानतळावर जाऊन त्यांना आपल्याच बिहारी सुपुत्रांना अखेरची सलामी द्यावीशी वाटली नाही. आणि पुढे तिथून हे चार मृतदेह पाटण्याला विमानाने आले; तेव्हा तिथेही कोणी बिहारचा मंत्री उपस्थित राहिला नाही. शासकीय यंत्रणा आपले काम करीत होती. पण ज्या विषयाला इतके राष्ट्रीय महत्व आलेले आहे, त्याबद्दल आत्मियता दाखवावी असेही कोणाला वाटू नये; ही अत्यंत शोचनीय बाब आहे. मग आपोआप ती सनसनाटी बातमी झाली. अर्थात त्या मृतांना शासकीय सन्मानाने निरोप दिला जाईल व त्यांच्या कुटूंबाला दहा लाखाची भरपाई दिली जाईल; अशा घोषणा तात्काळ झाल्या. पण हा शासकीय उपचार असतो. सरकारच्या वतीने देशासाठी बलीदान देणार्‍या जवानाच्या कुटुंबियाचे सांत्वन अत्यंत मोलाचा क्षण असतो, कारगील युद्धाच्या काळात लालूंसारखा माणूसही अगत्याने अशा प्रसंगी हजेरी लावत होता. तिथे नितीशकुमार यांचे सरकार  संपुर्ण नाकर्ते ठरले. त्यामुळेच मग वाहिन्यांनी त्याचा गाजावाजा केला. नितीश सरकारचे ग्रामीण विकासमंत्री भीमसिंग यांना एका स्थानिक वाहिनीच्या पत्रकाराने त्याबद्दल विचारले. शहीद होणार्‍या जवानाच्या अंत्यविधीकडे सरकारचे दुर्लक्ष कशाला? त्या शहीदांना सन्मान मिळायला नको का? अशा प्रश्नांना त्या मंत्र्याने दिलेली उत्तरे आजच्या राजकीय बेपर्वाईचा पुरावाच आहे. पोलिस व जवान हे मरण्यासाठी व शहीद व्हायलाच भरती होतात, असे या महोदयांनी सांगून टाकले.

   सैन्यात वा पोलिसात भरती होणारे मरायलाच पुढे आलेले असतात. ही भाषा आजच्या राजकीय मनोवृत्तीची साक्ष आहे. पुढार्‍यांना सुरक्षा द्यायची, प्राण पणाला लावून त्यांची रक्षा करायची आणि त्यासाठीच शहीद व्हायचे, असेच आता पोलिस व सैनिकांचे कर्तव्य झालेले आहे. आणि त्यासाठी त्यागाच्या गप्पा करण्याचे कारण नाही, मरण्यासाठी तयार असाल, तरच ह्या दोन ठिकाणी नोकरी वा पगार मिळू शकतो, असेच त्याला सुचवायचे आहे. ते कोणाला आवडणारे नसले व त्यातून राजकीय प्रतिक्रिया नुकसान देणारी असली; तरी तेच निखळ सत्य आहे. भीमसिंग यांनी ते स्पष्ट शब्दात बोलून दाखवले. पण पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यापासून एकूण सरकारचे धोरण त्यापेक्षा वेगळे आहे काय? इतकी भयंकर घटना घडून त्यावर काहूर माजले असताना पंतप्रधान त्याबद्दल चकार शब्द बोलले नाहीत. याच कशाला बाटला हाऊसपासून अनेक चकमकीत शेकडो पोलिस वा सेनेचे जवान मारले जात असतात, त्याबद्दल राजकारण्यांनी कधी आस्था दाखवली आहे काय? इशरतसाठी अश्रू ढाळणार्‍यांनी कितीदा अशा चकमक वा हल्ल्यात मारल्या जाणार्‍यांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला आहे? पोलिस वा जवान हकनाक मारले जात असतात. पण त्यांच्याकडूच चुकून सुटलेल्या गोळीला कोणी बळी पडला, तर त्यांचीच पुन्हा गुन्हेगार म्हणून निंदा केली जात असते. आपला जीव धोक्यात घालून समाज व जनतेच्या सुरक्षेसाठी सामान्य घरातल्या तरूणांनी मरावे आणि त्यांच्या मरण्यावर इथले बुद्धीमंत, मानवतावादी, राजकीय नेते आपल्या विद्वत्तेचे इमले उभे करणार; हे आता सेक्युलर धोरण होऊन बसले आहे. बाकीचे तसे स्पष्ट शब्दात भाषेत बोलत नाहीत. या मंत्र्याने ते सत्य बोलून दाखवले, बाकीचे कृतीतून तसे वागतात.

Thursday, August 8, 2013

तोयबांचे होयबा

   सत्तेवर असलेल्या पक्षाने वा सत्ताधार्‍यांनी देशहिताचे रक्षण करावे आणि देशहिताला बाधा येईल अशा गोष्टींच्या मुसक्या बांधाव्यात; अशी मुळात अपेक्षा असते. किंबहूना सत्ताधिकार तेवढ्यासाठीच त्यांच्याकडे सोपवलेला असतो. पण सत्ता म्हणजे आपल्या तुंबड्या भरण्यासाठीच मिळालेला विशेषाधिकार आहे, अशी बहुधा आजच्या कॉग्रेस नेत्यांची व नेतृत्वाची समजूत झालेली असावी. म्हणून की काय, त्यांनी मंगळवारी देशाच्या अब्रुवर आणि सुरक्षेवर घाला घातला जाण्याची घटना घडल्यावरही थेट शत्रू राष्ट्राची वकीली केल्याप्रमाणे संसदेत भूमिका मांडली. तेवढ्यावर न थांबता चुक झाली, तर ती वेळीच सुधारण्याचा शहाणपणाही केला नाही. अखेरीस दिर्घकाळ चाललेले सेक्युलर नाटक झुगारून तमाम लहानमोठ्या विरोधी पक्षांना एकजुटीने व एकदिलाने सरकारच्या विरोधात शड्डू ठोकून उभे रहावे लागले. तेव्हा सत्तेची मस्ती उतरली आणि संरक्षणमंत्र्यांनी आपले शब्द मागे घेतले. जणू आपण विरोधी पक्षावर उपकार केल्याच्या थाटात सत्ताधारी कॉग्रेसनेते दोन दिवस बोलत होते. कॉग्रेस पक्षात बुद्धीचे किती दिवाळे वाजले आहे, त्याचीच या निमित्ताने साक्ष मिळाली. कारण चुक कळत असूनही कोणी त्याबद्दल उघडपणे मतप्रदर्शन करायला घाबरत होता. उलट दुसर्‍या टोकाला जाऊन तमाम कॉग्रेसनेते संरक्षणमंत्री अन्थोनी यांच्या चुकीच्या विधानाचे समर्थन करत होते. त्यातून आपण पक्षाच्या हाती आलेली सत्ता व त्या सत्तेवर कब्जा करून बसलेल्यांच्या शब्दापेक्षा देशहिताला कवडीची किंमत देत नसल्याचे प्रत्येक कॉग्रेस नेत्याने यावेळी दाखवून दिले. वेळ आली तर सत्ता व सत्तेचे लाभ मिळवण्यासाठी आपण देशहितावर निखारे ठेवू शकतो, याचाही त्यांनी पुरावा दिला.

   मंगळवारी अन्थोनी यांनी केलेली चुक गुरूवारी दुरुस्त करण्यात आली. पण दरम्यान संपुर्ण कॉग्रेस पक्षाच्या लहानथोर नेत्यांनी आपली विवेकबुद्धी निकामी झाल्याचेच जगाला दाखवून दिले नाही काय? हीच चुक मंगळवारी विरोधी पक्षांनी आक्षेप घेताच दुरूस्त केली असती; तर संसदेचे कामकाज दोन दिवस वाया गेले नसते, की गदारोळ झाला नसता. प्रत्येक घोटाळा, गैरकारभार व गुन्हा सेक्युलर विचारांच्या मुखवट्य़ाआड लपवण्याची कॉग्रेसला आता इतकी सवय झाली आहे, की त्यांना भाजपा सोडून आपल्या चोरीमारी व भ्रष्टाचाराला कोणीच रोखू शकत नाही; याची पुरेपुर खात्री पटलेली आहे. भाजपाच्या जातीयवादाचा बागुलबुवा दाखवला; मग बाकीच्या लहानसहान सेक्युलर पक्षांना आपल्या समर्थनाला उभे करता येते आणि म्हणूनच मनमानी करायला आपण मुखत्यार आहोत, अशीच त्या पक्षाची ठाम समजूत झाली आहे. म्हणूनच थेट पाकिस्तानचा संरक्षणमंत्री असल्याप्रमाणे अन्थोनी यांनी सत्याचा अपलाप केला आणि तिथे बिगर भाजपा पक्षांनाही आपल्या सेक्युलर लाचारीची शरम वाटायची पाळी आली. त्या तमाम सेक्युलर पक्षांनाही मग भाजपाच्या सुरात सुर मिसळून सरकार विरोधात घोषणा देत कामकाज बंद पाडायची वेळ आली. जेव्हा हे तमाम सेक्युलर पक्ष विरोधात गेले, तेव्हाच कॉग्रेसला संरक्षणमंत्र्यांची गफ़लत मान्य करायची पाळी आली. लालू, मुलायम, पासवान, मायावती, डावे आणि बाकीचे पक्षही राष्ट्रहिताच्या बाजूने उभे राहिले आणि पाकिस्तानच्या हिताचा युपीए सरकारने घेतलेला पवित्रा हाणून पाडायला सिद्ध झाले, मुस्लिम मतांसाठी आता जिहादी, दहशतवादी व थेट पाकिस्तानच नव्हेतर तोयबांचेही समर्थन करण्यापर्यंत सत्ताधार्‍यांची मजल गेली असल्याचा हा पुरावा आहे.

   इशरत जहान चकमकीचे भांडवल असो किंवा अफ़जल गुरूला दिर्घकाल फ़ाशी देण्यात झालेली टाळाटाळ असो; त्यामागे केवळ मुस्लिम मते मिळवण्याचाच हेतू होता व आहे. पण आता हे खुळ थेट देशबुडव्या दिशेने सरकू लागले आहे. मुस्लिम मतपेढीसाठी मुस्लिमांचेही लांगुलचालन एकवेळ समजू शकते. पण जेव्हा माणुस विवेक सोडतो, तेव्हा त्याच्या वागण्याला ताळतंत्र उरत नाही. त्यामुळेच इथल्या मुस्लिमांना खुश करण्यासाठी तोयबांचेही समर्थन करण्यापर्यंत मजल जात असते. यातून कॉग्रेसला असा भ्रम झालेला दिसतो, की इथल्या मुस्लिमांचीही पाकिस्तानकडे सहानुभूती असून जिहादी हिंसेचे इथला मुस्लिमही समर्थनच करतो. म्हणून आपण तोयबा व जिहादींना पाठीशी घातले, तरच आपल्याला मुस्लिमांची मते मिळू शकतील. पण इथल्या भरकटलेल्या मुठभर तरूणांचा वापर पाकिस्तान घातपात घडवण्यासाठी करून घेत असला; तरी वास्तवात इथला बहूसंख्य मुस्लिम देशनिष्ठ आहे. पाकिस्तान बाबत त्याच्या मनात कुठलीही हळवी भावना नाही. त्यामुळेच पाकिस्तान वा तोयबांच्या समर्थनामु्ळे मुस्लिम मते मिळू शकणार नाहीत. मात्र असल्या खुळचट सेक्युलर नाटकामुळे बिगरमुस्लिम भारतीयांमध्ये कॉग्रेस व सेक्युलर राजकारणी संशय निर्माण करीत आहेत. अन्थोनी यांचे निवेदन त्यापैकीच एक मुर्खपणा होता. पण आज त्यातून बिगर भाजपा पक्षांचे डोळे निदान उघडले आहेत. मुस्लिमांचेही उघडलेले असतीलच. परिणामी मुस्लिम आता आपल्या देशप्रेमाची साक्ष देण्यासाठी कॉग्रेसकडे पाठ फ़िरवल्याशिवाय रहाणार नाहीत. पण या निमित्ताने एक प्रश्न विचारलाच पाहिजे. भारत सरकारचे निर्णय कोण घेतो? पक्षाचे धोरण कोण ठरवतो? खरेच पक्षाचे नेते करतात की तोयबांचे होयबा?

Wednesday, August 7, 2013

स्पष्टच सांगून टाका ना


   या वर्षाच्या आरंभी जानेवारी महिन्यात सीमेवर दोन भारतीय जवानांची निर्घॄण हत्या करण्यात आलेली होती. त्यापैकी एका जवानाचे मुंडकेच कापून पळवण्यात आलेले होते. असे काही कृत्य करणार्‍याचा हेतू स्पष्ट असतो. त्या जवानाला ठार मारणार्‍यांना निव्वळ भारतीय सेनेला हल्ल्यातून चिथावणी द्यायची नसते; तर त्या मृताची विटंबना करून संपुर्ण भारतीय जनतेला डिवचायचे असते. त्यातून तुम्ही नंपूसक आहात व स्वत:चा बचावही करायची तुमची लायकी नाही, असेच त्या कृतीतून सुचवायचे असते. सहाजिकच त्या घटनेनंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली तर नवल नव्हते. जेव्हा सामान्य जनता इतकी प्रक्षुब्ध होते; तेव्हा तिचेच प्रतिनिधीत्व करणार्‍या सरकारने किती आक्रमक प्रतिक्रिया द्यायला हवी, ते वेगळे सांगायची गरज नाही. पण भारतीयांचा अनुभव उलटाच आहे. त्या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्याऐवजी आमचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद नव्याने पाकिस्तानचे पंतप्रधान झालेल्या व्यक्तीचे भारतात स्वागत करत होते, त्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी देत होते. दुसरीकडे ज्या कारणास्तव हे पाकिस्तानी पंतप्रधान भारतात आलेले होते, तिथल्या सामान्य जनतेची काय प्रितिक्रिया होती? आशियामध्ये प्रसिद्ध असलेले मुस्लिम श्रद्धास्थान अजमेर शरीफ़ दर्ग्याला भेट देण्यासाठीच पाक पंतप्रधान इथे आलेले होते आणि त्याच दर्ग्याच्या प्रमुख संतांनी त्यांच्यासाठी दुवा मागायलाही नकार दिला होता. तेवढेच नाही. हे महोदय अजमेरला येऊन गेल्यावर तिथल्या सामान्य मुस्लिम नागरिकांनी दर्ग्याकडे जाण्याचा प्रमुख रस्ता विटाळला, म्हणून धुवून काढला होता. त्यातून दोन्ही देशाच्या सत्तेने दिलेला संदेशही महत्वाचा होता.

   भारतीय जवानांची मुंडी कापण्याबद्दल पाक पंतप्रधान बेफ़िकीर राहिले तर वेगळे. कारण त्यांचेच पाप त्यांनी जाहिरपणे कबूल करावे, अशी अपेक्षा कोणी करणार नाही. पण त्या पापाचे चटके ज्यांना बसतात, त्या देशाच्या सत्तेने त्या पापाचे घोंगडे त्यांच्या गळ्यात बांधण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा ना? तसे न करता, त्यांच्या स्वागताला पायघड्या पसराव्यात, यातून तुम्हालाही आपल्या जवानांच्या प्राणाची वा हौतात्म्याची काडीमात्र किंमत नाही, असाच संदेश दिला जात असतो. जानेवारीतल्या घटनाक्रमाने तेच केले. सहाजिकच त्यापासून परावृत्त होण्यापेक्षा पाकिस्तान व त्यांच्या सेनेने अधिकच आगावूपणा करावा यात नवल नाही. मंगळवारी काश्मिरच्या पुछ भागात नियंत्रण रेषेवर घडलेले हत्याकांड त्याचीच प्रचिती आहे. या सीमेवर भारतीय चौकीत पहारा देणार्‍या भारतीय जवानांवर पाक सेनेच्या तुकडीने आकस्मिक हल्ला चढवून पाच जवानांचे हत्याकांड केले. त्यामुळे देशभर एक संतप्त प्रतिक्रिया उमटली. पण देशात आज राज्य करणारे सरकार कुठल्या देशाच्या जनतेचे प्रतिनिधीत्व करते; त्याचीच शंका पुढल्या घटनाक्रमाने आली. कारण आपली मर्यादा ओलांडून पाक सेनेची तुकडी भारतीय हद्दीत घुसली व त्यांनी भारतीय जवानांवर आकस्मिक हल्ला चढवल्याची प्रारंभीची बातमी होती. त्याबद्दल संसदेमध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवणे स्वाभाविक होते. त्याचे कारण भारत सरकार व त्याचे संरक्षणमंत्री पाकिस्तानला खरमरीत उत्तर देतील, हीच अपेक्षा होती. पण विरोधकांचा अनुभव संपुर्ण देशालाच अचंबित करून गेला. भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अंथोनी संसदेत उभे राहिले; तेच मुळात पाकिस्तान सरकारच्या कुरापतखोरीला संरक्षण द्यायला. जणू पाक सेनेच्या बचावासाठीच ते बोलत होते.

   भारतीय चौकीवर हल्ला करणारे व पाच जवानांची हत्या करणारे पाकिस्तानी सेनेचा गणवेश घालून आले होते, असे विधान अंथोनी यांनी केले. त्याचा अर्थ असा, की हल्लेखोर पाक सेनेची तुकडी वा सैनिक नव्हते, तर पाक सेनेच्या गणवेशातले कोणी भलतेच होते, याची भारतीय संरक्षणमंत्र्यानेच कबुली देऊन टाकली. आणि ही भाषा किंवा असा खुलासा पाकिस्तान नेहमीच देत असते. मग असे हल्लेखोर कारगिलमध्ये घुसलेले पाक सैनिक असोत किंवा पाकसेनेने प्रशिक्षित केलेले मुंबईत हल्ला करणारे कसाब टोळीतले हल्लेखोर असोत. प्रत्येक वेळी पाकिस्तानने आपला सरकारी वा सेनेचा हात भारत विरोधी कारवायात नाही; असाच पवित्रा घेतलेला आहे. याच्या नेमक्या उलट भारताची भाषा राहिली आहे. प्रत्येक जिहादी व घातपाती हल्ल्यात पाकिस्तानवर भारत सरकारने थेट आरोप केलेला आहे. तेव्हा भले पाकिस्तानी अतिरेकी असतील, पण त्यांचा बोलविता धनी पाक सरकार वा पाकसेना नाही; अशीच पाकिस्तानची भूमिका राहिलेली आहे. दोन दशके उलटून गेली तरी पाकिस्तानने आपली भाषा वा शब्द बदललेले नाहीत. पण अंथोनी व त्यांच्या युपीए सरकारने भारताची भाषा मात्र बदलून टाकली आहे. आता भारताचा संरक्षणमंत्री पाकिस्तानी भाषेत बोलू लागला आहे आणि भारताचा परराष्ट्रमंत्री पाकच्या कुरापतखोरीचे स्वागत करू लागला आहे. मग सीमेवर जवान तरी कशाला उभे करायचे? पाक सेना, सैनिक व त्यांच्याकडून प्रशिक्षित केल्या जाणार्‍या जिहादी घातपात्यांना नेमबाजीचा सराव करता यावा; म्हणून भारताने नियंत्रण रेषा वा सीमेवर लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत व चौक्या उभ्रारल्या आहेत काय? युपीए सरकार, पंतप्रधान, खुर्शीद, अंथोनी इत्यादिकांनी त्याचा तरी खुलासा स्पष्ट शब्दात करून टाकावा.