चारपाच शतकांपुर्वी होऊन गेलेला इतिहासकार इब्न खाल्दून म्हणतो, की कुठल्याही साम्राज्य वा संस्कृतीच्या विनाशाची बीजे तिच्या घराणेशाहीतच पेरलेली असतात. त्यामुळे अशी संस्कृती वा साम्राज्ये तीन पिढ्यांपेक्षा अधिक तग धरू शकत नाहीत. चटकन खाल्दूनचा हा दावा चमत्कारिक वाटेल. पण आपल्या डोक्यातल्या समजूती व भ्रम बाजूला ठेवून त्याला समजून घ्यायला गेले; तर त्याच्या विधानाचे सुत्र लक्षात येऊ शकते. त्याच्या काळात अनेक संस्कृती व साम्राज्ये उदयास आलेली वा रसातळाला गेलेली त्याने बघितली व अभ्यासलेली होती. कालपर्यंत भक्कम व अभेद्य वाटणारे सोवियत साम्राज्य किंवा त्याच्याही आधी ज्याच्यावरच सुर्य मावळत नाही असे म्हटले जायचे; ते ब्रिटीश साम्राज्य आज नामशेष होऊन गेले आहे. पण जोवर त्यांची सत्ता होती तोवर कुठला विद्वान अभ्यासक त्यांच्या विनाशाचे भाकित करू शकला नव्हता. अगदी काही दिवसात बघताबघता ही साम्राज्ये उध्वस्त होऊन गेली. पण ती उध्वस्त होण्याची कारणमिमांसा कितीशी झाली? सर्वसाधारणपणे साम्राज्ये वा संस्कृती या स्वत:लाच ओझे होऊन लयास गेल्या असे भासवले व समजवले जाते. पण बारकाईने अभ्यास केला, तर त्यांचा विध्वंस चालू असताना प्रत्यक्षात तो विध्वंस करणारेच त्याचे सर्वात मोठे राखणदार असल्याचे भासवत होते, असेच आढळून येईल. आणि असे विध्वंसक कोण असतात, तर आपल्या अतीव पराक्रम, कष्ट वा मेहनतीतून ज्यांनी त्या साम्राज्याची उभारणी केलेली असते, त्यांचेच हे विध्वंसक वारस असल्याचे दिसतील. किती चमत्कारिक बाब आहे ना? आपल्याच पुर्वजांनी कष्टातून उभे केलेले साम्राज्य हे वारस कशाला बुडवतात? त्याची कारणमिमांसाच इब्न खाल्दून याने केलेली आहे.
कष्ट व मेहनत यांच्या सोबत निर्दयता, रानटीपणा व जुगारी वृत्तीने लढण्याच्या कर्तबगारीतून साम्राज्ये उभी रहातात. त्यात आपले सर्वस्व पणाला लावून कर्तृत्व दाखवायला पुढे येणारी माणसे वा त्यांची टोळी साम्राज्य निर्माण करीत असते. त्यात कदाचित मारले जाणे, संपून जाणे, नष्ट होणेही शक्य असते. थोडक्यात कर्तबगारी गाजवायला निघालेला माणूस वा त्याचे सवंगडी; आपले स्वस्थ जीवन झुगारून अस्मितेसाठी वा कर्तृत्वासाठी अवघे जीवनच त्या जुगारात पणाला लावतात. त्यात विजयी होतात, तेव्हा साम्राज्य उदयास आलेले असते. त्यात जो नेता असतो, तो आपल्या सवंगडी व साथीदारांशी सन्मानाने वागत असतो. पण नेता म्हणून त्याच्या हाती सत्ता आल्यावर पुढल्या पिढीत मात्र त्यांच्यात तो परस्पर सन्मान व समता शिल्लक उरत नाही. जन्माला आल्याने अधिकार हाती आलेला नवा नेता सत्ताधीश आपल्या सहकार्यांना दुय्यम वागणूक देतो आणि त्यांच्यातही सुखवस्तू जीवनाने स्वाभिमान पांगळा झालेला असतो. मग कर्तृत्वाशिवायची सत्ता औदासिन्य आणते आणि लढण्याचा कमीपणा वाटू लागतो. सत्ता व त्यातून मिळालेली सुबत्ता टिकवण्यासाठी भाडोत्री लढवय्ये गोळा करावे लागतात. सहाजिकच लढण्याची व अस्मितेसाठी सर्वस्व पणाला लावण्याची इच्छाच मरत जाते. किंबहूना लढणेच कमीपणाचे भासू लागते. तिसरी पिढी सत्तेवर येते, तिला आपला पुर्वज लढला, त्याने कष्ट केले, अंगातला घाम गाळला वा जखमा करून घेतल्या, हेच लज्जास्पद वाटू लागते. थोडक्यात त्याला अस्मिता, स्वाभिमान हे सुखवस्तू जीवनापुढे फ़डतूस कल्पना वाटू लागतात. परिणामी लढणे, झुंज देणे, प्रतिकार यांचीच भिती वाटून कर्तृत्वाचीच शरम निर्माण होते. अशारितीने तिसरी पिढी साम्राज्याच्या सुरक्षेला निकम्मी बनून जाते.
खरीखुरी हिंमत, धाडस, कर्तबगारी, शौर्य यापेक्षा अधिकारपदे, गणवेश, पदव्या, अधिकारपत्रे यातून आपली शक्ती येते; अशा समजूतीमध्ये ही तिसरी पिढी मशगुल होऊन जाते आणि नेमक्या त्याचवेळी सत्ताधारी परिघाच्या बाहेर कोणीतरी दबलेले, चेपलेले, पिडीत वा अन्यायग्रस्त आपल्या जगण्यातल्या अगतिकतेच्या विरोधात उभे रहायला धडपडत असतात, त्यांच्यासाठी नवी संधी निर्माण होत असते. आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी व अगतिकता, गुलामी झुगारण्यासाठी; आपले सर्वस्व पणाला लावायला असे काही लोक, त्यांचा समुह प्रयत्नशील असतो. कर्तृत्व दाखवायला सज्ज होत असतो. त्याच्यासाठी मग निष्क्रिय, कर्तृत्वहीन, नाकर्ते सत्ताधीश हे सोपे लक्ष्य होऊन जाते. तिथेच त्या साम्राज्याचा विनाश अटळ होऊन जातो. कारण सत्ता हाती असली, तरी ती राखण्यासाठी लढायची हिंमत गमावून बसलेले ती सत्ता टिकवू शकत नाहीत. त्यासाठी सर्वस्व पणाला लावायची हिंमत गमावलेले व तीच बळकावायला सर्वस्व पणाला लावण्यास सज्ज झालेले; अशी ही विषम लढाई असते. त्यात मग सुखवस्तूपणावर लाथ मारायला घाबरलेले पराभूत होतात आणि सुखवस्तू नसलेले, बाजारबुणगे वा रानटी निर्दयी लोक आपल्या क्रौर्याच्या बळावर विजयी होऊन जातात. सत्ता त्यांच्याकडे येते आणि आजवरचे सत्ताधीश नष्ट होऊन जातात. सोवियत क्रांती तिसर्या पिढीने बुडवली. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणार्या पुढार्यांची व तिची फ़ळे चाखणार्या वर्गाची तिसरी पिढी आज आपल्या देशात नेमकी त्याच दिशेने वाटचाल करताना दिसते आहे. राष्ट्रवाद, वंदेमातरम, देशप्रेमाची टवाळी करण्यात धन्यता मानणार्यांची तुलना खाल्दूनच्या सुत्रात आलेल्या नातवाशी होऊ शकते ना? पाकला धडा शिकवायला खुळेपणा म्हणणारा वर्ग कुठला आहे?
अलिकडेच सीमेवर पाच जवानांची पाक सेनेने हत्या केली. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे, असे उघड बोलले जाऊ लागले; तेव्हा युद्ध म्हणजे उपाय नाही, असे सांगायला हिरीरीने पुढे आलेला वर्ग कुठला आहे? युद्धाला व त्यासाठी देशप्रेमाच्या प्रक्षोभक भाषेला विरोध करणारा वर्ग कुठला आहे? हे लोक उलटा सवाल करतात, कितीजण सैन्यात भरती व्हायला तयार आहेत? याचा अर्थच त्यांच्यापैकी कोणीही तयार नाही, याची ती कबुली आहे. पण त्याचवेळी ज्या जवानांचे बळी गेले, त्यांच्या गरीब दरीद्री कुटुंबातील लोकांनी मात्र तितक्याच आग्रहाने पाकिस्तानला धडा शिकवा असा आग्रह धरलेला होता. आम्हाला भरपाईचे दहा लाख रुपये नकोत, तर पाकिस्तानवर हल्ला करा, असे हे कुटुंबिय म्हणतात. त्यांच्यापैकी किती गरीबांच्या वाट्याला या देशाच्या स्वातंत्र्य व विकासाची फ़ळे आलेली आहेत? कुठलेही सुखवस्तू जीवन त्यांच्या वाट्याला आलेले नाही. ब्रिटीश राज्यात, पारतंत्र्यात वा मोगल काळातही त्यांच्या पुर्वजांनी असेच गरीबीत जीवन कंठलेले आहे. ती गुलामी झुगारण्याच्या लढाईत त्यांना नेतृत्व द्यायला पुढे आलेल्या व परिणामी सुखवस्तू झालेल्या संस्थानिक, सरंजामदार व पुढल्या काळातील नेता अधिकारी वर्गातील लोकच आज युद्धाचे विरोधक झालेले दिसतील. तेव्हाच्या संस्थानिकांनी तनखे स्विकारून लढायचे टाळले, अस्मिता गुंडाळून ठेवली होती. आजचे सुखवस्तू काय वेगळी भाषा बोलत आहेत? आजच्या ऐषारामी जीवनाला धक्का देणारी अस्मिता त्यांना हास्यास्पद वाटणारच. कॉग्रेस व स्वातंत्र्योत्तर काळात उभे राहिलेले एक साम्राज्य व राजकीय संस्कृती रसातळाला जात असल्याची हीच चाहुल आहे. योगायोग म्हणजे त्याच प्रस्थापित राजकीय परिघाबाहेरचे आव्हान मोदींच्या रुपाने उभे ठाकलेले आहे.
No comments:
Post a Comment