बर्डफ़्लू किंवा स्वाईनफ़्लू यांच्याशी आमचे काही भांडण नाही. त्यांनी त्यांचे जीवन खुशाल जगावे आणि आम्ही आमचे जीवन खुशाल जगू; असे आपण म्हणू शकतो काय? पुण्यात वा आणखी कुठे जगात, अशा प्राणघातक रोगराईचा प्रादुर्भाव झाला; मग इथे आमची धावपळ कशाला सुरू होत असते? दिसेल त्याला लस टोचणे कशाला सुरू केले जाते? त्या धावपळीला काय म्हणायचे? त्या रोगजंतू वा विषाणूंनी तुमच्यावर कुठला हल्ला अजून केलेला नसतो, त्याच्या आधीच तुम्ही त्याच्या बंदोबस्ताची धावपळ कशासाठी करू लागलेले असता? त्याला युद्धाची हिंसेची खुमखुमी म्हणायचे काय? अशा घातक रोगबाधेशी आम्हाला दोन हात करायचे नाहीत, असे म्हणून तुम्ही त्यापासून सुटू शकता काय? दहशतवाद किंवा जिहाद त्यापेक्षा वेगळी गोष्ट नाही. त्यात आजवर जी माणसे बळी पडली आहेत, त्यांच्याकडे बारकाईने बघितले, तर त्यापैकी कुणाही बळीला युद्धाची खुमखुमी नव्हती. त्यापैकी क्वचितच कोणी माओवाद वा जिहादच्या विरोधात भाषणे दिलेली असतील. म्हणून त्यांच्यावर येणारे संकट टाळले गेले काय? कारण युद्ध ही एकतर्फ़ी बाब नसते. तुम्हाला युद्धाची खुमखुमी असो किंवा नसो; ते युद्ध लादले जाते तेव्हा त्यापासून तुमची सुटका नसते. त्याला सामोरे जाऊन स्वत:चा बचाव करणे अथवा त्या युद्धात हकनाक मारले जाणे, इतकाच आपल्या पुढला पर्याय असतो. कसाब टोळीच्या हातून मारले गेलेले किंवा अनेक स्फ़ोटात बळी पडलेले, असेच निरपराध दिसतील. म्हणूनच अशा लादलेल्या युद्धापासून पळ काढता येत नाही. त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग असतो; तो म्हणजे युद्धाची ज्याला खुमखुमी आहे, त्याला नामोहरम करण्याची पावले उचलणे. तशी पावले उचलण्याला युद्धाची खुमखुमी म्हणत नाहीत, तर सावधानतेचा उपाय म्हणतात.
आज देशासमोर जी परिस्थिती पाकिस्तानने निर्माण करून ठेवली आहे; ती नेमकी तशीच आहे. तुम्ही ती नाकारली म्हणून त्यापासून सुटका असू शकत नाही. जे कोणी शहाणे असली शांततेची प्रवचने देत असतात, त्यापैकी काही २६/११ च्या हल्ल्यात कसाब टोळीच्या तावडीत सापडलेले होते. त्यांनी सरकार वा सेनेकडे, पोलिसांकडे मदत मागण्याची काय गरज होती? त्यापैकी कोणाला युद्धाची खुमखुमी नव्हती. त्या हल्ल्यात आपले प्राण धोक्यात घालायला पुढे झालेल्या पोलिस व जवानांना युद्धाची अजिबात खुमखुमी नव्हती. मग त्यांच्या वाट्याला तो प्रसंग कशामुळे आला? तर असा हल्ला होण्याची ती पहिलीच घटना नव्हती. जेव्हा इथेच आपल्या हस्तकांकरवी स्फ़ोट घडवूनही तुम्ही युद्धाला सामोरे येत नाही असे दिसले; तेव्हा तोयबा व पाक जिहादींची हिंमत वाढली. त्यांनी थेट इथेपर्यंत आपले मारेकरी पाठवून किडामुंगीप्रमाणे नागरिकांचे हत्याकांड घडवून आणले. जेव्हा रोगजंतूंची पैदास थोपवण्याचे उपाय करण्यालाच मुर्खपणा ठरवणारा बुद्धीवाद बोकाळतो, तेव्हा अशी स्थिती येत असते. इथल्या पाक व तोयबा हस्तकांचा निर्दयपणे बंदोबस्त झाला असता, तर तिथून इथे मारेकरी व हल्लेखोर पाठवण्याची हिंमत त्यांना झाली नसती. नाक दाबले मग तोंड उघडते असे म्हणतात. पाकिस्तान वा त्यांनी जोपोसलेले ते तोयबा, तालिबान वा जिहादी इत्यादींना पोसणारे, सोसणारे इथे असतात; तेव्हाच त्यांच्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत असते. आमचे ज्येष्ठ नेतेच ‘सुडभावनेने गुन्हा करणे रास्त’ असल्याचे हवाले देत असतील, तर तोयबांना इथे हस्तक पैदास करायला पोषक स्थिती निर्माण होणारच ना? आम्ही इथे घाणीचे उकिरडे, डबकी निर्माण करायची, बुजवायची नाहीत आणि त्यात रोगराईची पैदास झाल्यास गळा काढून उपयोग आहे काय?
युद्धाची खुमखुमी हा फ़सवा शब्द आहे. युद्ध लादले जाते, तेव्हा त्याच्या प्रतिकाराची भूमिका म्हणजे युद्धाची खुमखुमी नसते. प्रत्येक युद्धात पाकिस्तानचा पराभवच झालेला आहे, पण म्हणून त्यांची मस्ती जिरलेली नाही. कारण खुमखुमी त्यांच्यात आहे. ती कायमची संपवली गेली नाही. त्या खुमखुमीचे निर्मूलन झाले असते, तर ही वेळ आलीच नसती. आज किश्तवाड किंवा सीमेवर जिथे हिंसा चालू आहे, तिथे शांततावाद्यांनी जाऊन उभे रहावे आणि आपली शांततेची प्रवचने तिथे समोरून गोळ्या झाडणार्यांना द्यावीत. आपल्या तत्वज्ञानावर किंवा विचारधारेवर ज्यांची इतकी गाढ श्रद्धा आहे; त्यांनी त्यासाठी तोंडाची वाफ़ इथे दवडण्यापेक्षा आपल्या विचारांची ताकद सीमेवर सिद्ध करावी. त्यासाठी ही उत्तम संधी आहे. एका बाजूला हकनाक मारल्या जाणार्या भारतीय जवानांचे प्राण त्यामुळे वाचतील आणि आपल्याला एका नव्या बचावात्मक सुरक्षा तंत्राची साक्षही मिळून जाईल. पर्यायाने संरक्षण खात्यावर होणारा करोडो रुपयांचा खर्च कमी करून लोकांच्या कल्याणासाठी ती मोठी रक्कम वापरता येईल. सैनिक भरती व शस्त्रास्त्र खरेदी बंद करून त्या जागी मोठ्या प्रमाणात अशा शांततावाद्यांची भरती करता येईल. पण त्यासाठी अशा युद्ध खुमखुमी विरुद्ध बोलणार्यांनी आपले तंत्रज्ञान प्रात्यक्षिकातून सिद्ध करायला नको का? तिथे युद्धप्रसंग ओढवला, मग हे तमाम लोक बिळात दडी मारून बसणार आणि ओंबळे वा उन्नीकृष्णन यांच्यासारख्या खुमखुमी नसलेल्यांना मरायला पुढे करणार. सगळी गफ़लत तिथेच तर होत असते. कारण युद्ध असो की शांतता असो, त्यावरच्या गप्पा या बुद्धीवाद्यांच्या पुस्तकातल्या व शिळोप्याच्या गप्पा असतात आणि सामान्य माणसाला त्यासाठी जीवाचे मोल मोजावे लागत असते.
No comments:
Post a Comment