Wednesday, August 7, 2013

स्पष्टच सांगून टाका ना


   या वर्षाच्या आरंभी जानेवारी महिन्यात सीमेवर दोन भारतीय जवानांची निर्घॄण हत्या करण्यात आलेली होती. त्यापैकी एका जवानाचे मुंडकेच कापून पळवण्यात आलेले होते. असे काही कृत्य करणार्‍याचा हेतू स्पष्ट असतो. त्या जवानाला ठार मारणार्‍यांना निव्वळ भारतीय सेनेला हल्ल्यातून चिथावणी द्यायची नसते; तर त्या मृताची विटंबना करून संपुर्ण भारतीय जनतेला डिवचायचे असते. त्यातून तुम्ही नंपूसक आहात व स्वत:चा बचावही करायची तुमची लायकी नाही, असेच त्या कृतीतून सुचवायचे असते. सहाजिकच त्या घटनेनंतर देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली तर नवल नव्हते. जेव्हा सामान्य जनता इतकी प्रक्षुब्ध होते; तेव्हा तिचेच प्रतिनिधीत्व करणार्‍या सरकारने किती आक्रमक प्रतिक्रिया द्यायला हवी, ते वेगळे सांगायची गरज नाही. पण भारतीयांचा अनुभव उलटाच आहे. त्या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्याऐवजी आमचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद नव्याने पाकिस्तानचे पंतप्रधान झालेल्या व्यक्तीचे भारतात स्वागत करत होते, त्यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी देत होते. दुसरीकडे ज्या कारणास्तव हे पाकिस्तानी पंतप्रधान भारतात आलेले होते, तिथल्या सामान्य जनतेची काय प्रितिक्रिया होती? आशियामध्ये प्रसिद्ध असलेले मुस्लिम श्रद्धास्थान अजमेर शरीफ़ दर्ग्याला भेट देण्यासाठीच पाक पंतप्रधान इथे आलेले होते आणि त्याच दर्ग्याच्या प्रमुख संतांनी त्यांच्यासाठी दुवा मागायलाही नकार दिला होता. तेवढेच नाही. हे महोदय अजमेरला येऊन गेल्यावर तिथल्या सामान्य मुस्लिम नागरिकांनी दर्ग्याकडे जाण्याचा प्रमुख रस्ता विटाळला, म्हणून धुवून काढला होता. त्यातून दोन्ही देशाच्या सत्तेने दिलेला संदेशही महत्वाचा होता.

   भारतीय जवानांची मुंडी कापण्याबद्दल पाक पंतप्रधान बेफ़िकीर राहिले तर वेगळे. कारण त्यांचेच पाप त्यांनी जाहिरपणे कबूल करावे, अशी अपेक्षा कोणी करणार नाही. पण त्या पापाचे चटके ज्यांना बसतात, त्या देशाच्या सत्तेने त्या पापाचे घोंगडे त्यांच्या गळ्यात बांधण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा ना? तसे न करता, त्यांच्या स्वागताला पायघड्या पसराव्यात, यातून तुम्हालाही आपल्या जवानांच्या प्राणाची वा हौतात्म्याची काडीमात्र किंमत नाही, असाच संदेश दिला जात असतो. जानेवारीतल्या घटनाक्रमाने तेच केले. सहाजिकच त्यापासून परावृत्त होण्यापेक्षा पाकिस्तान व त्यांच्या सेनेने अधिकच आगावूपणा करावा यात नवल नाही. मंगळवारी काश्मिरच्या पुछ भागात नियंत्रण रेषेवर घडलेले हत्याकांड त्याचीच प्रचिती आहे. या सीमेवर भारतीय चौकीत पहारा देणार्‍या भारतीय जवानांवर पाक सेनेच्या तुकडीने आकस्मिक हल्ला चढवून पाच जवानांचे हत्याकांड केले. त्यामुळे देशभर एक संतप्त प्रतिक्रिया उमटली. पण देशात आज राज्य करणारे सरकार कुठल्या देशाच्या जनतेचे प्रतिनिधीत्व करते; त्याचीच शंका पुढल्या घटनाक्रमाने आली. कारण आपली मर्यादा ओलांडून पाक सेनेची तुकडी भारतीय हद्दीत घुसली व त्यांनी भारतीय जवानांवर आकस्मिक हल्ला चढवल्याची प्रारंभीची बातमी होती. त्याबद्दल संसदेमध्ये विरोधी पक्षांनी आवाज उठवणे स्वाभाविक होते. त्याचे कारण भारत सरकार व त्याचे संरक्षणमंत्री पाकिस्तानला खरमरीत उत्तर देतील, हीच अपेक्षा होती. पण विरोधकांचा अनुभव संपुर्ण देशालाच अचंबित करून गेला. भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अंथोनी संसदेत उभे राहिले; तेच मुळात पाकिस्तान सरकारच्या कुरापतखोरीला संरक्षण द्यायला. जणू पाक सेनेच्या बचावासाठीच ते बोलत होते.

   भारतीय चौकीवर हल्ला करणारे व पाच जवानांची हत्या करणारे पाकिस्तानी सेनेचा गणवेश घालून आले होते, असे विधान अंथोनी यांनी केले. त्याचा अर्थ असा, की हल्लेखोर पाक सेनेची तुकडी वा सैनिक नव्हते, तर पाक सेनेच्या गणवेशातले कोणी भलतेच होते, याची भारतीय संरक्षणमंत्र्यानेच कबुली देऊन टाकली. आणि ही भाषा किंवा असा खुलासा पाकिस्तान नेहमीच देत असते. मग असे हल्लेखोर कारगिलमध्ये घुसलेले पाक सैनिक असोत किंवा पाकसेनेने प्रशिक्षित केलेले मुंबईत हल्ला करणारे कसाब टोळीतले हल्लेखोर असोत. प्रत्येक वेळी पाकिस्तानने आपला सरकारी वा सेनेचा हात भारत विरोधी कारवायात नाही; असाच पवित्रा घेतलेला आहे. याच्या नेमक्या उलट भारताची भाषा राहिली आहे. प्रत्येक जिहादी व घातपाती हल्ल्यात पाकिस्तानवर भारत सरकारने थेट आरोप केलेला आहे. तेव्हा भले पाकिस्तानी अतिरेकी असतील, पण त्यांचा बोलविता धनी पाक सरकार वा पाकसेना नाही; अशीच पाकिस्तानची भूमिका राहिलेली आहे. दोन दशके उलटून गेली तरी पाकिस्तानने आपली भाषा वा शब्द बदललेले नाहीत. पण अंथोनी व त्यांच्या युपीए सरकारने भारताची भाषा मात्र बदलून टाकली आहे. आता भारताचा संरक्षणमंत्री पाकिस्तानी भाषेत बोलू लागला आहे आणि भारताचा परराष्ट्रमंत्री पाकच्या कुरापतखोरीचे स्वागत करू लागला आहे. मग सीमेवर जवान तरी कशाला उभे करायचे? पाक सेना, सैनिक व त्यांच्याकडून प्रशिक्षित केल्या जाणार्‍या जिहादी घातपात्यांना नेमबाजीचा सराव करता यावा; म्हणून भारताने नियंत्रण रेषा वा सीमेवर लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत व चौक्या उभ्रारल्या आहेत काय? युपीए सरकार, पंतप्रधान, खुर्शीद, अंथोनी इत्यादिकांनी त्याचा तरी खुलासा स्पष्ट शब्दात करून टाकावा.

No comments:

Post a Comment