जयंती नटराजन यांच्या राजिनाम्यानंतर कॉग्रेसच्या तोंडाळ प्रवक्त्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित असल्या, तरी त्या लोकशाहीला मारक आहेत. कारण दुर्दैवाने कॉग्रेसला आज देशाची फ़िकीर नसली, तरी देशाला त्या पक्षाची निदान काही काळ गरज आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधारी पक्षाला आव्हान देऊ शकेल, जाब विचारू शकेल असा विरोधी पक्ष हवा असतो. म्हणूनच कॉग्रेसला सत्ताधारी होण्याइतके बळ नसले, तरी सत्ताधार्यांना धारेवर धरू शकणारा कॉग्रेस पक्ष, ही देशाची गरज आहे. निदान तितका समर्थ पर्यायी पक्ष उभा रहाण्यापर्यंत कॉग्रेसचा शेवट धोकादायक घटना असेल. पण आजच्या कॉग्रेस पक्षात सत्तेशिवाय अन्य काही आकांक्षा असलेल्या लोकांचा पुरता दुष्काळ आहे. म्हणूनच मग पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकणार्यांच्या मागे धावणार्या आशाळभूतांचा जमाव; अशी त्या पक्षाची अवस्था होऊन गेली आहे. असे लोक पक्ष वा संघटना म्हणून काम करत नसतात, विचारसरणीला बांधील नसतात. तर आपापल्या मतलब व सत्तास्वार्थापुरते पक्षाच्या ओसरीवर आश्रयाला आलेले असतात. तो आश्रय देणार्या नेत्याशी निष्ठावान असतात. आपला नेता त्यांच्यासाठी स्वार्थाचा पुरवठेदार असतो. अशाच लोकांची भरती झाली, मग संघटना म्हणजे एक सांगाडा उरतो. ती एकजीव प्रणाली होऊ शकत नाही. पर्यायाने एका क्रियाशील प्रणालीसारखे काम तिच्याकडून होऊ शकत नाही. सोनिया वा राहुल यांच्या कारकिर्दीत कॉग्रेसची अवस्था तशीच होऊन गेली आहे आणि त्याचेच परिणाम गेल्या दिडदोन वर्षात दिसत आहेत. सर्व पक्षच बांडगुळांनी बळकावला आहे. झाडाला खावून झाल्यावर आता त्याच बांडगुळांनी मुळावर हल्ला केला आहे. त्यामुळे मुळांकडून तक्रार झाली, तर बांडगुळे त्याच मूळांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करताना दिसली, तर नवल मानायचे कारण नाही. हे भारतीय लोकशाहीला पोषक नाही.
तीन वर्षापुर्वी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस थेट बहूमत मिळवून सत्ताच स्थापन करणार असल्याचे दावे राहुलचे सल्लागार दिग्विजय सिंग करत होते. त्यावेळी राहुलची जादू देशात पुन्हा कॉग्रेसला सर्वाधिक लोकप्रिय पक्ष बनवत असल्याचे दावे केले जात होते. आणि उत्तर प्रदेशात कॉग्रेस बहूमत मिळवू शकली नाही तर? असा सवाल पत्रकारांनी विचारला होता. त्यावरचे दिग्विजय सिंगांचे उत्तर आजच्या कॉग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. पक्षाला यश मिळाले, तर त्याचे सर्व श्रेय राहुल गांधींचे असेल. आणि कॉग्रेसचा पराभव झाला तर तो सामान्य कार्यकर्त्याचा दोष असेल, असे सिंग म्हणाले होते. ही कॉग्रेसच्या निष्ठेची आजची व्याख्या आहे. हे अर्थातच भाटगिरी करणार्या दिग्विजय सिंगांचेच म्हणणे नाही. खुद्द कॉग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचाही तसाच समज आहे. २०१३ अखेरीस चार राज्यांच्या विधानसभा मतदानात कॉग्रेसचा दारूण पराभव झाला, तेव्हा पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी तेच उत्तर दिले होते. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक अभावामुळे पराभूत झाला, असे स्पष्टीकरण सोनियांनी दिले होते. हा कार्यकर्ते व संघटनात्मकतेचा अभाव कोणाचे कर्तृत्व होते? पक्षाचे प्रादेशिक अध्यक्ष व पदाधिकारी कोण नेमतो? महाराष्ट्रात दोन लागोपाठच्या निवडणूकात पराभव झाल्यावर माणिकराव ठाकरे यांनी राजिनामा दिला आहे. त्यांच्या जागी दुसरा प्रदेशाध्यक्ष कोणी नेमलेला नाही? थोडक्यात राहुल वा सोनिया ज्यांची नेमणूक करतात, तेच अपयशाला जबाबदार असतील, तर पर्यायाने अपयशाचे धनी तेच दोघे मायलेक श्रेष्ठी नसतात काय? पण त्यांच्यावर दोषारोप करायची कोणाची हिंमत आहे काय? त्यांच्या चुका दाखवण्याला पक्षात स्थान आहे काय? जयंती नटराजन यांनी तेच धाडस केले आहे. तसे केल्यास आपल्याला पक्षात स्थान उरणार नाही, याची खात्री असल्यानेच त्यांनी विनाविलंब पक्षाचा राजिनामाही दिला आहे.
नटराजन यांच्या राजिनाम्याने एका दिवसात पक्ष संपणार नाही. पण मागली दहा वर्षे पक्ष देशाच्या सर्वोच्च सत्तेत असतानाही, अनेक राज्यातून संपत होता, त्याचे काय? तो पक्ष सावरण्याचे विसरून राजपुत्राप्रमाणे दिवाळखोर मनमानी करणार्या राहुल गांधींचे काय? त्यातून त्यांनी मोदी व भाजपाला थेट बहुमतापर्यंत मजल मारणे सोपे करून ठेवले, इथपर्यंत ठिक होते. पण देशात विरोधी पक्षही भक्कम असावा लागतो. राहुल व सोनियांच्या अशा मनमानीने भाजपाला देशव्यापी राजकारणात पुरेसे आव्हानच उरलेले नाही. ते आव्हान देऊ शकणारा अन्य कुठला राजकीय पक्ष आज तरी अस्तित्वात नाही. बहुतेक राज्यात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे. अर्धा डझन राज्यात कॉग्रेस व भाजपा आमनेसामने आहेत. बाकीचे प्रादेशिक पक्ष सोबत घेऊन लोकशाहीला पुरक असा विरोधी गोट उभा करण्याची क्षमताही कॉग्रेस दाखवू शकलेली नाही. अर्धा डझन राज्यात प्रमुख विरोधी पक्ष वा सत्ताधारी पक्ष असलेल्या कॉग्रेसला उर्वरीत राज्यात निदान संघटनात्मक सांगाडा म्हणावा इतके तरी अस्तित्व आहे. म्हणूनच राष्ट्रीय राजकारणात तोच प्रमुख विरोधक होऊ शकतो. पण त्या सांगाड्यावर उत्साही कार्यकर्त्यांचे बाळसे दिसतच नाही. सत्तास्वार्थी लोक पक्ष सोडून जातात. पण तेव्हाच खर्या निष्ठावान कार्यकर्त्याची गरज असते आणि तेच नव्याने पक्षाची उभारणी करत असतात. नुसतेच नेत्याचे आश्रित म्हणून सोकावलेले लोक तिथे उपयोगी नसतात. किंबहूना प्रसंगी नेता निकामी ठरला वा दिवटा निघाला, तर त्याला बाजूला सारून पक्षाला नव्याने उभारणारा पर्यायही पक्षाच्या फ़ळीत असावा लागतो. मागल्या कित्येक वर्षात कॉग्रेसने अशा कुवतीच्या कुणालाही पक्षात डोके वर काढू दिलेले नाही. किंबहूना तशी शक्यता दिसली, तरी त्याचे तात्काळ खच्चीकरण करणारे टोळभैरव पक्षात प्रतिष्ठीत केले गेलेत.
पाच वर्षापुर्वी पक्षाचे सरचिटणिस म्हणून राहुल गांधी पुढे आले. त्यांनी क्रमाक्रमाने आपले तोंडपुजे पुढे आणून खर्या कार्यकर्त्यांची गळचेपी सुरू केली. कार्यकर्त्याची अशी गळचेपी व मुस्कटदाबी पक्षाला नामोहरम करीत असते. त्याचे परिणाम तात्काळ दिसत नाहीत. पण नंतर समोर येतात, तेव्हा सावरण्याची वेळही गेलेली असते. चंद्राबाबू नायडू यांच्य प्रभावाखालून आंध्रप्रदेश बाहेर काढून तिथे कॉग्रेसचे पुनरूज्जीवन करणार्या राजशेखर रेड्डी व त्यांच्या पुत्राचे खच्चीकरण करण्यातून शेवटी तिथे कॉग्रेसच नामशेष होऊन गेली ना? त्याचे श्रेय कोणाला द्यायचे? आपापले हितसंबंध जपणार्या बांडगुळांनी श्रेष्ठींना हाताशी धरून खर्या कार्यकर्त्यांचा काटा काढण्यात कॉग्रेसच नामोहरम करून टाकली आहे. नटराजन हे त्याचे उदाहरण आहे. सोनियांच्या आदेशानुसार व राहुलची इच्छा म्हणून मंत्रीपद सोडल्यावर वर्षभर आपली वेदना उराशी बाळगून संयम दाखवणार्या या महिलेची पक्षात काय कदर झाली? तिला साधा खुलासाही दिला गेला नाही, की समजूत काढण्याची श्रेष्ठींना गरज वाटू नये? जिवानिशी जाऊन तक्रारही करायची नाही? अकरा महिने निमूट अन्याय सोसल्यावर पत्र लिहून खुलासा मागितल्यावरही दुर्लक्ष होत असेल, तर कोणीही चिडून चवताळुन उठणार. पत्र पाठवून अडीच महिने गेल्यावर साधी पोचपावती मिळाली नाही, तेव्हा नटराजन जगासमोर आपली फ़िर्याद मांडायला आलेल्या आहेत. त्यांच्यावर चिखलफ़ेक करून व दोषारोप केल्याने कॉग्रेस सावरली जाणे शक्य नाही. उलट बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तशीच आजच्या कॉग्रेसची अवस्था दिसते. दुर्दैव असे की लोकशाहीसाठी इतक्या लौकर तो पक्ष असा नामशेष होता कामा नये. निदान भाजपाशी झुंजणारा दुसरा राष्ट्रीय पर्याय उभा रहाण्यापर्यंत कॉग्रेस राजकीय क्षितीजावर असायला हवी. अन्यथा एकहाती सत्तेने भाजपाचेही राजकारण कॉग्रेसी मार्गाने भरकटत जाण्याचा धोका संभवतो.