Wednesday, May 15, 2019

भित्यापाठी ब्रह्मराक्षस

Image result for opposition unity

“Collective fear stimulates herd instinct, and tends to produce ferocity toward those who are not regarded as members of the herd.” ― Bertrand Russell,

सामुहिक भयगंड प्राण्यांच्या कळपामध्ये उपजत झुंडवृत्तीची जाणिव उत्पन्न करत असतो. त्यामुळे जे आपल्या कळपातले नाहीत, त्यांच्या विरोधात भयंकर क्रुर प्रतिक्रियेचा उदभव होतो, असे इंग्रजी विचारवंत बर्ट्रांड रसेल यांनी म्हटलेले आहे. आजकाल सतराव्या लोकसभा निवडणूक प्रचारात त्याचा सातत्याने अनुभव येत असतो. जसजशी ही निवडणूक पुढे सरकत गेली, तसतशी त्यातली विखारी क्रुर भावना अधिकाधिक दृगोचर होत गेली. आता अखेरच्या टप्प्यात तर मोदींना शिव्या घालण्यापासून कुठलेही अपशब्द वापरण्यापर्यंत मजल गेलेली आहे. यात गुरफ़टून गेलेल्या विरोधी पक्ष व नेत्यांची मग काही प्रसंगी कीवही येऊ लागते. त्यांच्याच मते मोदींनी देशाचे मागल्या पा़च वर्षात पुरते वाटोळे वा नुकसान केलेले असेल, तर मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही. प्रामुख्याने मोदींनी जी आश्वासने दिली त्यांची पुर्तता केलेली नाही म्हणून मतदार रागावलेला असेल, तर तो मोदींकडे पाठ फ़िरवणार यातही शंका नाही. त्यात तथ्य असेल तर विरोधकांना एकत्र यायची वा आघाडी करायचेही काही कारण नव्हते. कारण गेल्या लोकसभेत मोदींना ३१ टक्के मते मिळालेली होती आणि तेवढ्या बळावर त्यांनी बहूमताने सत्ता मिळवलॊ होती. आता त्यात नाराजीमुळे घट होणार असेल, तर मतविभागणी टाळण्याचे काहीही कारण उरत नाही. यापुर्वी २५ टक्के मतांवर भाजपा दोनशेचाही टप्पा ओलांडू शकलेला नव्हता. मग मोदींवर सहासात टक्के नाराज मतदारही त्यांना धुळ चाटवू शकतो. विरोधकांनी एकजुट करायची गरज काय? गळ्यात गळे घालून एकत्र येण्याच्या शपथा कशाला? त्याचे कारण मोदी हरण्याचा आनंद नसून मोदी जिंकण्याचे भय अधिक आहे आणि त्यालाच बर्ट्रांड रसेल झुंडीचा भयगंड म्हणतात. त्यातूनच मग असली क्रुर प्रतिक्रीया उमटत असते. मोदींविषयीचा द्वेष वा शिव्याशाप त्यातूनच आलेले आहेत.

इथे एक गंमतीची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या निवडणूकीच्या निमीत्ताने विविध राजकीय पक्षच एकत्र यायला निघाले नव्हते. अशा पक्षांना एकत्र यायला विनवण्या करणारे राजकीय अभ्यासक, विचारवंत, कलाकार, साहित्यिक अशा विविध टोळ्यांमधलेही लोक कमी नाहीत. आजवर इतक्या उघडपणे वा जाहिररित्या अशा प्रतिष्ठीत वर्गातल्या लोकांनी कधी निवडणूकीच्या राजकारणात लुडबुड केलेली नव्हती. आपण संवेदनाशील समाजघटक असल्याचा अशा लोकांचा दावा आहे. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. १९८४ सालात इंदिरा हत्येनंतर दिल्ली व उत्तर भारतात शीख समाजाची सार्वत्रिक कत्तल झालेली होती. पण त्याचा निषेध करणारे कागदी घोडे नाचवून असे संवेदनाशील लोक आपापल्या बिळात परतलेले होते. कोणी नंतरच्या कुठल्या निवडणूकीत राजीव गांधी वा कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी चव्हाट्यावर येऊन बोंबा ठोकलेल्या नव्हत्या. पण गेल्या दिडदोन वर्षापासून वा अगदी मागल्या लोकसभा मतदानाच्या वेळीही, असे लोक खुलेआम मैदानात आलेले होते. त्यातून त्यांच्यातल्या संवेदना व्यक्त होत नाहीत, तर कळपाची झुंडीची मानसिकता व्यक्त होते. अन्यप्रसंगी असे लोक आपापले मुद्दे वा भूमिका घेऊन एकमेकांशीच लढत झगडत असतात. अगदी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व त्यांनी सरकार स्थापन केल्यावरही अशा लोकांच्या आपसातल्या लढाया चालू होत्या. पण पुन्हा निवडणूका आल्या आणि त्यांच्यातली झुंडप्रवृत्ती उफ़ाळून आलेली आहे. ती तत्वज्ञान, विचार वा भूमिकांसाठीची नाही. तर आपण सगळे पुरोगामी आणि मोदी हा पुरोगामी नाही; म्हणून सगळेच त्याच्या अंगावर धावून आलेले आहेत. ‘तो आपल्यातला नाही वा आपल्यापैकी एक नाही’ ही त्यामागची खरी प्रेरणा आहे. बाकी मोदी काय करतो वा त्याने नेमके काय केले; याच्याशी कोणाला कसलेही सोयरसुतक नाही. चाललेला तमाशा केवळ झुंडीच्या भयगंडातून उमटलेली प्रतिक्रीया आहे.

हे सगळे इतक्या तपशीलात समजावून सांगण्याची गरज काय? तर विरोधी एकजुट वा महागठबंधन ही भानगड त्याशिवाय उकलता येणार नाही. दिल्लीत नव्या पक्षाची स्थापना केलेले अरविंद केजरीवाल २०१५ च्या आरंभी प्रचंड बहूमताने सत्तेत आलेले होते. अवघ्या सातआठ महिन्यापुर्वी तिथे भाजपाने सर्व सात लोकसभेच्या जागा जिंकलेल्या होत्या. पण विधानसभेत चित्र पालटून गेलेले होते. ७० पैकी ६७ जागा जिंकून केजरीवाल यांनी अवघी विधानसभा खिशात टाकलेली होती. त्या जागाही दुय्यम म्हणता येतील. कारण केजरीवाल यांच्या पक्षाला विधानसभेत तब्बल ५६ टक्के मते मिळालेली होती. त्यामुळे त्यांचा आपल्या मतदार समर्थकांवर पुर्ण विश्वास असेल तर याहीवेळी दिल्लीच्या सर्व लोकसभा जागा जिकताना त्यांना कुणाच्या कुबड्या घेण्याची गरज वाटायला नको होती. स्वबळावर सर्व जागा जिंकायला त्यांना कोणी रोखलेले नव्हते. पण पहिल्या दिवसापासून केजरीवाल कॉग्रेससोबत आघाडी करण्यासाठी गयावया करीत होते. ह्याला काय म्हणायचे? त्यांचा आपल्याच पाठीराखे मतदारावर विश्वास उरलेला नाही. म्हणून त्यांना कॉग्रेसच्या कुबड्या हव्या होत्या. उत्तरप्रदेशात मायावती व अखिलेश यांना एकत्र येण्याची गरज भासली, कारण मोदींचा मतदार त्यांना सोडून गेलेला नाही, याची भिती त्यांना सतावते आहे. त्यामुळेच आपापल्या मतदाराची बेरीज करून मोदींना पराभूत करण्याची गणिते मांडण्याचे उद्योग सुरू होते. मतदार नाराज असेल तर मोदींना सोडून जाईल, इतका आत्मविश्वास या लोकांपाशी कशाला नसावा? मोदींनी काम केल्याने अधिक मतदार त्यांच्याच मागे जाण्याचा भयगंड असल्याशिवाय या लोकांना महागठबंधनाचे डोहाळे लागले नसते. यातून एक गोष्ट साफ़ होते, की विरोधी पक्षाला आपल्या शक्तीपेक्षा मोदींची जनतेत असलेली लोकप्रियता भयभीत करीत आहे. आपली यापुर्वीची मतेही टिकण्याची खात्री नसल्यानेच हा भयगंड निर्माण झालेला आहे.

आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. नुसत्या जुन्या मतांच्या बेरजा करून निवडणूका जिंकता आल्या असत्या, तर त्यांना रोजच्या रोज उठून मोदींवर खोटेनाटे आरोप करण्याची गरज नव्हती. आजवर आपण जी मते मिळवली आहेत, ती कोणाशीही युती आघाडी केल्यावरही आपल्यालाच मिळतील अशी खातरजमा असायला हवी. मग आरोपांची राळ उडवण्याचे काहीही कारण नाही. मोदींवर नाराज असलेला मतदार त्यांच्यापासून दुरावणार आणि आपला असलेला मतदार अधिक जोशात आपल्यालाच मतदान करणार; हा आत्मविश्वास जिंकण्यासाठी पुरेसा असतो. पण या लोकसभा प्रचारात व मतदानात विरोधकांपाशी त्याचाच पुर्ण अभाव दिसून आला. मतदानाला आरंभ होण्यापुर्वीच त्यांच्याकडून मतदान यंत्रात गफ़लत असल्याचे आरोप सुरू झाले. वाढलेल्या मतदानाच्या प्रमाणातून विरोधकांचे आरोप वाढतच गेले. त्यातून अशा भयगंडाची प्रचिती येत असते. जेव्हा कोणीही व्यक्ती वा जनावर भयगंडाने पछाडलेले असते, तेव्हा ते अधिक हिंस्र होते आणि कुठलीही चिथावणी नसतानाही उगाचच समोरच्या कोणावरही हल्ला करायला सरसावते. मोदींनी कुठलीही चिथावणी दिली नसतानाही त्यांच्यावर झालेले व वापरले जाणारे गलिच्छ शब्द किंवा शिव्याशाप अशा भयगंडाचे पुरावे मानता येतील. किंबहूना केजरीवाल किंवा चंद्राबाबू यांच्यासारखे अनेक नेते आपली हक्काचीही मते मिळणार नाहीत, याविषयी अधिक खात्रीपुर्वक बोलत असतात. ओडीशाचे नविन पटनाईक वा आंध्राचा जगनमोहन यांनी एकदाही मतदान यंत्राविषयी शंका घेतल्या नाहीत. तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांनीही कुठली तक्रार केली नाही. पण बाकीचे लोक मात्र अखंड ऊर बडवताना दिसत आहेत. उपरोक्त तिन्ही नेते भाजपाचे नाहीत. मग त्यांना मतदान यंत्रात गफ़लत कशाला आढळत नाही? तर त्यांना आपला मतदार मोदी वा यंत्रामुळे पळवला जाऊ शकत नाही, असा आत्मविश्वास आहे. बाकीच्यांचे काय?

मराठीत भित्यापाठी ब्रह्मराक्षस अशी एक उक्ती आहे. तमाम विरोधी पक्षांची तशीच काहीशी अवस्था झालेली आहे. म्हणून तर त्यांच्या खुळेपणाला दाद देणार नाही, तोही त्यांना मोदींचा हस्तक वा भक्त वाटू लागला आहे. मग अशा पक्षालाही भाजपाची बी टीम असे संबोधन लावले जाते. सहाजिकच जेव्हा केव्हा त्यांना नरेंद्र मोदी समोर असल्याची जाणिव होते, तेव्हा त्यांच्यातली झुंडीची मानसिकता उफ़ाळून बाहेर येते. उलट तशी भिती नसली मग ते़च पक्ष व नेते एकमेकांच्या उरावर बसायला सज्ज असतात. बंगालमध्ये डाव्यांसह कॉग्रेसला ममताची सोबत घेता येत नाही आणि चंद्राबाबूंना आंध्रामध्ये कॉग्रेससोबत आघाडी करता येत नाही. मायावती अखिलेश यांना उत्तरप्रदेशात कॉग्रेसला सोबत घ्यायची इच्छा नसते. मग त्यांचा मोदीविरोध म्हणजे तरी नेमके काय असते? तर पराभवाचा भयगंड त्यांना भयभीत करतो. तो भयगंड मोदी नावाच्या चेहर्‍यात सामावलेला आहे. त्या नावात भरलेला आहे. मोदी हा शब्द वा नाव बाजूला करताच, त्या भयगंडातून हे लोक मुक्त होताता आणि लगेच एकमेकांशी भांडायला सुरूवात करतात. मोदींचे भय त्यांना एकत्र आणू शकते, किंवा एकत्र ठेऊ शकते. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतरचे चित्र खुप मनोरंजक असणार आहे. इतकी नाटके करूनही भाजपाला बहूमत मिळेल; तेव्हा हेच एकजुटीच्या शपथा घेणारे एकमेकांवर जे दोषारोप करतील, ते मजेशीर असेल. त्यांना मागल्या खेपेस पाडतानाही मोदींना खुप मेहनत घ्यावी लागलेली नव्हती. आपल्यातच सामावलेल्या भयगंडाने त्यांना खच्ची केलेले आहे. द्वेषाने त्यांना पोखरून टाकलेले आहे. त्यामुळे जनहिताची कामे करून लोकांचा विश्वास संपादन करण्याने निवडणूका जिंकता येतात, याचे भान त्यांना उरलेले नाही. परिणामी असे लोक राजकारणात असोत किंवा अन्य क्षेत्रातील असोत, त्यांना मोदी नावाच्या भयगंडाने इतके पछाडलेले आहे, की ते पाशवी क्रौर्याने आक्रमक झालेले आहेत. राहुल, प्रियंका वा ममता यांची बोली व देहबोलीच त्याची साक्ष देणारी असते. जरा बारकाईने बघितले तर त्यांच्यात गुरगुरणारे श्वापद आपल्याला दिसू शकते.

12 comments:

  1. खरय भाउ.मोदी पण स्वताच म्हनतात मी त्यांच्यातला नाही

    ReplyDelete
  2. Very correct. Because of Modi the ways of all other political parties to earn filthy money by looting the public are totally blocked. Even the so called corrupt educated Pandits which includes writers,socialists,actors,scientists,govt officers have lost their opportunity of earning fame,money and social status without doing anything!

    ReplyDelete
  3. भाऊ,अप्रतिम दाखला दिला आहे...

    ReplyDelete
  4. अप्रतिम......
    ही श्वापदं सत्तेवर होती म्हणून माणसात होती... आत्ता सत्तेवर नाहीये आणि परत येणार नाही हे कळाले आहे त्यामुळे ही श्वापदं क्रुर व्हायला लागली आहेत.

    ReplyDelete
  5. भाऊ,आपण विरोधकांच्या मनोवृत्तीचे अचुक वर्णन केले आहे.आपल्या पराभवापेक्षा मोदी परत सत्तेवर येणार या एका घटनेने भयभित झाले आहेत व स्वतःचे राजकिय भवितव्य त्यांना स्पष्ट दिसत आहे,आपले जाणता राजा शरद पवार यांनी भाकित केले की मोदी सरकार जरी स्थापन झाले तरी मागच्या प्रमाणे १३ दिवसात पडेल व मी स्वतः मोदी विरोधकांना परत एकत्र आणणार आहेत.त्यांच्या शापवाणीची किव येते व दुर्दम्य आशावादा बद्दल कौतुक वाटते.आता खरी मजा २३ तारखेला निकाल लागल्यावर विरोधकांचे मतप्रदर्शन व प्रतिक्रिया बघायला येओल. ममता आपणच मोदींना राजकीय विरोध करतो दाखवण्या करता कुठलाही विधिनिषेध न बाळगता आपल्या सत्तेचा आमानुष पणे वापर करुन भाजप समर्थकांना चिरडाण्याचा प्रयत्न केला व मोदींना सरळ सरळ आव्हान देत आहे. बंगाल मध्ये भाजपला खुले समर्थन मिळत आहे आधि बंगाल मधिल जनता छुपे व घाबरत भाजपला समर्थन करत होतो पण आता बदल स्पष्टपणे जाणवत आहे.मोदी व अमित शहा यांनी आज जाहिर पणे भाजपला ३००पार जागा मिळणार व बंगाल त्यांना आघाडी मिळवून देणार असे सांगितले . भाऊ आपण ममता बॕनर्जीच्या मोदीःना आसणारा त्याःचा टोकाचा विरोध राजकीय भवितव्याबद्दल आपले विचार मांडावे ही विनंती.

    ReplyDelete
  6. 👍👍👌👌💐💐👍👍👌👌💐💐

    ReplyDelete
  7. नेहमी प्रमाणेच अप्रतिम विश्लेषण... भय इथले संपत नाही अशी अवस्था सर्वच विरोधी पक्षांची झाली आहे. देश कसा चालवला पाहीजे याचा अजेंडा मुलायम, राहूल, सोनिया, पवार, लालू, ममता, चंद्राबाबू आदि कोणाकडेच नाही. मोदी विरोध हा एकनेव अजेंडा आहे... त्यानांच त्यांची स्वत:ची कीव कशी काय येत नाही या मागे बर्ट्रांड रसेल असावा

    ReplyDelete
  8. आताच्या परिस्तिथी बाबत उत्तम विश्लेषण.

    ReplyDelete
  9. True true true, very true, as a common man I have no complaint against political people but when so colled intellectuals are pretending that they are secular and misleading the mass , it is very dangerous for future of society.

    ReplyDelete
  10. In our country who so ever abused Hindu is treated as intelligent

    ReplyDelete
  11. 100% True.. Hon.PM/BJP should use Tit for Tat tactics and neutralise them using all ways.

    ReplyDelete