Saturday, May 25, 2019

बाजारबुणग्यांचे महागठबंधन

No photo description available.

दैनिक ‘संचार’च्या वाचकाला हे लोकसभा निकाल नक्कीच धक्कादायक वाटलेले नसतील. कारण मागल्या वर्षाभरात मी सतत राजकीय आढावा घेणारे लेखन इथे करतो आहे आणि जे त्याचे वाचन मनन करीत असतील, त्यांना निकालात काहीही चकीत करणारे असू शकत नाही. याच विषयावर माझे ‘पुन्हा मोदीच का?’ हे पुस्तक २६ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते आणि त्यातही मी मोदी ३००+ जागा जिंकतील असे भाकित केलेले होते. अर्थात ते भाकित अजिबात नव्हते. तो माझा अभ्यासपुर्ण निष्कर्ष होता. म्हणून अवघ्या दोन महिन्यात पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. खेरीज मागल्या सात वर्षापासून जे लोक माझा ब्लॉग किंवा अन्यत्र प्रकाशित होणारे राजकीय लेखन वाचत असतात, त्यांनाही यात काही आश्चर्य वाटू शकणार नाही. म्हणून असेल, निकाल लागले तेव्हा अनेकांनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. सोशल मिडीयात तर अनेकांनी स्वतंत्रपणे पोस्टही टाकल्या. मात्र असे भाकित करणारा मी एकटाच नव्हतो. एक समाजवादी मित्र व कट्टर मोदी विरोधक सुनील तांबे, यानेही नेमके हेच भाकित केलेले होते. माझ्या डोक्यात पुस्तक लिहीण्याचा किडा शिरण्याच्या आधी महिनाभर; सुनीलने सोशल मिडीयात विरोधकांच्या नाकर्तेपणावर कठोर टिका करणार्‍या त्या पोस्टमध्ये पुरोगाम्यांची बाजारबुणगे अशी संभावना केलेली होती. आज त्याचे कोणी अभिनंदन केले आहे किंवा नाही, मला ठाऊक नाही, बहुधा नसेल. कारण सुनीलचा बहुतांश पाठीराखा पुरोगामी व तत्सम मोदीत्रस्त आहे. सहाजिकच त्याच्याकडून तितक्या संवेदनाशील वा समजूतदार प्रतिक्रीयेची अपेक्षा करता येत नाही. कारण ज्या पोस्टविषयी मी इथे सांगतोय, त्याही पोस्टसाठी सुनीलला अनेकांनी लाईक दिलेले होते. पण त्यापैकी कितीजणांनी गंभीरपणे ती पोस्ट वाचली वा समजून घेतली होती, त्याची मला दाट शंका आहे. किंबहूना तीच आजकालच्या पुरोगाम्यांची शोकांतिका होऊन बसली आहे. निवडणूक निकालात त्याचे फ़क्त प्रतिबिंब पडले, इतकेच.

सुनील माझा फ़ेसबुक मित्र आहे आणि म्हणूनच मलाही त्याच्या पोस्ट वाचायला मिळतात. त्याच्या कुठल्याही पोस्टचे गुणगान करणारे व त्यावर आवडत्या प्रतिक्रीया देणारे चारपाचशे तरी लोक आहेत. पण त्याला मिळणार्‍या लाईक्स, विचारपुर्वक वाचून किती मिळतात? की नुसता ‘आपला माणूस’ म्हणून किती असतात, त्याचे संशोधन करणे रास्त ठरेल. कारण मी ज्या ठराविक पोस्टविषयी इथे लिहीतो आहे, ती पोस्ट एकूण पुरोगामी चळवळ व राजकारणाच्या दिवाळखोरीचा नेमका दोष सांगंणारी आणि निर्भत्सना करणारी होती. पण नेहमीच्या उत्साहात गोतावळ्याने त्यावर लाईकची क्लिक ठोकलेली. पुढे अशा पुरोगामी प्रचारासाठी चालणार्‍या बिगुल नावाच्या वेबसाईटवरही ती पोस्ट अगत्याने पुनर्प्रकाशित करण्यात आलेली होती. तिथे आणखी एक तशीच सावध पोस्ट वाचायला मिळाली होती, तॊ गजाकोश नावाचा पुरोगामी व्यक्तीची होती. त्याने स्पष्टपणे इशारा दिला होता, की आपण इथे सोशल मीडियात भाजपाची निंदानालस्ती करण्यात रममाण झालोय आणि तिकडे अमित शहांचे पन्नाप्रमुख निवडणूकीत बाजी मारून जातील. या दोघांनी मोदी-शहांची निंदा करण्यापेक्षा त्यांच्या कुवत व लढत यांचे नेमके विवरण करण्याचे धाडस केले असले तरी त्याचा कितीसा उपयोग होऊ शकला? नुसती मोदी-शहांना शिवीगाळ केली की पवित्र कार्य केल्याच्या भ्रमात हे लोक किती बुडून गेलेत, त्याचा हा नमूना आहे. कारण निवडणूका वा राजकीय पक्ष जनतेच्या सहभागाने चालतो; एवढेही त्यांना भान उरलेले नाही. आपल्या मस्तीत आणि भ्रमात रममाण होऊन राजकीय सत्तापरिवर्तन होऊ शकते, इतकी भ्रमिष्टावस्था पराकोटीला जाऊन पोहोचली आहे. तसे नसते, तर सुनीलच्या त्या पोस्टला लाईक मिळण्यापेक्षा त्यावर गंभीर उहापोह झाला असता. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला निदान महाराष्ट्रात लक्षणिय आव्हान तरी उभे राहिलेले दिसले असते. सुनीलची पोस्ट मुद्दाम वाचा.

Sunil Tambe  3 August at 23:32 ·
प्लासी ते सांगली
बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्पट होतं. नबाबाचा वझीर, मीर जाफर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला फितूर झाला. ५० हजार सैनिकांची फौज घेऊन तो ब्रिटीश सैन्याला येऊन मिळाला. ब्रिटीशांच्या कवायती फौजेपुढे नबाबाच्या सैनिकांची दाणादाण उडाली. भाजपच्या सुसंघटीत, केंद्रानुवर्ती पक्षसंघटनेपुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बेशिस्त, स्वार्थलोलूप, संधीसाधू सरदारांची दाणादाण उडते आहे. अनेक मीर जाफर आपआपली कुमक घेऊन भाजपच्या गोटात दाखल झाले. एकनाथ खडसे यांना आणि त्यांच्या कुटुंबियाना भाजपने भरपूर दिलं पण शक्ती भाजप संघटनेची होती. खडसेंची नव्हती. आपला तामझाम सांभाळला जाईल याची हमी मिळाल्यावर काँग्रेस व राकाँ चे अनेक सरदार, दरकदार भाजपच्या वळचणीला जातील पण ते शरणार्थी असतात, निर्णय घेणारे वा भाजपला दिशा देणारे नसतात. सांगलीमध्ये भाजपचा खासदार, आमदार, पंचायत समित्या, नगरपरिषदा होत्या, मराठा आंदोलन चरमसीमेवर असताना भाजपला सांगलीमध्ये यश मिळालं आहे. कदम, दादा, आबा, जयंतराव अशा गटा-तटात काँग्रेस व राकाँ विभागली गेली होती.केंद्रीय पक्ष वा संघटनेचं नियंत्रण त्यांच्यावर नाही. त्यांच्या निष्ठा आपआपल्या गटाला आहेत, विचारधारा वा पक्षसंघटनेला नाहीत. कवायती फौज आणि बाजारबुणगे वा सरदार यांच्या फौजांमध्ये हा फरक असतो.
विरोधकांची जागा व्यापण्याची शक्ती सोडाच पण उमेदही डाव्या, पुरोगामी राजकीय पक्षांकडे उरलेली नाही. त्यामुळे मतदारांपुढे 2 पर्याय आहेत—बंगालच्या नबाबाच्या फौजेत दाखल होणं किंवा ब्रिटीशांच्या कवायती फौजेला पाठिंबा देणं.

मी नेहमी पुरोगाम्यांच्या दिवाळखोरीवर टिकेचे असुड ओढत असतो. इथे सुनीलनेही तेच केलेले आहे. पण जे त्याला लाईक देतात, त्यातले बहुतांश माझ्यावर मोदीभक्त असल्याचा आरोपही करीत राहिलेले आहेत. मुद्दा असा, की विषय व आशय समान असेल, तर एकाचे कौतुक आणि दुसर्‍याला शिव्याशाप कशाला दिले जातात? याचा अर्थ त्यापैकी कोणी मुळातला मजकूर वाचत नाही, की आशय सम्जून घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. मी कधी पुरोगाम्यांना बाजारबुणगे म्हटलेले नाही. सुनीलने तेही म्हणून घेतले, तरी लाईक मिळतात. याचा अर्थ वाचणार्‍याला शिव्या किंवा ओव्या यातलाही फ़रक समजेनासा झालेला असावा. सुनील आपला माणूस आहे ना? मग काहीही लिहू बोलू देत. त्याची पाठ थोपटायची आणि त्याला प्रोत्साहन द्यायचे. अशा मानसिकतेचा परिणाम आपले डोके गहाण टाकण्यात होत असतो आणि हळुहळू अवघ्या पुरोगामी जगताला तीच रोगबाधा होत गेली. मग विचार तत्वज्ञान किंवा मुद्दे बाजूला पडले आणि मोदी किंवा त्यांच्या समर्थकांना शिव्याशाप, हे पुरोगामीत्व होऊन बसले. पर्यायाने पुरोगामीत्व म्हणजे निव्वळ बाष्कळ बडबड किंवा बालिश युक्तीवाद, असे त्याला स्वरूप येत गेले. तसे नसते तर राहुल गांधी आपल्या पोरकट घोषणा. वक्तव्ये किंवा युक्तीवादातून पुरोगामी राजकारणाची जनमानसातील विश्वासार्हता रसातळाला घेऊन जात असल्याचे भान आले असते. या लोकांना निदान त्यापासून अलिप्त होता आले असते. पण ते शक्य नव्हते. तुम्ही द्वेषाच्या आहारी गेलात, मग मित्र वा शहाणे लोक निवडण्य़ाचा अधिकार गमावत असता. मुर्खपणाची एक टोळी तयार होते आणि त्यातला एक म्हणून सामुहिक स्वरात घोषणाबाजी, हे कर्तव्य होऊन जाते. त्यातला आशय किंवा विषयही तपासण्याचे कारण उरत नाही. पुरोगामीत्वाचा पराभव अशा लोकांनी केला आणि मोदी तिकडे तटस्थपणे बघत बसले इतकेच.

लोकसभेची निवडणूक मार्च महिन्यात घोषित झाली. तिचे वेध जानेवारी महिन्यापासून लागले. मागल्या जुन महिन्यात कर्नाटकच्या निकालांनी तिच्यासाठी पुर्वतयारी सुरू झाली होती आणि त्याच दरम्यान सुनीलने उपरोक्त पोस्ट टाकली. त्यातला आशय इतका स्पष्ट होता आणि आहे. लढणारे मनापासून लढाईत झोकून देतात. शिस्तीने रणांगणात येतात. किंवा पळ काढतात. शत्रूलाही जाऊन मिळू शकतात. लढाई हा शिस्तीचा मामला असतो आणि तिथे बेशिस्त बाजारबुणग्या बोलघेवड्यांना स्थान नसते की भवितव्य नसते. मोदी-शहांच्या भाजपाशी लढायचे तर कमालीची शिस्त, इच्छाशक्ती, बांधिलकी व संघटना असायला हवी, असाच सुनीलचा दावा होता आणि तो रास्तही होता. माझे विविध लेख वाचले, तर त्यातून मी वेगळी भूमिका मांडलेली नाही. विरोधक वा पुरोगाम्यांच्या नाकर्तेपणावरच मी बोट ठेवत आलो. ती त्रुटी भरून काढण्यापेक्षा माझ्यावर मोदीभक्त असा शिक्का मारणे सोपे व बिनकष्टाचे काम होते. त्यातच धन्यता मानली गेली. त्याचा लाभ मोदी व भाजपाला कसा मिळाला? तर त्यामुळे राहुल गांधींचा खुळेपणा बालीश बडबड हेच पुरोगामी चळवळ व राजकारणाचे म्होरके होऊन गेले. त्याची टिंगलही करण्याची मोदींना गरज उरली नाही. कारण राहुलचा पोरकटपणा सामान्य बुद्धीच्या माणसाच्याही नजरेत भरणारा होता आणि पर्यायाने त्याच खुळेपणाचे समर्थन करणार्‍यांविषयी शंका व तिरस्कार निर्माण करणारा होता. नेपोलियन म्हणतो, शत्रू आत्महत्या करीत असेल, तर आपण त्यात हस्तक्षेप करू नये. मोदी-शहांनी काय वेगळे केले? त्यांनी शक्य तितके अशा खुळेपणाला प्रोत्साहन दिले आणि आपला खरा प्रतिस्पर्धी राहुल असल्याचा आभास उभा करण्याला भाजपाने हातभार लावला. परिणामी राहुल पुरोगामी राजकीय पक्षांचा मुखवटा किंवा चेहरा झाला आणि आपोआप मोदींची विश्वासार्हता वाढत गेली. पर्यायाने बाजारबुणग्यांनी मोदींना आज इतके मोठे यश प्रदान करून टाकले.

एकदा बुद्धी भ्रष्ट झाली, मग रसातळाला जायला वेळ लागत नाही. मागल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांना केजरीवाल उद्धारक वाटलेला होता, त्यांना यावेळी राहुल प्रेषित वाटला, तर नवल नव्हते. कुठल्याही कर्तृत्वहीन नाकर्त्या माणसाला नेहमी प्रेषिताची देवेकृपेची प्रतिक्षा असते. त्याचा देवावर अजिबात विश्वास नसतो. इतका आपल्या नाकर्तेपणावर गाढ विश्वास असतो. म्हणून तो कृपाप्रसादाकडे आशाळभूतपणे बघत असतो. अर्थात असे म्हटले, की देवभक्ताला पुरोगामी अंधश्रद्ध ठरवतात. पण त्यांच्यात आणि भक्तगणात एक मोठा फ़रक असतो. पुरोगामी नुसते निष्क्रीय बसून चमत्काराची प्रतिक्षा करतात आणि देवभक्त आपल्या परीने प्रयत्नशील राहून त्रुटी असेल तिथे देवाच्या कृपेची अपेक्षा बाळगतो. सहाजिकच मागल्या खेपेस असा उद्धारक केजरीवाल होता आणि यावेळी राहुल गांधींकडे प्रेषित म्हणून पुरोगामी बघत होते. महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांची तर राज ठाकरे आपला उद्धार करतील, इतकी घसरगुंडी झालेली होती. मागली दहा वर्षे ज्यांनी मनसेची खळ्ळ खट्याक म्हणून हेटाळणी केली, त्यांना यावेळी ‘लावारे तो व्हिडीओ’चा मंत्र आपल्याला मोक्ष मिळवून देईल, अशी जणू खात्री पटलेली होती. बुद्धीचे खंदक असे गटाराच्या पाण्याने दुथडी भरून वाहू लागले, मग दुर्बुद्धी खेरीज काहीही सुचत नाही. पर्यायाने सुनील तांबे येऊ घातलेला पराभव कथन करतोय, तेही वाचणार्‍यांना समजून घेण्याची गरज वाटली नाही. जेव्हा इतकी झिंग चढलेली असते, तेव्हा पराभवातले नैतिक विजय दिसू लागतात. त्या पराभवाचाही आनंदोत्सव साजरा करण्यापर्यंत मजल जात असते. अशा लोकांशी कोणी लढण्याची गरज नसते, की त्यांना पराभूतही करावे लागत नाही. असे लोक आणखी उन्मत्तपणे युक्तीवाद करतील, कुर्‍हाड आमच्या पायावर पडलेली नाही. आम्हीच कुर्‍हाडीवर पाय मारला आहे. मोदी-शहांनी फ़ुकटचे श्रेय लाटू नये.

एकूण पुरोगामी चळवळ किंवा सेक्युलर पक्ष यांची हीच शोकांतिका झालेली आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण सोलापूरातले नरसय्या अडाम मास्तरांचेच आहे. पुरोगामी म्हणून ज्या युपीए सरकारचे दिर्घकाळ समर्थन केले, त्यांनीच गरीब कष्टकर्‍यांची योजना रोखून धरली होती. तीच मोदी सरकारने मार्गी लावल्याचे सत्य बोलायची हिंमत त्यांनी केली, म्हणून मार्क्सवादी पक्षाने त्यांना हाकून लावले. ज्या पक्षाला वा विधारसरणीला सत्यकथनाचे इतके वावडे असेल, त्यांना सत्य कोणी व कसे सांगावे? समजावणे तर दुरची गोष्ट झाली. उलट सत्य बोलणार्‍याला हाकलून लावण्यातून एक कार्यकर्ता तुटत नसतो, कोट्यवधी जनता व मतदार आपल्यापासून दुर करण्याचा करंटेपणा आपणच करीत असतो. ही एकूण पुरोगामी राजकारणाची देशातील शोकांतिका आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हा गुन्हा ठरवणार्‍यांच्या हाती देशाचा कारभार कोणी देत नसतो, हे त्यांना कोण सांगू शकणार आहे? देश म्हणजे आयडिया ऑफ़ इंडिया नसते, त्याची एक भूमि असते. तिथला एक समाज असतो, त्याच्या शेकडो चालीरिती परंपरा असतात आणि त्यातून जी स्वाभिमान नावाची धारणा उदयास येते; त्याला राष्ट्र म्हणतात. त्याच संकल्पनेची विटंबना वा टवाळी करून त्याच लोकसंख्येचा पाठींबा किंवा आशीर्वाद मिळत नसतो. हे राहुलना उमजणार नाही. पण विचारस्वातंत्र्याचा नित्यनेमाने डंका पिटणार्‍यांना तर इतके समजायला हवेच ना? त्यांचेही डोके तितके चालणार नसेल, तर त्यांना कोण कसली किंमत देणार? शुद्ध मराठीत त्यांनाच बाजारबुणगे संबोधले जाते आणि म्हणून सुनील तांबेचे कौतुक आहे. त्याने हे सत्य बोलण्याची लिहीण्याची हिंमत तरी केली. पण त्याच्याच चहात्यांना वा समर्थकांना ते समजून घेण्याची इच्छा होणार नसेल, तर त्यांचा उद्धार कोणाला शक्य आहे? संघाचे वा भाजपाचे शिस्तबद्ध संघटन, बाजारबुणग्यांच्या महागठबंधनाला कशाला भिक घालणार ना?

16 comments:

  1. तुमचे म्हणणे रास्त आहे.

    ReplyDelete
  2. आदरणीय भाऊ सर मी आपल्याला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की आपण म्हणता त्या प्रमाणे राज ठाकरे महाराष्ट्रात खांग्रेस आणि खाष्टवादी ची जागा भरून काढण्यासाठी मेहनत घेत आहेत तर येत्या विधानसभेत ते काय दिवे लावणार आहे?

    ReplyDelete
  3. भाऊ एवढं होऊनही काही शिकलेले मूर्ख लोकं evm वर शंका घेत आहेत,, आणि त्याच बरोबर अडाणी हुशार लोकं मोदी विजयाचा आनंदोत्सव साजरा करत आहेत,

    ReplyDelete
  4. खरय भाउ पण निकालानंतर पुरोगामी लेोकांच्या पोस्टस मुद्दाम बघितल्या,काही फरक नाही,मोदींना शिव्या घालणे तसच चालुय.

    ReplyDelete
  5. एक मोदीविरोध सोडला तर सुनिल तांबे चांगले अभ्यासू लिहितो . आणि एक गोष्ट खटकते, अनेक वेगळा विचार करणारी मंडळी आहेत, त्यांना शेलकी विशेषणे देऊन टार्गेट करण्यात सर्व पुरोगामी काय मिळवतात? सुनील वेगळा आहे, त्याने तरी हे टाळावं असं वाटतं.

    ReplyDelete
  6. तुम्ही आणि श्री. सुनिल तांबे , एकच गणित विरूध्द टोका कडून सोडवून ही उत्तर एकच येते , याचा
    अर्थ दोघांचे ही गणित पक्के आहे. पण भाउ ,आम्ही तुमच्या बाजूचे आहोत आणि राहू ही !

    ReplyDelete
  7. I have not gone through any article of Shri Sunil tambeji, but a great writer like you are mentioning that he also has predicted like you, acceptance of this is also required big heart. Rest your article is as usual very good. Now give us like wise article s at the time if assembly election of M.S. in near future. Thanks.

    ReplyDelete
  8. Hello Sir, We are disappointed that Baramati has won by NCP again. Please share your valuable observation on this.

    ReplyDelete
  9. भाऊ त्रिवार सत्य मांडले तुम्ही. तुम्ही लिहिलेल्या गोष्टींचा अनुभव आम्हालाही थोडाबहुत आला पण आम्हाला त्याचा अर्थ लावता येईना त्यामुळे तुमच्या ३००+ हे कसे शक्य आहे हे कळत नव्हते व काळजी वाटत होती पण तुमच्या आताच्या नेमक्या शब्दांनी लक्षात आले. मोदींच्या आयुष्यमान भारत, उज्वला सारख्या योजनांची या पुरोगाम्यांनी हे सर्व खोटे आहे याचा फज्जा उडालाय वगेरे असे कोणत्यातरी वायर इंडिया सारख्यसारख्यांंवर विसंबून खिल्ली उडवत राहिले पण लाभार्थींना मोदींच्या आणि भाजपाच्या झोळीत बरोबर दान घातले. केंव्हा सुधारणार हे विचारवंत पुरोगामी.

    ReplyDelete
  10. मोठ्या उत्सुकतेने लेख वाचला आणि काही तरी चांगले वाचल्याचे समाधान वाटले. नंतर आता फक्त खिडकीतून बाहेर बघत बसलो आहे कारण कोणीतरी पुरोगामी चड्डी सांभाळत जाताना दिसेल कारण त्या सगळ्याच्या चड्डीच्या नाड्या तुम्ही काढून टाकल्या आहेत.

    ReplyDelete
  11. काका सर्वप्रथम तुमचे अभिनंदन आणि तुमच्या अभ्यासाला सलाम. तुम्हीच आम्हाला पहिल्यांदा कल्पना दिली होती की मोदी 300 पेक्षा जास्त जागा जिंकतील.ज्या ज्या वेळी मनात शंका आली त्यावेळी तुमच्या लेखाची वाट पाहायचो. ते लेख वाचल्यानंतर मन शांत व्हायचे. त्याबद्दल धन्यवाद.
    काका एक विनंती आहे की राजू शेट्टींच्या पराभवाचे तुम्ही विश्लेषण करावे. कारण तो एक निकाल माझ्यासाठी अनपेक्षित होता. बरीच करणे सांगितली जात आहेत. पण मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. फेसबुक वर लिहिलं तरी चालेल अथवा यु ट्यूब वर व्हिडीओ टाकला तरी चालेल. पण जरूर लिहावं हि विनंती.

    ReplyDelete
  12. महाराष्ट्र टाईम्स च्या संवाद पुरवणीत दि. २६ मे रोजी हाच लेख तांबे यांनी लिहिला आहे. व त्यात भाजपा ला इस्ट इंडिया कंपनी संबोधले आहे

    ReplyDelete
  13. Excellent, Bhau. Article worth remembering. Tell is about Prakash Ambedkar

    ReplyDelete
  14. अप्रतिम विश्लेषण
    भाऊ मानलं तुम्हाला
    धन्यवाद
    👍👍👌👌👍👍👌👌

    ReplyDelete
  15. भाऊ,
    जो जोडला गेला आहे, तो भक्त!
    अशी सोपी व्याख्या जर भक्तीची केली तर गेल्या पाच वर्षात हर तऱ्हेने मोदी शहा यांनी देशभर लोकांना जोडण्याचा प्रकट प्रयत्न केला,हे या मंडळींना दिसत नव्हते काय? मोदींवर विश्वास ठेवणारा प्रत्येक भारतीय हा त्यांनी स्वकष्टाने जोडला आहे,हे सत्य यांना पाहायचं नाहीये हा त्यांचा कपाळकरंटेपणा आहे.

    ReplyDelete
  16. Thanks Bhau for mentioning my FB post.
    Sunil Tambe

    ReplyDelete