Sunday, May 12, 2019

बुडत्याचा पाय खोलातच

rafale modis bofors के लिए इमेज परिणाम

"Anyone who doesn't take truth seriously in small matters cannot be trusted in large ones either." - Albert Einstein

राहुल गांधींनी राफ़ायलचा घोटाळा म्हणून मागल्या आठदहा महिन्यापासून आकांडतांडव केलेले आहे. पण त्यांनी केलेल्या चिखलेफ़ेकीचा कुठलाही परिणाम मोदींवर होऊ शकला नाही. कारण ज्या आरोपाला पुराव्यांची जोड नसते त्यावर कोणी विश्वास ठेवत नसते. पण मोदींना सत्तेतून बाजूला करायचे असेल, तर त्यांना बदनाम करून त्यांची स्वच्छ प्रतिमा पुरती डागाळून टाकायला हवी, असे कोणीतरी राहुलच्या मनात भरवून दिले आणि त्यांनी अथक आरोपांची बरसात करून चिखलफ़ेक चालू ठेवली आहे. अर्थात हा नवा प्रयोग नाही. राहुलचे पिताश्री राजीव गांधी सत्तेत असताना व त्यांना प्रचंड बहूमत मिळालेले असताना त्यांच्यावरही बोफ़ोर्सचे असेच आरोप झाले व त्यात जंजाळात फ़सलेल्या राजीवचा राजकारणात पराभव झाला होता. पण त्यात असलेले मुद्दे राफ़ायलमध्ये नसतील तर केवळ आरोपाने काहीही सिद्ध वा साध्य होण्याची शक्यता नव्हती व नाही. मात्र इतकी सोपी गोष्ट राहुल गांधींच्या डोक्यात शिरण्याची शक्यता नव्हती आणि त्यांची नुसती भाटगिरी करणार्‍यांनाही अधिकच गाळात जाण्याखेरीज पर्याय नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी जितके उत्तम प्रशासक आहेत, तितकेच मुरब्बी राजकारणीही आहेत. त्यामुळे कुठले मुद्दे केव्हा उकरून काढावे आणि कुठला पत्ता कधी खेळावा; याचे त्यांना नेमके भान आहे. म्हणून तर त्यांनी आठ महिने चाललेल्या आरोपांकडे दुर्लक्ष केले असताना, अकस्मात अर्धी निवडणूक संपल्यावर बोफ़ोर्सचा मुद्दा उकरून काढला. नुसता मुद्दा काढला नाही तर गांधी कुटुंबासह कॉग्रेसच्या दुखण्यावर बोट ठेवले. खरे तर तोच खड्डा होता आणि मोदींपेक्षा तो खड्डा राहुलनीच स्वत:साठी खोदून घेतला होता. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला सापळ्यात ओढायचे असते आणि आपल्यावर डाव उलटणार नाही, याचीही तेव्हाच काळजी घ्यायची असते. राहुलना याचे कधीच भान नव्हते. म्हणून त्यांनी पडदा पडलेल्या आपल्या पित्याचेच चारित्र्य उकरून काढायला हातभार लावला.

दिवंगत राजीव गांधी यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची खपली काढली म्हणजे तमाम कॉग्रेसी व पुरोगामी आपल्यावर तुटून पडणार आणि त्यांच्या हाती मोदींवर टिका करण्याचे आयते कोलित दिले जाणार, याची मोदींना कल्पना नसेल का? मोदी तितके धुर्त नक्कीच आहेत. तरीही त्यांनी आपल्यावर प्रतिहल्ला करायचे कोलित विरोधी नेत्यांच्या हाती बेसावधपणे दिले, असे मानायचे काय? अजिबात नाही. आपल्यावर हल्ला करण्याची सुवर्णसंधी म्हणून सगळे विरोधक राजीव गांधींच्या समर्थनाला समोर यावेत, ही मुळातच मोदींची अपेक्षा होती. विरोधकांनी ती पुर्ण केलेली आहे. मग मोदींनी यातून साधले काय? तर विस्मरणात गेलेल्या बोफ़ोर्स भ्रष्टाचाराची चर्चा सार्वत्रिक करायची संधी त्यांनी साधून घेतली. पण त्याचीही सुरूवात मोदींनी अजिबात केलेली नाही. आपल्या पित्याचे पाप मुळात राहुल गांधींनीच अकारण उकरून काढले. मोदी विरोधक वा पुरोगामी लोक विसरले असतील, किंवा त्यांनी कितीही झाकून ठेवले तरी बोफ़ोर्सचे भूत मोदींनी उकरलेले नाही. तब्बल नऊ महिन्यापुर्वी राहुल व सोनिया गांधी ज्याच्या मालक संचालक आहेत, अशा ‘नॅशनल हेराल्ड’ या दैनिकाने बोफ़ोर्सचे भूत उकरून काढलेले होते. जुलै २०१८ च्या आपल्या एका अंकामध्ये हा पेपर काय हेडलाईन देतो? ‘राफ़ायल हे मोदींचे बोफ़ोर्स आहे.’ त्याचा अर्थ किंवा आशय काय आहे? बोफ़ोर्सच्या घोटाळ्याने राजीव गांधींची सत्ता बुडवली तशी राफ़ायल मोदींची सत्ता बुडवणार, असाच त्यातला साधासरळ अर्थ नाही काय? त्यात बोफ़ोर्स हा घोटाळा असल्याची व राफ़ायल तसाच घोटाळा असल्याची डरकाळी आधी कोणी फ़ोडली? राहुल सोनियांनी त्या संपादकाचे काम उपटले होते, की त्यांनीच अशा हेडलाईनची फ़ुस संपादकाला दिलेली होती? मोदींचे बोफ़ोर्स होणार म्हणजे काय? राहुल वा अन्य कोणा कॉग्रेसवाल्यांनी तेव्हा कधी त्या वर्तमानपत्राचे वा तिथल्या संपादकाचे कान उपटले होते काय?

आज अनेकांना मृत पंतप्रधानाचा पुळका आलेला आहे. राजीव गांधी शहीद आहेत आणि देशासाठी त्यांनी मोठाच त्याग केला असल्याचे युक्तीवाद चालू आहेत. त्यंना नऊ महिन्यापुर्वी राजीव गांधींना भ्रष्ट म्हणणार्‍या वर्तमानपत्राची प्रत मिळाली नव्हती काय? तेव्हा कोणी मृत पंतप्रधानाची अशी विटंबना झाल्याची बोंब ठोकली होती काय? राहुल सोनिया सोडून द्या., आज ज्यांना राजकीय सभ्यतेचा पुळका आलेला आहे, त्यांना खरेच राजीव गांधी यांच्याविषयी खरोखरीची आस्था असती, तर त्यांनी तेव्हाच म्हणजे जुलै महिन्यात सर्वप्रथम राहुल व सोनियांचे कान पकडायला हवे होते. राजीव गांधी तुमचा पती किंवा पिता असेल. पण तो देशाचा शहीद पंतप्रधान होता आणि आता इतक्या वर्षांनी त्याच्यावर बोफ़ोर्स घोटाळ्याचे आरोप उकरून काढायला लाज कशी वाटत नाही? असा खरमरीत सवाल तेव्हाच या राजीवभक्तांनी राहुल सोनियांना विचारायला हवा होता. मोदी वास्तविक इतके विखारी असते, तर त्यांनी तेव्हाच बोफ़ोर्सच्या राहुलप्रणित अशा ‘नॅशनल हेराल्ड’मधील उल्लेखाचे मोठे भांडवल केले असते. पण त्यांनी नऊ महिने आपल्या देशातील तथाकथित संवेदनशील सभ्यतेला जाग येण्याची प्रतिक्षा केली. बोफ़ोर्स आणि राफ़ायलची तुलना मोदींनी केली नाही. किंबहूना तशी संधी राहुल सोनियांच्या वर्तमानपत्राने दिलेली असताना ‘संधीसाधूपणा’ केला नाही. पण त्याच बातमी व वर्तमानपत्राचा खरा उद्देश राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेस दैनिकाच्या मुलाखतीतून व्यक्त केल्यावर मोदींनी गांधी खानदानाच्या म्यानातील तलवारच उपसून त्यांच्यावर प्रतिवार केलेला आहे. राहुल गांधींना ‘नॅशनल हेराल्ड’ आठवत नाही, की त्यांच्या भक्तांनाही काही आठवत नाही. पण म्हणून या सर्व वादात पित्यावर शिंतोडे उडवणारा सुपुत्र निर्दोष ठरू शकत नाही. किंवा आज ज्यांना राजीव गांधींचा पुळका आला त्यांची ढोंगबाजी लपून राहू शकत नाही. एक्सप्रेस मुलाखतीत राहुल काय म्हणतात?

कोणीतरी मुलाखत घेताना राहुलनी विचारले मोदींशी शक्ती कशात आहे? तर समोरचा उत्तरला, मोदींच्या स्वच्छ प्रतिमेत त्यांची ताकद आहे आणि त्यामुळेच मोदींना पराभूत करणे अशक्य आहे. त्यावर राहुल उत्तरले, मग मी सतत मोदींच्या प्रतिमेवर हल्ले करून तिच्या ठिकर्‍या उडवीन आणि मोदींना संपवून टाकेन. सातत्यामध्ये खुप शक्ती असते. सतत एखादी गोष्ट करत रहावी, ती यशस्वी होते. थोडक्यात राफ़ायलचा हेतू सत्य बाहेर आणण्याचा नसून मोदींच्या प्रतिमेच्या ठिकर्‍या उडवण्याचा होता, हे राहुलनी कबुल करून टाकले. मग त्याची सुरूवात कुठून झाली, त्याकडे अब्घायला हवे. संसदेतील अविश्वास प्रस्तावाच्या भाषणात राहुलनी आधी राफ़ायलचा उल्लेख आणला आणि नंतर त्यांच्या दैनिकाने राफ़ायल हा मोदींचा बोफ़ोर्स असल्याची हेडलाईन केली. पण तसे करताना त्यांनीच बोफ़ोर्स हा घोटाळा असल्याचे मान्य करून टाकले होते ना? थोडक्यात मोदींची प्रतिमा उध्वस्त करण्याची राहुलनी सुरूवातच आपल्या पित्याची स्वच्छ शहीद ही प्रतिमा उध्वस्त करण्यातून आरंभली होती ना? वास्तविक तेव्हाच जाणत्या पत्रकार संपादक व बुद्धीमंतांनी राहुलची हजामत करायला हवी होती. आज जे कोणी मोदींवर तुटून पडले आहेत, त्यांनीच यात पुढाकार घ्यायला हवा होता. पण तेव्हा असे सगळे मूग गिळून गप्प बसले. किंवा बोफ़ोर्स आणि राफ़ायलमध्ये साम्य नसल्याचे विवेचन शेखर गुप्ता अशा अनेकांनी केलेले होते. पण त्यात त्यांना कुठे राजीव गांधीवर त्यांचाच पुत्र शिंतोडे उडवित असल्याची तक्रार नव्हती. जे शब्द मोदी बोलल्यावर अवमान होतो, तेच शब्द राजीव गांधींच्या पुत्राने उच्चारले लिहीले, मग गुणगान कसे होऊ शकते? मोदींनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे आणि ते दुखणे फ़क्त गांधी परिवाराचे किंवा कॉग्रेसपुरते मर्यादित नाही. ते तमाम बदमाश बुद्धीमंत सुसंस्कृतांचेही दुखणे आहे. कारण त्यांनी नऊ महिन्यापुर्वी राहुलच्या पापावर घातलेल्या पांघरूणाची खपली मोदींनी उचकटून काढलेली आहे.

अवमान हा मृत पंतप्रधानाचा होतो आणि विद्यमान हयात पंतप्रधानाचा होत नसतो काय? पंतप्रधानाला रोज उठून जाहिर सभेत चोर म्हणण्यात सभ्यता असते आणि मृत पंतप्रधानाच्या वास्तविक जीवनाच्या आठवणी करून देण्यात अवमान असतो? सावरकरही हयात नाहीत. त्यांच्यावर होणार्‍या बेछूट आरोपांकर्त्यांना ते आजही हयात असल्याचे वाटते काय? त्यांचे माफ़ीनामे चघळणर्‍यांना मोदींच्या विधाने इतकी कशाला झोंबतात? भंपकपणा किती टोकाचा असू शकतो? बोफ़ोर्स प्रकरण तेव्हाच्या निवडणूकीतही गाजले होते आणि त्याचेच भांडवल करून महात्मा गांधींचे खरेखुरे नातू राजमोहन गांधी यांनी तेव्हा अमेठीतून राजीव विरोधात निवडणूक लढवलेली होती. अलिकडेच त्यांनी एका इंग्रजी दैनिकात लेख लिहून मोदींचा निषेध केलेला आहे. त्यात राजमोहन म्हणतात, आपण बोफ़ोर्स गाजत असतानाच अमेठीत राजीव विरोधात लढलो होतो. पण तेव्हाही बोफ़ोर्सचा आरोप केला नव्हता. खुद्द महात्म्याचा नातू इतका खोटेपणा करीत असेल, तर डुप्लिकेट गांधींचा वारस खोटारडेपणा करण्यात माघार कशाला घेईल ना? राजमोहन लढले तेव्हा त्यांची निवडणूक बघून बातमीदारी करणार्‍या अजय सिंग या पत्रकारानेच ‘फ़र्स्टपोस्ट’ या वेबसाईटवर प्रदिर्घ लेख लिहून राजमोहन गांधींचा भंपक खोटेपणा चव्हाट्यावर आणलेला आहे. राजमोहन यांच्या प्रचारात नुसता बोफ़ोर्सचा आरोपच नव्हता, तर स्थानिक भोजपुरी बोलीतली बदनामी करणारी गाणीही अमेठीत वाजवली जात होती. याची ग्वाही अजय सिंग यांनी दिलेली आहे. त्याच्याही पलिकडे जाऊन राजीव गांधी खोटे आणि आपण खर्‍याखुर्‍या गांधीचे वारस असल्याचाही डंका राजमोहन गांधी यांनी तेव्हा पिटलेला होता. त्याची बातमी त्या काळात पार अमेरिकन वृत्तपत्रातही झळकलेली होती, हे राजमोहन गांधी बुद्धीमंत मानले जातात आणि ते इतके बिनदिक्कत खोटे लिहायला पुढे आले असतील, तर राहुलना शंभर गुन्हे माफ़ करायला नकोत का?

राजमोहन असोत किंवा तुषार गांधी असोत. त्यांच्यासहीत देशातला तथाकथित बुद्धीजिवी घटक असो. यांनी आजकाल इतकी लाजलज्जा सोडलेली आहे, की प्रतिष्ठीत असणे बेशरमीची गोष्ट होऊन गेलेली आहे. आपला मुद्दा लोकांच़्या गळी मारण्यासाठी बेधडक खोटे बोलण्याची जणू बौद्धिक स्पर्धाच देशात चाललेली आहे. मग अशा वातावरणात राहुलसारख्यांनी सुप्रिम कोर्टाच्या किंवा अन्य कुणा फ़्रान्स अध्यक्षाच्या तोंडी न बोललेले शब्द घालून खोटेपणा केल्यास नवल कुठले? अर्थात खोटेपणा करणे खुप सोपे असते. तो पटवणे किंवा पचवणे अशक्य असते. हीच अडचण आहे. म्हणून मग बर्ट्रान्ड रसेल आठवला. सत्य कोणाला मानावे? कुणावर विश्वास ठेवावा हे त्याने नेमके सांगितलेले आहे. ती लक्ष्मणरेषा कोणी ओलांडली, याला महत्व असते आणि सामान्य माणूस त्याच रेषेवर लक्ष ठेवून असतो. जो माणूस लहानसहान बाबतीत सत्य गंभीरपणे घेत नाही, त्याच्यावर मोठ्या बाबतीत अजिबात विश्वास ठेवता येत नसतो. सुप्रिम कोर्टाने जे म्हटलेलेच नाही, ते त्यांच्या तोंडी घालून राहुल गांधी जेव्हा बेछूट थापेबाजी करतात, तेव्हा त्यांच्या तोंडातून निघणार्‍या न्याय किंवा ७२ हजार रुपयांवर लोकांनी कसा व किती विश्वास ठेवायचा? जो माणूस कोर्टाला आपण खोटे बोललो म्हणून माफ़ीनामा लिहून देतो आणि त्यातही खोटेपणा करण्याची संधी घेऊ बघतो, त्याच्यावर अन्य कुठल्या बाबतीत कोण विश्वास ठेवणार? मात्र या गडबडीत राहूलच नव्हेतर कॉग्रेस पक्ष आणि त्यांच्या दरबारी बुद्धीमंतांनीही आपली विश्वासार्हता गमावली आहे. अशा लोकांनी राजीव गांधींच्या अवमानाविषयी कितीही गळा काढला, म्हणून त्यांना कोण कितीशी किंमत देईल? कारण त्यांना खरेच राजीव यांच्या हौतात्म्याची फ़िकीर असती, तर नऊ महिन्यपुर्वी़च त्यांनी आधॊ राहुलचे कान उपटले असते. सोनियांना जाब विचारला असता आणि ‘नॅशनल हेराल्ड’चा अंक जाळला असता.

पण एकूण निवडणूक व राजकीय वाटचाल बघता ह्या सर्वांनी आपली विश्वासार्हता पुर्णपणे गमावली आहे. त्याचा फ़टका फ़क्त कॉग्रे्स किंवा राहुलना बसणार नाही, तर या निमीत्ताने मोदींवर बालंट आणायला पुढे सरसावलेल्या बहुतेकांचे दिवाळे वाजणार आहे. यापैकीच एक विचारवंत प्राध्यापक शिव विश्वनाथन म्हणून आहेत. त्यांनी पाच वर्षापुर्वी ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकात मोदींच्या शपथविधीच्या दिवशीच एक विस्तृत लेख लिहून, आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. मोदींनी कॉग्रेस पक्षाला नव्हे, तर त्यांच्यासारख्या उदारमतवादी विचारवंतानाही कसे हरवले, त्याची ती कबुली होती. आपला मुर्खपणा, खोटे युक्तीवाद आणि ढोंगीपणाने मोदीच्या बाजूला अधिक मतदार ढकलला गेला आणि म्हणून भाजपाला बहूमत मिळाले; असे त्यांनी स्पष्टपणे कबुल केले होते. पण शब्दांनी शहाणा होईल तो बुद्धीमंत कसला? शहाण्याला शब्दाचा मार असे २०१४ पुर्वी म्हणायचे. हल्ली बहुधा मुर्खाला शब्दाचा मार असे म्हणायची पाळी आलेली आहे. जोडे खाऊन शिकतो, त्याला आजकाल बुद्धीमान म्हणायची वेळ आलेली आहे. तसे नसते तर मोदीद्वेषापायी असे एकाहून एक बुद्धीमंत राहुलसारख्या पोरकटाला खांद्यावर घेऊन मिरवले नसते, की आपली विश्वासार्हता अशी रसातळाला घेऊन गेले नसते. राहुलनी वा अशा दिवट्यांनी मोदींना राजीव गांधी यांच्या पापकर्माला उकरण्याची संधी दिली नसती. झाकली मूठ सव्वा लाखाची असते. ती उघडण्याची सक्ती मोदींवर कोणी केली? भ्रष्टाचारी नंबर एक, हा विषय वाढू दिला नसता, तर तो इतका ‘विराट’ अक्राळाविक्राळ होऊन समोर कशाला आला असता? पण कुणा उर्दू कवीने म्हटल्यासारखी सगळी बुद्धीमत्ता उथळ पाण्यात डुबली आहे. काही विषय अनुल्लेखाने संपवायचे असतात. शत्रूत दम नसतो, आपलेच बुडवायला पुरेसे असतात ना? 

हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था,
हमारी कश्ती थी डूबी वहां, जहाँ पानी कम था.

8 comments:

  1. आणि यात भर 'हुआ तो हुआ' ची । कसं काय व्हायचं यांचं ... 🤔🤔

    ReplyDelete
  2. डुप्लिकेट गांधींचा वारस 👌👌

    ReplyDelete
  3. Waa waa Pratishtit aasne beshrmichi goshta howun basli aahe. Very correct. All so called intellectuals are besharam in our country. Thanks for bringing this facts to publicly.

    ReplyDelete
  4. जबरी वाजवलेत भाऊ!
    सराईत खोटं बोलायला कुणी , अं कुणी नाही नेहरूंचे वंशज शिकले तर त्याला बघून हर्षवायू होणारे स्वयंघोषित पुरोगामी किती मिरवतात!
    राजा हरिश्चंद्रा पाहतोस ना रे वरून!!

    ReplyDelete
  5. पप्पू आणि त्याच्या पिल्लावळीच्या " नसलेल्या डोक्याचे " तुम्ही काढलेले धिंडवडे खूप कांही सांगून जातात ! या लेखातील तुमच्या विचारांशी १०० % सहमत !

    ReplyDelete
  6. वर दिलेला वृत्तपत्रचा फोटो मी बरेच दिवस हुडकत होतो, तो मिळाला तुमच्या मुळे त्यासाठी धन्यवाद बाकी लेख तर उत्तमच

    ReplyDelete
  7. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  8. जितना ज्यादा किचड होगा उतानाही ज्यादा कमल खिलेगा.

    ReplyDelete