Tuesday, May 7, 2019

होय, लोकांचा विश्वास उडालाय!

Image result for anna ramlila

कालपरवा बारामतीच्या निकालाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, तिथे भाजपाचा उमेदवार जिंकला तर लोकांचा निवडणूका व लोकशाहीवरचा विश्वासच उडून जाईल. वरकरणी पवारांचे विधान हास्यास्पद वाटेल. पण वेगळ्या अर्थाने त्यांच्याही वाक्यामध्ये आशय आहे आणि तो समजून घ्यावा लागेल. त्यांच्यासह विविध २१ राजकीय पक्षांनी मतदान यंत्रावर शंका घेऊन सुप्रिम कोर्टात दाद मागितली होती. वास्तविक यापुर्वीच त्याविषयी सुप्रिम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि मतदान यंत्राला पर्याय नसल्याचा निर्वाळा आधीच्याच निकालातून दिलेला आहे. पण तरीही कुठल्याही निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी याचिका करणे, हा आता एक खेळ होऊन बसला आहे. त्यातून असे पुरोगामी किंवा बुद्धीजिवी म्हणवून घेणारे लोक काय साध्य करीत असतात? तर कुठलाही निकाल अंतिम नाही आणि त्याविषयी शंका घेण्य़ाचीच प्रवृत्ती जनमानसात रुजवित असतात. हा खेळ इतका अतिरेकी झाला आहे, की सामान्य लोकांचा आता बुद्धीवाद किंवा बुद्धीजिवींच्या शहाणपणावरचा विश्वासच उडून गेला आहे. त्यामुळे लोकांना पर्याय शोधावा लागला होता. पाच वर्षापुर्वीच लोकांनी अशा तथाकथित बुद्धीवादावरचा अविश्वास आपल्या मतदानातून व्यक्त केलेला आहे. तसे नसते तर नरेंद्र मोदी यांना बहूमत देण्यापर्यंत लोकांची मजल गेली नसती. आधीच्या दहा वर्षात शहाण्या लोकांनी देशातल्या भ्रष्टाचार व अनागोंदीला वेळच्या वेळी रोखण्यासाठी हालचाली केल्या असत्या, तर नरेंद्र मोदी हा पर्याय लोकांना शोधावा लागला नसता, की स्विकारावा लागला नसता. तो मतदाराने दिलेला धडा होता. तर त्यातून शिकून शहाणे होऊन आपल्या चुका सुधारण्याचा उपाय विरोधकांनी व बुद्धीजिवींनी चोखाळायला हवा होता. उलट त्यांनी अधिकच खोटेपणा आरंभला व मोदींना नुसते बदनाम करून संपवण्याचे फ़सलेले डावच पुढे रेटल्याने लोकांचा आता मोदींवर अधिक विश्वास बसलेला आहे. तर पवारांसह तमाम पुरोगाम्यांवरचा विश्वास उडालेला आहे. त्यामुळेच असे नेते मतदान यंत्र, निवडणूक आयोग व सुप्रिम कोर्टावरही अविश्वास दाखवू लागले आहेत. पवार साहेब, लोकांचा मतदानावरचा विश्वास उडालेला नसून तुमच्यासारख्या नेते पुढारी पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे. किंबहूना तुमच्यसारखे नेते पक्षांचाच जनतेवरचा विश्वास उडालेला आहे.

जेव्हा तुमचे पक्ष जिंकतात, तेव्हा त्याच मतदान व यंत्राला जनतेचा कौल म्हणायचे आणि जेव्हा तुमचे पक्ष पराभूत होतात, तेव्हा त्यावरच शंका घ्यायच्या; याचा आता खुप अतिरेक झाला आहे. जेव्हा तुमच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागतो, तेव्हा तो न्याय असतो आणि जेव्हा निकाल तुमच्या विरोधात जातात, तेव्हा कोर्टावरही शंका घेतल्या जातात, यालाच बुद्धीवाद किंवा शहाणपणा मानायचे असेल, तर लोक हळुहळू म्हणू लागले आहेत, अशा शहाणपणापेक्षा अडाणी रहाणे भले. त्यातून तुमचाच आत्मविश्वास तुम्ही गमावून बसला आहात. लोकांचा आजही या देशावर, लोकशाहीवर आणि निवडणूकांवरचा विश्वास कायम आहे. तसे नसते, तर देशामध्ये एव्हाना जनतेने उठाव केला असता. तसा उठाव झाला, त्यावेळी पवार किंवा ममता बानर्जी, डावे किंवा विचारवंत काय दिवे लावित होते? यापैकी कोणालाही जनतेच्या भावना सत्तेपर्यंत पोहोचवता आल्या नाहीत, की न्याय मागायला पुढे येण्याची हिंमत झालेली नव्हती. तेव्हा महाराष्ट्राच्या राळेगण सिद्धी गावातल्या अण्णा हजारे यांना उठून दिल्लीच्या रामलिला मैदानात उपोषणाचे हत्यार उपसावे लागलेले होते. रामदेव बाबाला योगासने सोडून भ्रष्टाचार व काळ्यापैशाच्या विरोधात आरोळी ठोकण्याची वेळ आलेली होती. देश तेव्हा सगळ्या बाजूने अराजकाच्या जंजाळात फ़सलेला होता. ज्यांनी वडीलकी व शहाणेसुर्ते म्हणून राजकारण्यांचा कान पकडण्याची अपेक्षा होती, तेच अण्णा वा रामदेव बाबांची टवाळी करण्यात रममाण झालेले होते. पण कोणी सोनिया, राहुल वा मनमोहन सिंग यांचा कान पकडायला पुढे सरसावला नव्हता. त्याचवेळी लोकांचा अशा शहाणे व त्यांना मान्य असलेल्या लोकशाही अराजकावरचा विश्वास उडालेला होता. मात्र त्यासाठी पुढाकार घेणार्‍या अण्णा वा रामदेव बाबांमध्ये राजकीय सत्ता हाती घेऊन चालविण्याची क्षमता नव्हती,. म्हणून लोक गुजरातच्या मुख्यमंत्र्याकडे वळले, त्यालाच आज अवघे जग नरेंद्र मोदी म्हणून ओळखते.

मागल्या पाच वर्षात मोदींनी लोकांना काय दिले? खोटी आश्वासने? निदान विरोधक व बुद्धीजिवींचा तसा आरोप आहे. पण मुळातच २०१४ सालात लोकांनी मोदींकडून कुठली आश्वासने मागितली नव्हती, की त्या आश्वासनांसाठी लोकांनी मोदींच्या हाती सत्ता सोपवलेली नव्हती. लोकांना सोनिया, राहुल, मनमोहन यांच्या अराजकातून मुक्ती हवी होती आणि मागल्या पाच वर्षात मोदींनी लोकांची ती अपेक्षा पुर्ण केलेली आहे. लोकांचा ढासळणारा विश्वास पुन्हा प्रस्थापित करायचे कर्तव्य शहाणे बुद्धीजिवी, पुरोगामी नेते पक्ष यांनी पार पाडले असते, तर लोकांना मोदी किंवा भाजपा हा पर्याय शोधावा किंवा स्विकारावा लागला नसता. लक्षात घ्या, बाबा रामदेव किवा अण्णांची आंदोलने भडकलेली होती, तेव्हा नरेंद्र मोदी कुण्याच्याही दृष्टीपथात नव्हते. भाजपाचे नेतृत्व अडवाणी व गडकरी असे लोक करीत होते आणि त्यांच्याही बाबतीत लोकांचा विश्वास शून्य होता. हे सगळेच कॉग्रेसप्रणित नेहरू प्रणालीचेच पाईक असल्याची लोकांची खातरजमा झालेली होती. म्हणूनच लोकांना पर्याय शोधायचा होता. केजरीवाल म्हणून कल्पनेचा उडणारा घोडा बनू शकला. पण मुख्यमंत्री होताच लोकांच्या लक्षात त्याचा पोकळ वासा आला आणि सगळ्या जनतेच्या नजरा मोदींकडे वळल्या. आठदहा महिने आधी लोक मोदींकडे बघू लागले होते आणि केजरीवाल यांचा उडाणटप्पूपणा मोदींना आकर्षक बनवणारा ठरला. लोकांना तेव्हा किंवा आज पुन्हा, राहुल सोनियांची सत्ता व त्यातून येणारे अराजक नको आहे. पण पुन्हा तोच पर्याय घेऊन विरोधक व बुद्धिजिवी मतदारासमोर आले, तर मोदींना पर्याय उरतोच कुठे? सहाहिकच सवाल लोकांचा मतदानावरचा विश्वास उडण्याचा नसून, आधीच उडालेला विश्वास नव्याने संपादन करण्याचा विषय होता. मागल्या पाच वर्षात शरद पवार किंवा तत्सम नेते पक्षांनी त्या दिशेने एकही पाऊल टाकलेले नाही. ही आजच्या निवडणूकीतली शोकांतिका आहे.

पाच वर्षापुर्वी आपण का जिंकलो? किंवा लोकांनी आपल्या हाती सत्ता कशासाठी दिलॊय, याची पुर्ण जाणिव मोदींना होती आणि आश्वासने पुर्ण करण्यापेक्षा आपण लोकाचा विश्वास उडणार नाही, इतपत सावध राहिले पाहिजे, याची काळजी मोदींनी पदोपदी घेतलेली आहे. मुळातच त्यांच्याकडून लोकांच्या फ़ार अपेक्षा नव्हत्या. देश व समाज पुरोगामी दिवाळखोरी वा अराजकातून मुक्त व्हावा, इतकीच लोकांची किमान अपेक्षा होती. ती पुर्ण करण्यात मोदी कुठेही कमी पडलेले नाहीत. कदाचित त्यांनी दिलेली आश्वासने पुर्ण करण्यात कुठे कमी नक्कीच पडले असतील. त्याची मतदाराला अजिबात फ़िकीर नाही. म्हणूनच मोदींन पराभूत करण्याचा सर्वात सोपा उपाय पुन्हा जनतेच्या विश्वास संपादन करणे इतकाच होता. तो फ़क्त कॉग्रेस किंवा पुरोगामी पक्षांच्या बाबतीत उडालेला विश्वास नाही. देशातील बुद्धीवादी, पत्रकार, संपादक, अभ्यासक, जाणकार अशा तमाम उच्चभ्रू शहाण्यांवरचा लोकांचा विश्वास सात वर्षापुर्वीच उडालेला होता. त्यातून निवडणूकाच मुक्ती देऊ शकतात, असे जनतेला पक्के ठाऊक होते. त्याच विश्वासावर जनतेने अखेरची तीन वर्षे सोनिया, मनमोहन वा राहुल यांच्यासह पुरोगामी अराजक सहन केलेले होते. त्यामुळे जनतेचा मतदान व निवडणूकीवरचा विश्वास उडण्याचा सवाल नाही. तुम्ही गमावलेला जनतेचा विश्वास पुन्हा संपादन कसा करावा, ही समस्या होती. कोर्टात जाऊन किंवा निवडणूक आयोगावर शिंतोडे फ़ेकून जनतेचा विश्वास संपादन होत नसतो. तो तुमच्या वागण्यातून, बोलंण्यातून व कृतीतून संपादन होऊ शकत असतो. मोदींनी तीच चाकोरी पकडलेली आहे आणि पुरोगाम्यांना तिकडे वळण्याची बुद्धीही झालेली नसेल, तर जनतेला मोदींशिवाय पर्याय उरत नाही. त्याची खात्री पटलेली असल्यानेच मग वेगवेगल्या प्रकाराने निवडणूका, मतदान व तिचे निकाल यात अडथळे आणण्याचे खेळ चालले आहेत. लोकशाहीत कायदे, नियम, आचारसंहिता किंवा अगदी कोर्टापेक्षाही सामान्य जनताच अंतिम निर्णय देते. हे विसरलेल्यांना लोकशाही कधीच समजलेली नसते. पुरोगाम्यांना तेच समजून घ्यायची वेळही टळलेली आहे.

14 comments:

  1. लोकांचा मतदानावरचा विश्वास उडालेला नसून तुमच्यासारख्या नेते पुढारी पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे...... भाऊ तुमचे हे वाक्य एकदम खरे आहे जर मतदाना वरचा विश्वास उडाला असता तर मतदानाचा टक्का एकदम कमी झाला असता तसे होताना दिसत ,,सर्व सामान्य लोकांना सरकारी भ्रष्टाचारा पेक्षा त्याची कामे करणारे सरकार हवे असते त्यांच्या खूप माफक अपेक्षा असतात बिजली,पाणी,सडक (विकास) इ.आणि Bjp ने त्यावर खरच चांगले काम केले आहेत. पण विकास हा निरंतर चालूच असतो तो कधीच पूर्ण दिसत नाही,
    धन्यवाद भाऊ , खूप छान लेख,

    ReplyDelete
  2. पुरोगामी लोकं मैफिल गोळा करतात, आणि त्यात तुम्ही विरोधी मते व्यक्त केली की तुटून पडतात, लेबलं चिकटवतात .आणि त्यांच्या वलयाने किंवा घाबरून अनेक पोपट तयार झालेत, ते त्यांना तर खुश करतात, पण स्वतःचा वेळ ह्यात दवडण्यात काय हशील आहे आणि मग पुरोगामी लोकांना वाटतं जनमत ह्याच बाजूने आहे. ह्या लोकांचं कुणी ऐकत नाही वाटतं त्यासाठीच ते मैफिली भरवतात, पण लोकांच ऐकून घेतल्याशिवाय कसं कळणार लोकं काय विचार करत आहेत, आणि त्यामुळे परिवर्तन तरी कसं होणार ? पण शंका आहे त्यांना काही करायचं आहे का, कारण मैफिलीबाहेर ही मंडळी बाहेर पडताना माझ्या तरी पाहण्यात नाही...

    ReplyDelete
  3. भाऊ, जबरदस्त. शरद पवार हवेचे बुडबुडे उडवण्यात तरबेज आहेत, दिसायला छान दिसते पण उपयोग काही नाही.

    ReplyDelete
  4. विरोधी पक्षांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्या मुळे त्यांची पावले अराजकाकडे जाणारी आहेत. जनता शाहणी झाली आहे , यावर ही त्यांचा विश्वास नाही.
    विनाशकाले विपरितबुध्दी । दुसरं काय म्हणणार ?
    भाउ , तुमचे विवेचन नेहमी प्रमाणेच अर्थपूर्ण ! १०० % सहमती.....

    ReplyDelete
  5. अचानकच निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था इतक्या वाईट कशा होतील? वर्षानुवर्षे प्रस्थापित असलेल्या यंत्रणा अचानक अशा कशा आणि का बदलतील? 2014 ला याच यंत्रणा होत्या ना? त्यांची विश्वासार्हता अशी अचानक कशी लयाला जाईल? तसे झाले असेल तर यंत्रणाना इतक्या वर्षात इतके बिनकण्याचे कोणी व्हायला भाग पाडले हा ही संशोधनाचा विषय होईल. मोदीजी सगळे काही त्यांन्ना हवे तसे करुन घेऊ शकत असते तर तो बेरोजगारीचा अहवाल नसता का त्यांनी बदलून घेतला? जनता आता मूर्ख राहिली नाही हे तरी समजून घेतले पाहिजे अशा पुढा-यांनी.

    ReplyDelete
  6. 👍👍👍👍👍👌👌👌👌

    ReplyDelete
  7. श्री भाऊ मला वाटत तुम्ही मनकवडे आहात, देशातल्या 10 पैकी 9 लोकांना हेच वाटतंय

    ReplyDelete
  8. शेतकरी नाराज आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. शेतकरी कायम नाराज असतात...अजुन काय हवंय ?

      कृषी पंप मोफत
      वीज मोफत
      कर्ज माफ
      बियाणे मोफत किंवा सबसिडीसहित
      खते मोफत किंवा सबसिडीसहित
      इनकम टॅक्स नाही

      म्हणे काळ्या आईची सेवा करतात..शेतकरी तर काळ्या आईची सेवा घेतात..खते वापरून जमीनीचा पोत खराब करतात..तुम्ही जमिनीला काही देत नाहीत उलट घेतात.. सेवा करण्याचा आव नका आणू..

      तुम्ही नशिबवान आहात तुमच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. शिक्षणाची संधी तुम्हालाही तितकीच होती जितकी इतरांना आहे.. तुमच्याकडे हक्काचा रोजगार आहे. जरा इतरांकडे बघा ज्यांच्याकडे शेती नाही आणि रोजगारासाठी वणवण फिरावं लागतं. छोटया व्यावसायिकाकडे बघा. कर्जमाफी नाही, विजमाफी नाही, GST भरा, इनकम टॅक्स भरा..

      नका करू शेती नसेल जमत तर...

      Delete
    2. शेती हा व्यवसाय आहे उगाच सेवा करत असल्याचा आव आणू नाही. मे इंजिनिअर असून माझ्याकडे शेती असती तर मीपण शेती केली असती.

      Delete
  9. भाऊ तुम्ही आज पण भाजपाला 300 जागा मिळणार यावर ठाम आहात का ? कारण की पाचव्या टपप्या नंतर सर्वजन भाजपाला 200 च्या वर जागा मिळणार नाहीत अस सगळेजण म्हणतात आहे तुमची भविष्यवाणी खोटी ठरणार ? बघू 23 मे ला काय होत ते

    ReplyDelete
  10. Motto of today's politics -"If can't convince them,confuse them"

    ReplyDelete
  11. भाऊ यावेळी प्रथमच झोपडपट्टी पेक्षा वरच्या वर्गातील मतदान जास्त आहे. हा एका प्रकारे नोटबंदीचा निर्णय असेल. कारण झोपडपट्टी पैसे वाटल्या शिवाय मतदान येत नाही. हा आजपर्यंत चा अनुभव आहे.

    ReplyDelete