Saturday, January 11, 2014

दरबाराचा बोजवारा

 

    दिल्लीत अल्पमताचे सरकार बनवल्यापासून आम आदमी पक्षाचे नेते इतके हुरळले आहेत, की त्यांना राजकारण हा दिर्घकालीन विषय आहे याचेही भान उरलेले नाही. सहाजिकच त्या पक्षाचे धोरण व कार्यक्रम माध्यमे ठरवतात किंवा कसे; याची आता शंका येऊ लागली आहे. कारण सत्ता हाती घेतल्यापासून सरकारचे काम करण्यापेक्षा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रोज नव्या घोषणा करीत सुटले आहेत. जणू रोजच्या वृत्तपत्रांना हेडलाईन वा वृत्तवाहिन्यांना ब्रेकिंग न्युज पुरवणे हेच आपले प्रमुख काम आहे; अशा काहीशा मनस्थितीत ‘आप’चे नते वागताना दिसतात. त्याचेच परिणाम मग त्यांनीच वाजतगाजत योजलेल्या जनता दरबाराचा फ़ज्जा उडण्यात झाला आहे. दोनच दिवस आधी केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये मंत्रालयासमोर फ़ुटपाथवर जनता दरबार भरवण्याची घोषणा केली होती. शनिवारी सर्वच मंत्री आपल्यासह रस्त्यावर टेबल टाकून बसतील आणि रोजच्या रोज एक मंत्री तिथे बसून लोकांच्या तक्रारींचे निवारण करील; अशी घोषणा करताना त्यांनी परिणामांचा विचार केला नव्हता काय? केला असता तर शनिवारी त्यांचा फ़ज्जा दाखवायची वेळ त्यांच्याच कौतुकात रमलेल्या वाहिन्यांवर आलीच नसती. आपण आता एका संघटनेचे व आंदोलनाचे नेता नसून कुठल्या चळवळीची घोषणा करीत नाही; तर आपल्या प्रत्येक शब्दाला व घोषणेला सरकारचे काम समजले जाते, याचे भान त्यांनी ठेवायला हवे आहे. पण त्यापेक्षा पत्रकारांना खुश राखण्यात व रोजची ब्रेकिंग न्युज देण्यातच त्यांना रस दिसतो. आंदोलनाला जमणार्‍या गर्दीच्या तक्रारी घ्यायच्या व सोडवायच्या नसतात, तर गर्दीकडून घोषणा करून घ्यायच्या असतात.

   आता केजरीवाल मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी प्रश्न सोडवतो म्हटल्यावर हजारोच्या संख्येने लोक तिथे पोहोचले तर नवल नाही. ह्याचे भान त्यांनी ठेवायला हवे. कारण असा दरबार योजणारे ते देशातले पहिलेच मुख्यमंत्री नाहीत. प्रत्येक राज्यात असला खेळ चालतो. पण त्याचा आजवर कुठे फ़ज्जा उडालेला नाही. कारण तिथे अत्यंत सुत्रबद्ध रितीने दरबाराचे आयोजन केले जाते. पक्षाचे सदस्यत्व देण्याच्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवायच्या नसतात. परंतु आजवर झाला वा चालला आहे तो निव्वळ मुर्खपणा असल्याचा अहंकार डोक्यात इतका भिनलेला आहे, की आपण प्रत्येक बाबतीत नवेच काही केले पाहिजे असे खुळ चढले आहे. सहाजिकच दरबार म्हणून लोटणार्‍या गर्दीचा अंदाज नव्हता, की तक्रारी कशा घ्याव्या किंवा त्यांचा निचरा कसा करावा, त्याची सुद्धा काही योजना नव्हती. मग झुंबड उडाली आणि आम आदमीच्या गर्दीला घाबरून खुद्द आम आदमी’च्याच मुख्यमंत्र्याला पळ काढावा लागला. नंतर आयोजनात त्रुटी राहिल्याचे केजरीवाल यांनी मान्य केले. पण त्यासाठी त्यांनी टिका अकारण ओढवून घेतली आणि विरोधकांच्या हाती कोलीतही देऊन टाकले. निवडणूकीत मोठे यश मिळवल्यापासून केजरीवाल यांच्यावर अवास्तव आश्वासने दिल्याचा आरोप चालू आहे. त्याचप्रमाणे ते नेहमी अशक्यकोटीतल्या गोष्टीची घोषणा करतात, अशी टिका होत असते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. पण म्हणूनच त्यांना कचाट्यात पकडायला त्यांचे विरोधक दबा धरून बसलेले असणार, हे विसरता कामा नये. मग त्यांना संधी मिळणार नाही, याची काळजी केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी घ्यायला नको काय? पण उलट केजरीवाल इतका उतावळेपणा करीत आहेत, की शत्रूंच्या हाती कोलीत देण्यापर्यंत मजल मारू लागले आहेत.

   शनिवारच्या दरबाराचा फ़ज्जा उडाल्यावर अनेक वाहिन्या त्याची गंमत करीत होत्या. पण गर्दी व बेशिस्तीमुळे निराश झालेल्या सामान्य माणसाने संतापाची कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. काही प्रमाणात लोकांनी आम आदमी पक्ष व केजरीवाल त्यांच्याविषयी नाराजी प्रकट केली. पण राग असा दिसला नाही. ही स्थिती कायम राहिल असे नाही. एकदा असे घडते व हा नवा पक्ष सापळ्यात फ़सतो असे दिसले; तर प्रस्थापित पक्ष व त्याचे नेते ‘आप’ला गोत्यात घालायला टपलेले आहेत. जसजशा ह्या चुका व उतावळेपणा वाढत जाणार आहे, तसतशी ती संधी विरोधकांना वाढत जाणार आहे. मग केजजरीवालांची प्राथमिकता अशी संधी आपल्या विरोधकांना मिळणार नाही, याची काळजी घेण्याला असली पाहिजे. त्याच्यासाठी उतावळेपणा सोडून व प्रसिद्धी मागे धावत सुटण्यापेक्षा हाती आलेल्या सत्तेचा चांगला वापर करून आपल्या पक्षाची जनमानसातील प्रतिमा उंचावली पाहिजे. पण त्यासाठी प्रसिद्धी माध्यमांकडे थोडीफ़ार पाठ फ़िरवून कामात लक्ष घालावे लागेल. अन्यथा असाच विचका व फ़ज्जा उडणारी प्रसिद्धीलोलूप पावले उचलल्यास विरोधी पक्षाचे हस्तक जनतेमध्ये घुसून पुरता बोजवारा उडवण्यास हातभार लावतील. त्यातून लोकांचा नुसता भ्रमनिरास होणार नाही, तर तरूणांना राजकारणात आणायची प्रक्रिया सुरू करणार्‍या या पक्षाच्या अपयशाने ती प्रक्रिया थंडावेल. केजरीवाल किंवा त्यांच्या मुठभर सहकार्‍यांपुरते या पक्षाचे यश अवलंबून नाही. त्यांच्या यशस्वी वाटचालीवर आगामी पिढीचे नेतृत्व घडवले जाण्याची जबाबदारी अधिक महत्वाची आहे. ती पिढी ‘आप’मधलीच असेल असे नाही. अन्य कुठल्याही नावाने वा प्रस्थापित पक्षातली असेल, ती नवी पिढी नेतृत्व करायला पाय रोवून उभी रहाणे ही ऐतिहासिक गरज आहे.

No comments:

Post a Comment