आपल्या अवतीभवती अशी माणसे असतात, की त्यांनी सदिच्छेने आपल्याला केलेली मदत आपल्याला अधिक त्रासदायक होत असते. आपल्याला मदत करण्याचा त्यांचा हेतू प्रामाणिक असतो; पण त्यांच्या बुद्धीने जे काही करतात, ते नेमके आपल्याला अधिक अडचणीत घेऊन जाते. मग अशावेळी वैतागून आपण म्हणतो, तुम्हाला नसत्या उठाठेवी कोणी सांगितल्या होत्या? पुढे जाऊन आपण अशा मित्रांना व परिचितांना विनंती करतो, की त्यांनी आपलाला मदत म्हणून आपल्यासाठी काहीच करू नये. कारण त्यांच्या अशा उठाठेवी आपल्याला गोत्यात टाकणार्या असतात. आज कॉग्रेस पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मनोमन नेमके तसेच वाटत असेल. कारण त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष व भावी नेते राहुल गांधी यांनी दहा वर्षानंतर कुठल्या वाहिनी वा वृत्तपत्राला पहिलीवहिली मुलाखत देताना पक्षाची प्रतिमा उंचावण्याची अपेक्षा होती. पण घडले उलटेच. राहुलच्या प्रश्नोत्तरांनी कॉग्रेसलाच अधिक गोत्यात आणून टाकले आहे. ज्या कॉग्रेसने गेल्या बारा वर्षात सातत्याने गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना अडचणीत टाकले होते, ती दंगल बाजूला पडून राहुलच्या मुलाखतीने तीस वर्षापुर्वीच्या दिल्लीतील शिखविरोधी दंगलीचे भूत बाटलीतून बाहेर काढले आहे. प्रश्नोत्तरामध्ये गुजरात दंगल आली आणि नेहमीचेच मुद्दे पुढे आले. त्यात आता काही नवे राहिलेले नाही. पण त्याच ओघात शिखविरोधी दंगलीचा विषय निघाल्यावर राहुलनी त्यात कॉग्रेस नेत्यांचा काही प्रमाणात हात होता आणि त्यापैकी अनेकांना शिक्षाही झाल्याचे दडपून सांगितले. वास्तवात त्यापैकी काहीच झालेले नाही आणि प्रत्येकवेळी शिख विरोधी दंगलीचा विषय आल्यावर कॉग्रेसने आपल्या नेत्यांना वाचवण्यासाठी कसरत केलेली होती.
राहुलच्या त्या अवास्तव उत्तराने तो गाडला गेलेला विषय नव्याने ऐरणीवर आला आणि मोदींच्या दंगलीचा विषय बाजूला पडून कॉग्रेसला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याची शर्यत सुरू झाली. मग त्याचाच लाभ उठवायला भाजपा पुढे सरसावला तर नवल नव्हते. मागल्या बारा वर्षात गुजरात दंगलीचा विषय निघाला, मग भाजपा व त्याचे मित्र पक्ष अगत्याने दिल्लीच्या १९८४च्या शिख हत्याकांडाच विषय पुढे आणायचे. पण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याबद्दल कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माफ़ी मागितल्याचे सांगून पत्रकार भाजपावाल्यांना गप्प करीत होते. मात्र राहुल गांधी यांनी मुलाखतीमध्ये तोच विषय निघाल्यावर माफ़ी मागण्याची पळवाट न घेता, सारवासारव केली आणि मोदींच्या माफ़ीसारखा राहुलच्या माफ़ीचा विषय पुढे आला. गुजरातच्या दंगलीनंतर किती लोकांवर खटले झाले, किती लोक शिक्षा भोगायला गेले, किती धरपकड झाली, इत्यादीची दिल्लीशी तुलना होऊ लागली. दिल्लीत हिंसाचाराला दिलेले मोकाट रान व गुजरातचे पोलिस यांची तुलना सुरू झाली. अशा गोष्टी गेल्या बारा वर्षात कटाक्षाने टाळल्या जात होत्या. त्यावर पांघरूण घातले जात होते. तसे भाजपाने केलेले प्रयासही माध्यमेच हाणून पाडत होती आणि माफ़ी मोदी मागत नाहीत; एवढाच मुद्दा लावून ठेवला जात होता. राहुल नेमके तिथेच फ़सले आणि त्यांनी दिलेली ऐतिहासिक मुलाखत कॉग्रेसला लाभदायक ठरण्यापेक्षा अधिकच गोत्यात घालणारी ठरली. केवळ दंगल व मोदींपुरताच हा विषय कॉग्रेसला गोत्यात घालून गेला नाही, तर दिल्ली विधानसभेच्या पराभवानंतर खेळलेला राजकीय डावपेचही उधळणारा ठरला. कारण कॉग्रेस पाठींब्यावर सरकार चालवणार्या केजरीवालांनी आता दिल्ली दंगलीचेच भांडवल करायचे योजले आहे.
राहुलच्या विधानावर कल्लोळ सुरू असताना दिल्ली व भोवतालच्या शिख लोकसंख्येवर डोळा ठेवून केजरीवाल यांनी १९८४च्या हत्याकांडाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमण्याचा पवित्रा घेतला आहे. असे कुठलेही तपास पथक दिल्लीचा मुख्यमंत्री नेमू शकत नाही, त्याला फ़ार तर तशी उपराज्यपालांकडे मागणी करता येते व शिफ़ारस करता येते. त्यामुळेच आपल्या घोषणेतून कुणा पिडीत शिखाला न्याय मिळणार नाही, हे केजरीवाल पक्के जाणून आहेत. पण आम आदमी पक्ष शिखांच्या न्यायासाठी ठामपणे उभा असल्याचा देखावा तर त्यातून नक्की निर्माण होतो. केजरीवाल तीच दिशाभूल करीत आहेत. शिवाय कॉग्रेस पक्षाचा पाठींबा घेऊन सरकार चालवित असताना शिख हत्याकांडासाठी असे तपास पथक मागून सत्ता गमावण्याचीही त्यांच्या पक्षाला पर्वा नाही, असेही भासवू शकत आहेत. एकप्रकारे त्यांना यातून न्याय देण्यापेक्षा शिखांची मते आगामी लोकसभा निवडणूकीसाठी बळकवायची आहेत. ती संधी त्यांना राहुल गांधींच्या विधानाने मिळवून दिली आहे. परस्पर तशी घोषणा केल्यास इतका राजकीय लाभ केजरीवालना होऊ शकला नसता. पण राहुल १९८४च्या दंगल प्रकरणात भोवर्यात सापडले असताना अशी घोषणा करून केजरीवाल यांनी मोठा धुर्त डाव खेळला आहे. ती वेळ व मुहूर्त त्यांना राहुलच्या मुलाखतीने मिळवून दिला. म्हणजेच राहुलनी सर्वच बाजूने पक्षाला अडचणीत आणायचे काम, या ऐतिहासिक मुलाखतीतून केले आहे. एका बाजूला एका जुन्या आरोपाचे खंडन करीत बसण्याची पाळी त्यांनी स्वपक्षीयांवर आणली; तर दुसरीकडे दिल्लीत केजरीवालना पाठींबा दिलेल्या आपल्याच पक्षाला गोत्यात ढकलले आहे. कारण आता केजरीवालांचा पाठींबा काढल्यास त्याला दंगल चौकशीचे कारण ठरू शकेल. थोडक्यात राहुलनी मुलाखत देऊन नसती उठाठेव केली, यापेक्षा वेगळे काहीच झाले नाही.
सर्वे: कुछ ठीक नहीं है राहुल के 'घर' की हालत
ReplyDelete