Thursday, January 9, 2014

तुमच्यापेक्षा पवार बरे



  ‘आपल्याला मारून काश्मिरचा प्रश्न सुटणार असेल तर जागा आणि वेळ सांगा; आपण तिथे मार खायला हजर होऊ’ असे विधान दिल्लीचे ‘आप’ले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. ती त्यांची भाषा मागल्या दोनचार वर्षातील वाटचालीशी अगदी सुसंगत अशीच आहे. आपण गांधींचे वारस वा अनुयायी आहोत, हे दाखवण्याची एकही संधी केजरीवाल किंवा त्यांचे सहकारी कधी सोडत नाहीत. त्यासाठी सरकारी बंगला व गाडी नाकारण्यापासून व्यक्तीगत सुरक्षाही परत पाठवण्यापर्यंत त्यांनी अनेक कृती प्रत्यक्षात करून दाखवल्या आहेत, म्हणूनच त्यांचे ताजे वक्तव्य त्यांच्या आजवरच्या वाटचालीशी सुसंगतच म्हणावे लागेल. पण जेव्हा आपण अशा कृती सुसंगत म्हणतो, तेव्हा जितक्या कृती आपल्यासमोर आल्या किंवा माध्यमातून आणल्या गेल्या; तेवढ्यापुरतेच आपण मर्यादित असतो. याखेरीज अनेक कृती अशा असतात, की ज्या सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून त्याचा या सुसंगतीमधली विसंगती म्हणून विचार होऊ शकत नसतो. मग आजचे विधान मोठे उदात्त व गांधीवादी वाटून जाते. कारण दोन वर्षापुर्वी अशाच एका घटनेनंतर केजरीवाल यांचे मौन आपल्याला आठवत नसते. तेव्हा दिल्लीतच एका शीख तरूणाने अण्णा हजारे व केजरीवाल यांचा समर्थक म्हणून एका समारंभात घुसून केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांना चपराक हाणली होती. कशासाठी त्याने हा पराक्रम केला होता? त्याला लोकपाल हवा होता. वाहिन्यांवर हे प्रकरण खुप गाजले होते आणि संसदेतही त्याचा सर्वपक्षिय निषेधच झाला होता. पण तेव्हा केजरीवाल यांना दोन शब्द बोलावेसे तरी वाटले होते काय? की त्यांचा कुणी समर्थक हिंसक असभ्य वागतो तेव्हा मौन धारण करणे आणि त्यांच्यावरच हल्ला झाल्यावर बोलणे, म्हणजे गांधीवाद असतो?

   आम आदमी पक्षाचे एक प्रमुख बुद्धीमान नेते व प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी काश्मिर प्रश्नासंबंधी वादग्रस्त विधान केलेले आहे. मुळात त्यांनी असे विधान केलेच नसते, तर एकूण वाद उपस्थितच झाला नसता. मग कोणी त्याची प्रतिक्रिया म्हणून त्या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला नसता. त्यामुळे हल्ला करणारे कुठल्या धर्माचे आहेत वा त्यांचा धर्म कुठली शिकवण देतो; असल्या पळवाटांना अर्थ नसतो. हिंदु धर्म रक्षा नामक कुठल्या संघटनेने तिथे हल्ला केलेला आहे. तर त्याला धार्मिक रंग चढवण्य़ाची गरज नव्हती. कारण विषय धार्मिक नसून राजकीय आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी भूषण यांच्या विधानाचा निषेधच केला आहे. त्यावर आक्षेप घेतला आहे. अर्थात केजरीवाल यांनीही भूषण यांच्या विधानाचे समर्थन केलेले नाही. पण ज्याप्रकारचा अहिंसक मुखवटा चढवून त्यांनी काश्मिर प्रश्नाबद्दल भूमिका घेतली आहे; ती तितकीच हास्यास्पद आहे. केजरीवाल यांना मारायला कोणी तिथे आलेले नव्हते आणि निवडणूक लढवताना केजरीवाल म्हणायचे त्याप्रमाणे प्रत्येक भाजपा कॉग्रेस नेत्यांना तुरूंगात पाठवण्याचा त्यांचाही मनसुबा नव्हता, हे सर्वच जाणतात. मग त्यावेळी केजरीवाल जी तुरूंगाची भाषा बोलत होते, त्यावर अन्य पक्षांनी काय म्हणायला हवे होते? ‘दिल्लीकरांना भरपूर पाणीपुरवठा होणार असेल आणि अर्ध्या किंमतीत वीजपुरवठा होणार असेल; तर आम्हाला तुरूंगात डांबा’ असे आज शीला दिक्षीत वा भाजपाच्या कुणा नेत्याने म्हटले, तर त्याला केजरीवाल यांच्यापाशी उत्तर आहे काय? कुणाला मारहाण करून वा तुरूंगात पाठवून समस्या सुटत नसतात, हे सगळेच जाणतात. त्यामुळे असली भाषा वापरण्यातून केजरीवाल निव्वळ ढोंगीपणा करीत आहेत. कारण हल्ला करणार्‍यांचा हेतू त्यांना मारण्याचा नव्हता, हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे.

   निवडणूका संपुन निकाल लागले व सत्ताही आम आदमी पक्षाने हाती घेतली आहे. तेव्हा लोकसभेच्या निवडणूक प्रचाराला लागण्यापेक्षा त्यांनी दिल्लीकरांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे. कश्मिर वा राष्ट्रीय विषयात आतापासून लुडबुडण्याची गरज नाही. निदान कामपेक्षा नुसत्याच समस्या गुंतागुंतीच्या होतील, असे प्रसंग टाळायला हवेत. ते टाळता येत नसतील तर नम्रपणे लोकांची माफ़ी मागण्यापर्यंत जावे. मानभावीपणाची गरज नाही. ज्यांना आज केजरीवाल असे कुठेही मार खायला यायचे आव्हान देत आहेत, त्यांच्यापेक्षा शरद पवार यांच्यावर हल्ला करणारा तसूभर वेगळा नव्हता. त्यावेळी अण्णा हजारे काय म्हणाले होते? ‘थप्पड मारा? एकही मारा?’ तेव्हा अण्णांच्या विधानावर केजरीवाल गप्प कशाला बसले होते? शरद पवारांना मारहाण करून जनलोकपाल मिळणार होता, असे केजरीवाल यांना तेव्हा वाटले होते काय? नसेल तर जितेंद्र आव्हाड व अन्य राष्ट्रवादी नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून केजरीवाल, अण्णांचा निषेध करायला मैदानात कशाला आलेले नव्हते? धुर्त मानले जाणारे मुरब्बी राजकारणी पवारही केजरीवाल यांच्यापेक्षा कमी मानभावी म्हणायला हवेत. कारण त्यांनी हल्ला करणार्‍याच्या विरोधात कुठली तक्रार केली नाही, की त्यांना नसलेली सुरक्षाही कधी वाढवण्य़ाची मागणी केली नाही. मग तेव्हा पवारांनी काय म्हणायला हवे होते? मला मारून लोकपाल व्हायचा असेल व भ्रष्टाचार थांबणार असेल, तर सांगाल तिथे थपडा खायला येतो. असे म्हणून चालले असते काय? मग केजरीवाल यांनी आपली लोकपालाची लढाई सोडून दिली असती काय? नसेल तर हा सगळा मानभावीपणा कशाला? त्यापेक्षा आपले सहकारी प्रशांत भूषण यांनी मुर्खपणा केला, याची स्पष्ट कबुली देण्यात अधिक पारदर्शकता दिसली असती.

1 comment:

  1. तुमच्यापेक्षा पवार बरे

    ReplyDelete