Wednesday, January 8, 2014

प्रियंकाचा रायबरेलीतून?


   मंगळवारी अचानक राहुल गांधी यांच्या घरी त्यांच्या भगिनी प्रियंका पोहोचल्या आणि माध्यमांना ब्रेकिंग न्युज मिळाली. वास्तविक बहिणीने आपल्या भावाला भेटायला जाण्यात विशेष बातमी कशाला असेल? पण माध्यमांना चोविस तास खळबळ माजवायची असते म्हटल्यावर, नुसती झुळूक आली तरी त्याचे वादळ केल्याशिवाय कसे भागणार? त्यामुळे मग प्रियंका भावाला भेटायला गेल्या तरी बातमी झाली. मग त्या तिथे कशाला गेल्या, तेव्हाच तिथे अन्य वरीष्ठ कॉग्रेस नेते कशाला होते? त्यांच्याच काय खलबते शिजली, यावर फ़ुगे फ़ुगवण्याची सोय झाली. अर्थात नेहमीप्रमाणे कॉग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी सर्वच अफ़वांचा इन्कार केला. पण त्यातही फ़ारसे तथ्य असेल असे मानायचे कारण नाही. कारण कुठलाही राजकीय पक्ष आपले डावपेच वा रणनिती कधी माध्यमांना अगोदर जाहिरपणे सांगत नसतो. आणि जेव्हा पक्षाकडून काही सांगितले जाते; तेव्हा त्यात काय करायचे त्यापेक्षा त्यातून काय साधायचे, यावर भर असतो. म्हणजेच लोकांसमोर वा माध्यमांकडे काय माहिती गेल्यावर कशा प्रतिक्रिया उमटतील; त्याचा हिशोब करूनच माहिती वा प्रतिक्रिया दिल्या जात असतात. सहाजिकच प्रियंकानी भावाला भेटण्यात राजकारण नसल्याचा खुलासा तितकासा खरा नाही. त्यामागे राजकारण असणारच. अन्यथा कॉग्रेसच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रियंका राहुलच्या घरी गेल्याच नसत्या. त्यामागे अर्थातच उत्तरप्रदेशच्या दोन महत्वाच्या मतदारसंघाचे कारण असावे. अमेठी व रायबरेली ह्या दोन मतदारसंघातून राहुल व सोनिया निवडून येतात आणि त्यांचे कामकाज व्यवहारात प्रियंका बघत असतात. म्हणूनच या भाऊबहिणीच्या भेटीला महत्व आहे. त्याच संदर्भात ही भेटगाठ झालेली असावी.

   यापैकी अमेठीमधून आम आदमी पक्षाने आधीच कुमार विश्वास या आपल्या तरूण नेत्याला लढतीमध्ये उतरवण्याचा चंग बांधला आहे. खेरीज विश्वास यांनी अमेठीचा दौराही केलेला आहे. दुसरीकडे अमेठी या संस्थानाचे माजी राजे व आजचे कॉग्रेस खासदार संजय सिंग हे भाजपाचे राहुल विरोधातले उमेदवार असतील अशी बातमी आहे. म्हणजेच अकस्मात एकदम दोन मोठे प्रतिस्पर्धी राहुलना घरच्या आखाड्यात समोर येऊ घातले आहेत. यापैकी विश्वास मोठाच धुरळा उडवणार तर संजय सिंग हे आज कॉग्रेसचे सुलतानपुरचे खासदार आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपा प्रवेश केल्यास त्याचाही खुप गाजावाजा होणार आहे. दुसरीकडे सोनिया गांधींची प्रकृती चांगली नाही. त्या आजारी असतात, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच त्या स्वत: यावेळी रायबरेलीतून कितपत निवडणूक लढवतील, याचीही शंका आहे. त्यामुळेच ती घराण्याचा वारसा सांगणारी जागा वार्‍यावर सोडणे शक्य नाही. त्यापेक्षा तिथून प्रियंकाला उभे करण्याची शक्यता दाट दिसते. त्याचे दोन लाभ संभवतात. एक म्हणजे खुद्द प्रियंका सुद्धा त्या भागात आई व भावाइतक्याच लोकप्रिय आहेत. त्याचा फ़ायदा बाजूबाजूच्या दोन्ही मतदारसंघातील लढाई प्रियंका एकट्याच खुबीने लढवू शकतील. शिवाय आईला निवडणूकीच्या धकाधकीतून मुक्ती देऊ शकतील. खरे तर तशी मागणी उत्तरप्रदेश व अन्य कॉग्रेस कार्यकर्त्यांकडून दिर्घकाळ चालूच आहे. राहुलचा करिष्मा संपल्याने प्रियंका हा नव्या ताज्या दमाचा नेता उत्तरप्रदेशातील कॉग्रेसच्या नेत्यांना उत्साह पुरवू शकतो. त्याचीच चाचपणी करायला ही बैठक झाली असेल काय? एकूण राजकीय परिस्थिती बघता, तशीच शक्यता अधिक दिसते. कारण आपल्या धुर्त राजकारणात गुरफ़टत गेलेल्या कॉग्रेसने ‘आप’ला पाठींबा देऊन अन्य प्रदेशातील संकट मोठे करून घेतले आहे.

   ज्या पक्षाकडून महिनाभरापुर्वी दिल्लीत दारूण पराभव स्विकारला, त्याच आम आदमी पक्षाला पाठींबा देताना त्याला दिल्लीतच गुंतवण्याचा डाव कॉग्रेसने खेळला होता. पण आता त्याने देशव्यापी व्हायचा पवित्रा घेतला आणि त्याला मिळणारा उत्स्फ़ुर्त प्रतिसाद बघता, तेच कॉग्रेसला एक मोठे संकट वाटू लागले आहे. पण त्याचवेळी आपली सत्ता जाताना कट्टर विरोधक असलेल्या भाजपापेक्षा त्याचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी याला रोखायला केजरीवाल हा मोहरा म्हणून उपयुक्त ठरू शकतो; असाही कॉग्रेसचा होरा आहे. त्यासाठी मग प्रियंका ही अजून झाकली मूठ आहे. तिचा ऐनवेळी वापर करण्याची तयारी सुरू झालेली असावी. एका बाजूला प्रियंकाचा नवेपणा आणि दुसरीकडे सोनियांच्या आजारपणाची सहानुभूती मिळवण्याचे डाव असावेत. पण आजच अकस्मात त्या्चे सर्व पत्ते उघडले, तर त्यातले धक्कामुल्य संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यामुळेच मग प्रियंकाच्या तिथे येण्यात कुठले राजकारण नसल्याचा खुलासा पक्षाच्या प्रवक्त्याने करण्यात गैर काहीच नाही. त्याहीपेक्षा अशा भेटीच्या बातम्यांचा जनमानसावर काय परिणाम होतो, त्याचाही अंदाज घ्यायची संधी उपलब्ध झालेली आहे. शीला दिक्षीत यांना त्यांच्याच मतदारसंघातब उभे राहून प्रचंड मतांनी पराभूत केल्याने केजरीवाल व आम आदमी पक्षाला मिळालेल्या मोठ्या यशाने त्याही पक्षाचे मनसुबे वाढलेले आहेत. त्यामुळेच आपल्या महत्वाच्या नेत्यांना अशा हाराकिरी करणार्‍या विरोधकांच्या तावडीतून वाचवणे आणि नवा पत्ता काढून सगळा डाव फ़िरवणे कितपत शक्य आहे; त्याचा सुक्ष्म विचार अशा बैठकीमागे असू शकतो. त्यामुळेच प्रियंका आपल्या भावालाच भेटायला तिथे येऊन गेल्या यात तथ्य नाही. त्यातही राजकारण नक्कीच असावे.

No comments:

Post a Comment