दिल्लीसह चार राज्यात झालेल्या दारूण पराभवानंतर कॉग्रेसमध्ये आत्मपरिक्षणाची गरज आहे, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी जाहिरपणे सांगितले होते. ज्याप्रकारे राहुल सध्या वागत आहेत आणि आपल्या पक्षातील अनुभवी व जाणत्या नेत्यांना तोंडघशी पाडत आहेत; त्यानंतर त्यांनाच कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेता संबोधणे अगत्याचे झाले आहे. तर त्यांनी आत्मपरिक्षण केलेले असावे, पण बाकीचा त्यांचा पक्ष मात्र त्या तयारीत दिसत नाही. कारण महागाई हा शब्द राहुलसह कोणी कॉग्रेसवाला गेल्या वर्षभरात उच्चारतही नव्हता. मात्र निकाल समोर आल्यावर खुद्द राहुलनीच महागाई भोवल्याची कबुली देऊन टाकली. लोकांच्या समस्या समजून घेण्य़ासाठी आम आदमीशी ‘जवळीक’ साधण्याचाही सल्ला त्यांनी आपल्या पक्षाला दिला होता. तो त्यांच्याच नेते व मंत्र्यांनी ऐकला असता, तर इतक्या तडकाफ़डकी गॅस व इंधनाची भयंकर दरवाढ त्यांच्याच सरकारने केली नसती. दिल्लीचे अल्पमताचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाची शपथ घेण्यापुर्वीच ही दरवाढ करण्यात आल्याने दिल्लीचे रिक्षाचालक खवळले. तर दरवाढीचा मुहूर्त शंकास्पद असल्याचे मतप्रदर्शन केजरीवाल यांनीही केले होते. पण त्याची फ़िकीर न करता सरकारने पाठोपाठ घरगुती गॅस सिलींडरच्या किंमतीतही चक्क सव्वा दोनशे रुपयांची भरघोस वाढ एका झटक्यात करून टाकली. या दरवाढीलाच महागाई म्हणतात, हे बहूधा राहुल गांधींना ठाऊक नसावे. की त्यांनीच उद्या नाराजी व्यक्त करावी आणि दरवाढ कमी करायला भाग पाडावी; यासाठी ही दिखावू दरवाढ करण्यात आलेली आहे? हल्ली कॉग्रेस पक्षाचे व त्याने चालविलेल्या सरकारचे निर्णय असेच होत असतात. आधी जाहिर करायचे आणि मग राहुलच्या नाराजीसाठी ते मागे घेतले जातात.
चुका करून सुधारायच्या असे त्या पक्षाचे अवे धोरण राहुलनी ठरवून दिलेले असावे. त्यामुळेच असेल, की पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत बहुतेक कॉग्रेस नेते आधी चुका करतात. मग त्यांना आपण कुठे चुकलो त्याचे आत्मपरिक्षण करता येत असावे. महाराष्ट्रात साधी कुठल्या गावातल्या पाझर तलावाची फ़ाईलही स्वेच्छेने निकालात न काढणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तडकाफ़डकी ‘आदर्श’ अहवालाची वासलात लावून टाकली. त्यांनी स्वत:च्या बुद्धीने असा निर्णय घेतला, यावर कोण विश्वास तरी ठेवील काय? त्यांनी दिल्लीच्या सल्ल्यानुसारच तसा निर्णय घेतला असणार हे उघड आहे. पण आता त्यांनीच त्यावर फ़ेरविचार करून तो अहवाल उघडला आहे. पंतप्रधानांनी असाच गुन्हेगार सदस्यांना संरक्षण देणारा अध्यादेश आत्मपरिक्षण केल्यानंतरच फ़िरवला नव्हता काय? आता महागाई लोकांना कशी भेडसावते, त्याचे आत्मपरिक्षण कॉग्रेसजनांनी करावे, अशी बहुधा राहुल गांधींची इच्छा असावी. त्यासाठीच त्यांनी रिक्षाचालक व गृहिणींना सतावणार्या भयंकर दरवाढीचा निर्णय आपल्या सरकारला घ्यायला भाग पाडलेले असावे. त्यावर वाहिन्या चर्चा करतील, विरोधक रस्त्यावर येतील, मग राहुल गांधी एक पत्रकार परिषदेत आपला पक्ष कसा बेअक्कल लोकांचा आहे आणि असली दरवाढ कचर्याच्या टोपलीत फ़ेकून दिली पाहिजे, असे सांगतील. मगच ही दरवाढ मागे घेतली जाईल. ही नव्या कॉग्रेसची नवी दिशा आहे. राहुलनी त्याचा संपुर्ण आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसारच सर्व काही चालले आहे. अन्यथा एका मोठ्या पराभवानंतर आणि दुसरी मोठी निवडणूक दार ठोठावत असताना, कुठले सरकार इतकी मोठी दरवाढ एकदम करीत असते काय?
ही शक्यता नसेल, तर मग दुसरे एकमेव कारण असू शकते. ते म्हणजे निवडणूकीच्या आखाड्यात उतरण्य़ापुर्वीच कॉग्रेसने आपला पारभव मान्य केलेला असावा. जर पराभव होणार व अटळच असेल, तर मग उगाच लोकांचे लाड तरी कशाला करावे? त्यापेक्षा लोकांची पर्वा न करता आवश्यक तेवढी दरवाढ करून घ्यावी. मग परिणाम काहीही होवोत. असेच एकूण चित्र दिसते. त्याचा पुरावा म्हणजे जयराम रमेश यांनी एका वाहिनीला दिलेली स्पष्ट मुलाखत. ते म्हणाले होते, २०१४ ची निवडणूक राहुलसाठी अखेरची नसेल. त्यात कॉग्रेसचा पराभव झाला, म्हणून राहुल संपणार नाहीत. त्यांना भवितव्य आहे. परंतू नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही एकमेव संधी आहे. येत्या लोकसभा निवडणूकीसाठी मोदींनी आपली प्रतिष्ठा पणास लावली आहे, त्यात ते अपयशी झाले, तर मग त्यांना भवितव्य नाही. राहुलची गोष्टच वेगळी आहे. ते पक्षाची नव्याने उभारणी करीत असून त्यांचे लक्ष्य २०१९ साली कॉग्रेसला संपुर्न बहूमताकडे घेऊन जायचे आहे. आम्ही कॉग्रेसजन त्यामुळेच अस्वस्थ आहोत. कारण आम्हाला २०१४ चे आव्हान सतावते आहे. हे खरे असेल तर राहुलनीच दरवाढीला मान्यता दिलेली असावी. त्यांना येत्या लोकसभा निवडणूका जिंकण्याची इच्छाच नसेल, तर तसे प्रयत्न तरी कशाला? त्यामुळेच दरवाढ व महागाईने लोक संतापले आणि मते गेली, तरी त्यांना पर्वा नसावी. निवडणूका जिंकण्यापेक्षा त्यांना केजरीवाल सरांच्या क्लासमध्ये जाऊन राजकारणाचे धडे गिरवायचे आहेत. त्यासाठी राहुल सध्या आपली औकात ओळखून निवडणूका जिंकण्याचा किंवा सत्ता मिळवण्याचा विचारही करत नसावेत. उलट आम आदमी व्हावे आणि भल्याभल्या सिंहासनांना डोलवावे, अशी त्यांची मनिषा असावी. की म्हणूनच कुठलेही सत्तापद न घेता ते पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करायला लावून केजरीवाल यांच्या भाषेतली सिंहासने डोलवून दाखवत असतात?
भाऊ, तुमचं म्हणणं पटलं. केजरीवाल लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत अशी ताजी बातमी आहे. त्यावरून काँग्रेसला २०१४ ची चिंता असावी असं दिसतंय. तर मग लुटुपुटूची दरवाढ मागे घेतली जाण्याची वाट पाहूया.
ReplyDeleteआपला नम्र,
-गामा पैलवान
Tumhi nishchint raha. Kejriwal nivadnuk ladhavtil ani Congresschi alpasankhya mata kaptil.
Delete