Monday, January 13, 2014

मागचा अतिशहाणा



   यापेक्षा काहीही वेगळे होण्याची शक्यता नव्हतीच. अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या समस्या थेट सोडवण्यासाठी नित्यनेमाने मंत्रालयाच्या फ़ुटपाथवर जो जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतला होता, तो निकालात काढला आहे. पहिल्याच शनिवारी भरवलेल्या दरबाराचा पुरता बोजवारा उडाल्यावर दुसरा कोणता मार्ग होता? स्वत: मुख्यमंत्री असलेल्या आम आदमीलाच त्यातून जीव मुठीत धरून पळ काढायची वेळ आल्यावर त्याने तरी काय करायचे? अर्थात त्यासाठी केजरीवाल यांची थट्टा करण्याचे कारण नाही. जेव्हा घरातले मुल प्रथमच शाळेत जाते आणि काही शिकू लागते; तेव्हा त्याला आपणच ज्ञान संपादन केले आणि घरातले तमाम लोक मुर्ख असल्याचे वाटणे स्वाभाविक आहे. मग असे मुल त्याच्या नव्या ज्ञानानुसार प्रश्न विचारून घरातल्यांपुढे आपले शहाणपण सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयास करू लागते. पण आधी आपलेही पालक त्यातूनच गेलेत, याचे त्याला भान नसते. तसेच काहीसे घडले आहे. आजवर शेकडो मुख्यमंत्र्यांनी असे दरबार भरवले आहेत. मात्र त्याचा दिल्लीप्रमाणे कधी विचका उडालेला नव्हता. आणि आपण काही जगावेगळे करीत असल्याचा आव केजरीवाल यांनी आणला नसता व इतरांच्या अनुभवातून आयोजन केले असते; तर त्यांचाही नवा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरू शकला असता. पण आधीचे सर्वच मुर्ख होते, अशी धारणा असली मग दुसरे काय व्हायचे? पुढल्यास ठेच मागचा शहाणा असे म्हणतात. पण मागचा अतिशहाणा असला, मग तो जुन्या अनुभवातून शिकत नाही. तर पुढच्याला मुर्ख समजून खड्ड्यात उडी घेत असतो. केजरीवाल यांची तीच चुक झाली आहे. त्यातून धडा शिकून त्यांनी प्रयोग गुंडाळल्याबद्दल म्हणूनच त्यांचे स्वागतच करायला हवे.

   गेल्या दोनतीन वर्षापासून केजरीवाल हे व्हर्चुअल म्हणजे इंटरनेट, मोबाईलच्या आभासी जगात जगत आहेत. त्या आभासी जगाला वास्तवात आणायचा प्रयत्न करताना त्यांची अवस्था काहीशी द्विधा झाली आहे. वास्तव आणि आभास यातली सीमारेषा ओळखून तोल संभाळायचा असतो, त्याचे भान त्यांना राखता आलेले नाही. एसएमएस, ईमेल वा मिस-कॉल अशा मार्गाने पक्षाचे सदस्यत्व देणे किंवा लोकमातचा कौल मिळवणे जितके सोपे असते; तितके प्रत्यक्षातली लोकसंख्या आवाक्यातली गोष्ट नसते. म्हणूनच येणार्‍या लोकांची संख्या व त्यांना हाताळणार्‍या कार्यकर्ते अधिकार्‍यांची संख्या, याचे नेमके नियोजन करावे लागते. ते माणसांनीच करावे लागते. इंटरनेटच्या आभासी जगात ही जबाबदारी संगणक पार पाडत असतो. कुठल्याही माणसाने अजून तरी संगणक व्हायची मजल मारलेली नाही. त्यामुळेच दिल्ली दरबाराची फ़सगत झाली. पण एका गोष्टीचे नवल वाटते, की व्यवस्थापकीय व संगणकीय क्षेत्रातले जाणते लोक केजरीवाल यांच्या घोळक्यात असताना इतका बोजवारा कशाला उडावा? याचे एकमेव कारण त्या दोन्ही क्षेत्रात भावनांना स्थान नसते. आणि मानवी संबंध भावनांशीच निगडीत असतात. हा जितका सामान्य माणसांच्या गफ़लतीचा परिणाम होता, तितकाच ‘आप’च्या नेतृत्वाच्या अननुभवाचाही परिणाम होता. आजवरच्या नेत्यांनी केला तो सगळाच मुर्खपणा किंवा भ्रष्टाचार, अशा ठाम मतातून अशा चुका अपरिहार्य आहेत. नेते पोलिसांच्या गराड्यात असतात किंवा पोलिस अन्य अधिकारी नेत्यांना जनतेपासून रोखून धरतात, या समजूतीने मूळ आयोजनातच गफ़लत करून ठेवली होती. त्यामुळेच पुढला विचका झाला. लोकांना जशी समस्या सुटायची घाई आहे; त्यापेक्षा मुख्यमंत्र्याला लोकांच्या समस्या निकालात काढायची घाई अधिक झाल्याचा तो परिणाम आहे.

   आपल्या देशातल्या प्रशासनाला कितीही नावे ठेवली व त्यावर भ्रष्टाचारी व्यवस्था म्हणून ठपका ठेवला, तरी त्यापासून आपल्याला मुक्ती मिळवता येत नाही. कारण कायद्याचे राज्य हवे असेल, तर व्यवस्थेतूनच जावे लागेल. त्या व्यवस्थेतल्या त्रुटी वा कालबाह्य अडथळे दूर करून ते साध्य करता येईल. पण त्याला थोडा अवधी द्यावा लागणार आहे. आपल्यापाशी जादूची छडी आहे आणि ती फ़िरवल्यास झटपट सर्वांना न्याय देता येईल; अशी अपेक्षा करून चालणार नाही. एक एन्टरचे बटन दाबले, की लाखो लोकांना ईमेल वा मोबाईल संदेश जाऊ शकतो, तसा व्यवहारी जगातला कारभार नसतो. त्यासाठी विविधांगी यंत्रणा आधीपासून सज्ज कराव्या लागतात. कल्पनेच्या जगात उड्डाणे करून भागत नाही. वास्तवाचे भान ठेवावे लागते. जसजसे दिवस जातील तसतसे हे धडे प्रात्यक्षिकातून केजरीवालही शिकणार आहेत. त्यासाठी त्यांनी वा त्यांच्या पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांनी हिरमुसले होण्याचीही गरज नाही. सेना-भाजपा युतीची सत्ता येण्याआधी बाळासाहेबांनी जनतेला आश्वासन दिले होते. यापुढे मंत्रालयावर मोर्चा आल्यास युतीचे मंत्री खाली येऊन निदर्शकांना भेटतील. त्यांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागणार नाही. पहिले काही महिने त्याचे पालन झाले आणि वर्षभरात कोणाला त्याचे स्मरणही राहिले नाही. पुढल्या काळात आधीच्या सत्ताधार्‍यांप्रमाणेच मोर्चे अडवले गेले व त्यांच्यावरही लाठ्या पडल्याच. असो, सांगायचा मुद्दा इतकाच, की नव्याची नवलाई असते. म्हणून जगामध्ये सर्वकाही नवेकोरे असतेच असे नाही. जुन्यामध्ये थोडाफ़ार फ़रक होत असतो, बाकीचे बहुतांश गुणधर्म जुनेच असतात. पण वरातीत नाचणार्‍यांसाठी जुन्या घोड्यावर स्वार झालेला नवरामुलगा नविन असतो. घोडा जुनाच आहे म्हटले, तर बिचार्‍या वरातीत मिरवणार्‍यांचे कसे व्हायचे?

No comments:

Post a Comment