Wednesday, January 8, 2014

निळ्या आभाळातला निळा कोल्हा

 १९५०-६०च्या दशकामध्ये मराठीच्या शालेय पाठ्यपुस्तकात असलेल्या एका गोष्टीचे स्मरण होते. त्या पुस्तकात धडा म्हणून असलेली ही गोष्ट खुप मजेशीर होती. जंगलातला एक कोल्हा गावात येतो आणि शिकारीच्या शोधात असताना धोब्याच्या अंगणात पोहोचतो. तिथे कपडे रंगवण्यासाठी विविध पिंपात रंग साठवलेले असतात. त्यात हा कोल्हा पडतो आणि त्याचे अवघे अंग निळेशार होऊन जाते. कसाबसा जीव वाचवून कोल्हा पिंपातून आपली सुटका करून घेतो. पण आता पुन्हा जंगलात आल्यावर मोठी समस्या उभी रहाते, त्याचा नैसर्गिक रंग जाऊन तो पुरता निळा झालेला असतो. त्याबद्दल आपल्या जंगलवासी रहिवाश्यांना काय सांगायचे? तर धुर्त कोल्हा काल्पनिक गोष्ट गुंफ़ून रंगवून सांगतो. निळ्या आभाळातल्या देवानेच त्याचा नैसर्गिक रंग बदलून त्याला निळा बनवले आहे आणि जंगलचा राजा म्हणून नेमणूक केली आहे. त्या चमत्काराने थक्क झालेले जंगलवासी अवाक होतात आणि त्याला राजा म्हणून मान्यता देऊन टाकतात. त्याच्या सेवेत रुजू होतात. अगदी वाघ सिंह असे शिकारी प्राणीही निमूट या नव्या राजाची सत्ता मान्य करतात. कोल्हाही मनातल्या मनात झालेल्या चुकीबद्दल खुश असतो. त्याला खाण्यापिण्य़ाची ददात नसते. असेच दिवस जातात आणि एका पौर्णिमेच्या रात्री जंगलात सगळेच कोल्हे आपल्या सवयीनुसार कोल्हेकुई सुरू करतात. तेव्हा या निळ्या कोल्ह्याला आपले ढोंग लक्षात रहात नाही आणि तोही इतरांच्या सुरात सुर मिसळून ओरडू लागतो. तेव्हा आसपासचे पशूप्राणी चकीत होतात. हा कोणी देवाने धाडलेला राजा नसल्याचे सर्वांच्या लक्षात येते आणि सगळेच प्रक्षुब्ध होऊन त्याच्या अंगावर धावून जातात. अशा त्या धड्याचे शिर्षक होते, ‘निळ्या आभाळातला निळा कोल्हा’.

   इतक्या वर्षापुर्वीची ती गोष्ट वा धडा, साठी सत्तरीतल्या पिढीला नक्की आठवू शकेल. कारण सरकारी पाठ्य़पुस्तकांचा जमाना सुरू होण्यापुर्वीच्या शालेय जीवनातला तो धडा आहे. आज त्याचे स्मरण होण्याचे कारण काय? सध्या दिल्लीत नवा राजा आणि नवा राजकीय पक्ष आलेला आहे. त्या पक्षाची आणि त्या राजाची भाषा सुद्धा त्या गोष्टीतल्या राजापेक्षा वेगळी दिसत नाही. अवघ्या काही महिन्यांपुर्वी आपणच एकमेव इमानदार पक्ष आहोत किंवा आमच्याखेरीज या देशात कोणी प्रामाणिक राजकारणी वा कार्यकर्ता नाही; असे दावे आम आदमी पक्ष करीत होता. इतकेच नाही, तर प्रत्येक बाबतीत अन्य पक्षांना वा त्यांच्या नेत्यांना कुठल्याही समस्या प्रश्नांसाठी आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करत होता. पण जेव्हा त्यांच्याच हातात दिल्लीच्या सामान्य माणसाने सत्ता सोपवली, तेव्हा न सुटलेल्या समस्या व भ्रष्टाचाराचे जबाब द्यायची वेळ आल्यावर केजरीवाल काय बोलत आहेत? त्यांच्याच वक्तव्ये आणि विधानांबाबत सवाल विचारल्यावर आता येणारी उत्तरे जुन्याच राजकीय नेत्यांसारखी नाहीत काय? दोन वर्षापुर्वी शीला दिक्षीत यांच्यावर लिखीत साडेतीनशे पानांचे आरोपपत्र एका जाहीरसभेत ठेवणारे केजरीवाल, आता त्याच शीला दिक्षीत यांच्यावर खटला भरण्यासाठी भाजपाच्या ने्त्यांकडे पुरावे मागत आहेत. मग तेव्हा यांनी लिहिलेले आरोपपत्र व त्यातले पुरावे ह्या शुद्ध थापा होत्या काय? राष्ट्रकुल घोटाळ्यासाठी तात्काळ खटले दाखल करण्याचा आग्रह धरणारे केजरीवाल आता मात्र थोडा वेळ व सवड मिळायची भाषा बोलत आहेत. मग यांच्यात आणि त्यांनीच बेईमान ठरवलेल्या अन्य पक्ष व नेत्यांमध्ये कितीसा फ़रक राहिला. त्या पक्षांनी केली तर कोल्हेकुई मग यांनी चालविलेली दुटप्पी भाषा डरकाळी आहे काय?

   तीनचार वर्षापुर्वी जनलोकपाल कायद्यासाठी आंदोलनात उतरलेल्या या लोकांनी आता समाज सुधारणा वा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन सोडून राजकारण सुरू केले आहे. म्हणूनच दिल्लीत थोडे यश मिळवल्यानंतर थेट देशाची सत्ता मिळवण्याचा मनसुबा जाहिर केला आहे. अर्थात से मनसुबे त्यांचे नाहीत, सामान्य जनतेनेच अशी निवडणूक लढवायचे ठरवले आहे. त्याचा केजरीवाल यांच्याशी संबंधच काय? त्यांची औकात तरी काय? सर्वकाही जनताच ठरवत असते आणि केजरीवाल व त्यांचे सहकारी जनतेची कठपुतळी म्हणून तसे वागत असतात. जनतेने त्यांना चार महिन्यापुर्वी फ़क्त दिल्लीतच निवडणूका लढायला फ़र्मावले होते. खबरदार मध्यप्रदेश, छत्तीसगड वा राजस्थानकडे वळून बघितले तर; असे जनतेने धमकावले होते. अन्यथा त्या तीन राज्यांपासून केजरीवाल व त्यांचा पक्ष दूर कशाला राहिला असता? त्यांनी तिकडेही निवडणूका नक्कीच लढवल्या असत्या आणि देशाची सत्ता जिंकायला निघालेल्या नरेंद्र मोदींना एव्हाना गुजरातला पिटाळूनही लावले असते. पण जनतेला ते मंजूर नव्हते आणि आता जनतेला केजरीवाल कंपनीने देशव्यापी लोकसभा निवडणूक लढवावी असे वाटते. त्याचा पुरावा विचारायचा नसतो. जनतेच्या मनात काय आहे, त्याचा केजरीवाल यांना साक्षात्कार घडत असतो. त्याचे पुरावे नसतात, म्हणूनच ते मागणेही पाप असते. निळ्या कोल्ह्याकडे कोणी निळ्या आभाळातल्या देवाच्या असण्याचा पुरावा मागितला होता काय? तसाच केजरीवाल यांचा आम आदमी आहे. तो कुणाला दिसत नाही, की केजरीवालांना कधी साक्षात्कार देतो, त्याचा आपल्याला मागमूसही लागत नाही. आपण केजरीवाल म्हणतील, ती गोष्ट सत्य म्हणून मान्य करायची असते. तरच आपण इमानदार असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला मिळू शकते.

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो कि मी आपला निस्सीम चाहता आहे. मला वाटत आपण लिहिलेलं वचून वचून, माझे विचार आपल्या विचारांशी एकरूप झालेले आहेत. कारण केजरीवाल बाबत आपल्याला जे वाटल अगदी तसच काही दिवसा पूर्वी मला वाटल होत. आणि म्हणून मी ही निळ्या कोल्ह्याची गोष्ट कोंकणी भाषेतून गोव्याच्या एका facebook group वर post केली होती. तुमच्या वचना साठी या postचा लिंक खाली देत आहे. केजरीवाल बद्दल मी २४ डिसेंबर २०१३ रोजी कोंकणी मध्ये पुढील प्रमाणे लिहिले होते. "तो बाकीच्या परस वेगळो म्हणुन जर तेका CM करपाक सोद्तात जाल्यार ल्हानपणी आयकल्ली नीळ्या कोल्याची काणी आमी विसरले शे दिस्ता. कोलो एकदा कपड्यांक घालता त्या नीळीत बुडून नीळोच जालो आनी जंगलात येवन म्हणपाक लागलो हाव सगळ्या परस वेगळो म्हाका जंगलाचो राजा करात. सगळ्या प्राण्यानी सभा घेतली अनी ह्या नव्या नीळ्या प्राण्याक राजा करपाचे ठरयले. अशा तर्हेन कोलो नीळो रंग पांघरून राजा जालो. थोड्या दिसानी पावस आयलो. कोल्याचो नीळो रंग व्हावुन गेलो आनी सगळ्या ज़ाणाक समजले की ह्या कोल्यान सगल्याक कशे फ़सयले ते."
    https://www.facebook.com/groups/goaplus/permalink/265405806942781/

    ReplyDelete
  3. जाऊ दे भाऊ हे सगळे पाप आदमी आहेत.

    ReplyDelete