Wednesday, August 12, 2015

मोदी राजकारणाची ‘मुलायम’ पावले



आपल्या परिवाराच्या बॅंक खात्यामध्ये ललित मोदींकडून किती पैसे आले, हे सुषमा स्वराज यांनी सांगितले तर संसद सुरळीत चालेल, असे वक्तव्य करून राहुल यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले. सहाजिकच पुन्हा एकदा शेवटच्या आठवड्यात संसदीय कामकाजाचे वातावरण गढूळ होऊन गेले. मात्र इतके होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयांवर मौन धारण करून होते, ह्या आरोपाचे निरसन झाले. कारण संसदेच्या बाहेर राहुल गांधी यांनी केलेल्या अशा विधानाची दखल घेत मोदी यांनी संसदेत आपले मौन सोडले आणि आपल्या पाठीराख्यांना कॉग्रेसवर जोरदार हल्ला करण्याचे जणू आदेशच दिले. मोदींनी सरसकट विरोधकांना किंवा अगदी कॉग्रेस पक्षालाही जबाबदार न धरता फ़क्त सोनिया व राहुल यांनाच आपल्या टिकेचे लक्ष्य बनवले. सहाजिकच त्यातून संकेत घेऊन अरूण जेटली व अन्य भाजपा नेत्यांनी संसद ठप्प होण्याचे खापर फ़ोडत गांधी घराण्याच्या दोन व्यक्ती देशाला ओलिस ठेवत असल्याचा आक्षेप घ्यायला सुरूवात केली. यातला फ़रक लक्षात घेण्यासारखा आहे. पावसाळी अधिवेशन नव्हेतर त्याच्याही आधीपासून उठलेले ललित मोदी व व्यापम घोटाळ्याचे प्रकरण विरोधकांची एकजुट व्हायला लाभदायक ठरले होते. पुढे संसदेत त्याच विषयावर कॉग्रेसच्या नेतृत्वाखाली जवळपास सर्व विरोधक एकवटले होते. परिणामी विरोधी राजकारणाची सुत्रे कॉग्रेसच्या व पर्यायाने सोनियांच्या हाती गेली होती. म्हणूनच सत्ताधारी भाजपाची चांगलीच कोंडी झाली होती. एकही दिवस काम होऊ शकले नव्हते आणि सर्वच विरोधकांना झिडकारून संसद नुसत्या बहुमताच्या बळावर चालवणे शक्य नव्हते. पण क्रमाक्रमाने सोनिया बाजूला पडून विरोधकांचा प्रवक्ता राहुल गांधी होत गेले आणि त्यातून निर्माण होत असलेली अस्वस्थता मोदींच्या पथ्यावर पडली. २५ खासदारांचे निलंबन त्या पार्श्वभूमीवर बघितले पाहिजे.

तीन आठवडे कामाचा बट्ट्याबोळ झाल्यानंतर विविध पक्षात एकप्रकारची अस्वस्थता येऊ लागली होती. कारण दोनपाच वा दहा बारा खासदार असलेल्या त्याच पक्षांचे राजकारण आपापल्या प्रांतापुरते मर्यादित आहे. तिथल्या जनतेच्या समस्या सोडवताना केंद्रातील सत्ताधार्‍यांची मदत आवश्यक असते. तिथे व्यत्यय आला, मग केंद्राच्या अनेक योजनांवर विसंबून असलेल्या राज्यांची तारांबळ उडून जाते. तिथल्या सत्ताधारी पक्षाला स्थानिक जनतेच्या भडीमाराला उत्तर द्यायचे असते. म्हणूनच संसदेमध्ये  विरोधातला पक्ष असला, तरी त्याला अनेक बाबतीत केंद्रातील सत्ताधार्‍याची मर्जी संभाळावी लागत असते. मोदींनी त्याचाच लाभ उठवला. म्हणून तर नागा बंडखोरांशी तडजोड घडवून आणण्याविषयी सोनिया गांधी केंद्राला दोष देत असताना कॉग्रेसचेच नागालॅन्डचे मुख्यमंत्री मोदींचे स्वागत करीत होते. मग त्यांना दम देऊन सोनियांना गप्प बसवावे लागले. अन्य पक्षाच्या प्रादेशिक नेत्यांचे दुखणे यातून लक्षात येते. त्याचा लाभ २५ खासदारांच्या निलंबनातून उठवला गेला. फ़क्त कॉग्रेसच्याच २५ खासदारांना निलंबित करण्यात आले. तर अन्य पक्षांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली. पण बचावाचा मुद्दा नसल्याने अशा पक्षांना कॉग्रेसपासून दुरावा घेणे भाग पडले. म्हणूनच त्यातला खमक्या नेता मुलायम सिंग प्रथम अलिप्त झाले आणि त्यांनी कॉग्रेसला यापुढे साथ देणे अशक्य असल्याचे स्पष्टच सांगून टाकले. किती दबाव आणला गेला तरी ते निलंबन रद्द झाले नाही आणि विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लावला गेला. सभापतींनी बोलावलेल्य बैठकीवर कॉग्रेसने बहिष्कार टाकला होता आणि इतर पक्ष बैठकीला हजर झाले. तेव्हा कॉग्रेसलाही हजर व्हायची नामुष्की पत्करावी लागली. हा सोनियांनी योजलेल्या रणनितीचा दारूण पराभव होता. मात्र त्याचे खापर मोदींच्या माथी मारता येणार नाही. त्याला राहुल जबाबदार आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे सोनियांनी चांगले डावपेच खेळले होते आणि बहुमत असूनही भाजपाची कोंडी झाली होती. अगदी कॉग्रेसचेच खासदार निलंबित होऊनही विरोधकांनी त्यांचे समर्थन केले होते. पण जणू आपणच विरोधकांच्या वतीने निर्णय घेत असल्याचे भासवत राहुलनी परस्पर भूमिका जाहिर केली आणि विरोधक बिथरले. जोपर्यंत सुषमा इत्यादींचे राजिनामे होत नाहीत, तोपर्यंत संसद चालू देणार नाही असे राहुल गांधी माध्यमांसमोर बोलू लागले आणि विरोधकांचा धीर सुटत गेला. मजेची गोष्ट अशी, की सोनिया संसद भवनातील गांधी पुतळ्यापाशी धरणे धरून घोषणा देत होत्या आणि पाठीशी उभी असलेली एकच व्यक्ती घोषणा देत नसल्याचे आपण बघू शकतो. त्याचे नाव राहुल गांधी असे आहे. त्याचा अर्थ इतकाच, की आपण फ़क्त छू म्हणायचे आणि बाकीच्यांनी कल्लोळ करायचा, अशी काहीशी राहुलची समजूत आहे. म्हणूनच ते नुसत्या धमक्या देण्याची भाषा करतात व बाजुला होतात. घडणार्‍या प्रसंगात आपले काहीही स्थान वा कर्तव्य नाही, अशा समजुतीने राहुल पुर्णपणे अलिप्त असतात. बाकीच्या विरोधी पक्ष व नेत्यांशी त्यांचा जवळपास संपर्कच नाही. किंवा अन्य सहकारी पक्षांना काय वाटते याच्याशीही राहुलना कर्तव्य नाही. हे चित्रच महाग पडलेले आहे. आताही विरोधकांशी सल्लामसलत केल्याशिवाय ‘संसद चालू देणार नाही, अशी घोषणा त्याचाच दाखला आहे. हीच राहुलची कमजोरी हेरून मोदी राजकारण खेळत असावेत. म्हणूनच इतके दिवस संसद रोखली गेली असताना गप्प बसलेले मोदी बोलले, ते मुलायमचे कौतुक सांगायला आणि गांधी मायलेकरांना दोषी ठरवायला. दोन व्यक्ती संसदेला ओलिस ठेवत आहेत हे शब्द वरकरणी गांधी खानदानाच्या द्वेषाचे वाटतील. पण महिनाभर अन्य विरोधकांनी त्याचा अनुभव घेतल्या नंतरच मोदींनी ते शब्द योजले आहेत. त्यांचा हेतू समजून घेतला पाहिजे.

आपला नेहरू-गांधी खानदान विरोध मोदी वा भाजपावाल्यांनी कधीच लपवलेला नाही. म्हणूनच तसा आरोप आता करण्यात नवे काहीच नाही. पण मागल्या वीस वर्षात भाजपा विरोधातले राजकारण म्हणून बहुतांश कॉग्रेस विरोधक सोनियांच्या मागे एकवटत गेले, त्याला प्रथमच भेग पडू लागली आहे. त्याचा कळस याच अधिवेशनात झाला आणि त्याचा शेवटही याच अधिवेशनात सुरू झाला असे म्हणता येईल. कारण संसदीय राजकारणात सोनियांना शह देऊ शकेल असा एकमेव विरोधी नेता असला तर तो मुलायम सिंग आहे आणि त्यालाच कॉग्रेसच्या गोटातून अलिप्त करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. मात्र त्यांचे डावपेच यशस्वी व्हायला राहुल गांधींचा हातभार लागला नसता, तर मुलायमनी अलिप्त भूमिका घेण्यापर्यंत पाळी आली नसती. सोनियांनी राहुलला गप्प ठेवून विविध पक्षाच्या नेत्यांसोबत सातत्याने मसलत केली असती, तर ही पाळी आली नसती आणि सरकारची कोंडी कायम राहिली असती. पण राहुलना सोनिया गप्प करत नाहीत, की कॉग्रेस त्यांच्या बेताल वक्तव्यांना आवरू शकत नाही. मोदींनी अतिशय साळसुदपणे त्याचा राजकीय लाभ उठवला आहे. ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराजना कोंडीत पकडण्याचा डाव कॉग्रेस व राहुल यांच्यावर कसा उलटतो, ते लौकरच दिसून येईल. कारण युपीए कारकिर्दीत ललितला दिलेली मोकळीक आता संपली आहे आणि मोदी सरकारने त्याला भारतात आणायची कारवाई सुरू केली आहे. तो इथे आल्यावर माफ़ीचा साक्षिदार झाला, तर काय काय बोलू शकेल? कसले पुरावे देऊ शकेल? त्याच्या शक्यता भयंकर आहेत. कारण सगळा घोटाळा आयपीएलशी संबंधित असून त्या स्पर्धेच्या उदयाकाळी सोनिया प्रणीत युपीए सरकार सत्तेत होते आणि त्या नाटकाचे मुख्य पात्र ललित मोदी आहे. त्याच स्पर्धेची प्रायोजक कंपनी डीएलएफ़ आहे, ज्या कंपनीने करोडो रुपये रॉबर्ट वाड्राला बिनव्याजी कशासाठी दिले, तोही विषय प्रलंबित आहे. म्हणूनच मुलायमला अलगद बाजूला करण्याची मोदींची खेळी काय रंग आणते बघायचे.

3 comments:

  1. तिकडे पवारांनी तिसर्या आघाडीची पडताळणी चालू केलीये...मला वाटत मोदिनीच कॉंग्रस ला घाबरवायला हि खेळी केली असेल

    ReplyDelete
  2. Arpit,

    Ekdum Barobar aahe te, ti aaghaadi Congresslaa ekaki paadun keleli aahe. Modinsamorchyaa rajkaranat congress tikane katheen aahe.

    ReplyDelete
  3. I think this is the most flawless analysis by " Bhau " again

    ReplyDelete