Friday, August 7, 2015

मानवी बुद्धीच्या मुर्खपणाला कुठली सीमा नसते

‘लोकसत्ता’ अर्थात कुबेर टाईम्स (भाग चौथा)
treason with country

"Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the the universe."  -Albert Einstein

शहाण्यांची एकच चुक असते, ती म्हणजे ते कधीच चुकत नाहीत. सहाजिकच त्यांना चुका सुधारण्याची गरज वाटत नाही. उलट ते लोक शहाणपणा म्हणून अधिकाधिक उत्साहाने नव्या व मोठ्या चुका करीतच जातात. उदाहरणार्थ भिंतीवरची पाल आपण बघतो आणि तो सरपटणारा छोटा प्राणी आपल्याला ठाऊक असतो. पण एखादा शहाणा अकस्मात येऊन तीच लाल हा हत्ती असल्याचा तर्कशुद्ध दावा करू लागतो. अशा वेळी आपण त्याला कुठलेही शास्त्र-विज्ञान वगैरे समजावून उपयोग नसतो. उलट असा इसम त्याच पालीला हत्ती ठरवण्यासाठी तिची सोंड तुम्हाला दाखवू लागतो. त्यावरही तुम्ही अधिक तर्क व युक्तीवाद करू गेलात, तर असा शहाणा चक्क मच्छरालाही सोंड असते म्हणून तोही हत्ती असल्याचे आग्रहाने तुम्हाला पटवण्याचा धोका संभवतो. असे मी यापुर्वी सांगून लिहून झाले आहे. तरी उपयोग कवडीचा झालेला नाही. ‘अन्यथा’ गिरीश कुबेरांनी आज शनिवार ८ ऑगस्टच्या ‘लोकसत्ता’मध्ये ‘मीरमरणाचं मोल..’ अशी कथा कशाला कथन केली असती? अर्थात कुबेरांना ३० जुलैच्या त्या याकुब मरणाच्या यातना अजून जाणवत असल्यानेच त्यांनी इस्रायलच्या सेनाधिकारी मीर तोबिआन्स्की याच्या मृत्यूदंडाचा मातम केला आहे. जणू मीर आणि याकुब सारख्याच गैरसमजाचे बळी आहेत, असे भासवून कुबेरांना आपल्या वाचकांच्या डोळ्यात आणखी धुळफ़ेक करायची आहे. किंवा त्यांना बुद्धीच्या अजीर्णाची बाधा झालेली असावी. याचे पहिले कारण मीर व याकुब यांच्या मृत्यूदंडाच्या कथा संपुर्णपणे भिन्न व विरोधाभासी आहेत. मीरला कुठल्याही सज्जड पुरावा साक्षीखेरीज तडकाफ़डकी मृत्यूमुखी धाडण्यात आलेले होते आणि याकुबला तब्बल २२ वर्षे लहानसहान बारकावे तपासून दोषी ठरवून, मगच फ़ाशी देण्यात आलेली आहे. म्हणूनच त्या दोन मृत्यूदंडाची कुठूनही व कुठल्याही निकषावर तुलना होऊ शकत नाही. गिरीश कथा वाचा....

‘मीरच्या मायदेशाला हा मोठा झटका होता. सगळेच हादरले त्यामुळे. या सगळ्यांची खात्रीही पटली. कोणीतरी फंदफितुरी केल्याशिवाय ही अशी माहिती फुटणं अशक्यच. मग शोध सुरू झाला. कोण असेल तो अस्तनीतला निखारा? सगळ्यांच्या नजरा हळूहळू मीरकडे वळायला लागल्या. मीरच तो. त्यात त्याच्याकडे वॉकीटॉकी सापडला. म्हणजे नक्की तोच. याच वॉकीटॉकीवरनं त्यानं शत्रूशी संधान बांधलं असणार.. खात्री पटली सगळ्यांची. आपला देशबांधव इतका क्षुद्र वागू शकतो? मुळापासून उपटून टाका ही विषवल्ली.. राष्ट्रवादाचा सामूहिक आविष्कार संतप्त सुरांतून व्यक्त होऊ लागला. त्याची धग अगदी लष्करी नेतृत्वापर्यंत पोहोचली. त्यांनाही जाणवलं लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यायला हवा या मीरचा. तो लवकर घ्यायचा तर कोर्टकचेऱ्या वगरे करून चालणार नव्हतं. आणि त्याची गरजही नव्हती. कारण मीर लष्करी अधिकारी होता. कोर्टमार्शल हा सोपा आणि जलद मार्ग होता. तेव्हा हे कोर्टमार्शल ठरलं. त्यात मीर दोषी ठरला. आता तो दोषी ठरलाच आहे तर त्याला आणखी जिवंत ठेवायचं कारणच काय, असा सुज्ञ विचार लष्करी अधिकाऱ्यांनी केला. बरोबरच होतं त्यांचं. तेव्हा असाच योग्य दिशेनं विचार करणारा लष्करी अधिकारी म्हणाला.. याच्या फाशीची तरी कशाला वाट पाहायची.. उगाच वेळ जातो.. त्यापेक्षा इथेच मारून टाकू या त्याला.. मग ते मीरला घेऊन निघाले शहराकडे. जाताना वाटेत एका शाळेची रिकामी इमारत दिसली. तिकडे घेऊन गेले त्याला. मीर आत जात असताना बरोबरच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या घातल्या त्याला.. पाच गोळ्यांत मीर मेला.. 

कशी मस्त कथा आहे ना? कुठे कोर्ट, तपास, चौकशा, साक्षी, अपील, दयेचा अर्ज, पुन्हा अपील आणखी दयेचा अर्ज यापैकी काही आहे काय? मीरला पकडला आणि लोकांचा गदारोळ होता, म्हणून त्याला तडकाफ़डकी मारण्याचा मार्ग पत्करला गेला. त्याला राष्ट्रवा्दी उन्माद नक्कीच म्हणता येईल. पण जे काही मीरच्या बाबतीत इस्रायलमध्ये घडले, त्याचा लवलेश तरी इथे मुंबईत वा भारतात याकुबच्या बाबतीत घडला आहे काय? मुळात वरळी येथे एक बेवारस सोडून दिलेली गाडी आढळली व त्यात स्फ़ोटके होती. तपास करता ती याकुबच्या पत्नीच्या नावाने असल्याचे दिसून आले. त्यानंतरच पोलिस माहिमला मेमन कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. तोपर्यंत कुणाही ‘राष्ट्रवादाने उन्मादित’ झालेल्यांना मेमन हे नावही ठाऊक नव्हते. फ़क्त माहिम पोलिसांना याकुब मेमन नावाचा शांतता समितीचा सदस्य ठाऊक होता आणि गाडीचा शोध घेत माहिमला पोहोचल्यावर लक्षात आले, की तोच कुबेरी शांतीसेनेचा कार्यकर्ता प्रत्यक्षात स्फ़ोटकांच्या गाडीचा मालक होता. त्यानेच सगळी विध्वंसाची व्यवस्था करून पळ काढलेला होता. त्याला आता बाविस वर्षे होऊन गेलीत आणि याकुब पोलिसांना शरण आला, त्याला एकविस वर्षे होऊन गेलीत. तेव्हा याकुब कुटुंबाला दगडांनी ठेचून मारावे, अशीच लोकभावना होती आणि आक्रोश करून लोक तशी मागणी करीत होते. पण एकाही गुन्हेगाराच्या जीवाला (उन्मादित राष्ट्रवाद्यांकडून) धक्का लागू नये म्हणून इथल्या शासन व्यवस्थेने आरोपींना कोर्टातही नेण्या आणण्याचा धोका पत्करला नाही. खटलाच तुरूंगात तात्पुरते कोर्ट उभारून चालवला. तोही तडकाफ़डकी निकालात काढलेला नाही. तब्बल बाविस वर्षे हा तमाशा चालला आणि कायद्याच्या कसोटीवर निर्दोष ठरण्याची प्रत्येक संधी याकुबला देण्यात आली. फ़क्त याकुबलाच नव्हेतर त्याच्या वतीने अश्रू ढाळणार्‍या कुबेर यांच्यासारख्यांनाही त्याला वाचवण्याची संधी देण्यात आली. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मध्यरात्री पुन्हा सुनावणी करण्याचा अपवाद करण्यात आला. मीर तोबिआन्स्की याला यापैकी कुठली संधी मिळाली होती? मीर जसा उन्मादाच्या वावटळीत मारला गेला, तसेच याकुबने मात्र २५७ लोकांना तडकाफ़डकी उन्मादित अवस्थेत ठार मारले. बचावाची कुठलीही संधी दिली नाही. थोडक्यात कुबेर इथे आपल्याच मुर्खपणाची साक्ष द्यायला उतावळेपणाने असल्या गोष्टी सांगायला पुढे आले आहेत. ज्या कारणास्तव कुबेर राष्ट्रवादी भावनेला उन्मादक मनस्थिती ठरवत आहेत, त्याचे मुर्तिमंत स्वरूप याकुब होता. आणि त्याला शिक्षा देण्याची कृती विचारपुर्वक झालेली आहे. 

पण इथे कुबेरांना आता याकुबच्या निरागसतेपेक्षा फ़ाशीतली अमानुषता सांगायची आहे आणि म्हणून इस्रायलने फ़ाशी कशी कायमची नाकारली, त्याचाही दाखला देवून आपलाच बचाव मांडायचा आहे. पण त्यासाठी यापेक्षा वेगळे व निर्दोष उदाहरण शोधायचे कष्टही घ्यायचे नाहीत. म्हणून मिळालेले कुठलेही फ़डतूस उदाहरण सादर करून आपल्याच थोबाडीत मारून घेतली म्हणायला हरकत नाही. कारण इस्रायलने फ़ाशी रद्द केली त्याचे कौतुक कुबेरांना सांगायचे आहे. पण त्यातच इस्रायलने एक अपवाद केला तेही सांगणे त्याना भाग पडले आहे. कुबेर लिहीतात, ‘१९६२ साली अ‍ॅडॉल्फ आएकमन या होलोकॉस्ट गुन्हेगाराला दिलेली फाशी वगळता इस्रायलनं हा निर्णय आजतागायत पाळलाय.’ मुद्दा असा, की तो तरी अपवाद इस्रायलने कशासाठी केला? उन्माद म्हणून की हकनाक मारल्या गेलेल्यांना न्याय म्हणून? आएकमन हा नाझी राजवटीतला सामुहिक हत्याकांडाचा गुन्हेगार होता आणि याकुब कोण आहे? त्याच्याच आदेशानुसार स्फ़ोटकांच्या गाड्या जागोजागी पेरणार्‍यांनाही जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने फ़र्मावली व अंमलात आलेली आहे. पण सुत्रधार असलेला आएकमन व याकुब, एकही थेट हत्या न केलेले असून त्यांना मात्र फ़ाशी देताना अपवाद करावा लागतो. म्हणजेच कुबेर आपल्या बाजूने साक्षीदार म्हणून जे ‘मीरमरणाचं मोल..’ निरूपण करतात, तेच त्यांच्या मूळ उन्मादित अग्रलेखाच्या विरोधात साक्ष देते. योगायोग असा आहे, की आएकमन सारख्यांनी जर्मनीला सामुहिक हत्याकांडाची मसणवट बनवले, तिथून एक महापुरूष जीव मूठीत धरून पळाला त्याचे नाव आहे अलबर्ट आईनस्टाईन! त्यानेच कुबेर व तत्सम लोकांविषयी म्हणून ठेवलेले (उपरोक्त) एक वाक्य मग आठवते. ‘एकवेळ विश्वाच्या पसार्‍याला मर्यादा असेल, पण मानवी मुर्खपणाला कुठली मर्यादा नसते.’

9 comments:

  1. Very well written the truth. Congratulations sir. I always read ur articles. They are really informative. Thanks

    ReplyDelete
  2. कुबेरांच्या मागे हात धुवून लागलेत भाऊ. अर्थात आपल ते कामच आहे, योग्य ते समोर आणणे, त्याबद्दल आपले आभार. शिवसेनेच्या 'ट्याब' बद्दल आपले विचार वाचायला आवडेल. अर्थात आपला जगता पहारा त्यावरही असेलच.

    ReplyDelete
  3. आदरणीय भाऊ..बिन पाण्याची हजामत केली आपण कुबेरांची..आभार मानावेत तेवढे थोडे आहेत आपले..नाठालांची विचारसरणी आणि अर्धवठा पणाचा कळस हाच बाणा आहे कुबेरांचा...आपले लेख वाचून आनंद झाला आणि कुबेर हि धडा घेतील हि अपेक्षा..धन्यवाद भाऊ.

    ReplyDelete
  4. Well done .Expose such person and his rotten mentality.

    ReplyDelete
  5. भाऊ, कुबेरांचा लेख मस्तकात तिडिक आणणाराच होता. तुम्ही अगदी योग्य शब्दांत फटकावले आहे. आणि कुबेर शांतीसेना - हाहाहा... ग्रेटच!!!

    ReplyDelete
  6. 'मीरमरणाचं मोल..' हा आजच्या लोकसत्तातला श्री. गिरिश कुबेर यांचा लेख.

    इस्त्राएलच्या एका लष्करी अधिका-याने दगाफटका केल्याच्या संशयावरून त्याला फाशीची शिक्षा सुनावून ती अमलातही आणली गेली. त्यानंतर तो अधिकारी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे इस्त्राएलने फाशीची शिक्षा रद्द केली, असा या कथेचा आशय आहे. या लेखाची लिंक शेवटी दिली आहे.

    वास्तव म्हणून सदर लेख चांगलाच आहे.

    लेखात लिहिल्याप्रमाणे फाशी देण्यात घाई झाली हे त्याचे मुख्य कारण आहे, त्यासाठी फाशीची शिक्षाच रद्द करणे संयुक्तिक वाटत नाही.

    शिवाय हे विसरायला नको, की ज्या काळात इस्त्राएलने तो निर्णय घेतला त्यापेक्षा आताच्या काळात न्यायव्यवस्थेत कितीतरी अधिक checks and balances अस्तित्वात आहेत. आपल्याकडे तर त्याचा अतिरेक होताना दिसतो. परंतु माणसाच्या मरणाचा संबंध असल्यामुळे शेवटपर्यंत त्याला वाचवण्याचा तो प्रयत्न करणार हे समजण्यासारखे आहे.

    शिवाय आपल्याकडे ही शिक्षा म्हणजे शरियासारखी हात तोडल्याच्या बदल्यात हात अशा पद्धतीने व उठसुट न दिली जाता दुर्मिळ परिस्थितीत सुनावली जाते.

    हाच इस्त्राएल देश सरकारी पातळीवर दुस-या महायुद्धातील गुन्ह्यांच्या बाबतीतीत परदेशात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा खातमा करतो व आजही मोसाद या आपल्या हेरसंघटनेमार्फत देशाच्या हिताविरूद्ध जाणा-यांचे खून घडवून आणतो. आणखी एक उदाहरण म्हणजे म्युनिक ऑलिंपिकदरम्यान इस्त्राएलच्या खेळाडुंच्या हत्याकांडातील गुन्हेगारांना इस्त्राएलने जगाच्या कानाकोप-यात जाऊन टिपून काढले.

    शिवाय इस्त्राएली लोकांविरुद्ध होणा-या हिंसेला तो देश कितीतरी पट व अतर्क्य वाटावी अशी हिंसा करून उत्तर देतो. त्यात तर कित्येक निरपराधांचे व त्यातही लहान मुलांचे बळी जातात.

    तेव्हा मानवी जीवन मौल्यवान आहे व निरपराधांचा बळी जाता कामा नये हे सूत्र मानले तर वरील उदाहरणांवरून इस्त्राएल सरकारचे फाशीबद्दलचे धोरण कसे भंपकपणाचे आहे लक्षात येईल. देशांतर्गत भयंकर गुन्हे आणि दहशतवादासंबंधीचे किंवा देशद्रोहासंबंधीचे भयंकर गुन्हे यांत का फरक केला जावा?

    कुबेरांचा या लेखामागचा हेतु नक्की काय हे कळत नाही. परंतु याकूबसारख्या दहशतवाद्याला फाशी देण्याच्या थोडेच आधी त्यांना अचानक याकूबबद्दल भरून आले होते व त्याच्या जोडीला फाशीची शिक्षाच नको हा सूर त्यांनी लावला होता. आपली मते मांडायचा संपादकाला हक्कच आहे हे मान्य केले तरी त्यावेळी त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. इंडियन एक्सप्रेसच्या त्यादिवशीच्या अग्रलेखातही एकूणच फाशीच्या शिक्षेला विरोध केला होता. कुबेर मात्र त्याच्याहीपुढे गेले होते. आजचा हा लेख म्हणजे काही संपादकीय नव्हे. परंतु आधीच्या संपादकीयात मांडलेल्या मतांना पूरक म्हणून हा लेख असू शकेल.

    कुबेर यांचे इतर मुद्द्यांकडे कसे दुर्लक्ष झाले याचे आश्चर्य वाटते. या पोस्टमध्ये त्यांच्यावर टीका करण्याचा हेतु नाही. परंतु शक्य झाल्यास त्यांनी रद्द केलेली फाशीची शिक्षा व वर मांडलेले मुद्दे यांचाही उहापोह जरूर करावा.

    ReplyDelete
  7. सणसणीत चपराक

    ReplyDelete
  8. एकवेळ विश्वाच्या पसार्‍याला मर्यादा असेल, पण मानवी मुर्खपणाला कुठली मर्यादा नसते.’

    ReplyDelete
  9. ‘एकवेळ विश्वाच्या पसार्‍याला मर्यादा असेल, पण कुबेर महाशयांच्या मुर्खपणाला कुठलीच मर्यादा नाही आहे.’ 👹😂😠

    ReplyDelete