Thursday, August 13, 2015

वाड्राची चिंता करा असे, ललित का म्हणतो?



एका बिघडलेल्या शहाजाद्याची गोष्ट म्हणून एक मजेशीर कथा अनेकदा ऐकायला मिळते. तो शहजादा म्हणजेच राजपुत्र असल्याने त्याला कोणी काहीही करण्यापासून रोखत नसते आणि तो वाटेल ते पोरकटपणा करीत असतो. एकदा हा राजपुत्र कुर्‍हाड घेऊन झाडावर चढतो आणि ज्या फ़ांफ़ीवर बसलेला असतो, तिच्यावरच कुर्‍हाडीचे घाव घालू लागतो. आता ती फ़ांदी कोसळली तर तिच्यासकट राजपुत्रही खाली कोसळून त्याचा कपाळमोक्ष होणार, हे सर्वांना दिसत असते. पण त्याला सावध तरी कोणी करायचे? म्हणून सगळे गप्प बघत बसतात, अशी ती गोष्ट आहे. तिचा शेवट काय होतो ते वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र असे घडताना सहजगत्या कुठे बघायला मिळत नाही. पण अलिकडे कॉग्रेस पक्षाची जी दुर्दशा झाली व होत आहे; ती बघितली की अशा गोष्टी नुसत्या मजेशीर नसतात, तर वास्तवही असतात याची प्रचिती येऊ लागली आहे. तसे नसते तर राहुल गांधी या शहजाद्याच्या हातून कॉग्रेस अशी हकनाक मारली जाण्याचा पोरखेळ कशाला होऊ शकला असता काय? सव्वाशे वर्षे जुन्या राजकीय पक्षाला इतक्या प्रदिर्घ काळात एकाहून एक दिग्गज नेते मिळाले व त्यांच्या कर्तृत्वाने देशाला अनेक लाभही होऊ शकले. पण मागल्या पंचवीस वर्षात त्याच पक्षाला कोणी नेता उरलेला नाही. काही धोरण उरलेले नाही, की कार्यक्रम नाही. नेहरूंच्या घराण्यातला कोणी राजगादीवर बसवायचा आणि त्याने पक्ष चालवावा, अशाच अगतिकतेत हा पक्ष सापडला आहे. त्या गर्तेतून त्याला बाहेर पडता येत नाही. म्हणूनच राहुल गांधी यासारख्या दिशाहीन व बुद्धीहीन व्यक्तीकडे पक्षाची सुत्रे गेलेली आहेत. मग हा तरूण मनात येईल तसे वागून पक्षाची फ़रफ़ट करतो. किंबहूना आपल्या कुटुंब व घराण्याचीही बेअब्रु होतेय, याचेही त्याला भान उरलेले नाही. अन्यथा बुधवारी संसदेत कॉग्रेस व गांधी कुटुंबाचे इतके धिंडवडे कशाला निघाले असते?

मागले तीन आठवडे संसदेत व त्याच्याही आधी माध्यमातून ललित मोदींचा आडोसा घेऊन सोनिया व राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुषमा स्वराज व भाजप सरकारवर टिकेची झोड उठवण्यात आलेली होती. तिला उत्तर देण्याचीही संधी त्यांना नाकारण्यात धन्यता मानली गेली. त्यासाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनावर बोळा फ़िरवला गेला. अखेरीस ललित मोदी व त्यांच्या अफ़रातफ़रीवर प्रत्यक्ष चर्चा झाली, तेव्हा अर्थंमंत्र्यांनी कॉग्रेसच्याच कर्तृत्वाची लक्तरे वेशीवर टांगली. तेव्हा ती बघायला सभागृहात किती कॉग्रेस सदस्य थांबले होते? ललित मोदीला वाचवण्यासाठी युपीए सरकार व त्याच्या नेत्यांनी कायद्यानुसार कशी लबाडी केली व कायद्यातून ललितला कशा पळवाटा ठेवल्या; त्याचा पाढाच जेटली यांनी संसदेत वाचला. त्यामुळे मागला महिनाभर ललित मोदींच्या नावाने कॉग्रेस जो धिंगाणा घालत आहे, त्यात आता कॉग्रेसच फ़सत चालली आहे. कारण ललितला कॉग्रेस व त्याचे अर्थमंत्री चिदंबरम यांनी बहाल केलेल्या सवलती मोदी सरकारने काढून टाकल्या असून, ललित विरोधात फ़ौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतील अशी कारवाई केलेली आहे. म्हणजे त्याच्यावर कारवाई होऊ शकेल, अशी कृती युपीए सरकारने टाळली होती. ती मोदी सरकारने केली आहे. याचा अर्थ इतकाच, की चार वर्षे सोनिया-राहुल यांचेच सरकार ललित मोदीला वाचवत होते आणि कारवाईचे निव्वळ नाटक करत होते. मात्र आपल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी सुषमा स्वराज यांच्या किरकोळ कृतीचा बोभाटा करून कांगावा चालू होता. मात्र आता नव्या कारवाईमुळे ललितला भारतात आणले जाईल आणि तो पोपट बोलू लागला, मग भल्याभल्यांना पळता भूई थोडी करील. त्याची चुणूक त्याने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दाखवलेली आहेच. कारण ललितने आता सोनियांचे जावई व राहुलचे भावजी रॉबर्ट वाड्रा यांना त्यात ओढले आहे.



हे प्रकरण जरा समजून घ्यावे लागेल. ललित मोदी नावारूपाला आला, आयपीएल या स्पर्धेमुळे आणि त्या स्पर्धेचा पहिल्यापासूनचा मुख्य प्रायोजक डीएलएफ़ ही कंपनी आहे. म्हणजे जे काही घोटाळे ललितने केल्याचा दावा आहे, त्यात ही कंपनी गुंतलेली असणारच. पण तिथेच येऊन त्या कंपनीचे ‘व्यवहार’ थांबत नाहीत. तीन वर्षापुर्वी अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्यापासून बाजूला होऊन आम आदमी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर अनेक भ्रष्टाचाराच्या आरोपांचा भडीमार सुरू केला होता. त्यातले एक गाजलेले प्रकरण होते अशोक खेमका नावाच्या सनदी अधिकार्‍याचे. हरयाणाचा हा कर्तव्यदक्ष अधिकारी कशासाठी आपल्या पदावरून हाकलला गेला होता? तर त्याने एका मोठ्या भूमी खरेदी विषयात हस्तक्षेप करून ते खरेदी व्यवहार बेकायदा ठरवले होते. त्यातला लाभार्थी होता रॉबर्ट वाड्रा. ज्याच्या कंपनीपाशी बॅन्केमध्ये पन्नास लाख रुपयेही नव्हते, त्याला एका कंपनीने आपली कित्येक एकर जमिन खरेदी करण्यासाठी स्वत:च बिनव्याजी कर्ज दिले होते. मग ही जमिन वाड्राने खरेदी केल्यावर तिच्या आसपास नव्या विकास योजना हरयाणा सरकारने जाहिर केल्या आणि ती जमिन आरक्षणातून मुक्त केली. त्यानंतर पुन्हा त्याच मुळच्या कंपनीने तीच जमिन वाड्रा याच्याकडून अनेकपट अधिक किंमत देवून खरेदी केली होती. असा तो व्यवहार बेकायदा ठरवून खेमका यांनी रद्दबातल केला होता. केजरीवाल व त्यांचे तात्कालीन सहकारी प्रशांत भूषण यांनी ह्या संबंधातले कागदपत्र २०१३ च्या आक्टोबर महिन्यात पत्रकार परिषद घेऊन जगजाहिर केल्याचे आठवते कुणाला? ती वाड्रा यांच्यावर इतकी माया दाखवणारी कंपनी कुठली होती? तिचे नाव आहे डीएलएफ़. कसे योगायोग आहेत ना? ललित मोदीला नावारुपाला आणणार्‍या आयपीएलचा व सोनियाचे जावई रॉबर्ट वाड्राचा प्रायोजक एकच कंपनी असावी का?

आता गंमत बघा. ‘इंडीया टुडे’ या वाहिनीतर्फ़े राजदीप सरदेसाई यांनी लंडनला जाऊन अलिकडेच ललित मोदी यांची मुलाखत घेतल्याची बातमी टाईम्स ऑफ़ इंडियाने प्रसिद्ध केली. त्यातले ललितचे एक वाक्य मोठे सुचक आहे. कारण राहुलने सुषमांना एक सवाल जाहिरपणे विचारला आहे आणि त्याचे उत्तर जाहिरपणे द्यावे असाही आग्रह धरला आहे. ललितच्या खात्यातून सुषमा स्वराज यांच्या परिवाराच्या खात्यात किती रक्कम आली, असा तो सवाल आहे. ललित मोदींनी बहुधा त्यालाच उद्देशून हे ‘सूचक’ उत्तर दिले आहे. ललित त्यात म्हणतो, ‘राहुलनी फ़क्त वाड्राची चिंता करावी.’ सगळा गोंधळ ललित मोदीच्या घोटाळ्याचा व सुषमा स्वराज यांनी ललितला केलेल्या मदतीचा असताना, ललितने मध्येच वाड्रा कुठून आणला? त्याचा संबंध डीएलएफ़ कंपनीशी आहे काय? कारण ललित मोदींची आयपीएल असो किंवा वाड्राचे हरयाणा प्रकरण असो, दोन्हीकडे सढळ हस्ते मदत करणारी कंपनी एकच आहे; DLF. याचा अर्थ ललित मोदी त्या वाड्रा व त्या कंपनीचे व्यवहार जाणून आहे आणि तेच उघड करण्याची धमकी देतो आहे काय? नसेल तर त्याने अकारण वाड्राचे नाव इथे आणायचे कारण काय? केजरीवाल भूषण यांनी ते प्रकरण चव्हाट्यावर आणले तेव्हा तडकाफ़डकी खेमका यांना कॉग्रेसचे मुख्यमंत्री भुपींदरसिंग हुड्डा यांनी अधिकारावरून बाजुला केले होते. थोडक्यात सुषमांना व ललितला धारेवर धरणार्‍या राहुलच्या कौटुंबिक व्यवहाराचे  धागेदोरे आपल्यापाशी असल्याचे संकेतच ललित मोदी देत आहे. त्याने तसे काही पुरावे येत्या काळात पुढे आणले, तर सुषमा स्वराजना लक्ष्य करून संसदेचे कामकाज बंद पाडण्याचे राजकारण कॉग्रेसला किती महागात पडेल, याची नुसती कल्पना करावी. म्हणून म्हटले राहुल ज्या फ़ांदीवर बसलेत, तीच तोडण्यासाठी उतावळेपणाणे कुर्‍हाड चालवित आहेत. मात्र बिचारे कॉग्रेसनेते निमूटपणे तो तमाशा बघत आहेत. याला म्हणतात राजपुत्र!

1 comment:

  1. एक शंका. कदाचित राहुल गांधी प्रियांका वद्राला अडवण्यासाठी मुद्दाम करत असतील का? कारण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यातला तिढा हाच असेल.

    ReplyDelete