Wednesday, August 19, 2015

हा जाणता राजा, मग ‘तो’ कोणता राजा?

Image result for जाणता राजा

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने जाहिर केल्यापासून वाद उफ़ाळून आलेले आहेत. त्यातला प्रमुख आक्षेप संभाजी ब्रिगेड या मराठा संघटनेने घेतला होता. ही संघटना ब्राह्मण विरोधी म्हणूनच ओळखली जाते आणि म्हणूनच त्यांनी जन्माने ब्राह्मण असलेल्या पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध केला होता. त्यात वावगे काही म्हणता येणार नाही. कारण एका जातीच्या विरोधात अजेंडा घेऊन उभ्या असलेल्या दुसर्‍या जातीच्या संघटनेकडून यापेक्षा भिन्न कृती अपेक्षित नसते. मात्र मागल्या सहासात वर्षात या संघटनेने जे काही उद्योग केले, त्यातून आजवर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या झेंड्याखाली भक्कमपणे उभ्या असलेल्या मराठा संघशक्तीला कायमचा तडा गेला. अन्यथा मागल्या विधानसभेत राष्ट्रवादीला आपल्याच बालेकिल्ल्यात पश्चीम महाराष्ट्रात इतका मोठा तडाखा बसला नसता. शरद पवार यांच्यासारखा दांडगा अनुभवी, तितकाच मुरब्बी नेता पाठीशी असताना राष्ट्रवादीला आपल्याच प्रभावक्षेत्रात नको इतका फ़टका बसला. सत्तेत असलेल्या नेत्यांची मस्ती आणि त्यांनी पोसलेल्या बांडगुळ मराठा संघटनांच्या उचापती, हेच एकमेव कारण होते. आपल्या जातीद्वेषाच्या कारवायांसाठी ह्या मंडळींनी संभाजी महाराज व शिवरायांचे अक्षरश: भांडवल केले होते. त्यासाठी असाउद्दीन ओवायसी याच्यासारख्या देशविघातक व्यक्तीशी हातमिळवणी करण्यापर्यंत ब्रिगेडची मजल गेली होती. खरे तर हा अतिरेकच आपला राजकीय सामाजिक पाया खोदून काढण्याची लक्षणे पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याने वेळीच ओळखून त्यांचा बंदोबस्त केला असता, तर सार्वत्रिक निवडणूकीत त्यांच्या पक्षाची अशी दारूण अवस्था झाली नसती. आणि असे शरद पवार ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जातात व त्यांनाही त्यात काही गैर वाटले नाही. पण मुद्दा असा, की त्यातून पवारांचा गौरव होत असला तरी खुद्द शिवरायांचा अवमान झाला त्याचे काय?

सतत आपल्या गदारोळातून शिवरायांच्या बदनामी विरोधात आवाज उठवण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेऊन अस्तित्वात आलेल्या संभाजी ब्रिगेडने कधी पवारांच्या गुणगौरवात शिवरायांच्या होणार्‍या बदनामीबद्दल अवाक्षर उच्चारले नाही. याचे कारण काय असावे? मागल्या तीन दशकात ‘जाणता राजा’ ही बिरूदावली शिवरायांसाठी जनमानसात पक्की केली, ती बाबासाहेब पुरंदरे यांच्या महानाट्याने. समर्थ रामदासांच्या शब्दात शिवरायांचा उल्लेख ‘जाणता राजा’ असा आलेला आहे. पण ब्रिगेडीयर मंडळीना मुळातच रामदासांचे वावडे आहे. कारण तेही जन्माने ब्राह्मण. सहाजिकच त्यांनी शिवरायांचा गौरव केला तरी त्याला शिवप्रभूंचा अवमान समजणे त्यांच्यावर सक्ती असते. म्हणूनच मग शिवरायांना पुरंदरे वा रामदासांनी लावलेली बिरुदावली शरद पवारांना चिकटवण्यात त्या शब्दांचा अवमान केल्याने ब्राह्मण शिवशाहिरांचे नाक कापले गेल्याचा आनंद ब्रिगेडकरांना होत असावा. अन्यथा त्यांनी शरद पवारांना हेच बिरूद लावण्याला आक्षेप घेतला असता. पण त्यातल्या कोणालाही शिवरायांच्या प्रतिष्ठा वा सन्मानापेक्षा ब्राह्मणद्वेष अधिक प्रिय असल्याने, कोणीही पवारांना ‘जाणता राजा’ संबोधण्याला आक्षेप घेतला नाही. पण आज जेव्हा पुरंदरे यांच्या इतिहास व संशोधनाविषयी पवार स्वत:च शंका काढत आहेत, तेव्हा तरी त्यांनी आपल्याला चिकटवले जाणारे हे बिरूद झटकण्याचे प्रसंगावाधान दाखवायला काय हरकत होती? पण तसे काहीही होऊ शकले नाही. कारण यानिमीत्ताने शरद पवार यांचाही खरा चेहरा जगासमोर आला. कारण सुरूवात ब्रिगेडने केली असली, तरी ‘जाणता राजा’ पवारांनी आपली रसद जितेंद्र आव्हाड यांच्या स्वरूपात ब्रिगेडकडे रवाना केली आणि प्रसंग बाका आल्यावर स्वत:च पवार आव्हाडांच्या समर्थनार्थ मैदानात आलेले होते. थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आव्हाडांच्या पुरोगामी कार्याची माहिती फ़डणवीसांना पोहोचती केली होती.

सवाल इतकाच, की जर तुम्हाला इतक्या टोकाचा ब्राह्मण विरोध करायचा असेल, तर पवारांनीही आपल्याला लावल्या जाणार्‍या बिरूदावलीला साफ़ खुलेपणाने अव्हेरले पाहिजे. कारण ती दोन ब्राह्मणांनी लोकप्रिय केलेली शिवराय विषयक बिरूदावली आहे. खुद्द आव्हाडांनीच आपल्या पितृतुल्य शरद पवाराना जेव्हा हे बिरूद लावण्यात आले, तेव्हापासून कधीच त्याविषयी आक्षेप घेतला नव्हता. की तेव्हा त्यांना ब्रिगेडचे तत्वज्ञान ठाऊक नव्हते? शिवरायांची बदनामीच पुरंदरे यांनी चालविली होती, तर इतके दिवस आणि इतकी वर्षे खुद्द शरद पवार त्याबद्दल मौन धारण करून कशाला बसले होते? एका विद्यापिठाकडून संशोधन व अन्य कार्यासाठी त्याच बाबासाहेबांना सन्माननीय डी. लीट पदवी बहाल करण्यात आली. तेव्हा तिचे प्रदान करणारे ‘शुभहस्त’ पवारांचेच होते. त्यावेळी पवारांचे ऐतिहासिक ज्ञान कुठे आयपीएलची मॅच खेळत रमले होते काय? वयाची पंच्याहत्तरी ओलांडण्याची वेळ आलेली असताना कुठले पोरखेळ करावेत, याचे तरी भान या जाणत्या नेत्याला उरले आहे काय, याचीच शंका येते. लोकसभा ते विधानसभा अर्धी चड्डीकडे देशाचा राज्याचा कारभार सोपवणार काय, असा सवाल करीत फ़िरायचे आणि अखेरच्या क्षणी त्याच अर्ध्या चड्डीला पाठींबाही देवून मोकळे व्हायचे, याला ‘जाणता राजा’ म्हणतात काय? कदाचित त्याचमुळे आव्हाडांनी जो पोरखेळ केला, त्याला पवार साहेब पुरोगामी प्रबोधनाचे कार्य समजून बसले असावेत. मात्र त्यावर काम भागेल अशी त्यांची अपेक्षा असावी. ती पुर्ण झाली नाही, तेव्हा मग पवारांची राखीव बुद्धीजिवी फ़ौज मैदानात आली. ज्यांचे प्रबोधन व बौद्धिक कार्य शरद पवारांनी नेमून दिलेली वतने व अनुदानावर होत आले, अशा बुद्धीजिवींची फ़ौज मग शेवटच्या अटीतटीच्या लढाईसाठी मैदानात आली. मग ह्या सह्याजीरावानी रांगेत उभे राहून बाबासाहेबांना पुरस्कार देवू नये असे निवेदन काढले.

अलिकडे ही एक फ़ॅशन झाली आहे. ज्यांना समाजात कोणी हिंग लावून विचारत नाही, पण जे माध्यमांच्या बळावर समाजातील मान्यवर अशी बिरूदावली मिरवत असतात, त्यांचा हा नित्याचा तमाशा झाला आहे. मागल्या दोन दशकात अशाच वाचाळवीर बिनबुडाच्या विचारवंतांनी जे आग्रह धरले, तेच नाकारून जनतेने मागल्या दोन वर्षात कौल दिला आहे. म्हणूनच आता अशा लोकांचा विरोध हीच मूळ निर्णयाला जनतेची सहमती, असे समजण्याचा निकष तयार झाला आहे. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत प्रत्येक निवडणूकीत याच सह्याजीरावांनी ज्यांना विरोध केला, तेच दणदणित मतांनी निवडून आले आहेत. याचा अर्थ इतकाच, की अशा सह्याजीराव मंडळींचा विरोध हे आता जनमानसाच्या होकाराचे प्रतिक बनले आहे. थोडक्यात ज्या हिरीरीने ही मंडळी बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देऊ नये असा आग्रह धरून पुढे सरसावली आहेत, त्याचा अर्थ जनतेमध्ये बाबासाहेबांविषयी प्रचंड आदरभावना आहे, असेच गृहीत धरावे लागते. पण याच निमीत्ताने त्याच सह्याजीरावांना एक सवाल करणेही आवश्यक आहे. त्यांना शरद पवार ‘जाणता राजा’ वाटतात काय? असेल तरी हरकत नाही. मग त्यांनी तो रायगडावरचा शिवप्रभू म्हणून राजा होऊन गेला, त्याला ‘कोणता राजा’ संबोधावे; तेही जरा सांगून टाकावे. कारण तो राजा इतका ठीसूळ व धरसोडवृत्तीचा नव्हता. दिल्लीला शरण जाण्याचा ‘पराक्रम त्याला कधी जमला नाही. जो पवारसाहेब सातत्याने करीत आले. पोटच्या पोराला मुगलांकडे जामिन ठेवून स्वराज्याचॊ डागडुजी करायला आलेल्या शिवरायाला जग ‘जाणता राजा’ म्हणून ओळखत आले. आणि आजचा हा ‘जाणता’ आपल्या लेकीला बारामतीतून जिंकणे शक्य व्हावे, म्हणून मोदींनी जानकरांच्या प्रचाराला तिकडे येऊ नये, अशा विनंत्या करीत बसला. त्याला ‘जाणता राजा’ संबोधणार्‍यांना बाबासाहेबांचा राग असेल, तर तोच बाबासाहेबांच्या शिवभक्तीचा सर्वात सज्जड पुरावा आहे. म्हणूनच फ़डणविस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी केलेली निवड निर्विवाद योग्य असल्याचा आणखी ऐतिहासिक वा वर्तमानकालीन पुरावा देण्याही कुठलीही गरज उरत नाही. (अपुर्ण)

7 comments:

  1. Sundar Bhau...Apratim vivechan !!

    ReplyDelete
  2. अगदी सत्यवचन भाउ .. बि ग्रेड ही पक्की जातीयवादी आहे.., विनाकारण पुरंदरे सारख्या तपस्वी व्यक्तीची बदनामी करण्याङं महापाप यांनी केलय.., खरे शिवद्रोही हे बी ग्रेडीच..!!

    ReplyDelete
  3. bhausaheb , fakta tumchya karita facebook open karato . aaj tar tumhi dolyat anjan navhe tar , garam salai janata raja { thatha kathit aaj kal } chya dolyat khupasali aahe . Aani Maharashtra wanchawala aahe .

    ReplyDelete
  4. Bhau shatash pranam aani je Kay tumhi bollat te barobar

    ReplyDelete
  5. भाऊ तुम्ही लिहिलेली एकएक ओळ तोलामोलाची!
    महाराज न्याय कराहो! स्वराज्याचे मारेकरी ढकला कड्यावरून!!

    ReplyDelete
  6. भाऊ निव्वळ अप्रतिम,
    याला म्हणतात शालजोडीतली हाणणे

    ReplyDelete