Friday, August 28, 2015

शिना, इंद्राणी, पीटर, राहुल, मुखर्जी, मिखाईल..........



पोलिस तपास ही बातमीदारी किंवा टेलिव्हीजनचा शो नसतो. त्यात नुसत्या तर्काने कुणाला दोषी ठरवून फ़ाशी देता येत नाही, की गुन्हेगार सिद्ध करता येत नाही. तर कोर्टात कायद्याच्या निकषावर साक्षीपुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडायची असते. म्हणूनच जे साध्या डोळ्यांना दिसते त्याच्याही पलिकडे जाऊन घटना व तिचे संदर्भ जोडून साक्षीपुराव्यांची संगतवार मांडणी पोलिसांना करावी लागते. त्यासाठी आधी रहस्यमय कोडे सोडवावे, तसे त्याच कोड्यातले विविध तुकडे व सुटे भाग गोळा करावे लागतात. पोरांच्या खेळात जसे सर्व तुकडे समोर असतात, तशी पोलिसांची चैन नसते. त्यांना आपल्या प्रयत्नातून कोड्याचे तुकडे गोळा करावे लागतात आणि त्यातून जे चित्र स्पष्ट होऊ लागते, त्याच्या आधारे उरलेले तुकडे शोधावे लागतात. तेही सहजगत्या बाजारात उपलब्ध नसतात. कसून शोध घेतला तरी मिळायला अवघड असतात. अनेकदा तर एक चित्र स्पष्ट होत असताना त्यातूनच भलतेच चित्र साकारू लागते आणि एका गुन्ह्याच्या जागी दुसर्‍याच अनुत्तरीत कोड्याचा रहस्यभेद होत जातो. इंद्राणी मुखर्जी व शिना बोरा हे त्याचे जळजळित उदाहरण आहे. उठसुट पोलिसांकडे इच्छाशक्ती नाही, सरकारला गुन्ह्यांचा शोध घ्यायचाच नाही, म्हणून जे ‘आम्ही सारे’ रस्त्यावर फ़लक घेऊन उभे असतात, त्यांना गुन्हेतपास म्हणजे काय याचा गंध नसतो, त्याचा हा पुरावा आहे. पण तिथेच ही तुलना संपत नाही शिना व इंद्राणी यांचा हा गुंता म्हणूनच मुळापासून समजून घेतला पाहिजे. ते करताना त्यांच्यातले नातेसंबंध व त्यातला गुंता अनावश्यक आहे. शिना नावाच्या तरूणीचा तीन वर्षापुर्वी निर्घृण खुन झाला आणि त्याचे धागेदोरे लपवणारी तिचीच आप्तस्वकीय निकटवर्तिय मंडळी आहेत. ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. म्हणून लक्ष केवळ खुनाच्या संदर्भावर केंद्रित करण्याची गरज आहे.

शिना ही इंद्राणीची मुलगी होती आणि ते सत्य लपवून तिने कागदोपत्री तिला आपली बहिण ठरवण्याचे कारस्थान यशस्वीरित्या राबवले होते. त्यात खुद्द शिना व तिचा भाऊ मिखाईल सहभागी होते. म्हणूनच त्यांनी इतके दिवस त्याविषयी मौन पाळले होते. मारली जाईपर्यंत शिनाने त्याचा कुठे गवगवा केला नाही, की आजपर्यंत मिखाईल त्याबद्दल कुणाला बोलला नाही. याचा अर्थ मुळात जी भामटेगिरी इंद्राणी करीत होती, त्याचे हे दोघेही भागिदारच होते. जेव्हा त्यांच्यात बेबनाव झाला, तेव्हा इंद्राणीने इतर कोणाच्या मदतीने शिनाचा काटा काढला. त्यामुळे आता मिखाईल म्हणतो, की मलाही आईने म्हणजे इंद्राणीने असेच संपवले असते. पण तशी भिती असूनही मिखाईल निदान तीन वर्षे गप्प होता. आज तो इंद्राणीवर खुनाचा आरोप करतो आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा तर आपली बहिण शिना मागली तीन वर्षे बेपत्ता असताना त्याने मौन कशाला धारण केलेले होते? शिनाचा खुन माहित असून लपवाछपवी करणे गुन्हा नाही काय? तिसरा आहे इंद्राणीचा विद्यमान पती पीटर मुखर्जी. त्यालाही शिना बहिण की मुलगी याविषयी शंका होती. पण त्याने त्यात नाक खुपसले नाही. पण मागली तीन वर्षे ही मुलगी बेपत्ता होती आणि कुठल्याही संपर्कात नाही, तर त्याचे कुतूहल कुठे दडी मारून बसले होते? शिना अमेरिकेत आहे आणि तिथे दिवाळी करतानाची छायाचित्रे इंद्राणीने दाखवल्याचे पीटर सांगतो. इतक्या बड्या उद्योग समुहाच्या प्रमुखपदी विराजमान झालेला माणूस इतका भोळा असू शकतो? जो अकस्मात बेपत्ता झालेल्या सावत्र मुलगी वा मेहुणीबद्दल तीन वर्षे थाप ऐकून घेतो? त्याचेही या विषयातले मौन शंकास्पद नाही काय? कारण शिनाला शेवटचे ज्याने कोणी बघितले, त्यानंतर तिचा संपर्क नसल्याने मुंबईत खार पोलिस ठाण्यात ‘बेपत्ता’ व्यक्ती म्हणून तक्रार नोंदली गेली होती.

शिना बेपत्ता असल्याची तक्रार कोणी दिली होती? त्याचे उत्तर पोलिसांनी दिलेल्या बातमीत कुठे मिळत नाही. जर अशी तक्रार होती तर पोलिसांनी त्याचा तपास कुठवर केला होता? कोणा कोणाकडे शिनाबद्दल विचारपूस केली होती? पीटर म्हणतो की इंद्राणीने शिना अमेरिकेला गेली असल्याचे सांगितले व तसे फ़ोटोही दाखवले. तर त्याला बेपत्ता तक्रार ठाऊकच नव्हती का? तसे असेल तर बेपत्ता व्यक्तीविषयी पोलिसांनी कुठे तपास व चौकशी केली, असा प्रश्न उपस्थित होतो. जी व्यक्ती बेपत्ता आहे तिचे फ़ोटो इंद्राणी दाखवते, तर तिची जबानी तेव्हा पोलिसांनी घेतली होती काय? यातली आणखी एक शंकास्पद व्यक्ती आहे पीटरचा पुत्र राहुल मुखर्जी. त्याचे शिनाशी प्रेमप्रकरण होते आणि ते इंद्राणीला मंजूर नसल्याचे आता सांगितले जात आहे. आपली प्रेयसी तीन वर्षे संपर्कात नसताना व तिच्याविषयी खार पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार असताना राहुल काय करत होता? त्याने प्रेयसी शिनाला शोधण्यासाठी कसला पाठपुरावा केला? नसेल तर कशामुळे त्याने प्रेयसीविषयी इतकी अनास्था दाखवावी? पीटर आपल्या पुत्राच्या प्रेमप्रकरणाकडे अलिप्तपणे बघत होता. तरी त्यातली प्रेयसी बेपत्ता असावी आणि तिच पीटरच्या पत्नीची बहिण (वा कन्या) असावी हे पचणारे आहे काय? यातल्या प्रत्येकाला शिना वा तिच्या बेपत्ता असण्याविषयी इतकी अनास्था कशामुळे असावी? यातला कोणीही शिनाला शोधण्यात उत्सुक नव्हता, की कुठेही प्रयत्न करीत नव्हता. जणू तशी कोणी शिना आपल्या आयुष्यात आलीच नव्हती, असे या प्रत्येकाचे वागणे इंद्राणी इतकेच चमत्कारीक वाटणारे नाही काय? इंद्राणीने तर तिचा खुनच केल्याचा दावा आहे. तिची अनास्था वा लपवछपवी समजू शकते. पण यातले बाकीचे तिघेजण धुतल्या तांदळाइतके निर्दोष आहेत का? की आता प्रकरण उलटल्यावर प्रत्येकजण हात झटकतो आहे?

मुळात ह्याचा उलगडा पोलिसांनीही बेपत्ता व्यक्तीचा शोध म्हणून केलेला नाही. याच नाट्यातील एक महत्वाचे पात्र श्याम राय हे आहे. त्याला कुठल्या तरी भलत्याच प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले असताना तो जे काही बरळला, त्यातून शिना बोरा प्रकरण उजेडात आलेले आहे. म्हणजेच तो दुसर्‍या भानगडीत पकडला गेला नसता व बरळला नसता; तर पीटर, इंद्राणी, राहुल वा मिखाईल यांची नावे कुठे पुढे आलीच नसती की शिना बोराची हत्या झाली, त्याचा बोभाटाही झाला नसता. हे सारे उजळमाथ्याने उच्चभ्रू समाजात मिरवत राहिले असते. श्याम राय याच्याकडे संशयास्पद पिस्तुल पोलिसांना मिळाले आणि त्याचा पाठपुरावा करताना श्यामने शिनाची हत्या झाल्याचे ओकून टाकले. तिथून मग बेपत्ता शिना मेली असल्याचे पोलिसांना लक्षात आले आणि शिनाच्या बेपत्ता तक्रारीचा पुन्हा खार पोलिस ठाण्यातून शोध सुरू झाला. पण थोडा वेगळा विचार करा. जर पीटरने आपल्या मुलाच्या प्रेयसीच्या बेपत्ता होण्याचा किंवा राहुलने आपल्या प्रेयसीच्या अकस्मात गायब होण्याचा पाठपुरावा २०१२ मध्येच सुरू केला असता तर? म्हणजे पोलिसांना शिना कधीपासून कुठून व कशा परिस्थितीत गायब झालीय त्याचा तपशील देवून, शोध करण्यास भाग पाडले असते तर? तर श्याम रायने सत्य ओकण्यापर्यंत शिनाच्या हत्येवर पडदा पडून राहिला असता काय? इंद्राणीला तीन वर्षे उजळमाथ्याने मिरवता आले असते काय? या आप्तस्वकीयांची अनास्था किंवा लपवाछपवीच इंद्राणीला खुन पचवायला हातभार लावत नव्हती काय? परस्परातील संबंध, भांडणे, वादविवाद, मतभेद, रागलोभ यांचा सारा तपशील वेळीच पोलिसांना मिळाला असता, तर त्याच बेपत्ता व्यक्तीचा शोध घेताना शिनाच्या खुनाचा उलगडा कधीच होऊ शकला असता. पानसरे वा दाभोळकर प्रकरणात असे काही दुवे नक्कीच असतील, ज्यांचा त्यांच्या हत्याकांडाशी निकटचा संबंध असू शकतो आणि ज्याच्याअभावी पोलिस त्यात नेमक्या दिशेने तपास करू शकले नाहीत. किंवा तिथेच पोलिसांचे गाडे फ़सलेले असू शकते. पण शिनाप्रमाणेच याही दोन्ही प्रकरणात कोणीतरी श्याम राय असू शकतो, तो हाती लागेल, तेव्हा त्यातल्या इंद्राणीचा बुरखा टरटरा फ़ाट्ल्याशिवाय रहाणार नाही. या दोन्ही हत्याकांडातला खरा आरोपी व सुत्रधारही आजही उजळमाथ्याने समाजात प्रतिष्ठीत म्हणून इंद्राणीप्रमाणे वावरतो आहे. पण त्याचाही श्याम राय कुठेतरी असेल आणि तो लौकर पोलिसांच्या जाळ्यात अडकू देत, अशी प्रार्थना आपण करू या.

No comments:

Post a Comment