Wednesday, September 30, 2015

पाकिस्तान कशाला रडकुंडीला आलाय?



प्रत्येक व्यक्ती वा व्यक्तीसमुह आपापल्या हेतूनुसार एखादी गोष्ट बघत वा करत असतो. त्यातून आपले हेतू साध्य करायचे त्याचे उद्दीष्ट असते. सहाजिकच त्या कृतीमागच्या हेतूला समजून घेतले नाही, तर त्यावरचे आपले विवेचन फ़सणारे असते. कारण दिसणार्‍या हालचाली वा कृतीचा आपल्या डोक्यात साठलेल्या संदर्भानुसार आपण विचार करीत असतो आणि प्रत्यक्ष कृती करणारा वेगळ्या संदर्भाने तशी कृती करत असतो. सहाजिकच त्यातून कृतीवीराला अपेक्षित असलेले परिणाम आपल्याला ठाऊक नसतात. म्हणूनच तो चुकतोय असेही आपले मत बनू शकते. पण पुढल्या काळात ते परिणाम दिसतात, तेव्हा आपल्यावरच चकित व्हायची पाळी येत असते. नुकतेच अमेरिकेत गेलेले भारताचे पंतप्रधान मोदी कोणाला भेटले वा त्यांचे कुठे कोणी स्वागत केले, त्याचा अर्थ आपण आपल्या समजूतीनुसार लावत असतो. पण त्यातून मोदींना काय साधायचे आहे, त्याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. म्हणूनच मग त्याच काळात आपला शेजारी पाकिस्तानात मोदींबद्दल काय बोलले जात आहे, त्याकडे आपल्याला ढुंकूनही बघावेसे वाटत नाही. ‘द नेशन’ या पाकिस्तानच्या एका प्रमुख इंग्रजी दैनिकाने खास अग्रलेख लिहून मोदींनी अमेरिकेत कसा प्रभाव पाडला, त्याची चर्चा केली आहे. उलट भारतातील माध्यमे मात्र मोदींविषयी नेहमीप्रमाणे हेटाळणीचा सुर लावून बसली आहेत. अमेरिकेतील मोठे उद्योग व माध्यम समुह मोदींसाठी एकत्र येऊन संवाद साधतात आणि पाकिस्तानी पंतप्रधानाला कोणी विचारतही नाही, अशी टिका या संपादकीयाने केलेली आहे. पण त्यातले मोदीविषयक कौतुक नेमके आहे. मोदी अत्यंत धुर्त राजकारणी असून आपल्याला हवे ते समोरच्याकडून करून घेण्यात वाकबगार आहेत, असे नेशनच्या संपादकांनी आपले मत नोंदवले आहे. पाकच्या कुणा संपादकाने अशी भूमिका कशाला मांडावी?

आपला पंतप्रधान जागतिक व्यासपीठावर हास्यास्पद ठरला व शेजारी शत्रूदेशाचा पंतप्रधान जागतिक समुदायाला प्रभावित करतो आहे, याची ती पाकिस्तानी पोटदुखी आहे. पण तेवढ्यासाठी आपणही मोदींचे अवास्तव कौतुक करायला हवे काय? नुसते जगातील मोठ्या महत्वाच्या व्यक्तींना प्रभावित केल्याने भारताचा कुठलाही लाभ होऊ शकेल असे नाही. म्हणूनच मोदी जगासमोर किती चमकतात, त्याला काही अर्थ नाही. तर त्यातून काय साध्य करतात व काय साध्य होते, याला प्राधान्य असले पाहिजे. आपण कितीही बढाया मारल्या तरी आजही आपण खर्‍या अर्थाने महाशक्ती नाही. म्हणूनच आजही जे मान्यवर पुढारलेले देश आहेत, त्यांना आपल्या बाजूला ओढूनच परिसरातील राजकारण खेळणे भाग आहे. भारताला आपल्या शेजार्‍यांशी संबंध ठेवताना वा बिघडवताना, जगातल्या मोठ्या देशांचा कल बघावा लागतो. तिथे पाकिस्तानने आजवर बाजी मारलेली आहे. चीन असो किंवा अमेरिका असो, त्यांना जागतिक पटावरच्या खेळीत पाकिस्तान मोहर्‍यासारखा वापरता येत होता. तीच पाकिस्तानची किंमत होती. पण त्यापेक्षा अधिक महत्व पाकिस्तान वाढवून घेऊ शकला नाही. अशा स्थितीत त्याची ताकद भारताला सतावण्यापुरतीच होती. आता तेवढीही पाकिस्तानची उपयुक्तता उरलेली नाही, ही दाखवून देणे भारताच्या लाभाची गोष्ट असू शकते. त्यासाठी जगभरच्या मोठ्या देशांना त्यांच्यासाठी अर्थकारणात भारताचे महत्व पटवून देणे व म्हणूनच भारताची सुबत्ता त्यांच्या भल्याची असल्याचे सिद्ध करणे अगत्याचे आहे. पण त्याचवेळी पाकिस्तान निरूपयोगी व त्रासदायक असल्याचेही सिद्ध करण्याला महत्व आहे. जागतिक पटलावर श्रेष्ठ ठरण्याइतकी ताकद नसताना असलेल्या कुवतीचा धुर्तपणे स्थानिक संबंधात उपयोग करून घेण्यातच मुत्सद्देगिरी सामावेलेली असते. ज्याला इथे भपकेबाजी म्हटले जाते आहे, त्यामागचा हेतू तोच असू शकतो.

तिथे अमेरिकेत पाकच्या पंतप्रधानाची दखल कोणी घेत नाही म्हणून पाकचा एक मोठा संपादक अश्रू ढाळतो आहे आणि त्याचवेळी पाकव्याप्त काश्मिरात हजारो लोक रस्त्यावर येऊन हिंदूस्तान झिंदाबादच्या घोषणा देतात, याला योगायोग म्हणता येत नाही. आजवर अशा बातम्या कधी आल्या नाहीत. मोदींचा अमेरिकन दौरा चाललेला असताना व्याप्त काश्मिरात उठलेला हा गदारोळ नवाज शरीफ़ यांना अधिकच गोत्यात आणणारा आहे. कारण तिथे अमेरिकेत जगापुढे शरीफ़ नेमके काश्मिर हाच भारत-पाक यांच्यातला वाद असल्याचे प्रतिपादन करत होते. भारतात काश्मिरींवर अन्याय होत असल्याचा दावा पेश करत होते आणि त्याचवेळी त्यांनी व्यापलेल्या काश्मिरातच पाकविरोधी निदर्शने उफ़ाळून आलेली होती. मात्र खुद्द मोदी त्यापासून संपुर्ण अलिप्त होते. त्यांनी काश्मिरचा विषयसुद्धा मांडला नाही, ती कामगिरी सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीने पर पाडली. पाकिस्तानात काश्मिरी खुश नाहीत व त्यांच्यावर तिथे अत्याचार होतात, हे मोक्याच्या वेळी घडवून आणले गेलेले नाट्य नाही काय? अर्थात तसे एकट्या पाकव्याप्त काश्मिरातच घडलेले नाही. महिनाभरापुर्वी पाकचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्तानातही पाकविरोधी घोषणा देत भारताचा तिरंगा फ़डकवण्याचा उद्योग झालेला आहे. दोन्ही ठिकाणी पाकला पोलिस बाजूला ठेवून लष्कराचा बडगा उगारावा लागला, इतकी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. मागल्या वर्षभरात हे प्रकरण इतके चिघळले, की घाईगर्दीने प्रथमच पाकने व्याप्त काश्मिरात मतदान घेऊन आपण तिथल्या काश्मिरींना नागरी अधिकार दिल्याचा देखावा उभा करण्याची पाळी आली. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि आता पाकचे पंतप्रधान जगाच्या व्यासपीठावर काश्मिरींच्या भारतविरोधी व्यथा मांडण्याचा आव आणत असतानाच, त्यांना तोंडघशी पडायची वेळ आली.

मोठमोठ्या उद्योगपतींना भेटण्यातून काय साधले गेले, हा नंतरचा विषय आहे. त्याचे परिणाम उशिरा दिसणारे आहेत. पण त्या भपकेबाज कार्यक्रमात मोदी गर्क असताना अन्य काही गोष्टी घडवून आणल्या गेल्यात. त्यातून पाकिस्तान व त्याचा राष्ट्रीय नेता जगासमोर केविलवाणा होऊन पेश करायची वेळ आणली गेली. याकडे पाकिस्तानी जाणत्यांचे नेमके लक्ष आहे. म्हणून तर आपली वेदना ‘द नेशन’च्या संपादकाने स्पष्ट शब्दात व्यक्त केली. त्यांनी भारताच्या पंतप्रधानाचे गुणगान करताना पाकिस्तान कसा दिवसेदिवस कोंडीत आणला जातो आहे, त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयास केला आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी एकदा स्पष्टपणे दहशतवाद हे पाकचे परराष्ट्र धोरण राहिले असे मान्य केले होते. तर अफ़गाण जिहादनंतर पाकने जिहादपासून फ़ारकत घ्यायला हवी होती, अशी कबुली पाकचे न्युयॉर्कमधील माजी राजदूत हक्कानी यांनी बोलून दाखवलेले आहे. पण त्यापासून बाजुला व्हायला तयार नसलेल्या पाक राज्यकर्त्यांना शहाण्या शब्दात समजावणे अवघड अशक्य होते. त्यांना समजणारी त्यांचीच भाषा मोदी सरकारने मागल्या वर्षभरात वापरायला सुरूवात केली आहे. सहाजिकच काश्मिरातला गदरोळ कमी होऊन पलिकडे व्याप्त काश्मिर व बलुचिस्तानात हादरे बसू लागले आहेत. त्याविषयी भारताचा पंतप्रधानही फ़ुशारक्या मारू शकतो. पण त्यापेक्षा नामानिराळे राहुनच आपापले डावपेच खेळण्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. अमेरिकेच्या दौर्‍यात पाकिस्तान, काश्मिर याविषयी अवाक्षरही मोदी बोलले नाहीत. उलट त्यांनी भपकेबाज कार्यक्रम करण्यात धन्यता मानली. त्यासाठी आपल्या ठेवणीतल्या घरगुती टिकाकारांची बोचरी टिकाही नेहमीप्रमाणे ओढवून घेतली आहे. पण बदल्यात पाकिस्तान रडकुंडीला आला असेल. तर त्यांचे हेतू यशस्वी झाले ना? बाकी टिंगल, टवाळी, टिका याची मोदींना सवय जडली आहे. त्यात नवे काहीच नाही.

कौरवांची कथा आणि पांडवांची गोष्ट



सत्य आणि कथा यात कुठला फ़रक असतो? तर सत्य हे जसेच्या तसे आपल्या समोर येत असते. कथा कितीही सत्य सांगणारी असली, तरी सत्याचा काहीतरी अपलाप त्यात होतच असतो. कारण कथेतले सत्य हे सांगणार्‍याला समजले वा भासले तिथपर्यंत मर्यादित रहाते. कारण समोर दिसले अनुभवले, त्यात जे त्याच्या बुद्धीला भिडलेले भावलेले असेल, तेच कथाकार रंगवून सांगत असतो. मग त्यात अनेक गोष्टी तो अतिरंजित करतो, तर काही भाग दडपून टाकतो. कारण त्याला ज्यात सत्याचा भास झालेला असतो, तोच परिणाम ऐकणार्‍या वाचणार्‍याच्या मनावर व्हावा; अशी त्याची अपेक्षा असते. सहाजिकच ज्यामुळे असा परिणाम वा प्रभाव कमी होऊ शकेल अशी शंका असते, तेवढा भाग कथाकार झाकतो, लपवतो किंवा चुकीच्या पद्धतीने सादर करत असतो. ही जगाची रीत आहे. त्यात आजचे असे नवे काही नाही. जगातल्या कुठल्याही मानवी पुराणकथा वा अनुभवांचे कथन बघितले, तर अशीच प्रचिती येईल. जी पात्रे असतात वा प्रसंग असतात, त्यातले नायक खलनायक कथाकारांनी आधीच निश्चीत केलेले असतात. सहाजिकच नायकांच्या भोवती सहानुभूती निर्माण व्हावी व खलनायकाच्या विषयी क्षोभ-संताप उत्पन्न व्हावा, अशाच रितीने कथेची मांडणी केली जात असते. मग तेच सत्य वा वास्तविक घटना थेट उलट्या टोकाच्या प्रतिक्रीया उमटवत असतात. पण एक बाजू त्याला सत्य मानत-समजत असते व त्यासाठी आग्रही असते, तर दुसरी बाजू त्याला धडधडीत खोटारडेपणा म्हणून नाकारत असते. इथून मग युक्तीवादाचे साम्राज्य सुरू होते. एकदा युक्तीवाद सुरू झाला, मग क्रमाक्रमाने वास्तव आणि सत्य मागे पडत जातात आणि कल्पनांच्या विश्वात मानवी मन गटांगळ्या खाऊ लागते. सहाजिकच कथाकथन करणारे अधिक आवेशात युक्तीवाद उभे करून बुडणार्‍याला आपणच वाचवू असा आव आणू लागतात.

सध्या नेहरू, नेताजी, शास्त्रीजी, नथूराम वा सावरकर अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तीमत्वांच्या बाजूने व विरुद्ध असेच आखाडे रंगलेले आहेत. त्यातल्या विविध कथा कादंबर्‍या ऐकल्या वाचल्या तर मजा वाटते. एका कथेतला खलनायक दुसर्‍या कथेतला साधूसंत सत्वशील नायक असल्याचे दावे वाचायला मिळतात आणि नेमके त्याच्याच उलटी बाजू दुसर्‍या कथाप्रसंगातून समोर ठासून मांडली जात असते. बहुतांश बाबतीत प्रसंग-पुरावे वा साक्षीदार सारखेच असतात. पण त्यांचा आधार घेऊन केलेले युक्तीवाद मात्र थक्क करून टाकणारे परस्परविरोधी असतात. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला हे कालपर्यंतचे ठाम सत्य होते आणि त्याविषयी शंका घेणे निव्वळ पाप होते. नेहरूंची बदनामी करण्याचे कारस्थान होते. पण ममता बानर्जींनी गुप्त कागदपत्रे समोर आणली आणि नेताजींचा अपघातात मृत्यू झालेलाच नव्हता असे निष्पन्न झाले. मग मुळच्या कथाकारांचा पवित्रा कसा सहजगत्या बदलला? नेताजी हयात असल्याचे लपवून प्रत्यक्षात त्यांना युद्धकैदी म्हणून पेश करण्याच्या संकटातून नेहरूंनी वाचवले. पण इथे सहा दशके खोटारडेपणा झाला त्याचे काय? नेहरू वा अन्य कोणी सामान्य जनतेची दिशाभूल करत होते, त्याबद्दल मौन धारण केले जाते. कथाकार यातूनच यशस्वी होत असतो. त्याला जे तुमच्या माथी मारायचे असते आणि जे मनात भरवून द्यायचे असते, त्यानुसार तो सत्य, पुरावे व साक्षिदाराचे कथन यांची ‘कलात्मक’ मोडतोड करत असतो. त्यात कपोलकल्पित गोष्टी घुसडून तुमच्या प्रतिक्रीया जोखुन मांडणी करीत असतो. त्याला कलात्मक मांडणी म्हटले जाते. अर्थातच ही आजची बाब नाही, शेकडो पिढ्या व अनेक शतके मानवी मनाशी असाच खेळ चालला आहे. मग आजचे सत्य उद्याची कथा होते आणि कालची कथा आजची दंतकथा होऊन जाते. पुराणकथा होऊन जाते.

रामायणात रामाच्या आवाजात लक्ष्मणाला हाका मारल्या जातात. तेव्हा सुरक्षेसाठी त्याने पर्णकुटीच्या भोवती एक रेखा आखलेली असते. सीतेने ती लक्ष्मणरेषा ओलांडू नये असा दंडक असतो. मजा कशी आहे बघा. त्या दंडकाचे पालन गोसाव्याच्या रुपात आलेला रावण पाळतो. कुठल्याही रामायणात रावणाने लक्ष्मणरेषा ओलांडल्याचे वाचायला मिळणार नाही. तर सीतेने ती मर्यादा ओलांडल्याचेच ऐकायला मिळेल. म्हणजे नियमाचे उल्लंघन सीतेने केले होते. त्यातून पुढले रामायण घडले. पण इथे आधीपासून सीता ही नायिका ठरलेली आहे आणि रावण खलनायक निश्चीत झालेला आहे. तेव्हा त्याने नियमाचे पालन केले असूनही त्याचा नुसता ओझरता उल्लेख केला जातो. पण मर्यादा ओलांडल्यावर जे काही परिणाम होतात, त्याची भयानकता इतकी अफ़ाट रंगवली जाते, की सीतेच्या मर्यादाभंगाकडे ऐकणार्‍या वाचणार्‍याचे दुर्लक्ष झालेच पाहिजे. त्याला कलात्मकता म्हणतात. खलनायक असूनही रावण मर्यादा पाळतो आणि नायिका असूनही सीता मर्यादाभंग करते, हे त्यातले सत्य आहे. पण ते कधी नेमके बोट ठेवून समजावण्याचा प्रयत्न झाला आहे काय? युधिष्ठीराने आपली पत्नी द्रौपदी पणाला लावली आणि तिची प्रथम विटंबना केली. पत्नी ही जुगारी पणाला लावण्याची वस्तु नव्हे. तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ज्या पतीवर आहे; तोच तिला पणाला लावतो. त्याचा उल्लेख ओझरता आणि पुढे भर दरबारात दु:शासन वस्त्रहरणाचा प्रयत्न करतो, त्याची रंगतदार वर्णने कशासाठी होतात? युधिष्ठीराच्या मूळ गुन्ह्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ना? त्याला कलात्मकता म्हणतात. ही जगातल्या सर्व पुराणकथांपासून इतिहास व वास्तव बातमीदारीपर्यंत आपल्या अनुभवास येत असते. जीवंत वा काल्पनिक पात्रांना माणसांना कथाकार बातमीदार आपल्या हेतू व इच्छेनुसार खेळवत असतो.

कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई किती रंगवून सांगितला जातो? तितका रमेश मोरे, विठ्ठल चव्हाण, प्रेमकुमार शर्मा वा रामदास नायक अशा भाजपा सेनेच्या आमदारांच्या हत्येचे कथानक सांगितले जाणार नाही. सनातनच्या भयकथा रंगवणारे कधी नक्षलवादी हिंसाचाराविषयी तपशीलवार बोलणार नाहीत. ही एक कला आहे. त्यात जनमानसाशी खेळ होत असतो आणि तो कित्येक शतकांपासून चालू आहे. कधी त्याला पुराणकथा म्हणतात, किर्तन प्रवचन म्हणतात, कधी सेमिनार परिसंवाद म्हणतात. त्यातून जनमानसाला एका ठराविक दिशेने घेऊन जाण्याचा, प्रभावित करण्याचा प्रयास असतो. मग त्या लढाईत ज्यांचा आवाज मोठा असतो वा ज्यांच्यामागे राजसत्ता उभी असते, त्यांची कथा सत्यकथा म्हणून ठासून सांगितली जात असते वा स्विकारण्याची सक्ती असते. ज्याचा आवाज मोठा असतो त्याचे सत्य प्रस्थापित झाले, असा दावाही केला जातो. पण सत्य कधीच प्रस्थापित होत नाही आज ज्यांचा आवाज मोठा असतो त्यांचा आवाज कधीतरी क्षीण होतो आणि कालचा दुबळा आवाज प्रभावी होऊन कालपर्यंत असत्य ठरलेले आज सत्य ठरू लागते. ज्याचा आवाज लोकांपर्यंत जातो किंवा ज्याची दहशत मोठी, त्याच्याकडे तेव्हाचे सत्य झुकत असते. मग त्यातले कालचे शिरजोर आज आपल्यावर अन्याय होत असल्याचे दावे करू लागतात, तर कालपर्यंत अन्यायाने चिरडले गेलो म्हणणारे, आज शिरजोरी करू लागतात. दोघेही एकाच माळेचे मणी वा एकाच कुरू कुळातले कौरव असतात. कथेला कलाटणी जशी मिळेल, तसे त्यातले जिंकलेले दिसतात, त्यांना तेवढ्या काळासाठी पांडव म्हणायचे असते. कुठल्याही कौरवाला तेच मुद्दे व पुरावे घेऊन युक्तीवादाने पांडव ठरवणे व सिद्ध करून दाखवणे ही कलात्मकता असते. त्याच कलाविष्काराला संस्कृती म्हणून मान्यता असते आणि त्यामुळे माणुस सुसंस्कृत होत असतो.

Tuesday, September 29, 2015

वडनगरचा ढोकळा, खायी त्याला खवखवे!



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांच्या एका समारंभात ‘सासू-जावई’ अशा स्वरूपाचे काही विधान केल्याने कॉग्रेसजन खवळले असतील तर ते आजच्या कॉग्रेसला जडलेल्या आजाराचे लक्षण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा आमचा पक्ष आहे आणि त्याला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे, असा दावा करणार्‍यांना आपण कुणा सासू-जावयाचे गुलाम नाही, इतके तरी लक्षात रहायला हवे. ज्या पक्षाने खंडप्राय देशाला परकीय गुलामीतून सोडवले हा दावा आहे, त्याने सासू जावयाचेही आपण गुलाम नसल्याचे उक्ती-कृतीतून सिद्ध करायला नको काय? तसे असते तर मोदींनी कुठेही अशी काही शेलकी टिका केल्यास. त्याकडे काणाडोळा केला पाहिजे. पण कारण नसताना कॉग्रेस नेते प्रवक्त्यांनी तो आरोप अंगावर ओढवून घेतला आणि आपलीच जगापुढे शोभा करून घेतली. पक्षाचे अघोषित प्रवक्ते राशिद अल्वी यांनी आधी सुरूवात केली. सासू-जावई म्हणजे सोनिया आणि वाड्रा हे आम्हाला कळत नाही काय, असे म्हणून त्यांनी प्रथम हा आळ अंगावर घेतला. मग कॉग्रेसचे आणखी एक अतिशहाणे बुद्धीमान प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मोदींच्या आईपर्यंत मजल मारली आणि त्याचा शोधपत्रकारांनी तपास करण्यापर्यंतचे आदेश देऊन टाकले. एक गोष्ट स्पष्ट आहे, की मोदींच्या आईने कुठे कष्ट उपसले वा कुणाच धुणीभांडी केली असतील वा नसतील. पण मोदी मुख्यमंत्री वा पंतप्रधान होण्यापुर्वी त्यांचे नातलग जिथे होते, त्याच अवस्थेत आजही गुजराण करीत आहेत. वाड्राचे तसे नाही. प्रियंकाशी विवाह होऊन सोनियांचा जावई होण्यापुर्वी कुठल्या मार्केटमध्ये किरकोळ नकली दागिने विकणारा हा कोणी सामान्य माणूस, पुढल्या दहापंधरा वर्षात अब्जाधीश झाला आहे आणि त्यासाठी त्याला इथली काडी तिकडे करावी लागलेली नाही. हे लोकांच्या नजरेत भरणारे सत्य आहे. ज्याचा कोणी शोध घेण्याची गरज नाही.

जावई रॉबर्ट वाड्रा हे नुसते सासुबाई सोनिया गांधींचे दुखणे नाही, तर एकूणच कॉग्रेसचे अवघड जागीचे दुखणे आहे. हरयाणा व राजस्थानात एकही पैसा खिशात नसता त्याने बळकावलेल्या कित्येक एकर जमिनी व नंतर त्याच्या व्यवहारातून खात्यात जमा झालेले अब्जावधी रुपये, कॉग्रेसला भेडसावत आहेत. म्हणूनच वाड्रा सोनियांचा जावई म्हणजे प्रत्यक्षात कॉग्रेसचाच जावई आहे. तेव्हा पक्षाला दुखणे अपरिहार्य आहे. शिवाय अल्वी म्हणतात, तसे देशाला लुटणारे सासू-जावई म्हटल्यावर नावे घेण्य़ाची गरजच काय? नुसते लुटणारे म्हटले की नावाची गरज उरत नाही, असे प्रवक्ताच म्हणतो तेव्हा अन्य कोणी कुठले पुरावे देण्याची गरज उरते काय? त्याविषयी खुलासा करता येत नसेल, तर निदान गप्प बसण्यात शहाणपणा असतो. पण देशात पावसाचा दुष्काळ असताना कॉग्रेसमध्ये अकलेचा दुष्काळ पडलेला आहे. तसे नसते तर आनंद शर्मांनी आपल्या अकलेचे तारे कशाला तोडले असते? मोदींनी चहा कधीच विकला नाही असे ठामपणे सांगताना पत्रकारांनी शोध घेण्याचे आवाहन शर्मांनी केले आहे. त्याची गरज काय? शर्मांनी पत्रकार परिषद घेण्याआधी थोडी माहिती त्यांचेच ज्येष्ठ सहकारी मणिशंकर अय्यर यांच्याकडून घेतली असती, तर मोदींनी कधी व कुठे चहा विकला, त्याचा तपशील मिळू शकला असता. दोनच वर्षापुर्वी कॉग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेली असताना, अय्यर यांनी तिथे मोदींना चहाविक्रीसाठी स्टॉल देऊ केला होता. मणिशंकर अय्यर यांना ‘वो चायवाला’ कोण इतके विचारले, तरी आनंद शर्मा यांना मोदींनी खुद्द कॉग्रेसच्या मंडपातच चहा विक्री केल्याचे पुरावे व साक्षिदार मिळाले असते की! त्यासाठी पत्रकारांना कामाला जुंपायची आवश्यकता काय? पण हे सर्वकाही शहाण्यासारखे करायचे, तर अक्कल हवी आणि त्याच्याच टंचाई व दुष्काळातून सध्या कॉग्रेस वाटचाल करते आहे ना?



एका बाजूला सासू-जावयाच्या लूटमारीचे समर्थन करायचे आणि दुसरीकडे आपणच मोदींच्या नि:स्वार्थी वर्तनाचे दाखले द्यायचे, असला मुर्खपणा कॉग्रेसमध्ये असलात तरच होऊ शकतो. मोदी आपल्या आईच्या आठवणी सांगून खोटे अश्रू ढाळतात, इतका आरोप करून थांबले असते तर शर्मांच्या वक्तव्यातली मजा राहिली असती. पण त्याच्या पुढे जाऊन शर्मा म्हणतात, मोदींनी आपल्या आईला शपथविधीलाही आमंत्रण दिलेले नाही, की पंतप्रधान निवासात पाऊल टाकू दिलेले नाही. म्हणून मोदींचे मातृप्रेम खोटे आहे. किती टोकाचा विरोधाभास आहे बघा. मोदी सोनियांवर जावयाचे लाड पुरवायला सरकारी यंत्रणा वापरली व वाकवली असा आरोप करीत आहेत. तर त्याला प्रत्यूत्तर देताना कॉग्रेस प्रवक्ता मोदी आपल्या आप्तस्वकीयांना सरकारच्या जवळपास फ़िरकू देत नाहीत, म्हणून दोष देतात. याला विनोद म्हणावे की खुळेपणा? एक बाजूला आप्तस्वकीयांसाठी सरकारी खजिना लुटणार्‍या सोनिया व दुसरीकडे आप्रस्वकीयांना सरकारी समारंभापासूनही दूर ठेवणारे पंतप्रधान! यापैकी लोकांना काय आवडू शकेल? कशाने लोक भारावतील? याला बौद्धिक व राजकीय दिवाळखोरी म्हणतात. जिथे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याची स्पर्धा चालते, त्याला कॉग्रेस आजकाल धुर्त राजकारण समजते आहे. किंबहूना मग मोदी जाणिवपुर्वक अशा खेळी करून त्यांना तोंडघशी पडायला भाग पाडतात की काय, अशी शंका येते. राहिला प्रश्न मोदींनी अमेरिकेत भारतीयांच्या समारंभात असे काही बोलणे कितपत उचित आहे हा! पहिली बाब म्हणजे तिथे घरच्याच म्हणजे भारतीयांपुढे मोदींनी हे भाषण केले होते आणि म्हणूनच जगाच्या व्यासपीठावर काही मांडले असे म्हणण्यात अर्थ नाही. पण त्याच संदर्भातले औचित्य मोदी विरोधकांना कधी लक्षात आले? गुजरात दंगलीचा आडोसा घेऊन बारा वर्षे काय चालले होते?

मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून पन्नासाहून अधिक भारतीय संसद सदस्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना निवेदन पाठवले होते. त्यातले औचित्य कोणते? तिथेच वसलेल्या वा इथून तिथे मुद्दाम जाऊन मोदी विरोधातला प्रचार करणार्‍या तथाकथित बुद्धीमंतांनी कुठले उचित कार्य केले होते? भारतात कायद्याने मोदींना कुठलाही दोषी ठरवलेले नसताना परदेशाच्या सत्तेने इथल्या राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या मोदींना अमानुष वा मारेकरी ठरवून व्हिसा नाकारल्याचा उल्लेख अभिमानाने करणारे देशातले तमाम पुरोगामी कुठले औचित्य बाळगून तसे करत होते? भारतीय घटनेने व एका राज्याच्या जनतेने निवडून दिलेल्या भारतीय मुख्यमंत्र्याची विटंबना वा बदनामी जगाच्या व्यासपीठावर करण्याने औचित्य दाखवले गेले असेल, तर एका समारंभात मोदींनी नाव टाळून केलेला सोनिया वाड्रांचा लूटमारीचा उल्लेख औचित्याला धरूनच म्हणायला हवा. किंबहूना त्याला सेक्युलर पुरोगामी पायंडा म्हणून संबंधितांनी मोदींची पाठच थोपटायला हवी. पण गंमत अशी, की कालपर्यंत आपण जे केले ते पुण्य असल्याचे दावे करणारेच आज त्यापेक्षा सौम्य कृतीसाठी मोदींना पापी ठरवायला धावत सुटले आहेत. त्यात जसे कॉग्रेसचे प्रवक्ते आहेत, तसेच अनेक पुरोगामी सेक्युलर विचारवंतही आघाडीवर आहेत. आजची त्यांची वेदना समजू शकते. पण असे आपल्या वाट्याला येऊ नये, याची काळजी पुर्वी घ्यायला हवी होती. तुम्ही ते चुकीचे पायंडे पाडलेत. मोदी आज चुकत असतील, तर ते तुमच्याच पुरोगामी सेक्युलर पायंड्याचा अवलंब करीत आहेत. तुम्हीच धार लावलेले हत्यार मोदींनी तुमच्याच विरोधात परजलेले आहे. त्यासाठी कपाळ आपटून घेण्यापेक्षा आणखी मुर्खपणा होणार नाही, असे वागण्यात शहाणपणा आहे आणि मोदींचा पाठलाग करणे सोडून नव्याने आपले पुरोगामी राजकारण जनमानसात कसे प्रस्थापित करावे, याचा विचार करणे उपकारक ठरेल. जे घडले त्याबद्दल इतकेच म्हणता येईल

वडनगरचा ढोकळा, खायी त्याला खवखवे!

नेहरू घराण्याच्या रहस्यमय गुढकथा



नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संशयास्पद मृत्यू व कागदपत्रांच्या भोवर्‍यात कॉग्रेस सध्या गटांगळ्या खाते आहे. अशा वेळी भारताचे अल्पकालीन पण लोकप्रिय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, यांच्या सुपुत्राने आपल्या पित्याच्या संशयास्पद मृत्यूची कागदपत्रे खुली करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना केल्यामुळे नवाच वादविवाद उभा रहाण्याची चिन्हे आहेत. १९६२ सालच्या भारत-चीन युद्धात नामुष्की पदरी आल्याने खचलेल्या भारतीय सेनेला शास्त्रीजींच्या अल्प कारकिर्दीत मोठे मनोधैर्य मिळाले. कारण भारतीय सेना मनाने खचली असल्याचा निष्कर्ष काढून लष्करशहा जनरल अयुबखान यांनी भारतावर हल्ला केला होता. तेव्हा नवखे व बटुमुर्ती असलेले पंतप्रधान शास्त्री गडबडून जातील, ही त्यांची अपेक्षा होती. ती चुकीची ठरली आणि भारताने अल्पावधीत ते युद्ध जिंकले. खरे तर पाकिस्तानला दाती तृण धरायची वेळ आली. त्यात मध्यस्थी करून सोवियत युनियनने ताश्कंद करार घडवून आणला होता. त्याच वाटाघाटीसाठी तिथे गेलेले शास्त्री यांचे करारावर सह्या केल्यानंतर निधन झाले. विजयीवीराप्रमाणे ताश्कंदला गेलेल्या शास्त्रीजींचे पार्थिवच मायदेशी परत आले. तेव्हापासून त्यांचा मृत्यू हा संशयास्पद विषय राहिला आहे. वारंवार त्याबद्दल विचारणा झालेली आहे आणि संबंधित कागदपत्रे जाहिर करण्याच्या मागण्याही झाल्या आहेत. डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्याने त्यावर झोड उठवली होती. या मृत्यूशी गाजलेल्या धर्मा तेजा घोटाळ्याचा संबंध जोडणारा आरोपही लोहियांनी संसदेत केला होता. नेमका तसाच आरोप इतक्या वर्षानंतर खुद्द अनिल शास्त्री यांनी केला आहे. विशेष म्हणजे आजही अनिल शास्त्री कॉग्रेस पक्षात आहेत आणि आपल्या मागणीने पक्ष अडचणीत येईल, असे त्यांना वाटलेले नाही. पण कॉग्रेस पक्षात मात्र त्यामुळे खळबळ माजलेली आहे.

कॉग्रेसचे एक प्रवक्ते व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे पुत्र संदीप दिक्षीत, यांनी अनिल शास्त्रींना दोष देण्याचाही प्रयत्न केला आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूला इतकी वर्षे उलटून जाईपर्यंत त्यांचे कुटुंबिय गप्प कशाला बसले होते, असा सवाल दिक्षीत यांनी केला आहे. ही बाब मात्र खटकणारी आहे. अनिल शास्त्री यांनी कोणावर स्पष्ट आरोप केलेला नाही, की कॉग्रेस सत्तेला दोष दिलेला नाही. म्हणजेच आपला पक्ष गुन्हेगार आहे असे अनिल शास्त्रींना आजही वाटत नसावे. मग संदीप दिक्षीत यांनी इतकी खोचक व जळजळीत प्रतिक्रीया कशाला द्यावी? जणू दिक्षित यांनी हा आरोप आपल्या पक्षावरच ओढवून घेतला आहे. म्हणूनच मग मूळ मागणीपेक्षा दिक्षीत यांची प्रतिक्रीया तपासून बघणे अगत्याचे ठरावे. कुठल्याही मुलाला आपल्या जन्मदात्याच्या शंकास्पद मृत्यूची माहिती मागण्याचा अधिकार नाही काय? असेल तर अनिल शास्त्रींच्या मागणीत खटकण्यासारखे आहे तरी काय? आजही राहुल गांधी आपली आजी इंदिराजी व पिता राजीव गांधी यांच्या घातपाती हत्येविषयी राजकारण करत असतील. तर दुसर्‍या पंतप्रधानाच्या कुटुंबाला साधी मृत्यूची कारणेही मागण्याचा अधिकार का असू नये? त्यात कॉग्रेसच्या कुणा नेत्याने राजकारण का शोधावे? चोराच्या मनात चांदणे म्हणतात, त्यातलाच हा प्रकार नाही काय? ४५ वर्षे शास्त्री कुटुंब गप्प बसले, तर त्याची कारणे विचारताना परिस्थितीही तपासणे भाग आहे. नेताजींचे कुटुंबिय पहिल्या दिवसापासून तशी मागणी करीत होते. त्यांच्या हाती काय लागले होते? संदीप दिक्षीत यांनी त्याचाही खुलासा करावा. तात्काळ शास्त्री कुटुंबाने तशी मागणी केली असती, तर तेव्हाच्या इंदिरा सरकारने कागदपत्रे खुली केली असती काय? नसेल तरा असला खुळचट सवाल दिक्षीतांनी विचारावाच कशाला? की खायी त्याला खवखवे म्हणायचे?

कारण उघड आहे. शास्त्री कुटुंब नव्हेतरी अनेकांनी त्या शंकास्पद मृत्यूच्या चौकशीची वेळोवेळी मागणी केलेली होती आणि गुपित म्हणून ती फ़ेटाळली गेली होती. पण ते गुपित राखण्यात नेहरू कुटुंबाचाच हात आहे, असा कोणी दावा केलेला नाही. तेव्हाचे आक्रमक समाजवादी नेते डॉ. लोहियांनी तशी मागणी केली होती आणि त्यामध्ये घोटाळेबाज डॉ. धर्मा तेजा गुंतले असल्याचा संशयही व्यक्त केला होता. त्यावर तात्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग यांना संसदेत खुलासा करावा लागला होता. त्यामुळे संदीप दिक्षीत समजतात तितका तो पोरकट विषय नाही. पण कॉग्रेस म्हणजे नेहरू कुटुंब व नेहरू कुटुंब म्हणजे कॉग्रेस, अशी जी घट्ट समजूत आहे, त्यातून दिक्षीत यांची तात्काळ प्रतिक्रीया आलेली आहे. अगदी कालपरवा जयंती नटराजन यांनी पक्षाचा राजिनामा देऊनच आपल्या विरुद्ध राहुलनी केलेल्या कुजबुजीचा खुलासा मागितला होता ना? त्यातून कळते की शास्त्री कुटुंब इतकी वर्षे गप्प कशाला होते. नटराजन यांचेही तीन पिढ्या कॉग्रेसशी संबंध होते. पण त्यांना आपल्यावरच्या बिनबुडाच्या आरोपाचा खुलासा मागण्यासाठीही सोनियांच्या हातून सत्ता जाण्याची प्रतिक्षा करावी लागली. अन्यथा खुलासा विचारण्याची हिंमत झाली नव्हती. ही बाब लक्षात घेतली, तर शास्त्री वा अन्य कुटुंबे आप्तस्वकीय नेहरू कुटुंबाच्या दहशतीखाली कशाला असायचे, त्याचा खुलासा होऊ शकतो. दिक्षीत ज्या वेगाने शास्त्री कुटुंबाच्या हेटाळणीला पुढे सरसावले, त्यातूनच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. कारण हा अनुभव शास्त्री वा नटराजन यांच्यापुरता मर्यादित नाही. सीताराम केसरी कॉग्रेस अध्यक्षपदी असताना त्यांचे पद सोनियांना हवे, म्हणून केसरींना जीव मुठीत धरून पक्ष कार्यालयातून पळावे लागले होते. अशा पक्षात व त्यांच्याच हाती सत्ता असताना कुठलाही खुलासा वा प्रश्न विचारण्यासाठी वेळ लागणारच ना?

अर्थात संदीप दिक्षीत यांनी केली ती नुसती सुरूवात आहे. ही मागणी अनिल वा सुनील शास्त्री यांनी अशीच लावून धरली, तर लौकरच लालबहादूर शास्त्री हे देशासाठी कसा धोका होते, त्याचीही वर्णने आपल्याला ऐकायला व वाचायला मिळू शकतील. कारण मागल्या सहा सात दशकात एक नेहरू घराणे सोडल्यास बाकी या देशासाठी कोणी उपकारक वा उद्धारक होऊच शकलेला नाही, हा मुळचा राजकीय सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला धक्का बसणार असेल, तर कोणालाही व कशालाही देशद्रोही व देशविघातक ठरवण्याचे पुरावे व तर्क सज्ज असतात. कालपरवापर्यंत नेताजींचा विषय पटलावर असताना शास्त्रीही गृहमंत्री होते आणि नेताजींच्या कुटुंबावर पाळत ठेवली गेली, तर त्याला शास्त्रीही जबाबदार होते असे युक्तीवाद झालेले आहेत. आता शास्त्रींच्या शंकास्पद मृत्यूचा विषय आला आणि त्यात पुन्हा कम्युनिस्ट रशियाचे नेतृत्व गुंतले असेल, तर बघायलाच नको. आपोआप शास्त्रीजी प्रतिगामीही ठरवले जाऊ शकतील. मात्र लोक अशा खुलासे व युक्तीवादाला बधणार नाहीत. कारण सहा दशके लोक असले खुलासे व मखलाशी ऐकून थकले व कंटाळले आहेत. किती बाबतीत योगायोग व रहस्ये असावीत, याला मर्यादा असतात. वाड्राच्या पित्याचाही मृत्यू संशयास्पद होताच. त्याविषयी कोणाला कधी कुतूहल वाटलेले नाही. हे सगळे शंकास्पद मृत्यू नेहरू कुटुंबाच्याच अवतीभवती कशासाठी होत असावेत? त्या काळात एका बॅन्केतून साठ लाखाची कॅश काढली म्हणून नगरवाला प्रकरण गाजले होते आणि त्यात इंदिराजींचे नाव घेतले गेले होते. नगरवाला अटकेत असताना संशयास्पद रितीने मरण पावला होता. इथे शास्त्रीजींच्या सोबतचा व्यक्तीगत डॉक्टर अपघातात मरतो आणि स्वीय सचिव अपघाताने स्मृती गमावून बसतो. तर संदीप दिक्षीत विचारतात इतके दिवस गप्प कशाला बसलात? बहुधा मोदींसारखा नेहरू कुटुंबाला न घाबरणारा कोणी सत्तेत येण्याची प्रतिक्षा करीत, हे लोक गप्प बसले असावेत

Monday, September 28, 2015

पुरोगामी मित्र सैरभैर कशाला झालेत?

कोण कुठला भाऊ तोरसेकर? (उत्तरार्ध)



ब्लॉग, फ़ेसबुक हा सोशल मीडियाचा अनुभव खरेच आनंददायी आहे. आजवर कुठल्याही वृत्तपत्रात लिहीले असले तरी आपल्यासाठी कोणी वृत्तपत्र घेतो किंवा वाचतो, असा आत्मविश्वास नव्हता. ब्लॉगला मिळत चाललेला वाचक केवळ आपल्यासाठी आहे, ही जाणिव खुश करणारी होती. त्यानंतर तेरा चौदा महिने ‘उलटतपासणी’ सदर चालू होते आणि त्यामध्ये बहुतेक सेक्युलर पुरोगामी पत्रकार व माध्यमांची धुलाई अधूनमधून चालू होती. त्याच्या वाचकाला एक प्रश्न सतावत होता, की ह्या पत्रकाराला कुठल्या बाहिनीवर का बोलावत नाहीत? कारण वाहिन्यांवरील चर्चा बघून त्यातला मुर्खपणा व खोटेपणाही मी तपशील व पुरावे देवून मांडत होतो. मात्र इतके करूनही कोणा संपादक पत्रकाराने माझ्या आरोप वा टिकेला उत्तर देण्य़ाची तसदी घेतली नाही. किंबहूना दुर्लक्षित करणे, हाच त्यांचा बचाव राहिला. बौद्धिक भाषेत त्याला अनुल्लेखाने मारणे असे म्हणतात. प्रत्यक्षात त्यात काडीमात्र बुद्धीवादाचा संबंध नाही. तो निव्वळ पळपुटेपणा होता. कारण जे खुलासे मी करत होतो, किंवा खोटेपणा समोर आणत होतो, त्याचा प्रतिवाद करायला जागाच नव्हती. म्हणूनच ‘पुण्यनगरी’त मी कितीही हजामत केली, तरी ती पुरोगामी पत्रकारांकडून दुर्लक्षितच राहिली. मलाही त्याचे कौतुक नव्हते. कारण या राज्यव्यापी वृत्तपत्राने मला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेलेले होते आणि मक्तेदार माध्यमातील पुरोगामी शहाण्यांचे पितळ मी पुरते उघडे पाडलेले होते. मात्र त्यातून जो चोखंदळ वाचक माझ्याकडे आकर्षित झाला होता, त्याची भूक भागत होती. मी त्यावरच समाधानी होतो. पुढे काही कारणाने ‘पुण्यनगरी’तले माझे उलटतपासणी सदर बंद झाले. त्याची कारणेही स्पष्ट आहेत. कुठल्याही व्यवसायात आर्थिक तोल संभाळावा लागतो. आज वृत्तपत्र व माध्यमात तोटा अफ़ाट झाला आहे. वृत्रपत्राच्या खपावर किंवा वाहिनीच्या लोकप्रियतेवर त्याचे अर्थकारण चालत नाही. त्यासाठी अतिरिक्त पैसा लागतो. म्हणून काळापैसावाले व चिटफ़ंडवाले यांच्या हाती माध्यमांची सुत्रे गेलेली आहेत. संपादक वा बुद्धीमान पत्रकाराची कुणाला गरज उरलेली नाही. उलट सत्ताधारी वा राजकारणी यांच्या दारी जाऊन मालकाची कामे निस्तरू शकणारा कारभारी संपादक पत्रकार मोलाचा झाला आहे. अशा जीवघेण्या स्पर्धेत कुठलाही अतिरिक्त पैसा वा काळापैसा हाती नसलेल्या शिंगोटे याच्यासारख्या वृत्तपत्र मालकाने माझ्या प्रतिकुल लेखन स्वातंत्र्यासाठी आपला धंदा पणाला लावावा, असे मी म्हणणार नाही. माझे लिखाण त्यांना अडचणीचे झाले आणि छापील स्वरूपातील ‘उलटतपासणी’ २०१३ च्या पुर्वार्धात थांबली. पण मला फ़रक पडत नव्हता. आर्थिक उत्पन्न थांबले, तरी लिहीण्यासाठी नवे माध्यम ब्लॉगच्या रुपाने उपलब्ध झाले होते.

सहाजिकच संगणक आणि मोकळा वेळ मी ब्लॉग लिहीण्यावर खर्ची घालायला आरंभ केला. अधिक मधल्या वर्षभरात फ़ेसबुकमुळे मित्रांचा गोतावळा वाढला होता आणि त्यांनीही आपापल्या मित्रांपर्यंत मला नेऊन पोहोचवले होते. दिवसागणिक ब्लॉगची लोकप्रियता वाढत होती. खरे तर मला अशा वाचकांचे आजही कौतुक वाटते. हातात पुस्तक वा वर्तमानपत्र घेऊन वाचणे जितके सोपे आहे, त्यापेक्षा टॅब, संगणक वा अन्य मार्गाने इंटरनेटवर असलेला मजकूर वाचणे कटकटीचे आहे. आजही मी स्वत: फ़ारसे अशा माध्यमातून वाचू शकत नाही. जे वाचतात, त्यांना म्हणूनच मी साक्षात दंडावत घालतो. शिवाय माझ्या लेखासाठी इतके लोक असे कष्ट घेतात, त्याचेही मला नवल वाटते. आरंभी मला त्याची गंमत लक्षात आलेली नव्हती. पण मध्यंतरी एका मित्राने वाचल्या जाणार्‍या किंवा ब्लॉगला भेट देणार्‍यांच्या मोजणीची सोय ब्लॉगला जोडली आणि माझ्यावर थक्क व्हायची वेळ आली. २०१३ च्या एप्रिलपासून मी पुर्णवेळ ब्लॉगवर लक्ष केंद्रित केल्यापासून दोनही ब्लॉगला पंधरा लाखाहून अधिक लोकांनी भेट दिली किंवा माझे लेख वाचले, हे अजून खरे वाटत नाही. पण ते सत्य आहे, कारण तंत्रज्ञान खोटे बोलत नाही. ‘जागता पहारा’ आणि ‘उलटतपासणी’ अशा दोन्ही ब्लॉगची वाचकसंख्या एव्हाना पंधरा लाखाला पार करून गेली आहे. सगळी गडबड तिथेच असावी, हे म्हणूनच लक्षात आले. पुण्यनगरीत लिहीत होतो, तेव्हा माझे लेख काही लाख लोकांपर्यंत प्रतिदिन जात होते. त्याच्या तुलनेत ब्लॉगची वाचक संख्या नगण्य आहे. पण हा केवळ माझा वाचक आहे. पण मला वाटलेले कुतूहल असे, की जेव्हा माझे लिखाण लाखो लोकांपर्यंत रोज जात होते, तेव्हा खरे तर पुरोगामी सेक्युलर संपादक पत्रकारांनी माझ्याविरोधात आघाडी उघडली पाहिजे होती. कारण ती संख्या अधिक होती. तिच्या तुलनेत ब्लॉगची ताकद वा संख्या अजिबात नगण्य आहे. मग तेव्हा गप्प बसलेल्यांनी अलिकडे माझ्या नगण्य ब्लॉगची इतकी दखल कशाला घ्यावी? ज्यांच्या हाती वाहिन्या व लक्षावधी खपाची प्रमुख वृत्तपत्रे आहेत, त्यांनी एका नगण्य ब्लॉगचा इतला धसका कशाला घ्यावा? मागल्या चारपाच महिन्यात अनेकांनी माझ्या ब्लॉगच्या लेखावर शिवराळ टिका केली, आक्षेप घेतले. ह्यामागे काय रहस्य आहे?

कल्पना करा. मोठी तीनचार वृत्तपत्रे व वाहिन्यांवरचे हे पुरोगामी पत्रकार आहेत, ज्यांनी माझ्यावर असे शिवराळ हल्ले केलेत. त्यांच्या वाहिन्यांचे प्रतिदिन प्रत्येकी प्रेक्षकच दहाबारा लाख तरी असतील. म्हणजे एकत्रित त्यांचा प्रेक्षकच पन्नास लाखाच्या घरात दैनंदिन आहे. दुसरीकडे मोठी वृत्तपत्रे घ्या. त्यांच्या खपाचे आकडे नेहमीच मोठे असतात. एकत्रित २०-३० लाख दैनंदिन प्रती छापल्या जातात. म्हणजे गेला बाजार रोज एक कोटी मराठी लोकांपर्यंत पोहोचू शकणारे हे पुरोगामी संपादक पत्रकार वर्षभरात साडेतीनशे कोटी लोकांपर्यंत जात असतील. त्यांच्या साडेतीनशे कोटींच्या तुलनेत माझा ब्लॉग अवघा दोनचार लाख लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कुठे म्हणून तुलना होऊ शकते काय? किस झाडकी पत्ती, म्हणून दुर्लक्ष करावा असाच माझा हा ब्लॉग किंवा त्यावरील लिखाण नव्हे काय? मग त्यांनी त्याची दखल कशाला घ्यावी? त्यांना अशा एका क्षुल्लक ब्लॉगवर काय लिहीले जाते वा कुठले मुद्दे येतात, त्याची दखल घेण्य़ाचे कारणच काय? इतकी भक्कम व निर्विवाद साधने ज्यांच्या पुरोगामी लढाईसाठी सज्ज आहेत, त्यांनी एका क्षुल्लक ब्लॉगवर इतका कल्लोळ व गदारोळ उठवण्याचे कारणच काय? मला मागले काही महिने हा प्रश्न सतावत होता. आधी मी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षही केले. पण लागोपाठ मोठ्या पदावर बसलेले संपादक व सहसंपादक माझ्यावर शिवराळ हल्ले करू लागले, तेव्हा त्यांच्याकडे पाठ फ़िरवणे शक्य नव्हते. त्यांचा समाचार घेणे भाग होते. त्याप्रमाणे ती चोख समाचार घेतलाच. पण तरीही यांनी इतके कशाला विचलीत व्हावे, त्याचे उत्तर मला सापडत नव्हते. मनात आत कुठे तरी त्याची कारणे शोधत होतो. कारण अकस्मात सुरू झालेले हे हल्ले निर्हेतूक नक्कीच नसणार. त्यामागे काहीतरी कारण असणारच, याचीही खात्री होती. मात्र कारण सापडत नव्हते.

उद्या अमेरिकेचा अध्यक्ष बराक ओबामा याने मालदिव वा मॉरीशससारख्या एका बेटवजा देशावर हल्ला करायला मोठ्या युद्धनौका सज्ज केल्या, तर कोणालाही गंमत वाटेल ना? अशा तमाम मोठ्या माध्यमातील बड्यांनी माझ्या विरुद्ध आघाडी उघडण्याचे म्हणूनच मला कुतूहल वाटले. यांचे मोठे गच्च जाडजुड पगार, सगळी साधने त्यांच्यापाशी, करोडोचा वाचक त्यांच्या पुरोगामी प्रवचनासाठी मालकाने काळा पैसा ओतून सज्ज ठेवलेला. मग त्यांनी एका फ़डतूस ब्लॉगवरच्या लेखांनी असे विचलित कशाला होऊन जावे? जसजसा मी त्याची कारणे शोधत गेलो आणि त्याचे संदर्भ-संबंध जोडत गेलो, तेव्हा अशा पुरोगामी सेक्युलर माध्यमांचा पोकळपणा अधिकच स्पष्ट होत गेला. त्यांच्यातली निरर्थकता समोर येत गेली. त्यांच्यातला खोटेपणा त्यांनाच भयभीत करत असल्याचे लक्षात येत गेले. त्यातला नुसताच पोकळपणा नव्हे, तर अगतिक पोरकेपणाही नजरेस येत गेला. आज अशा मोठ्या माध्यमातले बहुतांश संपादक-पत्रकार आपली ओळख विसरून गेलेत आणि त्यांच्यातला आत्मविश्वास पुरता लयास गेला आहे. आपण खोटे आहोत, हे त्यांना आधीच माहिती होते. पण आता त्यांचा खोटेपणा लोकांनाही उमगल्याने वाचकही पाठ फ़िरवू लागल्याने पुरोगामी खेळ धोक्यात आलेला आहे. त्यामुळे हे भयभीत झाले आहेत. माझ्या लेखन, मुद्दे व भूमिकांनी नव्हे; इतकी त्यांच्याच खोटेपणाने त्यांना धडकी भरली आहे. त्यातूनच मग प्रतिहल्ल्याची प्रतिक्रिया उमटलेली आहे. वैफ़ल्यातून आलेली ती आक्रमकता आहे. पत्रकार, वृत्तपत्र व माध्यम म्हणून आपण विश्वासार्हता गमावून बसल्याची जाणिव, त्यांना भयभीत करून राहिलेली आहे. म्हणून त्यांच्याविषयी कुठलाही व्यक्तीगत आरोप वा आक्षेप मी घेतला नसताना, अशा पत्रकारांनी माझ्यावर व्यक्तीगत शिव्यागाळी व गरळ ओकण्याचा उद्योग केला. माझे सडेतोड ब्लॉग त्यांना त्यांच्यावरचाच हल्ला वाटून उमटलेली ती प्रतिक्रिया आहे. म्हणतात ना चोराच्या मनात चांदणे? (संपुर्ण)

Sunday, September 27, 2015

कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)



१० ऑगस्ट रोजी माझ्या ‘जागता पहारा’ ब्लॉगने दहा लाखाचा पल्ला ओलांडला आणि पुढल्या ४३ दिवसात २२ सप्टेंबर रोजी आणखी दोन लाखाची त्यात भर पडून बारा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. नेमके सांगायचे तर पंचवीस महिन्यात इतकी झेप झाली. पण त्यात मागच्या सात-आठ महिन्यात ब्लॉगचे वाचक कमालीचे वाढत चालले आहेत. पण त्याच दरम्यान अकस्मात काही विपरीत प्रतिक्रीया व अस्वस्थ आत्मे सतावू लागल्यासारखे अंगावर येऊ लागले. म्हणून त्यावर सविस्तर लिहायचा विचार केला.

मागले काही दिवस एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली, की अनेक तथाकथित पुरोगामी, सेक्युलर सोशल माध्यमातून माझ्यावर व्यक्तीगत हल्ला करू लागले आहेत. त्यातही अनेक पत्रकार व मोठ्या माध्यमातील भुरट्यांचा समावेश आहे. खेरीज त्यांचे सहप्रवासी म्हणजे त्यांच्यातले अन्य टोळीबाजही समाविष्ट आहेत. अशा लोकांनी अकस्मात माझ्याविरुद्ध आघाडी उघडल्यासारखे हल्ले कशाला सुरू करावेत, याचे कोडे मला पडलेले आहे किंवा होते. कारण माझ्या लिखाणातून ज्या भूमिका वा मुद्दे मी मांडत असतो, त्यात नवे असे काहीच नाही. मागल्या तीन दशकात सातत्याने मी हेच करत आलेलो आहे. ते म्हणजे जे काही प्रचलित व प्रस्थापित माध्यमातून प्रसिद्ध होत असते, किंवा टाहो फ़ोडून सांगितले जात असते, त्याची उलटतपासणी करणे. त्यात लपवल्या गेलेल्या दुसर्‍या बाजूवर प्रकाश टाकणे, इतकीच माझी भूमिका राहिली आहे. मग विषय शिवसेना, भाजपा, संघ वा हिंदूत्वाचा असो, किंवा मोदी-ठाकरेंचा विषय असो. त्याविषयी जेव्हा काहूर माजवले जाते, तेव्हा त्यामध्ये सराईतपणे जी माहिती वा तपशील दडवलेला असतो, त्याला समोर आणायचे काम मी अगत्याने केलेले आहे. अर्थात माझ्या हाताशी साधने म्हणाल तर काहीच नाहीत.

आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते.

अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे.

दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो.

पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले.

गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:)

Saturday, September 26, 2015

रानटी युगाकडे वाटचाल

 

चार दशकांपूर्वी गाजलेला एक हिंदी चित्रपट लोकांना अजूनही आठवत असेल. पडोसन असे त्याचे नाव होते आणि मेहमूद, सुनील दत्त व किशोरकुमार यांच्या अप्रतिम अभिनयाने तो चित्रपट सजला होता. त्यातला मेहमूद एक दाक्षिणात्य संगीत नृत्यशिक्षक म्हणून नायिकेला प्रभावित करू बघत असतो आणि तिचा शेजारी पहिलवान भोला तिच्या प्रेमात पडलेला असतो. हा दाक्षिणात्य मेहमूदने छान रंगवला होता. एकदा त्याला थेट पहिलवानाला भिडण्याचा प्रसंग रंगवला आहे. तो पहिलवान भोला याला दम भरत असतो आणि एकही अक्षर न बोलता भोला त्याच्या अंगावर येतो. तर मास्टर मेहमूद त्याला धमकावतो, बोला, आगे मत आना, असे दोनतीनदा सांगून काहीच परिणाम होत नाही. तेव्हा शेपूट घालून हा मास्टरजी म्हणतो, तुम आगे आयगा तो हम पिछे जायगा. थोडक्यात काय उसने अवसान आणून त्याची डाळ शिजत नाही. हा त्या चित्रपट कथेतला विनोद असेल. पण वास्तव जीवनातही आपण असे अनुभव घेत असतो आणि अगदी जागतिक राजकारणातही त्याचीच प्रचीती येत असते. मध्यपूर्व आशियात तेच चालू आहे आणि अगदी युरोपातही त्याचेच पडसाद उमटत आहेत. इराक व सिरीयात युरोपीयन देशांनी जे उद्योग केले त्यातून अराजक माजले आणि आता तिथून निर्वासित म्हणून लक्षावधी लोकांचे लोंढे युरोपात घुसत आहेत. त्यांना थांबवण्याचे रोखण्याचे इशारे देऊन काहीही उपयोग झालेला नाही आणि आता तर त्याही दुखण्यावर मीठ चोळायला म्हणून की काय, राष्ट्रसंघातल्या शहाण्यांनी सौदी अरेबियाच्या प्रतिनिधीला मानवाधिकाराच्या शाखेचे प्रमुख नेमले आहे. ही सध्या जागतिक लोकशाही व उदारमतवादाची शोकांतिका बनू लागली आहे.

आपल्या धर्माचे व आपलेच शेजारी असून सौदी वा अन्य अरबी देशांनी एकाही निर्वासिताला सामावून घेतलेले नाही. उलट तिथे कोणी घुसू बघेल तर त्याला जिवानिशी मारण्याचे इशारे दिले आहेत. आणि ते इशारे शब्दश: खरे आहेत. कारण जिनिव्हा कराराने मानवाधिकार जाहीरनामा अस्तित्वात आला. त्यावर सौदीसह कुठल्याच अरबी देशाने सही केलेली नाही. म्हणूनच मानवाधिकार म्हणून अन्य लोकशाही देशात जे थोतांड चालते, ते सौदीमध्ये होत नाही. थोडक्यात सौदीमध्ये मानवाधिकार अस्तित्वात नाहीत; आणि अशा देशाच्या प्रतिनिधीने आता जागतिक मानवाधिकार शाखेचे म्होरकेपण सांभाळायचे आहे. श्रीलंकेत तामिळी वाघांचा बंदोबस्त करताना मानवाधिकाराचे हनन झाले, अशी तक्रार करायची आणि त्याचवेळी सौदीमध्ये नित्यनेमाने मानवाधिकार पायदळी तुडवले जातात, त्यांच्या हाती त्याच विषयातील नेतेपद सोपवायचे. याला विनोद म्हणायचे की जखमेवर मीठ चोळणे म्हणावे? कालपरवाच सौदी राजांनी म्हणजे तिथल्या राजेशाहीने आणखी आठ-दहा फाशी देणार्‍यांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. फाशी म्हणजे तलवारीने एकाच घावात मुंडके उडवणे होय. त्यासाठी अतिशय कुशलता आवश्यक असते. ज्याला पुढारलेल्या देशामध्ये अमानुष मानले जाते, तशी शिक्षा सौदी मोठ्या अभिमानाने देत असते. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने नव्या जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजेच मानवाधिकाराचेच मुंडके उडवण्यात ज्याची ख्याती आहे, अशा देशाच्या हाती आता जगाच्या मानवाधिकाराचे पद देण्यात आले आहे. वास्तविक ही नवी बातमी नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण त्याविषयी कमालीची गोपनीयता बाळगली गेली.

सध्या जगाला सर्वात मोठा मानवी पेचप्रसंग भेडसावतो आहे, तो सिरिया, इराकच्या निर्वासितांचे युरोपातील स्थलांतर! तिथे इतक्या लक्षावधी लोकांना सामावून घेण्याची व्यवस्थाही नाही की पैसा नाही. पण त्याचवेळी एकट्या मक्केत हज यात्रेसाठी येणार्‍या पर्यटकांसाठी तिथल्या प्रशासनाने २० लाख लोकांसाठी सुविधा उभारलेली आहे. म्हणजेच युरोपऐवजी निर्वासित तिथे मक्केत गेले, तर विनासायास त्यांना वास्तव्य करता येईल. शिवाय मुस्लिमच असल्याने मक्केत त्यांना जाण्यात कुठली अडचण येऊ शकत नाही. पण तिकडे एकाही निर्वासित मुस्लिमाला फिरकू देण्याची मुभा सौदीने दिलेली नाही. किंबहुना त्यापासून हात झटकले आहेत. म्हणजेच विषय इस्लाम धर्माचा असो किंवा मानवतेचा असो, दोन्ही बाजूने सौदी अरेबियाने नाकर्तेपणाचीच साक्ष दिलेली आहे. तरी मानवाधिकार पदावर सौदीलाच बसवण्यात आले आहे. मग प्रश्‍न असा पडतो, की मानवाधिकार म्हणून जे उद्योग राष्ट्रसंघात चालतात, ते पंक्तिप्रपंच करणारे नाहीत काय? भारतातल्या दंगली वा श्रीलंकेतील युद्धस्थिती यावर भिंग हातात घेऊन गुन्हे शोधणार्‍या राष्ट्रसंघातील मानवाधिकारी शहाण्यांना, सौदीतले गुन्हे कशाला दिसत नाहीत? तर त्याचे उत्तर सोपे आहे. तिथे त्यांना दिसत सगळे असले तरी काही बघायचेच नाही. आणि बघायचेच नसल्याने दिसत नाही, की त्याविषयी बोललेही जात नाही. आता देखील निर्वासितांना सामावून घेण्यासाठी युरोपवर दबाव आणला जात आहे. पण मानवाधिकार पद सौदीला बहाल करताना त्यांच्यावर निर्वासित पुनर्वसनाचा दबाव कोणी आणलेला नाही. कारण सौदी दाद देणार नाही याची पुरेपूर खात्री आहे. पण उद्या तशी वेळ आली, तर भारतावरही दबाव आणला जाऊ शकतो. कारण आपल्या देशानेही जिनिव्हा करारावर सह्या केल्या आहेत. जणू तुम्ही चांगल्या गोष्टीला होकार भरलात, हाच गुन्हा आहे. सौदी वा अन्य मुस्लिम अरब देशांनी त्याला नकार दिला असल्याने त्यांना अमानुष वागूनही सन्मान मिळू शकतो. याला आजकाल सेक्युलर वा उदारमतवाद संबोधले जाते. ही बाब लक्षात घेतली, तर याकुब मेमन वा अफजल गुरू यांच्या फाशीविषयी इथे आक्रोश कशासाठी चालू होता, त्याचा उलगडा होऊ शकतो.

आपल्या देशातले महान चित्रकार एम. एफ. हुसेन यांना नुसती कोर्टाने नोटिस दिल्यावर ते मायभूमी सोडून पळाले होते आणि मोठ्या उदार मनाने कतार नावाच्या अरबी देशाने त्यांना तिथले नागरिकत्व बहाल केले होते. हा कतार देश त्याच सौदी अरेबियाचा शेजारी आहे आणि त्यानेही जिनिव्हाच्या मानवाधिकार जाहीरनाम्यावर सही करण्यास नकार दिलेला आहे. तिथे कोणी धर्मभावना दुखावल्या, धर्माचे विडंबन केले, तर तात्काळ त्याच्यावर मृत्युदंड ठोठावला जातो. अर्थात इस्लाम विषयक धर्मभावना दुखावणारी असायला हवी, अन्य कुठल्याही धर्माची तुम्ही मस्त विटंबना करू शकता. अशा देशात कलास्वातंत्र्य जोपासण्यासाठी हुसेन कायमचे निघून गेले. पण इथे मानवाधिकार असूनही हुसेन यांना जिवाचे भय सतावत होते. त्यांना कोणाची भीती भेडसावत होती? कोर्टाच्या नोटीसची! म्हणजे इथे न्यायव्यवस्थाही भयावह आहे. पण कतारमध्ये नुसत्या इस्लामच्या धर्मभावनांना धक्का बसला तरी मुंडके उडवले जाऊ शकेल. त्याला सुरक्षित देश म्हणतात. याला सेक्युलर मानवी हक्क असे संबोधले जाते. त्याच अरबी आघाडीमध्ये कतार आहे तसा सौदी अरेबियाही सहभागी आहे. तिथल्या हुसेनची अवस्था काय आहे? तिथला हुसेन म्हणजे राईफ बदावी नावाचा लेखक ब्लॉगर! त्याने लोकशाही हवी म्हणून लेखन केले, तर सौदी सत्तेने त्याला एक हजार चाबकाचे फटके मारायची सजा फर्मावली. त्यातून राईफ बचावला म्हणून आज सौदी तुरुंंगात सडतो आहे. त्याची पत्नी इन्साफ हैदर परदेशी राहून पाश्‍चात्त्य मानवधिकार संस्थांकडे आपल्या नवर्‍याला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करते आहे. तर तिला याच पाश्‍चात्त्यांनी कुठला न्याय दिला? तिच्या लोकशाहीवादी नवर्‍याला चाबकाने फटकावणार्‍यांना मानवाधिकाराचे जगातील सर्वात मोठे पद बहाल केले. ही आजच्या राष्ट्रसंघ व तो चालवणार्‍या, पुस्तकी पांडित्य सांगणार्‍यांच्या हातातल्या संघटनांची दुर्दशा आहे. त्यांचे विचार मानणार्‍यांना तिथे शिक्षा भोगावी लागते आणि त्यांना झुगारणार्‍यांचा सन्मान होतो. एकूणच राष्ट्रसंघ हे आता बुजगावणे झाले आहे.

पावणे दोनशेहून अधिक लहान-मोठे देश राष्ट्रसंघाचे आज सदस्य आहेत आणि त्यातले बहुतांश देश लोकशाही मानत नाहीत. शंभराहून अधिक देशात हुकूमशाही किंवा लष्करशाही नांदते आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रसंघ काही करू शकलेला नाही. पण जे कुठलीही लोकशाही तत्त्वे मानत नाहीत वा पायदळी तुडवतात, त्यांनाही सदस्य करून घेण्यात आले आहे. मात्र, अशा बेछूट देशाच्या हुकूमशहा लष्करशहांनी अन्य कुठल्या लोकशाही देशाची आगळिक केली, तर त्यांना मोकळीक आहे. कारण त्यांना कुठल्या लोकशाही, मानवाधिकार कराराने बांधलेले नाही. पण चुकून कुणा लोकशाही देशाने त्याच लोकशाही विहीन देशाची आगळिक केली, तर राष्ट्रसंघ त्यांचा कान पकडतो, अशी स्थिती आहे. आपल्या देशातील बहुसंख्य जनता वा बहुमताची गळचेपी करणार्‍यांचे आज राष्ट्रसंघात बहुमत आहे आणि त्याचाच आधार घेऊन हे देश लोकशाही देशांना ओलिस ठेवत असतात. सोप्या भाषेत वर सांगितल्याप्रमाणे भोलावर धमक्यांनी उपयोग होत नाही आणि भोला पहिलवान पुढेच येत राहिला, मग माघार घेण्याला आता राष्ट्रसंघातील मुत्सद्देगिरी म्हटले जाते. तसे नसते तर सौदीला इतके मोठे व महत्त्वाचे पद मिळूच शकले नसते. शिवाय गंमत बघा, त्याविषयी कमालीची गोपनीयता पाळली गेली. अर्थात त्याचे दुष्परिणाम सामान्य लोकांना भोगावे लागत असतात. सुरक्षित सभागृहात वा केबिनमध्ये बसून गप्पा ठोकणार्‍यांना त्याच्या झळा लागत नसतात. उदाहरणार्थ सिरियन निर्वासितांची समस्या युरोपीयन महासंघातल्या बुद्धिमंत मुत्सद्दी लोकांनी कागदावर सोडवून टाकली आहे. दीड लाख निर्वासित प्रत्येक देशाने प्रमाणात सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे. पण त्यासाठीचा आर्थिक बोजा कोणी उचलावा? या घुसखोरांनी दंगली माजवल्या आहेत, त्याच्या जखमा कोणी अंगावर घ्यायच्या? त्याची मुत्सद्दी लोकांना फिकीर नाही. असा एकूण कारभार आहे. जगभर हेच चालले आहे, यात नवे काहीच नाही.
आपल्याकडे आपण ज्यांना पुरोगामी वा सेक्युलर संबोधतो, तीच ही युरोपमध्ये मिळणारी राजकीय प्रजाती आहे. तिला सामान्य लोकांच्या जगण्यामरण्याशी काडीमात्र कर्तव्य नसते. आपने सिद्धांत व पुस्तकी पांडित्य यानुसार हे समस्या शोधतात व निकालात काढतात. त्याचे वास्तवात काय झाले याची गंधवार्ता त्यांना नसते. मुंबईत स्फोट झाले व शेकडो माणसे मारली गेली, त्यांच्या जिवाला कवडीची किंमत नसते. पण त्यात कोणी संशयित आरोपी, गुन्हेगार, कारस्थानी पकडला गेला, म्हणजे विनाविलंब इथले मानवाधिकारवादी जागे होतात ना?

पकडलेल्या आरोपीवर न्यायालयाकडून अन्याय होऊ नये वा पोलिसांकडून अत्याचार होऊ नये, म्हणून मानवाधिकारी लोकांची किती धावपळ होते ना? याकुब वा अफजल गुरूसाठी किती जाणत्यांनी रात्री जागवल्या ते आपण पाहिले ना? आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्यासाठी सामान्य माणसे किडा-मुंगीपेक्षा अधिक मोलाची नसतात. अशा सामान्य माणसांचे जीव कधीही, कुठेही गंमत म्हणून कोणीही घेऊ शकतो, तो खरा माणूस असतो आणि म्हणून त्याला असतात, ते मानवाधिकार असतात. त्याची जपणूक तितकेच अमानुष वागू शकणारे सौदी राजेच घेऊ शकतील ना? मग त्यांच्याकडे असे महत्त्वाचे अधिकार सोपवायला नकोत का? सगळा निव्वळ पोरखेळ झाला आहे. आता लवकरच या पोरखेळाने युरोपीयन देशातील सामान्य लोकांना घरातून बाहेर पडून दंगली करायची पाळी येणार आहे. कारण आपल्याच देशात व आपल्याच घरात शांतपणे जगायचीही सोय तिथल्या उदारमतवादी मानवाधिकाराने शिल्लक ठेवलेली नाही. कुणी राहात्या घरात घुसून तुमच्यावर बलात्कार करणार असेल, तुम्हाला लुटणार असेल वा प्राणघातक हल्ले करणार असेल, तर त्या झुंडीला झुंड होऊनच उत्तर देण्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण तिथले पोलिसही आपल्याच जनतेसाठी निर्वासितांवर हात उचलू शकणार नाहीत. सिरियातून आलेले निर्वासित भणंग त्याच मार्गाने निघाले आहेत. त्यात सौदीकडे मानवाधिकाराचे प्रमुख पद सोपवल्यावर सामान्य युरोपीयनांपुढे अन्य काही पर्याय उरतो काय? येत्या दीड-दोन वर्षात युरोपचाच इराक सिरिया होण्याला पर्याय नाही.

पूर्वप्रसिद्धी:  तरूण भारत (नागपूर) रविवार, २७ सप्टेंबर २०१५

पुरोगामी प्रबोधनाचे पुढले पाऊल



बिहारच्या निवडणूकीत असाउद्दीन ओवायसी यांनी अखेरच्या क्षणी झेप घेतली आणि मोजक्याच जागा लढवण्याची घोषणा केली आहे. इस्लामी कट्टरवाद सांगणार्‍या त्यांच्या इत्तेहादूल मुसलमीन पक्षावर भाजपाने टिका केली तर समजू शकते. पण या घोषणेने सेक्युलरांचे धाबे दणाणले आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते चाको यांनी तर भाजपानेच ओवायसीचे कळसुत्री बाहुले बिहारमध्ये आणल्याचा आरोप केला आहे. यासारखा हास्यास्पद प्रकार कुठला नसेल. ओवायसी हे भूत मुळात आपले बहुमताचे गणित जमवताना कॉग्रेसनेच उभे केलेले आहे. सत्ता मिळवताना ओवायसींना सेक्युलर ठरवून कॉग्रेसने सोबत घेतले. देशाची सत्ता असो किंवा आंध्रातील राजकारण असो, ओवायसीला सेक्युलर प्रमाणपत्र द्यायला भाजपा नव्हेतर कॉग्रेसच पुढे आली होती आणि बाकीच्या सेक्युलर पक्षांनी ओवायसीच्या धर्मांधतेवर पांघरूण घालण्याचा प्रयास केला आहे. मग आताच ओवायसी भाजपाचे कळसुत्री बाहुले कशाला होईल? मोजक्या दोन डझन जागा ओवायसी लढवणार आहे आणि अर्थात त्या मुस्लिम बहुल भागातच लढणार आहे. त्यामुळे तिथे आजवर ज्यांनी मुस्लिमांकडे फ़क्त मतांची पतपेढी म्हणून बघितले, अशा सेक्युलर पक्षांचे धाबे दणाणले तर चुकीचे नाही. कारण ओवायसी त्याच मतांवर दावा करणार असून तितकी मते नितीश-लालू वा कॉग्रेसला गमवावी लागणार. पण मागली तीनचार वर्षे ओवायसी त्याचीच तयारी करत होता, तेव्हा हे सेक्युलर पक्ष कुठे झोपा काढत होते? या कालखंडात अनेक विषयांवरच्या चर्चेत ओवायसी टिव्ही वाहिन्यांवर आला. त्याने सहसा भाजपा किंवा हिंदूत्वावर टिका केली नाही. तर सेक्युलर म्हणून मुस्लिमांचे प्रेषित बनलेल्या पक्षांवरच झोड उठवलेली होती. हे मुस्लिमांचे पक्ष नाहीत आणि ते मुस्लिमांना फ़क्त मतांचा गठ्ठा म्हणून वापरतात, हाच ओवायसीचा आरोप राहिला आहे.

त्याच्या म्हणण्यात तथ्य नक्कीच आहे. कारण मुस्लिमांचे सेक्युलर पक्षांनी जितके नुकसान केले, तितके हिंदूत्ववादी पक्षांनी केलेले नाही. नेहमी हिंदुत्वाचा भयगंड उभा करायचा आणि त्याच्या बदल्यात मुस्लिमांची मते लुटायची, इतकेच होत राहिले. पण मुस्लिमात सुधारणा घडवून आणणे वा मुस्लिम समाजाला धर्ममार्तंडांच्या जाळ्यातून सोडवण्यासाठी सेक्युलर पक्षांनी कधीच काही केले नाही. उलट मतांसाठी धर्ममार्तंडांचेच लांगुलचालन सेक्युलर पक्ष करत राहिले आणि पर्यायाने मुस्लिमांना अधिकाधिक धर्माच्या गुलामीत ढकलत राहिले. ओवायसीने त्याच दुखण्यावर बोट ठेवले आहे आणि जोडीला मग पर्यायी मुस्लिम पक्षच मुस्लिमांना न्याय देऊ शकेल असा प्रचार चालविला आहे. त्याच्या गळाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम लागत असल्याचे महाराष्ट्रातील निकालांनी दाखवून दिले आहे. आणि त्याने राज्यातील मुस्लिम वस्त्या जिथे लक्ष्य केल्या, त्याचा हेतू स्पष्ट होता. तो यापुर्वीच आम्ही स्पष्ट केला होता. महाराष्ट्रात उत्तर भारतातून स्थलांतरीत झालेल्या मुस्लिम वस्त्यावरच ओवायसीने लक्ष्य केंद्रित केलेले होते आणि त्यातून त्याला उत्तर भारतीय मुस्लिम प्रदेशात आपला पाया घालायचा आहे, असे विश्लेषण आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे निकाल पाहुनच केलेले होते. त्यातून प्रत्यक्षात सेक्युलर पक्षांना ओवायसी कसे आव्हान म्हणून उभे राहिल, त्याचा धोकाही दाखवला होता. पण इथले वा एकूणच देशातील पुरोगामी कायम भूतकाळात रममाण झालेले असतात आणि मागे बघून पुढे चालत असतात. मग समोरून येणारा धोका त्यांना दाखवून तरी काय लाभ होता? व्हायचे तेच झाले आहे आणि आजही इथले पुरोगामी आपल्याच व्याख्येतले पुरोगामीत्व उमजू शकलेले नाहीत. कालपरवा प्रा. शेषराव मोरे यांच्या विधानांचा समाचार घेताना लिहीलेल्या लेखात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुरोगामीत्वाची केलेली व्याख्या त्यांना तरी उमजली आहे का?

खरेच उमजली असती, तर आज सेक्युलर पक्ष वा कॉग्रेसला ओवायसी हे भाजपाचे कळसुत्री बाहुले म्हणायची वेळ कशाला आली असती? ‘समाजहिताच्या आड येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात प्रबोधन करणारा तो पुरोगामी. पुरोगामी म्हणजे पुढे पाहणारा. उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारा.’ अशी व्याख्या समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी केली आहे. ती खरी मानायची तर ओवायसी हा येणारा धोका लालु, नितीश वा कॉग्रेस अशा पुरोगाम्यांना आधीच कळायला हवा होता. त्यासाठी पुढे म्हणजे येऊ घातलेल्या भविष्याकडे बघावे लागते आणि असे काम त्या त्या चळवळ वा संघटनांचे विचारवंत करीत असतात. सप्तर्षी यासारखे पुरोगामी विचारवंत कायम मागे व भूतकाळातच रमलेले असतात. कोणी नेहरूचे गुणगान व सावरकरांची निंदानालस्ती करण्यात गर्क असतो, तर कोणी हिंदूत्वाची निंदा करत व स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगण्यात गुंतलेला असतो. पण उद्याचे वा भविष्यातले राजकारण वा घडामोडींविषयी चर्चा करण्याचा विषय त्यांच्या मनाला शिवत नाही. मग ओवायसी कोणते हेतू घेऊन व लक्ष्य ठरवून महाराष्ट्रात आपले हातपाय पसरत होता, त्याचे भान यांना कसे यावे? मात्र तोच ओवायसी सेक्युलरांसाठी भविष्यात मोठा धोका आहे, असे आम्ही इथे बोंबलून सांगत असलो, तरी आम्ही प्रतिगामी असतो. हा विनोद नाही काय? जे भविष्यातले धोके पुरोगाम्यांना समजावू बघतात, तेच प्रतिगामी असतात आणि जे भूतकाळातच रममाण होतात, ते पुरोगामी मानले जातात. मागल्या तीनचार दशकात अशाच पुरोगामी विचारवंतांनी पुरती पुरोगामी चळवळ नामशेष करून टाकली आहे. कारण त्यांनी फ़क्त पुरोगामी प्रतिगामी शब्दाच्या व्याख्याच विटाळलेल्या नाहीत, तर प्रत्येक शब्दाचे अर्थ व निकषच हेराफ़ेरी करून चळवळीचा आत्माच ठार मारून टाकला आहे. प्रतिगामी असण्यालाच पुरोगामी ठरवून टाकले आहे.

मग आपल्याच अपयशाचा वा नाकर्तेपणाचा दोष अन्य कुणाच्या माथी मारून पळवाट काढणे, हाच बुद्धीवाद होऊन जातो. पुरोगामी म्हणजे समाजाचे प्रबोधन करणरा असेही सप्तर्षी प्रवचन देतात. त्यांचे शब्द खरे मानायचे, तर त्यांच्या प्रबोधन काळाच्या आधीपासून जितका भारतीय समाज सहिष्णू होता, त्याच्या तुलनेत आज धर्मांधतेचा धोका कशाला वाढलेला आहे? याचे प्रबोधन १९७० नंतरच्या जमान्यात सुरू झाले आणि त्याच्याआधी आजच्या इतकी धर्मांधता वा जातियवाद बोकाळला नव्हता. मग आज जे काही धोके त्यांना दिसत आहेत, त्याला प्रबोधनाचे परिणाम म्हणायचे काय? जितके यांचे प्रबोधन वाढत गेले वा आक्रमक होत गेले, तितके अधिकाधिक समाजघटक धर्माच्या जातीच्या आहारी गेले. त्याला पुरोगामी प्रबोधन म्हणायचे काय? ओवायसी असो किंवा हिंदूत्ववादी असोत, त्यांचा १९६०-७० पर्यंत सामाजिक व राजकीय क्षेत्रात फ़ारसा प्रभाव दिसत नव्हता. म्हणजेच आजच्यापेक्षा तेव्हाचा भारतीय समाज अधिक समजूतदार व समावेशक होता. म्हणूनच अशा धर्माधिष्ठीत राजकारणाला मतपेटीतही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर सप्तर्षी पॅटर्नचे पुरोगामी प्रबोधन इतके आक्रमक होत गेले, की समाजात अधिकाधिक प्रतिसाद सप्तर्षी दावा करतात, त्या धर्मांध शक्तींना मिळत गेला. तेव्हाच्या समाजवादी व पुरोगामी राजकारणाच्या तुलनेत दुबळ्या असलेल्या प्रतिगामी शक्ती आज प्रचंड प्रभावी झाल्या, ही त्याच पुरोगामी पॅटर्नची किमया नाही काय? मोदींचे अपुर्व यश असो किंवा ओवायसीने बिहारला मारलेली धडक असो, त्याचे श्रेय सप्तर्षीप्रणित पुरोगामी प्रबोधनलाच द्यावे लागते ना? अशांनी को्णते प्रबोधन केले माहित नाही, पण लोहिया, सानेगुरूजी वा कॉम्रेड डांगे, जयपकाशांनी केलेल्या सामाजिक प्रबोधनाचे नामोनिशाण यांच्या पुरोगामी प्रबोधनाने नष्ट करून टाकले हे निश्चीत! ओवायसीचा उदय हा त्याचे पुढले पाऊल आहे.

Friday, September 25, 2015

खरेच भ्रमनिरास केलात, देवेन्द्रजी!

Fadnavis has dinner at farmer's house; spends the night there

राजदीप सरदेसाई या दिल्लीतील इंग्रजी पत्रकाराच्या अनावृत्त पत्राला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर देऊन गप्प केल्याने त्यांचे समर्थक सुखावले आहेत. त्याला दोन कारणे संभवतात. पहिले म्हणजे अशा समर्थकांचा आधीपासूनच राजदीपवर राग असू शकतो. म्हणूनच त्याला कोणीही झापडले तर यांना आनंद होणे स्वाभाविकच आहे. तर दुसर्‍या गटात आपल्या आवडत्या मुख्यमंत्र्याने विरोधकाला चोख उत्तर दिल्याचेही एक राजकीय समाधान असू शकते. त्यात काही गैर नाही. प्रत्येकाच्या आपापल्या भूमिका व समज असतात. त्यानुसार लोक अर्थ लावत असतात. पण वास्तविक विचार करून हे पत्र व त्याला दिलेले उत्तर वाचले, तर देवेंन्द्र फ़डणवीस यांनी राजदीपला उत्तर देण्याची गरज होती काय, असाही एक प्रश्न उदभवतो. तो प्रश्न त्यांच्याही मनात असल्याचे लपून रहात नाही. राजदीपसारखे काही पत्रकार व माध्यमे आपला पक्षपाती अजेंडा घेऊनच पत्रकारिता करीत असतात. म्हणूनच त्यांना लोकांचे प्रबोधन करण्यापेक्षा एक राजकीय अजेंडा पुढे न्यायचा असतो. म्हणूनच कुणाविषयी त्यांचा भ्रमनिरास होण्याचा विषयच उदभवत नाही. खुद्द देवेन्द्रजींनी त्याची आरंभीच ग्वाही दिलेली आहे. मग तसे असताना भ्रमात जगणार्‍यांना व त्यातच समाधानी असणार्‍यांचे शंकानिरसन कशाला करायचे? त्यासाठी वेळ देण्याइतकी सवड निदान आजच्या मुख्यमंत्र्याला असू शकत नाही. महाराष्ट्राला दुष्काळ व शेतकरी आत्महत्यांनी पछाडलेले असताना, असा वेळेचा दुरूपयोग व उर्जेचा अपव्यय कितपत रास्त आहे? राजदीप वा तत्सम लोकांनी काही भ्रम जोपासले आहेत आणि त्यालाच वास्तव ठरवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. तोच अजेंडा पुढे नेण्यासाठी ते तुमचा वेळ व उर्जा खराब करायला असे बोलत-लिहीत असतात. त्याला प्रतिसाद देण्यानेही तुम्ही त्यांचाच अजेंडा पुढे न्यायला हातभार लावत असता.

या पत्रात राजदीपने अनेक विषय उपस्थित केले आहेत आणि सत्तांतरानंतर त्याला नवे सत्ताधीश हात घालतील, अशी अपेक्षा असल्याचे मतप्रदर्शन केले आहे. त्या प्रश्न व समस्यांसाठी त्याने आधीच्या राज्यकर्त्यांना गुन्हेगारही ठरवले आहे. मग पहिला सवाल असा, की ते राज्यकर्ते त्यातले गुन्हेगार असल्याचे राजदीपला कधी उमगले? जनतेने त्यांना हाकलून लावल्यावर? जेव्हा आधीचे सत्ताधीश महाराष्ट्राचा चुथडा करीत होते, तेव्हा राजदीपने कधी दोन ओळीचे पत्र मुख्यमंत्र्याला लिहीले होते काय? शरद पवार यांच्याशी राजदीपची असलेली जवळीक सर्वश्रूत आहे. तेच पवार दहा वर्षे सलग शेतीमंत्री असताना देशात आत्महत्येचे सत्र सुरू झाले व वाढतच गेले. तेव्हा पवारांना मुलाखतीत वा पत्र लिहून राजदीपने असे काही प्रश्न केले होते काय? शेतकर्‍याचा मुलगा वा शेतीतला जाणकार शेतीमंत्री असताना देशातला शेतकरी अधिक संख्येने आत्महत्या करू लागला, तर पवारांविषयी सामान्य जनतेचाही भ्रमनिरास झाला होता. त्याची प्रचिती लोकसभा विधानसभा मतदानानेच दिली. तोवर हाच राजदीप शेतकरी गुण्यागोविंदाने नांदतो आणि मौज म्हणून आत्महत्या करतोय, अशाच भ्रमात रहाणे पसंत करत होता ना? कारण भ्रमात जगणे आणि तेच वास्तव असल्याचे दावे करत रहाणे, हाच त्यांचा छंद वा अजेंडा आहे. पण नवे सरकार सत्तेत आल्यापासून जलयुक्त शिवार वा तत्सम योजनांचा लाभ घेऊन दुष्काळातही काही सुविधा उभ्या राहिल्याने राजदीपचा भ्रमनिरास झालेला असू शकतो. अशावेळी त्याच्या पत्राला उत्तर देण्यापेक्षा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले काय, याचाच शोध मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्रनी घ्यायला हवा होता. कारण आत्महत्या म्हणजे शेतकरी आनंदात जगतो, असा मुळात राजदीपचा भ्रम असणार आहे. त्या संख्येत घट आल्याने तोव विचलित होऊन त्याचा भ्रमनिरास होऊ शकला असेल.

असो, राजदीपचा भ्रमनिरास त्याला लखलाभ होवो. आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही भ्रमात नव्हेतर वास्तव जगात जगतो आणि म्हणूनच वास्तवात भेडसावणार्‍या प्रश्न विषयांचा उहापोह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आम्हाला राजदीपच्या अनावृत्त पत्रापेक्षा दत्ता आत्माराम लांडगे याचे देवेन्द्रनाच उद्देशून लिहीलेले आठ पानी पत्र अधिक मोलाचे वाटते. देवेन्द्रजी ओळखता काहो तुम्ही त्या विदर्भातल्या दत्ता लांडगेला? ३६ वर्षाचा हा तरूण शेतकरी तेरा एकर शेतीचा मालक! कुठल्याही सरकारी मदतीशिवाय स्वावलंबी शेती करण्यातून थकला आणि त्याने आत्महत्या केली. कारण जवळचे किडुकमिडूक विकून शेती पिकवताना तो कर्जबाजारी झाला. शेतात पाणी आहे म्हणून पाईपलाईन टाकली आणि तिला आवश्यक असलेली वीज मिळाली नाही म्हणून दिवाळखोर झाला. आसपास शेतकरी निमूट आत्महत्या करताना पाहूनही तो जिद्दीने एकटाच एकाकी लढत होता. दोन वर्षे वीज जोडणी मिळाली नाही, म्हणून त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली आणि आत्महत्येची पाळी कशामुळे येते त्याचे विदारक वर्णन करणारा वास्तविक अहवालच त्याने तुमच्यासाठी लिहून, मग गळफ़ास लावला. कोणी अधिकारी वा दिल्लीतले खुशालचेंडू पत्रकार खोटे अश्रू ढाळून तुमच्यापर्यंत वास्तव जाऊ देत नाहीत वा तुम्हाला भ्रमातच खेळवत ठेवतात, अशा खात्रीमुळे त्याने परस्पर आत्महत्या करून पळ काढलेला नाही. तर शेतकरी आत्महत्या कशाला करतो त्या आजाराचे निदान सविस्तर लिहून त्याने जगाचा निरोप घेतला. निदान केल्यावर त्याने उपाय व उपचारही आपल्या बुद्धीने सांगितला आहे. विरंगुळा म्हणून जगाने वाचावे म्हणून तुम्हाला अनावृत्त पत्र लिहीले नाही, तर काही हालचाल व्हावी म्हणून त्याने आठ पानी पत्र लिहीले. तेही वृत्तपत्राकडे छापायला न पाठवता आपल्या मृत्यूचे तिकीट लखोट्यावर डकवून पाठवले होते.

देवेन्द्रजी, राजदीपच्या अनावृत्त पत्राचे वाचन-मनन करून त्याला उत्तर देण्याच्या नादात तुम्ही दत्ता लांडगेच्या पत्राचा लखोटाही उघडून बघायचे विसरून गेलात काय? कारण त्यावरची तुमची प्रतिक्रीया कुठे ठळकपणे वाचायला मिळाली नाही. सरकार जी भरपाई देते त्यातून दिवंगत शेतकर्‍याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होत नाही, किंवा किती दुर्दशा होते, त्याचे काळीज फ़ाटणारे तपशील लांडगेने तुमच्यासाठी खास लिहीलेत हो! सामान्य जनता पोटाला चिमटा घेऊन ज्यांचा बोजा उचलते, असे सरकारी कर्मचारी कसे मजेत जगतात. त्यांच्या ताटातले शिळेपाके तरी मरणार्‍या शेतकर्‍याच्या नशिबी यावे, यासाठी टाहो फ़ोडलाय त्या लांडगेने. तुमच्या कानी त्याचा आक्रोश पडला नाही काय? नसेल तर राजदीपपेक्षा सामान्य माणसाचा अधिक भ्रमनिरास झाला म्हणावे लागेल. असेच एक पत्र अकोल्याच्या गजानन घोटेकरने तीन वर्षापुर्वी लिहून मग गळफ़ास लावला होता. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी शापवाणी उच्चारणार्‍या घोटेकरच्या पत्राचीही दादफ़िर्याद कोणा राज्यकर्त्याने तेव्हा घेतली नाही. परिणाम समोर आहेत देवेन्द्रजी! तेव्हा पवार, अजितदादा असोत की पृथ्वीराज असोत, त्यांनी घोटेकरपेक्षा राजदीपसारख्यांचा भ्रमनिरास दूर करण्यासाठी वेळ दिला. त्यामुळेच त्यांना आज सत्ताभ्रष्ट व्हावे लागले आहे. कारण त्यांनी गजानन घोटेकरच्या वास्तविक यातनेपेक्षा राजदीप शैलीतल्या काल्पनिक समस्या सोडवण्यात धन्यता मानली होती. वाशिम जिल्ह्यातल्या जऊळका रेल्वे गावचा दत्ता लांडगे त्याच घोटेकरच्या वंशावळीतला आणखी एक वैफ़ल्यग्रस्त शेतकरी! त्याने शिव्याशाप दिलेले नाहीत की शापवाणी उच्चारलेली नाही. पण अशा व्याकुळ शेतकरी कष्टकर्‍याची वेदना हाच गंभीर इशारा असतो. त्याचे निरसन नव्हेतर निराकरण अगत्याचे असते. राजदीपला उत्तर द्यायला जो वेळ खर्ची घातलात, त्यात दहा लांडगे घोटेकर वाचवता येतील. राजदीपचा भ्रम वा भ्रमनिरास त्यापेक्षा अधिक मोलाचा नाही. देवेन्द्रजी उत्तर द्यायचे असेल, तर लांडगे घोटेकरांना असे उत्तर द्या, की आत्महत्येचा विचारही त्याच्या मनाला शिवता कामा नये. एका घोटेकर लांडगेवर शंभर राज‘दीप’ ओवाळून टाकायचे धाडस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू शकला तर??????


Thursday, September 24, 2015

प्रतिमांची आणि प्रतिकांची लढाई



Never Interfere With an Enemy While He’s in the Process of Destroying Himself    - Napoleon Bonaparte

ही उक्ती इतिहासात गाजलेला फ़्रेन्च सेनापती नेपोलियन बोनापार्ट याच्या नावाने सांगितली जाते. खरेच तो तसे कधी बोलला किंवा नाही, ते इतिहास संशोधक अभ्यासकच सांगू शकतील. पण त्यामुळे त्या उक्तीमधला बोध बदलत नाही. तुमचा शत्रू आत्महत्येच्या वा आत्मघाताच्या तयारीत असेल, तर त्यात हस्तक्षेप करू नका, असे नेपोलियन कशासाठी म्हणतो? तर तुम्हाला त्याच्या विरोधात जिंकायचे असते. म्हणजे शत्रूला संपवायचे असते आणि तेच काम तो शत्रू स्वत:च करत असेल, तर त्याला तसे करू देणे, तुमच्याच फ़ायद्याचे असते. कारण कसलेली कष्ट न घेता तुम्ही युद्ध जिंकू शकणार असता. हा त्यातला बोध आहे. पण आत्महत्या करणारा तुमचा शत्रू नसेल, तर त्याला रोखणे व त्यापासून परावृत्त करणे गैर नाही. मागल्या दोनतीन वर्षात मी नेमके तेच करण्याचा प्रयत्न केला असता, माझ्यावर भाजपाचा हस्तक वा भाट म्हणून आरोप करण्याची पुरोगामी वा कॉग्रेसी व नेहरूवाद्यांची स्पर्धा लागली होती. आपले होणारे वा होत असलेले नुकसान बघून कोणी आपल्याला सावध करतोय, त्यालाच शत्रू ठरवण्य़ाच्या अशा प्रवृत्तीने आज त्यांच्यावर अतिशय दुर्दैवी प्रसंग ओढवलेला आहे. कारण आपल्याच बेताल व बेभान अतिरेकातून या लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या सत्तेचा व यशाचा मार्ग प्रशस्त करून दिला. आणि इतका दारूण पराभव झाल्यानंतरही त्याची कारणे शोधून चुका सुधारण्यापेक्षा अधिकच मुर्खपणा चालविला आहे. अर्थात त्यामुळे माझे काही बिघडलेले नाही की मोदी भाजपाचे काही नासलेले नाही. उलट प्रतिदिन त्यांचे काम सोपेच होते आहे. तीन वर्षापुर्वी मोदींच्या राजकारणाची सुक्ष्म मिमांसा मी आरंभली होती आणि तेव्हापासून लेखनातून मोदी हा भाजपाला सत्ता मिळवून देणाराच नेता नव्हेतर नेहरू विचारांना संपवणारा आक्रमक सत्ताधीश असेल, असा इशारा मी दिलेला होता.

अशावेळी समोरचा इशारा नावडता असला तरी त्याचा विचार करण्यात काही गैर नसते. कारण नजरचुकीने एखादा धोका आपण पत्करत असलो, तर त्यातून सावरून घेण्याची ती अपुर्व संधी असते. भाजपाच्या दिल्लीतील मरगळलेल्या नेतृत्वाकडून आपल्याला आव्हान शिल्लक उरलेले नाही, याची सोनियांना इतकी खात्री होती, की त्यांनी नेमक्या त्याच कालखंडात पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार राहुल गांधींकडे सोपवले. त्यात गैर काही नव्हते. कारण माध्यमातल्या सेक्युलर नेहरूवाद्यांपासून थेट पुरोगामी राजकारणात कोणालाही मोदी नावाचे आव्हान समोर येण्याची अपेक्षाही नव्हती. कारण याच शहाण्यांनी गुजरात दंगलीचे अवडंबर माजवून मोदींना पुर्ण बदनाम केले होते. मात्र त्याच अतिरेकी बदनामीतून मोदींना देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवलेही होते. शिवाय मोदीही राज्यातला नेता असून अखिल भारतीय पुरोगामी टिकेला एकहाती तोंड देत होते. त्यामुळे मोदी हा देशव्यापी पर्याय उभा रहात गेला, जो भाजपाने निर्माण केला नव्हता, तर पुरोगाम्यांनी आपल्या मुर्ख अतिरेकातून उभा केला होता. पण खोटा आत्मविश्वास किती घातक असतो? जो मोदी आपणच पर्याय म्हणून उभा करून दिलाय, तोच भाजपाने राष्ट्रीय नेता म्हणून समोर ठेवावा, असे थेट आव्हान तमाम पुरोगामी भाजपाला देत होते. मात्र वैफ़ल्यग्रस्त भाजपा नेतृत्वही त्यासाठी बिचकत होते. अशा वेळी मोदी हा पर्याय म्हणून आला, मग हा माणूस केवळ सत्ता पादाक्रांत करणार नाही, तर देशात प्रस्थापित असलेल्या आठ दशकांच्या नेहरूवादाची पाळेमुळे खणून काढील, असा इशारा मी याच सदरातून दिलेला होता. तो नुसता सत्तेला धोका नव्हता, तर नेहरूवादाला धोका होता, असे स्वच्छ शब्दात मी प्रतिपादन केले होते. ज्याचे वास्तव आज अनुभवास येते आहे. तेव्हा माझ्या इशार्‍याची गंभीर दखल घेऊन पावले उचलली असती, तर आज नेहरूवाद्यांची वा पुरोगाम्यांची इतकी तारांबळ उडाली नसती.

पण संकटाची शक्यता दाखवणारा किंवा इशारा देणाराच शत्रू ठरवला, मग आत्मघाताला पर्याय नसतो. आपण बारा वर्षे अखंड बदनाम केलेला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा उमेदवार झाला तर भाजपा संपलाच! या आंधळ्या विश्वासाने पुरोगाम्यांचा घात केला. कारण मोदी व्यक्तीगत कारणाने लोकप्रिय नव्हते, तर नेहरूवादाच्या अतिरेकाला उबगलेल्या लोकांसाठी मोदी पर्याय बनत चालले होते. दुर्दैव असे होते, की अगदी सहा वर्षासाठी भाजपाची सत्ता आली तेव्हा किंवा त्याच्याही आधी दोनदा जनता परिवाराच्या हाती सत्ता आली तेव्हा, लोकांना नेहरूवादापासून मुक्ती मिळू शकली नव्हती. १९६७ पासून लोकांनी कॉग्रेसपासून देश मुक्त करण्याचा प्रयत्न चालविला होता. पण ज्यांना हाताशी धरले त्यांनी निकालानंतर फ़क्त नेहरूवादाला पुनरुज्जीवित करण्याचाच घातकी पवित्रा घेतला. अगदी वाजपेयी सहा वर्षे पंतप्रधान होते, त्यांनीही कधी नेहरूवादी व्यवस्थेला धक्का लावण्याचे धाडस केले नव्हते. ते साहस नरेंद्र मोदी करू शकतो, याच भावनेतून जनमानस मोदींकडे वळत गेले. त्याचा धोका निव्वळ कॉग्रेसची सत्ता जाणे किंवा पुरोगाम्यांचा पाडाव इतकाच नव्हता. तो एका निवडणूकीपुरता धोका नव्हता. स्वातंत्र्यपुर्व काळापासून नेहरूंनी घातलेला राजकीय पाया खोदून काढू शकेल, असा हा धोका होता. जसजसे मतदानाचे दिवस जवळ येते गेले, तसतसे जाणत्या नेहरूवाद्यांना ते संकट जाणवू लागले आणि मग एक एक नेहरूवादी बुद्धीमंत आपली तटस्थता सोडून राजकीय मैदानात उतरत गेला. अमर्त्य सेन, अनंतमुर्ति, गिरीश कर्नाड वा तत्सम बहुतांश जाणत्यांना तो धोका जाणवला आणि जयराम रमेश यांच्यासारख्याने तसे बोलूनही दाखवले. तर त्यांची मुस्कटदाबी करण्यात धन्यता मानली गेली. मोदी नुसते पंतप्रधान होणार नाहीत, तर पाऊण शतकापासून इथे उभी असलेली नेहरूवादी व्यवस्था जमिनदोस्त करतील, हे माझे भाकित उशिरा अनेकांच्या डोक्यात शिरू लागले. पण तेव्हा उशीर झाला होता आणि तथाकथित पुरोगामी मंडळी बेभान होऊन अधिकच अतिरेक करून मोदींचे हात बळकट करत गेली.

असो, आता त्याचे परिणाम दिसत आहेत. पण हा अतिरेक तेव्हा दोनतीन वर्षापुर्वी थांबला असता, तर नरेंद्र मोदी नावाचा गुजरातचा मुख्यमंत्री देशासमोर एक नेतृत्व पर्याय म्हणून आणलाच गेला नसता, की नेहरूवादाला आव्हान उभे राहिलेच नसते. सत्ता येणे-जाणे निवडणूकीचा खेळ आहे. पण मोदी हे एका निवडणूकीपुरते आव्हान नाही व नव्हते. ते स्वातंत्र्योत्तर काळात प्रस्थापित केलेल्या व झालेल्या नेहरूवादी संकल्पनेला धक्का देणारे आव्हान होते. ते ओळखून मुळात मोदी भाजपाचे उमेदवार होऊ नयेत आणि सहज हाताळता येऊ शकेल असे सुषमा वा अडवाणी हे उमेदवार होण्याचे डावपेच पुरोगाम्यांनी खेळले असते, तर मोदी नावाचा धोका पत्करण्याची वेळ आली नसती. मोदी विरोधातील अतिरेक तीनचार वर्षापुर्वी थांबवून जनमानसात मोदींची राष्ट्रीय प्रतिमा उभारण्याचे काम पुरोगाम्यांनी इतक्या धडाडीने केले नसते, तर मतदानाने भले पुरोगाम्यांची सत्ता गेली असती. पण भाजपाच्या अन्य नेत्याकडून नेहरूवादाला इतके निर्णायक आव्हान नक्की उभे राहिले नसते. सात दशकात नेहरूवादाने देशापुढले कुठले गहन प्रश्न सोडवले नव्हते, तरी तीच नेहरूभक्ती वा आरती करत बसलेल्यांना कंटाळून परिवर्तन घडवायला उत्सुक असलेल्या जनतेला मोदी नावाचा आयता पर्याय ज्यांनी पुरवला, त्यांनीच मग नेहरूवादाची कबर खणली. हा मुर्खपणा करणार्‍यांना मोदींनी कधीच रोखण्याचा प्रयास केला नाही, तर वेळोवेळी प्रोत्साहन अगत्याने दिले व अशा अप-प्रचारकांच्या हाती कोलितही दिलेले होते. थोडक्यात नेहरूवादी पुरोगामी आत्महत्येला धावत सुटलेले असताना, मोदींनी त्यांना रोखले नाही, तर सतत प्रोत्साहन दिले. आज आपण बघत आहोत, ते त्याचे परिणाम! राहुल सोनियांनी त्याला हातभार लावला असेल, पण आत्मघात करून घेतला आहे, तो पुरोगामी व नेहरूवादी अशा लोकांनी; स्वेच्छेने, राजीखुशीने व अक्कलहुशारीने!

पुरवणी वाचन >>>>>
ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी दोन वर्षापुर्वी ब्लॉगवर अजून असलेला (शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३ रोजीचा) नेहरूवादाला इशारा देणारा लेख वाचायला हरकत नाही.

http://panchanaama.blogspot.in/2013/10/blog-post_5.html

Wednesday, September 23, 2015

स्वातंत्र्य चळवळीत सोनियांचा सिंहाचा वाटा!



सध्या ममतांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधात जी कागदपत्रे खुली केली आहेत, त्यांनी आजवरच्या अनेक समजूतींचा धक्का बसला आहे. खेरीज नेताजीच्या अपघातावर शंका घेऊन नवनवे सिद्धांत मांडणार्‍यांची नेहमी टवाळी जरण्यात धन्यता मानलेल्यांची पुरती कोंडी झाली आहे. सहाजिकच आपले झाकून दुसर्‍याचे वाकून बघण्याच्या नितीनुसार युक्तीवाद पुढे येत आहेत. त्यात मग कारण नसताना सावरकर-संघ यांना ओढले जाते. विषय नेहरू व नेताजी असा असताना स्वातंत्र्य चळवळीत संघाचे योगदान किती व कोणते; असा प्रश्न विचारण्याचे कारणच काय? नेताजींच्या मृत्यू वा अपघाताविषयी नेहरूंच्या जमान्यात धोरण म्हणून ज्या अफ़वा पसरवल्या गेल्या, त्याविषयी बोलणे वा स्पष्टीकरणे देण्यापलिकडे जाण्याची गरज काय? सवाल स्पष्ट आहे, नेताजी यांच्याविषयी नेहरूंनी खोटे सांगण्यात धन्यता का मानली? कारण त्यांना जितके सरदार वल्लभभाई पटेल हे आव्हान होते, तितकेच नेताजीही राजकीय आव्हान होते. तेव्हाच्या कालखंडात नेताजी समोर आले असते, तर नक्कीच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. जसे आणिबाणीनंतर जॉर्ज फ़र्नांडीस यांना लोकांनी डोक्यावर घेतले होते, तशीच नेताजींची लोकप्रियता शिगेला पोहोचली असती. मग नेहरूंना एकमुखी राज्य व स्वातंत्र्य मिळवण्याचे श्रेय पदरी पाडून घेता आले नसते. म्हणूनच संघाचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान विचारणार्‍यांनी अगोदर अन्य शेकडो लोकांनी जे योगदान दिले, त्यांना कोणते श्रेय मिळाले, त्याचा खुलासा करायला हवा. उदाहरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्यासाठी काही योगदान होते किंवा नाही? त्यांना स्वातंत्र्योत्तर उर्वरीत अपुर्‍या हयातीमध्ये नेहरू व कॉग्रेसने कसे वागवले? म्हणूनच योगदान विचारण्यापेक्षा नेहरूंना किती अवास्तव श्रेय दिले जाते व कशाला, या प्रश्नाचे उत्तर शोधणे भाग पडते.

सावरकर, आंबेडकर, नेताजी, अशी भरपूर लांबलचक यादी आहे. त्यांच्या अगणित त्याग व प्रयत्नातून भारतीय स्वातंत्र्य साकारले आहे. पण एकूण कॉग्रेसजन अथवा नेहरूवादी बघितल्यास त्यांच्या हिशोबात अगदी सोनिया गांधींचेही स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असावे, अशीच भाषा चालते. यातल्या कोणी कधी सोनिया गांधींचा स्वातंत्र्य चळवळीतला वाटा किती व कधीचा, त्याचा खुलासा कशाला करू नये? ज्या सोनिया गांधी संघाला सवाल करतात, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी असे कोणते योगदान दिले? नेहरूंच्या नातवाशी पुढल्या कालखंडात विवाह करून भारतात येणे, याला स्वातंत्र्य चळवळीतले योगदान म्हणायचे काय? इथे येऊन पंधरा वर्षे पंतप्रधान निवासात वास्तव्य करूनही देशाचे नागरिकत्व घ्यायचे नाकारण्याला, बहुधा नेहरूवादी भाषेत त्याग व योगदान म्हणत असावेत. अन्यथा नेताजी सावरकरांच्या योगदानाचा विषय कशाला निघाला असता? देशाच्या सत्तेची सुत्रे ज्या व्यक्तीच्या हाती होती व जिथे देशातील सर्व गुपिते बोलली जात होती, तिथे एक परदेशी महिला राजरोस दिर्घकाळ वास्तव्य करीत होती. तिचे परदेशी नातलग कधीही येजा करीत होते. त्याला स्वातंत्र्य चळवळीतले योगदान म्हणत असावेत. एकदा माणसाची बुद्धी भरकटली, मग तर्काचा घोडा बेभान दौडू लागतो. म्हणूनच मग इतके दिवस झाकलेले नेहरूंचे खोटे चव्हाट्यावर येताच, किती टोकाचे युक्तीवाद चालू आहेत. नेताजींना युद्धकैदी ठरवण्यापासून वाचवायचे म्हणून त्यांच्या अपघाती मृत्यूची कंडी पिकवली, हा त्यापैकीच एक युक्तीवाद आहे. मग पुढे बोस कुटुंबावर सरकारने पाळत ठेवली तर त्याचे खापर सरदार पटेल, वा लालबहादूर शास्त्री अशा गृहमंत्र्यावर फ़ोडायचे. याला नेहरूवाद म्हणतात, श्रेय असेल तर नेहरूंचे, त्यात दुसरा कोण भागिदार होऊच शकत नाही. मात्र खापर फ़ोडायचे वेळ आली, मग नेहरूंच्या सहकार्‍यांकडे बोट दाखवायचे.

आज कुठल्याही गोष्टी गोपनीय असल्या तर त्या खुल्या होण्याचा आग्रह आहे आणि लपवाछपव नको असेल, तर तेव्हा नेहरूंनी लपवाछपवी करणे घातकच होते. कुठलाही नियम काढा, त्यात नेहरू कुटुंबाला सवलत असते. त्याविषयी प्रश्न विचारला, मग लगेच तुमच्यावर संघाचे भक्त म्हणून आरोप होणार. नेताजी डाव्या विचारांचे होते. पण त्यांच्याविषयी आस्थेने बोललात, तरी तुम्ही लगेच संघवाले ठरता. थोडक्यात आपण अफ़वा पिकवायच्या आणि तुम्ही सत्याची मागणी केली, मग तुमच्यावरच अफ़वाबाज म्हणून आरोप करायचे. अगदी नेताजींना वाचवण्यासाठी तेव्हा खोटे बोलले गेले असले, तरी पुढल्या तीस चाळीस वर्षे त्यावर पडदा कशाला राहिला? बोसांच्या कुटुंबावर पाळत ठेवण्याचा अट्टाहास कशाला? त्याचे उत्तर कोणी देत नाही. २००४ सालात पुन्हा युपीए (कॉग्रेस) सरकार सत्तेत आल्यानंतर पहिली गोष्ट काय केली असेल, तर अंदमानमध्ये जे सावरकरांचे स्मारक होते, त्याचे महात्म्य संपवण्यात आले. त्यात पुढाकार घेणारे मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते? अंदमानात सावरकर एकटेच काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला गेलेले नव्हते. शेकड्यांनी स्वातंत्र्य सैनिक तिथे खितपत पडले. मग एकट्या सावरकरांचे महात्म्य कशाला सांगायचे? खरेच आहे! वादासाठी अय्यर नामे नेहरूवाद्याचा हा नियम मान्य करू. मग देशभरच्या तुरूंगात शेकडाच नव्हेतर हजारांनी स्वातंत्र्य सैनिकांनी यातना सोसल्या. संघर्ष केला व त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यांच्यापेक्षा नेहरू व त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचे महात्म्य कशाला वाढवले गेले? त्या बाकीच्यांना न्याय देण्यासाठी मणिशंकर अय्यरनी आधीपासून जी नेहरू स्मारके उभी होती, त्यांच्या फ़ेररचनेचे काम कशाला हाती घेतले नाही? उत्तर सरळ आहे. कोणाच्या त्यागाचा कामाचा तसूभर संबंध नाही, नेहरूंना आव्हान ठरू शकतील अशा कुठल्याही (अगदी कॉग्रेस) नेत्यालाही स्वातंत्र्योत्तर काळात संपवण्याचेच उद्योग झाले आहेत.

सावरकर यांना जी वागणूक मिळाली तीच घटनासमितीत असूनही डॉ. बाबासाहेबांना मिळाली ना? नेहरूंच्या कन्येला भारतरत्न मिळाल्यानंतर बाबासाहेबांना तोच सन्मान मिळायला किती वर्षे लागली? सावरकर दुर्लक्षितच नव्हेतर राजकीय अस्पृष्यच होते. सरदार पटेल यांची तुलनेने किती स्मारके कॉग्रेसच्या दिर्घकालीन सत्ताकाळात होऊ शकली? शास्त्रींच्या वाट्याला काय आले? ह्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत कुठलेच योगदान दिले नव्हते असे समजावे काय? अर्थातच! त्यासाठीच अशा कुठल्याही नेते व्यक्तींची ओळख व नामोनिशाण पुसण्याचाच उद्योग पुढल्या काळात झाला आणि त्यासाठी सरकारी तिजोरीतून अब्जावधी रुपयांची लुट करण्यात आलेली आहे. नेहरूंवरच्या चित्रपट मालिकेसाठी सरकारी तिजोरी खुली होती. सावरकरांचा चित्रपट काढण्यासाठी सुधीर फ़डके यांनी वर्गणीतून पैसा उभा केला. नेताजींवर तर असे काही होऊच शकले नाही. गेल्या सहा सात दशकात नेहरू-गांधी यांना सरकारी तिजोरीतून अफ़ाट पैसा उधळून देशाचे उद्धारक व सातंत्र्ययोद्धे म्हणून पेश करण्याचा आटापिटा झाला. त्याचवेळी अन्य प्रत्येक कर्तबगार नेते झाकण्याचाही अपप्रचार कायम राहिला. इतके होऊनही त्यांच्याविषयी जनमानसातली आस्था तीनचार पिढ्या उलटून गेल्यावर कायम आहे. लोकवर्गणीतून त्यांची स्मारके उभी राहिलीत. मात्र त्याच प्रदिर्घकाळात नेहरु-गांधी यांचे स्मरण जतन करण्यासाठी सरकारी खजिना रिता करावा लागला आहे. विद्यापीठ, स्टेडीयम, रस्ते वा इमारतीच्या निर्जीव स्वरूपात या दोन नेत्यांना टिकवून धरावे लागले आहे. नेताजी, सावरकर वा पटेल यांच्या कर्तृत्वाला तितके दयनीय व्हावे लागलेले नाही. सरकारी आश्रयावर त्यांच्या विचार वा स्मृतीला जगावे तगवावे लागलेले नाही. कारण त्यांचा स्वातंत्र्य चळवळीत किती वाटा होता, हे एका पिढीने दुसर्‍या पिढीला सांगितले आहे. नेहरूवाद्यांना मात्र त्यासाठी जाहिराती कराव्या लागत आहेत. म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा बहुधा सोनिया गांधीचाच असावा.

Tuesday, September 22, 2015

नेताजींच्या वारश्याला नेहरू घाबरले होते?



सध्या ममता बानर्जी यांच्या राज्य सरकारने खुल्या केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयीच्या कागदपत्रांनी मोठे रण माजले आहे. त्यात अर्थातच प्रत्येकजण आपल्याला हवे तेच शोधणार आणि सोयीचे तितकेच सांगणार आहे. बहुतेक बाबतीत हाच अनुभव असतो. मात्र आपणच सत्याचे पुजारी आहोत, असा आव युक्तीवादात आणलेला असतो. यात प्रामुख्याने नेहरूवादी किंवा पुरोगामी म्हणवून घेणार्‍यांचे हाल झाले आहेत. कारण आजवर जे पाखंड मनोभावे माजवण्यात धन्यता मानली गेली. त्याची लक्तरे आता चव्हाट्यावर येत असून जागोजागी ठिगळ लावताना अशा मंडळीची तारांबळ उडालेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे नेताजी हयात आहेत, की नाही हा वाद बाजूला ठेवून अन्य मुद्दे तपासता येतील. सुभाषबाबू विमान अपघातात मृत्यूमुखी पडले, ही आजवर भारत सरकारने कथन केलेली सरकारी भूमिका आहे. तिला तडा गेला आहे आणि त्याच स्वातंत्र्याच्या सेनानीला युद्धकैदी ठरवले गेल्याचा बभ्रा झालेला आहे. पण त्यातले तथ्य समोर यायला अजून अनेक पुरावे कागदपत्रे आवश्यक आहेत. भारत सरकारने आपला दफ़्तरखाना उघडून संबंधित कागदपत्रे खुली करावी लागतील. तेव्हाच त्यावरील पडदा उठवला जाऊ शकेल. पण ममतांनी खुल्या केलेल्या दस्तावेजांनी एक गोष्ट स्पष्ट केली, की स्वातंत्र्योत्तर काळातही सुभाषबाबूंच्या आप्तस्वकीयांवर स्वकीय सरकारनेच संशयिताप्रमाणे नजर ठेवली होती. ज्यावेळी अन्य स्वातंत्र्यसैनिकांना व त्यांच्या आप्तांना सन्मानाची वागणूक मिळत होती, त्याचवेळी नेताजींचे नातेवाईक मात्र संशयित गुन्हेगारासारखे वागवले जात होते. सहाजिकच ज्यांचे नेताजींवर प्रेम होते वा आहे, त्यांच्यासाठी ही दुखरी जखम होती. त्यावरची खपली या कागदपत्रांनी उचकटून काढली आहे. सहाजिकच आजवर ज्यांनी त्याची टवाळी केली होती, ते आज आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहिले आहेत.

नेताजींचा मृत्यू शंकास्पद असेल. पण ते स्वातंत्र्यपुर्व राजकारणात नेहरू व गांधीजींना आव्हान म्हणून उभे राहिले होते. सहाजिकच पुढल्या काळात नेताजींच्या आप्त मंडळींना वागणूक मिळाली, त्यात सुडबुद्धी शोधली जाणे स्वाभाविक आहे. अगदी कालपरवा देशात सत्तांतर झाले, त्याच्याही आधीपासून अनेक भानगडी चव्हाट्यावर आल्या होत्या. पण त्यात आपलेच हातपाय अडकलेले असल्याने आधीच्या कॉग्रेस सरकारने व त्यातल्या राज्यकर्त्यांनी त्याची चौकशी होऊ दिली नव्हती, की त्याविषयी तपासही होऊ दिला नव्हता. अगदी पुरावे म्हणावे इतकी माहिती समोर आणुनही सोनियांनी कोणाचा बाल बाका होऊ दिला नव्हता. आता सत्तांतर झाल्यावर तेच पुरावे व माहिती घेउन नव्या सरकारने कारवाई सुरू केल्यावर काय आरोप मोदी सरकारवर झाले? राजकीय सूडबुद्धीने कारवाया होतात, हाच आरोप होतोय ना? म्हणजे तुम्ही सत्तेत असताना भ्रष्टाचार व गैरलागू कृती करणार आणि त्याबद्दल तक्रार केली तरी प्रशासनाला कारवाई करू देणार नाही. सत्ता बदलली आणि त्यांनी आधीच्या पापांचा घडा शोधायला घेतला, मग सुडबुद्धीचा आरोप! हे आता नेहमीचेच झाले आहे. जर हे सोनियांचे जावई रॉबर्ट वाड्रांबाबत होऊ शकते, तर नेहरूंच्या बाबतीत वेगळे काय होईल? इतर खुलासे करत बसण्यापेक्षा नेहरूवादी किंवा कॉग्रेसजनांनी जरा आपल्याच कालपरवाच्या वाड्रा वा नॅशनल हेराल्ड खटल्याविषयीच्या भूमिका तपासून बघाव्यात. मग त्यांच्यावर नेताजींचे पुरस्कर्ते कसला आरोप करीत आहेत, त्याचा खुलासा होऊन जाईल. तुमच्या म्हणजे नेहरूंच्या हाती सत्ता होती, तेव्हा नेताजी सोडा त्यांच्या आप्तस्वकीयांनाही सुडबुद्धीने वागवले, असेच म्हटले जाणार नाही काय? जर आता नेताजींच्या बाबतीत कायद्याची तरतुद हे स्पष्टीकरण द्यायचे असेल, तर वाड्रा प्रकरणी मोदी सरकारचे समर्थन करावे ना?

मुद्दा इतकाच आहे की नेताजींच्या मृत्यूनंतर तब्बल दोन दशके बोस कुटुंबावर पाळत ठेवली गेली आहे आणि नेहरूंच्या निधनानंतरही तो ससेमिरा चालूच होता. असा कुठला धोका नेताजींच्या कुटुंब वा वारसांकडून नेहरू कुटुंबाला भेडसावत होता? १९७० सालापर्यंत ही पाळत चालू होती किंवा अगदी १९६५ पर्यंत चालू असेल, तर त्याचा नेमका खुलासा करता आला पाहिजे ना? नेताजी हा भारतासाठी धोका होता काय? त्यांचे आप्तस्वकीय भारताच्या स्वातंत्र्यासाठी कुठल्या कारणाने धोका ठरणार होते? आजवरच्या इतिहासाची तपासणी केली, तर केवळ कुणावर नुसती पाळत ठेवणे कॉग्रेसने सर्वात मोठे पाप मानलेले आहे. कॉग्रेसजनांची स्मृती भ्रष्ट झालेली नसेल तर त्यांना दिडदोन वर्षापुर्वीचे स्नुपगेट आठवायला हरकत नसावी. गुजरातमधल्या कुणा एका तरुण मुलीवर तिच्याच पालकांच्या सूचनेवरून गुजरात पोलिसांनी नजर ठेवली असल्याचा निवडणूक प्रचारात कॉग्रेससह तमाम पुरोगाम्यांनी किती तमाशा मांडला होता? एका व्यक्तीचे स्वातंत्र्य बाधीत झाल्याचा गाजावाजा होऊन खुप दिवस लोटलेले नाहीत. कॉग्रेसच्या महिला आघाडीने त्यासाठी महिला आयोगाकडे धाव घेतली होती ना? मग दोन दशके बोस कुटुंबावर पाळत ठेवणे गंमत म्हणायची काय? त्याच्याही थोडे मागे गेल्यास १९९१ सालात राजीव गांधींच्या पाठींब्यावर चंद्रशेखर पंतप्रधान झाले होते. त्यांच्या निवासस्थानी दोन साध्या वेशातले हरयाणा पोलिस घोटाळताना दिसल्याचा आक्षेप घेत सरकार बरखास्त होण्याचा प्रसंग आणला गेला होता. तेव्हा एका दिवसाच्या पाळतीने कोण आकाशपाताळ एक करीत होता? ते नेहरूंचे नातू व इंदिराजींचे सुपुत्रच होते ना? गदारोळ करणार्‍या पक्षाचे नाव कॉग्रेसच होते ना? या प्रत्येकवेळी कशाला पाळत? काय धोका होता? असले प्रश्न विचारले गेले होते ना? मग तेच प्रश्न आज बोस कुटुंब आणि नेताजीप्रेमी विचारत आहेत.

सगळा युक्तीवाद वा तर्कबुद्धी कशी मर्कटलिला करू लागते ना? जेव्हा अन्य कु्णावर पाळत ठेवली तर ती प्रशासनिक बाब असते. सुरक्षेचा विषय असतो. दुसर्‍या कुणी असा उद्योग केला, मग घोर पाप असते. पण तेच नेहरूंनी वा कॉग्रेसच्या सत्तेने केले, मग देशहिताचा मामला होऊन जातो. सवाल सोपा आहे. नेताजींच्या मृत्यूचा विषय बाजूला ठेवून पुढल्या दोन दशकातील घडामोडींचा मुद्दा कळीचा आहे. कुठल्या कारणास्तव आणि काय हेतूने बोस कुटुंबावर दोन दशके पाळत ठेवली गेली? त्यांना नजरकैदेत असल्यासारखे कशाला वागवले गेले? नेहरू जितके स्वातंत्र्योत्तर काळात लोकप्रिय होते, तितकेच नेताजीही लोकप्रियतेच्या शिखरावर होते. अगदी त्यांचा मृत्यू झालेला असला तरी त्यांच्या बलिदानाचा वारसा घेऊन कोणी आप्तस्वकीय राजकीय आखाड्यात उरतले असते, तरी नेहरूंच्या लोकप्रियतेला आव्हान उभे राहू शकले असते. त्याच भयाने व आपल्या मागे आपल्याच वारसाला देशाच्या गादीवर विनासायास विराजमान होता यावे हा हेतू असेल का? यासाठी नेहरू बोस कुटुंबाला लोकांमध्ये येण्यापासून प्रतिबंध घालण्याचे डाव खेळत होते काय? नसतील तर मग पाळत कशाला? एका बाजूला नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील नेते सैनिकांना कॉग्रेसमध्ये समाविष्ट करून सत्तापदे द्यायची आणि दुसरीकडे नेताजींच्या कौटुंबिक वारसांना खच्ची करायचा राजकीय डाव त्यातून खेळला जात होता काय? त्यासाठी मग युद्धकैदी वा मित्रराष्ट्रांचे आरोपी भासवून बोस कुटुंबाला जेरबंद करण्याचा पद्धतशीर खेळ झाला होता काय? ममतांनी मुक्त केलेल्या कागदपत्रातून हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत आणि त्याची चर्चा कोणी करीत नाही. किंबहूना ती करायची नाही. कोणी ते प्रश्न विचारू नयेत म्हणून मग चर्चा युद्धकैदी वा अन्य युद्धगुन्ह्यांच्या दिशेने भरकटवली जाते आहे काय असा संशय येतो. नेताजीप्रेमीही त्यातच भरकटलेले दिसतात.

Monday, September 21, 2015

सेक्युलॅरीझम म्हणजे ‘सनातन धर्म’?

Nepal has become a Hindu State through the backdoor

शहाण्या वा बुद्धीजिवी लोकांची एक मोठी समस्या अशी असते, की त्यांना प्रत्येक गोष्टीची व्याख्या आवश्यक असते. जी बाब कानाने ऐकता येते, नाकाला येणार्‍या वासाने ओळखता येते, किंवा डोळ्यानेही बघता येते, तिची ओळख व्याख्येत नसली मग विचारवंतांचे हाल सुरू होतात. त्यांना प्रत्येक बाबतीत डॉक्युमेन्ट हवे असते. ज्याचे डॉक्युमेन्ट वा शब्दात केलेले वर्णन वा व्याख्या नाही, ती अस्तित्वातच नाही; अशी ज्यांची ठाम समजूत असते, त्यांना बुद्धीमान म्हणून ओळखले जात असावे. मग अशा शहाण्यांना कोणीही अडाणी कागद व शब्दातली व्याख्या दाखवून हत्तीला मुंगीही ठरवू शकत असतो. नेपाळमध्ये काहीसे तसेच झाले आहे. तिथे माओवाद्यांनी उच्छाद मांडला होता, त्यातून क्रांती झाली आणि राजेशाही व्यवस्था संपुष्टात आली. मग भूमीगत माओवादी नेत्याच्याच हातात सत्ता गेलेली होती. पण उच्छाद मांडणे जितके सोपे, तितके कारभार चालवणे सहजशक्य नसते. कारण सामान्य लोक बुद्धिजिवी नसतात, तर व्यवहारी जीवन जगत असतात. म्हणूनच त्यांच्या समस्या प्रश्नांवर व्यवहारी उपाय योजावे लागतात. त्याच्या अभावी माओवाद्यांचा नेपळमध्ये ‘प्रचंड’ बोजवारा उडाला आणि आता नव्याने तिथे लोकशाही राष्ट्राची घटना बनवली गेलेली आहे. तोपर्यंत पुन्हा जुन्या राजकीय पक्षांच्या हाती सत्ता आलेली होती आणि त्यांनी लोकशाहीला आकार देताना देश सेक्युलर राहिल, याची पुरेपुर काळजी घेतली आहे. मात्र सेक्युलर म्हणजे नेमके काय, त्याचे उत्तर कुठेच मिळत नाही. पण घटना समितीने पुन्हा नेपाळला हिंदूराष्ट्र ठरवण्याचा प्रस्ताव साफ़ फ़ेटाळून लावला आहे. मग काय सगळे पुरोगामी खुश होणार ना? कारण व्याख्येने नेपाळ आता सेक्युलर देश झाला आहे आणि व्यवहाराने मात्र ते हिंदूराष्ट्र ठरणार आहे. म्हणजे नेपाळी सेक्युलर शब्दाची व्याख्याच कुठल्या कुठे बदलून गेली आहे.

मागल्या काही महिन्यापासून नेपाळला पुन्हा हिंदूराष्ट्र घोषित करण्यासाठी आंदोलने सुरू होती. शांततेने जशी आंदोलने चालू होती, तशीच हिंसकही संघर्ष पेटलेला होता. मजेची गोष्ट म्हणजे तिथल्या मुस्लिमांनाही नेपाळ पुन्हा हिंदूराष्ट्र व्हावे असेच वाटत होते. त्यासाठी नेपाळी मुस्लिम संघटनांनी एकत्रितपणे तशी मागणीही केली होती. बाकी हिंदू पक्ष व संघटनांनी तशी मागणी करण्यात फ़ारसे नाविन्य नव्हते. पण मुस्लिमांना हिंदूराष्ट्र कशासाठी हवे होते? भारतातले मुस्लिम नेते किंवा संघटना सातत्याने सेक्युलर भाषा बोलत असतात. कारण आपल्या धर्माला सेक्युलर कवच वाचवू शकते अशी त्यांची खात्री आहे आणि हिंदुत्वाचा इस्लामला धोका आहे, असेच वाटत असते. मग नेपाळी मुस्लिमांना हिंदू राष्ट्राविषयी इतके प्रेम कशाला असावे? तर तिथे त्यांना सेक्युलर व्यवस्थेत मुस्लिमांवर ख्रिश्चन धर्मसंस्था कुरघोडी करतात अशी भिती सतावत होती. किंबहूना सेक्युलर राजकारण म्हणजे ख्रिस्ती धर्मप्रसाराची राजकीय मोहिमच, असे मुस्लिम नेपाळी संघटनांचे मत झालेले होते. त्याच कारणास्तव त्यांनी हिंदूराष्ट्र मागितले होते. नेपाळ जोपर्यंत हिंदू राष्ट्र होते तोपर्यंत तिथे इस्लामला कुठला धोका नव्हता, पण सेक्युलर राजकारण सुरू झाल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांनी इस्लामवर संकट आणले, असा या संघटनांचा आरोप होता. म्हणूनच हिंदू संघटनांच्या खांद्याला खांदा लावून नेपाळी मुस्लिम संघटना हिंदूराष्ट्राची मागणी राष्ट्राची मागणी करायला मैदानात आलेल्या होत्या. इतक्या टोकाच्य प्रतिक्रीया नेपाळी राज्यघटनेच्या निमीत्ताने समोर आलेल्या होत्या. लोकशाहीतील राज्यकर्ते नेहमीच लोकमताच्या दबावाखाली असतात आणि म्हणूनच अशा मागण्यांकडे पाठ फ़िरवणे त्यांना शक्य नव्हते. मग त्यातून पर्याय काढावा लागतो आणि नेपाळच्या नेत्यांनी एक अजब चमत्कार करून दाखवला आहे. खरे तर तो भारतातल्या पुरोगाम्यांसाठी इशाराही मानायला हरकत नाही.

कितीही आंदोलने झाली व उलटसुलट मागण्या झाल्या, तरी घटना समितीने शेवटी नेपाळच्या हंगामी घटनेचा धागा पकडून ते हिंदूराष्ट्र होणार नाही याची ग्वाही दिली आणि सेक्युलर नेपाळची घोषणा राज्यघटनेतूनच केलेली आहे. मात्र भारतातले पुरोगामी सेक्युलर म्हणून जी व्याख्या करतात, त्यापेक्षा नेपाळी सेक्युलर शब्दाची व्याख्या भलतीच भिन्न आहे. त्याचा धर्मनिरपेक्षतेशी काहीही संबंध नाही, तसाच भारतीय सेक्युलॅरीझम जसा हिंदू शब्दाचा कट्टर विरोधक असतो, तसेही नेपाळमध्ये होणार नाही. त्यांच्या घटनेत हिंदू शब्दाला स्थान नाही. मात्र सेक्युलर म्हणजे सनातन धर्माला संरक्षण व त्या धर्माची पाठराखण, अशी पुस्ती घटनेत जोडण्यात आली आहे. तसे बघायला गेल्यास हिंदू नावाचा कुठला धर्म नाही. तर भारतीय उपखंडातील विविध धर्मप्रथांचे सामुदायिक अनुकरण करणार्‍या कोट्यवधीच्या जनसमुदायाला पाश्चात्यांनी दिलेले समायिक नाव म्हणजे हिंदूधर्म! वास्तवात ज्याला हिंदूधर्म संबोधले जाते तो व्याख्येनुसार सनातन वैदिक धर्म आहे. म्हणूनच जोवर राजेशाही होती तोवर नेपाळही सनातन धर्माचेच राष्ट्र होते आणि आताही सेक्युलर घोषित झाल्यावर तिथे सनातन धर्माचाच वरचष्मा रहाणार आहे. थोडक्यात नेपाळ हे सनातन धर्माचे राष्ट्र असेल. मात्र त्याला कायदेशीररित्या हिंदूराष्ट्र संबोधता येणार नाही. तर सेक्युलर राष्ट्र मानले जाईल आणि तिथे प्राधान्य सनातन धर्माला असेल. इतरही धर्म तिथे गुण्यागोविंदाने नांदू शकतील. पण व्यवहारी अर्थ असा, की नेपाळची सत्ता ही सनातन धर्माच्या आधीन असेल. थोडक्यात भारतीय सेक्युलॅरीझमच्या नेमक्या उलट्या टोकाची अशीच ही व्याख्या झाली. इथे हिंदू असणे वा सनातन शब्दाचा उपयोग करणे, सेक्युलॅरीझमला बाधक असते. तर नेपाळमध्ये सनातन असणे म्हणजेच सेक्युलर असणे ठरवले गेले आहे. पण अजून तरी कुणा भारतीय पुरोगाम्यांनी तक्रार केलेली दिसली नाही.

तक्रार कशाला करायची? त्यांना सेक्युलर शब्द प्यारा आहे आणि नेपाळने त्या शब्दाला जसेच्या तसे ठेवलेले आहे. मात्र नेपाळमध्ये सेक्युलर शब्दाची व्याख्या भारत वा अन्य जगभर असते तशी नाही. अर्थात हा प्रकार प्रथमच घडतो आहे, असेही मानायचे कारण नाही. जोवर सिंगापूर हा मलेशियाचा भाग होता, तोवर तिथेही सेक्युलर घटना होती आणि वेगळा झाल्यावरही मलेशियाची घटना बदललेली नाही. तिथे सेक्युलर घटनाच आहे. मात्र शब्दाचा अर्थ तसाच नाही. म्हणजे बहुसंख्य ख्रिश्चन असलेली सिंगापूरची संख्या वेगळी झाल्यावर उर्वरीत मलेशियात मुस्लिम बहुसंख्य झाले आणि त्यांनी घटनेत काही किरकोळ बदल करून तिथे इस्लामची शरियत लागू करून घेतली. त्यानुसार मुस्लिमांना सेक्युलर सत्तेत व कारभारात झुकते माप मिळते इतकेच! बाकी मलेशिया सेक्युलर आहे. आताही नेपाळ सेक्युलर असेल मात्र तिथे सनातन धर्माचा वरचष्मा असेल. कारण सेक्युलर शब्दाचा अर्थच सनातन धर्माला संरक्षण देणे, असा करण्यात आला आहे. थोडक्यात सनातन धर्माला धक्का बसणार नाही याची प्रत्येक धर्माच्या नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. सेक्युलॅरीझम असा सोपा व व्यवहारी होणार असेल, तर भारतातल्या हिंदूत्ववाद्यांना तरी हिंदूराष्ट्राची खुमखुमी कशाला राहिल? शब्द वा व्याख्येत कुठल्याच धर्माचे लोक बुद्धीजिवींप्रमाणे अडकून रहात नाहीत. त्यांना व्याख्येपेक्षा व्यवहाराची व कारभाराची फ़िकीर असते. म्हणूनच पुढल्या काळात सेक्युलर भारताला नेपाळच्या पद्धतीने सेक्युलर करण्याच्या हालचाली सुरू होण्याचा धोका पुरोगाम्यांनी ओळखायला हवा आहे. निदान नेपाळ येथील ताज्या घटनांबद्दल पुरोगामी आक्रोश एव्हाना सुरू व्हायला हवा होता. पण दोन दिवस उलटून गेले तरी फ़ारशी कुठे नेपाळी ‘सेक्युलॅरीझम’ विषयी पुरोगामी नाराजी असल्याचा सूर कानी आलेला नाही. नवलच आहे ना?

Sunday, September 20, 2015

जमाते इस्लामीचे धाडसी पाऊल



कुठलीही बातमी रंगवून सांगणे हा मानवी स्वभाव आहे आणि जितके मिरचीमीठ लावले जाईल तितकी बातमी मजेदार होते; अशी एक समजूत असते. पण त्याचाच हव्यास केला, मग अनेकदा अर्थाचा अनर्थ होऊन जातो. सनसनाटी माजवण्याच्या नादात सत्याचा विपर्यास होतो, तशाच अनेक इतर महत्वाच्या बातम्याही झाकल्या जातात. वास्तवात अशा बातम्या सामाजिक स्वास्थ्य व सौहार्दाला हातभार लावणार्‍या असतात. नेमक्या त्याच बातम्या दुर्लक्षित केल्या जातात किंवा सनसनाटीच्या हव्यासापायी झाकल्या जातात. उदाहरणार्थ जमाते इस्लामी या मुस्लिम धार्मिक राजकीय संघटनेची पत्रकार परिषद होय. अलिकडेच या जुन्याजाणत्या इस्लामी संघटनेने एक महत्वाची भूमिका घेतली आणि अगदी जाहिरपणे तिचा उच्चार केलेला आहे. त्याकडे माध्यमांनी साफ़ दुर्लक्ष केले आहे. ती बातमी केवळ मुस्लिम समाजासाठी महत्वाची नाही, तर एकूणच सर्व समाजघटकांच्या व जगाच्या हिताची भूमिका आहे. पण तीन दिवस उलटून गेल्यावरही पुरोगामी म्हणवणार्‍या माध्यमांनी त्यातले महत्व जगासमोर मांडण्याचा प्रयत्नही केलेला दिसला नाही. केरळात कोझिकोडे येथे या संघटनेच्या म्होरक्यांनी पत्रकार परिषद घेऊन इसिसच्या अरबी देशातील हिंसाचारी कृत्यांना प्रतिकार करण्याचा पवित्रा जाहिर केला आहे. म्हणजे नेमके काय करायचे त्याचा तपशील मांडला नसला, तरी भूमिका तर घेतली आहे? मग त्याचे कौतुक कशाला होऊ नये? वर्षभर इथले मुस्लिम तरूण इसिसकडे आकर्षित होत असल्याचे वा जिहाद करायला इराकपर्यंत गेल्याच्या बातम्या आल्या. त्याबाबतीत अगत्य दाखवणार्‍या माध्यमांनी जमातची ही भूमिका दुर्लक्षित कशाला करावी? म्हणजे त्याबद्दल किरकोळ दखल घेणार्‍या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण त्या संदर्भात उहापोह का होऊ नये? की मुस्लिम संघटना चांगली दिसू नये, असे माध्यमांच्या जाणत्यांना वाटत असावे?

इसिसमध्ये भारतीय मुस्लिम तरूण गेल्याच्या बातम्या झळकतात, तेव्हा मुस्लिमांकडे वा त्यांच्या तरूणांकडे शंकास्पद नजरेने बघितले जात असते. पण २०-२२ कोटी मुस्लिमातील २०-२२ तरूण तिकडे आकर्षित झाले तर ती संख्या नगण्य असते. पण ठळक बातम्यांमुळे इतरेजनांची मुस्लिमांकडे बघण्याची नजर कलुषित होते. अशा वेळी मुस्लिम तरूणांना रोखण्यासाठी समाजातले म्होरके काहीच करत नाहीत, अशीही धारणा तयार होऊ लागले. जमातने त्यातच पुढाकार घेतला आहे, म्हणूनच त्या बातमीला खरे महत्व आहे. एका बाजूला इसिसचा धर्माशी काहीही संबंध नसून उलट त्यांनी जिहादच्या नावाने चालविलेला हिंसाचार धर्मबाह्य असल्याची जमातची घोषणा बहुमोलाची आहे. कारण सामान्य मुस्लिम धर्मभिरू असतो आणि धर्माच्या नावावर त्याच्या गळी काहीही उतरवणे सोपे असते. इसिसचा हेतू तोच आहे आणि त्याच्या विरोधातले मोठे पाऊल म्हणजे त्यांच्या कृत्याशी जोडलेला धर्माचा संबंध तोडला जाणे. अजून तरी जगातील कुठल्या धर्ममार्तंड वा धर्मसंघटनेने इसिस विरोधत इतके मोठे खंबीर पाऊल उचललेले नाही. त्याच्या तुलनेत जमाते इस्लामीने उघडपणे इसिसची निर्भत्सना करण्याचे धैर्य दाखवणे, अनेक अर्थांनी महत्वाचे आहे. एक म्हणजे इस्लाम धर्म व मुस्लिम यांच्या संबंधात जे गैरसमज होतात, त्याच्या निराकरणाचे ते पाऊल आहेच. पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे इसिसच्या हिंसाचाराला धर्मबाह्य ठरवण्यापर्यंत मारलेली मजल महत्वाची आहे. संगीतकार रेहमान याच्या विरोधात रझा अकादमीने काढलेल्या फ़तव्यापेक्षा जमातची बातमी म्हणूनच मोठी ठरते. किंबहूना एकप्रकारे जमातच्या अशा भूमिकेमुळे रझा अकादमीच्या धर्मांध भूमिकेलाही नाकारले जात असते. म्हणून प्रसिद्धी देताना चांगले सौहार्दाचे परिणाम साधणार्‍या जमातच्या घोषणेचा गाजावाजा व्हायला हवा असतो. पण माध्यमे तिकडे दुर्लक्षच करतात.

इस्लामिक स्टेट नावाने इराक-सिरीयाच्या काही जिहादींनी स्थापन केलेली खिलाफ़त ही तोतयेगिरी असून, तिला इस्लाममध्ये कुठला धार्मिक आधार नाही, म्हणूनच त्या तोतयेगिरीचा निषेध केला पाहिजे व तिच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, इतकी ठाम स्पष्ट भूमिका जमातने घेतली आहे. इथे आणखी एक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. खिलाफ़त हा असा विषय आहे, की ज्यामुळे मुस्लिम मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्यात ओढला गेला होता व त्याचेही नेतृत्व जमातनेच केले होते. खिलाफ़त याचा अर्थ इस्लामी धर्मसत्तेचे जागतिक मुख्य सिंहासन होय. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात तुर्कस्थानातले आटोमान साम्राज्य खिलाफ़त होती व जगभरच्या अन्य इस्लामी सत्ताधीशांना मुस्लिम राज्य स्थापन करताना त्याच पिठाची मान्यता घ्यावी लागत असे. ब्रिटीश फ़्रेन्च वसाहतवादाने आटोमान साम्राज्य मोडून टाकले व परिणामी खिलाफ़तही बरखास्त करून टाकली. तेव्हापासून सगळे मुस्लिम देश वा सत्ताधीश स्वयंभू होऊन गेले. पण जनमानसात खिलाफ़त हा शब्द धर्मभावनेशी जोडला गेला आहे. इसिसच्या तोतयांनी त्याच भावनेला हात घालून रक्तरंजित नाटक रंगवले आहे. त्याच्या विरोधात तितक्याच ठामपणे राजकीय व धार्मिक भूमिका घेऊन उभे रहाण्याला म्हणूनच महत्व आहे, जगातल्या कुठल्याही देशातील मुस्लिम संघटना संस्थेने ते धाडस केलेले नाही. अगदी अरबी आखाती देशातले सत्ताधीशही मूग गिळून गप्प बसले आहेत, अशा वेळी जमाते इस्लामीने घेतलेली ठाम भूमिका निर्णायक महत्वाची असते आणि त्यासाठीच तिचा प्रसार प्रसार अगत्याचा आवश्यक होऊन जातो. किंबहूना त्यामुळे निदान भारतात तरी मुस्लिमांविषयी जी विकृत प्रतिमा असू शकते, ती पुसण्याच मोठा हातभार लागू शकतो. त्याहीपेक्षा भरकटणार्‍या मुस्लिम तरुणांना सावध करण्यात मोठे योगदान होऊ शकते.

दुर्दैव असे, की त्यात सामाजिक लाभ असला तरी सनसनाटी माजवायचा माल नसल्याने जमातची ही भूमिका किरकोळ बातम्या देवून संपवली जाते. उलट रझा अकादमीने काढलेल्या फ़तव्याचा डांगोरा पिटला जातो. ज्या फ़तव्याने मुस्लिम समाजात अस्वस्थता निर्माण होते आणि धर्मभावना दुखावल्याचे निमीत्त करून इसिस सारख्या संघटना अधिक मुस्लिम तरुणांना आपल्याकडे ओढू शकतात, त्याला माध्यमे प्राधान्य देतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की अशा चुकीच्या बातम्या रंगवून व ठळकपणे पेश करणार्‍यांना या देशात वा विविध धर्मियात सलोखा निर्माण करण्यापेक्षा वितुष्ट माजवण्याचा हव्यास आहे. पण ज्यातून मुस्लिमांना भरकटण्यापासून रोखता येईल, अशा बाबतीत काहीही करायचे नाही. हे एकूणच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे, की माध्यमे विध्वंसक वृत्तीला खतपा्णी घालत आहेत आणि विधायक अशा भूमिकांना फ़ारसे प्राधान्य देत नाहीत. आपल्या याच पत्रकार परिषदेत जमातने सिरीयन निर्वासितांकडे पाठ फ़िरवलेल्या आखाती अरबी देशांचाही निषेध केला आहे. ही बाब अधिक लक्षणिय आहे. आज जगात हेच अरबी देश मुस्लिमजगताचे नेते म्हणून मिरवत असतात. पण जेव्हा शेजारी मुस्लिम देशातील मुस्लिमांवरच मोठे संकट आले, तर मात्र त्यांच्या मदतीला जात नाहीत. याचा निषेधही जमात या मुस्लिम संघटनेने केला आहे. माध्यमांची जी गोष्ट आहे, तीच इथल्या धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या राजकीय पक्ष व संघटनांची स्थिती आहे. त्यातल्याही कुणाला जमातच्या भूमिकेचे हिरीरीने स्वागत करायची इच्छा झालेली नाही. एकूण काय तर सामाजिक सौहार्दाच्या गप्पा खुप जोरात चालतात. पण जिथे खरोखरच त्यात सहभागी होऊन योगदान देण्याची संधी येते, तेव्हा हेच धर्मनिरपेक्ष पुरोगामी कुठल्या कुठे गायब असतात. अशाच लोकांच्या अज्ञान वा खोडसाळपणामुळे विविध धर्मिय व समाजघटकात परस्पर शंका-संशय मात्र वाढत असतात.

आजन्म देणेकरी म्हणून जगलेला कार्यकर्ता!

 Displaying IMG-20150920-WA0030.jpg

१९७० च्या पुढे मागे दोन मोठ्या चळवळी वा संघटना मुंबईत उगम पावल्या. त्यातली एक होती शिवसेना आणि दुसरी होती दलित पॅन्थर! यातली शिवसेना आजही तितकीच प्रभावी आहे आणि प्रस्थापित राजकारणात मोठे फ़ेरबदल घडवायला कारणीभूत झाली आहे. मात्र सेनेच्या मागोमाग चारपाच वर्षात उदयास आलेली पॅन्थर ही संघटना नामशेष झाली आहे. त्याची मिमांसा हा स्वतंत्र विषय आहे. पण आजही दलित राजकारण वा समाजकारणात पॅन्थर हा शब्द तितकाच प्रभावी आहे, जितका चार दशकांपुर्वी होता. सेना वा पॅन्थर या दोन्ही युवकांच्याच संघटना होत्या. त्यातले साम्य-साधर्म्य असे, की ठराविक विचार भूमिकांच्या प्रस्थापित नेतृत्वाच्या गलथान वागण्याने वैफ़ल्यग्रस्त झालेल्या तरूणांचा उद्रेक म्हणून या दोन्ही संघटना उदयास आल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने मराठी राज्याची मागणी करून जन्म घेतला होता. पण ते राज्य स्थापन होतानाच समितीतील पक्षांमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि ते पक्ष पांगले. त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या मराठी तरूणाची कुठल्याही पक्षाशी बांधिलकी नव्हती. म्हणूनच तो समितीच्या भूमिकेला धरून जाणारे पर्यायी नेतृत्व शोधत होता आणि ते शिवसेनेच्या रुपाने पुढे आले. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेनुसार त्यांच्या पश्चात स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचीही नेत्यातल्या बेबनावाने फ़ाटाफ़ुट झाली आणि पुर्वाश्रमीच्या शेड्युल कास्ट फ़ेडरेशन या संघटना पक्षाचे तुकडे रिपब्लिकन पक्ष म्हणुन पडत गेले. त्यांचा अनुयायी प्रचंड प्रमाणात खेडोपाडी, गावोगावी व शहरातून पसरला होता. त्यातल्या तरूणाची जी घुसमट चालू होती, त्याला गटबाजी विसरून संघर्षाचे शिंग फ़ुंकणारे नेतृत्व हवे होते. त्यातून दलित पॅन्थरचा जन्म झाला. सेना असो किंवा पॅन्थर, दोन्हीचे नेतृत्व पुर्णत: अननुभवी होते आणि तो तत्कालीन परिस्थितीचा उद्रेक होता.

यातल्या पॅन्थरची स्थापना नामदेव ढसाळ व ज. वि. पवार अशा दोघांच्या पुढाकाराने झाली. त्यातला नामदेव आज हयात नाही आणि शनिवारी ज. वि. पवार याची सत्तरी साजरी झाली. त्या समारंभात मी एक वक्ता म्हणून हजर होतो आणि १९७० च्य दशकातले अनेक चेहरे वार्धक्याकडे झुकलेले बघून मला जुना काळ आठवला. पण त्याहीपेक्षा प्रकर्षाने आज जाणवणारी गोष्ट म्हणजे म्हातारा वा अस्तंगत होत चाललेला कार्यकर्ता! नामदेव किंवा ज वि पवार हे पॅन्थरचे संस्थापक वा नेता म्हणूनच ओळखले जातात. पण त्यातला जवि हा कधीच नेता नव्हता. आजही नेता होऊ शकलेला नाही. कार्यकर्ता कसा असावा, त्याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणुन त्याच्याकडे बोट दाखवता येईल. मागल्या चार दशकात समाजकारण वा सारजनिक जीवनाची झालेली सर्वात हानी कुठली असेल, तर त्यातून ज. वि. पवार याच्यासारख्या कार्यकर्त्याची जमात कुठल्या कुठे लुप्त होऊन गेली आहे. दलित पॅन्थरची संकल्पना साकारताना त्यांच्यापाशी पत्रक छापून घेण्याइतकेही पैसे नव्हते आणि बॉम्बे लेबर युनियनच्या कार्यालयातील सायक्लोस्टाईल यंत्रावर छापलेल्या शंभर चिटोर्‍याच्या आमंत्रणावर बैठकीचे आयोजन झाले होते. त्यातून एक झुंजार संघटना उदयास आली. त्यामागचे मोठे भांडवल ज. वि, पवार हेच होते. त्याला मी भांडवल इतक्यासाठी म्हणतो, की त्याला कुठला स्वार्थ वा महत्वाकांक्षा नव्हती आणि आजही नाही. एका विचार-भूमिका यांनी भारावलेल्या व पदरमोड करून जग बदलण्याची स्वप्ने बघणार्‍यांच्या योगदानावर संघटना व पक्ष संस्था उभ्या रहात. परदेशी सोडा, कुठले देशी निधी वा देणग्याही लागत नसायच्या, अशा परिस्थितीत उभी राहिली त्या संघटनेचे नाव होते पॅन्थर! यात सहभागी होणार्‍या तरूणांकडे कुठले पद नव्हते की सदस्यत्वाच्या पावत्याही कोणी फ़ाडल्या नव्हत्या. हेतू, उद्दीष्ट व विचार यासाठी जीव ओवाळून टाकणार्‍यांचा जमाव म्हणजे पॅन्थर!

आजही राज्यात राजरोस दलितांवर अत्याचार होतात, अन्याय होतात, त्यावर मोर्चे निघतात, आवाज उठवला जातो. तेव्हाही १९७० च्या जमान्यात परिस्थिती वेगळी नव्हती. पण आजचे रिपब्लिकन गट जसे निषेधाचे शब्द बोलून पाठ फ़िरवतात, तशीच तेव्हाची गोष्ट होती. त्यामुळे बेचैन झालेल्या मुठभर दलित तरूणांना आपण फ़क्त मूठभर नाही तर जागोजागी पसरलो आहोत, याचे भान येऊ लागले आणि त्यांनी आधी स्वत:तला सुप्त ज्वालामुखी जागवला. त्याचा वणवा पुढे पसरत गेला तोच पॅन्थर म्हणून ओळखला गेला. आपल्या आतल्या धुमसता ज्वालामुखी जागा केला पाहिजे, म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला त्यातला आजही जागरुक असलेला एक ज्वालामुखी आहे ज. वि. पवार! शनिवारी त्याच्या गौरवासाठी हजेरी लावली आणि चार शब्द बोलत होतो, तेव्हाही त्याच्यातली धग जाणवत होती. आजही तितकाच निस्वार्थी, निस्पृह पण निर्धारी जवि बघून खुप बरे वाटले. किंबहूना विशीतल्या जमान्यात गेलो. वंचितांचा लढा लढवण्यात हयात गेली असतानाही, सर्व सन्मान वा पदे यांना वंचित ठेवला गेलेला हा हाडाचा कार्यकर्ता. पण अजून स्वत:ला काही मिळाले नाही याची तक्रारही करत नाही. आजच्या रिपब्लिकन चळवळ, पक्ष व गटांना ज्यांनी नेते पुरवण्याचे काम चाळीस वर्षापुर्वी आरंभले होते, त्याच्या साध्या गौरव समारंभात रामदास आठवले वा अर्जुन डांगळे वगळता कोणी मोठा नावाजलेला दलित नेता हजर राहू नये, याचे मला खुप वैषम्य वाटले. पण जविच्या कपाळावर एकही आठी नव्हती, की त्याला त्याची काडीमात्र फ़िकीर नव्हती. आपणच सत्कारमुर्ति आहोत याचेही भान नसलेला हा माणुस, तिथेही व्यवस्था बघत सामान्य कार्यकर्त्यासारखा वागत होता. आजवर काय व किती केले, त्याचे मोजमाप त्याच्या वागण्यात नसतेच. पण सत्काराच्या प्रसंगीही राहुन काय गेलेय त्याचीच बोली जवि बोलत होता.

याला कार्यकर्ता म्हणतात, तो कुठल्या कुठे लुप्त झालाय हल्लीच्या समाजजीवनात. शेकड्यांनी एनजीओ उदयास आलेत. हजारो समाजसेवक आपल्याला दिसत असतात. पण हातात वाडगा घेऊन निधी देणग्या वा मागण्या करत फ़िरणारे हे वंचित बघितले, की पॅन्थरची श्रीमंती लक्षात येते. सरकार वा अन्य कोणाकडे मागण्या करताना हक्क मागणारा हा पॅन्थर आजही हक्काची मागणी करतोय. समाजाचे लोकांचे इतरांचे हक्क मागणारा हाच संघर्ष व परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता असतो. आयुष्यभर नोकरी करून संसार करताना त्याने समाजाकडून घेतले काय? त्याला मिळाले काय? या प्रश्नाचे उत्तर आजही नकारात्मक आहे. सामान्य नागरिक जसा रोजगार करतो आणि आपल्या उपजीविकेच्या विवंचनेत असतो, त्यापासून जविची सुटका नव्हती. पण तितके चुल पेटण्याचे पैसे कमावल्यावर आपला प्रत्येक जादा क्षण व तास-दिवस त्याने वैचारिक संघर्ष व हक्कांच्या लढाईसाठी खर्ची घातला. पण आजही तुम्ही ज वि पवार नावाच्या माणसाला कुठे चुकून भेटलात, तर आपण समाजासाठी अमुकतमुक केले, असे शब्द त्याच्याकडून ऐकायला मिळणार नाहीत. ही दुर्मिळ झालेली गुणवत्ता मला हल्ली जागोजागी खटकते. शनिवारी त्याचा गौरव होता आणि आम्ही त्यातले वक्ते त्याने आजवर दलित शोषित समाजाला काय काय दिले, त्याचा ताळेबंद मांडायचा प्रयत्न आपल्या परीने करत होतो. तर हा माणूस मात्र त्यातले श्रेयही घेण्याला पाप समजून अंग झटकत राहिला. बाबासाहेबांचे लिखाण वा अन्य साहित्य पत्रव्यवहार जविच्या प्रयत्नामुळे कसा प्रसिद्ध होऊ शकला व आधी कसा धुळ खात कोर्ट रिसीव्हरच्या अडगळीत पडला होता, त्याचा किस्सा भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितला. तर समारंभ संपला असतानाही जवि बोलायला पुन्हा उभा राहिला आणि त्यातला योगायोग सांगून त्याने त्याचेही श्रेय घ्यायला तत्परतेने नकार दिला.

मी जेव्हा इथे विविध चळवळी, पक्ष-संघटना वा नेते इत्यादींविषयी नेहमी लिहीतो, तेव्हा कायम टिकात्मक लिहीतो असा अनेकांचा आक्षेप असतो. मला नकारात्मकच सर्व दिसते असा अनेकांचा आक्षेप असतो. त्याचे कारण हे जविसारखे निस्वार्थी कार्यकर्ते असतात. माझ्या उमेदीच्या कालखंडात मला अशी माणसे जवळून बघता आली, त्यांच्याशी देवाणघेवाण करता आली. त्यांच्यात मिसळता आले. ज्यांना कधी समाजाकडून काही घेणे लागतो अशा भावना वा स्वार्थाची बाधाच झाली नाही. तर आपण समाजाचे देणे लागतो, अशा धारणेने पछाडलेले होते. आपल्या जगण्यापुरते असले म्हणजे खुप झाले. त्यापेक्षा अधिक काही वाट्याला आले वा हाताशी असले तरी ते समाजासाठी, वंचितांसाठी उधळून वाटून टाकावे, अशा समजुतीने त्यांना पछाडलेले होते, अशीच माणसे माझ्या वाट्याला आली. मागल्या पिढीतले जीएल रेड्डी, बाबू मुंबरकर, सोहनसिंग कोहली वा माझ्याच पिढीतले जविसारखे लोक आयुष्यभर समाजाचे देणेकरी म्हणून जगताना जवळून अनुभवलेला माझा स्वभाव पदासाठी, स्वार्थासाठी तडजोडी बौद्धिक कसरती करणार्‍यांना बघतो, तेव्हा घुसमटून जातो. बाकीचे स्वार्थ सोडाच, साधे श्रेय गौरव समारंभातही नाकारण्याचे औदार्य ज्यांच्यापाशी असते, असे हजारभर कार्यकर्ते उभे राहिले; तर देशाला कुणा प्रेषिताची उद्धारासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही. बाबासाहेबांनी शिक्षणाचे व स्वयंउद्धाराचे दरवाजे खुले करून दिले, म्हणून आपण इतकी मजल मारू शकलो. त्याच कर्जाची फ़ेड म्हणून आपण समाजाचे देणे लागतो, ही धारणा असलेला ज. वि. पवार हा खरा आदर्श आहे. पण तो लोकांपुढे आणायचा कोणी? कुठे त्याचे कौतुक होणार नाही, की त्याला आदर्श म्हणून कोणी पेश करणार नाही. बाबासाहेबांनी काय दिले, ते सांगणारे खुप आहेत. पण त्यांच्यापासून घेतले काय, ते उमजलेला ज. वि. पवार विरळाच!