नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संशयास्पद मृत्यू व कागदपत्रांच्या भोवर्यात कॉग्रेस सध्या गटांगळ्या खाते आहे. अशा वेळी भारताचे अल्पकालीन पण लोकप्रिय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, यांच्या सुपुत्राने आपल्या पित्याच्या संशयास्पद मृत्यूची कागदपत्रे खुली करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना केल्यामुळे नवाच वादविवाद उभा रहाण्याची चिन्हे आहेत. १९६२ सालच्या भारत-चीन युद्धात नामुष्की पदरी आल्याने खचलेल्या भारतीय सेनेला शास्त्रीजींच्या अल्प कारकिर्दीत मोठे मनोधैर्य मिळाले. कारण भारतीय सेना मनाने खचली असल्याचा निष्कर्ष काढून लष्करशहा जनरल अयुबखान यांनी भारतावर हल्ला केला होता. तेव्हा नवखे व बटुमुर्ती असलेले पंतप्रधान शास्त्री गडबडून जातील, ही त्यांची अपेक्षा होती. ती चुकीची ठरली आणि भारताने अल्पावधीत ते युद्ध जिंकले. खरे तर पाकिस्तानला दाती तृण धरायची वेळ आली. त्यात मध्यस्थी करून सोवियत युनियनने ताश्कंद करार घडवून आणला होता. त्याच वाटाघाटीसाठी तिथे गेलेले शास्त्री यांचे करारावर सह्या केल्यानंतर निधन झाले. विजयीवीराप्रमाणे ताश्कंदला गेलेल्या शास्त्रीजींचे पार्थिवच मायदेशी परत आले. तेव्हापासून त्यांचा मृत्यू हा संशयास्पद विषय राहिला आहे. वारंवार त्याबद्दल विचारणा झालेली आहे आणि संबंधित कागदपत्रे जाहिर करण्याच्या मागण्याही झाल्या आहेत. डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्याने त्यावर झोड उठवली होती. या मृत्यूशी गाजलेल्या धर्मा तेजा घोटाळ्याचा संबंध जोडणारा आरोपही लोहियांनी संसदेत केला होता. नेमका तसाच आरोप इतक्या वर्षानंतर खुद्द अनिल शास्त्री यांनी केला आहे. विशेष म्हणजे आजही अनिल शास्त्री कॉग्रेस पक्षात आहेत आणि आपल्या मागणीने पक्ष अडचणीत येईल, असे त्यांना वाटलेले नाही. पण कॉग्रेस पक्षात मात्र त्यामुळे खळबळ माजलेली आहे.
कॉग्रेसचे एक प्रवक्ते व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे पुत्र संदीप दिक्षीत, यांनी अनिल शास्त्रींना दोष देण्याचाही प्रयत्न केला आहे. शास्त्रीजींच्या मृत्यूला इतकी वर्षे उलटून जाईपर्यंत त्यांचे कुटुंबिय गप्प कशाला बसले होते, असा सवाल दिक्षीत यांनी केला आहे. ही बाब मात्र खटकणारी आहे. अनिल शास्त्री यांनी कोणावर स्पष्ट आरोप केलेला नाही, की कॉग्रेस सत्तेला दोष दिलेला नाही. म्हणजेच आपला पक्ष गुन्हेगार आहे असे अनिल शास्त्रींना आजही वाटत नसावे. मग संदीप दिक्षीत यांनी इतकी खोचक व जळजळीत प्रतिक्रीया कशाला द्यावी? जणू दिक्षित यांनी हा आरोप आपल्या पक्षावरच ओढवून घेतला आहे. म्हणूनच मग मूळ मागणीपेक्षा दिक्षीत यांची प्रतिक्रीया तपासून बघणे अगत्याचे ठरावे. कुठल्याही मुलाला आपल्या जन्मदात्याच्या शंकास्पद मृत्यूची माहिती मागण्याचा अधिकार नाही काय? असेल तर अनिल शास्त्रींच्या मागणीत खटकण्यासारखे आहे तरी काय? आजही राहुल गांधी आपली आजी इंदिराजी व पिता राजीव गांधी यांच्या घातपाती हत्येविषयी राजकारण करत असतील. तर दुसर्या पंतप्रधानाच्या कुटुंबाला साधी मृत्यूची कारणेही मागण्याचा अधिकार का असू नये? त्यात कॉग्रेसच्या कुणा नेत्याने राजकारण का शोधावे? चोराच्या मनात चांदणे म्हणतात, त्यातलाच हा प्रकार नाही काय? ४५ वर्षे शास्त्री कुटुंब गप्प बसले, तर त्याची कारणे विचारताना परिस्थितीही तपासणे भाग आहे. नेताजींचे कुटुंबिय पहिल्या दिवसापासून तशी मागणी करीत होते. त्यांच्या हाती काय लागले होते? संदीप दिक्षीत यांनी त्याचाही खुलासा करावा. तात्काळ शास्त्री कुटुंबाने तशी मागणी केली असती, तर तेव्हाच्या इंदिरा सरकारने कागदपत्रे खुली केली असती काय? नसेल तरा असला खुळचट सवाल दिक्षीतांनी विचारावाच कशाला? की खायी त्याला खवखवे म्हणायचे?
कारण उघड आहे. शास्त्री कुटुंब नव्हेतरी अनेकांनी त्या शंकास्पद मृत्यूच्या चौकशीची वेळोवेळी मागणी केलेली होती आणि गुपित म्हणून ती फ़ेटाळली गेली होती. पण ते गुपित राखण्यात नेहरू कुटुंबाचाच हात आहे, असा कोणी दावा केलेला नाही. तेव्हाचे आक्रमक समाजवादी नेते डॉ. लोहियांनी तशी मागणी केली होती आणि त्यामध्ये घोटाळेबाज डॉ. धर्मा तेजा गुंतले असल्याचा संशयही व्यक्त केला होता. त्यावर तात्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग यांना संसदेत खुलासा करावा लागला होता. त्यामुळे संदीप दिक्षीत समजतात तितका तो पोरकट विषय नाही. पण कॉग्रेस म्हणजे नेहरू कुटुंब व नेहरू कुटुंब म्हणजे कॉग्रेस, अशी जी घट्ट समजूत आहे, त्यातून दिक्षीत यांची तात्काळ प्रतिक्रीया आलेली आहे. अगदी कालपरवा जयंती नटराजन यांनी पक्षाचा राजिनामा देऊनच आपल्या विरुद्ध राहुलनी केलेल्या कुजबुजीचा खुलासा मागितला होता ना? त्यातून कळते की शास्त्री कुटुंब इतकी वर्षे गप्प कशाला होते. नटराजन यांचेही तीन पिढ्या कॉग्रेसशी संबंध होते. पण त्यांना आपल्यावरच्या बिनबुडाच्या आरोपाचा खुलासा मागण्यासाठीही सोनियांच्या हातून सत्ता जाण्याची प्रतिक्षा करावी लागली. अन्यथा खुलासा विचारण्याची हिंमत झाली नव्हती. ही बाब लक्षात घेतली, तर शास्त्री वा अन्य कुटुंबे आप्तस्वकीय नेहरू कुटुंबाच्या दहशतीखाली कशाला असायचे, त्याचा खुलासा होऊ शकतो. दिक्षीत ज्या वेगाने शास्त्री कुटुंबाच्या हेटाळणीला पुढे सरसावले, त्यातूनच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. कारण हा अनुभव शास्त्री वा नटराजन यांच्यापुरता मर्यादित नाही. सीताराम केसरी कॉग्रेस अध्यक्षपदी असताना त्यांचे पद सोनियांना हवे, म्हणून केसरींना जीव मुठीत धरून पक्ष कार्यालयातून पळावे लागले होते. अशा पक्षात व त्यांच्याच हाती सत्ता असताना कुठलाही खुलासा वा प्रश्न विचारण्यासाठी वेळ लागणारच ना?
अर्थात संदीप दिक्षीत यांनी केली ती नुसती सुरूवात आहे. ही मागणी अनिल वा सुनील शास्त्री यांनी अशीच लावून धरली, तर लौकरच लालबहादूर शास्त्री हे देशासाठी कसा धोका होते, त्याचीही वर्णने आपल्याला ऐकायला व वाचायला मिळू शकतील. कारण मागल्या सहा सात दशकात एक नेहरू घराणे सोडल्यास बाकी या देशासाठी कोणी उपकारक वा उद्धारक होऊच शकलेला नाही, हा मुळचा राजकीय सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला धक्का बसणार असेल, तर कोणालाही व कशालाही देशद्रोही व देशविघातक ठरवण्याचे पुरावे व तर्क सज्ज असतात. कालपरवापर्यंत नेताजींचा विषय पटलावर असताना शास्त्रीही गृहमंत्री होते आणि नेताजींच्या कुटुंबावर पाळत ठेवली गेली, तर त्याला शास्त्रीही जबाबदार होते असे युक्तीवाद झालेले आहेत. आता शास्त्रींच्या शंकास्पद मृत्यूचा विषय आला आणि त्यात पुन्हा कम्युनिस्ट रशियाचे नेतृत्व गुंतले असेल, तर बघायलाच नको. आपोआप शास्त्रीजी प्रतिगामीही ठरवले जाऊ शकतील. मात्र लोक अशा खुलासे व युक्तीवादाला बधणार नाहीत. कारण सहा दशके लोक असले खुलासे व मखलाशी ऐकून थकले व कंटाळले आहेत. किती बाबतीत योगायोग व रहस्ये असावीत, याला मर्यादा असतात. वाड्राच्या पित्याचाही मृत्यू संशयास्पद होताच. त्याविषयी कोणाला कधी कुतूहल वाटलेले नाही. हे सगळे शंकास्पद मृत्यू नेहरू कुटुंबाच्याच अवतीभवती कशासाठी होत असावेत? त्या काळात एका बॅन्केतून साठ लाखाची कॅश काढली म्हणून नगरवाला प्रकरण गाजले होते आणि त्यात इंदिराजींचे नाव घेतले गेले होते. नगरवाला अटकेत असताना संशयास्पद रितीने मरण पावला होता. इथे शास्त्रीजींच्या सोबतचा व्यक्तीगत डॉक्टर अपघातात मरतो आणि स्वीय सचिव अपघाताने स्मृती गमावून बसतो. तर संदीप दिक्षीत विचारतात इतके दिवस गप्प कशाला बसलात? बहुधा मोदींसारखा नेहरू कुटुंबाला न घाबरणारा कोणी सत्तेत येण्याची प्रतिक्षा करीत, हे लोक गप्प बसले असावेत
your conclusion "बहुधा मोदींसारखा ......
ReplyDeletesimply precious !!
मागल्या सहा सात दशकात एक नेहरू घराणे सोडल्यास बाकी या देशासाठी कोणी उपकारक वा उद्धारक होऊच शकलेला नाही, हा मुळचा राजकीय सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला धक्का बसणार असेल, तर कोणालाही व कशालाही देशद्रोही व देशविघातक ठरवण्याचे पुरावे व तर्क सज्ज असतात.
ReplyDeleteहेच वास्तव आहे भारताचे
Bhau you are putting the things straight before readers. Well done
ReplyDeleteया नेहरू गांधी परिवारांनी किती राजकीय बळी घेतलेत हे देव जाणे आता अनिल शास्त्री परिवारांचे अभिनंदन केले पाहिजे कारण त्यांना उशिरा का होयीना शहाणपण सुचले आता या परिवारांनी किती बळी घेतलेत हे जगजाहीर झाले पाहिजे आणि त्यांच्या कठोर कारवाई केली पाहिजे तसेच गोपीनाथ मुंडे यांचे देखील अपघाती मारेकरी कोण आहे हे देखील समजले पाहिजे पण त्यास वेळ लागेल व तिथे पक्ष देखील वेगळा असेल
ReplyDeleteआपण म्हणू व सांगू व.आम्हाला जी पटेल, रूचेल, आवडेल तोच देशभक्ती व इतर जे करतात तो जातीयवाद. हीच गांधी नेहरूंची विचारसरणी होती व आहे. आता आत्ता लोकाना हे कळायला लागले आहे. हा विचार एक दिवस मरणार हे नक्की.
ReplyDelete