Sunday, September 13, 2015

डॉक्टऱच्या पोस्टमार्टेमचा पुरवणी अहवाल

सांगा यात कोणी पुरोगामी दिसतोय? सगळे कसे सशस्त्र हिंसाचारी प्रतिगामी आहेत ना?



‘समाजहिताच्या आड येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात प्रबोधन करणारा तो पुरोगामी. पुरोगामी म्हणजे पुढे पाहणारा. उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारा. मोरे मात्र म्हणतात, "पुरोगामी दहशतवादी असतात.‘ या विधानाला प्रमाण काय? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. प्रतिगामी म्हणजे भूतकाळात डोके खुपसून बसलेला. भविष्याकडे पाठ फिरवणारा. समाजातील कुप्रथा आणि दोष यांना कुरवाळणारा. म्हणजे एका अर्थी व्यापक समाजहिताची बांधिलकी न मानणारा. थोडक्‍यात, प्रतिगामी म्हणजे संकुचित विचारसरणीचा आणि हिंसाचाराचा मार्ग अवलंबणारा. धर्मद्वेष आणि धार्मिक तेढ वाढली तर ती भारतीय बांधवांमधील बंधुत्व नष्ट करते. प्रतिगामी मंडळींनी आजवर परधर्मीयांची व पुरोगामी मंडळींची हत्या केली. त्याची संख्या मोठी आहे. पुरोगामी हे विशेषण लावणाऱ्या कोणीही कधी हत्येचा मार्ग अवलंबलेला नाही, हा इतिहास कसा नाकारता येईल? मग दहशतवादी कोण हे स्पष्ट झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. याउलट कोणत्या प्रतिगामी व्यक्तीची महाराष्ट्रात हत्या झाली, हे मोरे यांनी आपल्या विधानाच्या पुष्टीसाठी सांगायला हवे. "पुरोगामी लोकांच्या हत्येमागे विचारसरणीच्या भिन्नतेचे कारण नाही,‘ हे विधान ते कशाच्या आधारे करतात, हा प्रश्‍न आहे. गुप्तचर यंत्रणेच्या थाटात केलेले हे भंपक विधान आहे.’

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हा शेवटचा परिच्छेद आहे. त्यातले एक एक वाक्य घेऊनही त्याचे पोस्टमार्टेम होऊ शकते. पण मग वाक्ये तोडूनमोडून विपर्यास केला असा आरोप होण्याचा धोका मला नको आहे. म्हणून संपुर्ण परिच्छेद जसाच्या तसा पेश केला आहे. आता त्यातली तर्कविसंगती बघा. दाभोळकर पानसरे यांच्या सोबत कलबुर्गी यांच्या हत्येचा संदर्भ द्यायचा आणि महाराष्ट्रात तशी कुठल्या प्रतिगाम्याची पुरोगाम्याने हत्या केली, त्याचा पुरावा मागायचा. कलबुर्गी यांची हत्या कर्नाटकात झाली, तेही या डॉक्टरांना ठाऊक नाही काय? दुसरी गोष्ट महाराष्ट्रातच विदर्भ येतो आणि तिथे जो माओवादी हिंसाचार चालू आहे, ते लोक कुठले विशेषण आपल्या मागे लावतात? नक्षलवादी वा माओवादी स्वत:ला पुरोगामी असेच विशेषण लावतात, हे सप्तर्षींना अजून ठाऊक नसेल, तर ते कुठल्या युगात व जगात जगतात, असा प्रश्न पडतो. अर्थात असे प्रश्न आपल्यालाच पडू शकतात, सप्तर्षींना कुठलेच प्रश्न पडत नाहीत आणि उत्तरे शोधण्याची त्यांना गरजही वाटत नाही. पुरोगाम्यांनी कोणत्या प्रतिगामी व्यक्तीची महाराष्ट्रात हत्या केली, असा प्रश्न विचारताना मार्क्सची साम्यवादी विचारसरणीही जगात पुरोगामी मानली जाते, हेच ज्यांना अजून उमगलेले नाही, ते पुरोगामी विचारवंत आहेत. अशा सप्तर्षींनी दाभोळकर वा पानसरे किती वाचलेत वा समजून घेतलेत, याचीही शंका आहे. किंबहूना सप्तर्षी आपल्या लिखाणात वा भाषणातून संघविषयक इतके संदर्भ देण्याचा हव्यास बाळगतात, की त्यांनी संघ वा हिंदूत्वाचाच जास्त अभ्यास केलेला असावा अशी शंका घ्यायला जागा आहे. मात्र शंकेच्या पुढे जाता येत नाही. कारण बारकाईने सप्तर्षींची विधाने व दावे तपासत गेलात आणि त्यांनी वापरलेल्या जडजंबाल शब्दांच्या खाली दबला नाहीत, तर हे डॉक्टर अत्यंत निरर्थक बोलत असल्याचे सहज लक्षात येऊ शकते. उदाहरणार्थ त्यांनी वरील परिच्छेदात पुरोगामी व प्रतिगामी या विषयात केलेली व्याख्याच बघा.

सप्तर्षी स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात. पण त्यांनीच जी प्रतिगाम्यांची व्याख्या केलेली आहे, त्यानुसार स्वत:च वागताना दिसतील. त्यांच्या मते प्रतिगामी कोण? ‘प्रतिगामी म्हणजे भूतकाळात डोके खुपसून बसलेला. भविष्याकडे पाठ फिरवणारा. समाजातील कुप्रथा आणि दोष यांना कुरवाळणारा. म्हणजे एका अर्थी व्यापक समाजहिताची बांधिलकी न मानणारा.’ आता गंमत बघा, सप्तर्षींसह तमाम पुरोगामी गांधी वा कुठलाही विषय निघाला, मग कुठे जाऊन पोहोचतात? नथूरामपर्यंत! नथूराम ही आधुनिक युगातली गोष्ट आहे काय? संघाचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान काय, असाही सवाल पुरोगामी विशेषण लावणारा अगत्याने विचारल्याशिवाय रहात नाही. ह्याला पुढे बघणे म्हणायचे की भूतकाळात डोके खुपसून बसणे म्हणायचे? याला भविष्याला सामोरे जाणे म्हणावे, की भविष्याकडे पाठ फ़िरवणे म्हणतात? याचा परिणाम असा झाला आहे, की दिवसेदिवस ज्याला पुरोगामी चळवळ किंवा विचारसरणी म्हणतात, ती सातत्याने मागे पडत गेली आहे. आणि तिचाच आग्रह धरणार्‍यांनी ती विचारसरणी मागे मागे जाईल यासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत. पण आपल्या मागे पडण्याला व कालबाह्य होण्यालाच हे डॉक्टर महाशय ‘पुढे पहाणारा वा पुढे जाणारा’ असे ठरवित आहेत. इथे आपल्या लक्षात येते, की पुढे-मागे वा अन्य कुठल्याही शब्दाचे तुमचे आमचे अर्थ आणि अशा पुरोगाम्यांने अर्थ यातच जमिनअस्मान इतका फ़रक आहे. आज ज्यांच्यावर हिंदूत्ववादी म्हणून प्रतिगामी असा पुरोगाम्यांचा आरोप असतो, त्यापैकी कितीजण ‘कर्मविपाकाचा सिद्धांत’ सांगताना तुम्ही ऐकले आहे? कुठल्या संघ शिबीरात वा शिवसेना, बजरंग दलाच्या बैठकीत ह्या सिद्धांताचे प्रवचन ऐकायला मिळणार नाही. पण सप्तर्षींसारखे निवडक पुरोगामी मात्र अत्यंत आग्रहाने जुन्या कालबाह्य कर्मविपाक सिद्धांताची पारायणे नित्यनेमाने करताना दिसतील.

थोडक्यात आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी अशा पुरोगाम्यांना सातत्याने पुरणकाळात जावे लागते आणि कर्मविपाकाचा सिद्धांत सांगून आजच्या पुढारलेल्या हिंदूं व त्यांच्या संघटनांना त्यांचा भूतकाळ आठवण करून द्यावा लागतो. मग भूतकाळ वा त्यातल्या कुप्रथा कुरवाळत कोण बसलेला आहे? प्रतिगामी प्रा शेषराव मोरे यांनी कुठे कर्मविपाकाचा सिद्धांत आपल्या भाषणात मांडला नाही. पण डॉक्टर सप्तर्षी मात्र अगत्याने त्याचे पारायण करून कालबाह्य कुप्रथेची जपमाळ ओढत बसले आहेत आणि याही लेखातून त्यांना त्या कुप्रथेकडे पाठ फ़िरवता आलेली नाही. शिवाय असे लोक त्या कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये इतके गुरफ़टून जातात, की अलिकडच्या हिंदूत्व सोडा, पुरोगामी राजकारणाचा इतिहासही त्यांना तपासुन बघायला सवड मिळत नाही. म्हणून मग हेच लोक विचारतात कुठल्या पुरोगाम्याने कधी कुठल्या प्रतिगाम्याची हत्या केलेली आहे? असे विचारताना रशियात स्टालिन, चीनमध्ये माओ वा क्युबामध्ये चे गव्हेरा यांनी काय रक्तपात केला, त्याचीही माहिती मिळवायचे त्राण त्यांच्या अंगी उरत नाही. कदाचित सप्तर्षी वा तत्सम पुरोगाम्यांच्या लेखी ही मंडळी कर्मविपाकाच्या सिद्धांत प्रभावाखाली येऊन अशी हिंसक वगैरे झालेली असावी. मार्क्स हा कोणी इश्वराचा प्रेषित असावा आणि त्यानेच दास मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहीलेला असावा. अन्यथा सप्तर्षींना असा प्रश्न कशाला पडला असता? विदर्भात माओवादी धर्मांधांनी जे सामुहिक हत्याकांडाचे सत्र चालविले आहे, तेही बहुधा प्रतिगामी असेच विशेषण लावून मिरवत असावेत. अन्यथा डॉक्टर मजकुरांनी इतक्या छातीठोक असले प्रश्न ‘सकाळ’मधून कशाला विचारले असते? पुण्यातल्या ‘सकाळ’ आवृत्ती संपादकाला विदर्भातील ‘सकाळ’ आवृत्तीच्या बातम्याही वाचायला मिळत नसाव्यात का? एकूण मामलाच मोठा विचित्र आहे. अशा मस्तीत व नशेत झिंगलेल्यांविषयी काय बोलावे?

इतिहासातल्या वर्तमानाला घट्ट चिकटून बसणारे वर्तमानातले शहाणे भविष्यातला इतिहास घडवू शकत नाहीत. मात्र भविष्याबद्दल भाकिते करण्यात पुढे असतात. मग त्या भाकितासोबतच असे लोक इतिहासजमा होतात. इतिहास त्यांना हसत असतो, वर्तमान त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि भविष्य त्यांची दखलही घेत नाही.

3 comments:

  1. सप्तर्षि आहेत, तारे तोडण्याचे लायसेन्स आहे.
    अजूनही काही खटकले तर कुमार असल्याने पोरकटपणा सुद्धा सहन करणे भाग आहे.

    ReplyDelete
  2. आपले सर्व लेख योग्य आहेत आणि मी ते न चुकता वाचतो. अनेक वर्तमानपत्रातील अग्रलेख वाचणे बंद करायची वेळ आली आहे. असो.
    प्रकाश बाळ ह्यांनी काही दिवसापूर्वी शेषराव मोरेंनी सावरकरांच्या निर्दोशात्वाबाबत केलेल्या विधानातील "बौद्धिक बेशिस्त" दाखवून देणारा लेख लिहिला होता. गेल्या रविवारीही म टा च्या संवाद मध्ये कुलकर्णी ह्यांनी लेख लिहिला आहे. आपण त्यांचाही एकदा समाचार घ्यावा हि विनंती.
    हे सर्व पुरोगामी सोयीने आणि चलाखीने "दहशतवाद = हत्या" असा अर्थ पकडून प्रतिप्रश्न विचारात आहेत. मोरे ना जे म्हणायचं होतं ते ह्या लोकांमुळे इतर विचारधारेच्या लोकांवर येणाऱ्या दडपणविषयी बोलायचं होतं असा वाटतं. पण मोरे देखील काहीहि बोलत नाही आहेत आता ! त्यांनी समाचार घ्यायला हवा सर्व प्रतिवादाचा.

    ReplyDelete
  3. Let dear Dr rest at his coveted bottom seat in dustbean. Ruffling his feathers is just unwarranted. He is itching for slinging mud at some post or piller . Sakal is striving for circulation. So Bhau! Let him and his clan rest in peace.
    You have lot many purposeful topics to handle. We want to hear more from you on right path for progress and well being of all of us. And its not certainly business.

    ReplyDelete