Saturday, September 12, 2015

एका पुरोगामी डॉक्टरचे पोस्टमार्टेम



शनिवारी ‘सकाळ’ दैनिकात डॉक्टर कुमार सप्तर्षि यांचा लेख प्रसिद्ध झालेला आहे. प्रा. शेषराव मोरे यांच्या अंदमान येथील विश्व मराठी साहित्य संमेलना़चे अध्यक्षिय भाषण व अन्य विधानांचा परामर्ष घेण्याचा त्यात प्रयास केला आहे. प्रयास एवढ्यासाठी म्हणायचे, की आयुष्यभर सप्तर्षी व त्यांच्या बहुतांश सहकार्‍यांनी नुसतेच प्रयास केले आणि त्यातून काहीही साध्य झाले नाही. याचे एकमेव कारण, आपण कोणते व कशासाठी प्रयास करीत आहोत, त्याचा त्यांनाच अजून शोध लागलेला नाही. अशा संभ्रमावस्थेत अर्धशतकाहून अधिक काळ व्यतित केल्यावर, त्यांना अवघे विश्व हाच एक संभ्रम असल्याचे वाटू लागले तर नवल नाही. म्हणूनच त्यांनी मोरे यांच्या बाबतीत केलेली विधाने बाजूला ठेवून सप्तर्षि काय व कोणते सत्य विदीत करीत आहेत, तेच समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला बरा. अगदी एक एक विधान घेऊन आपण सप्तर्षींचा लेख तपासू शकतो.

उदाहरणार्थ आरंभीच ते म्हणतात, ‘वास्तविक साहित्याची व्याख्या सर्वांना सहित घेऊन जाणे अशी आहे.’ असेच असेल तर आजवरच्या अर्धशतकात सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा कोणता प्रयत्न खुद्द सप्तर्षी यांनी यशस्वीरित्या करून दाखवला आहे? असेल तर त्यांच्यासह तत्सम लोकांवरच सतत एकाकी पडण्याची वेळ कशासाठी आलेली आहे? साहित्य बाजूला ठेवू, पुरोगामी म्हणून मिरवण्यात धन्यता मानणार्‍यांना सतत लोकांनी भ्रमिष्ट असल्यासारखे दूर कशाला ठेवले आहे? समाजहीत पुढे घेऊन जाणारे आपले विचार व तत्वज्ञान लोकांना समजावून सांगण्यात सप्तर्षींसारखे पुरोगामी कायम अपेशी का ठरतात? तर आपण म्हणू तेच खरे आणि आपल्याला समजत नाही, ते जणू अस्तित्वातच नाही; अशी संभ्रमित अवस्था या लोकांना कायम ग्रासून राहिलेली आहे. आणि जे समजलेही नाही किंवा समजूनही घेण्याचा प्रयत्नही केला नाही, त्याचे विवेचन करण्याची मात्र भारी हौस! त्यातून मग अशी एकाहून एक विनोदी विधाने सप्तर्षी करू शकतात.

आता दुसरे विधान बघू. ‘तथापि, या संमेलनात फक्त हिंदुत्ववादी संप्रदायाला स्थान होते, असे दिसले.’ त्या संमेलनात फ़क्त हिंदूत्ववादी संप्रदायाला स्थान होते असे दिसले तर तिथे खुद्द सप्तर्षींना जाण्यापासून कोणी रोखले होते काय? नसेल तर सप्तर्षी तिथे फ़िरकले कशाला नाही? जर त्यांच्यासारख्यानी हजेरी लावली असती आणि त्यांना येण्यापासून रोखले गेले असते, तर ‘फ़क्त स्थान होते’ हा दावा खरा ठरू शकतो. पण तुम्ही जाणारच नाही आणि जे गेले त्यांना दोष देण्यासाठी इतरांना स्थान नव्हते, असा अर्थ काढणार. इथे लबाडी दिसते की भ्रमिष्टावस्था दिसते, हे ज्याचे त्याने ठरवावे. उद्या हेच सप्तर्षी म्हणतील विधानसभा वा महापालिकेच्या निवडणुकीत पुरोगाम्यांना स्थानच नव्हते. जर तुम्ही उमेदवार उभे करणार नाही आणि तुमच्यापाशी उमेदवारच नाहीत, तर त्याचा दोष अन्य निवडणूका लढवणार्‍यांवर कसा टाकता येईल? तुम्ही मतदानाला जाणार नाही आणि फ़क्त वाहिन्यांवर विश्लेषणाची पोपटपंची करणार, की तिथे फ़क्त हिंदूत्ववाद्यांनाच स्थान होते. सप्तर्षी ज्या राजकीय वारश्यातून आलेत, त्यांना हल्ली निवडणूका लढवण्याचेही बळ उरलेले नाही. त्यालाच ते पुरोगामीत्व म्हणत असावेत. कारण त्यांचे आणखी एक असेच संभ्रमित विधान लेखात आलेले आहे.

‘समाजहिताच्या आड येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात प्रबोधन करणारा तो पुरोगामी. पुरोगामी म्हणजे पुढे पाहणारा. उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणारा.’ असे सप्तर्षी म्हणतात. किती विनोदी वाक्य आहे ना? हिंदूत्व किंवा प्रतिगामी शब्द नुसता तोंडात आला, तरी ज्यांना साठ वर्षाच्या ‘मागे’ जावे लागते, त्याला हे पुरोगामी म्हणजे ‘पुढे’ बघणारा म्हणतात. नथूरामपासून यांचा गांधी सुरू होतो आणि तिथेच येऊन संपतो. आजच्या संदर्भात त्यांना गांधी बघता येत नाही किंवा सांगताही येत नाही. मागे बघतच ज्यांना पुढे चालतो आहे असे वाटत असते; त्याला जागृत म्हणायचे की संभ्रमित म्हणायचे? समाजाचे प्रबोधन करून समाजहिताच्या आड येणारे अडथळे दूर करणार्‍यांना पुरोगामी म्हणावे, असा सप्तर्षींचा आग्रह आहे. तो मान्यही व्हायला हरकत नाही. पण त्यात खुद्द याच महोदयांचे योगदान किती व कोणते? पन्नास वर्षे सतत प्रबोधन करून त्यांना एक संघटना बांधता आली नाही आणि ज्या संघटना आधीच्या पुरोगाम्यांनी उभ्या केलेल्या होत्या, त्याही नामशेष करण्याचेच श्रेय ज्यांना घेता येईल, त्यात सप्तर्षींची गणना होते. सरकारी अनुदानावर ज्यांचे गांधीविषयक प्रबोधन चालू आहे, त्यांनी पदरमोड करून सावरकर विषयक प्रबोधन अखंड चालवणार्‍या व्रतस्थांची टवाळी करावी; यातच पराभूत मनोवृत्तीची साक्ष मिळून जाते. समाजाचे प्रबोधन करताना सप्तर्षींसारखे लोक इतके ‘पुढे’ निघून गेलेत, की आता त्यांना अवधी जनताच प्रतिगामी म्हणजे ‘मागे’ पडलेली वाटणे स्वाभाविक आहे.

‘प्रा. मोरे म्हणतात, "पुरोगामी म्हणजे हिंदूंवर टीकेचे प्रहार करणारे.‘ हे धादांत असत्य विधान आहे. धर्म वेगळा आणि समाज वेगळा. पुरोगामी धर्माची चिकित्सा करतात.’ हे त्याच लेखातील सप्तर्षींचे आणखी एक विधान आहे. हे जे कोणी सप्तर्षींचे पुरोगामी आहेत, त्यांनी हिंदू वगळून कुठल्या कुठल्या अन्य धर्माची चिकित्सा केली आहे? किती प्रमाणात केली आहे? त्यातल्या कोणत्या कुप्रथा संपवण्यासाठी काही काम केले आहे? त्याची कुठलीही जंत्री सप्तर्षी देत नाहीत. मात्र शेषराव मोरे यांनी प्रत्येक विधानाला आधार व पुरावा देण्याचा आग्रह आहे. उदाहरणार्थ दाभोळकर, पानसरे वा कलबुर्गी यांच्या हत्या प्रतिगाम्यांनीच केल्याचा कुठलाही पुरावा अजून तरी पोलिसांनी वा सप्तर्षींच्या कुणा पुरोगाम्याने पुढे आणलेला नाही. तरीही त्या हत्या प्रतिगामी वा हिंदूत्ववाद्यांनीच केल्याचा बेछूट आरोप करण्याचा विशेषाधिकार पुरोगाम्यांना आपोआप असतो. त्यासाठी त्यांना कोणी उलट सवालही विचारता कामा नये. पण तुम्ही अन्य कोणी प्रत्यारोप करणार असला, तर मात्र बारीकसारीक सर्व गोष्टींचे आधी पुरावे गोळा केले पाहिजेत आणि संगतवार मांडले पाहिजेत.

सप्तर्षी वा तत्सम मंडळी कायम संभ्रमावस्थेतच असतात आणि त्याचे पुरावे अन्यत्र कुठे शोधण्याचीही गरज नाही. त्यांचेच जुने लेख व विवेचन डोळसपणे तपासले, तर किती भ्रमिष्टावस्थेत ही मंडळी जगतात, त्याची साक्ष खुद्द सप्तर्षीच देताना आढळतील. तीन वर्षापुर्वी अण्णा हजारे लोकपाल आंदोलन छेडून सरकारवर दबाव आणत होते. त्याविषयीचा सप्तर्षींचा लेख त्यांच्याच ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकात आजही उपलब्ध आहे. अण्णांसारखा सामान्य कार्यकर्ता देशात हुकूमशहा होऊन अध्यक्षिय लोकशाही आणायचे प्रयत्न करीत असल्याचा अजब शोध याच सप्त-ॠषींनी लावला होता. किंबहूना ते पुरोगामी म्हणजे ‘फ़ार पुढे’ गेलेले असल्याने, अण्णा टोळी बाबासाहेबांची राज्यघटनाच बदलायला सिद्ध झाली आहे इथपर्यंतचे भास या पुरोगाम्यांना भयभीत करीत होती. काय झाले आज तीन वर्षांनी? देशाची घटना बदलली आहे, की देशात अध्यक्षिय लोकशाही आलेली आहे? भुताटकीची बाधा झालेल्यांची जी मानसिक अवस्था सांगितली जाते, त्यापेक्षा सप्तर्षींचे लेखन, विधाने व विवेचन फ़ारसे भिन्न भासणार नाही. म्हणूनच त्यांना आता प्रा. शेषराव मोरे यांच्या भाषण वा विधानात काही भयंकर भास होत असतील, तर त्याक्डे कमालीच्या सहानुभूतीने बघण्याची गरज आहे. नेहमी डॉक्टर पोस्टमार्टेम करतात. पण इथे डॉक्टराचेच पोस्टमार्टेम करायची वेळ यावी, हे खेदजनक असले तरी आवश्यक आहे. म्हणून हे लिहावे लागले.

12 comments:

  1. Bhau jabardast vishleshan..... He sapta (seculars) rushi kharach swatachya Fantasy world madhe jagat astat....

    ReplyDelete
  2. khup chan postmortom!! ekhadya doctorapekshahi mast !! dhanyavad

    ReplyDelete
  3. उत्तमा अंजन घालणारा लेख.

    ReplyDelete
  4. पुरोगामीत्वाचा उदो उदो करणार्या उच्छृंखल मंडळीच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Bhau,
    Kumar saptarshi Keval vachalveer nahit.
    Samaja Madhe rahun ratra divas kaam karave legate. Cha gale charitra a save legate pan he Sagle aisle tari samaaj manache bhan thevun atmiya bhav rakhun sarv karave legate.
    Dr he sarv kartat , mag tari ase ka hote tyanc he v tyanchya mitranche.

    ReplyDelete
  7. Saptarshi yanni khupch khalcha patliwar jaun lekhan kele ahe...mala ase watat hote ki ty pramanik ani balanced astil..pan tyanni khupch patli sodli...ti tyanna laukrat laukar sapdo

    ReplyDelete
  8. भाउ अप्रतिम लेख, पण म्हणतात ना शहाण्याला शब्दाचा मार पुरे असतो. हि केस तर पार पुढे ( सुधारण्याच्या ) गेलेली आहे.

    असो. सडेतोड प्रतीवादा बद्दल अभिनंदन.

    ReplyDelete
  9. khrach dolyat anjan ghalanara lekh....khup sunder bhau.

    ReplyDelete
  10. उत्तमा लेख... स्वतःला पुरोगामी समजणारी मंडळी याच्यातून काहीतरी बोध घेईल...

    ReplyDelete
  11. lokmat madhyehi tyani ek lekh lihila aahe. Purogami dahashatwad mhanje Morena kay abhipret aahe te ya lekhatun spasht hote. Doctor mhantat ki Morena kuni Vicharvant Manatach Nahi. Mhanje vicharvant manannyasathi kuthalya swaymghoshit purogami Mathachi manyata Moreni ghetli nahi. Mhanje More bahishkrit. Mhanunach itaranhi tyana bahishkrut manave ashi doctoranchi apeksha. Hi vruttich dahshatwadachi suruvat nahi ka

    ReplyDelete
  12. >>उदाहरणार्थ दाभोळकर, पानसरे वा कलबुर्गी यांच्या हत्या प्रतिगाम्यांनीच केल्याचा कुठलाही पुरावा अजून तरी पोलिसांनी वा सप्तर्षींच्या कुणा पुरोगाम्याने पुढे आणलेला नाही. तरीही त्या हत्या प्रतिगामी वा हिंदूत्ववाद्यांनीच केल्याचा बेछूट आरोप करण्याचा विशेषाधिकार पुरोगाम्यांना आपोआप असतो<<<
    थेट पुरावा नाही पण परिस्थितीजन्य असणारी एखादी दाट शक्यता निदर्शनास आणुन दिली म्हणजे बेछुट आरोप नव्हे.ही हत्या विचारांचा मुकाबला विचारांनी न करता आल्यामुळेच झालेली आहे.संपत्ती,सत्ता,स्त्री, अशा कुठल्याही गोष्टीशी ही हत्या संबंधीत नाही हे विरोधक ही मान्य करतील.

    ReplyDelete