वृत्तपत्र किंवा अन्य कुठलेही प्रसार माध्यम हे लोकशाहीत जनतेसमोर सत्य आणण्याला बांधील असते. कारण लोकशाहीतला खरा न्यायाधीश सामान्य जनता किंवा मतदार हाच असतो. सहाजिकच त्याच्यासमोर जी माहिती पुरावे आणले जातील, त्यानुसारच तो आपला न्यायनिवाडा करीत असतो. न्यायालयीन प्रक्रियेत म्हणूनच सर्व बाजू समोर आणल्या जाण्याचा प्रयास होत असतो. त्यासाठी जे साक्षीपुरावे समोर आणले जातात, ते दोन्ही बाजूंना तपासण्याची मुभा दिलेली असते. अशा प्रक्रियेत जो कोणी एखाद्या साक्षिदाराला आपल्या समर्थनार्थ आणून हजर करतो, त्याचीच साक्ष ग्राह्य मानली जाण्याचा अट्टाहास करून चालत नाही. तर त्या साक्षिदाराच्या कथनाचा खरेखोटेपणाही तपासण्याची मुभा असते. मात्र माध्यमात तशी सुविधा परस्पर नाकारण्याची वृत्ती अधिक आहे. म्हणजेच माध्यमातून आलेली बातमी वा चर्चा हीच अंतिम ठरवून निवाडे केल्याच्या थाटात लिखाण वा बातम्या दिल्या जातात. त्यामागचा हेतू स्पष्ट आहे. माध्यमात बसलेल्या कोणीतरी सुत्रधाराने आधीच निवाडा करून कोणाला तरी दोषी ठरवलेले असते आणि सहाजिकच त्याला गुन्हेगार सिद्ध करण्यापुरते साक्षी वा पुरावे समोर आणले जातात. त्याची तपासणी करू दिली जात नाही की होत नाही. मग त्यानुसार लोकमत बनवले जात असते किंवा निदान तसा हेतू तरी असतो. म्हणून तर मागल्या दहाबारा वर्षात माध्यमांनी एकतर्फ़ी गुजरात दंगलीचा आरोपी म्हणून मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना दोषी ठरवून टाकलेले आहे आणि त्याची दुसरी बाजू समोर येऊ दिली जात नाही. आणायचा प्रयत्नही केला तरी गदारोळ सुरू केला जातो. अर्थात असा हा एकमेव माध्यमांचा बळी नाही. आता हा खेळ नेहमीचा होऊ लागला आहे. म्हणूनच कुठलीही बातमी वा माहिती समोर आली वा आणली गेली, तर तिची कसून तपासणी आवश्यक आहे. किंबहूना उलटतपासणी घेऊन त्यातला खरेखोटेपणा तपासणे दिवसेदिवस अगत्याने होत चालले आहे.
अगदी ताजी घटना हवी असेल तर संगीतकार ए. आर. रहमान यांच्यावर निघालेल्या फ़तव्याचीच बातमी घ्या. त्यांच्यावर फ़तवा निघाला व त्यांनी प्रेषित महंमदाच्या जीवनावर निघालेल्या चित्रपटाला संगीत दिल्याने फ़तवा निघाला, अशीच माहिती आपल्या समोर आलेली आहे. यात मग प्रेषिताचे चित्र रेखाटणे वा त्याचे व्यक्तीमत्व अभिनयातून साकारणे इस्लामला मान्य नसल्याचे कारण देण्यात आलेले आहे. तसे असताना चित्रपट काढणे म्हणजे इस्लामची विटंबना वा अवमान असल्याचे सांगत फ़तव्याची बातमी आलेली आहे. पण फ़तवा कोणी काढला? त्यांची पार्श्वभूमी कोणती? असे लोक काय करू शकतात? याविषयी कुठलाही तपशील आपल्याला बातम्या वाचून मिळत नाही. यालाच फ़सवेगिरी असेही म्हणता येईल. कारण नुसती इतकीच बातमी वाचली तर कुणा निरूपद्रवी धर्मसंस्थेने दिलेला इशारा म्हणून आपण तिकडे दुर्लक्ष करणे स्वाभाविक आहे. आणि दिसतेही तसेच आहे. कुणा साक्षी महाराज वा साध्वीने चमत्कारीक विधान केल्यावर गदारोळ उडवून देणार्या माध्यमांनी या फ़तव्याबद्दल कुठलाही कल्लोळ केलेला नाही. किंबहूना तशी वेळही येऊ नये म्हणून साळसूदपणे फ़तवे काढणार्यांची वाचकाला ओळखही करून दिलेली नाही. हा फ़तवा कोणी काढला व त्यांनी यापुर्वी काय काय उद्योग केलेत? बातम्यातून याची माहिती तुम्हाला मिळू शकली आहे काय? नसेल तर कोणीही त्या फ़तव्याच्या बाबतीत गाफ़ील रहाणे स्वाभाविक आहे. पण म्हणून त्या फ़तव्यातला गंभीर हिंसक इशारा संपणार नसतो. कारण अशा फ़तवा रझा अकादमी नामक इस्लामी संस्थेने काढलेला आहे आणि मागल्या काही वर्षात या संस्थेने आपले रौद्ररूप किती भीषण असू शकते, त्याचे जाहिर प्रदर्शन दोनदा तरी घडवले आहे. सहाजिकच बातम्या देणार्या माध्यमे व पत्रकारांनी फ़तवेबाजांची ती ओळख सांगण्याची टाळाटाळ करणे ही फ़सवेगिरी ठरते.
ज्या दिवशी हा फ़तवा आला, त्याच दिवशी मुंबईच्या मोक्का न्यायालयात जुलै २००६च्या पश्चिम रेल्वे घातपाती स्फ़ोट मालिकेच्या खटल्याच्या निकालाचीही बातमी आली होती. ह्या घातपाताची मालिका घडण्याच्या चार दिवस आधी काय घडले होते? मुंबई नजिकच्या हातमागनगरी भिवंडी येथे एका कबरस्थानाच्या जमीनीचा वाद उकरून काढण्यात आला व तिथे चालू असलेल्या पोलिस ठाण्याच्या बांधकामावर हल्ला करून दंगल माजवण्यात आली होती. मग आसपासच्या मुंबई ठाण्यातले जादा पोलिस बंदोबस्तासाठी भिवंडीला पाठवण्यात आले होते. तिथे बंदोबस्ताला असलेल्या दोन पोलिस शिपायांना मुस्लिम जमावाने हल्ला करून कंठस्नान घातले होते. अशी कृती करणार्या व त्याचे नेतृत्व करणार्या संस्थेचे नाव होते रझा अकादमी. मग भिवंडी शांत होताच दोन दिवसांनी मध्यमुंबईच्या एका मंदिरातील गणेश मुर्तीला शेण फ़ासण्यात आले व मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचेही विडंबन करण्यात आले. त्यामुळे मुंबईभर शिवसैनिक रस्त्यावर आले आणि मुंबईतले उरलेसुरले पोलिस सेनेच्या मागे लागले. बाकीची मुंबई कोणालाही मनमानी करायला मोकाट झाली. नेमक्या अशाच वेळी पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात डझनभर बॉम्ब ठेवले गेले आणि त्यांचे एकामागून एक बॉम्बस्फ़्ट होत गेले. त्याच खटल्याचा निकाल शुक्रवारी लागला आणि त्याच दरम्यान रहमानला इशारा देणारा फ़तवा आलेला आहे. पण त्याला इशारा देणारी संस्था व पश्चिम रेल्वेच्या स्फ़ोटाच्या आधी भिवंडीत गोंधळ घालून हिंसा माजवणारी संस्था एकच असल्याचे कोणी बातमीतून सांगितलेले नाही. तसे सांगितले तर त्याच फ़तव्यातला हिंसक इशारा समोर येऊ शकतो ना? सामान्य माणसाला, वाचकाला अशा घटना स्मरत नसतात. त्याला त्याची आठवण करून देणे हेच पत्रकार माध्यमांचे खरे काम असते. पण ते काम करण्यापेक्षा लपवाछपवी होत असेल तर काय करायचे?
भिवंडीच्या कबरस्थानाच्या दंगलीने दोन पोलिसांचे बळी घेतले व लगोलग मुंबईच्या लोकलमध्ये स्फ़ोटमालिका झाली, तो जुना विषय समाजून बाजूला ठेवू. फ़तवा काढणार्या रझा अकादमीचा पराक्रम तितकाच मर्यादित नाही. तीन वर्षापुर्वी मुंबईच्या पोलिस आयुक्तालाही धाब्यावर बसवण्यापर्यंत याच अकादमीने मर्दुमकी गाजवलेली तरी कोणी सांगेल की नाही? आठवते, मुंबईत तीन वर्षापुर्वी काय झाले होते? तिकडे दूर म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर अन्याय झाला व त्यांना बौद्ध जमावाने मारहाण केली, म्हणून याच रझा अकादमीने मुंबईत एक निषेध मोर्चा आयोजित केला होता. ऑगस्ट २०१२ ची गोष्ट! त्यासाठी हजारो मुस्लिम तरूण लाठ्याकाठ्या व पेट्रोल-रॉकेल घेऊन आलेले होते. त्यांनी मग आझादमैदान व शिवाजी टर्मिनस या परिसरात इतके थैमान घातले, की पोलिसांनाच जीव मूठीत धरून पळ काढायची वेळ आलेली होती. मुंबई पालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या अमर जवान स्मारकाची नासधुस त्यांनी एखाद्या धर्मकार्यासारखी पार पाडली. पोलिसांसह माध्यमाच्या गाड्याही पेटवल्या. रेल्वे स्थानकात असलेल्या महिलांच्या अब्रुला हात घातलाच. पण महिला पोलिसांच्या अबुवरही हात घालण्याचे पवित्र कार्य केले होते. मात्र तो सगळा धिंगाणा पोलिस निमूट बघत बसले होते. कारण पवित्र रमझानचा महिना चालू होता आणि पवित्र धर्मकार्यात हस्तक्षेप करायची सेक्युलर पोलिसांना हिंमत झाली नव्हती. तोही पराक्रम याच रझा अकादमीचा होता. मात्र घडले त्याची जबाबदारी त्यांनी नेहमीप्रमाणे नाकारली आणि त्यांना जा्ब विचारण्याची हिंमत कुणा सेक्युलर पत्रकाराने दाखवली नाही. पत्रकारांचे कॅमेरे तोडले, गाड्या जाळल्या तरी कोणी बोलायला राजी नव्हता. त्यांच्याकडून आज रझा अकादमीने फ़तवा काढल्यास कुठली माहिती किंवा तपशील वाचकांना दिला जाऊ शकेल? काय सत्य समोर आणले जाऊ शकेल?
मुद्दा इतकाच, की जितक्या सोपेपणाने व सौम्य भाषेत या फ़तव्याची बातमी आलेली आहे, तितकी ती सौम्य निरूपद्रवी बातमी नाही. त्यात गंभीर इशारा दडला आहे आणि तो कळतो म्हणूनच रहमानही गप्प बसला नाही. त्याने विनाविलंब फ़तव्याला उत्तर देत आपण कुठले धर्मबाह्य कृत्य केलेले नाही, असा खुलासा केला आहे. एका प्रतिथयश कलावत संगीतकाराच्या कलाविष्काराला इतके मोठे खुले आव्हान दिले गेल्यावर खरे तर माध्यमातून किती गदारोळ व्हायला हवा होता ना? पण सगळीकडे कशी नीरव शांतता आहे. कारण फ़तवा कुणा हिंदूत्ववादी संस्था संघटनेने काढलेला नाही, की हिंदू नेत्याने कुणाला दमदाटी केलेली नाही. धर्माचेही नाव हिंदू नाही. मग अविष्कार स्वातंत्र्याची मातब्बरी कुठे रहाते? सर्व अविष्कार स्वातंत्र्य वा धर्मचिकित्सा ही हिंदूंपुरती मर्यादित असते. पण खरा दहशतवाद रौद्ररूप धारण करून समोर आला, मग ‘चिडीचूप स्वातंत्र्याचा जय हो’ सुरू होतो. चित्रकार मकबुल फ़िदा हुसेनने हिंदू दैवतांच्या विकृत चित्रण केल्यावर त्याला कोर्टात खेचले आणि तो देश सोडून पळून गेला, तरी ज्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत, असे शेकड्यांनी स्वातंत्र्य योद्धे आहेत. पण त्यापैकी कोणी प्रेषित महंमदाच्या उदात्तीकरणाच्या चित्रपटाला संगीत देणार्या रहमानच्या समर्थनाला पुढे येण्याचे धाडस करू शकलेला नाही. कारण त्या प्रत्येकाला रझा अकादमीचा फ़तवा म्हणजे परिणाम कळतात. पण ते सामान्य वाचकाला उमजणार नाहीत. आणि माध्यमात न्यायाधीशाचा आव आणुन बसलेल्यांना ते सत्य वाचकापासून लपवायचे आहे. मग कोण रझा अकादमीची खरी ओळख सांगेल? त्यापेक्षा नुसती फ़तव्याची बातमी देवून उपचार उरकण्यात येतो आणि खर्याखुर्या धोक्यावर पांघरूण घातले जाते. ही आजच्या माध्यमांची दुर्दशा आहे. त्यांना खरे बोलता येत नाही आणि न्यायाधीशाचे नाटक रंगवण्याचा हव्यासही सुटत नाही. म्हणून त्यांची सतत उलटतपासणी करत रहाण्यालाही पर्याय नाही.
पूर्वप्रसिद्धी: तरूण भारत (नागपूर) रविवार, २० सप्टेंबर २०१५
भाऊ, सत्य समोर आणल्याबद्दल धन्यवाद ! खरोखर कोणत्याही दैनिकाने फतवा कोणी काढला होता याबद्दल माहिती दिलेलीच नाही.
ReplyDeletebhaunkahi bhag copy karun paste karat ahe mazya fb var tumacha nav khali takun
ReplyDeleteBetter v
Deleteभाऊ, कुठून शिकालात हो हे सगळं?
ReplyDeleteतुमचं अनॅलिसिस टू द पॉइण्ट आणि वास्तवाला धरून असते. जर प्रत्येक भारतीय नागरिक असं
बातमीचा माग घ्यायला शिकला तर या देशाला असल्या भिकार मीडियाची गरजच उरणार नाही!!!
परिणाम - फक्त खर्या आणि देशहितकारक बातम्याच घापल्या जातील....