Saturday, September 5, 2015

नरकात गेलेल्या पतिव्रतेची दंभकथा

     

एक छान गोष्ट आठवते. एका वस्तीत एक सुंदर वेश्या रहात असते. तिच्याकडे रोज संध्याकाळी ग्राहकांची येजा चालते. येणार्‍यांचे मन रिझवणे हाच तिचा धंदा असतो. सहाजिकच तिला रोज दुपारपासून सजण्या शृंगारण्याचे वेध लागलेले असतात. तिच्यापासून जवळच रहाणार्‍या एका विवाहितेला त्या वेश्येचा खुप हेवा वाटत असतो. कारण ही पतिव्रता असते. पण नवरा कमावून आणेल त्यावरच संसाराचे गाडे ओढताना, तिच्या नाकी नऊ येत असतात. त्यातून पैसे वाचवून दागदागिने बनवणे वा परिधान करण्याची गोष्ट दुर राहिली. साध्या घरच्या वस्त्रप्रावरणांसाठी तिला झुंजावे लागत असते. मग साजशृंगार कुठला? आपण इतक्या पवित्र आणि ही सटवी वेश्या, पण मेलीची चंगळ आहे, अशा शिव्याशाप देतच ती त्या वेश्येचा द्वेष करत असते. पावित्र्याचे नशीब हे असे म्हणून स्वत:च्या नशीबाला दोषही देत असते. दुसरीकडे ती वेश्याही या सतीसावित्रीकडे नियमीत पाहून मनोमन दु:खी होत असते. तिला शेजारणीच्या सुखी संसाराचे खुप कौतुक असते. साध्या कपड्यात संध्याकाळी पतीच्या स्वागताला सज्ज रहाणारी ती पतिव्रता तिला सुखी समाधानी वाटत असते. थकून भागून घरी येणारा पती आपल्या पत्नीसाठी कधीतरी एखादा गजरा घेऊन येतो, त्यामागचे प्रेम व आस्था त्या वेश्येच्या नशीबी कधीच आली नव्हती. कोणी शेठ धनी अधूनकधून चांगला दागिना तिला आणून द्यायचे. पण त्यात प्रेम आपुलकीपेक्षा आसक्ती व हाव बरबटलेली असायची. तरीही त्याला हसून दाखवायचे, याच्या त्या वेश्येला वेदना होत असत. शेजारणीच्या पतीने आणलेला तो क्षुल्लक किमतीचा, पण प्रेमाने ओथंबलेला गजरा आपल्या नशीबी नाही म्हणून ती कर्माला दोष द्यायची. त्या श्रीमंतीला शेजारची पतिव्रता आसुसलेली होती तर तिच्या संसारसुखाकडे वेश्या आशाळभुतपण्र पहात असायची.

    योगायोग असा, की दोघी एकाच दिवशी मरण पावल्या. त्यांच्या आत्म्याला यमदूत चित्रगुप्ताकडे घेऊन गेले. तेव्हा दोघींना चकित व्हायची पाळी आली. त्यातल्या पतिव्रतेला नरकात ढकलून देण्याचा आदेश चित्रगुप्ताने दिला आणि वेश्येला मात्र सन्मानपुर्वक स्वर्गात घेऊन जाण्यास फ़र्मावले. मग त्या दोघी आश्चर्यचकित होणारच ना? पतिव्रतेचा तर तिळपापड झाला. तिने तिथल्यातिथे चित्रगुप्ताला जाब विचारला. "या बाजारबसवीला स्वर्गात पाठवतोस काय? की तुलाही बाह्हेरख्यालीपणाने पछाडले आहे? अरे ही तर पापीणी. आयुष्य कोणाशीही शय्यासोबत करण्यात गेले तिचे. पुण्याचा लवलेश तिच्या खात्यात नसेल आणि तिला स्वर्गाची दारे उघडतोस कायरे? आणि माझ्याकडे बघ, अठराविश्वे दारिद्र्यात काढली. पण कधी पतीधर्म सोडला नाही. कुठल्या परपुरूषाकडे वर नजर करून बघितले नाही. आणि मला नरकात ढकलतोस कायरे? कोणते पाप मी केले? आणि ह्या सटवीने तरी काय असे पुण्य केले?"

   तिथे लोकशाही नव्हती, की गोपनियतेचा कायदा नव्हता. त्यामुळेच माहिती अधिकाराचा अर्ज करून अशी माहिती मागायची गरज नव्हती. चित्रगुप्ताचा कारभार दंडविधानानुसार चालत नव्ह्ता, की आधी अटक, जामीन व नंतर सुनावणी. त्याने तात्काळ पतिव्रतेला तिच्या प्रश्नाची उत्तरे देऊन टाकली. बिचारी वेश्या मात्र जागच्याजागी अपराधी भावनेने चिडीचुप उभी होती. चित्रगुप्ताने आपल्या निवाड्याचा खुलासा व कारणे सांगितली. "हे पतिव्रते तु आयुष्यभर पतीखेरीज दुसर्‍या कुणा पुरूषाकडे बघीतलेसुद्धा नाही हे खरे आहे. पण मनाने तु कधीच शुद्ध नव्हतीस. तू अखंड या वेश्येचा, तिच्या दागदागिने, पैसे, श्रीमंतीचा हेवा केलास. यातले काही आपल्या नशीबी नाही म्हणुन कायम दु:खी राहिलीस तू. तशी चैन नशीबी नाही म्हणून तू पवित्र रहाण्याचे ढोंग करत होतीस. प्रत्येक क्षणी मनाने तु आपले पावित्र्य विटाळत होतीस. जगासाठी तू पतिव्रता होतीस, पण मनाने तू पापी होतीस. तुझ्या उलट हिची कहाणी आहे. दैवाने जो भोग तिला दिला तो तिने निमुटपणे भोगला. पण त्यात ती कधीच रमली नाही. ती सतत तुझ्या संसाराकडे बघून पातिव्रत्याची इच्छा बाळगून होती. मनाने ती कधीच विटाळली नाही. तिच्या देहाने अनेक पुरूषांशी संग केला. पण मनाने ती कायम शुद्ध पवित्र राहिली. ती श्रीमंती, दागदागिने, साजशृंगार करूनही ती त्यात कधीच रमली नाही. तेच तिचे पुण्य होते आणि आहे. ती स्वर्गात येण्यासाठी पुण्य जोडत नव्हती. पाप जगताना पुण्याचे ओझे डोक्यावर घेऊन चालत राहिली, तर तु पुण्याचे रडगाणे गात गात पापाची आराधना करत राहिलीस. हे पतिव्रते, तू त्या वेश्येत नरक पाहिलास तर तिने तुझ्यात स्वर्ग पाहिला. तुम्ही दोघींनी आपापली निवड इहलोकातच केली होती. मी फ़क्त त्याची अंमलबजावणी करतो आहे."

   म्हटले तर बोधकथा आहे, म्हटले तर भाकडकथा आहे. मुद्दा मात्र महत्वाचा आहे. आपण विचार कसा करतो आणि वागतो किती प्रामाणिक, त्यावर सगळे परिणाम अवलंबून असतात, एवढाच त्यातला बोध आहे. ह्या गोष्टीचे इथे प्रयोजन काय? तर आपण जे रोजच्या रोज वृत्तवाहिन्या वा वृत्तपत्रातून पावित्र्य चारित्र्याचे प्रवचन ऐकत असतो, ते सांगणार्‍या पतिव्रतांची ती गोष्ट आहे. अशीच एक पतिव्रता मित्राच्या भिंतीवर येऊन माझ्या नावाने शिव्याशाप देताना वाचनात आली. तिची ओळख काय? रमेश किणीच्या संशयास्पद मृत्यूचा मंत्रालयासमोरच्या बंगल्यानजिक फ़ुटपायरीवर बसून ज्यांनी वाटे विकल्यासारखा दलालीचा धंदा केला आणि धन-संचयाची करणी केली, त्याच्या चुलीवरची ही मुगडाळ! त्या रमेश किणीचे मारेकरी आजही सापडलेले नाहीत आणि नुसते आरोपांची राळ उडवण्याचा ‘सभ्यपणा’ करणार्‍यांना आज त्याचे स्मरणही होत नाही. असे खोटारडे आरोप करून तुंबडी भरणार्‍यांची चुल फ़ुंकणारी मुगडाळ, लक्ष्मणानंदाच्या हत्येतले सत्य शोधायला धावते. थोडक्यात काय बळी पडलेल्यांच्या मृत्यूचा धंदा करणे हा यांचा सभ्यपणा आणि मतलब संपला मग त्यांचे मुडदे तसेच सोडून नामानिराळे होणे ही यांची सत्यवादीता! अशा या दांभिक मुगडाळीने माझ्यावर सुपारी पत्रकारितेचा आरोप करणे म्हणजे केवढा मोठा सन्मान असेल, ते त्या चित्रगुप्तालाच माहित असणार ना? त्या मुगडाळीला धन्यवाद, कारण तिच्या शेंबुड खाण्यामुळे तर ही गोष्ट सांगण्याचा योग आला.

No comments:

Post a Comment