Friday, September 18, 2015

लालबागचा राजा आणि गिरणगावचे रंक

(गणेश टॉकीजजवळून घेतलेला विसर्जनाला निघालेल्या भव्य गणेशाच्या मिरवणूकीचा फ़ोटो)



बहूधा १९५७-५८ सालची गोष्ट आहे. तेव्हा मुंबईत ट्राम होत्या. मुख्य रस्त्याच्या मधोमध ट्राम दौडत असायच्या. आजच्या लोकल रेल्वेप्रमाणे वर टांगलेल्या वायरमधून इलेट्रिकचा करंट घेऊन खाली असलेल्या रुळावरून धावणार्‍या बसच्या आकारातील ट्राम, हेच मुंबई बेटावरचे सर्वात स्वस्त वाहन होते. कुठेही बसा आणि कुठेही उतरा, तिकीटाचे पैसे सारखेच असायचे. तर अशा ट्रामला उर्जा पुरवणार्‍या ओव्हरहेड वायर्स मधोमध असल्या तरी त्यांना जागच्या जागी ठेवण्यासाठी तारांनी ताणून रस्त्यालगतच्या खांबांना बांधलेले असायचे. साधारण २५-३० फ़ुट उंचीवर अशा तारा असायच्या. त्यात पतंग अडकलेले असत. कावळे चिमण्यांचाही झोका असायचा. ट्राम दोन प्रकारच्या होत्या. एक सिंगल डेकर, ज्या दोन भागात जोडलेल्या असायच्या. तर एक मोठी ट्राम दुमजली असायची. त्यात फ़ळीचे बाक म्हणजे सीटा होत्या. पाठ टेकायला असलेली फ़ळी फ़ोल्डींगची असे. म्हणजे ज्या दिशेने ट्राम जाणार आहे त्या दिशेने तोंड करून बसायचे असेल, तर पाठीची फ़ळी उलट्या दिशेला करावी लागे. स्वातंत्र्यदिन वा प्रजासत्ताकदिनी या ट्रामवर रोषणाई करून रात्री फ़िरवल्या जात आणि त्या बघायला रस्त्यावर गर्दी लोटायची. १९६२ च्या आसपास ट्राम बंद झाली. पण माझी ट्रामची आठवण गणेशोत्सवाशी जोडलेली आहे. लालबागचे मोठे गणपती तेव्हा अशा ट्रामच्या तारेखालून जाऊ शकायचे. अर्थात लालबागचेही गणपती त्या काळात आजच्यासारखे टोलेजंग नसायचे. चिंचपोकळी स्थानकाच्या पुर्वेला बसणारा गणपती सर्वात प्रथम टोलेजंग झाला. श्याम सारंग या उदयोन्मुख कलावंताने केलेल्या भव्य गणपतीने लालबागचे गणपती उंच होऊ लागले. हे राम व श्याम सारंग भाऊ होते आणि त्यांचीच अशा मोठ्या भव्य मुर्ती बनवण्यात जणू मक्तेदारी होती. मुर्तिकार कांबळी हेही त्यांचे समकालीन. नंतर खातू वगैरे यांचा जमाना आला.

तर ५७-५८ चे वर्ष असावे. तेव्हा श्याम सारंग यांनी संत तुकोबाच्या सदेह वैकुंठाचे चित्र उभे केले होते. त्यात तो भव्य गरूड व ते पुष्पक विमान यांची उंचीच ३० फ़ुटापेक्षा अधिक असावी. विसर्जनाची मिरवणूक निघाली तेव्हा हिंदमाता लेन(आजचा दत्ताराम लाड पथ)मधून मिरवणूक वाजतगाजत आंबेडकर मार्गावर आली. पण तिथून त्या हमरस्त्यावरची खरी समस्या उभी राहिली. डावीकडे वळून ही मिरवणूक लालबागच्या दिशेने जाऊन मग मार्केटजवळ सानेगुरूजी मार्गावर वळायची होती. पण तितका मार्ग सोपा नव्हता. ट्रामच्या वायरना ताणून धरणार्‍या तारांचा अडथळा उभा राहिला. कारण गाडीवरच्या त्या भव्य मुर्तीची उंची तारांपेक्षा अधिक होती आणि तारांना ‘बाजूला करावे इतक्या त्या जाडजुड तारा लवचिक नव्हत्या. तारा तोडणे शक्य नव्हते की विसर्जन थांबणे शक्य नव्हते. मग एक एक खांबाची तार सैल करून मुर्ती व मिरवणूक पुढे सरकवण्याचा प्रयोग करावा लागला. हिंदमाता लेन ते लालबाग मार्केट दरम्यान हा खेळ बहुधा दहा बारा वेळा तरी झाला असावा. कारण तितके खांब व तारा मिरवणूकीला पार कराव्या लागल्या होत्या. तो द्राविडी प्राणायाम अनुभवल्यानंतर त्या म्हणजे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने कायमचे धोरण म्हणून गणपतीची उंची २० फ़ुटापेक्षा अधिक होऊ नये असे ठरवले आणि पुढल्या काळात लालबागचे गणपती मोठे असले तरी मिरवणूकीला व सार्वजनिक व्यवस्थेला अडथळा होऊ नयेत, याची काळजी घेतली गेली.

१९६५ च्या सुमारास व्ही. शांताराम यांचा ‘गीत गाया पत्थरोने’ (जितेंद्रला हिरो म्हणून पेश करणारा) हा चित्रपट आला. त्यामध्ये भव्य सेट व मुर्तींमध्ये नृत्येगीते चित्रित केलेली होती. त्यात गणेशाची भव्य मुर्ती होती. तिचे पूजन झालेले नसले तरी शांताराम बापूंनी आपल्या स्टुडीओमध्ये ती लोकदर्शनासाठी मांडली. बापूंचा राजकमल स्टुडीओ लालबागच्याच सीमेवर होता. त्यामुळे चारपाच भव्य गणपती बघायला येणारी गर्दी तिकडेही वळली आणि पुढल्या काळात प्रतिवर्षी राजकमलचाही मोठा म्हणजे भव्य गणपती उत्सवाचे एक आकर्षण बनून गेला. त्यात अन्य काही चित्रे नसायची. तर नुसता बसलेला गणपतीच २०-३० फ़ूट उंचीचा असायचा. बाकी लालबागचे गणपती चित्रांसाठी व पौराणिक देखाव्यांसाठी बघायला लोकांची गर्दी व्हायची. त्यात राजकमलच्या भव्यतेची भर पडली. मग १९७५ च्या पुढे केव्हा तरी गणेशगल्लीच्या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव आला व भव्यतेने साजरा करताना त्यांनी एकच भव्य मुर्तीचा राजकमल फ़ंडा उचलला. तितकेच नाही तर संपुर्ण गल्ली व परिसरालाच जणू चित्रपटाचा सेट म्हणावे असे वातावरण निर्माण करण्याची नवी प्रथा आणली. त्याची भव्यता व सजावट यातून लालबाग वा ‘गणेश गल्लीचा राजा’ अशी बिरूदावली उदयास आली. पुढे लालबागच्या बाजारात व्यापारी व कोळणींच्या नवसामुळे सुरू झालेल्या मार्केटच्या उत्सवाचा महोत्सव आला आणि त्यांनी सजावटीचा पसारा आणखीनच विस्तारीत केला. गणेशगल्ली उत्सवाला मागे टाकण्याच्या जिद्दीने मार्केटच्या कार्यकर्त्यांनी जी भव्यता उभी केली, तिचा खुप गाजावाजा झाला. योगायोगाने त्याच कालखंडात भारतामध्ये टेलिव्हीजन क्रांतीची सुरूवात झालेली होती. सहाजिकच लालबागच्या त्या भव्य उत्सवी मुर्तीला देशव्यापी वा जगभर प्रसिद्धी मिळाली. गणेश गल्लीवाल्यांनी सुरू केलेला ‘राजा’ शब्द त्यामुळे लालबागलाही चिकटलेला होता. पण त्यातून मग गणेश वा गणपती बाजूला पडला आणि सिद्धीविनायक वा तत्सम तीर्थक्षेत्राच्या गणेशांना नाव असावे, तसे या बाजारच्या गणपतीला ‘लालबागचा राजा’ असे नाव मिळाले.

बालपणापासून गरमखाड्याचा गणपती म्हणून आम्ही ज्याला ओळखत होतो, तो असा टिव्हीच्या जमान्यातला ‘लालबागचा राजा’ होऊन गेला. तेवढ्यावरच लालबागची गणेश भक्ती वा महिमा संपत नाही. जगातला सर्वात मोठा मुर्ती उद्योग बहुधा याच उत्सवामुळे व भव्यतेमुळे लालबागची ओळख बनली. साधारण मे महिन्यापासून लालबागच्या परिसरात गणपतीचे कारखाने सुरू होतात. ते गल्लीबोळात पसरलेले आहेत. किमान दिडदोन हजार भव्य मुर्ती इथे बनतात आणि मुंबईसह महाराष्ट्रात कुठेही पाठवल्या जातात. गेल्या वर्षी तर दिल्लीच्या कुठल्या मंडळाने लालबागहून मुद्दाम बनवून मोठी गणेश मुर्ती नेल्याची बातमीही वाचनात आली. मात्र तिचे नाव गणेश नव्हते तर ‘लालबागचा राजा’ असे होते. ज्या गिरणी कामगार वस्त्यांनी गणेशाला इतके भव्यदिव्य नवे रूप प्राप्त करून दिले. तो गिरणगाव आता पुर्णपणे बदलून गेला आहे. जिथे गणेशाच्या भव्य मुर्तीपेक्षा फ़क्त गिरणीची धुरांडीच अधिक उंच असायची, तिथे आता धुरांड्यांपेक्षाही खुप उंच अशा गगनचुंबी इमारती उभ्या आहेत आणि त्यांच्या पायथ्याशी आपल्या विस्कटून गेलेल्या पिढीजात संसाराला जपत जोपासत गिरणी कामगारांची चौथी तिसरी पिढी अधिक भव्यतेने गणेशाचे पूजन करते आहे. त्याला अधिकाधिक विराट रुप देण्याचा उत्साह संपलेला नाही. कधीकाळी तिथे नाविन्य बघायला मुंबईकर गर्दी करायचा, त्याच्या भजनी नामवंत कलाकार लागल्याने त्यांच्याही महिम्याने लालबागचे गणपती जगप्रसिद्ध झाले आहेत. आता तेव्हाच्या ट्रामच्या वायर तारेपेक्षाही उंचावर असलेल्या फ़्लायओव्हरवरून गाड्या दौडतात आणि त्यांच्या कमानीखालून २५-३० फ़ुटाचेही राजे सहज आपली मिरवणूक घेऊन जाऊ शकतात. तेव्हा ढोल ताश्याच्या तालावर बेधूंद नाचणारा तरूण म्हातारा होऊन गेलाय आणि त्याची नातवंडे आता डीजेच्या गोंगाटात भान हरपून नाचतात. की लाखो उध्वस्त गिरणी कामगार व त्यांच्या आप्तस्वकीयांचा आक्रोश टाहो ऐकू येऊ नये म्हणून डीजे कानठळ्या बसवतो?

2 comments:

  1. Magil Varshi pasun amachya kolhapuratil eak mandal 16 feet unchichi "LALABAG RAJA Swarupatil murti mumbai varun (Lalabag Rajaj banavanarya Murtikarankadun) aanun mothya dimakhat basvat aahet.

    ReplyDelete