Friday, September 4, 2015

कॉम्रेड अंजान श्रीक्षेत्र बारामतीची वारी करा

 

तिकडे दूर उत्तरप्रदेशात ऐन कृष्णाष्टमीच्या मुहूर्तावर कम्युनिस्ट नेते कॉम्रेड अतुलकुमार अंजान यांनी संस्कृती रक्षणाचा पवित्रा घेतल्याने अनेकांना हृदयविकाराचा झटकाच आलेला असेल. कारण आजवर हे काम प्रतिगामी मानले जाणारे हिंदूत्ववादी करीत होते आणि त्यातला खुळेपणा जनतेला समजावण्याचे कर्तव्य पुरोगामी अगत्याने बजावत होते. असे असताना अकस्मात कॉ. अंजान यांना भारतात बलात्काराचे प्रमाण वाढल्याचा साक्षात्कार झाला आणि विनाविलंब त्यांनी अशा घटनांना सनी लिओन नावाची पाश्चात्य बॉलिवुड अभिनेत्री जबाबदार असल्याचा शोध लावला. तसा शोध लावून ते थांबले नाहीत. त्यांनी त्याचा जाहिर उच्चार केला आणि हा पाश्चात्य कचरा उचलून बाहेर फ़ेकून दिला पाहिजे, अशी मागणी केली. खरे तर अशी कोणी भारतीय कॉम्रेडकडून अपेक्षा करत नाही. मग हे अगाध ज्ञान अंजान यांनी कुठून प्राप्त केले असेल, असे कुतूहल निर्माण झाले आणि आम्हीही थोडाफ़ार शोध संशोधन केले. तेव्हा अंजान यांनी मागल्या काही दिवसात कॉग्रेसचे प्रवक्ते व कायदेपंडीत अभिषेक मनु सिंघवी यांची शिकवणी लावली असल्याचे आढळून आले. काही महिन्यापुर्वीच सिंघवी यांनी हा कचरा भारतातील घराघरांची शोभा वाढात असल्याचा शोध लावला होता. तसे टवीटही केलेले होते. बहुधा त्यापासून प्रेरणा घेऊनच संस्कृती रक्षणाची सुरसुरी कॉ. अंजान यांना आलेली असावी. आता हा कचरा त्या दोघाना कुठे सापडला, ते रहस्य मात्र अजून कोणाला उलगडलेले नाही. की सिंघवी यांचा अर्धवट राहिलेला शोध घेत कॉ. अंजान पुढे सरसावले होते? कारण सिंघवी नुसता कचरा म्हणाले होते. अंजान यांनी तो कचरा म्हणजे सनी लिओन हिच्या कंडोमच्या जाहिराती असल्याचे स्पष्ट केले आहे. कंडोम वापरून झाला मग उकिरडयावर फ़ेकून देत असतात. मग अंजान तिथे संशोधनाला गेले असतील काय?

असो, तर महान आध्यात्मिक गुरू व विचारवंत महेश भट यांच्या संस्कारात वाढलेल्या सुसंस्कृत पूजा भट यांनी तीन वर्षापुर्वी ‘जिस्म-२’ नावाचा एक चित्रपट काढला होता. त्या प्रबोधनपर चित्रपटाच्या जाहिराती मुंबईभर झळकत होत्या. त्यामुळे अस्वस्थ होऊन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या व आमदार विद्या चव्हाण यांनी महापौरांकडे तक्रार केली. या जाहिराती बहुधा फ़ारच अध्यात्मिक झाल्या असाव्यात. त्यामुळे मुलाबाळांवर भलतेच प्रतिगामी संस्कार होण्याच्या चिंतेपोटी चव्हाण यांनी त्या जाहिराती काढून टाकाव्यात, अशी मागणी केलेली होती. बिचारे मुंबईचे तात्कालीन प्रतिगामी महापौर सुनील प्रभू यांनी उगाच राजकारण माजू नये, म्हणून विनाविलंब त्या जाहिराती ह्टवण्याचे आदेश देवून टाकले. राजरोस इतका प्रतिगामी उच्छाद त्यामुळे मांडला गेला होता, काही विचारू नका. त्यात पुन्हा राष्ट्रवादीच्याच आमदाराने पुढाकार घेतला. मग पक्षाच्या प्रबोधन कार्याच्या चिंतेने पक्षाध्यक्ष शरद पवारांचे पुत्रतुल्य आमदार जितेंद्र आव्हाड खवळले नसते तरच नवल ना? महाराष्ट्रात ओबीसींचे नेते म्हणून आव्हाडांवरच पवारांनी शाहू, फ़ुले, आंबेडकरांचे विचार प्रसारीत करायची जबाबदारी सोपवली आहे. त्यात आपल्याच पक्षाच्या महिला आमदाराने व्यत्यय आणलेला बघून आव्हाड पुढे सरसावले आणि त्यांनी या ‘जिस्म-२; चित्रपटाला संरक्षण देण्याचे उत्तरदायित्व आपल्या शिरावर घेतले. इतके की प्रथमच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रवक्त्याला (मदन बाफ़नांना) आव्हाड करीत आहेत ते शाहू, फ़ुले, आंबेडकर प्रबोधनकार्य, हा पक्षाचा कार्यक्रम नाही असे पत्रकार परिषद घेऊन जाहिर करावे लागले. कदाचित बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध करण्याचा आव्हाड यांचा पवित्रा हा पक्षाने आपली भूमिका नाही म्हणण्याचा दुसरा प्रसंग असावा. पहिला होता तो ‘जिस्म-२’ या प्रबोधनपर चित्रपटाला पुरस्कार देण्याचा.

योगायोगाने तेव्हाही २०१२ सालात अशीच जन्माष्टमी होती आणि संघर्षरत आव्हाडसाहेब शाहु, फ़ुले, आबेडकरांच्या विचारांना पुढे चालना देण्यासाठी ठाण्यात कोटीकोटी रुपयाची बक्षिसे देवून उंच उंच हंड्या बांधायचे जंगी कार्य करत होते. मग ‘जिस्म-२’ सारख्या प्रबोधनपर चित्रपटाला प्रोत्साहन देण्य़ासाठी आव्हाडांनी त्याच्या निर्मात्या पूजा भट आणि सर्ववस्त्र परित्याग करणार्‍या सनी लेओन यांना आपल्या दहिहंडीत सहभागी व्हायला खास आमंत्रण दिले. ज्याला सिंघवी किंवा अंजान पाश्चात्यांनी फ़ेकून दिलेला कचरा म्हणतात, त्याच या सनी लेओन. आता यात कुठले आले शाहू, फ़ुले, आंबेडकरांच्या विचारांचे प्रबोधन? असा हलकट प्रश्न काहीजण विचारू शकतील, तर त्यांचे आधी समाधान करणे भाग आहे. कचरा म्हणजेच फ़ेकून दिलेले, वंचित, उपेक्षित ना? मग सिंघवी अंजान लिओन हिला काय संबोधत आहेत? तेव्हा तिच्याच आध्यात्मिक फ़ोटोला टाकावू ठरवणारे महापौर वा आमदार महिला नेत्या तिला कचराच ठरवित होत्या ना? अशा उपेक्षितांचा उद्धार व त्यांचे सशक्तीकरण म्हणजेच पुरोगामी कार्य नव्हे काय? ते करण्याचे धाडस आव्हाडांनी दाखवले होते आणि त्यासाठी पक्षाच्या प्रवक्त्याच्या विरोधालाही जुमानले नव्हते. असे संघर्षाचे काम करणार्‍या जितेंद्र आव्हाडांना पवारसाहेब उगाच इतके महत्व देत नसतात. प्रबोधन व सुधारणांचे कार्य असेच प्रवाहाच्या विरोधात जाऊन करावे लागत असते आणि आव्हाड त्यात कमालीचे आघाडीवर पहिल्यापासून राहिले आहेत. त्यांनी नाकारल्या गेलेल्या, वंचित सनी लेओन व पूजा भट यांना सन्मानपुर्वक आपल्या दहिहंडीचे माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित केले. कारण सनी वा तिचा चित्रपट अश्लिल नाही तर त्याकडे बघणार्‍यांची नजर अश्लिल असते, असा उपदेश आव्हाडांनी भक्तजनांना केला होता. कदाचित त्यातूनच पवार साहेबांचे प्रबोधन झाले असावे व आव्हाड शाहू, फ़ुले, आंबेडकरांचे विचार पुढे नेत असल्याचे त्यांना उमजले असावे.

आता त्याला तीन वर्षे होऊन गेली. लोक ‘जिस्म-२’ विसरून गेलेत आणि भारतातले लोक पुरोगामी होऊन सनी लिओनला सन्मानाने वागवू लागले आहेत. त्याचे योग्य ते श्रेय आव्हाडांना द्यावेच लागेल. दुर्दैवाने कॉम्रेड अतुल अंजान महाराष्ट्रात रहात नाहीत. म्हणून ते आव्हाडांच्या शाहू, फ़ुले, आंबेडकर विचारांना पारखे राहिले असावेत. त्यांच्या तोंडून अजाणतेपणी सनी लिओनबद्दल असे शब्द निघून गेले असावेत. त्याचे कारण आहे. सतत दिल्ली वा उत्तर प्रदेश, बंगाल अशा प्रदेशात फ़िरणार्‍या अंजान यांना अधूनमधून महाराष्ट्राच्या पुण्यभूमीतल्या खर्‍या पुण्यक्षेत्राला भेट देता आलेली नाही किंवा त्यांनी आळस केलेला असावा. महिन्यातून एकदोनदा तरी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘साहेबां’च्या संपर्कात असतात आणि सवड मिळाली की बारामतीला भेट देतात. मग अतुल अंजान यांनी त्यात कंजुषी कशाला केलेली आहे? त्यांनी पुण्यक्षेत्र बारामतीची यात्रा केली असती तर सनी लेओन ही आध्यात्मिक साध्वी असल्याचे त्यांच्या लक्षात आले असते. मग त्यांनी तिचे चित्रपट वा जाहिरातीवर आक्षेप घेतला नसता. उलट आव्हाड यांच्याप्रमाणे असे आक्षेप घेणार्‍या पुराणमतवादी संस्कृतीरक्षकांना त्यांची पायरी दाखवण्यासाठी थेट वृंदावनातच जन्माष्टमीसाठी सनी लिओनला आमंत्रित केले असते. असो, ते व्हायचे नव्हते आणि आता तितका वेळही शिल्लक उरलेला नाही. आता कॉम्रेड अंजान यांनी टिव्ही चॅनेलवर पोपटपंची करण्यापेक्षा काहीकाळ इथे ठाण्यात येऊन आव्हाडांकडून प्रबोधनाचे व शाहू, फ़ुले, आंबेडकरांच्या विचारांचे धडे गिरवावे. पारायण करावे आणि मग त्यात पारंगत झाल्यावर श्रीक्षेत्र बारामतीला जाऊन खुद्द साहेबांचा अनुग्रह घ्यावा. त्यातून सनी लेओनला अपमानित केल्याचे प्रायश्चित्त होईलच. पण पुढल्या काळात कधी तशी चुक त्यांच्याकडून होण्याची शक्यता उरणार नाही. साहेबांच्या धोरण व कृपेमुळे उत्तर भारतातही पुरोगामी विचारांची गंगा धो धो वाहू लागेल.

No comments:

Post a Comment