महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री व विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य गिरीश बापट सध्या नसत्या वादात गुरफ़टले आहेत. हल्ली नेहमी असेच होते. कोणीही काहीही बोलायची खोटी, मग त्यातला मतितार्थ समजून घेण्यापेक्षा बारा-मतितार्थ शोधायची माध्यमांना खोड जडली आहे. अन्यथा बापटांना अकारण खुलासा करण्याची वेळ आलीच नसती. तरूणांच्या व विद्यार्थ्यांच्या सभा संमेलनात गेल्यावर कुणा वक्त्याने अध्यात्मावर प्रवचन करायचे असते काय? तसा दंडक असता तर बापटांनी किर्तनही केले असते. पण समोर बसलेल्या तरूणांना मार्गदर्शन करायचे तर ‘योग्य’ मार्गच दाखवायला हवा ना? मुलांचे हौसमौजेचे दिवस असताना त्यांना नसत्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगून चालेल काय? अगदी सध्या महाराष्ट्रात काटेकोर ‘पर्युषण’ चालू असले म्हणून काय झाले? त्यात मांसाहाराला बंदी आहे आणि शाकाहारी जेवणाची सक्ती आहे. पण तोच व्हेज आहाराचा दंडक विनोदाला लागू होत नाही, इतके मंत्रीमहोदयांना नक्की कळते. म्हणून त्यांनी नॉनव्हेज विनोद केला. त्याला समोरच्यांकडून तितकाच नॉनव्हेज प्रतिसादही मिळाला. यात माध्यमांना पोटदुखी होण्याचे कारण काय? त्यात पुन्हा सोशल मीडियाचे तर विचारूच नका. तिथे अनेकजण सुगावाच लागायच्या प्रतिक्षेत असतात, विनाविलंब शिकार्यासारखे राजकारण्यांवर तुटून पडायला ही हिंसक मंडळी कायम दबा धरून बसलेली असतात. मोबाईलच्या जमान्यात आणि सोशल मीडियात काय लिहावे-बोलावे, त्याचेही भान अशा मंडळींना उरलेले नाही. म्हणूनच बापटांची ‘टंग स्लिप’ झाली तर या लोकांनी त्यांची ‘टंग क्लिप’ करायचा घाट घातला. टवाळांनी त्यांचीच क्लिप बनवून गदारोळ सुरू केला. तरूणांच्या जमावात मंत्र्यांनी तरूण व्हायचा प्रयत्न केल्यास कल्लोळ करण्याचे कारण काय? तरूण व्हायचे म्हणजे क्लिपा बघायच्या असतात, हे आपले रहस्य मंत्र्यांना उमगल्याची तर ही पोटदुखी नसेल ना?
खरे तर समोरच्या जमावाला खुश करून टाकण्यात वक्त्याची किमया सामावलेली असते आणि ज्याप्रकारे तिथे शिट्ट्या फ़ुंकल्या गेल्या व हास्याचा गडगडाट होऊन पाऊस कोसळला, त्यासाठी बापटांचे आभारच मानायला हवेत. कारण विद्यार्थी या तरूण वयात मोबाईल फ़ोनचा वापर कसा करतो, त्याची जाण त्यांनाही असल्याचे त्यातून लक्षात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातला सर्वात तरूण देश म्हणून भारताचे वय पस्तिशीच्या आसपास असल्याचे लोकसभा निवडणूकीपासून सांगितले होते. असा हा तरूण देश आज जगातला सर्वाधिक मोबाईल फ़ोनधारकांचाही देश आहे. इतके मोबाईल घेऊन या देशातला तरूण नेमके काय करतो, असाही प्रश्न अनेकांना पडलेला असेल, त्याचा खुलासा कोणी तरी करायला हवाच होता. ती जबाबदारी बापटांनी पार पाडली. इतर कोणाची तशी हिंमत झाली नव्हती. महाराष्ट्रामध्ये असलेली शिवसेना-भाजपा युती तोडायची होती. पण भाजपात ती हिंमत कोणाला होत नव्हती. एकनाथ खडसेंनी तशी हिंमत करून दाखवली. हिंमतीने पक्षाचे बळही वाढले असे नाथाभाऊंनी कालपरवाच जाहिरपणे सांगितलेले विसरून चालेल काय? तसेच देश तरूण असण्यामागचे रहस्य कोणीतरी देशाला व जगाला समजावण्याची गरज होती. पण तशी हिंमत कोणी दाखवत नव्हता. खुद्द पंतप्रधानांनाही ती हिंमत होत नव्हती. बापटांनी ती हिंमत दाखवून मोदींचे काम सोपे केले म्हणायचे. म्हणून तर पक्षातर्फ़े त्यांचे खास आभार मानायला हवेत. पक्षानेच कशाला सर्वच राजकीय पक्षांनी व नागरिकांनी बापटांच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. मोबाईलचा हा वापर अजून देशातल्या बहुतांश लोकांना व त्यांचे उत्पादन करणार्या अनेक कंपन्यांनाही ठाऊक नव्हता. मोबाईल हे तरूण असण्याचे वा तारूण्य जोपसण्याचे खास साधन असल्याच्या या शोधावर तात्काळ भारताने पेटंट नोंदवून घेण्याची गरज आहे.
अनेकांना यात कसली आली आहे हिंमत वा धाडस, असेही वाटू शकेल. तर त्यांच्या दुबळ्या स्मरणशक्तीला चालना देण्याची गरज आहे. दोन वर्षापुर्वी कर्नाटकच्या विधानसभेत काही आमदार असेच आपल्या तारूण्याचा नमूना एकमेकांना सभागृहातच दाखवत असल्याचा गवगवा झालेला होता. त्यावरून टिकेची झोड उठलेली होती. तेही आमदार भाजपाचेच होते आणि म्हणून ‘क्लिपबघे’ असलेल्या त्या आमदारांना फ़ैलावर घेण्य़ाचा नतद्रष्टपणा दिवाळखोर माध्यमांनी केला होता. तेव्हा आपण तसली कुठली क्लिप बघतच नव्हतो, असा खुलासा करताना कर्नाटकातील त्या भाजपा आमदारांची दमछाक झालेली होती. मोबाईलवर क्लिपा बघणे हे धाडसाचे कामच नसते, तर त्या बिचार्यांनी कशाला ते आरोप झटकले असते? त्यांनी मोठ्या रुबाबात आपण क्लिपा बघत होतो, कारण आम्हीही ‘म्हातारे कोतारे’ झालेलो नाही, तर अतिशय उमद्या व्यक्तीमत्वाचे तरूण आहोत, असे छाती फ़ुगवून सांगितले असते. किंबहूना देश सर्वाधिक तरूणांचा असल्यानेच आम्हाला त्यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अगदी सभागृहातही क्लिपा बघाव्या लागतात, असे त्यांनी अभिमानाने सांगितले असते. पण त्यांच्यात तितकी हिंमत नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या तरूणाईचा हवाला द्यायचे सोडून आरोप फ़ेटाळण्याचा पळपुटेपणा दाखवला होता. तो किस्सा स्मरला तर मग गिरीश बापट यांनी क्लिपा बघत असल्याचे सांगून कोणते धाडसी पाऊल टाकले, त्याचा अंदाज येऊ शकतो. पण त्यातले धाडस ओळखण्या इतकीही माध्यमातल्या ‘ढुढ्ढाचार्यांची’ बुद्धी शाबुत राहिलेली नाही. म्हणून बापटांच्या धाडसाचे कौतुक होण्याऐवजी त्यांना धारेवर धरण्याचा कपाळकरंटेपणा झालेला आहे. समस्त तरूणाईने त्या बौद्धिक दिवाळखोरीचा कडकडीत निषेध केला पाहिजे. तेवढ्यावर न थांबता खास समारंभाचे आयोजन करून मोठ्या पडद्यावर क्लिपांचे प्रदर्शन मांडायला हवे आहे.
राज्याला दिर्घकाळानंतर तरूण मुख्यमंत्री लाभला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली कारभार हाकणार्यांना म्हातारे असले तरी कोतार्यासारखे वागून चालणार नाही, याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मंत्र्यांनी प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचा तरूण असल्याने पहिला सर्वात पवित्र हक्क कोणता असेल, तर मोबाईलवर क्लिपा बघणे. त्याचाच तर उदघोष बापट यांनी केला आहे. नुसते त्या हक्कावर शिक्कामोर्तबच केले नाही, तर आपणही म्हातारे झालेलो नाही हे सिद्ध करण्यासाठी आपण क्लिपा बघतो, याची ग्वाही दिली आहे. मात्र विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ मोबाईलवर क्लिपा बघण्यात जातो, तितका वेळ बापटांना त्या तारूण्याच्या कर्तव्यासाठी देता येत नसेल, तर त्यांनी खंत व्यक्त करण्याची संधी समारंभात बोलताना साधली. किती समाधान वाटले असेल, त्या मुलांना? किंबहूना त्यात सहभागी असलेल्या मुलींना तर मंत्री महोदयांविषयी अभिमानच वाटलेला असणार. आता अशा विषयावर पडदाही पाडायचा असतो, हे मात्र विसरता कामा नये. क्लिपा बघायच्या आणि त्यावर पडदा पाडायचा, हेही तरूणाईचे लक्षण असावे. कारण गाजावाजा झाल्यावर बापटांनी अनवधानाने बोललो, असे सांगून त्यावर पडदा टाकावा असे आवाहन केले आहे. पण तुम्ही बघितलेल्य क्लिपवर दुसरा कोण कसा पडदा टाकू शकेल? अनवधानाने बोलण्याचाच विषय असेल, तर त्याला ‘स्लिप ऑफ़ टंग’ असे इंग्रजीत म्हणतात. बापटांचे झाले त्याला ‘क्लिप ऑफ़ टंग’ असे म्हणता येईल. विचारले नसताना क्लिपा बघतो असे कोणी अनवधानाने सांगणार नाही. अनवधानाने बोलली जाते ती गोष्ट मुळात लपवायची अशी असते. पण बापट अभिमानाने क्लिपा बघतात आणि सांगतातही. मग त्याला अनवधान कसे म्हणावे? उलट यापुढे आपण काय बोललो त्याचीच क्लिप बापटांनी रोज निवांत वेळ काढून बघावी, मग त्यांना अनवधान म्हणजे काय त्याचा साक्षात्कार होऊ शकेल.
Bhau.....sadhya punyanagari la kumar saptarshi yanche lekh yetat.vachun agadi chid yete.agdi konala tari target karun, comman sense sodun lihalele lekh astat.Bhau, ha manushya ase ka lihat asel?Bhau...aaj tyancha purogami aani pratigami ya var jo lekh aala hota to agdi dokyavarun gela.bhau tumhi aamhala samjel ashya sopya bhashet (ha surya ha jayadratha) lihatat.ha manus ase ka lihato he janun ghyaychi icchha aahe.please kahitari sanga na yavar.
ReplyDeleteभाऊ आता मजा बघा.
ReplyDeleteसरकारने पोर्न वर बंदी घातली लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली (काही लोकांच्या )
मग सरकारने बंदी उठवली , वादळ शमले , पण ज्यावेळी भाजप चा मंत्री म्हणतो कि " तो क्लिप्स पाहतो" त्यावेळी परत ओरड. आपल्या देशात किती हुशार लोक आहेत ना
माध्यमांना काहीतरी सनसनाटी हव असत. बापटांना सारवासारव करायला यांनी भाग पाडल. धर्म ही अफूची गोळी आहे हे असंच एक सनसनाटी वाक्य रुढ करण्यात विद्वानांचाही हात. जे समाजात घडत आहे ते सुद्धा बोलायची चोरी. एकदा तरुणांना मार्गदर्शन करताना निखिल वागळे म्हणाले होते कि काही नाही मस्त बिअर प्या. मजा करा. चार पाच वर्षांपुर्वी असेल एसेम जोशी सभागृहात कार्यक्रम झाला होता. मी उपस्थित होतो कार्यक्रमाला. आता हे संवादातील एवढच वाक्य तोडून माध्यमांनी कुठ त्यांच्या तोंडी घातल होत? बातमीत सुद्धा त्यांच्या भाषणाचा मुख्य आशयच होता. असो.
ReplyDeleteपुण्यातील बुधवार पेठ हा परिसर बापटांच्या मतदार संघात येतो त्यामुळे बापटांकडुन अजुन काय अपेक्षा ठेवणार??
ReplyDeleteतश्या क्लिप बघणे मोबाईल फोन मध्ये बाळगणे हे कृत्य कायद्याने गुन्हा आहे. भाजपाला समर्थन करताना किती व्हावयाचे याचे तरी निदान भान बाळगले पाहिजे.
ReplyDelete