Tuesday, September 1, 2015

नितीश लालूंकडून बिहारला बारबाला पॅकेज



लौकरच बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका व्हायच्या आहेत. अजून तरी त्याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाने केलेली नाही, तरी येत्या दोन महिन्यात त्याचा कार्यक्रम जाहिर होईल. पण राजकीय अस्थीरता इतकी आहे, की बिहारच्या राजकीय पक्षांनी कधीपासून जागावाटप उरकून प्रचाराच्या मोहिमाही आरंभल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत दोन मोठ्या सभा घेऊन रणशिंग फ़ुंकले आहेच. पण दुसर्‍या सभेत सव्वा लाख कोटी रुपयांचे खास बिहार पॅकेज जाहिर करून मतदाराला भुरळ घालण्याचा आपला हेतू स्पष्ट केला आहे. अनेकांना आठवत असेल, तर तीन वर्षापुर्वी भाजपात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याचे प्रयास सुरू झाले. तेव्हापासून बिहार पॅकेजचा विषय नितीशकुमार यांनी लावून धरला होता. राष्ट्रपती निवडणूक असो किंवा एफ़डीआय गुंतवणूकीचा विषय असो, जदयूचा पाठींबा हवा असेल तर बिहारला खास पॅकेज द्या, असा सूर नितीश आळवत होते. पण आज मोदींनी तसे पॅकेज खुलेआम जाहिर केल्यावर नितीशनी त्यांचे स्वागत केलेले नाही, तर त्याची खिल्ली उडवली आहे. मागले वर्षभर नितीश तोच सवाल मोदींना करत होते. लोकसभा प्रचारात बिहारला पॅकेज देण्याची भाषा केलेले मोदी यश मिळाल्यावर बिहारला विसरून गेलेत, असे कालपर्यंत नितीश बोलत होते. पण तेव्हा पन्नास हजार कोटीचे दिलेले आश्वासन फ़ुगवून आता मोदींनी चक्क सव्वा लाख कोटी इतकी मोठी रक्कम जाहिर केली आहे. थोडक्यात नितीशना त्यांच्याच जाळ्यात फ़सवायची खेळी मोदी करीत आहेत. त्यानंतर नितीशची तारांबळ उडणे स्वाभाविक होते. कारण लोकसभा निवडणूकीपुर्वी एनडीएमधून बाहेर पडून त्यांनी आपल्याच पायावर राजकीय धोंडा पाडुन घेतला आहे. परिणामी त्यांच्या पक्षाचे लोकसभेतील बळ कमी झालेच, पण बिहारमध्ये असलेली शक्तीही घटली आहे.

दोन दशके ज्या बिहारमध्ये लालुंचे जंगलराज संपवण्याची भाषा नितीश करीत होते, त्याच लालूंना कोर्टाने भ्रष्टाचारासाठी शिक्षा ठोठावून निवडणूक लढ्वण्यास प्रतिबंध केल्यावर नितीश लालूंचे भजन करीत आहेत. यासारखी कुठल्या राजकीय नेत्याची नामुष्की असू शकत नाही. पण शेवटी सत्तेचे राजकारण हा सापशिडीचा खेळ असतो. एक खेळी फ़सली की तुम्ही तळागाळात फ़ेकले जाता. नितीशचे तेच झाले. आपल्या मोदी तिरस्काराच्या आहारी जाऊन त्यांनी बिहारमध्येही स्वत:ची कोंडी करून घेतली आहे. त्यामुळे आता टिकाव धरण्यासाठी त्यांना लालूंनाच शरण जावे लागले आहे आणि सोबत नामशेष झालेल्या कॉग्रेसला कुबडीसारखे वापरावे लागते आहे. जिथे स्वपक्षाचे थेट बहुमत होते, तिथे तितक्याही जागा लढवण्याचा आत्मविश्वास नितीशकडे उरलेला नाही. म्हणूनच लालू व नितीश प्रत्येकी शंभर व उरलेल्या दोन डझन जागा कॉग्रेसला अशी विभागणी झाली आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याशी लढताना नितीशना फ़ेस आला आहे. तर अशा सेक्युलर आघाडीने आपले रणशिंग फ़ुंकण्यासाठी जी स्वाभिमान सभा घेतली तिला गर्दी जमवताना सर्वच नेत्यांची तारांबळ उडाली व गर्दी आणायला योजलेल्या खेळीने माध्यमात नाचक्की झाली आहे. लोकांना जमवायला व रोखून धरण्यासाठी चक्क बारबालांचे नाच सभास्थानी ठेवावे लागले, ही लोहियावादी विचारसरणीची अवहेलना नाही काय? पण तिला पर्याय नव्हता. कारण ज्यांची मिळून ही आघाडी झालेली आहे, त्यात मतदाराला आकर्षित करून मते मिळवू शकेल असा कोणी चेहरा वा नेता उरलेला नाही. मागल्या विधानसभा निवडणूकीय नितीश भाजपा यांनी मिळून सर्वांचा खुर्दा उडवला होता. त्यात कॉग्रेस नामशेष झाली, तर लालूंच्या पत्नी राबडीदेवी आपल्या गावातच पराभूत झाल्या. मग लोकसभेत नितीशनेही आपले वाटोळे करून घेतले.



आज मोदीलाट रोखायला एकत्र आलेल्या तीन पक्षांचा बिहारमध्ये कधीकाळी मोठा पाया होता आणि आजही त्यांना मानणारा एक मोठ मतदारवर्ग आहे. पण दिर्घकाळ लालू नितीश व कॉग्रेस एकत्र नांदतील काय, याचीच शंका त्यांच्या पाठीराख्यालाही वाटावी अशी स्थिती आहे. कारण नेते एकाच व्यासपीठावर येत असले, तरी कार्यकर्ता व भूमिकेत एकवाक्यता आढळून येत नाही. मोदी वा भाजपाला शिव्याशाप देण्यापुरते त्यांच्यात एकमत आहे. अशा तिघांनी मिळून महासभा आयोजित केली तरीही त्यांना मैदान भरेल असे शक्तीप्रदर्शन करता आले नाही. याचे कारण त्यांच्यापाशी लोकांच्या आकांक्षा जागृत करील असा कार्यक्रम नाही, की भूमिकाही नाही. भाजपाला शिव्या व मोदींच्या नावाने शंख तर मागल्या अनेक निवडणूकात झाला आहे. पण त्यातून बिहारी मतदाराचे कल्याण कसे होणार, याचे उत्तर हे नेते व पक्ष देवू शकलेले नाहीत. त्याच्याच तुलनेत मग मोदींनी जाहिर केलेले करोडो रुपयांचे पॅकेज वजनदार ठरते. त्यातले दोष सांगणार्‍यांकडे त्यापेक्षा उत्तम द्यायला काहीच नाही. आपणही मागल्या दहा वर्षात प्रचंड विकास केला असा नितीशचा दावा आहे. त्यात काही तथ्य आहे. पण तो विकास होत असताना भाजपाही सत्तेत सहभागी होता, तर विकासाची खिल्ली उडवणारे आज नितीश सोबत आहेत. हा विरोधाभास ओलांडून लोकांची मते वळवणे म्हणूनच नितीशला अवघड होते आहे. जर विकास झाला तर नितीशकुमार वाडगा घेऊन पॅकेज कशाला मागत होते, असा प्रश्न येतो आणि त्याचे चोख उत्तर नाही. शिवाय आठ वर्षे नितीश सरकारने बिहारचे वाटोळे केल्याचा आरोप लालूंकडुन होत राहिला. त्यांनी आज नितीशच्या विकासावर बोलले तर कोणी कसा विश्वास ठेवायचा? अशी एकूण भाजपा विरोधी गोटातली घालमेल आहे. म्हणून भाजपाच्या गोटात सर्व आलबेल असल्याचे मानण्याचीही गरज नाही.

दिल्लीतल्या दणदणित पराभवानंतर अमित शहा नावाच्या जादूबद्दल लोक शंका घेऊ लागले आहेत. त्यामुळेच भाजपाला बिहारमध्ये लोकसभेत मिळवलेले यश कायम टिकवणे हे मोठे आव्हान आहे. कारण दिल्लीनंतर बिहारमध्ये निवडणूका होत आहेत आणि पंतप्रधानपद मिळवायला बिहारनेच मोदींना मोठा हातभार लावला होता. तिथे किमान थेट बहुमत हुकले व सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत यश मिळवले, तरच मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलेली नाही असा दावा करता येईल. तशीच शक्यता अधिक आहे. याचे कारण बिहारमध्ये भाजपाची संघटनात्मक शक्ती मोठी असली तरी त्यांना मागल्या दोन दशकात नितीशकुमार यांचाच चेहरा पुढे करावा लागला होता. कारण तितक्या कुवतीचा नेता भाजपापाशी नव्हता. मोदींशी नितीश राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकत नसले, तरी मोदीही बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तिथेच भाजपा तोकडा पडतो आहे. शिवाय बिहार जातिपातींमध्ये विखुरलेला मतदारसंघ आहे. त्याला विकासाच्या नावावर एकत्र आणणे शक्य असले, तरी जातीपातीच्या विखुरलेपणावर मात करणे सोपे नाही. जसजशी निवडणूक स्थानिक विषय व पातळीवर येत जाते तशा राष्ट्रीय, तात्विक गोष्टी बाजुला पडत जातात आणि व्यक्तीगत मुद्दे मोठे होत जातात. भाजपाची अडचण तिथे आहे. मात्र पासवानांची चारपाच टक्के मते भाजपासाठी निर्णायक मोठी गोष्ट आहे. त्याच बळावर हा पक्ष बिहारमधले आपले वर्चस्व टिकवू शकेल. पण त्यासाठी महाराष्ट्र वा दिल्लीत जो आगावू उद्दामपणा पक्षपातळीवर झाला, त्यापासून सावध रहावे लागेल. कारण कितीही गमजा सोनिया, लालू व नितीश यांनी केल्या, तरी ते दुर्बळ आहेत आणि त्यांच्यापाशी झुंजण्याचीही संघटनात्मक शक्ती नाही. त्याच लाभ भाजपा उठवू शकतो. साध्या सभेच्या गर्दीसाठी बारबाला आणाव्या लागल्या हीच त्याची साक्ष आहे. मात्र म्हणून ती भाजपाच्या हुकमी यशाची हमी मानता येत नाही. थोडक्यात काय? सव्वा लाख कोटीच्या पॅकेजला बारबालांचे पॅकेज कितपत तोंड देवू शकेल, यवर बिहारचे भवितव्य अवलंबून आहे.

No comments:

Post a Comment