Tuesday, August 6, 2013

ही ‘नमो’नियाचीच लक्षणे

   अकस्मात उत्तर प्रदेशच्या राजकारणाला अशी उकळी कशाला फ़ुटली असावी? म्हणजे तिथे जे काही मुलायम यांच्या पुत्र मुख्यमंत्र्याने दिवे लावले; त्यावर बोलायला भाजपा उपलब्ध असताना कॉग्रेस व युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लेखी पत्र लिहून हस्तक्षेप करण्याचे तसे काही राजकीय कारण नव्हते. कारण त्यांच्याच लाडक्या अन्नसुरक्षा विधेयकाला संसदेत संमत करून घेण्यासाठी त्यांना मुलायमच्या समाजवादी पक्षाच्या पाठींबाची गरज आहे. अलिकडेच त्यासाठी पंतप्रधानांनी मुलायमना अगत्याने बोलावून तशी बोलणी करून ठेवली होती. पण सोनियांच्या पत्राने ही बोलणी विसटून टाकल्यासारखी भासतात. कारण आता मुलायम त्याच अन्नसुरक्षा विधेयकासाठी विविध अटी घालू लागले असून उघड विरोधी भाषा बोलू लागले आहेत. ते विधेयक संमत करून घेतल्यावरही सोनिया दुर्गा प्रकरणी हस्तक्षेप करू शकल्या असत्या. पण तसे त्यांनी केलेले नाही. आणि वाळू माफ़ीयांना वाचवण्यासाठी अखिलेश व मुलायम दुर्गाशक्तीला अन्य पदावर पाठवून विषय संपवू शकत होते. त्यांनी थेट मशीदीची भिंत पाडल्याचा खोटा आरोप ठेवून तिला निलंबित करण्याची गरज नव्हती. पण दोन्ही घटना घडल्या आहेत आणि दोन्ही पक्षांना अडचणीत आणणार्‍या वाटत आहेत. तर त्याचे कारण उघड आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार असून त्यांची गठ्ठा मते आपल्याच पारड्यात सगळीच्या सगळी यावीत; यासाठी दोन्ही पक्ष धडपडू लागले आहेत. भाजपाने नरेंद्र मोदी यांना उमेदवार केल्याप्रमाणे पुढे आणल्यापासून उत्तर भारतामध्ये जी हिंदू मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे; त्यातून मुस्लिम मतांवरच विसंबून राजकारण करणार्‍यांचे धाबे दणाणल्याचे ते लक्षण आहे. म्हणून मुलायम यांनी वाळू माफ़ियांसाठी दुर्गाला हटवले असले तरी त्यासाठी मशीदीची भिंत पाडल्याचे खोटे कारण पुढे केले आहे. त्यातून आपणच मुस्लिमांचे कडवे पक्षपाती आहोत, असे त्यांना दाखवायचे आहे.

   दुसरीकडे सोनियांनी त्यात हस्तक्षेपाला विलंब केला असता, तर त्याला अर्थच उरला नसता आणि निष्कीय सरकार म्हणून मोदी आरोप करतात, त्यालाच जास्त बळकटी आली असती, त्याला शह देण्यासाठी सोनियांनी हे पत्र लिहिले. पण त्यातून समाजवादी पक्षाला शह देतानाच मुस्लिमांबद्दल आपण पक्षपाती नाही, असे दाखवले गेले आहे. त्याचा अर्थच मुस्लिम मते गमावण्याचा धोका पत्करला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग आता पुन्हा जुनीच आयडीया कॉग्रेसने बाहेर काढली आहे. मुस्लिम आरक्षणाचा विषय दिड वर्षापुर्वी सलमान खुर्शीद यांनी ऐन विधानसभा निवडणूकीत उकरून काढला होता, त्यातून मोठे वादळ उठले होते. आता दुर्गा प्रकरणी पत्र लिहिल्याने मुस्लिम अस्वस्थ होतील; म्हणून पुन्हा तोच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उकरून काढला आहे. अल्पसंख्य विभागाचे मंत्री रहमान खान यांनी पंतप्रधान व राहुल गांधी यांना पत्र लिहून आरक्षणाकडे लक्ष वेधले आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्ल्यावर कॉग्रेस मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा साफ़ विसरून गेली होती, आता त्याच शिळ्या कढीला ऊत आणायचा उद्योग कशासाठी? बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारपासून उत्तरप्रदेशातील मुस्लिम पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या समाजवादी पक्षापर्यंत प्रत्येकाला साध्या ‘नमो’निया नामक आजाराने पछाडले असण्याची ही लक्षणे आहेत. मोदी यांनी एकही शब्द उच्चारला नाही, तरी त्यांच्या उमेदवारीने पुन्हा हिंदूत्वाची लाट येण्याच्या भयाने या सर्वांना पछाडलेले दिसते आहे आणि त्याला शह देण्याच्या नादात ही मंडळी अधिकाधिक चुका करू लागली आहेत. नितीशनी सकस आहाराच्या खाण्यात सापडलेले विषारी द्रव्य गुजरातमधून आल्याचा आरोप उगाच केला असेल काय?

   नरेंद्र मोदींचे नाव अजून भाजपाने पंतप्रधान पदासाठी जाहिर केलेले नाही आणि कदाचित आणखी काही महिने तशी घोषणाही होणार नाही. पण ज्या प्रकारे राजकारण पुढे सरकते आहे, त्याकडे बघता ते नाव खरेच आधी जाहिर केल्यास स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍यांना पळता भूई थोडी व्हावी. किंबहूना भाजपा ते नाव जाहिर करायला बिचकते, यावरच अशा सेक्युलर लोकांची अधिक मदार दिसते. दोन चाचण्यात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोदींमुळे भाजपाची मते वाढलेली दाखवली, म्हणून दुर्गा व विषारी द्रव्यासंबंधी तर्कहीन वक्तव्ये होत असतील; तर मोदी खरेच या दोन्ही राज्यात प्रचाराच्या मोहिमेवर येतील, तेव्हा यांची अवस्था काय होईल? मुद्दा आजवरच्या मुस्लिम व्होटबॅन्केचा आहे. मुस्लिम एकगठ्ठा मतदान करून निवडणूकीचे पारडे झुकवतात, या समजूतीला गुजरातेत मोदी यांनी शह देऊन दाखवला आहे. आज त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली आहे व लोकांमध्ये त्यांच्याविषयीचे आकर्षण आहे, त्याच्या परिणामी मुस्लिम व्होटबॅन्केला निकामी करू शकणारी मोदी समर्थक व्होटबॅन्क उभी राहिल्याच्या भयाने सेक्युलरांना अस्वस्थ केले आहे काय? आणि मग त्यासाठीच सगळी मुस्लिम मते आपल्याच पारड्यात आणण्यासाठी या अतिरेकी डावपेचाच्या आहारी मुलायम, सोनिया व नितीशकुमार जाताना दिसत आहेत. अन्यथा दुर्गाशक्तीवर मशिदीची भिंत पाडल्याचा आरोप किंवा त्याच्याही पुढे जाऊन नोकरशाहीत मुस्लिम विरोधी अधिकारी असल्याचा पोरकट आरोप कशाला झाला असता? प्रचाराला अजून सुरूवात नाही, त्या आखाड्यात मोदी उतरतील तेव्हा यांचे काय व्हायचे?

Monday, August 5, 2013

नियमानुसार सर्वकाही

  युपीएच्या व कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून उत्तर प्रदेशच्या तरूण सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्यावर अन्याय होता कामा नये असे सांगितले होते. त्यामुळे या तरूणीला सोनिया न्याय देऊ इच्छितात; याचा खुप गाजावाजा झाला. खरे तर तिथेच हे प्रकरण संपायला हवे होते. कारण सोनियांच्या पत्राचा व ते माध्यमांना लगेच प्रसिद्धीसाठी पाठवण्यामागचा तितकाच हेतू होता. सहाजिकच त्यानुसार कामही झालेले आहे. पंतप्रधानांनी नियमावर बोट ठेवून उत्तर प्रदेश सरकारकडून त्यासंबंधीचा अहवाल मागवला आहे. आता तो अहवाल पोहोचला; मग दिर्घकाळ त्यावर विचार करण्याचे दळण सुरू होईल. दरम्यान इतका हस्तक्षेपही मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाला खपलेला नाही. त्यांनी सोनियांसह कॉग्रेस पक्षाला जाब विचारण्यापर्यंत मजल मारून अन्नपाणी तोडण्यापर्यंत म्हणजे अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यात फ़ारसा दम नाही. आतापर्यंत प्रत्येकवेळी मुलायम यांनी असली खुप नाटके केली आहेत. विरोधात तावातावाने बोलायचे आणि मतदानाची वेळ आली; मग सरकार अडचणीत येऊ नये अशी खेळी करायची, हे मुलायमचे राजकारण आहे. त्यामुळेच दुर्गाप्रकरणात दोघेही मस्तपैकी आपापल्या भूमिका पार पाडत आहेत. त्या अभिनयाला कोणी गंभीर ‘भूमिका’ म्हणून घेण्याची गरज नाही. नियमानुसार काम व कारभार हा स्वातंत्र्योत्तर काळातला कॉग्रेसी कार्यपद्धतीचा मूळमंत्र नेहमीच राहिला आहे. नियमाबाहेर कॉग्रेस कधीच जात नाही. त्यामुळे जे काम करायचे असते ते नियमात बसवून उरकले जाते आणि ज्या कामात खोडा घालायचा असतो, ते असे सगळे नियम गुंडाळून ठेवले जात असतात. नियम कधी मोडला जात नाही.

   आताच बघा, दुर्गा प्रकरणी सोनियांनी पत्र लिहून पंतप्रधानांना त्या मुलीवर अन्याय होऊ नये याची आठवण करून दिली. पण तसेच अशोक खेमका प्रकरणी झाले; तेव्हा सोनियांनी पत्र लिहायचे कष्ट घेतले नाहीत. कशा घेतील? खेमका हा हरयाणा सरकारचा अधिकारी होता आणि राज्यसरकारच्या कारभारात केंद्राने हस्तक्षेप करणे नियमबाह्य होते ना? पण तेव्हा हरयाणाचे मुख्यमंत्रीच दिल्लीत दाखल झाले व त्यांनीच सोनियांची भेट घेऊन नियमांचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. पंतप्रधान त्यात अवाक्षर तरी बोलले होते काय? सर्व कसे नियमानुसार पार पडले. खेमका यांना नियमानुसार नव्या पदावर रवाना करण्यात आले आणि नियमानुसार आलेल्या नव्या अधिकार्‍याने जुन्या अहवालात फ़ेरबदल करून सोनियांच्या जावयाला नियमांच्या पालखीत बसवून सुखरूप बाहेर काढले. कुठे म्हणून तक्रारीला वा अन्यायाला जागा शिल्लक राहिली काय? म्हणून संसद अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान पत्रकारांना म्हणाले नियमानुसार जे काही करता येईल, ते सर्वच दुर्गा प्रकरणात केले जाणार आहे. जेव्हा नियमात बसणार नसेल; तेव्हा नियमात बसणारे नियम शोधून ते वापरणारा योग्य जागी आणून बसवला जातो. इशरत चकमक प्रकरणात दोनदा प्रतिज्ञापत्र असेच नियमानुसार म्हणूनच तर बदलता आले ना? आधीच्या अधिकार्‍याला चकमक खोटी ठरवणारे प्रतिज्ञापत्र नियमानुसार बनवता येत नव्हते. म्हणून त्याच्या जागी योग्यवेळी योग्य अधिकारी आणून बसवला आणि त्याने इशरतची चकमक खोटी असल्याचे प्रतिज्ञापत्र नियमात बसवून दाखवले. कुठे म्हणून नियमाचे उल्लंघन झाले काय? कुठे नियम मोडला गेला काय? सर्वकाही कसे नियमात नेमके फ़िट्ट बसले ना?

   तुम्ही काहीही करा वा करू नका, पण सुरक्षित रहायचे व जगायचे असेल, तर सतत नियमात बसायची काळजी घ्या, मग तुम्हाला कसला धोका नसतो. नियमात बसून तुम्ही अगदी कुठलाही गुन्हा करू शकता. अगदी मुडदाही पाडू शकता. पण तुम्ही पाडलेला मुडदा म्हणजे केलेला खुन वा दरोडा नियमानुसार कायदेशीर कृत्य असल्याचे तुम्हाला सिद्ध करता आले पाहिजे. म्हणून तर आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेकडो दंगली झाल्या व हजारो निष्पाप निरपराध माणसे त्यात मारली गेली. पण कधी आपण कुठल्या मुख्यमंत्र्याला त्यात गुन्हेगार मानले काय? बहुतेक दंगली कॉग्रेसच्या राज्यात झाल्या आणि त्यांनी कधीही नियमांचे उल्लंघन केले नाही. सर्व दंगली, त्यातला हिंसाचार वा त्यातले गुन्हे नियमात बसण्याची मस्तपैकी काळजी घेतली होती. नरेंद्र मोदी यांचा गुन्हा असा, की त्यांना आपल्या कारकिर्दीतील दंगल नियमात बसवता आलेली नाही. आता हे नियमात बसवणे म्हणजे काय असते? तर त्याचा गवगवा होऊ न देणे. राजीव गांधींच्या काळात दोनतीन दिवसात टिपून पाच हजार शिखांची दिल्लीत कत्तल झाली. पण त्यात आघाडीवर राहुन खुनाखुनीला प्रोत्साहन देणारे भगत, टायटलर वा सज्जनकुमार यांच्यावर एकतरी आरोप दाखल होऊ शकला काय? सर्वकाही नियमानुसार झाले. यातला पहिला निर्णायक नियम असतो तो, सेक्युलर मुखवटा चढवण्याचा. एकदा तो मुखवटा चढवला, मग आपोआपच बाकीचे नियम लुळेपांगळे व निकम्मे होऊन जातात. तुमच्या सर्वच गुन्हे व अपराधांना नियमात बसवायला भरपूर मोकळी जागा तयार होते. वाटेल ती मनमानी करण्यासाठी नियम शिथील होऊन जातात. नियमानुसार सर्वकाही होते व होणारच आणि सेक्युलर मुखवटा ही नियमातली एकमेव पळवाट आहे.

Saturday, August 3, 2013

निव्वळ मानभावीपणा


   उत्तर प्रदेशच्या सनदी अधिकारी दुर्गालक्ष्मी नागपाल यांना खोटी कारणे दाखवून वाळू माफ़ियांच्या दबावाखाली निलंबीत केले गेले. याबद्दल गेला आठवडाभर आता कोणाच्याच मनात शंका राहिलेली नाही. इतकेच नव्हेतर आपल्या पापावर पांघरूण घालतानाही राजकीय लाभ उठवण्यासाठी समाजवादी पक्षाचे तरूण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या तरूण अधिकार्‍यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अत्यंत घातक आरोपही केला. त्यातून त्यांना वाळू माफ़ियांचे आपण समर्थक असल्याचे लपवायचे होतेच. पण त्याच्याही पलिकडे जाऊन बेकायदा मशीद पाडणार्‍या अधिकार्‍याला आपण तडकाफ़डकी बरखास्त केले; असे भासवून मुस्लिम मतांची बेगमी करायची होती. मात्र आता त्यांचे दोन्ही डाव उघडे पडले आहेत आणि अपेक्षेपेक्षा मोठीच देशव्यापी प्रतिक्रिया उमटलेली आहे. पण अशा पेचातून निसटायचे तर राजकारण्यांना तोंड लपवायला जागाही लागते. ती सापडत नसल्याने मुलायम व त्यांच्या पुत्राची अधिकच राजकीय कोंडी झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री उत्तरप्रदेश व बिहारमध्ये आगामी लोकसभेसाठी आपली ताकद लावणार या बातम्यांनी मुस्लिम मतांवर विसंबून राजकारण करणार्‍यांची तारांबळ उडाली आहे. त्यातूनच हा असा मुर्खपणा झालेला आहे. मोदींची जोर लावला तर प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम मते कॉग्रेसकडे झुकतील; या भयाने आपण मुस्लिमांचे एकमेव पक्षपाती असल्याचे भासवण्याची ही वेडगळ शर्यत सुरू झाली आहे. त्यामुळेच मशीद पाडण्याच्या कंड्या दुर्गाशक्तीच्या विरोधात पिकवून वाळू माफ़ियांना वाचवताना राजकारणही खेळण्याचा उद्योग करण्यात आला. पण आता तो उलटला आहे. कारण मशीद पाडण्यात संबंधित अधिकारी नसल्याचे उघडकीस आले आहे.

   खरे तर मूळ कारवाईच बेकायदा होती. पण संसदेत मुलायमच्या समाजवादी पक्षाचा बहूमतासाठी पाठींबा आवश्यक असल्याने कॉग्रेसचे नेते व संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी त्या निलंबन प्रकरणात हस्तक्षेप करण्यास साफ़ नकार दिला होता. म्हणजेच कॉग्रेसने सरळसरळ हात झटकले होते. पण हे प्रकरण गाजू लागल्यावर त्यात हात धुवून घेण्याचा मोह सोनियांनाही आवरला नाही. त्यांनी सहा दिवस उलटल्यावर पंतप्रधानांना पत्र लिहून प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांना संरक्षण मिळायला हवे; असा मानभावीपणा केला. खरे तर अशा साळसूद भाषेत पत्र लिहिण्याची अजिबात गरज नव्हती. पंतप्रधानांना सोनिया थेट फ़ोन करून तसे सांगू शकत होत्या. पण त्याऐवजी त्यांनी भलेथोरले पत्र लिहून त्याच्या प्रति माध्यमांकडे पाठवून दिल्या. तिथेच त्यांचा मतलब उघड झाला. त्यांना कर्तव्यदक्ष अधिकार्‍याला संरक्षण देण्याची इच्छा नसून राजकीय लाभ उठवायचा होता. कारण दुर्गालक्ष्मी प्रकरणी उठलेले मोहोळ त्यांनी बघितले असेल; तर त्यात बहुतेक वाहिन्यांवर अशोक खेमका नावाच्या अन्य पिडीत अधिकार्‍यानेही हजेरी लावली होती. आणि त्या खेमकावर अन्याय झाला त्याचे कारण सोनियांचा लाडका जावई रॉबर्ट वाड्रा याचेच पाप होते. कमी किंमतीत व अनधिकृत जमीनी खरेदी करून, मग सरकारी कागदपत्रात हेराफ़ेरी करून, त्याच जमीनी अनेकपटीने पुन्हा व्यापारी कंपन्यांना विकण्याचा या जावयाचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला म्हणून खेमका या अधिकार्‍याची तडकाफ़डकी बदली करण्यात आली होती. तेव्हा दुर्गालक्ष्मी प्रकरणात तोंड उघडले, तर आपल्यावर खेमका प्रकरण शेकणार; याचेही भान सोनियांनी ठेवायला हवे होते. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ना?

   इथे नॉयडामध्ये तरी सामान्य माफ़ीया वाळू उपसा चालतो आणि कायद्याचा बडगा दाखवल्यावर त्यांनी पळ काढला होता. पण वाड्रा प्रकरण चव्हाट्यावर आणले म्हणून खेमका यांना तातडीने उचलून दुर फ़ेकण्यात आले. इतकेच नव्हेतर त्यांनी मारलेले ताशेरे फ़िरवून जावयाच्या पापावर पांघरूण घातले गेले होते. तेव्हा सेक्युलर पापधर्माला जपून मुलायम वा अन्य कुणा सेक्युलर पक्षाने त्यावर मल्लीनाथी केली नव्हती. त्यामुळेच सोनियांनीही आपल्या मित्रपक्ष समाजवाद्यांच्या पापावर बोलण्याचा मानभावीपणा करायला नको होता. पण त्यांना तो मोह आवरता आला नाही आणि समाजवादी पक्षानेही मग खेमका यांच्यासाठीही सोनियांनी पंतप्रधानांना पत्र लिहावे; असे सुचवून कॉग्रेसच्या अब्रूची लक्तरेच काढली आहेत. अर्थात अब्रुच्या गोष्टी अब्रुदारांसाठी असतात. सत्तेत राहून मनमानी करणार्‍यांना अब्रूची चैन करता येत नसते. त्यामुळेच आता हे दोन्ही सेक्युलर पक्ष एकमेकांचे कपडे फ़ाडण्यात धन्यता मानतील. खरे तर दुर्गा प्रकरणात मुलायम व त्यांच्या पुत्राने वाळू माफ़ियांना वाचवण्यासाठी या अधिकार्‍याची नुसती बदली केली; तरी थोडा गाजावाजा होऊन खेमकाप्रमाणे याही प्रकरणावर पडदा पडला असता. पण मुस्लिम मतांच्या हव्यासापायी मशीदीची भिंत पाडल्याचा कांगावा झाला तो आता त्यांना महागात पडायची वेळ आलेली आहे. त्यातून ही तमाम सेक्युलर व मुस्लिम मतांसाठी अगतिक झालेली राजकीय मंडळी मोदींच्या आव्हानाने किती गर्भगळीत झालीत; त्याचेच प्रदर्शन घडवत आहेत. ते जितक्या चुका व आगावूपणा करीत जातील; तितका मोदींना लाभ मिळणार आहे. सहाजिकच असला पोरकटपणा सोडून सेक्युलर लोकांनी थेट मोदींसमोर खरे राजकीय आव्हान उभे केल्यास, त्यांना मोदींशी चांगले दोन हात करता येतील.

वरातीमागून घोडे


   कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाचे प्रवक्ते व नेत्यांसाठी एक फ़तवा जारी केल्याचे वृत्त आहे. ते खरे असेल तर देशातील सर्वात जुन्या व सव्वाशे वर्षाच्या या पक्षाची कीव करायला हवी. विरोधी पक्षातल्या एका नेत्याविषयी काय बोलावे किंवा बोलू नये; असा सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्याने फ़तवा काढणे हास्यास्पद नाही काय? मग तो फ़तवा जाहिर असो की आतल्याआत काढलेला छुपा फ़तवा असो. त्यातून प्रत्यक्षात त्या विरोधी नेत्याचा प्रभावच मान्य केला जात असतो. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी कॉग्रेसच्या अधिकृत भूमिकेपेक्षा अधिक कोणी काही बोलू नये. आणि बोलल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा राहुलचा फ़तवा आहे म्हणे. असला फ़तवा काढण्याआधी त्यांनी थोडे आत्मपरिक्षण केले असते तर बरे झाले असते. कारण याची सुरूवात त्यांच्याच मातोश्री व भोवतालच्या कोंडाळ्याने दहा वर्षापुर्वी केली. त्यासाठी माध्यमातले भाडोत्री पत्रकार हाताशी धरले. अर्थात असल्या डावपेचांचा प्रारंभिक लाभ नक्कीच मिळत असतो. ज्याच्या विरुद्ध अशी बदनामीची मोहिम चालविली जाते, त्याचे तात्काळ खच्चीकरण होत असते. परंतू असा प्रकार अल्पकालीन असला पाहिजे. त्याचा अतिरेक झाला, मग लोकांना कंटाळा येतो आणि बदनाम व्यक्तीबद्दल सहानुभूती व कुतूहल निर्माण होते. मोदी यांच्या बाबतीत तेच झाले आहे. मात्र पहिले काही महिने अशा बदनामीने गडबडलेले मोदी नंतर सावरले आणि त्यांनी आपल्या टिकाकारांसह विरोधी अपप्रचार करणार्‍यांना शिंगावरच घेतले. त्याचे विपरित परिणाम आता कॉग्रेस पक्षालाच भोगायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मोदींवर टिका करू नये, असा लाजिरवाणा फ़तवा काढण्यापर्यंत पाळी आलेली आहे.

   २००२ च्या दंगलीनंतर दिडदोन वर्षात तो विषय आटोपला असता, तर मोदी इतके मोठे झाले नसते. अशा दंगली देशाच्या कानाकोपर्‍यात व सर्वच राज्यात आजवर झालेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून मोदींनी काही भयंकर केले किंवा गुजरातमध्ये काही अभूतपुर्व घडले; असे अजिबात नाही. पण ज्याप्रकारे एका मुख्यमंत्र्याला बारीकसारीक चुका वा घटनांसाठी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे कारस्थान राबवले गेले, ते मात्र अभूतपुर्व नक्कीच होते. ज्याअर्थी एका मुख्यमंत्र्याबाबतीत इतका गाजावाजा होतो आहे, त्याअर्थी ह्या मुख्यमंत्र्यामध्ये काही विशेष आहे; अशी मग समजूत झाली तर नवल नाही. तिथूनच मग मोदींना आपल्या विरोधकांच्या आरोप, टिका व बदनामीची खरी किंमत कळली. त्यांनी पुढल्या काळात पद्धतशीरपणे टिका व बदनामी ओढवून घेण्याचा उलटा डाव खेळायला सुरूवात केली. त्यात त्यांनी आपले विरोधक व टिकाकारांना छानपैकी वापरून घेतले. त्याचे परिणाम आता लोकसभेच्या निवडणूकीत मोदीच आव्हान म्हणून समोर आल्यावर कॉग्रेसच्या मुत्सद्यांना उमगू लागले असावेत. हे एक मोदीचे आव्हान बाजूला काढले, तर आजही इतक्या भष्टाचारानंतर कॉग्रेस पुन्हा निवडणूक जिंकू शकली असती. कारण मोदी वगळता सत्ताधारी पक्षाला शिंगावर घेऊ शकेल; असा दुसरा कोणी संपुर्ण देशात नाही. भाजपासह कुठलाही राजकीय पक्ष कॉग्रेसच्या नालायकीचा लाभ निवडणूकीत उठवू शकेल, अशी स्थिती नाही. पण कॉग्रेससह सेक्युलर पक्षांचे दुबळेपण नेमके ओळखलेला मोदी हाच एकमेव नेता कॉग्रेसला शह देऊ शकणारा आहे. पण दुर्दैव असे, की त्याला भाजपाने असा शक्तीमान वा प्रभावी नेता बनवलेला नाही, तर भाजपा विरोधकांनीच त्याला इतका मोठा नेता बनवला आहे, ज्याच्या पुढे भाजपालाही शरण जावे लागले आहे.

   २००४ पासून सलग पाच वर्षे विरोधी नेता म्हणून संसदेत काम करताना लालकृष्ण अडवाणी देशाचा सर्वात दुबळा पंतप्रधान असे मनमोहन सिंग यांना खिजवत असत. पण निवडणूकीची कसोटी लागली, तेव्हा अडवाणींचे दुबळेपण चव्हाट्यावर आले. स्वपक्षाला आक्रमक बनवून आणि कार्यकर्त्यासह मतदाराला मैदानात आणून अडवाणी कॉग्रेसला लोळवू शकले नाहीत. पण निवडणूकीला दोन वर्षे असल्यापासून दिल्लीत नसलेल्या मोदींनी मात्र कॉग्रेसला पळता भूई थोडी करून ठेवली. अडवाणी सोडाच, जेटली, स्वराज वा अन्य भाजपाच्या दिग्गज नेत्यांना जमले नाही, ते शिवधनुष्य उचलून मोदी यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांना धडकी भरावी, असे राजकारण केले. गेल्या पाच सहा वर्षात मोदी विरोधात एक शब्द बोलायची हिंमत या प्रमुख तीन नेत्यांना झालेली नाही. मात्र मोदी सर्रास त्यांना टोमणे मारत असतात. बाकीचे कॉग्रेस प्रवक्ते काय बोलतात, त्यांची मोदी दखलही घेत नाहीत. पण त्याच चलाखीतून प्रत्येक कॉग्रेस नेता, प्रवक्त्याला मोदी नामजप करायची वेळ आणली गेली आणि त्यासमोर भाजपाच्या नेतृत्वालाही शरण जावे लागले आहे. हा सगळा उद्योग, म्हणजे मोदींची कोंडी करण्यासाठी चाललेले आरोप व बदनामी पहिल्या तीनचार वर्षातच संपली असती, तर आज मोदी हे आव्हान म्हणून उभेच राहिले नसते. शिवराज चौहान, रमण सिंग, नितीशकुमार वा नविन पटनाईक यांच्याप्रमाणे मोदी हा नामवंत मुख्यमंत्रीच राहिला असता. अवघ्या देशातल्या मतदाराचे त्याच्याकडे लक्ष गेले नसते, की त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झाले नसते. व्हायचे ते होऊन गेले आणि आता फ़तवा काढून काय उपयोग? यालाच वरातीमागून घोडे म्हणतात ना? 

Friday, August 2, 2013

माझ्या सेक्युलर मुक्तीची कहाणी

हृषिकेश मुखर्जीचे बहुतेक चित्रपट मला आवडायचे. त्यातला ‘आशिर्वाद’ जास्तच. त्यात घरातल्या भांडणाला कंटाळून शहरात आलेला भणंग दिसणारा ठाकूर अशोककुमार. तो एका बागेत खांद्याला झोळी व अंगावर शाल अशा अवस्थेत बाकावर झोपलेला असतो. तिथे एक गोंडस बालिका येते. तिचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी तिला पालकांनी दिलेली सोन्याची माळ ती निरागसपणे या भणंगाला दाखवत असते. अशोककुमारला घरी सोडून आलेल्या त्याच वयातली आपली मुलीची आठवण येते. तो या बालिकेशी अगत्याने, आस्थेने बोलत असतो व तिची कौतुकाची सोनसाखळी बघत असतो. पण त्याचा तो भणंग अवतार कोणाच्याही मनात शंका निर्माण करणारा असतो. पलिकडल्या इमारतीमधून त्या बालिकेचा बाप सगळे बघत असतो. त्याला शंका येते, हा कोणी भुरटाभामटा चोर असावा. सोन्याची साखळी चोरायला बालिकेशी जवळीक करीत असावा. दोन लोक मदतीला घेऊन तो बागेत येतो; दमदाटी करून अशोककुमारला खुलाशाची संधीही न देता मारतो व बालिकेला घेऊन निघूनही जातो. बागेच्या दारात एक बाइस्कोप दाखवणारा एक खेळवाला उभा असतो. तोही सर्व काही बघत असतो. आसपासचे पादचारीही जमतात, बघतात. त्याच रस्त्यावरून जाणारा एक विमनस्क माणूस क्षणभर थबकतो आणि त्या बाईस्कोपवाल्याला विचारतो काय झाले? तो उत्तरतो, ‘कोई बच्चीका गहना चुरा रहा था.’ मग तो विचारणारा मान झटकतो आणि निघतो. जाता जाता पुटपुटतो, ‘ये गवर्मेन्ट नही चलेगी’.

कितीतरी वेळा मी तो चित्रपट बघितला असेल. आवडलाही होता. त्यातली हरिंद्रनाथ चट्टोपाध्यायने लिहिलेली‘रेलगाडी’ व ‘नाव चली’ ही अशोककुमारने गायलेली बेसुर आवाजातली गाणी बघताबघता पाठ होऊन गेली आणि त्याचेच बोट पकडून पुढे मी ‘जंबो जेट’ हे बडबडगीत लिहिले. पण प्रत्येकवेळी पाहिलेला हा बागेतला प्रसंग मला विचलीत करून जायचा. अशा किरकोळ घटनेचे खापर तो सरकारच्या माथी का फ़ोडतो? तो कोणी निनावी पादचारी किती सहजगत्या बोलून जायचा, ‘ये गवर्मेन्ट नही चलेगी’. ते निनावी नगण्य पात्र मनात घर करून राहिले होते, कितीतरी वर्षे आणि त्याचे ते वाक्य, ‘ये गवर्मेन्ट नही चलेगी’. काय सुचवायचे असेल त्या दिग्दर्शकाला त्यातून? पुढे थोडे, थोडे रहस्य उलगडत गेले. तेव्हा आम्हा इंदिरा व कॉग्रेस विरोधातल्या तमा्म समाजवादी व डाव्यांनी तीच भाषा होती. कुठलाही प्रश्न असो, कुठलीही समस्या असो. कुठलेही संकट येवो. बस्स त्या प्रत्येकासाठी इंदिरा गांधी व कॉग्रेस जबाबदार धरून आम्ही बकवास सुरू करायचो. ‘देशकी जनता करे पुकार, बदलो बदलो ये सरकार’. दिग्दर्शकाने त्याच वाचाळतेवर त्या निनावी पात्रातून भाष्य केले होते.

१९७७ सालात जनतेने खरेच सरकार बदलले. विरोधकांच्या हाती सत्ता दिली. कॉग्रेस व इंदिरा गांधींनी केलेली पापे धुवून काढण्याची संधी दिली. पण सत्ता हाती आल्यावर आमच्या डाव्या समाजवादी सेक्युलर लोकांनी कुठले कारण नसताना जनता पक्षातल्या जनसंघियांच्या विरोधात आघाडी उघडली. जनता पक्षात फ़ुट पाडली. मोरारजी देसाई सरकार पाडले. मजेची गोष्ट म्हणजे त्या जनसंघ-संघ विरोधी सेक्युलर उठावात मधू दंडवते, सदानंद वर्दे, भाई वैद्य, निहाल अहमद, आजचे कुमार सत्पर्षी इत्यादी सेक्युलर सहभागी झाले नव्हते. त्यांनी प्राणपणाने जनसंघ व संघाच्या सोबतची मैत्री कायम राखून तो जनता पक्ष टिकवण्याचा आटापिटा केलेला होता. जनता पक्षाचा विचका केला म्हणून तेव्हा उत्तर मुंबईतून मृणाल गोरेंना पराभूत करायला रविंद्र वर्मांना निवडून आणले होते. आणि मी त्या संघ विरोधी आघाडीचा समर्थक होतो. पुढल्या काळात पुर्वाश्रमीचे जनसंघिय स्वत:च बाजूला झाले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी अशी वेगळी चुल मांडली. तेवढेच नाही तर त्या भाजपाने गांधीवादी समाजवादाची कास धरली होती. म्हणूनच पुढे पार्ल्याच्या पोटनिवडणूकीत सेनेच्या हिंदूत्ववादी डॉ. रमेश प्रभूला विरोध करण्यासाठी सेक्युलर जनता पक्षिय उमेदवार प्राणलाल व्होरा यांना भाजपाने (हिंदूत्वाल पाडण्यासाठी) पाठींबा दिला होता. पण वर दिलेल्या नावातला कोणी त्यांच्या विरोधात जनता पक्ष सोडून बाहेर पडला नव्हता. खुप नंतर त्यांनीही संघविरोधी पोपटपंची सुरू केली. पाचसात वर्षे आधी जसे प्रत्येक समस्या वा पापाचे खापर इंदिरा गांधींच्या डोक्यावर फ़ोडण्याची बकवास होत असे तसे आता संघाचे व हिंदूत्वाचे टुमणे सुरू झाले.

ह्या सगळ्यात मी सुद्धा होतोच. पण माझ्या मनात तो आशिर्वाद मधला निनावी पादचारी पिंगा घालत होता. जसा तो निरर्थक वाक्य बोलून निघून जातो, त्यापेक्षा ही आमची समाजवादी सेक्युलर बकवास वेगळी होती का? कुठे काही घडो, कुठली समस्य येवो, इंदिरा दोषी; तसे आता संघ, सेना वा हिंदूत्व दोषी. जितका तो निनावी पादचारी या प्रत्येक बडबडीतून जवळ येत स्पष्ट होत गेला, तेवढा मला अशा बाष्कळ बडबडीतला फ़ोलपणा लक्षात येत गेला. मी माझ्या समाजवादीस सेक्युलर मित्रांशी हुज्जत करत गेलो. त्यांचे युक्तीवाद व मुर्खपणा त्यातून जास्तच स्पष्ट होत गेला. त्या बडबडीत व युक्तीवादात त्यांचे स्वत:चे डोके कुठेच नव्हते. विवेकबुद्धी चिकित्सक वृत्ती संपुन गेली होती. दहा वर्षापुर्वी जेवढ्या आंधळेपणाने इंदिरा विरोध बोलला जायचा; तसा आता संघ विरोध बोलला जात होता. त्यामागे काही तर्कशास्त्र नव्हते, सत्य नव्हते आणि नसेल तर बेधडक खोट्या कहाण्या सांगितल्या जात होत्या. ह्या अनुभव व जाणिवेनंतर मी पद्धतशीर त्या ‘संसर्गातून’ स्वत:ला बाजूला करून घेतले. सेक्युलर किंवा समाजवादी असणे म्हणजे कुठल्याही थराला जाऊन हिंदूत्व, संघ वा सेनेचा विरोध असे होऊन गेले. सत्य, तथ्य, बुद्धी, विवेक, चिकित्सा सर्वांना तिलांजली म्हणजे सेक्युलर असेल तर आपली बुद्धी शाबूत ठेवण्यासाठी त्यापासून दुर जाणे अगत्याचे होते. आणि जितका मी डोळसपणे तो खुळेपणा बघत व अभ्यासत गेलो, तेवढी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की संघावर किंवा शिवसेनेवर जे आरोप हे माझे सेक्युलर सहकारी करीत होते, नेमके तेच आरोप त्यांनाच जसेच्या तसे लागू होणारे होते.

आज मी जेव्हा असल्या सेक्युलर असण्याची टिंगल करतो, तेव्हा माझ्याच जुन्या खुळेपणाची कींव करीत असतो. मात्र सेक्युलर थोतांडापासून दूर जाण्यासाठी मला दुसर्‍या कुणाच्या जवळ वा वळचणीला जाण्याची गरज भासली नाही. सेक्युलर, समाजवादी वा डावे खुळचट असतील म्हणून संघ, सेना वा हिंदूत्ववादी शहाणे आहेत वा विवेकी वागतात, असा दुसर्‍या टोकाचा दावा मी अजिबात करणार नाही. तिथेही काहीअंशी तसाच एकांगीपणा आढळुन येतो. फ़रक आहे तो संघटनात्मक. हळूहळू संघाचे राष्ट्र सेवादल होत असून भाजपाचा प्रजा समाजवादी पक्ष होत चालला आहे. खरेच सेक्युलर समाजवाद्यांना संघ व भाजपाचा काटा काढायचा असेल तर त्यांनी त्या संघात व भाजपात सहभागी व्हावे, त्या दोघांचा बोर्‍या वाजलाच म्हणुन समजा. कारण निष्क्रिय वाचाळता हे समाजवादी सेक्युलर प्रवृत्तीचे उत्तम लक्षण आहे. पण तो मोठा वेगळा विषय आहे. जेव्हा समाजवादी पक्ष व चळवळ प्रत्यक्ष जनतेत मिसळून काम करणार्‍या मॄणाल गोरे, सोहनसिंग कोहली, बाबू मुंबरकर, जॉर्ज फ़र्नांडिस अशा लोकांच्या हातून निसटून पुस्तकी व उच्चभ्रू वाचाळांच्या हाती गेली, तेव्हाच तिचा र्‍हास सुरू झाला होता. तीस वर्षापुवी तिथे त्याची सुरूवात झाली. गेल्या आठदहा वर्षात त्याची लागण भाजपामध्ये झाली आहे. अलिकडे चारपाच वर्षात त्याची बाधा शिवसेनेलाही झाली आहे.

असो, तर ही अशी माझी सेक्युलर वेडपटपणातून मुक्त होण्याची कहाणी. कुठल्या विचारवंत, ज्ञानी वा परिचित नेत्याच्या प्रेरणेने नव्हे; तर आशिर्वाद चित्रपटातल्या एका नगण्य पात्राच्या कुणाच्या लक्षातही राहू नये अशा एका वाक्यातून झालेली किमया आहे. याचा अर्थ मी सेक्युलर विचाराचा त्याग केलेला नाही. तर आज ज्याला भाततात सेक्युलर म्हणतात वा भासवतात, त्याचा त्याग केलेला आहे. आणि अशा सेक्युलर लोकांनी मला जातीय, तालीबानी, हिंदूत्ववादी, जिहादी अशा शिव्या दिल्या तरी मला तो सन्मानच वाटतो. कारण त्यामुळे मी ‘त्यांच्यातला’ नाही याची हमी मिळत असते.

Monday, May 20, 2013

साबरमती ते बारामती; व्हाया हरिश्चंद्र तारामती


आदरणिय श्री. अरूण टिकेकर
संपादक दै. ‘लोकसत्ता’ यांस,

   आपल्या दैनिकाच्या १ मे आणि १५ मे १९९४च्या अंकात रविवारी ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध झालेले माधव गडकरी व शरद पवार नामे दोघांचे प्रदीर्घ लेख वाचण्यात आले. आजच्या प्रतिष्ठीतांमध्ये बोकाळलेल्या बुद्धीभ्रष्टतेला पुरेसे अनावृत्त करण्यास हे दोन्ही लेख कारणीभूत ठरावेत, ही अपेक्षा आहे. आपलीही तशीच अपेक्षा असावी. परंतू या दोन्ही लेखामध्ये कुठेतरी कारण नसताना माझ्यासारख्या सामान्य माणसाची उगाच फ़रफ़ट करण्यात आलेली आहे. त्या दोघांनी लेख लिहिताना माझा उल्लेख केल्याने हा खुलासा करणे आवश्यक वाटते. म्हणून हा पत्रप्रपंच.

   ‘साबरमती ते बारामती’ या आपल्या प्रदीर्घ लेखामध्ये माधव गडकरी यांनी माझा उल्लेख करून माझ्या तोंडी भलतेच विधान घुसडले आहे. ‘मुर्खांच्या हाती पैसा आणि बुद्धीशून्यांच्या हाती सत्ता यामुळे साबरमती ते बारामती देशाचे वाटोळे झालेय’, हेच ते विधान. वास्तविक मी म्हणजे पुण्याचा रिक्षावाला असे विधान करण्याइतका बुद्धीभ्रष्ट नाही. कारण मुर्ख व बुद्धीभ्रष्ट वेगळे नव्हे हे गडकरींना कळत नसेल. पण मला कळते. म्हणूनच मी असे विधान कशाला करीन? असे अक्कलशून्य विधान करायला आम्ही पुण्याचे रिक्षावाले शिक्षण महर्षी पतंगरावांच्या विनाअनुदान विद्यापिठात देणग्या देऊन शिकलो नाही. खेड्यात जिथे अनुदानाअभावी अर्धपोटी शिक्षक कसेबसे पोरांना शिकातात, तिथे शिकून आम्ही पोटापाण्याच्या मागे लागलो. मग आम्हाला अशी साबरमती ते बारामती वगैरे अनुप्रासाची विधाने सुचणार तरी कशी? पण त्यानंतर शरद पवारांचा लेख वाचला. तेव्हा जुळणार्‍या शब्दरचनेला अनुप्रास म्हणतात, याचे ज्ञान झाले. आणि अनुप्रास करायचा तर काय केले असते, म्हणून शब्दाशी खेळ करत गेलो, तेव्हा पुढील विधान सुचले ते असे- 

   ‘मुर्खांच्या हाती वृत्तपत्रे आणि लफ़ंग्यांच्या हाती सत्तासुत्रे आली; मग हरिश्चंद्र तारामतीचे शरश्चंद्र बारामती होतात आणि त्यांच्या पोटी रोहिदासाऐवजी मोहीदासाची हावरी संतती पैदा होते. मग सगळा देश विकून खाल्ला तरी त्या हावरट पोराची भूक संपत नाही’. 

   आता हे वाचून पवारांना पुन्हा अनुप्रास दिसेल आणि नको त्या गोष्टीची दखल घ्यावीशी वाटेल. प्रामाणिक मतभेद व्यक्त करावेसे वाटतील. त्यात त्यांचा बहुमोल वेळ उगाच खर्ची पडू नये, म्हणून या पत्रास प्रसिद्धी देऊ नये आणि दिलीच तर त्या अंकाची प्रत पवारांच्या हाती लागू नये याची काळजी घ्यावी.

   संपादक महोदय, ‘मुर्खांच्या हाती वृत्तपत्रे’ म्हटल्यावर आपल्यालाही माझा राग येणे स्वाभाविक आहे. पण शहाण्यांच्या हाती वृत्तपत्रे असती, तर लफ़ंग्यांच्या हाती सत्तासुत्रे गेली असती काय? आपण ज्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये श्रीयुत गडकरी यांचा ‘साबरमती ते बारामती’ असा मुख्यमंत्री पवारांच्या लुच्चेगिरी विषयक लेख छापला, त्याच ‘लोकरंग’मध्ये डिसेंबर (१९९३) महिन्यात पवारांचे गोडवे व गुणवत्ता गाणारा दिनेश देसाई यांचा लेख छापला होता. त्या लेखाप्रमाणे जर पवार पंतप्रधान होण्याइतके महान असते, तर आज अवघ्या चार पाच महिन्यात ते लुच्चेलफ़ंगे बनले काय, असा प्रश्न पडतो. असे दोन परस्परविरोधी लेख चारपाच महिन्याच्या अंतराने छापताना, आपले वृत्तपत्र एका टोकाहून दुसर्‍या टोकाला भरकटत जाते, एवढेही ‘तारतम्य’ ठेवले जात नाही ना? पवारांनीही आपल्या लेखात ‘तारतम्याच्या अभावाची’ आठवण करून दिली आहे. मग सांगा टिकेकरजी वृत्तपत्रे शहाण्यांच्या हाती आहेत की मुर्खांच्या हाती गेली आहेत?

   आज तुम्ही मुख्यमंत्र्याने पैसा खाल्ला, माया जमवली, भ्रष्टाचार केला, असे छापल्यावर तोच मुख्यमंत्री खुलासेवार लेख पाठवतो आणि तुमच्या ‘तारतम्याचा’ प्रश्न विचारून तुमच्या अब्रुला थेट हात घालतो, ती बेअब्रू तुम्ही छापता. हा शहाणपणाचा दाखला आहे का? आमचा बाप नेहमी आचार्य अत्रे नामक कुणा संपादकाची आठवण मोठ्या अभिमानाने सांगायचा. या अत्रे साहेबाचा ‘मराठा’ म्हणून एक पेपर होता. सगळ्या मंत्र्यासंत्र्यांना ‘मराठा’ नागडा करायचा. अत्र्यांच्या लेखणीने कोणाचे धोतर पाहिले नाही, की कोणाची लंगोटी पाहिली नाही. ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ अशा ब्रिदवाक्याने पत्रकारिता केली. त्या अत्र्यांना सगळे मंत्री वचकून असायचे. भानगड छापतो म्हणायची खोटी, भल्याभल्यांची पॅन्ट पिवळी व्हायची. एका मुख्यमंत्र्याने तर म्हणे, ‘मराठा’त आपली मोठी भानगड छापून येणार म्हणून आत्महत्याच केली होती.

   नाहीतर आजचे तुम्ही संपादक लोक. मुर्ख आणि बुद्धीशून्य यातला फ़रक तुम्हाला कळत नाही. तुम्हाला शहाणे कोणी म्हणावे? पूर्वीचे संपादक शहाणे होते म्हणून वृत्तपत्रांचा दरारा असे. सत्ताधार्‍यांना जपून कारभार करावा लागे. कारण पत्रकार हा समाजाचा पहारेकरी असतो. तो जेवढा शहाणा असतो, तेवढा चोर भित्रा असतो. पण पहारेकरीच मुर्ख बनला, मग चोर शिरजोर व्हायचाच. जेव्हा बुद्धीवादी वर्ग स्वार्थावर डोळा ठेवून बुद्धी गहाण टाकू लागतो, तेव्हा देश गहाण पडायला वेळ लागत नाही. ज्या काळात इंदिराजींच्या लांड्यालबाड्या झाकायला इथला बुद्धीवादी वर्ग झटू लागला, तिथूनच देशाची अब्रू विकायला सुरूवात झालेली होती. गडकरी जे ४७० हजार कोटी रुपयांचे कर्ज सांगतात, ते कालपरवा घेतलेले नाही. पंचवीस वर्षातल्या उधार उसनवारीचा हिशोब आहे. त्याच इंदिराजींच्या कर्तृत्वाचे गोडवे गडकरी आधी गात होते. पवारांनी गायले व निळूभाऊ खाडीलकरही गातच होते. त्याच कर्तृत्वाची किंमत आपण कर्जाचे व्याज म्हणून आपण भरत आहोत.

   बांगला देश मुक्त करून दाखवला त्याचीही किंमत याच कर्जात येते. एशियाड स्पर्धा भरवल्या, रंगीत टिव्ही आणला, बॅन्कांचे राष्ट्रीयीकरण झाले, बर्‍याच गोष्टी आहेत. सगळा प्रकार ॠण काढून सण साजरा करण्याच्याच होत्या. पण तेव्हा ज्यांनी कान पकडायचे तेच ढोल पिटत होते. आणि आता मोठे कर्जाचे आकडे दाखवून छात्या बडवित आहेत. तेव्हा त्यांनी खोट्या कर्तृत्वाचे ढोल पिटले नसते, तर आज मुर्खांच्या हाती पैसा आला असता का? हाती पैसा येणे म्हणजे विकास अशी फ़सवी व्याख्या कोणी तयार केली? भीक मागणे व भीक मिळवणे म्हणजे कमाई आणि ती भीक पदरात पडली म्हणजे विकास; अशी व्याख्या कोणी तयार केली? गडकरी आपल्या लेखात म्हणतात- 

   ‘उत्तम अर्थमंत्री हवा होता, तोही मिळाला. श्री. मनमोहन सिंग यांनी भारताला जगाच्या बाजारातील गेलेली पत पुन्हा मिळवून दिली हेही खरे आहे. परदेशी कर्जावरचे व्याज वेळेपुर्वीच दिले असे सांगितले गेले.’

   याला पत म्हणतात? घेतलेले कर्ज फ़ेडलेले नाही. व्याज भरताना तारांबळ. ती तारांबळ थांबली म्हणजे बाजारात पत आली? टिकेकर साहेब, आम्ही सुद्धा पठाण सावकाराकडून कर्ज घेतो. पण आम्हाला त्याची बाहेर वाच्यता करायचीही लाज वाटते. वेळीच व्याज दिले नाही तर सावकार दारात येतो. तेव्हा आत्महत्या करावी इतकी शरम वाटते. एकदाचे सर्व कर्ज फ़ेडतो, तेव्हाच कुठे आम्ही उजळमाथ्याने फ़िरू शकतो. त्याला आम्ही रिक्षावाले, मोलमजूरी करणारे पत म्हणतो. तेव्हा तुमच्या आणि आमच्य साबरमतीमध्येही तेवढाच फ़रक आहे. तुम्हाला कर्जावरचे व्याज वेळच्यावेळी दिले हेच कर्तृत्व आणि पत वाटते. आम्ही कर्जमुक्त होण्याला पत समजतो. तुमची साबरमती गांधीजींच्या आश्रमात किंवा त्यांच्या चष्म्यात अडकलेली आहे. तुमचे गांधीजी पुतळ्यात कुंठीत झालेले आहेत. आश्रमाला भेट दिली किवा पुतळ्याला हार घातला, की तुमचा गांधीजींशी संबंध संपतो. आमची साबरमती, आमचा गांधीजी हा विचार आहे, प्रामाणिक आचार आहे. आपण आपल्या जागी चांगले व खरे वागलो; हेच आमचे गांधीदर्शन असते. त्यात चोरीचपाटी केली मग साबरमतीची बारामती होते. शरद पवार आपल्या लेखामध्ये म्हणतात- 

   ‘साबरमती व बारामती हे सार्वजनिक जीवनातील प्रवृत्तीची दोन परस्परविरोधी टोके आहेत, असे चित्र उभे केले आहे. ते निखालस अन्याय्य आहे. गांधीजी हे शतकातून एकदाच जन्माला येणारे महामानव होते. त्यांचे निकटचे सहकारी असणार्‍या पंडित नेहरू, सरदार पटेल आदी थोर राजकीय नेत्यांनाही त्यांच्या मार्गाने जाणे जमले नाही. माझ्यासारख्या आजच्या बदलत्या परिस्थितीत काम करणार्‍या स्वातंत्र्योत्तर काळातील पिढीच्या प्रतिनिधीला ते जमणे जवळजवळ अशक्यप्रायच आहे.’

   यालाच आम्ही सामान्य माणसे दांभिकपणा म्हणतो. ढोंग म्हणतो. गांधींच्या मार्गाने जाण्यात पवारांना कुठली अडचण आहे? गांधींचा मार्ग सोपा सरळ आहे. स्वावलंबन आणि सचोटी या दोन समांतर रेषांमध्ये जेवढे अंतर आहे, तेवढ्या रुंदीमधून वाटचाल करायची. यालाच गांधीमार्ग म्हणतात ना? त्यात लांडीलबाडी, थापेबाजी यांना स्थान नाही. तसेच कर्ज मागत झोळी घेऊन फ़िरण्याची मोकळीक नाही. यात कठीण ते काय? पवारांना त्यात अशक्यप्राय वाटावे, असे आहेच काय? गांधीजींचा मार्ग म्हणजे पंचा नेसून जगणे, बकरीचे दूध पिणे, टकळी घेऊन सूत कातणे, चरखा चालवणे, पदयात्रा करणे, असा नाही. कुणी पवारांना पंचा नेसायला सांगत नाही की दांडीयात्रा करायला सांगितलेले नाही. पण गांधींसारखे खरे व सत्य बोलायला काय अडचण आहे? गांधींप्रमाणे सचोटीने जगण्यात अशक्यप्राय कोणती बाब आहे? पवार गांधीजींना महामानव बनवून आपण फ़क्त लांड्यालबाड्या करू व असत्यच बोलू; असे बजावत अहेत. त्याला हिंमत म्हणतात.

   तुम्हीच सांगा टिकेकर साहेब, आजवर कुणा माणसाची एवढी हिंमत झाली आहे काय? आपण फ़क्त खोटेच बोलू व वागू, याची जाहिर ग्वाही देण्याची हिंमत दुसरा कोणी करू शकला आहे काय? एवढ्यापायीच पवारांची बारामती म्हणजे खोटेपणा, दगाफ़टका यांची धोकेबाज गुहा अशी कुख्यात झाली आहे. आणि पवार ती बदनामी पुसायच्या नादात लेख लिहिताना सुद्धा, पुन्हा बारामतीला बदनामच करून गेलेत ना? थोडक्यात आपण धुर्त बनेल आहोत आणि सत्ता मिळवण्या टिकवण्यासाठी लफ़ंगेच रहायला हवे, प्रामाणिक होता येणार नाही; असे पवार सांगतात. तेव्हा सत्ता लफ़ंग्यांच्या हाती आहे, याची पवारच साक्ष देतात ना? गडकरी आपल्या लेखामधून स्वत:चा मुर्खपणा सिद्ध करतातच. शिवाय वृत्तपत्रीय खोटेपणाचे दाखले देतात, तेव्हा वृत्तपत्रे मुर्खांच्या हाती गेल्याचे सिद्ध होते आणि मग अशा लफ़ंगेगिरीलाच सच्चाई ठरवणेही सोपे होऊन जाते ना? पवारांनी आपल्या लेखात सर्वच आरोपांना ‘लोकापवाद’ ठरवून आपण सत्याचे पुतळे आहोत, असा आव उगाच आणला का? पण त्या लोकापवादात अनील शर्मा प्रकरणी पवारांनी मूग गिळले ते कशाला?

   असो. तर माझ्या विधानातील मुर्खांच्या हाती वृत्तपत्रे आणि लफ़ंग्यांच्या हाती सत्तासुत्रे गेली, याचा अर्थ एवढ्याने स्पष्ट व्हावा. आता वळू या हरिश्चंद्र तारामती या गोष्टीकडे. राजा हरिश्चंद्र म्हणे सत्यवचनी होता. स्वप्नात राज्याचे दान दिल्याचे वचन त्याने जागेपणी पुर्ण केल्याची कहाणी खुप प्रसिद्ध आहे. कुणा साधूला स्वप्नात दिलेला शब्द पाळण्यासाठी हरिश्चंद्राने स्वत:चा लिलाव  करून राज्यावर पाणी सोडले, हलाखीचे जीवन पत्करले, अशी ती पुराणकथा आहे म्हणे. तुलनाच करून बघा. आजच्या बारामतीचा राजा शरश्चंद्र जागेपणी दिलेला शब्द स्वप्नात तरी पाळतो का? मुख्यमंत्री होताना गॅंगवॉरचा बंदोबस्त करतो असे पवार म्हणाले होते. कोणता बंदोबस्त केला? उलट आता गुन्हेगारी आणि गॅंगवॉर अस्तित्वातच नाही, असा विश्वामित्री पवित्राच शरश्चंद्र बारामती घेत नाहीत काय? ‘लोकसत्ता’च्या लोकरंग पुरवणीत ‘लोकापवादाला खतपाणी कशाला’ अशा शिर्षकाच्या लेखात ते काय लिहितात?

   ‘गेल्या शनिवारी खटाव मिलचे प्रमुख सुनित खटाव यांची भर दुपारी रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती अजून शहरात वावरत आहेत व आता कामगार चळवळीत त्या प्रवेश करू पहात आहेत, हे प्रकर्षाने दिसून येते.’

   इथे अजूनही या शब्दाचे प्रयोजन काय? पवारांनी मुख्यमंत्री झाल्यापासून असा कोणता बंदोबस्त केला होता, की मुंबईत गुन्हेगारी प्रकर्षाने दिसेनाशी झाली होती? तान्या कोळीचा खुन झालाच. अश्विन नाईकवर हल्ला झालाच. खंडण्या उकळण्याचे उद्योग नियमित चालू असल्याचे पोलिसच सांगतात. त्यासाठी अनेकांना टाडा लावतात. हे पोलिस पवारांच्याच हाती असलेल्या गृहखात्याचे बंदे सेवक आहेत ना? मग पोलिसांना दिसणारा दहशतवाद, गुन्हेगारी, गुंडगिरी पवारांना प्रकर्षाने दिसत नव्हती ती कशाला?

   हा हरिश्चंद्र आणि शरश्चंद्र यांच्यातला फ़रक आहे टिकेकर साहेब. ‘तारतम्य’ लिहिताना असे फ़रक लक्षात घेत चला जरा. मग पवारांच्या लेखातील असे ‘अजूनही’ रहाणारे शब्द प्रकर्षाने संपादकीय कैचीत सापडतील. ‘लोकसत्ता’च्या संपादकाला थेट ‘तारतम्य’ शिकवायचा आगावूपणा पवार आपल्या लेखात करतात, तेव्हा स्वत: किती तारतम्य राखत असतात? ‘अजूनही गुन्हेगारी दिसते’ म्हणतात हा धादांत खोटारडेपणा झाला. कारण त्यांचेच निकटवर्तिय व कालपर्यंतचे गृहराज्यमंत्री अरूण मेहता यांनीच राष्ट्रीय मिल मजदूर संघ प्रकरणी चाललेल्या गुंडगिरीसाठी गळा काढला होता. पवारांना होणारी गुन्हेगारी दिसत नसेल, तर निदान मेहतांचा आक्रोश तरी ऐकू यायला हवा ना? पण नाही ऐकू आला. त्यालाच शरश्चंद्र बारामती म्हणतात. सरळ कानावर हात ठेवून मोकळे होणे. आपण त्या गावचेच नाही, असे भासवून काढता पाय घेणे, म्हणजेच शरश्चंद्र बारामती.

   त्या पुराणकथेतील हरिश्चंद्र तारामतीला एक पुत्र होता. आपल्या पित्याचे राज्य गेल्यावर आलेल्या हलाखीच्या जीवनात तोही अर्धपोटी जगू लागला. त्याने शब्द पाळणार्‍या बापाला नालायक ठरवले नाही. एके दिवशी खायला अर्धीच भाकर राहिली; म्हणून मायबापांनी उपाशी राहुन आपला पुत्र रोहिदासाला ती अर्धी भाकर वाढली. तेव्हा तो पोर सुद्धा भूक मारून उपाशी झोपला. त्याची बोधप्रद कथा आचार्य धर्माधिकारी यांनी लिहून ठेवली आहे. आईबापांच्या भुकेतही सुख शोधणारा पुत्र हरिश्चंद्र तारामतीच्या पोटी जन्मला होता. शरश्चंद्र बारामतीला अशी संतती लाभली का? लाभेल का? काका आमदार, पुतण्या खासदार, पुतण्या आमदार तर काका खासदार; असाच खेळ चालला आहे ना? कुठे संपणार आहे त्यांची सत्तेची भूक? सत्तेत काय कमी झाले त्यांना? शरदरावांना काय कमी पडले, की अजितदादांची कुठली उपासमार झाली? तरीही भुक संपली आहे का? यालाच मोहीदास म्हणतात. मोह न संपणारा तो मोहीदास. ज्याची भूक सगळे जग गिळून झाले, तरी संपत नाही. पवारांची सगळी पिलावळ अशीच हावरी झालीय. मग कुणाचे नाव कलमाडी असेल, कुणाला पद्मसिंह म्हणत असतील. पण उपज तीच मोहीदासाची. विधीनिषेधशून्य हावरटाची.

   मात्र तरीही दोष त्यांचा नाही टिकेकर साहेब, आरोपी ते नाहीतच. त्यांना मोकाट होऊ देणारे खरे गुन्हेगार आहेत. ज्यांनी त्यांना वेळच्यावेळी रोखायचे होते, तेच त्यांच्याशी चांगले सोयरसंबंध जुळवत बसले, मग चोरांनी शिरजोर व्हायचे नाही तर काय? आज गडकरींना साबरमती व बारामतीमधला फ़रक दिसू लागला, कारण त्यांचे पवारांशी संबंध चांगले नाहीत. म्हणजे संबंध कसे आहेत वा असतात; त्यावर गडकरी वा इतरांची लेखणी निर्भीड होत असते. अलिकडे ‘नवाकाळ’चे निळूभाऊ खाडीलकर यांच्या निर्भिडतेचा घोडा खुप उधळला आहे. गडकरी तरी चौफ़ेर लिहायचे. निळूभाऊ चक्क चौखुर उधळलेत. पवारांच्या गृहमंत्र्यावरच ‘गॅंगवॉरची पाळेमुळे’ असल्याचा बिनपुराव्याचा आरोप निळूभाऊ करणार. मात्र खैरनारांनी पवारांवर आरोप केला, तर तेच निळूभाऊ त्यांच्याकडे पवारांच्या विरोधातले पुरावे मागणार. त्यांना फ़ैलावर घेणार. पवारांची बदनामी म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राची बेइज्जत, म्हणून ‘नवाकाळ’ गळा काढणार. कशाला कुठले तारतम्य शिल्लक राहिले आहे? अशा़च प्रकारच्या प्रतिष्ठीतांची संख्या समाजात वाढते आहे. पण एकूण समाजाची प्रतिष्ठा मात्र दिवसेदिवस खालावत चालली आहे. कदाचित जागतिक बॅन्क आणि नाणेनिधीकडून उद्या अब्रू देखील कर्जावू आणावी लागेल, इतकी प्रतिष्ठा संपत आलेली आहे. पवार आणि गडकरी अब्रू व प्रतिष्ठेऐवजी विश्वासार्हता असा बनावट शब्द वापरतात इतकेच. आमच्या साध्या शब्दात कुणालाच लाज उरलेली नाही.

   माफ़ करा टिकेकर साहेब, आजच्या या प्रतिष्ठीतांकडे पाहिले, बुद्धीमत्तेच्या कसरतीकडे पाहिले, मग आम्ही सामान्य पोटार्थी व अडाणी राहिलो; याचीच धन्यता वाटते. शिकून विद्वान झालो असतो, तर न जाणो आम्हीही रिक्षा चालवण्याऐवजी असेच बेशरम शाब्दिक कसरती, चलाख्या आणि लबाड्या करून स्वत:च्या पापाला पुण्यकर्म ठरवित गेलो असतो. दुसर्‍यांच्या पापाला पुण्यकर्माचे लेबल लावायचे महापाप करीत राहिलो असतो. मुर्खांच्या हाती पैसा आणि अक्कलशून्यांच्या हाती सत्ता गेल्याने काही बिघडत नाही. पण जेव्हा त्या निर्बुद्धांना बुद्धीमान व चतूर ठरवणारे निर्माण होतात. तेव्हाचा वाटोळे होत असते. बुद्धीमान असतात तेच भाट, चमचे व लाळघोटे झाले मग मात्र विनाशाला पर्याय उरत नाही.

   मुर्खाच्या हाती पैसा आला तर तो उधळून टाकतो. बुद्धीशून्याचा हाती सत्ता आली तर तो ती सत्ता गमावतो. पण  शहाणपणा-मुर्खपणा, सत्य-असत्य, चांगले-वाईट, पाप-पुण्य यात फ़रक करण्याचा जो निकष असतो, त्यात दोष वा खोट असणे; ही विनाशाची हमी असते. कारण हा निकष खोट्याला खर्‍याचे प्रमाणपत्र देण्याचा धोका असतो. निकष हा मानवी श्रद्धा, समजुती, निष्ठा यांचा प्रमुख आधार असतो. तोच निकष खोटा बनला; मग समाजाचा मूलाधारच डळमळू लागतो. संपुर्ण समाज व राष्ट्रच दोलायमान होऊन जाते. साबरमती ते बारामती नव्हेतर काश्मिर ते कन्याकुमारी. असेतू हिमाचल राष्ट्रच कोसळू लागते. आपण तेच घडताना पहात आहोत. पवारांना ‘अजुनही’ तेवढेच ‘प्रकर्षाने’ दिसत नाही. गडकरींच्या दृष्टीक्षेपात येत नाही. तुमच्या ‘तारतम्यात’ बसत नाही. निळूभाऊंची अवस्था इतकी तरल आहे, की वितभर उंचीवरून त्यांचा रथ धावतोय. आधार सुटल्याचे भानही एवढ्यात त्यांना येणार नाही. आम्ही सामान्य मातीची बनलेली माणसे. साध्या भूकंपाने आमची घरे ढासळतात. तेव्हा समाज, देश, राष्ट्र डळमळू लागले हे आम्हालाच आधी कळणार ना? तुम्हा बड्यांना ते इतक्या लौकर कसे कळेल?

   तुम्ही विचारात गढलेली माणसं. विचारांनी प्रवृत्त होणारी, विचारांनी अनावृत्त होणारी, विचारातून निवृत्त होणारी, म्हणूनच अविचारालाही प्रवृत्त होणारी. आम्ही विचारच करत नाही; तर अविचाराला तरी सवड कुठली मिळायची? पोटात एक बावीस फ़ूट लांबीचं आतडं असतं. तेवढा बावीस फ़ुटाचा पल्ला गाठून रोजच भूक भागवण्यातच आमचं आयुष्य संपून जातं. तुमच्यासारखे अतीदूर पल्ल्याचे विचारही आमच्या डोक्यात येऊ शकत नाहीत. ते आम्हाला परवडणार नाहीत. कारण पोटाची भूक हे आमचं सत्य आहे. इतर सत्यशोधन आमच्या आवाक्यातल्या गोष्ट नाही. त्यामुळे आम्ही समोर दिसणार्‍या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पवार साहेब आमच्या त्या विश्वासालाच लोकापवाद म्हणतात.

   मग तुम्हीच सांगा टिकेकर साहेब, पवारांवर मतदानातून सामान्य जनतेने व्यक्त केलेला विश्वासही लोकापवाद नाही काय? त्या मतदाराने तरी कुठे पवारांचा प्रत्येक शब्द खराखोटा तपासून पाहिला होता? आज पवारांच्या पाठीशी विधानसभेत बहूमत आहे, म्हणजेच जनतेचा त्यांना पाठींबा आहे, हा सुद्धा एकप्रकारे लोकापवादच नाही काय? मतदानाला चार वर्षे उलटून गेली. पवारांनी कधी व कितीदा तो जनतेचा विश्वास खरा की खोटा, ते तपासून पाहिले आहे? कितीसे सत्यशोधन केले आहे? टिकेकर साहेब तुम्ही तरी किती सत्यशोधन केलेत? पवारांचा लेख छापण्यापुर्वी त्यात सत्य किती नि तथ्य किती याचा शोध घेतला का? पवारांनी लिहिला नि तुम्ही छापलात. पवारांच्याच भाषेत सांगायचे, तर गडकरींचा लेख छापून तुम्ही ‘लोकापवादाला खतपाणी’ घातलेत. तसेच पवारांनी लिहिलेल्या लेखाला प्रसिद्धी देऊन पुन्हा दुसर्‍या लोकापवादालाच खतपाणी घातलेत ना?

   कोण कोणाला जेवू घालतो, कोणाच्या दारी पंगती उठतात, कोण बोकड कापून खाऊ घालतो, त्याची उठाठेव गडकरींनी केली आहे. अशी तक्रार करताना पवार म्हणतात, कोणी कोणाला कोठे भोजन दिले, ही बाब गौण मानावी. म्हणजे खाण्याचा बोभाटा नको. खर्‍याखुर्‍या खाण्याची चर्चा नको. नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात अधिक बोला(ई)चे मटन हवे आहे. लोकांनी त्यावरच आपली भूक भागवावी अशी अपेक्षा दिसते. मुळात हा सगळा उद्योग हवाच कशाला होता? गडकरींनी असला लेख लिहिण्यापेक्षा शरद पवारांशी चांगले नसलेले संबंध, चांगले बनवण्याचा प्रयास केला असता; तर ही बोलाची पंगत वाढलीच गेली नसती. आणि आमच्यासारख्या सामान्य रिक्षावाल्याला बोलाचे उपाशी ढेकर देण्याची वेळही आली नसती. कदाचित लेख छापून आल्यावर त्यांचे बिघडलेले संबंध सुधारतील व पंगती रंगतदार होतीलही. मग आम्ही कोरडे ढेकर द्यायचे आणि तुम्ही रहाणार कोरडे पाषाण.

   शेवटी एकच विनंती टिकेकर साहेब, तुम्ही वा गडकरी त्या पवारांचे गोडवे गा किंवा पोटभर निंदानालस्ती करा. आम्हा पुण्याच्या वा इतरत्रच्या रिक्षावाल्यांना त्यात अकारण ओढू नका. आमच्या तोंडी भलतीसलती विधान घुसडू नका, कोणी घुसडली तर निदान छापू नका. खुप खुप उपकार होतील गरीबांवर तुमचे.

आपला नम्र

पुण्याचा रिक्षावाला

(पूर्वपर्सिद्धी जुन १९९४)