Friday, August 2, 2013

माझ्या सेक्युलर मुक्तीची कहाणी

हृषिकेश मुखर्जीचे बहुतेक चित्रपट मला आवडायचे. त्यातला ‘आशिर्वाद’ जास्तच. त्यात घरातल्या भांडणाला कंटाळून शहरात आलेला भणंग दिसणारा ठाकूर अशोककुमार. तो एका बागेत खांद्याला झोळी व अंगावर शाल अशा अवस्थेत बाकावर झोपलेला असतो. तिथे एक गोंडस बालिका येते. तिचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी तिला पालकांनी दिलेली सोन्याची माळ ती निरागसपणे या भणंगाला दाखवत असते. अशोककुमारला घरी सोडून आलेल्या त्याच वयातली आपली मुलीची आठवण येते. तो या बालिकेशी अगत्याने, आस्थेने बोलत असतो व तिची कौतुकाची सोनसाखळी बघत असतो. पण त्याचा तो भणंग अवतार कोणाच्याही मनात शंका निर्माण करणारा असतो. पलिकडल्या इमारतीमधून त्या बालिकेचा बाप सगळे बघत असतो. त्याला शंका येते, हा कोणी भुरटाभामटा चोर असावा. सोन्याची साखळी चोरायला बालिकेशी जवळीक करीत असावा. दोन लोक मदतीला घेऊन तो बागेत येतो; दमदाटी करून अशोककुमारला खुलाशाची संधीही न देता मारतो व बालिकेला घेऊन निघूनही जातो. बागेच्या दारात एक बाइस्कोप दाखवणारा एक खेळवाला उभा असतो. तोही सर्व काही बघत असतो. आसपासचे पादचारीही जमतात, बघतात. त्याच रस्त्यावरून जाणारा एक विमनस्क माणूस क्षणभर थबकतो आणि त्या बाईस्कोपवाल्याला विचारतो काय झाले? तो उत्तरतो, ‘कोई बच्चीका गहना चुरा रहा था.’ मग तो विचारणारा मान झटकतो आणि निघतो. जाता जाता पुटपुटतो, ‘ये गवर्मेन्ट नही चलेगी’.

कितीतरी वेळा मी तो चित्रपट बघितला असेल. आवडलाही होता. त्यातली हरिंद्रनाथ चट्टोपाध्यायने लिहिलेली‘रेलगाडी’ व ‘नाव चली’ ही अशोककुमारने गायलेली बेसुर आवाजातली गाणी बघताबघता पाठ होऊन गेली आणि त्याचेच बोट पकडून पुढे मी ‘जंबो जेट’ हे बडबडगीत लिहिले. पण प्रत्येकवेळी पाहिलेला हा बागेतला प्रसंग मला विचलीत करून जायचा. अशा किरकोळ घटनेचे खापर तो सरकारच्या माथी का फ़ोडतो? तो कोणी निनावी पादचारी किती सहजगत्या बोलून जायचा, ‘ये गवर्मेन्ट नही चलेगी’. ते निनावी नगण्य पात्र मनात घर करून राहिले होते, कितीतरी वर्षे आणि त्याचे ते वाक्य, ‘ये गवर्मेन्ट नही चलेगी’. काय सुचवायचे असेल त्या दिग्दर्शकाला त्यातून? पुढे थोडे, थोडे रहस्य उलगडत गेले. तेव्हा आम्हा इंदिरा व कॉग्रेस विरोधातल्या तमा्म समाजवादी व डाव्यांनी तीच भाषा होती. कुठलाही प्रश्न असो, कुठलीही समस्या असो. कुठलेही संकट येवो. बस्स त्या प्रत्येकासाठी इंदिरा गांधी व कॉग्रेस जबाबदार धरून आम्ही बकवास सुरू करायचो. ‘देशकी जनता करे पुकार, बदलो बदलो ये सरकार’. दिग्दर्शकाने त्याच वाचाळतेवर त्या निनावी पात्रातून भाष्य केले होते.

१९७७ सालात जनतेने खरेच सरकार बदलले. विरोधकांच्या हाती सत्ता दिली. कॉग्रेस व इंदिरा गांधींनी केलेली पापे धुवून काढण्याची संधी दिली. पण सत्ता हाती आल्यावर आमच्या डाव्या समाजवादी सेक्युलर लोकांनी कुठले कारण नसताना जनता पक्षातल्या जनसंघियांच्या विरोधात आघाडी उघडली. जनता पक्षात फ़ुट पाडली. मोरारजी देसाई सरकार पाडले. मजेची गोष्ट म्हणजे त्या जनसंघ-संघ विरोधी सेक्युलर उठावात मधू दंडवते, सदानंद वर्दे, भाई वैद्य, निहाल अहमद, आजचे कुमार सत्पर्षी इत्यादी सेक्युलर सहभागी झाले नव्हते. त्यांनी प्राणपणाने जनसंघ व संघाच्या सोबतची मैत्री कायम राखून तो जनता पक्ष टिकवण्याचा आटापिटा केलेला होता. जनता पक्षाचा विचका केला म्हणून तेव्हा उत्तर मुंबईतून मृणाल गोरेंना पराभूत करायला रविंद्र वर्मांना निवडून आणले होते. आणि मी त्या संघ विरोधी आघाडीचा समर्थक होतो. पुढल्या काळात पुर्वाश्रमीचे जनसंघिय स्वत:च बाजूला झाले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी अशी वेगळी चुल मांडली. तेवढेच नाही तर त्या भाजपाने गांधीवादी समाजवादाची कास धरली होती. म्हणूनच पुढे पार्ल्याच्या पोटनिवडणूकीत सेनेच्या हिंदूत्ववादी डॉ. रमेश प्रभूला विरोध करण्यासाठी सेक्युलर जनता पक्षिय उमेदवार प्राणलाल व्होरा यांना भाजपाने (हिंदूत्वाल पाडण्यासाठी) पाठींबा दिला होता. पण वर दिलेल्या नावातला कोणी त्यांच्या विरोधात जनता पक्ष सोडून बाहेर पडला नव्हता. खुप नंतर त्यांनीही संघविरोधी पोपटपंची सुरू केली. पाचसात वर्षे आधी जसे प्रत्येक समस्या वा पापाचे खापर इंदिरा गांधींच्या डोक्यावर फ़ोडण्याची बकवास होत असे तसे आता संघाचे व हिंदूत्वाचे टुमणे सुरू झाले.

ह्या सगळ्यात मी सुद्धा होतोच. पण माझ्या मनात तो आशिर्वाद मधला निनावी पादचारी पिंगा घालत होता. जसा तो निरर्थक वाक्य बोलून निघून जातो, त्यापेक्षा ही आमची समाजवादी सेक्युलर बकवास वेगळी होती का? कुठे काही घडो, कुठली समस्य येवो, इंदिरा दोषी; तसे आता संघ, सेना वा हिंदूत्व दोषी. जितका तो निनावी पादचारी या प्रत्येक बडबडीतून जवळ येत स्पष्ट होत गेला, तेवढा मला अशा बाष्कळ बडबडीतला फ़ोलपणा लक्षात येत गेला. मी माझ्या समाजवादीस सेक्युलर मित्रांशी हुज्जत करत गेलो. त्यांचे युक्तीवाद व मुर्खपणा त्यातून जास्तच स्पष्ट होत गेला. त्या बडबडीत व युक्तीवादात त्यांचे स्वत:चे डोके कुठेच नव्हते. विवेकबुद्धी चिकित्सक वृत्ती संपुन गेली होती. दहा वर्षापुर्वी जेवढ्या आंधळेपणाने इंदिरा विरोध बोलला जायचा; तसा आता संघ विरोध बोलला जात होता. त्यामागे काही तर्कशास्त्र नव्हते, सत्य नव्हते आणि नसेल तर बेधडक खोट्या कहाण्या सांगितल्या जात होत्या. ह्या अनुभव व जाणिवेनंतर मी पद्धतशीर त्या ‘संसर्गातून’ स्वत:ला बाजूला करून घेतले. सेक्युलर किंवा समाजवादी असणे म्हणजे कुठल्याही थराला जाऊन हिंदूत्व, संघ वा सेनेचा विरोध असे होऊन गेले. सत्य, तथ्य, बुद्धी, विवेक, चिकित्सा सर्वांना तिलांजली म्हणजे सेक्युलर असेल तर आपली बुद्धी शाबूत ठेवण्यासाठी त्यापासून दुर जाणे अगत्याचे होते. आणि जितका मी डोळसपणे तो खुळेपणा बघत व अभ्यासत गेलो, तेवढी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की संघावर किंवा शिवसेनेवर जे आरोप हे माझे सेक्युलर सहकारी करीत होते, नेमके तेच आरोप त्यांनाच जसेच्या तसे लागू होणारे होते.

आज मी जेव्हा असल्या सेक्युलर असण्याची टिंगल करतो, तेव्हा माझ्याच जुन्या खुळेपणाची कींव करीत असतो. मात्र सेक्युलर थोतांडापासून दूर जाण्यासाठी मला दुसर्‍या कुणाच्या जवळ वा वळचणीला जाण्याची गरज भासली नाही. सेक्युलर, समाजवादी वा डावे खुळचट असतील म्हणून संघ, सेना वा हिंदूत्ववादी शहाणे आहेत वा विवेकी वागतात, असा दुसर्‍या टोकाचा दावा मी अजिबात करणार नाही. तिथेही काहीअंशी तसाच एकांगीपणा आढळुन येतो. फ़रक आहे तो संघटनात्मक. हळूहळू संघाचे राष्ट्र सेवादल होत असून भाजपाचा प्रजा समाजवादी पक्ष होत चालला आहे. खरेच सेक्युलर समाजवाद्यांना संघ व भाजपाचा काटा काढायचा असेल तर त्यांनी त्या संघात व भाजपात सहभागी व्हावे, त्या दोघांचा बोर्‍या वाजलाच म्हणुन समजा. कारण निष्क्रिय वाचाळता हे समाजवादी सेक्युलर प्रवृत्तीचे उत्तम लक्षण आहे. पण तो मोठा वेगळा विषय आहे. जेव्हा समाजवादी पक्ष व चळवळ प्रत्यक्ष जनतेत मिसळून काम करणार्‍या मॄणाल गोरे, सोहनसिंग कोहली, बाबू मुंबरकर, जॉर्ज फ़र्नांडिस अशा लोकांच्या हातून निसटून पुस्तकी व उच्चभ्रू वाचाळांच्या हाती गेली, तेव्हाच तिचा र्‍हास सुरू झाला होता. तीस वर्षापुवी तिथे त्याची सुरूवात झाली. गेल्या आठदहा वर्षात त्याची लागण भाजपामध्ये झाली आहे. अलिकडे चारपाच वर्षात त्याची बाधा शिवसेनेलाही झाली आहे.

असो, तर ही अशी माझी सेक्युलर वेडपटपणातून मुक्त होण्याची कहाणी. कुठल्या विचारवंत, ज्ञानी वा परिचित नेत्याच्या प्रेरणेने नव्हे; तर आशिर्वाद चित्रपटातल्या एका नगण्य पात्राच्या कुणाच्या लक्षातही राहू नये अशा एका वाक्यातून झालेली किमया आहे. याचा अर्थ मी सेक्युलर विचाराचा त्याग केलेला नाही. तर आज ज्याला भाततात सेक्युलर म्हणतात वा भासवतात, त्याचा त्याग केलेला आहे. आणि अशा सेक्युलर लोकांनी मला जातीय, तालीबानी, हिंदूत्ववादी, जिहादी अशा शिव्या दिल्या तरी मला तो सन्मानच वाटतो. कारण त्यामुळे मी ‘त्यांच्यातला’ नाही याची हमी मिळत असते.

3 comments:

  1. भाऊ,

    तुम्ही सेक्युलर विचाराचा त्याग केला नाही असं म्हणता. पण 'सेक्युलर विचार' म्हणजे नक्की काय? आणि तो का अंगिकारावा? याबद्दल आपण काही चिंतन केले असेलंच. वाचायला आवडेल.

    भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकात भारताचा सेक्युलर सोशालिस्ट डेमोक्रॅटिक रिपब्लिक असा उल्लेख असला तरी कुठल्याही कलमात हा शब्द नाही. त्यामुळे सेक्युलर या शब्दाबद्दल अधिक चर्चा होणे अपेक्षित आहे. अशी चर्चा सेक्युलॅरिझमचे ढोल बडवणार्‍या आपल्या माध्यमपंडितांनी कधी केल्याचं ऐकिवात नाही.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  2. Feeling Happy ! आपण त्या समाजवादी सेक्युलर विचारातून बाहेर पडलात. नाहीतर आम्ही एका चांगल्या राजकीय विश्लेशकाला मुकलो असतो.

    ReplyDelete