उत्तर प्रदेशच्या सनदी अधिकारी दुर्गालक्ष्मी नागपाल यांना खोटी कारणे दाखवून वाळू माफ़ियांच्या दबावाखाली निलंबीत केले गेले. याबद्दल गेला आठवडाभर आता कोणाच्याच मनात शंका राहिलेली नाही. इतकेच नव्हेतर आपल्या पापावर पांघरूण घालतानाही राजकीय लाभ उठवण्यासाठी समाजवादी पक्षाचे तरूण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या तरूण अधिकार्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अत्यंत घातक आरोपही केला. त्यातून त्यांना वाळू माफ़ियांचे आपण समर्थक असल्याचे लपवायचे होतेच. पण त्याच्याही पलिकडे जाऊन बेकायदा मशीद पाडणार्या अधिकार्याला आपण तडकाफ़डकी बरखास्त केले; असे भासवून मुस्लिम मतांची बेगमी करायची होती. मात्र आता त्यांचे दोन्ही डाव उघडे पडले आहेत आणि अपेक्षेपेक्षा मोठीच देशव्यापी प्रतिक्रिया उमटलेली आहे. पण अशा पेचातून निसटायचे तर राजकारण्यांना तोंड लपवायला जागाही लागते. ती सापडत नसल्याने मुलायम व त्यांच्या पुत्राची अधिकच राजकीय कोंडी झाली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री उत्तरप्रदेश व बिहारमध्ये आगामी लोकसभेसाठी आपली ताकद लावणार या बातम्यांनी मुस्लिम मतांवर विसंबून राजकारण करणार्यांची तारांबळ उडाली आहे. त्यातूनच हा असा मुर्खपणा झालेला आहे. मोदींची जोर लावला तर प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम मते कॉग्रेसकडे झुकतील; या भयाने आपण मुस्लिमांचे एकमेव पक्षपाती असल्याचे भासवण्याची ही वेडगळ शर्यत सुरू झाली आहे. त्यामुळेच मशीद पाडण्याच्या कंड्या दुर्गाशक्तीच्या विरोधात पिकवून वाळू माफ़ियांना वाचवताना राजकारणही खेळण्याचा उद्योग करण्यात आला. पण आता तो उलटला आहे. कारण मशीद पाडण्यात संबंधित अधिकारी नसल्याचे उघडकीस आले आहे.
खरे तर मूळ कारवाईच बेकायदा होती. पण संसदेत मुलायमच्या समाजवादी पक्षाचा बहूमतासाठी पाठींबा आवश्यक असल्याने कॉग्रेसचे नेते व संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी त्या निलंबन प्रकरणात हस्तक्षेप करण्यास साफ़ नकार दिला होता. म्हणजेच कॉग्रेसने सरळसरळ हात झटकले होते. पण हे प्रकरण गाजू लागल्यावर त्यात हात धुवून घेण्याचा मोह सोनियांनाही आवरला नाही. त्यांनी सहा दिवस उलटल्यावर पंतप्रधानांना पत्र लिहून प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकार्यांना संरक्षण मिळायला हवे; असा मानभावीपणा केला. खरे तर अशा साळसूद भाषेत पत्र लिहिण्याची अजिबात गरज नव्हती. पंतप्रधानांना सोनिया थेट फ़ोन करून तसे सांगू शकत होत्या. पण त्याऐवजी त्यांनी भलेथोरले पत्र लिहून त्याच्या प्रति माध्यमांकडे पाठवून दिल्या. तिथेच त्यांचा मतलब उघड झाला. त्यांना कर्तव्यदक्ष अधिकार्याला संरक्षण देण्याची इच्छा नसून राजकीय लाभ उठवायचा होता. कारण दुर्गालक्ष्मी प्रकरणी उठलेले मोहोळ त्यांनी बघितले असेल; तर त्यात बहुतेक वाहिन्यांवर अशोक खेमका नावाच्या अन्य पिडीत अधिकार्यानेही हजेरी लावली होती. आणि त्या खेमकावर अन्याय झाला त्याचे कारण सोनियांचा लाडका जावई रॉबर्ट वाड्रा याचेच पाप होते. कमी किंमतीत व अनधिकृत जमीनी खरेदी करून, मग सरकारी कागदपत्रात हेराफ़ेरी करून, त्याच जमीनी अनेकपटीने पुन्हा व्यापारी कंपन्यांना विकण्याचा या जावयाचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला म्हणून खेमका या अधिकार्याची तडकाफ़डकी बदली करण्यात आली होती. तेव्हा दुर्गालक्ष्मी प्रकरणात तोंड उघडले, तर आपल्यावर खेमका प्रकरण शेकणार; याचेही भान सोनियांनी ठेवायला हवे होते. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी ना?
इथे नॉयडामध्ये तरी सामान्य माफ़ीया वाळू उपसा चालतो आणि कायद्याचा बडगा दाखवल्यावर त्यांनी पळ काढला होता. पण वाड्रा प्रकरण चव्हाट्यावर आणले म्हणून खेमका यांना तातडीने उचलून दुर फ़ेकण्यात आले. इतकेच नव्हेतर त्यांनी मारलेले ताशेरे फ़िरवून जावयाच्या पापावर पांघरूण घातले गेले होते. तेव्हा सेक्युलर पापधर्माला जपून मुलायम वा अन्य कुणा सेक्युलर पक्षाने त्यावर मल्लीनाथी केली नव्हती. त्यामुळेच सोनियांनीही आपल्या मित्रपक्ष समाजवाद्यांच्या पापावर बोलण्याचा मानभावीपणा करायला नको होता. पण त्यांना तो मोह आवरता आला नाही आणि समाजवादी पक्षानेही मग खेमका यांच्यासाठीही सोनियांनी पंतप्रधानांना पत्र लिहावे; असे सुचवून कॉग्रेसच्या अब्रूची लक्तरेच काढली आहेत. अर्थात अब्रुच्या गोष्टी अब्रुदारांसाठी असतात. सत्तेत राहून मनमानी करणार्यांना अब्रूची चैन करता येत नसते. त्यामुळेच आता हे दोन्ही सेक्युलर पक्ष एकमेकांचे कपडे फ़ाडण्यात धन्यता मानतील. खरे तर दुर्गा प्रकरणात मुलायम व त्यांच्या पुत्राने वाळू माफ़ियांना वाचवण्यासाठी या अधिकार्याची नुसती बदली केली; तरी थोडा गाजावाजा होऊन खेमकाप्रमाणे याही प्रकरणावर पडदा पडला असता. पण मुस्लिम मतांच्या हव्यासापायी मशीदीची भिंत पाडल्याचा कांगावा झाला तो आता त्यांना महागात पडायची वेळ आलेली आहे. त्यातून ही तमाम सेक्युलर व मुस्लिम मतांसाठी अगतिक झालेली राजकीय मंडळी मोदींच्या आव्हानाने किती गर्भगळीत झालीत; त्याचेच प्रदर्शन घडवत आहेत. ते जितक्या चुका व आगावूपणा करीत जातील; तितका मोदींना लाभ मिळणार आहे. सहाजिकच असला पोरकटपणा सोडून सेक्युलर लोकांनी थेट मोदींसमोर खरे राजकीय आव्हान उभे केल्यास, त्यांना मोदींशी चांगले दोन हात करता येतील.
छान
ReplyDelete