Sunday, July 7, 2019

तमाशाचे (कर)नाटक

 Image result for karnatak crisis

लोकसभा निवडणूकीच्या निकालांना महिना उलटत असताना दोन राज्यातील बड्या नेत्यांना पदयात्रेचे वेध लागलेले आहेत. त्यात एक आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आहेत, तर दुसरे माजी पंतप्रधान देवेगौडा आहेत. यापैकी चंद्राबाबूंना राज्यात जनता असते आणि तिच्याच मतावर निवडून यावे लागते. अन्य प्रांतातल्या पक्षनेत्यांचे शाली घालून सत्कार केल्याने सत्ता मिळत नसते असा नवा साक्षात्कार झालेला आहे. तर देवेगौडांना आपल्या लडक्या पुत्राचे सिंहासन डळमळीत झाल्यानेच पदयात्रेला जाण्याचे वेध लागलेले आहेत. तशी त्यांना आता सत्तेत टिकण्याची शाश्वती उरलेली नाही आणि पुन्हा किती मतदार आपल्यासोबर राहिल याची शंकाही भेडसावू लागली आहे. त्यामुळेच हे पदयात्रेचे खुळ त्यांनी डोक्यात घेतलेले असावे. अन्यथा वय हाताबाहेर गेल्याने देवेगौडा आपल्याच पायावर चार पावले चालू शकत नाहीत. अशा स्थितीत पदयात्रा म्हणजे हास्यास्पद प्रकार झाला ना? पण ह्यात काही डाव आहे. लोकसभेत खुद्द देवेगौडा आपल्या बालेकिल्ल्यात पराभूत झाले आहेत आणि अशाच दुसर्‍या बालेकिल्ल्यात त्यांच्या मुख्यमंत्री पुत्राचा लाडका सुपुत्रही पराभूत झाला आहे, त्यानंतर त्या नातवाने आपल्या निकटवर्तियांना मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा इशारा खाजगी बैठकीत दिला होता आणि त्याचीच पुनरोक्ती आजोबांनी एका मुलाखतीतून केलेली होती. पण खुप गहजब झाल्यामुळे गौडांनी आपले विधान मागे घेतले. पण आता समोर आलेली पदयात्रेची टुम मध्यावधीचा़च इशारा खरा करणारी वाटते. आहे ते सरकार कोसळले तर विधानसभेसाठी कॉग्रेस आघाडीने जागांचे वाटप करण्याची शक्यता गौडांना वाटत नसावी म्हणून सर्व जागा लढवण्याच्या तयारीला ते लागलेले असावेत. त्यांना सरकार टिकण्याची शाश्वती उरलेली नाही आणि स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचण्याचीही हमी नाही. तर निदान कॉग्रेस व भाजपाला बहूमतापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

वर्षभरापुर्वी तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढलेले होते आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला तरी त्याचे बहूमत हुकलेले होते. त्याला शह देण्यासाठी तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष असूनही राहुल गांधींनी कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपद घातले होते. त्यामुळे ही आघाडी सत्तेत आली. पण सत्ता चालवणे व राबवणे दोघांनाही अशक्यच होते. त्याच कारभाराला कंटाळलेल्या मतदाराने त्याच दोन्ही पक्षांनी एकत्रित लोकसभा लढवूनही त्यांना चितपट केले व भाजपाला प्रचंड कौल दिलेला आहे. नुसत्या २८ मध्ये २५ जागा भाजपाने जिंकलेल्या नाहीत तर पन्नास टक्केहून अधिक मतेही भाजपाला मिळालेली आहेत. तो कल व कौल लक्षात घेतला तर आघाडी केलेल्या दोन्ही पक्षांनी आपली असलेली सत्ता टिकवणे व त्यासाठी समजूतदारपणे वागण्याला महत्व आहे. कारण जो मतदार वर्षभरात दुसर्‍या टोकाला जाऊन भाजपाला इतका प्रचंड कौल देतो, तो विधानसभेत एकत्र लढवूनही जनता दल कॉग्रेस अशा दोन्ही पक्षांना लोळवून भाजपाला भरपूर बहूमत देण्याची खात्री बाळगायला हरकत नाही. म्हणूनच अशा निकालानंतर दोन्ही पक्षांनी तात्काळ एकत्र बसून सामंजस्याने सरकार चालवण्याचा विचार करायला हवा होता. तसे झाले असते, तर कुमारस्वामी विरोधात कॉग्रेस पक्षाच्या दोन आमदारांना पक्ष व सदस्यत्वाचे राजिनामे देण्याची वेळ आली नसती. हे सरकार डळमळीत झाले नसते. पण दोन्ही पक्षांना जनतेची अजिबात फ़िकीर नसून त्यांना शक्य होईल तितके दिवस् लुटमार करायची आहे आणि त्याचेच प्रतिबिंब तिथल्या सरकारी कारभारात पडलेले आहे. असे सरकार कितीकाळ चालेलम् याची खुद्द मुख्यमंत्री व त्यांच्या पिताश्रींनाच शंका आहे. म्हणून त्यांनी मित्रपक्ष कॉग्रेसला न दुखावता निवडणूकीची तयार् सुरू केलेली आहे. पराभवानंतर पक्षाची राज्यातली संघटना मजबूत करण्यासाठीच ही पदयात्रा असल्याचा दावा म्हणूनच गौडांनी केलेला आहे.

वास्तविक मागल्या विधानसभा निवडणूकीतच मतदाराने भाजपाला बहूमत दिले नाही, तरी आपला कल त्याच पक्षाकडे असल्याचे स्पष्ट केलेले होते. त्याला अडवण्याचे राजकारण गैरलागू नक्कीच नाही. म्हणूनच भाजपाला रोखण्यासाठी जनता दल व कॉग्रेसने एकत्र येण्याला कोणी पापकर्म समजण्याचेही कारण नाही. पण् परिस्थिती ओळखून त्या दोन्ही पक्षांनी सत्तापदे व सत्तावाटपाचे वाद घालण्यापेक्षाही आपसात सामंजस्याने चांगला कारभार करून दाखवायला हवा होता. उत्तमप्रकारे आघाडी सरकार चालू शकते असे आठदहा महिन्यात लोकांच्या अनुभवाला आले असते, तर निदान लोकसभेत भाजपाला इतके मोठे यश नक्कीच मिळाले नसते. पण दोन्ही पक्षांनी इतका घोळ घातला की त्यांच्याविषयी जनमानसात संतापाची लाट उसळावी. त्यांना धडा शिकवण्याची अनिवार इच्छा मतदाराच्या मनात उत्पन्न व्हावी असे प्रयत्न त्यांनीच इतके कष्टपुर्वक केले, की त्याचे प्रतिबिंब मतदानात पडले. जिथे भाजपाची संघटना दुबळी किंवा नगण्य आहे, अशा दक्षिण कर्नाटकातही भाजपाला प्रचंड यश मिळून गेले. त्याचे श्रेय मोदींनाही नसून कुमारस्वामी व कॉग्रेसच्या नेत्यांना आहे. त्याखेरीज एकाच घरातील तून पिढ्यांनी सत्तेसाठी केकेल्या हव्यासाच्या किळसवाण्या प्रदर्शनालाही लोकांनी दिलेला तो नकार आहे.देवेगौडांचा धाकटा पुत्र मुख्यमंत्री आहे आणि थोरला ज्येष्ठ मंत्री आहे. त्याच दोघांचे पुत्र आणि पिता असे एकाच घरातले तीन लोकसभा उमेदवार असण्याची त्यांनाच लाज कशाला वाटली नाही? त्यांना लाजशरम नसेल, पण अशा कुटुंबाच्या हाती राज्याची सुत्रे असल्याने कानडी मतदाराला इतकी लाज वाटली, की त्याने त्या घराण्याचा प्रमुखालाच लोकसभेत पराभूत केले, मजी पंतप्रधान असूनही देवेगौडा म्हणून आपल्या प्रभावक्षेत्रात पराभूत झाले आहेत. पण अजून त्यांचा हव्यास किंवा सत्तालालसा सुटलेली दिसत नाही. त्यातून हे पदयात्रेचे खुळ आलेले असावे.

टुमकुर या मतदारसंघात देवेगौडा कॉग्रेसचे दिवंगत मंत्री असलेल्या अंबरीश यांच्या पत्नीकडून पराभूत झाले. त्या अपक्ष म्हणून मैदानात होत्या आणि त्यांना कॉग्रेसने उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ त्यांनी ती जागा लढवलेली होती. कॉग्रेसने गौडांना खुश करण्यासाठी ती जागा सोडली. तर भाजपाने कॉग्रेसच्या या बंडखोर महिला उमेदवाराला पाठींबा देऊन आपली शक्ती त्यांच्यामागे उभी केली. हेतू अर्थातच देवेगौडांना चितपट करण्याचा होता. पण घराण्याचा प्रमुखच पराभूत झाल्याने पक्षासह आघाडीची किती नाचक्की होईल याचाही विचार गौडांना सुचलेला नसेल, तर त्यांनी आपल्याला वयोवृद्ध राजकीय नेता समजण्यात अर्थ नाही. नातवांनी राजकारणात उडी घेतली तरी आजोबाचा हव्यास सुटणार नसेल, तर लोकांनाच त्याचा बंदोबस्त करावा लागत असतो. लोकांनी तेच केले आहे आणि त्याचा अर्थही सुस्पष्ट आहे. प्रे झाले असेच गौडांना कानडी मतदार समजावतो आहे. तो समजून घेतला नाही, तर जनता दल सेक्युलर पक्षाचा कर्नाटकात लालू यादव् झाल्याशिवाय रहाणार नाही. हेच तर बिहारमध्ये झाले,कौटुंबिक पक्ष म्हणून चाललेल्या राष्ट्रीया जनता दलाला लोकसभेतून मतदारानेच संपवून टाकलेले आहे, काहीशी तशीच गत उत्रमप्रदेशात अखिलेश व् मुलायमसिंग यादव यांची झालेली आहे. ते दोघे निवडून आले तरी त्यांच्या बालेकिल्ल्यातच कुटुंबाचे अन्य तीन उमेदवार पराभूत झाले आहेत. जातीपाती व कुटुंबाची मालमत्ता म्हणून चालणार्‍या पक्षांना यावेळी मतदाराने आसमान दाखवले आहे. देवेगौडांना त्याचीच् चव चाखावी लागलेली आहे, त्यांचाही कर्नाटकातील पक्ष एका जातीपुरता मर्यदित आहे. अशा प्रादेशिक जाती व समाजघटक आता कुठल्याही पक्षाचे वेठबिगार राहिलेले नाहीतम्, हा ताज्या निकालातला मतितार्थ आहे. पण सत्तेची लालसा देवेगौडांना अजून संपलेली नाही. अन्यथा त्यांनी या पराभवानंतर निवृत्ती पत्करली असती आणि पदयात्रेचे नाटक नव्याने रचले नसते.

एक गोष्ट साफ़ झालेली आहे. गौडांना आता आपल्या सुपुत्राचे सिंहासन डळमळू लागल्याची खात्री झाली आहे आणि आपल्या कुटुंबाच्या मालकीचा राजकीय पक्ष निदान संपून जाऊ नये याची भ्रांर पडलेली आहे. एक एक करून कॉग्रेसचे आमदार भाजपात जात आहेत, किंवा पक्षाला रामराम ठोकत आहेत, तशीच गळती जनता दलाला लागली तर हयातीतच आपल्यालाही इतिहासजमा होण्याची नामुष्की येण्याची शक्यता त्यांना सतावत असावी. म्हणूनच मग निदान आगामी विधानसभेत आपले काही अस्तित्व असावे यासाठी त्यांनी आतापासून तयारी करण्याचे मनावर घेतलेले असावे. आजही पुत्र मुख्यमंत्री असला, तरी स्वबळावर जनमत संपादन करण्याची कुवत त्याच्यापाशी नाही. दोनदा मुख्यमंत्री होऊनही कुमारस्वामी यांना जनमतावर स्वार होऊन निवडणूका जिंकण्याची कुवत एकफ़्दाही दाखवता आलेली नाही. म्हणून या वयातही गौडांना पुढल्या निवडणूकीसाठी कंबर कसून उभे रहाण्याची वेळ आलेली आहे. त्याची सर्व ताकद दक्षिण कर्नाटकात होती आणि तिथेही जमिनदोस्त झाल्याने त्यांना संपुर्ण कर्नाटकची पदयात्रा करण्याची गरज वाटू लागली आहे. कारण बहुधा विधानसभा कॉग्रेस सोबत येणार नसल्याचा आत्मविश्वास त्यामागे असावा. अर्थात त्यांना वाटते तितकी त्यांचीही पुण्याई आता उरलेली नाही. त्यामुळे पदयात्रा करून त्यांना आपले शक्तीप्रदर्शन करायचे असावे. त्यातून कॉग्रेस पक्षावर निवडणूकपुर्व दबाव निर्माण करण्याचा डाव गौडा खेळत असावेत. तर असल्या डावपेचांना बळी जाण्याइतके राहुल गांधी समर्थ किंवा त्यांचे कानडी सरदार सिद्धरामय्या दुबळे राहिले नाहीत. किंबहूना पहिल्या दिवसापासून सिद्धरामय्यांना पायरी दाखवण्याचा अट्टाहास गौडांनी केला नसता, तर हे सरकार अधिक सुरळीत चालू शकले असते. परंतु तितके दिर्घकालीन वा दुरदृष्टीचे राजकारण् गौडा पंतप्रधान असताना तरी केव्हा करू शकले होते? कुपमंडुकवृत्ती उच्चापदी बसल्याने संपत नसते आणि त्या प्रवृत्तीला कधी मोठी झेप घेता येत नसते. यातून फ़क्त तमाशाचे कर-नाटक होऊन बसले आहे.

Saturday, July 6, 2019

आयडिया ऑफ़ कॉग्रेस

Image result for indira emergency

अखेरीस राहुल गांधी यांनी ४० दिवस वाट बघून आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजिनामा जाहिर केला आहे. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी लोकसभा निकालानंतरच तात्काळ कार्यकारिणीची बैठक घेऊन आपला राजिनामा सादर केलेला होता. पराभवाची जबाबदारी स्विकारून राजिनामा देण्याची ही जुनीच पद्धत आहे. अनेक पक्ष व संघटनांत अशी जबाबदारी घेऊन राजिनामे दिले जातात आणि कधीकधी अनुयायांच्या आग्रहास्तव मागेही घेतले जातात. त्यामुळेच राहुल गांधींचा राजिमाना देखावा असल्याचेच सर्वांना वाटत होते. पण त्यांनी राजिनाम्यासोबत एक भूमिकाही मांडलेली होती, त्याकडे फ़ारसे कोणी गंभीरपणे लक्ष दिले नाही. यापुढे पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याच्या वारसाकडे असू नये, असाही मुद्दा त्यांनी मांडलेला होता. पण तो तसा दुर्लक्षित राहिला. आपण कॉग्रेसचा कार्यकर्ता राहू शकतो, पण नेतृत्व मात्र कोणा विगर गांधीने करावे, असा राहुलचा आग्रह आहे. त्याचा अर्थ कोणी कशाला लावला नाही? त्याचा साधासरळ अर्थ आपण नसू तर प्रियंका किंवा अन्य कोणाही गांधी वारसालाही तिथे बसवू नये, असा राहुलचा आग्रह आहे. त्याचा विपरीत अर्थ नक्की काढला जाईल. पण त्याचाही सकारात्मक अर्थ निघू शकतो आणि तो काढला तर कॉग्रेसला चांगले दिवसही येऊ शकतात. त्याचा अर्थ मुळच्या काग्रेस परंपरेकडे किंवा वैचारिक वारशाकडे जाऊया, असे तर राहुलना वाटलेले नसेल का? जिथे ज्याच्यापाशी नेतृत्व करायची कुवत व पात्रता आहे, त्यानेच कॉग्रेसचे नेतृत्व करावे आणि अगदी नेहरू गांधी वारसांनीही त्या कर्तबगाराचे नेतृत्व मान्य करावे, असेही राहुलना म्हणायचे असू शकते ना? त्याचा साधासरळ अर्थ असा, की कॉग्रेस म्हणून जी विचारधारा सव्वाशे वर्षात भारतामध्ये विकसित झाली व फ़ोफ़ावली, तिथे परत जायचे. त्याच विचारांचे विविध पक्ष व गट एकत्र करून नव्याने कॉग्रेसला देशव्यापी समावेशक पक्ष बनवायचे. त्यात ममता, जगन असे प्रादेशिक नेते असतील आणि तिथे शरद पवारही पक्षाध्यक्ष गोऊ शकतॊल. काय वाटते?

मागल्या सत्तर वर्षात भारतामध्ये जे दिल्लीत राजकारण झाले आणि प्रादेशिक पातळीवर राजकारण झाले, त्यात कॉग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. ते जसे प्रशासकीय कामासाठी आहे, तसेच ते प्रादेशिक अस्मिता व राजकीय पक्षांच्या उदयालाही कारणीभूत झालेले आहे. आजचे अनेक प्रादेशिक वा पुरोगामी पक्ष हे मुळातच कॉग्रेसचे नाराज गट वा घटक आहेत. त्यांना वेळीच कॉग्रेसमध्ये समाविष्ट करून घेतले गेले असते आणि त्यांच्या नेतृत्वगुण वा गुणवत्तेला स्थान मिळू शकले असते, तर त्या नेत्यांनी वा त्यांच्या अनुयायांमुळे कॉग्रेस पक्ष अधिकच बलवान होत राहिला असता. त्याचे गटतट होऊन समान विचारधारेचे इतके लहानमोठे पक्ष निर्माण झाले नसते. नेहरू वा इंदिराजी यांनी कॉग्रेस पक्षाला एकहाती आपल्या दावणीला बांधून ती कुटुंबाची मालमत्ता करण्याचा घाट घातला नसता, तर आजचे अनेक प्रादेशिक पुरोगामी पक्ष जन्मालाच आले नसते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष म्हणजे काय आहे? शरद पवार या नेत्याला कॉग्रेसमध्ये घुसमटल्यासारखे झाल्याने त्याने बाहेर पडून दोनदा वेगळी चुल मांडलेली होती. पहिल्या वेळेस त्यांच्यासोबत राज्यातले अनेक दुय्यम नेते बाहेर पडले आणि दुसर्‍या खेपेला अन्य काही राज्यातले दुय्यम नेतेही पवारांच्या सोबत बाजूला झाले. आंध्रातला जगन रेड्डीचा पक्ष तर मुळचा कॉग्रेस पक्षच आहे. पित्याचा वारसा जगनला देण्यात कॉग्रेसने कसूर केल्यामुळे त्याने वेगळी चुल मांडली. ममता बानर्जी त्यापेक्षा वेगळ्या नाहीत. बंगालमध्ये पक्ष डाव्या आघाडीशी खंबीरपणे दोन हात करीत नाही, म्हणून ममतांनी वेगळा राजकीय पक्ष काढला. पुढे डाव्यांचा पराभवही करून दाखवला. अशा नेत्यांना कॉग्रेसमध्ये पुरेसा वाव मिळाला असता, तर तिथे तिथे कॉग्रेस आजच्या इतकी दुबळी नक्कीच झाली नसती किंवा संपली नसती. त्याचे खापर त्या नेत्यांच्या माथी मारण्यापेक्षा गांधी घराण्याने आपल्या अंतरंगात झाकून बघितले पाहिजे.

ममता, शरद पवार किंवा जगन रेड्डी हे अलिकडल्या कालखंडातील कॉग्रेस नेते आहेत, ज्यांनी कॉग्रेसमधून बाजूला होऊन आपले स्थानिक प्रादेशिक पक्ष उभारले. त्यात अनेक कॉग्रेस नेतेच सहभागी होत गेले आणि पर्यायाने कॉग्रेस त्या राज्यात निकामी वा दुबळी होत गेली. दिल्लीत बसून आंध्रा किंवा बंगालचे निर्णय स्थानिक नेत्यांवर लादण्याची चुक गांधी खानदानाची होती. किंबहूना कुठल्याही राज्यातील कॉग्रेस नेता आपल्या कुवतीवर प्रभावशाली ठरू लागला, तर त्याला पांगळा करण्याचे डावपेच कोण भाजपावाला खेळलेला नव्हता. हे नेहरू इंदिरा गांधींनीच केले असे नाही. आज विकलांग झालेल्या कॉग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी तरी वेगळे काय करीत होते? राहुलनी उत्तरप्रदेश विधानसभा गमावला, तेव्हा पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे खडतर आव्हान पेलून अमरिंदर सिंग यांनी तिथे विधानसभा जिंकून दाखवलेली होती. तर त्याच्या गळ्यात नवज्योत सिद्धू नावाचे लोढणे अडकवण्यचे पाप कोणाचे होते? कॉग्रेस अशीच खिलखिळी होत गेली. आज राहुलना पक्षाचा पराभव खुपत असेल, तर त्या पराभवाला फ़क्त त्यांचे निकामी दिल्लीकर सहकारी व श्रेष्ठीच कारणीभूत नाहीत. मायलेकांनीही त्याला हातभार लावलेला आहे. २००४ सालात दिल्लीची सत्ता पुन्हा मिळाली त्याचे खरे श्रेय आंध्रातून अधिक खासदार निवडून आणणा‍र्‍या राजशेखर रेड्डी यांना होते आणि २००९ सालातही तिथल्याच अधिक संख्येने युपीएच्या सत्तेवर शिक्कामोर्तब केलेले होते. तर तिथूनच कॉग्रेसचे खच्चीकरण सोनियांनी केलेले नव्हते का? राजशेखर रेड्डी यांनी विभजनाची वा तेलंगणा राज्याची मागणी फ़ेटाळूनही अधिक खासदार निवडून आणले होते. त्याच राज्याची २०१४ साली विभागणी करून सोनियांनी काय केले? तिथला कॉग्रेस पक्षच नामशेष करून टाकला. कारण जगन रेड्डी त्यांच्या आवाक्यातला नेता नसेल तर तिथली कॉग्रेसही बुडवली गेली हे सत्य आहे.

थोडक्यात हेच अनेकदा झालेले आहेत आणि होत राहिले आहे. आज ओडिशात दिर्घकाळ जिंकलेला बिजू जनता दल नावाचा पक्ष दिसतो, त्याचा वारसाही कॉग्रेसचाच आहे. बिजू पटनाईक हे कॉग्रेस नेताच होते आणि नेहरू वा इंदिराजींशी जमले नाही म्हणून बाजूला झाले. पुढे वेगवेगळ्या राजकीय पक्षात गेले वा संस्थापकही झाले. पण त्यांच्या पुत्राला जो वारसा मिळाला तो कॉग्रेसचाच नाही काय? उत्तरप्रदेशात राष्ट्रीय लोकदल किंवा हरियाणातले लोकदल हे मुळात चौधरी चरणसिंग देवीलाल यांचे वारस होत. त्यांचे राजकारणही कॉग्रेसमध्येच सुरू झाले आणि पटले नाही म्हणून त्यांनी वेगळे तंबू थाटले. त्यांच्यावर तशी पाळी आणली, तिथून कॉग्रेसची वैचारीक राजकीय पक्ष म्हणून वाताहत झालेली आहे. बांगला कॉग्रेस, उत्कल कॉग्रेस असे लहानसहान पक्ष १९६० नंतरच्या काळात आले, त्याला तेव्हाचे नेहरू घराणेच जबाबदार होते. हा इतिहास जितका मागे शोधत जाल तितला कॉग्रेसच्या वंशावळीशी जोडलेला दिसेल्. मार्क्सवादी व जनसंघ-भाजपा याच दोन राजकीय संघटना त्याला अपवाद आहेत. अन्यथा बहुतेक राजकीय पक्षांचा वारसा कॉग्रेसमधून आलेला आहे. स्थानिक वा प्रादेशिक नेत्यांवर अशी पाळी आणली गेली नसती, किंवा केंद्राचे निर्णय त्यांच्यावर सतत लादले गेले नसते, तर पन्नास वर्षात अनेक नेते कॉग्रेसपासून दुरावले नसते. कॉग्रेसची विचारधारा जपणारा पक्ष ही प्रतिमा कायम राहिली असती. पण तसे झाले नाही आणि मागल्या पन्नास वर्षात इंदिराजींच्या नंतर कॉग्रेस हा केंद्रातला पक्ष त्यांच्या घराण्याची खाजगी मालमत्ता बनून गेला. त्याचे नाव कॉग्रेसच राहिले, तरी आयडिया ऑफ़ कॉग्रेस मात्र नामशेष होत गेली. आजची कॉग्रेस ही ‘आयडिया ऑफ़ नेहरू-गांधी फ़ॅमिली एम्पायर’ अशी आहे. तिथे राहुल, प्रियंका वा त्यांचे आप्तेष्ट, यापेक्षा अधिक गुणवत्तेच्या वा कुवतीच्या व्यक्तीला स्थान असू शकत नाही, ही खरी समस्या आहे. राहुलना त्यातून पक्ष बाहेर काढायचा आहे काय?

मार्क्सवादी, भाजपा किंवा मुस्लिम लीगसारखे पक्ष आणि निव्वळ प्रादेशिक असे द्रवीड पक्ष सोडले, तर अन्य विविध दोनतीन डझन पक्ष हे मुळातच कॉग्रेसचे लहानमोठे गटतट आहेत. अशा सर्वांनी एकत्र यायचे ठरवले, किंवा कॉग्रेसने पुढाकार घेऊन त्यांना एका छत्राखाली आणायचे ठरवले; तरी नवी कॉग्रेस जोमाने उभी राहू शकते. आज सुद्धा कॉग्रेसचा इतका दारूण पराभव झाला असताना, त्याच्या पारड्यात साडे एकोणिस टक्के मते पडलेली आहेत्. त्यामध्ये अशा तमाम लहानसहान व प्रादेशिक पण कॉग्रेसचा वैचारिक वारसा घेऊन चालणार्‍या पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी वा मते टाकली, तर ३५-४० टक्के मते होतात. म्हणजेच त्याची भाजपाला मिळालेल्या ३७ टक्के मतांशी बरोबरी होऊ शकते. भाजपला तुल्यबळ् मानता येईल, इतका भक्कम कॉग्रेस पक्ष विनाविलंब उभा राहू शकतो. त्याची प्रचिती नजिकच्या विधानसभा निवडणुकांमध्येही येऊ शकेल. मात्र त्याची एक अट असेल, ती नेतृत्वाची. त्यापैकी प्रत्येक प्रादेशिक वा स्थानिक नेता आपापला बालेकिल्ला उभारून बसलेला आहे. त्या नेता किंवा पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची ताकद नगण्य असेल. पण अशा स्थानिक जागी त्याची विजय संपादन करण्याची कुवत कोणी नाकारू शकत नाही. कॉग्रेसला संघटनात्मक शक्ती व मतांचे पाठबळ असतानाही जे यश महाराष्ट्रात मिळवता आले नाही, त्यापेक्षा मोठे यश पवारांनी आपल्या प्रभावक्षेत्रात आजही मिळवून दाखवले आहे. तेच नविन पटनाईक वा ममतांच्या बाबतीत सांगता येईल. पण वैचारिक भूमिकेसाठी ते राहुल वा सोनियांच्या समोर झुकणार नाहीत. त्यांना सन्मानाने पक्षात आणावे लागेल आणि सन्मानानेच् वागवावे लागेल. तितकी लवचिकता गांधी खानदानाला किंवा त्यांच्या पाठीराख्यांना दाखवावी लागेल. त्यातले पहिले पाऊल राहुलनी उचललेले असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे ना? गांधी कुटुंबातला कोणी नको, ह्या राहुलच्या शब्दांची म्हणून महत्ता आहे.

आज सिद्धरामय्या किंवा अमरींदर सिंग असे धडाकेबाज स्वयंभू नेते कॉग्रेसमध्येही आहेत. त्यात ममता, नविन पटनाईक, शरद पवार अशा अनेकांची भर पडल्यास, त्या पक्षाला खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकेल्. अशा विविध नेत्यांना व पक्षांना सोबत घेतल्यास दुबळी वाटणारी १९ टक्के मतेही अधिक जागा जिंकून देऊ शकतात. ममतांना बंगाल आंदण दिला किंवा पटनाईकांवर ओडिशा सोपवला, तर पक्षाचे कोणते नुकसान होणार आहे? जगनला आंध्रा वा चंद्रशेखर रावना तेलंगणा सोपवला, तर काय कमी होणार आहे? अशा नव्या पिढीतल्या नेत्यांना हाताळणे गुलाम नबी किंवा आनंद शर्मा यांच्यापेक्षा शरद पवारांना सहजशक्य आहे. दिल्लीतले नेतृत्व हुकूमत गाजवणारे असण्यापेक्षा सल्लागार वा वडीलधारे असले, तर कॉग्रेसला अनेक राज्यात नवी पालवी फ़ुटायला वेळ लागणार नाही. पुन्हा कॉग्रेस उभी करण्याची भाषा चालू आहे, त्यासाठी या अटी असू शकतात. नुसतेच राहुलनी अध्यक्षपद सोडायचे आणि पडद्यामागून कळसुत्री बाहुल्याप्रमाणे नेत्याला खेळवायचे; असा प्रकार चालणार नाही. ते ममता वा पवारांना मान्य होणार नाही. त्यासाठी यातला कोणी आपला वेगळा तंबू मोडून कॉग्रेसमध्ये येणार नाही. कारण जितका राहुल वा सोनियांचा अहंकार मोठा आहे, तितकाच ममता किंवा जगनचाही स्वाभिमान ताठ असतो. त्यांना नेतृत्व आयते मिळालेले नाही. त्यांनी वेगळी चुल मांडून व अनेकांशी राजकीय संघर्ष करूनच आपले राजकीय स्थान प्राप्त केलेले आहे. त्यांना सामावून घेणे म्हणूनच सोपे काम नाही. आज जे कोणी नेते कॉग्रेसमध्ये उरलेले आहेत, किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ मानले जातात, त्यापैकी कोणापाशी तितका स्वाभिमान नाही किंवा कुवतही नाही. त्यापैकी कोणाला अध्यक्ष होण्याचीही हिंमत उरलेली नाही. मग पक्षाचे नेतृत्व करणे किंवा स्थानिक वा प्रादेशिक नेत्यांना मुठीत ठेवणे, त्यापैकी कोंणाला कसे शक्य असेल?  

खरेतर कॉग्रेसमध्ये आव्हान पेलू शकेल असा कोणी नेता सोनियांनीच शिल्लक ठेवला नाही. कष्ट उपसून मोल मागावे असा कोण उरला आहे? आपली कुवत सिद्ध करून नेतृत्वाची हुकूमत गाजवावी, असा नेता आज कॉग्रेसला उभारी देण्यासाठी हवा आहे आणि उरलेत कोण? काश्मिरी असून महाराष्ट्रातून दिर्घकाळ लोक्सभेत निवडून आलेले गुलाम नबी आझाद. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आणावे लागलेले चिदंबरम. केरळात आपले कुठलेही स्थान नसलेले अन्थोनी. अशा नेत्यांकडून कॉग्रेसला नवी उभारी मिळू शकत नाही. त्यापेक्षा उतारवयातही झुंजत राहिलेले शरद पवार यांच्याकडे आज कॉग्रेसची सुत्रे दिली, तर त्या पक्षाला नव्याने काही करता येऊ शकेल्. अनेकांना हा प्रस्ताव आवडणारा नाही. पवारांविषयी अनेकांचे पुर्वग्रह पक्के आहेत. म्हणूनच त्यांचे नाव घेतल्यावर नाके मुरडली जाऊ शकतील. पण् मोदीलाटेतही आपला पक्ष टिकवून ठेवण्यातली त्यांची क्षमता आज कॉग्रेसला जीवदान देणारी ठरू शकते. पवारांचा जितका आवाका आहे, त्याच्या तुलनेत त्यांना महाराष्ट्राच्या प्रादेशिक पक्षात अडकून पडल्याने आपल्या गुणवत्तेला झळाळी आणता आलेली नाही. राहुलना प्रामाणिकपणे कॉग्रेसचे पुनरुज्जीवन करायचे असेल, तर राष्ट्रवादीचे कॉग्रेस पक्षात विलिनीकरण करून त्यांनी नवी सुरूवात करावी. उरलेल्या कॉग्रेसी विचारांच्या लहान व प्रादेशिक गटांना व पक्षांना कॉग्रेसमध्ये सुरळीत आणण्याचे कामही पवार यांच्यावर सोपवता येईल. तिथून मग कॉग्रेसचा खरा जिर्णोद्धार सुरू होईल. आयडिया ऑफ़ कॉग्रेस पुन्हा देशव्यापी वैचारिक पक्षाच्या रुपाने उभी राहू शकेल. राहुलना खरेच बिगरगांधी कॉग्रेस अध्यक्ष हवा असेल आणि त्याने कॉग्रेसला उभारी देण्याची अपेक्षा असेल, तर शरद पवारना पर्याय नाही. कारण आज तरी त्यांच्या कुवतीचा व क्षमतेचा अन्य कोणी नेता कॉग्रेसपाशी नाही, की कॉग्रेसवादी अन्य पक्षांपाशी नाही.

Friday, July 5, 2019

राहुलचे इतिहासाचे गुरूजी

‘स्वतंत्र बाण्याच्या अध्यक्षाबाबत काँग्रेसचा इतिहास अभिमान बाळगावा असा नाही. तो तपासून पाहण्यासाठी निजलिंगप्पा वगरेंपर्यंत मागे जाण्याची गरज नाही. राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्रींच्या काळात काय घडले ते पाहिले तरी पुरे. सोनियांच्या इच्छेविरोधात पंतप्रधानपदी नरसिंह राव असताना पक्षाध्यक्षपद सांभाळणारे सीताराम केसरी यांना किती तारेवरची कसरत करावी लागली, हे सर्वश्रुत आहे.’ (लोकसत्ता संपादकीय शुक्रवार ५ जुलै २०१९)

राहुल गांधी आज त्रागा कशाला करीत आहेत, असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरना पडला आहे. म्हणून त्यांनी ‘भूतपुर्व’ कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अग्रलेखातून इतिहास आठवण्याचा सल्ला दिला आहे. पण पर्यायाने त्यांनी राहुल गांधींसह त्यांच्या इतिहास गुरूजींचाच इतिहास किती दुबळा आहे, त्याचीच साक्ष दिली आहे. राहुलना कॉग्रेस अध्यक्षांचा इतिहास चाळून बघण्याचा सल्ला देताना कुबेरांनी नरसिंहरावांच्या कारकिर्दीत सीताराम केसरी कॉग्रेस अध्यक्ष असल्याचा नवा इतिहास शोधून काढला आहे. तो राहुलना समजावताना इतिहासात खुप मागे म्हणजे निजलिंगप्पा यांच्यापर्यंत जाण्याची गरज नसल्याचाही इशारा दिला आहे. पण अलिकडला इतिहास सांगताना राव आणि केसरी यापैकी खरेच कोण कॉग्रेस अध्यक्ष होता, त्याचा इतिहास गुरूजींनाही तपासण्याची गरज वाटलेली नाही. नरसिंहराव सोनियांच्या इच्छेविरुद्ध पंतप्रधान असले तरी ते मुळातच कॉग्रेस अध्यक्ष होते. म्हणून त्यावेळी पंतप्रधान होऊ शकले हे कुबेर गुरुजींच्या गावीही नाही. कदाचित राव पंतप्रधान असताना कुबेरांचा जन्म झालेला नसावा, किंवा कुणा इकॉनॉमिस्ट, स्टेट्समन वगैरे नियतकालिकांनी त्या कालखंडावर काही लिखाण प्रसिद्ध केलेले नसावे. अन्यथा कुबेरांच्या इतिहासात इतकी ढोबळ चुक झाली नसती. किंबहूना नरसिंहराव अध्यक्ष कशामुळे झाले, किंवा भंगारातून बाहेर पडून पंतप्रधान कशामुळे झाले, त्याचाही थांग कुबेरगुरूजींना नसावा. कारण कुबेर हे राहुल युगातले असून, त्यां युगातली कॉग्रेस बिना अध्यक्षाचीही चालणारी आहे्. तशीच पुर्वीही असावी असे कुबेरांचे गृहीत असावे. अन्यथा त्यांनी राहुलना मातोश्रीचा इतिहास सांगताना पिताश्रींच्या कारकिर्दीतले संदर्भ कशाला चुकले असते? आज ज्या स्थितीत कॉग्रेस आहे, तशीच काहीशी स्थिती उदभवली म्हणून नरसिंहराव कॉग्रेस अध्यक्ष झालेले होते.

१९९१ सालात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका चालल्या असताना व अर्धे मतदान संपून गेलेले असताना, श्रीपेरांबुदूर या तामिळनाडूच्या गावात राजीव गांधी प्रचाराला गेले होते. तिथे त्यांचे घातपाती निधन झालेले होते. अगदी जवळून बॉम्बस्फ़ोट घडवून त्यांना मारले गेले आणि तेव्हा राजीवच कॉग्रेसचे अध्यक्ष होते. अकस्मात त्यांची अशी हत्या झाल्यावर पक्षाचे नेतृत्व कोणी करावे, असा प्रश्न उदभवला आणि पक्षाध्यक्षपद मोकळे ठेवायचे नाही, म्हणून अडगळीत पडलेले नरसिंहराव सर्वात वयोवृद्ध नेता म्हणून हंगामी अध्यक्ष नेमले गेले. पंधरा दिवस लांबल्या गेलेल्या निवडणूका पुर्ण झाल्या, तेव्हा कॉग्रेस सर्वात मोठा तरी अल्पमताचा पक्ष होता आणि त्यालाच सरकार बनवण्याचे आमंत्रण मिळाले. दुसर्‍या क्रमांकाचा भाजपा अन्य कुणाच्या मदतीने सरकार स्थापण्याची शक्यता नसल्याने राव यांचे अल्पमताचे सरकार स्थापन झाले व पुर्ण मुदत चाललेही. अशा सर्व काळात नरसिंहरावच पंतप्रधान व कॉग्रेस अध्यक्ष होते. त्याच्या आधी व नंतरही सीताराम केसरी कॉग्रेसचे खजिनदार होते. दिर्घकाळ खजिनदार राहिलेला नेता अशीच त्यांची ख्याती होती. राव यांच्या सरकारचा १९९६ सालात दारूण पराभव झाला, तेव्हाही रावच कॉग्रेसचे अध्यक्ष होते. सोनियांना आवडणारे असो किंवा नसो, रावच त्या पदावर कायम होते. किंबहूना राव यांच्यामुळेच तेरा दिवसांसाठी वाजपेयी प्रथमच पंतप्रधान होऊ शकले. कारण भाजपा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला तरी त्याला पाठींबा द्यातला कुठलाही पुरोगामी विरोधी पक्ष उभा राहिला नाही. डाव्यांसह विविध पुरोगामी पक्षांनी नरसिंहरावांनावर भाजपाला सत्तेत बसवल्याचा आरोप केला होता. वेळीच राव यांनी कॉग्रेसचा बाहेरून पाठींबा विरोधी पुरोगामी आघाडीला दिला असता, तर वाजपेयींना पंतप्रधानपद मिळाले नसते, असा खुप गदारोळ झाला. तेव्हाही केसरी नव्हेतर रावच पक्षाध्यक्ष होते.

पुढे तेरा दिवसात वाजपेयी सरकार कोसळले आणि पुरोगामी व डाव्यांच्या संगनमताने तिसर्‍या आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या आघाडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री देवेगौडांना नेता म्हणून निवडले आणि त्या सरकारला कॉग्रेसचा बाहेरून पाठींबा देणारे कॉग्रेसचे अध्यक्ष नरसिंहरावच होते. पण त्यानंतर जो जैन आयोगाचा अहवाल आला आणि फ़ुटला. त्यात राव यांच्यावर बालंट आलेले होते आणि त्यांना पक्षाध्यक्ष सोडण्यासाठी दबाव आणला गेला. त्यावेळी नवे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनाच नेमले जाईल, अशी अपेक्षा होती. पण पवार स्वयंभू वृत्तीचे नेता असल्याने आपल्या आवाक्यात रहाणार नाहीत, म्हणून राव यांनी आपल्याशी एकनिष्ठ राहू शकेल अशा एका दुबळ्या नेत्याला अध्यक्षपदी बसवले. त्याचे नाव सीताराम केसरी होते. केसरी यांनीही आपल्या निष्ठा लपवल्या नव्हत्या. आपण राव यांचे निष्ठावान दास हनुमान असल्याची कबुली त्यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतानाच दिलेली होती. मात्र ती फ़क्त बोलाची कढी होती. कारण लौकरच केसरींनी राव यांना कार्यकारिणीतूनही बाहेर काढले होते. त्यापुर्वी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनीही असाच दोन भिन्न बिगर कॉग्रेसी सरकारांना बाहेरून पाठींबा दिला, पण सत्तेत टिकू दिलेले नव्हते. पक्षाचे अध्यक्षपद हाती आल्यानंतर लेचेपेचे केसरीही सिंहासारखे आवेशात वागू व बोलू लागले होते. एका दुपारी त्यांना लहर आली आणि त्यांनी राष्ट्रपती भवन गाठले. देवेगौडा सरकारला दिलेला पाठींबा काढून घेतला. त्यामुळे पेचप्रसंग उभा राहिला होता. त्यांनी तो निर्णय कार्यकारिणीलाही अंधारात ठेवून घेतलेला होता. ज्येष्ठ नेता असूनही शरद पवारांना ही बातमी पुण्यात रेडीओवरून समजलेली होती. केसरी इतके स्वयंभू अध्यक्ष होते आणि नंतर पक्षाच्या महासमिती अधिवेशनातही त्यांच्याच अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. यातल्या इतिहासापेक्षाही आशय कुबेरगुरूजींना कधी उमजला आहे काय?

इंदिराजी, राजीव, सोनिया किंवा राहुल यांची कथा सोडून द्या. ते चौघेतरी थेट गांधी होते आणि एका राजघराण्याचे वारसदार होते. त्यांच्या समोर ताठ मानेने उभे रहाण्याची हिंमत कॉग्रेसजन गमावून बसले असतील, तरी समजू शकते. पण नरसिंहराव गांधी कुटूंबातले नव्हते आणि तरीही ते अध्यक्ष झाल्यावर त्यांनाही चार शब्द् ऐकवण्याची हिंमत कुणा कॉग्रेसवाल्यापाशी उरलेली नव्हती. राव तरी काहीसे बुद्धीमान कर्तबगार होते. मोठी पदे भूषवलेले होते. पण सीताराम केसरींचे कर्तृत्व काय? एक गलितगात्र पण महत्वाकांक्षी म्हातारा, यापेक्षा त्यांचे अधिक नेमके वर्णन करता येणार नाही. अशा पक्षाध्यक्षासमोर ताठ कण्याने उभे रहायची वा त्याला आव्हान देण्याची हिंमत शरद पवार यांच्यासारख्या धुर्त व मुरब्बी कॉग्रेसजनालाही हिंमत करता आलेली नव्हती. त्यापेक्षा राहुल वा सोनिया खुपच अधिकारी व्यक्ती होत्या आणि आहेत. त्यांच्यासमोर कॉग्रेसचा कोणीही ज्येष्ठ नेता आपल्या पायावर उभे राहून बोलतो किंवा गुडघे टेकल्याशिवाय बातचित करतो, हीच मोठी धाडसाची गोष्ट नाही काय? १९७० च्या जमान्यात इंदिराजींनी कॉग्रेसवाला म्हणजे आपले पाय किंवा बुद्धी नसलेला ठोब्या; अशी पक्षाची अवस्था करून टाकलेली आहे. त्या ठोब्यांमध्ये काही आशय शोधणे किंवा त्यांच्या इतिहासाचे धडे कोणाला शिकवायला जाणे; हा अतिशहाणपणा झाला ना? किंबहूना पक्षातले काही मुठभर जयराम रमेश वा तत्सम लोक उरलेत, त्यांचे चार शब्द ऐकण्यापेक्षा राहुलनी मागल्या चारपाच वर्षात विविध क्षेत्रातले कुबेर गोळा केले; तिथेच त्यांच्या र्‍हासाची सुरूवात झालेली होती. तसे नसते तर कुबेरांनी राहुलनाच त्यांच्या पक्षाचा इतिहास शिकवण्याचा आगावूपणा केला नसता. राहुल यांची अशीच कुबेरी श्रीमंती त्यांना इतिहासजमा करायला पुरेशी आहे. कुमार केतकर, सुधींद्र कुलकर्णी व कुबेर त्यालाच आपल्या परीने हातभार लावीत आहेत, त्यांना शुभेच्छा!

Thursday, July 4, 2019

पासष्टाच्या घरातले पक्षाध्यक्ष



राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीतील् पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा दिला. त्याला आता महिन्याचा काळ लोटला आहे. इतक्या दिवसात त्या पक्षाला आपला नवा अध्यक्ष निवडता आलेला नाही, किंवा राहुलनाच अध्यक्षपदी कायम राहाण्यासाठी पटवण्यातही श्रेष्ठी यशस्वी झालेले नाहीत. कारण् सवाल या पराभवाची जबाबदारॊ कोणाची असा नसून, येऊ घातलेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आहे. कॉग्रेस पक्षातल्या प्रत्येक नेत्याची हीच गुणवत्ता असते, की त्यांना कुठलीही जबाबदारी नको असते. सहाजिकच् त्यांना असा अध्यक्ष किंवा नेता लागतो, जो जबाबदारी घेईल आणि तरीही तोच कर्तृत्ववान असल्याची इतरांनी ग्वाही द्यायची असते. परिणामी राहुल भले राजिनामा देतील्, पण तो स्विकारायचा कोणी असा घटनात्मक प्रश्न पक्षासमोर उभा आहे. जर पक्षाने त्यांना अध्यक्षपदी निवडलेलेच नसेल्, तर पक्षाला राजिनामा तरी स्विकारण्याचा अधिकार कसा असेल? २०१३ च्या अखेरीस राहुल पक्षाचे उपाध्यक्ष झालेले होते. पण त्यापुर्वी कधी पक्षात असे पद उपलब्ध नव्हते, की कोणी उपाध्यक्षही झालेला नव्हता. मग अचानक आता हे पद आले कुठून् वा राहुलना ते मिळालेच कसे? कोणी असा प्रश्न विचारण्याची हिंमत तरी केलेली होती काय? अकस्मात एके दिवशी दोन दशकापुर्वी सोनिया पक्षाध्यक्ष झाल्या, तेव्हा तरी त्यांना कोणी त्या पदावर आणून बसवले होते? आणि त्याचा आधार काय होता? असे प्रश्न तेव्हा विचारले गेले नसतील, तर आता कोण विचारणार? पण् आज ज्या परिस्थितीत कॉग्रेस पक्ष आहे, त्याला त्यापासून मोक्ष देण्याची कुवत असलेले अनेकजण सध्या कॉग्रेस गोतावळ्यात आहेत. पण त्याकडे कोणाचेच लक्ष जात नसेल, तर सगळेच बुचकळ्यात पडण्यालाही पर्याय नाही ना? कुमार केतकर पक्षाचे खासदार आहेत आणि सुधींद्र् कुलकर्णी राहुलचे सल्लागार असल्याचे कोणा कॉग्रेस नेत्यांना कशाला आठवत नाही? इतके कर्तबगार अध्यक्ष कॉग्रेसला शोधूनही मिळणार नाहीत ना?

कुठल्याही राजकीय पक्ष वा संघटनेला मोक्ष हवा असेल, तर तिने शांतपणे ग्रंथप्रामाण्यवादी पुस्तकपंडितांना शरण जायचे असते. कारण पुस्तकपंडितांना व्यवहाराशी कधी कर्तव्य नसते. त्यात केतकर किवा त्यांच्यासारखे कॉग्रेसवादी बुद्धीमंत खुप उच्चपातळीवर आहेत. पण राहुलच्या जागी पर्यायी अध्यक्ष शोधताना कोणाचेच लक्ष तिकडे गेलेले दिसत नाही. सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक गेहलोट अशा नावांची उगाच चर्चा चाललेली आहे. त्यांच्याकडून काय साध्य होऊ शकते? ते पक्षाला पराभवापासून वा़चवू शकत नाहीत किंवा नव्याने उर्जितावस्थेलाही आणू शकत नाहीत. अशावेळी बुडणार्‍या पक्षालाही तो प्रगतीपथावर असल्याचाच खोटा दिलासा देणार्‍यांची गरज असते. लोकसभेतील पराभवानंतर सुधींद्र कुलकर्णी यांनी नॅशनल हेराल्ड या कॉग्रेसच्या अधिकृत दैनिकात राहुल गांधींच्या नैतिक विजयाची ग्वाही दिलेली होती ना? जगातला इतर कोणी शहाणा वा राजकीय अभ्यासक त्या व्यवहारी पराभवातला विजय सिद्ध करू शकला होता काय? पण ती किमया कुलकर्णी यांनी दाखवली आहे आणि अशा जादूचीच सध्या कॉग्रेसला गरज आहे. तिथे व्यवहारी निवडणुका लढलेले वा मुख्यमंत्री म्हणून् कारभार हाकलेले शिंदे-गेहलोट काय दिवे लावू शकणार आहेत? त्यापेक्षा कुमार केतकर आणि सुधींद्र कुलकर्णी कॉग्रेसला सुखनैव मुठमाती देण्याचे काम करू शकतील. आपण संपलो कधी आणि कसे, याचा थांगपत्ता कुठल्याही राज्यातल्या कॉग्रेस नेत्यांना वा पक्षालाही लागणार नाही. दुर्दैव इतकेच, की अजून अशा कर्तबगार दोघांचे नावही कुठे चर्चेत आलेले नाही. की राहुल गांधींपर्यंत त्या दोघांना कोणी जाऊच देत नसावा का? अन्यथा फ़तवा काढूनच राहुलनी या दोघांना अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमून टाकले असते. मग मोदींची भिती कोणाला बाळगण्याचे कारण उरले नसते. कारण मोदी कसे संपणार, याचे पंचाग केतकरांनी खुप पुर्वीच एबीपी माझा वाहिनीच्या कट्ट्यावर बसून मांडलेले आहे.

मला याचीच गंमत वाटते, की केतकर राहुलना सल्ला देतात आणि त्यांचा सल्ला नरेंद्र मोदी काळजीपुर्वक उपयोगात आणतात. याकडे तरी कोणा कॉग्रेसवाल्याने थोडे गंभीर होऊन बघायला नको काय? मध्यंतरी केतकरांनी हमीच दिलेली होती, की मोदींचा सतराव्या लोकसभेत दारूण पराभव होणार् आहे आणि त्यातून त्यांना अयोध्येचा श्रीराम अवतरला तरीही वाचवू शकणार नाही. हा इशारा केतकरांनी मोदींना किंवा भाजपाला दिलेला नव्हता. तो कॉग्रेस व राहुलना दिलेला होता. त्याचा अर्थ असा होता, की मोदींनी अयोध्येतील रामाच्या मंदिराच्या उभारणीत फ़सावे आणि त्यांचा राजकीय निवडणूकीत पराभव व्हावा. सापळा खुप छान व सोपा होता. पण कपील सिब्बल किंवा अन्य कॉग्रेसवाल्यांनी केतकरांना तो सापळा लावूच दिला नाही. मोदींच्या पहिल्या कारकिर्दीत मंदिरच्या कामात जितके अडथळे आणता येतील, तितके आणले आणि मोदी त्यापासून अलगद दुर राहिले. परिणाम असा झाला, की मोदींनी अध्यादेश काढला नाही किंवा संघाच्या कुठल्या संस्थेला मंदिराची उभारणी करण्यास मुभा दिली नाही. सुप्रिम कोर्टात सिब्बलांनी अडथळे आणले नसते, तर मंदिराचा मार्ग मोकळा झाला असता आणि मोदींचे सरकार व भाजपा मंदिरातच फ़सत गेला असता. त्यांनी पुलवामा, बालाकोट किंवा गरीबांना गॅसजोडणी वा वीजपुरवठ्याच्या गोष्टीच केल्या नसत्या. त्यापेक्षा मंदिराच्या उभारणीसाठी छाती फ़ुगवून मोदी प्रचारात मिरवले असते. अयोध्येतला राम आपल्याला निवडणूका जिंकून देईल, अशा भ्रमात मोदी राहिले असते, तर राहुलना ७२ हजार रुपयात निवडणूक सहज जिंक्ता आली असती. पण केतकरांचा इशारा मोदींनी गंभीरपणे घेतला. रामाच्या मंदिरापेक्षाही पुलवामा बालाकोटवर भर दिला आणि पुन्हा एकदा लोकसभा जिंकली. रामाची मदत घेण्यापेक्षा त्यांनी केलेल्या कामाच्या बळावर निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याचे श्रेय केतकरांचे नाही, तर काय अमित शहांचे आहे?

आताही इतके मोठे बहूमत मिळवल्याने नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार कसे मस्तवाल होऊन गाळात जाणार आहे, त्याचे पंचांग केतकरांनी ‘द प्रिंट’ नावाच्या संकेतस्थळावर प्रदिर्घ लेखातून मांडलेले आहे. म्हणजेच अशा वेळी मोदी सरकारला कुठलाही प्रतिकार करण्यापेक्षा मस्तवाल होऊ देणे, असा सापळा केतकरांनी सुचवलेला आहे. पण तिकडे पुन्हा कुणाही कॉग्रेसवाल्याचे लक्ष नाही. सगळे मुर्ख लेकाचे राहुलची समजूत घालून अध्यक्षपदी कायम राखण्यात गर्क आहेत्. विधानसभा लढवण्य़ाचे मनसुबे रचण्यात रमलेले आहेत. पण मोदींना केतकरी सापळ्यात अडकवण्याचा विचारही कोणा कॉग्रेसवाल्याच्या मनाला शिवलेला नाही. दुसरे सुधीद्र कुलकर्णी. त्याना नैतिक विजयानेही सत्ता मिळवण्याची किमया साधलेली आहे. राहुलना पक्ष संभाळता येत नसेल आणि निवडणूका जिंकून सत्ता मिळवणे शक्य नसेल, तर निवडणूकांशिवायच सत्ता मिळवण्याला कॉग्रेसने प्राधान्य देणे भाग आहे ना? मग ती किमया ज्याला साधली आहे, त्याचाच सल्ला बहूमोलाचा नाही काय? त्यात फ़क्त कुलकर्ण्यांचाच हातखंडा आहे. त्यामुळे जुन्यापान्या कुणा नेत्यांना कॉग्रेसची सुत्रे सोपवण्यापेक्षाही केतकरांना पक्षाध्यक्ष करावे आणि कुलकर्णींना महासचिवपदी नेमले, तर किती बहार येईल ना? हुड्डा किंवा अशोक चव्हाणांना बाजूला ठेवूनही हरयाणा व महाराष्ट्रात कॉग्रेसला नैतिक विजय संपादन करता येतील. कार्यकारिणी वा श्रेष्ठी असल्या सर्व दगदगीतून राहुलना कायमची मुक्ती मिळून जाईल. मराठीत आपण म्हणतो ना काखेत कळसा नि गावाला वळसा? घरात नि दारात केतकर-कुलकर्णी असताना कॉग्रेस इतरत्र अध्यक्ष कशाला शोधते आहे? कुठल्या तंत्रज्ञ वा रणनितीकाराची कॉग्रेसला गरजच काय? या दोघांना बुद्धीबळाचा पट आणून द्यावा आणि त्याच्या पासष्टाव्या घरात ता दोघांना बसवावे. काम झालेच म्हणून समजा. त्यासाठी पासष्ट घरे असलेला बुद्धीबळाचा पट कुठून आणायचा, ते कुमार केतकर सांगू शकतील. त्यांनी त्यावर यापुर्वी दोनदा अग्रलेखरुपी प्रबंध लिहीलेले आहेतच.

Wednesday, July 3, 2019

अजुनी रुसूनी आहे

१२ कोटी मतदारांचे काय?

No photo description available.

राहुल गांधी यांनी कॉग्रेसच्या दारूण पराभवानंतर आपल्या पदाचा राजिनामा दिला आणि कॉग्रेस पक्षात भलताच पेचप्रसंग उभा राहिला आहे. त्या पक्षाला विचारधारा वगैरे काही नसल्याचा तो परिणाम आहे. कारण कॉग्रेस म्हणजे लालू, मुलायम किंवा राष्ट्रीय लोकदल असा कौटुंबिक पक्ष म्हणून स्थापन झालेली राजकीय संघटना नाही. सव्वाशे वर्षापुर्वी ब्रिटीश साम्राज्याच्या जुलमी सत्तेला आव्हान देण्यासाठी काही महापुरूषांनी जी संघटना स्थापन केली, तिला अजूनही कॉग्रेस म्हणून ओळखले जाते आणि आजही बहुतांश कॉग्रेसवाले तोच वारसा आपल्याकडे असल्याचे अगत्याने सांगत असतात. मग त्या पक्षाची स्थापना करताना कोणीही नेहरू त्यात सहभागी नसेल वा नंतरही दोनतीन दशके त्यात नेहरू खानदानाचा कोणी नसला; तर आज त्या कुटुंबाच्या वारसाशिवाय तो पक्ष कशाला चालत नाही? विचारधारेशी संबंध असेल, तर मार्क्सवादी किंवा भाजपाही तसे पक्ष आहेत आणि त्यापैकी कुठल्या संघटनेला एका घराण्याच्या वारसासाठी अडून बसावे लागलेले नाही. पण राजद, समाजवादी किंवा लोकदल अशा कौटुंबिक पक्षांना मात्र घराण्याशी निष्ठा असलेला नेता किंवा वारस प्रमुखपदी असावा लागतो. त्याचा सामान्य जनता वा मतदाराच्या भावनांशी संबंध येत नाही. कॉग्रेसची अवस्था नेमकी तशीच झालेली नाही काय? त्या घराण्याचा वारस आपल्याला अध्यक्षपद वा म्होरकेपण नको म्हणून हट्ट धरून बसला आहे आणि त्याच्या जागी कॉग्रेस पक्ष कोणी चालवायचा, असा पेच पक्षात निर्माण झाला आहे. पण कोणालाही कॉग्रेसची काही विचारधारा आहे आणि तीच पुढे घेऊन जावी, याचे साधे स्मरणही होताना दिसत नाही. मग त्या विचारधारेला म्हणून ज्या १२ कोटी मतदारांनी दोन महिन्यापुर्वी मतदान केले; त्यांच्या भावनांचे काय? त्यांच्या वैचारिक निष्ठांचे काय? राहुल गांधी आपल्याच अनुयायी लाळघोट्या नेत्यांना लाथाडत आहेत, की त्या १२ कोटी मतदारांना?

मुद्दा त्या १२ कोटी मतदारांचा आहे. कारण त्यांनी एका पक्षाला किंवा तो पक्ष जी विचारधारा सांगत असतो, त्यासाठी मते दिलेली आहेत. पराभूत होतानाही कॉग्रेसला मिळालेली मते कुठल्याही इतर पक्षापेक्षा प्रचंड आहेत आणि त्यांना आपल्या विचारधारेचे काय होते आहे, ते जाणून घेण्याचा हक्कही नाही काय? १९८४ सालात भाजपा अवघ्या दोन खासदारांचा पक्ष म्हणून उरला होता, अशी आठवण कॉग्रेसवाले अगत्याने सांगत असतात. तेव्हाही भाजपला इतकी प्रचंड मते मिळालेली नव्हती. पुढे १९९६ सालात भाजपा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून विजयी घोडदौड करू लागला, तेव्हाही भाजपाला १५ टक्के मतांची मजल मारता आलेली नव्हती. त्यापेक्षा कॉग्रेसची आज मिळालेली मते अधिक आहेत. लोकशाहीत जागांना महत्व नसते किंवा संख्येलाही महत्व नाही. त्यामागे जो मतदार उभा राहिलेला आहे, त्याचा सन्मान राखणे हे पक्षाचे व नेत्याचे कर्तव्य असते. आपल्या पराभव किंवा सत्ता गमावण्यामुळे नेत्याने पक्षासह विचारधारेच्या राजकारणाकडे पाठ् फ़िरवणे; हा त्याच मतदाराचा घोर अपमान असतो. निर्णय त्याने आधी घ्यायचा असतो. निवडणूकीत उतरताना त्याने मतदार आपल्याला कशाला मत देणार, त्याचे भान ठेवूनच यायचे असते. आता सत्ता मिळाली नाही म्हणून सगळ्या जबाबदारीकडे पाठ फ़िरवणे; म्हणजे प्रत्यक्षात त्या १२ कोटी मतदाराच्या इच्छा अपेक्षांना लाथाडणे आहे. ज्यांनी त्या निवडणूकीत पदरमोड करून वा कुठल्याही अपेक्षेशिवाय काम केले, त्यांचे काय? फ़क्त राहुलना सत्ता मिळणे इतकीच त्या मतदाराची इच्छा नव्हती. भाजपा विरोधात किंवा कॉग्रेसची भूमिका आहे, ती ठामपणे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर मांडली जावी; म्हणून त्या कार्यकर्त्याने व मतदाराने काही केलेले आहे. त्याचेही भान ज्या माणसाला असू शकत नाही, तो नुसता पक्षाध्यक्ष व्हायलाच नालायक नसुन अन्य कुठलीही सार्वजनिक जबाबदारी घ्यायलाही निकामी माणूस आहे.

मागले चारपाच आठवडे हा तमाशा रंगलेला आहे आणि वृत्तपत्रांसह विविध वाहिन्याही त्या़चे नाटक रंगवुन पेश करीत आहेत. त्यापैकी कुठल्याही वाहिनी वा संपादकाने कॉग्रेसच्या प्रवक्ते वा नेत्यांना एक प्रश्न अजिबात विचारलेला नाही. राहुल अध्यक्ष नव्हते तेव्हा कॉग्रेस कोण चालवित होता? सोनियाही नव्हत्या तेव्हा कॉग्रेसचे कोणते नुकसान झालेले होते? राजीव गांधी यांच्या निधनानंतर काही अशाच लाळघोट्यांनी सोनियांच्या दारात उपोषण करून त्यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्विकारावे म्हणून आग्रह धरला होता. पण आपली मुले एकटी पडली असून, त्यांच्या पालनपोषणासाठी आपण सर्व वेळ देऊ इच्छितो, म्हणत सोनियांनी अध्यक्षपद नाकारण्याचा ‘त्याग’ केलेला होता. त्यातून त्यांनी एक गोष्ट साफ़ केली होती. अगदी गांधी खानदानाशिवाय कॉग्रेस चालणार नसली, तरी गांधी खानदान मात्र कॉग्रेसशिवाय चालू शकते, जगूही शकते. त्यांच्या जगण्यात कुठलाही अडथळा किंवा व्यत्यय कॉगेसमुळे येणार असेल, तर त्यांच्यासाठी पहिला प्राधान्याचा विषय कुटुंब इतकाच आहे. त्यासाठी वेळ देताना कॉग्रेस वार्‍यावर सोडायलाही गांधी खानदान कमी करीत नाही. इतकाच सोनियांच्या तात्कालीन वागण्याचा अर्थ होता. म्हणून १९९१ पासून १९९८ अशा सात वर्षात त्यांनी कॉग्रेसची आबाळ होऊ दिली आणि मुले मोठी शहाणीसुरती झाल्यावर कॉग्रेसची बुडती नाव वाचवायला सोनिया अध्यक्षपदी येऊन बसल्या. तर तेव्हाच राहुलना अध्यक्षपदी बसवायला काय हरकत होती? आज राहुलच अपरिहार्य आहेत, तर १९९८ सालात राहुलशिवाय किंवा सोनिया कॉग्रेस कशाला वाचवू शकत होत्या? आजही राहुल नसतील तर सोनिया हयात आहेत आणि त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नाहीच तर प्रियंकाही त्याच खानदानाच्या वारस आहेत. त्याही नकोत तर प्रियंकाचा पुत्र रिहानही वयात आलेला तरूण आहे.

राहुल एका बाजूला राजिनामा देतात आणि आपण माघार घेणार नाही म्हणतात. पण कोणाचे नाव सुचवित नाहीत, की कामही थांबवित नाहीत. कालपरवा अनेक राज्यांचे मुख्यमंत्री त्यांना भेटून गयावया करत होते. पण राहुलनी त्यांनाही नकार दिलेला आहे. मुद्दा इतकाच, की खरेच राहुलना अध्यक्षपद नको असेल, तर त्यांनी कार्यालयात किंवा घरातही त्या संदर्भाने भेटायला येणार्‍यांना थेट हाकलून लावावे आणि विषय संपवून टाकावा. पण त्यापैकी काहीही होताना दिसलेले नाही. सोनियांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक घेतली आणि लोकसभेतील पक्षनेता म्हणून अधीररंजन चौधरी यांची नियुक्ती केली. राहुलनीही अनेक राज्यातल्या समित्या बरखास्त केल्या, किंवा इतरही काही नेमणूका केलेल्या आहेत. हा सगळा पोरखेळ होऊन बसला आहे. पण देशाचा ५५ वर्षे कारभार चालविलेल्या पक्षातील एकाहून एक अनुभवी नेतेही त्या बालीशपणला लगाम लावण्याला धजावलेले नाहीत. हा घरातल्या घरात रुसण्याचा नसून जगासमोरच चाललेला हास्यास्पद तमाशा आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील दुसर्‍या क्रमांकाचा लोकप्रिय पक्ष म्हणून जगाचेही कॉग्रेसमधील पोरखेळाकडे बारीक लक्ष आहे. हा पक्ष वा त्यांचा नेता भारताचा पंतप्रधान व्हायला किंवा देशाची सत्ता संभाळायला कसा नालायक आहे्, त्याचीच अशा तमाशातून ग्वाही दिली जात असते. इतकेही मनमोहन वा चिदंबरम, अन्थोनी यांना कळत नसेल का? पण बोलायची कोणाची बिशाद नाही. वयाने वाढलेल्या थोराड कारट्याचे नसते लाड व् चोचले चालू आहेत आणि त्यासाठी ज्या १२ कोटी मतदारांना लाथाडले जात आहे, तोच मतदार पुढल्या प्रत्येक निवडणुकीत कोणाला लाथाडेल, याचा तरी विचार कोणाला कसा सुचत नाही? निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात राहुल म्हणायचे जनता मायबाप है. मग त्याच मायवापाने टाकलेली जबाबदारी पार पाडायची सोडून, हे कसले तमाशे चालू आहेत?

राहुल यांच्यासाठी कॉग्रेस ही घरगुती मालमत्ता असेल. पण हजारो दुय्यम कनिष्ठ नेते व लाखो कार्यकर्त्यांसाठी कॉग्रेस हा एक राजकीय पक्ष आहे. त्यांच्या आकांक्षांचे प्रतिक आहे. त्यांचा नेता व त्याच्या भोवतालचे अन्य नेते असे खुळचट वागू लागतात, तेव्हा त्या कॉग्रेस अनुयायांचा पुरता भ्रमनिरास होत असतो. त्या बारा कोटी मतदारापैकी मुठभर तरी त्याच्यापासून दुर जाण्याचा विचार करू लागतात. नेत्यांनी राहुलचे पाय धरावेत्. कदाचित तीच अपेक्षा आहे. आपल्या राजिनाम्यावर राहुलही हट्ट धरून बसलेत, तेव्हा त्यांना कार्यकारिणी व श्रेष्ठी म्हणून मिरवणार्‍या नाकर्त्या नेत्यांचेही राजिनामे हवे आहेत. पण त्यापैकी कोणी राहुलसोबत सती जायला राजी नाही, म्हणून हे नाटक रंगलेले आहे. प्रदेशाध्यक्ष वा अन्य पदाधिकार्‍यांच्या राजिनाम्याशी राहुलना कर्तव्य नाही. त्यांना कार्यकारिणी व मुख्यमंत्र्यांनी राजिनामे घेऊन पुढे यावे अशी अपेक्षा आहे. पण त्यापैकी कोणी तितका त्याग करायला राजी नाही, तिथेच घोडे अडलेले आहे. कारण राहुलचा राजिनामा खोटा आहे याची सर्व ज्येष्ठ नेत्यांना पक्की खात्री आहे. पण त्याच्या नादी लागून आपण राजिनामे दिले, तर ते मात्र स्विकारले जाण्याचा धोका प्रत्येकाला ठाऊक आहे. म्हणूनच त्यापैकी कोणी तसे करायला राजी नाही आणि राहुलचा तिथेच मुखभंग झालेला आहे. पण याहीवेळी त्यांना मते देणारा १२ कोटी मतदार ते बारकाईने बघतो आहे आणि त्याची किंमत तोच अपमानित मतदार पुढल्या प्रत्येक निवडणुकीतून वसुल केल्याशिवाय रहाणार नाही. कारण जो काही तमाशा चालू आहे, त्यातून त्याच निष्ठावान कॉग्रेस मतदार जनतेची अवहेलना चालू आहे. तिने पाठ फ़िरवली तर विधानसभा व लोकसभा सोडा; महापालिका जिल्हा परिषदा जिंकणेही अशक्यप्राय होऊन जाईल. म्हणून तर जिल्हा तालुका पातळीवरच्या नेत्यांनी कॉग्रेस सोडायचा सपाटा लावला आहे आणि श्रेष्ठींचे शेफ़ारलेले पोर ‘अजूनी रुसूनी आहे’ असा सुर आळवत बसलेले आहे.

Tuesday, July 2, 2019

पेरले तेच उगवते आहे

Image result for lakshmi parvati amma

आंध्राचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आता राज्यव्यापी पदयात्रा काढायचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कारण त्यांच्या हातातून राज्यातली सत्ता गेलेली आहे आणि तेव्हा त्यांना आंध्रप्रदेशात जनता किंवा मतदार असल्याचा साक्षात्कार झालेला असावा. कारण मागल्या वर्षभरात हेच चंद्राबाबू आपल्या राज्यात जनता असल्याचे पुरते विसरून गेलेले होते. किंबहूना आंध्र नावाचे राज्य आहे आणि मुख्यमंत्री म्हणून तिथल्या जनतेचे आपण काही देणे लागतो, याचेही भान त्यांना उरलेले नव्हते. म्हणूनच की काय, त्यांनी आपल्या राज्याकडे साफ़ पाठ फ़िरवून केंद्रातील मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी आटापिटा चालविला होता. त्यासाठी देशव्यापी दौरा काढून विविध राज्याचे पक्षनेते व मुख्यमंत्र्यांना शाली घालून त्यांचे सत्कार करण्यात चंद्राबाबू रमलेले होते. मात्र त्यांच्या राज्यातला विरोधी नेता जगनमोहन रेड्डी सातत्याने पदयात्रा काढून जनतेला भेटत होता, किंवा तिच्या समस्या समजून घेत होता. सहाजिकच मतदानाची वेळ आली, तेव्हा मतदाराने जगनला प्रतिसाद दिला आणि बिचारे चंद्राबाबू अक्षरश: रस्त्यावर आलेले आहेत. कारण राज्यात सत्तांतर होऊन रातोरात चंद्राबाबू रस्त्यावर आलेले आहेत. त्यांचे फ़क्त मुख्यमंत्रॊपद गेलेले नाही, तर जिथे त्यांचे वास्तव्य होते, ती खाजगी इमारतही उध्वस्त करण्याचा फ़तवा नव्या मुख्यमंत्र्याने काढलेला आहे. अर्थात नवख्या लोकांना यात काही चमत्कारीक वाटले तरी राजकीय इतिहासाची जाण असलेल्यांना त्यात नवे काहीही वाटणार नाही. किंबहूना चंद्राबाबूंनी पुर्वायुष्यात जे पेरले तेच आता उगवून आले असेच म्हणावे लागेल. त्यांनी दोन दशकापुर्वी काय पेरले होते? आज त्यांच्या सासूबाई जावई देशोधडीला लागल्याने इतक्या कशाला सुखावल्या आहेत? कोण आहेत चंद्राबाबूंच्या सासूबाई? त्यांच्या अशा आनंदाचे कारण काय आहे? चंद्राबाबूंचे मुख्यमंत्रीपद कशातून आलेले होते?

चंद्राबाबू मागल्या पाव शतकापासून तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. पण तो पक्ष त्यांनी स्थापन केलेला नाही, किंवा त्याचे संस्थापक सदस्य अशीही कुठे नोंद मिळू शकणार नाही. कारण हा पक्ष स्थापन झाला, तेव्हा चंद्राबाबू स्वत:च कॉग्रेस पक्षात होते आणि त्यांचे सासरे एन. टी. रामाराव यांनी या पक्षाची स्थापना कॉग्रेसला आंध्र प्रदेशातून संपवण्यासाठीच केलेली होती. त्याचेही काही कारण होते. १९८० नंतर इंदिराजी पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्यावर त्यांचे वारस म्हणून संजय गांधींचा राजकीय उदय झाला होता. पण अल्पावधीतच एका विमान अपघातात त्यांचे आकस्मिक निधन झाले. तेव्हा त्यांच्या जागी त्यांचे थोरले बंधू राजीव गांधी यांची राजकीय वारस म्हणून निवड झाली. पक्षाध्यक्ष इंदिराजींनी राजीवना पक्षाचे महासचिव म्हणून नेमले आणि राजीव देशाच्या विविध राज्यात जाऊन आपला परिचय करून घेत होते. मग तिथले कॉग्रेस नेते त्यांच्या पाया पडायला तात्काळ हजेरी लावायचे. असेच राजीव आंध्रप्रदेशात आलेले होते आणि हैद्राबाद विमानतळावर त्यांच्या स्वागताला तिथले कॉग्रेस मुख्यमंत्री टी. अंजय्या अगत्याने उपस्थित होते. तर कारभार सोडून तोंडपुजेगिरी करायला इथे कशाला आलात, अशा शब्दात राजीवनी त्यांची अवहेलना केलेली होती. चारचौघात आपली अशी विटंबना अंजय्यांना सहन झाली नाही आणि ते तिथेच रडू लागले. त्याचे एक छायाचित्र ‘एनाडू’ नावाच्या दैनिकाने प्रसिद्ध केले आणि मग त्या राज्यात तेलगू अस्मितेचा विषय गाजू लागला. अनेक तेलगू मान्यवर संतप्त झाले आणि मुख्यमंत्र्याचा अवमान म्हणजेच तेलगू अस्मितेची पायमल्ली, असा अर्थ लावून मोठी मोहिमे छेडली गेली. तेव्हा रामाराव हे तेलगू चित्रपटातील सुपरस्टार होते आणि अनेक मान्यवरांच्या आग्रहाला मान्यता देऊन त्यांनी प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व करण्यास पुढाकार घेतला. त्यातून तेलगू देसम पक्षाची स्थापना झाली आणि तेव्हाही चंद्राबाबू अंजय्या सरकारमध्ये मंत्री होते.

१९८३ सालात जेव्हा विधानसभा निवडणूका आल्या, तेव्हा तेलगू देसम आणि रामाराव हे कॉग्रेससमोरचे मोठे आव्हान ठरले आणि त्या नव्या पक्षाने कॉग्रेसला पराभूत करून दाखवले. सासरा मुख्यमंत्री झाल्यावर चंद्राबाबू कॉग्रेसला रामराम ठोकून तेलगू देसम पक्षात आले. पुढे राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आणि रामारावांना सत्ता सोडावीही लागलेली होती. पण पुन्हा मध्यावधी घेऊन त्यांनी बहूमतासह सत्ता मिळवली आणि पाच वर्षांनी सत्ता गमावली सुद्धा. मात्र राजकारणात टिकून रहाण्याचे बक्षीस त्यांना मतदाराने पुन्हा दिले आणि १९९५ सालात रामाराव पुन्हा सत्तेवर आले. पण यावेळी त्यांच्या कुटुंबात मोठा बदल झालेला होता. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूने एकाकी झालेल्या रामाराव यांनी उतारवयात एका विवाहितेशी दुसरा विसाह केला. ती त्यांच्या एका कार्यकर्त्याची पत्नी होती. पण तिला घटस्फ़ोट घ्यायला भाग पाडून रामारावांनी दुसरा विवाह केला. तो त्यांच्य कुटुंबाला व मुलांनाही मान्य नव्हता. तिथून मग घरातली सुंदोपसुंदी सुरू झाली आणि मुत्सद्दी मुरब्बी चंद्राबाबूंनी त्याचा पुर्ण लाभ उठवला. सासर्‍याच्या या दुसर्‍या विवाहाला विरोध करणार्‍या मुले मुलांची आघाडी भक्कम केल्यावर चंद्राबाबूंनी आमदार व पक्षातही रामारावांच्या विरोधातली फ़ळी उभी केली आणि रामाराव यांना सत्ताभ्रष्ट करीत चंद्राबाबूंनी मुख्यमंत्रीपद बळकावलेले होते. आपले संपुर्ण कुटुंबच विरोधात गेल्याने व सत्ताही गमावल्याने रामाराव खुप खचले होते. त्यांनी मतदार जनतेला आपल्या बाजूने उभे करण्यासाठी नव्याने पदयात्रा आरंभली. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि तेलगू देसम पक्ष दुभंगला होता. आज जसे एकामागून एक आमदार खासदार चंद्राबाबूंना सोडून भाजपा, कॉग्रेस किंवा जगन रेड्डीच्या पक्षात जात आहेत, तशीच काहीशी तेव्हाची स्थिती होती. ती सासर्‍यावर जावई चंद्राबाबूंनी आणलेली होती. रामाराव यांचा त्यातच मृत्यू झाला आणि त्यांचे उरलेले सहकारीही चंद्राबाबूंना शरण गेले.

याच दरम्यान १९९६ सालात अकराव्या लोकसभेच्या निवडणूका आल्या, तेव्हा रामाराव हयात नव्हते आणि त्यांच्या विधवा दुसर्‍या पत्नी लक्ष्मी पार्वती यांनी त्याच्याच पुतळ्याची पदयात्रा काढून निवडणुका लढवल्या होत्या. पण त्यांच्यापाशी रामाराव यांचा करिष्मा नव्हता, की संघटनात्मक बळ नव्हते. त्यामुळे चंद्राबाबूंच्या हाती पडलेला तेलगू देसम हाच गट अधिकृत पक्ष ठरला. त्याला आता २३ वर्षाचा कालखंड होऊन गेला आहे. दरम्यान कॉग्रेसपाशी त्या राज्यात कोणी दमदार नेता नसल्याने नायडू १९९९ च्या विधानसभाही जिंकले होते आणि पुढल्या काळात त्यांनी हैद्राबादला माहिती तंत्रज्ञानाची राजधानी बनवण्यातून आपली किर्ती मिळवली होती. तेव्हा पत्रकार चंद्राबाबूंना मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा आंध्राचे राजकीय मुख्याधिकारी म्हणूनच कौतुक करीत होते. त्याच दरम्यान देशाच्या राजकारणातही उलथापालथ झालेली होती. केंद्रात आघाडी बनवून भाजपाने सत्ता मिळवली होती आणि तिला हातभार लावण्याची कोलांटी उडी चंद्राबाबूंनी मारून दाखवली होती. तोवर पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवून फ़ेडरल फ़्रन्टचे संयोजक झालेल्या नायडूंनी १९९८ साली एनडीएला कमी पडणारी संख्या पुरवून वाजपेयींना निर्वेध सत्ता उपभोगण्याची सोय केली. मात्र आपल्या तंत्रज्ञान समर्थनाची त्यांना इतकी झिंग चढलेली होती, की सामान्य जनता शेतकरी कष्टकरी यांच्याकडे त्यांनी पाठ फ़िरवली होती. तीच पोकळी भरून काढणारा नेता तेव्हाच कॉग्रेस पक्षाला सापडला आणि चंद्राबाबूंचे ग्रह फ़िरत गेले. त्याचे नाव राजशेखर रेड्डी त्याने सहासात महिने आंध्रातील खेडोपाडी फ़िरून पदयात्रा केली आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याला दिलासा देणारा प्रचार केला. त्याच्या परिणामी चंद्राबाबूंचा पक्ष २००४ च्या निवडणूकीत जमिनदोस्त झाला. कॉग्रेसला आंध्रानेच अशी संख्या दिली, की पुन्हा एकदा कॉग्रेसने आघाडी बनवून देशाची सत्ता सोनियांच्या नेतृत्वाखाली काबीज केली.

२००४ सालातच नव्हेतर राजशेखर रेड्डी यांनी पुन्हा २००९ सालातही त्या राज्यातील जनतेचा विश्वास संपादन करताना मोठे यश मिळवले आणि चंद्राबाबू पराभवाच्या गर्तेत ढकलले गेले. मात्र कॉग्रेसश्रेष्ठींना आंध्र आपल्या हातात ठेवता आला नाही. म्हणून २०१४ सालात् पुन्हा मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन नायडूंना मुख्यमंत्रीपद मिळू शकले. २००९ची निवडणूक जिंकल्यावर् राजशेखर रेड्डी यांचा लौकरच अपघाती मृत्यू झाला आणि त्यांचा वारसा आपल्याला मिळावा असा त्यांचे सुपुत्र जगनमोहन यांचा अट्टाहास होता. तो सोनियांनी जुमानला नाही आणि जगन ऐकेना तेव्हा त्याच्यामागे सूडबुद्धीने आयकर व अन्य यंत्रणांच्या तपासाचे शुक्लकाष्ट लावले. त्यामुळे जगन कॉग्रेसमधून बाहेर पडला आणि कुवत नसलेल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदी बसवून सोनियांनी तिथे आपल्याच पक्षाची कबर खोदून घेतली. कॉग्रेसमधून हळुहळू एक एक नेता जगनच्या आश्रयाला जात राहिला. किंवा चंद्राबाबूंच्या गोटात दाखल होत गेला. तेव्हा जगनला संपवण्यासाठी सोनियांनी आंध्रचे विभाजन करण्याची मागणीच मान्य करून टाकली आणि त्याचा जगनला अधिकच लाभ मिळाला. तेलंगणा व आंध्र अशा दोन्ही राज्यातून कॉग्रेसचे नामोनिशाण पुसले गेले आणि मोदींलाटेवर स्वार होऊन चंद्राबाबू पुन्हा उरलेल्या आंध्राचे मुख्यमंत्री होऊ शकले. दरम्यान कॉग्रेस नेस्तनाबुत झाली होती आणि बहुतांश नेते जगनच्या आश्रयाला गेलेले होते, तेलगंणाताले कॉग्रेसनेते चंद्रशेखर राव यांच्या पक्षात निघून गेले. पण तरीही उरलेल्या आंध्रामध्ये चंद्राबाबू हा लोकप्रिय नेता नव्हता. सासर्‍याची पुण्याईच त्यांना राजकारणात तगवू शकलेली होती. कारण तेलगू देसम व जगनच्या पक्षाची मते समसमान होती. तरी भाजपाच्या किरकोळ मतांच्या भारामुळे तेलगू देसमला २०१४ सालात बहूमत व सत्ता मिळालेली होती. पण गेल्या वर्षी नायडूंनी मोदींना हुलकावण्या दिल्या आणि आपल्याच पा्यावर धोंडा पाडून घेतला.

२००३ सालात गुजरात दंगलीनंतर नायडूंनी एक मोठी राजकीय चुक केली होती. त्यांनी आपल्या लोकप्रियतेच्या भ्रमात वहावत जाऊन एनडीए सोडली आणि विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूकीचा जुगार खेळला होता. त्यातच त्यांनी सत्ता गमावली. नेमकी तीच चुक त्यांनी पंधरा वर्षानंतर २०१९ सालात राज्याला विशेष दर्जा मिळावा म्हणून एनडीए सोडून केली. तेव्हा म्हणजे २००३ सालात शेतकरी आत्महत्येचा गाजावाजा करीत राजशेखर रेड्डी राज्यभर पदयात्रा करीत फ़िरले होते आणि त्याकडे नायडूंनी ढुंकूनही बघितले नव्हते. आताही रेड्डीफुत्र जगन अनेक महिने पदयात्रा करून राज्यव्यापी फ़िरत असताना नायडू काय करीत होते? चंद्राबाबू देशव्यापी दौरे करून मोदी विरोधातली आघाडी उभारण्यासाठी अनेक प्रादेशिक नेत्यांना शाली घालून सत्कार करीत होते. दिल्ली, चेन्नई, बंगलोत वा कोलकात्याच्या यात्रा करीत होते. त्याची किंमत मतदानात मोजावी लागलीच आहे. पण् पक्षातही आता कोणी त्यांच्या विश्वासाचा उरलेला नाही. तेलंगणा असो किंवा आंध्रात असो, त्यांच्या पक्षाचे नेते व आमदार त्यांना सोडून अन्य पक्षात निघून जात आहेत. तेव्हा कुठे चंद्राबाबूंना जनतेची आठवण झालेली आहे. आपल्या विरोधकांनीच नव्हेतर पक्षसंस्थापक सासरे रामाराव यांनी पदयात्रा करूनच जनतेचा विश्वास संपादन केल्याचे स्मरण या दिर्घकालीन मुख्यमंत्र्याला झालेले आहे. आपल्याला कुमारस्वामी, ममता किंवा मायावती, येच्युरी, राहुल गांधी मते मिळवून देऊ शकत नसल्याचा साक्षात्कार, सत्ता गमावल्यानंतर नायडूंना झाला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यभर पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण नव्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्याविरुद्ध बोलण्यासारखे त्यांच्या हाती आज तरी काहीही मुद्दे नाहीत. सासरे रामाराव यांच्यासारखा करिष्माही नायडू यांच्यापाशी नाही. म्हणूनच आताच पदयात्रा काढण्यापेक्षा त्यांनी पक्षाला लागलेली गळती थांबवायला प्राधान्य देण्याची गरज होती.

थोडक्यात आता पदयात्रा काढून त्यांना काहीही साध्य होणार नाही किंवा हाती लागणार नाही. त्यापेक्षा शांतपणे आपल्या कुठे कुठे चुका झाल्या, त्याचा ताळेबंद मांडावा आणि त्याच चुकांची पुनरावृत्ती होणार नाही अशी रणनिती आधी बनवावी. कारण् दोनतीन दशकाच्या राजकीय अनुभवातून हा नेता काहीही शिकलेला नाही. जर शिकला असता, तर त्याने जुन्या चुका तशाच्या तशा करून आपला राजकीय कपाळमोक्ष करून घेतला नसता. मोदींना दिल्लीतून हुसकावून लावण्यापेक्षा, आपलेच आंध्र राज्यातील सत्तास्थान पक्के करण्याला प्राधान्य असावे, इतकेही त्याला समजू शकले नाही. त्याला मुरब्बी तरी कशाला म्हणायचे? उलट आता निवडणूक निकालानंतर त्यांच्याच पक्षातले अनेक खासदार नायडूंची साथ सोडून भाजपात दाखल झाले आहेत. किंबहूना त्याच खासदारांच्या विरोधात आयकर विभागाने कारवाई केल्यने सुडाचे राजकारण म्हणून नायडूंनी बोंब ठोकली होती. सीबीआयला आपल्या राज्यात येण्यावर प्रतिबंध घातला होता. तर तेच खासदार आता मोदींना शरण गेले आहेत आणि नायडूंना मिळाले काय? हाती आले धुपाटणे? पण त्यांच्या सासूबाई नायडूंची सत्ता जाण्याने जितक्या सुखावलेल्या नाहीत, तितक्या नायडूंना त्यांच्याच पक्षातले सहकारी सोडून जात असल्याने सुखावल्या आहेत. कारण नायडूंनी अशीच स्थिती लक्ष्मी पार्वती व त्यांचे दिवंगत पती रामाराव यांच्यावर आणलेली होती. घरातल्या विश्वासघात व दगाबाजीने रामाराव यांचा इहलोकीचा अवतार आटोपला होता आणि तसाच् काहीसा अनुभव आता नायडूना घ्यावा लागत असल्याने सासूबाई खुश झालेल्या असाव्या. तो त्यांचा घरातला कुटुंबातला मामला आहे. बाकीच्या जगातील राजकारण्यांसाठी हा एक कठोर धडा आहे. लबाडीने किंवा चतुराईने कर्तबगारीला कायम उल्लू बनवता येत नाही किंवा अन्य कुणाचे यश लुबाडता येत नाही. असा तो धडा आहे. जे पेराल ते उगवते आणि ते विषारीच असते.

Monday, July 1, 2019

पुन्हा ममतांची महाजोट

Image result for TMC mahajot cartoon

ममता बानर्जी यांनी कॉग्रेसशी संबंध तोडले आणि वेगळ्या प्रादेशिक पक्षाची चुल मांडली; त्याला आता दोन दशकाचा कालखंड उलटून गेला आहे. तेव्हा कॉग्रेसचे अध्यक्ष बॅन्डमास्टर सीताराम केसरी होते आणि ममताला हाताळणे त्यांना जमले नाही. ममताच्या नेतृत्वाखाली मग बंगालमधील नाराज कार्यकर्ते एकवटले. त्यांना नेतृत्व मिळाले. त्यामागची प्रेरणा तिथे दिर्घकाळ प्रस्थापित असलेल्या डाव्या आघाडीचे वर्चस्व संपवणे, अशी होती. ममता ह्या रस्त्यावरच्या लढवय्या म्हणुन प्रसिद्ध् होत्या आणि म्हणून डाव्यांशी लढायला तसेच नेतृत्व बंगालमध्ये हवे होते. मात्र मोजक्या कॉग्रेस कायकर्त्यांना घेऊन ते शक्य नव्हते. हे ओळखून ममतांनी इतर पक्षांची मदत मागितली. त्यापैकी एक होता, भाजपा! त्या काळात भाजपाला बंगालमध्ये दोनचार टक्केही मते मिळवता येत नव्हती, की नाव घेण्यासारखा कोणी नेता नव्हता. सहाजिकच ममता बानर्जींशी हातमिळवणी करून भाजपाने आपले बस्तान तिथे बसवण्याचा पवित्रा घेतला. मात्र ती आघाडी फ़ारकाळ टिकली नाही. १९९९ सालची ती गोष्ट आहे. पण त्या निवडणूकीत ममतांनी लोकसभेत ८ तर भाजपाने ४ जागा जिंकून डाव्यांसमोर मोठे आव्हान उभे केलेले होते. ममतांना त्या यशाची नशा चढली आणि त्यांनी लगेच डाव्यांची सत्ता उलथून पाडण्याचा हव्यास धरला. त्यासाठी त्यांनी महाजोट नावाचे पिल्लू सोडले होते. म्हणजे डावी आघाडी सोडून उरलेल्या सर्व पक्षांनी एकजुटीने विधानसभा लढवावी आणि डाव्यांचे बहूमत संपवावे, असा त्यांचा हेतू होता. तो तेव्हा साधला नाही. आज नेमक्या त्याच दिशेने ममता विचार करू लागल्या आहेत. त्यांना पुन्हा एकदा तीच स्वप्ने पडू लागलेली दिसतात. अन्यथा त्यांनी डाव्यांसहीत कॉग्रेसला आपल्या सोबत येऊन भाजपाला रोखण्याचे आवाहन केले नसते. थोडक्यात जुन्याच इतिहासाची पुनरावृत्ती बंगालमध्ये ममता घडवू पहात आहेत. तेव्हा काय व कसे झाले होते?

१९९९ च्या मर्यादित यशानंतर ममता एनडीएमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी घेतलेली होती. त्यांचेच एक सहकारी अजित पांजा यांनाही वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आलेले होते. पण २००१ च्या विधानसभा निवडणूका आल्या आणि ममतांना महाजोटचे वेध लागले. त्यांनी एनडीए बाजूला ठेवून कॉग्रेसच्या साथीने बंगाल विधानसभा निवडणूका लढवायला आघाडी केलेली होती. भाजपा सोबत कॉग्रेसला यायचे नव्हते म्हणून ममता रेल्वेमंत्रीपद सोडून मैदानात उतरल्या होत्या. अर्थात त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही आणि पुन्हा एकदा डाव्यांनी बाजी मारली. भाजपा आपला स्वतंत्रपणे लढून पराभूत झाला होता. तर ममतांच्या महाजोटलाही मतदाराने तितका प्रतिसाद दिला नव्हता. सहाजिकच विधानसभा निकाल लागले आणि ममतांची महाजोट विसर्जित झाली. ममतांनी आपला सेक्युलॅरीझम सोडून पुन्हा वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्रीपद स्विकारले होते. थोडक्यात डाव्यांना पराभूत करण्यासाठी ममता त्या कालखंडात कसल्याही राजकीय उड्या मारत होत्या किंवा कसरती करीत होत्या. डाव्यांचा कमालीचा द्वेष करताना त्यांना भाजपा अस्पृष्य वाटला नव्हता. किंवा डावी आघाडी पुरोगामी असल्याची काही पर्वा नव्हती. आता दोन दशकांनंतर चित्र पुर्ण बदलून गेले आहे. मध्यंतरी २००४ सालात बंगाली राजकारणाने ममतांना चांगलाच धडा शिकवला. त्या वगळता त्यांच्या पक्षाचा कोणीही लोकसभेत निवडून आला नव्हता. उलट त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या डाव्यांच्या पाठींब्यावर २००४ सालात कॉग्रेसने पुन्हा केंद्राची सत्ता हस्तगत केली आणि ममता बानर्जींचा राजकीव वनवास सुरू झाला होता. तो वनवास डाव्यांनी मनमोहन सरकारचा अणूकरारासाठी पाठींबा काढून घेण्यापर्यत चालू राहिला. पण त्याच घटनाक्रमाने ममतांना नवी राजकीय् संजिवनी दिलेली होती.

डाव्यांनी २००८ सालात मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला आणि २००९ च्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला बंगालमध्ये ममतांच्या आश्रयाला जावेच लागले, तेव्हा लोकसभेत ममतांची शक्ती घटली असली, तरी विधानसभा व स्थानिक संस्थांमध्ये ममतांच्या पक्षाने मोठी मुसंडी मारली होती. कॉग्रेसचे अनेक धडपडे कार्यकर्ते व स्थानिक नेते ममतांना जाऊन मिळाले होते आणि म्हणूनच् लोकसभेत कॉग्रेसला डाव्यांचे आव्हान पेलताना ममतांची मदत घ्यावी लागली. तिथून ममतांचा प्रभाव वाढत गेला. त्याचे पहिले प्रतिबिंब २००९ च्या लोकसभेतच पडलेले होते. डाव्यांना पहिला दणका त्याच निवडणूकीत बसला आणि ममता कॉग्रेस यांची आघाडी अधिक जागा घेऊन विजयी झाली होती. ती येऊ घतलेल्या भविष्याची चाहुल होती. पण लोकसभा निवडणूक व नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणूका; यातला फ़रक समजत नसलेल्या लोकांकडे डाव्या आघाडीचे नेतृत्व गेलेले होते. प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांना जमिनी हकीगत ठाऊक नव्हती. बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री असूनही या नव्या नेत्यांच्या मागे भरकटत गेले आणि त्यातून डाव्यांचा बंगालमधला र्‍हास सुरू झाला. त्याचा राजकीय लाभ उठवून ममता बंगालमध्ये यश मिळवू शकल्या. जे त्यांना महाजोट करून साधता आलेले नव्हते, तेच डाव्यांच्या गुंडगिरी व अराजकामुळे शक्य झाले. सक्तीने शेतकर्‍यांची जमिन सरकारने कब्जात घेण्याची दोन गावातील घटना त्याचे कारण झाली. सिंगुर व नंदिग्राम अशा दोन गावात पोलिस व डाव्या गुंडांनी हिंसेचे असे हैमान घातले, की त्या विरोधात लढायला पुढे येणारा आपोआप बंगालचा लोकप्रिय नेता होऊन जाणार होता. ती संधी ओळखून ममता सिंगुरला ठाण मांडून बसल्या आणि डाव्या सरकारला आपल्याच गुंडांना वेसण घालून शरण जावे लागले. पण त्यातूनच ममतांची लढवय्या अशी प्रतिमा उभी राहिली आणि त्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारू शकल्या.

मुद्दा इतकाचा, की हा इतिहास तपासला तर महाजोट करून ममतांना इथवर मजल मारता आलेली नाही. तर डाव्या सरकारची अरेरावी, मुस्कटदाबी आणि कार्यकर्त्यांची गुंडगिरी, याविषयीच्या नाराजीतून मतदार ममतांच्या आश्रयाला आला होता. त्यातूनच त्यांना दणदणित यश मिळाले होते. २००९ ची लोकसभा आणि २०११ साली झालेल्या विधानसभा निवडणूकांनी डाव्यांना बंगाली राजकारणात इतिहासजमा करून टाकले. २०११ मध्ये कॉग्रेसला सोबत घेऊन ममतांनी लोकसभेतील यश विधानसभा मतदानातही काम ठेवले. त्यांनी एकट्या आपल्या पक्षालाही बहूमत मिळवून दिले आणि लौकरच त्यांचा कॉग्रेसशीही खटका उडाला, तर त्यांनी पर्वा केली नाही. म्हणून तर २०१४ या लोकसभेत त्यांनी एकट्याने लढूनही ४२ पैकी ३२ जागा जिंकल्या होत्या. तो आत्मविश्वास आता कुठल्या कुठे गायब झाला आहे. त्या यशाची नशा मात्र आजही कायम आहे. कारण आपला शत्रू आपणच निर्माण करीत असल्याचे भान त्यांना उरलेले नव्हते. त्याचे मुख्य कारण २०१६ च्या विधानसभा निवडणूकीतील अपुर्व यश आहे. डाव्यांसह आघाडी केलेली कॉग्रेस आणि नव्याने आपले हातपाय पसरणारा भाजपा यांना धुळ चारून २९४ पैकी २१२ आमदार ममतांनी निवडून आणलेले होते. बंगाली मतदार आपला गुलाम असल्याची धारणा तिथून सुरू झाली आणि ममतांनी र्‍हासाला जणू आमंत्रणच दिले. डाव्यांनी कॉग्रेससोबत जाऊन आपला पाया खिळखिळा करून घेतला आणि ममतांच्या तृणमूल गुंडगिरीशी दोन हात करणारा कुठला पक्ष वा नेताच उरला नाही. नेमक्या अशा स्थितीचा फ़ायदा घ्यायला भाजपाने पुढाकार घेतला. तर आपला विश्वासू सहकारी हाकलून लावत ममतांनी भाजपाला मदतच केली. ममतांच्या यशाचा पडद्याआडचा शिल्पकार मुकूल रॉय नावाचा मुळचा कॉग्रेसी नेताच होता. भाच्याला आपला वारस बनवताना ममतांनी त्याचा रोष पत्करला. तोच मग ममतांना संपवायला भाजपात दाखल झाला.

आज मुकूल रॉय याची महत्ता ममतांना पुन्हा उमजलेली असेल. कारण त्याने अवघ्या दोन अडीच वर्षात बंगालमध्ये चमत्कार घडवून दाखवला आहे. कुठलाही नेत्याचा चेहरा समोर नसताना भाजपाने बंगालमध्ये ४२ पैकी १८ जागा जिकल्या आणि ममतांच्या १० खासदारांना पराभवाचे तोंड बघायची वेळ आली. त्याचे खरे श्रेय मुकुल रॉयना आहे, तितकेच ममतांच्या आक्रस्ताळीपणाला आहे. मात्र तोच दुर्गुण न सोडता ममतांना पुन्हा लढाई जिंकायची आहे. पण त्यांच्यापाशी जुना आत्मविश्वास उरलेला नाही आणि स्वबळावर भाजपाशी लढायची हिंमत, त्या लोकसभा निकालानंतर गमावून बसल्या आहेत. म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा अठरा वर्षे जुन्या महाजोट नामक महागठबंधनाचा राग आळवायला आरंभ केला आहे. डावे आणि कॉग्रेस यांनी आपल्या सोबत येऊन भाजपाचे आव्हान बंगालमधून परतून लावावे, असे ममतांनी म्हणून आवाहन केलेले आहे. त्याला निदान डाव्यांकडून साफ़ नकार आलेला आहे आणि कॉग्रेस तर विचार करण्याच्याही स्थितीत उरलेली नाही. अर्थात इतक्या झटपट ममता शरणागत होण्याची बिलकुल शक्यता नाही. म्हणूनच त्यांच्या या नव्या वाटणार्‍या महाजोट कल्पनेचा बोलविता धनी कोणी वेगळाच किंवा बाहेरचा सल्लागार असण्या़ची दाट शक्यता आहे. त्याचे नाव प्रशांत किशोर असे तर नाही? कारण अलिकडेच ममतांनी प्रशांतला बोलावून घेतले आणि त्याच्याशी विचारविनिमय केल्याचे वृत्त आलेले होते. असे सल्ले तोच देऊ शकतो. असाच सल्ला त्याने अडीच् वर्षापुर्वी राहुलना उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूका घोषित होण्यापुर्वी दिलेला होता. मात्र त्याची व्याप्ती व आवाका यायला वेळ लागला आणि राहुलनी आपल्यासह अखिलेश यादवचाही कपाळमोक्ष करून घेतला. एकूण सार इतकेच, की ममतांनी आपल्या आक्रस्ताळेपणा व उतावळेपणातून स्वत:ला २००४ च्या कालखंडात नेवून ठेवले आहे. म्हणूनच् त्यांना महाजोटचे वेध पुन्हा लागलेले आहेत.