मध्यंतरी आपल्या इमानदारीचा दाखला देण्यासाठी केजरीवाल यांनी एका जाहिर कार्यक्रमात देशातल्या मोठमोठ्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे लढवय्ये उमेदवार उभे करण्याची डरकाळी फ़ोडली होती. अर्थात या देशात केजरीवाल आणि त्यांनी निवडलेले त्यांचे मोजके सहकारी सोडल्यास प्रत्येकजण भ्रष्टच असल्यावर; वेगळी अशी यादी बनवण्याची गरज नव्हती. जो आम आदमी पक्षाचा सदस्य होईल, डोक्यावर त्यांची टोपी चढवील किंवा मिसकॉल देऊन त्यांचा सभासद होईल, तेवढे सोडले; मग उरलेले भ्रष्ट हा इतका सोपा सिद्धांत मांडल्यावर केजरीवाल यांनी वेगळी यादी कशाला सांगावी? ते एक कोडेच आहे. खरे पाहिल्यास त्यात रहस्य कुठलेच नाही. केजरीवाल किंवा त्यांच्या टोळीला आपली इमानदारी सिद्ध करण्यासाठी सतत कोणाला तरी भ्रष्ट ठरवावेच लागते. ज्या दिवशी कोणाला भ्रष्ट ठरवले नाही वा तसा कुठला आरोप केला नाही, तर त्यांना आपणच भ्रष्ट झालो की काय, अशी भिती सतावत असते. मग त्यांना असला खुळेपणा करावाच लागतो. आणि जेव्हा असल्या खुळेपणाला प्रसिद्धी द्यायला उतावळ्या कॅमेरावाल्यांची सभोवती झुंबड उडालेली असते; तेव्हा तर केजरीवाल यांना संपुर्ण मफ़लर घशात कोंबला तरी गप्प बसणे शक्य नाही. सहाजिकच त्यांनी देशातल्या काही मोठ्या नेत्यांना भ्रष्ट म्हणून जाहिर करून टाकले होते. मग कोणी विचारले, त्यात राहुल गांधी, सोनिया गांधी वा नरेंद्र मोदी यांची नावे कशी नाहीत? ते तीन नेते स्वच्छ आहेत काय? लगेच दुसर्या दिवशी केजरीवालांनी त्यांनाही भ्रष्ट यादीत टाकून दिले. पुढले काही दिवस मग त्यांचा जीव भांड्यात पडला. पण पुन्हा केजरीवालांना आपण भयंकर भ्रष्ट झाल्याची स्वप्ने पडू लागली आणि त्यांनी मुकेश अंबानीची तेलविहीर उकरून काढली.
अर्थात केजरीवाल यांची पहिली यादी वाया गेली नाही. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, भाजपा नेते व्यंकय्या नायडू व नितीन गडकरी यांनी ताबडतोब कायदेशीर नोटिसा पाठवल्या आणि खुलासा मागितला. अर्थात कुठलाही खुलासा द्यायला केजरीवाल बांधील नसतात. माहितीचा अधिकार आम आदमी असल्याने एकट्या त्यांनाच मिळालेला आहे. आणि त्यांच्याकडून कोणी कसलीही माहिती मागू शकत नाही, अशी त्यांची ठाम समजूत आहे. त्यामुळेच मग केजरीवाल वा त्यांच्या टोळीतील कोणीही कायदेशीर नोटिशीला उत्तर देण्याचे कष्ट घेतले नाहीत. अर्थात खुद्द केजरीवाल यांच्यावरही आजपर्यंत मोठमोठे आरोप झालेले आहेत. पण त्यांनी त्याविषयी कधी खुलासे केलेले नाहीत किंवा कुणाला बदनामीच्या नोटिसाही पाठवलेल्या नाहीत. त्याचेही कारण आहे. कोणीही कसलेही घाणेरडे आरोप केल्याने केजरीवाल यांचे काहीही बिघडत नाही. त्यांना अब्रुच नाही, तर त्यांनी बेअब्रुचा दावा करण्यात अर्थ कुठला? ते नेहमी अगत्याने सांगत असतात, आमची औकात काय? औकात म्हणजेच लायकी वा अब्रु. त्यामुळेच त्यांच्यावर कुठलेही आरोप करा, केजरीवाल ढिम्म हलत नाहीत. कधी कोणाला नोटिस देऊन माहितीचा अधिकारही वापरत नाहीत. निमूट आरोप मान्य करतात. मात्र आता त्यांनाही माहितीच्या अधिकाराखाली आणायचे धाडसी पाऊल गडकरी आदींनी उचलले आहे. त्यांनी कोर्टात धाव घेऊन केजरीवाल यांनी लपवून ठेवलेली या बड्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती उघड करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. माहिती अधिकाराचे सर्वात लढवय्ये केजरीवाल इथे ही लपवाछपवी कशाला करीत असावेत? असो, गडकरी कसे व किती भ्रष्ट आहेत, त्याची केजरीवालांनी लपवलेली माहिती आता कोर्टासमोर आणावीच लागणार आहे.
केजरीवाल यांच्या नावावर एक नवाच पराक्रम नोंदला गेला आहे. गडकरी व अन्य राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती लपवणारा इमानदार, असा तो विक्रम आहे. मात्र तो फ़ार काळ टिकणार नाही. कारण दिल्लीतल्या एका कोर्टाने आता केजरीवाल यांना हजर होण्याचे समन्स बजावले असून गडकरींच्याच मागणीवरून त्यांना गडकरींचा भ्रष्टाचार उघड करावा लागणार आहे. एका राष्ट्रीय नेत्याचा भ्रष्टाचार त्याने लपवण्याऐवजी भ्रष्टाचार निर्मूलन चळवळीचा नेता लपवतो; असा हा जगावेगळा विक्रम पराक्रम आहे. त्यातही मोठा चमत्कार म्हणजे गडकरी यांच्यासारख्या ‘भ्रष्ट माणसाला’ आपलाच भ्रष्टाचार जाणून घ्यायला केजरीवाल यांना कोर्टात खेचावे लागले आहे. जगाच्या पाठीवर असे कधी घडले आहे काय? गुन्हेगार हा नेहमी कायद्यापासून पळतो आणि कोर्टात जायला घाबरत असतो. पण इथे उलटेच घडते आहे. एक भ्रष्टाचारी नेता आपल्या पापाचा पुरावा कोर्टात आणण्यासाठी एका दुधाने धुतलेल्या चारित्र्यसंपन्न माणसाला कोर्टात खेचतो आहे. गुन्हेगारच आपल्याविरुद्धचे पुरावे मागायला कोर्टात धावला आहे. आणि इमानदार मात्र कोर्टात जाण्यापासून टाळाटाळ करतो आहे. किती अजब मामला आहे ना? नुसतेच आरोप करून पळ काढायच्या या नाटकात आता सत्वपरिक्षेची वेळ आलेली आहे. कारण माध्यमातून बेछूट आरोप करून पळ काढणार्याला आता त्याच आरोपाचे पुरावे कोर्टात द्यावे लागणार आहेत. आपण सत्यवचनी व इमानदार असल्याचे हवाले केजरीवाल व त्यांचा पक्ष नेहमीच देत असतो. आता त्यांचे वचन सत्य असल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. खैरनार होण्याच्या दिशेने केजरीवाल यांनी गेल्या दोनचार महिन्यापासून वाटचाल सुरू केली होती. आता कोर्टातच त्यांच्या त्या वाटचालीचा निकाल लागणार आहे.