Wednesday, February 26, 2014

पक्षांतराचा मजेशीर इतिहास



  बिहारमध्ये सध्या जे नाटक चालू आहे, तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल पस्तीस वर्षापुर्वी झालेले होते. फ़रक असेल तर किंचितसा आहे. तेव्हा देशात पक्षांतराचा कायदाच नव्हता. त्यामुळे कुणा नेत्याला आमदार मोजून घाऊक पद्धतीने फ़ोडफ़ोडी करावी लागत नव्हती. १९७८ सालात कॉग्रेस पक्षात फ़ुट पडली होती आणि देशाप्रमाणेचा महाराष्ट्रातही जनता लाट होती. पण जनता पक्ष व त्याच्या मित्रांची संख्या बहूमताच्या खुपच अलिकडे येऊन अडकली. उलट कॉग्रेस आणि फ़ुटलेली इंदिरा कॉग्रेस यांना मिळून सव्वाशेच्या आसपास जागा मिळालेल्या होत्या. म्हणजे त्यांनीही एकत्र यायचे ठरवले तरी बहुमताचा पल्ला गाठला जाणार नव्हता. तरीही मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी थेट दिल्ली गाठून इंदिराजींनाच साकडे घातले. त्यांच्याच पाठींब्याने महाराष्ट्रात पहिले संयुक्त सरकार स्थापन करण्याचा घाट घातला. दादा तेव्हा यशवंतराव चव्हाणप्रणित कॉग्रेसमध्ये होते, तर इंदिरा कॉग्रेसचे नेतृत्व नासिकराव तिरपुडे करीत होते. त्यांनी एकत्र येऊन सत्तेचे वाटप केले आणि जनता पक्षाला हात चोळत बसावे लागले. कारण त्यात जुने समाजवादी निहाल अहमद आणि जुने जनसंघवाले (म्हणजे आजचे भाजपावाले) उद्धवराव पाटील यांचाच नेतृत्वासाठी आग्रह धरून बसले होते. त्यांच्या भांडणात जनता पक्षाचा नेता निश्चित होईपर्यंत वसंतदादांनी दिल्लीत जाऊन सत्तेचा मार्ग मोकळा करून घेतला होता. पण प्रत्यक्षात त्यांच्यापाशी १४५ आमदार नव्हते. मग त्यांनी डझनभर अपक्ष आमदारांना सोबत घेतले. पण त्यातही त्रुटी होती. जेव्हा प्रत्यक्षात सभागृहात बहूमत सिद्ध करायची वेळ आली, तेव्हा काठावरचे बहुमत सिद्ध करताना दादांनी जनता पक्षाच्या पाठींब्यावर निवडून आलेल्या एका अपक्षालाही आपल्यात ओढले आणि सत्ता टिकवली होती.

   गजाननराव गरूड असे त्या अपक्षाचे नाव होते आणि त्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन गणित सोडवण्यात आलेले होते. त्या सरकारमध्ये दोन्ही कॉग्रेस अधिक जाबुंवंतराव धोटे यांचा फ़ॉरवर्ड पक्षही सहभागी होता. मात्र ते सरकार फ़ारकाळ चालू शकले नाही. त्याचे पहिले कारण म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे वर्चस्व झुगारून वसंतदादांनी इंदिराजींचा कौल घेतला होता. त्याचाच फ़ायदा घेऊन अवघे अडतीस वर्षे वय असलेले शरद पवार यांनी दादांच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले. अर्थात त्यासाठी त्यांनी जनता पक्षाचे वडीलधारे सात्विक नेते एस एम जोशी यांचा आशीर्वाद घेतला होता. जनता पक्षाचा पाठींबा व सहभाग घेऊन मग शरद पवार थेट कोवळ्या वयात मुख्यमंत्री झाले. त्यांनी कॉग्रेसचे वीस आमदार फ़ोडून ऐन विधानसभा अधिवेशनातच सरकार पाडले. त्यांच्यासह तेव्हा सुशीलकुमार शिंदे व आणखी दोन मंत्र्यांनी राजिनामे दिले आणि धुमकुळ सुरू झाला होता. अर्थसंकल्प मांडलेला असताना दादांचे सरकार पडले. मग जनता पक्ष, शेकाप यांच्यासह पवारांनी पुलोद म्हणजे पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून सरकार बनवले. त्यानंतर हळूहळू कॉग्रेसचे अनेक आमदार पवारांच्या गोटात येत गेले. त्यावेळी जनता पक्षाचे ९९ आमदार असूनही पवारांनी बहुतेक महत्वाची खाती आपल्याच कॉग्रेस सहकार्‍यांकडे ठेवली आणि जनता पक्षियांची किरकोळ पदांवर बोळवण केली होती. थोडक्यात आमदार फ़ोडणे व आमिषे दाखवून फ़ोडणे, महाराष्ट्रात तेव्हापासून प्रतिष्ठीत झाले. पुढल्या काळात त्याची पुनरावृत्ती अनेकदा होतच राहिली. १९९१ अखेर पक्षांतर कायदा नवाकोरा असताना शिवसेना भाजपा मोठे पक्ष होऊन समोर आलेले होते, त्यांच्यातही मंत्रीपदाचे आमिष दाखवून फ़ोडाफ़ोडी झालेली आहे.

   अर्थात पवार किंवा वसंतदादांच्या त्या राजकारणाला फ़िके पाडणारे पक्षांतराचे किस्से उत्तर भारतात अधिक आहेत. महाराष्ट्राला तिथपर्यंत पोहोचायला खुप वर्षे लागतील. १९८० नंतर पुन्हा देशातली जनता लाट ओसरली होती आणि प्रचंड बहूमताने इंदिराजी पंतप्रधान झाल्या होत्या. त्यांनी केलेले पहिले काम म्हणजे जनता पक्षाची सत्ता असलेल्या सर्वच विधानसभा बरखास्त केल्या आणि तिथे मध्यावधी निवडणूका घेतल्या. त्यात अर्थातच पवारांची पुलोदही वाहून गेली. महाराष्ट्रातही मध्यावधी निवड्णूका झाल्या. खरे तर ते काही महिने वगळता राज्यात कधी राष्ट्रपती राजवट लागली नव्हती. पण इंदिराजींच्या सपाट्यातून बचावले ते हरयाणातील जनता पक्षाचे मंत्रीमंडळ. येऊ घातलेले वादळ ओळखून तिथले जनता पक्षाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या मंत्रीमंडळ आणि सर्वच आमदारांसह थेट कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तिथेच विधानसभा टिकली व जनता सरकारच कॉग्रेस सरकार होऊन कायम राहिले. पुढे भजनलाल कॉग्रेसचे एक वजनदार नेता म्हणून विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकून राहिले. भुपेंद्रसिंग हुड्डा यांचा उदय झाल्यावरच भजनलाल इतिहासजमा झाले. तोच चमत्कार पुढे १९९३ सालात गुजरातमध्ये झाला होता. भाजपाच्या पाठींब्याने जनता दलाचे मुख्यमंत्री झालेले चिमणभाई पटेल, पुढे काही महिने कॉग्रेस पाठींब्यावर सत्ता टिकवून राहिले. पण ती टिकवण्यासाठी लौकरच सगळा जनता पक्ष घेऊनच कॉग्रेसवासी झाले. त्यानंतर पुन्हा गुजरातमध्ये जनता पक्ष उभा राहू शकला नाही आणि कॉग्रेस विरोधाची जागा भाजपा व्यापत गेला. त्याने मग कॉग्रेसही संपवली. आज त्या कॉग्रेसला भाजपातले नाराज गोळा करून पक्ष चालवावा लागतो. अशा एकूण पक्षांतराच्या गमतीजमती आहेत. बिहार त्यातला खुप जुना म्हणजे १९६० च्या दशकापासूनचा मुरब्बी खेळाडू आहे.

1 comment: