Sunday, February 23, 2014

मतचाचण्यांचे गुर्‍हाळ



   हल्ली अनेक मतचाचण्यांचा सपाटा लागला आहे. अशा मतचाचण्या घेणार्‍यांना त्याचे नेमके अर्थ ठाऊक असतात, पण त्यांच्याकडे बाजाराइतकी जर राजकीय समज नसेल; तर घेतलेल्या चाचण्य़ांच्या आकड्यांचे नेमके विश्लेषण त्यांनाही करता येत नाही. त्याच्याही पलिकडे अशा आकडे व टक्केवारी संबंधाने नुसतेच राजकीय अभ्यासक म्हणून मिरवणार्‍यांना चर्चेत सहभागी केले; मग आणखीनच सावळागोंधळ होत असतो. शनिवारी बिगफ़ाईट नामक एका कार्यक्रमात त्याबद्दलच चर्चा चालू असताना त्याची प्रचिती आली. त्यात भाजपातर्फ़े नरसिंहराव नामक एक चाचणीकर्ता सहभागी झाला होता; तर जदयु नामक नितीशकुमारच्या पक्षातर्फ़े पवन वर्मा नावाचे गृहस्थ सामील झाले होते. बाकीच्या चर्चेला अर्थ नाही. मतचाचण्यांवरील चर्चेतल्या विसंवादाची मिमांसा करायला या दोघात जुंपलेले भांडण रोचक ठरावे. नरसिंहराव हा भाजपाचा प्रवक्ता म्हणून अनेक चर्चेत दिसत असला, तरी तो लौकीकार्थाने पक्ष कार्यकर्ता नाही. त्यामुळेच चाचणीविषयी त्याचे मत गंभीरपणे घेण्याची गरज आहे. हल्ली होणार्‍या बहुतेक चाचण्यांमध्ये भाजपाचे नेते नरेंद्र मोदी हे बाकीच्या पक्ष व नेत्यांपेक्षा लोकप्रियतेमध्ये आघाडीवर दिसतातच. पण त्यांच्यामुळे भाजपाची उत्तर भारतासह अन्य प्रांतामध्ये लाट आलेली दिसते. अर्थात असे निष्कर्ष सेक्युलर विचारवंतांना पटणारे नाहीत. कारण देश सेक्युलर असल्याने त्या देशातल्या मतदाराने मोदींच्या विरोधातच असले पाहिजे; असा त्या विचारवंतांचा आग्रह असतो. त्याचाच परिपाक मग अशा विसंवादातून दिसतो. नऊ महिन्यांपुर्वी मोदीच भाजपातर्फ़े पंतप्रधान पदाचे उमेदवार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आणि नितीशकुमार यांनी सतरा वर्षाची मैत्री विसरून भाजपाशी संबंध तोडून टाकले होते.

   अर्थात तेव्हा त्यांनी आपला सेक्युलर बाणा दाखवण्यासाठीच ही जुनी मैत्री संपवली होती आणि म्हणूनच देशभरचे तमाम सेक्युलर विचारवंत नितीशची पाठ थोपटत होते. उलट भाजपा व मोदींना तो अपशकून असल्याचे छातीठोक अभ्यासपुर्ण दावेही केले जात होते. पण त्याचवेळी त्याचे दुष्परिणाम भाजपाला नव्हेतर नितीशना बिहारमध्ये भोगावे लागतील, असे भाजपा सांगत होताच. पण त्याचवेळी नरसिंहराव ह्या भाजपा प्रवक्त्यानेही त्याचीच ग्वाही दिलेली होती. अशावेळी नरसिंहराव यांच्या मताला महत्व इतक्यासाठीच होते, की हा माणूस व्यावसायिक चाचणीकर्ता आहे. आणि मागल्या तीन वर्षापासून तो भाजपासाठी देशव्यापी मतचाचण्य़ा घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यायला पक्षाला मदत करतो आहे. नितीशनी भाजपाशी संबंध तोडण्यापुर्वी याच माणसाने नितीशच्या पक्षाचे कसे त्यातून नुकसान होईल; याची आकडेवारी पवन वर्मा यांनाही दाखवली होती. त्याचे कारण पवन वर्मा हा नुसता जदयुचा नेता प्रवक्ता नाही, तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा राजकीय सल्लागारही आहे. परवाच्या कार्यक्रमात भाग घेताना राव यांनी तीच जुनी आठवण वर्मा यांना करून दिली. त्यामुळे वर्मा यांच्या जखमेवरची खपली काढली गेली. कारण नऊ महिन्यांपुर्वी जे आकडे राव यांनी सांगितले होते, तेच आकडे आता तमाम मतचाचयातून समोर येऊ लागले आहेत. त्याचा अर्थ इतकाच, की नितीशकुमार यांना त्यांच्या सल्लागारानेच खड्ड्यात घातल्याचे त्यातून समोर येत आहे. नरसिंहराव त्याचीच आठवण वर्मा यांना करून देत होता. अर्थात आजही ते आकडे वर्माच कशाला. कुठल्याही सेक्युलर विद्वानाला आवडणार नाहीत. ज्यांना वास्तवापेक्षा भासमात्र अवास्तवही प्यार असते, त्यांना वास्तवाचे चटके बसेपर्यंत सत्य स्विकारता येत नसते.

   नऊ महिन्यांपुर्वी एकटा नरसिंहरावच हे सांगत नव्हता. जयनारायण निषाद नावाचा जदयुचा खासदार व शिवराज सिंग नावाचा राष्ट्रीय सरचिटणिसही त्याचीच ग्वाही देत होता. त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली. म्हणून वास्तव बदलणार आहे काय? त्यातला निषाद हा थेट निवडून येणारा कार्यकर्ता आहे आणि त्याचे म्हणणे असे, की भाजपाच्या संघटनात्मक बळावरच जदयुला इतके मोठे यश मिळाले होते. मोदीद्वेषाने आघाडी मोडली तर त्याचा लाभ भाजपाला होऊन जदयुला तोटा होईल. नेमके तेच नरसिंहराव चाचणीच्या आकड्यातून दाखवत होता. म्हणजेच आता चाचण्या तेच आकडे दाखवू लागल्याने आपल्याच मुर्खपणा व हेकेखोरपणाची जाणिव झाल्याने पवन वर्माचा संताप त्या कार्यक्रमात झाला. त्याने भाजपा चाचण्यांसाठी पैसे देऊन खोटे आकडे दाखवत असल्याचा प्रत्यारोप केला. त्यातले तथ्य आणखी तीन महिन्यात मतमोजणी संपल्यावर समोर येणार आहे. कारण चाचण्यांचे खोटे आकडे दाखवून एकदोन टक्के मते फ़िरवता येऊ शकतात, लाट निर्माण करता येत नाही. मुद्दा मोदींच्या लोकप्रियता वा भाजपाच्या प्रभावाचा नसून कॉग्रेसने मागल्या नऊ वर्षात माजवलेल्या अराजकाचा आहे. त्याला गांजलेल्या व ग्रासलेल्या जनतेला पर्याय हवा आहे आणि त्यावेळी समोर उभा असलेला नेता म्हणून मोदींकडे लोकांचा ओढा वळलेला आहे. थोडक्यात बदनामीच्या व नकारात्मक प्रचारातून मोदींचा पर्याय माध्यमांसह सेक्युलर पक्षांनीच जनतेसमोर आणलेला आहे. त्याशिवाय प्रत्येकजण मोदींनाच रोखण्याची भाषा सातत्याने वापरून मोदींची लाट असल्याची अप्रत्यक्ष कबुली देतो, त्याची प्रतिक्रिया म्हणून ती मोदी लाट उसळी घेऊ लागली आहे. मात्र ती ज्यांना बघायची नाही, त्यांना बुडाल्यावरच त्याची प्रचिती येऊ शकणार आहे.

No comments:

Post a Comment