Monday, February 24, 2014

सेक्युलर झोपाळा


   मागल्या दोन दिवसात अकस्मात तमाम वाहिन्यांवरून केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाची जादू उतरली आहे. त्यांना मिळणार्‍या वारेमाप प्रसिद्धीची जागा आता पासवान यांनी व्यापली आहे. हे कोण पासवान; असा सवाल नव्या पिढीतल्या ‘आम’ पत्रकारांना पडू शकतो. कारण पासवान मागल्या पाच वर्षात प्रसिद्धीच्या झोतातून बाजूला पडले होते. राष्ट्रीयच नव्हेतर बिहारच्या राजकारणातही अडगळीत जाऊन पडले होते. आता अकस्मात त्यांचा पक्ष नवी वाट चोखाळण्य़ाचा तयारीत असल्याच्या अफ़वा पसरल्या आणि केजरीवाल यांचे अंबाणी पुराण पत्रकारांना बेचव वाटू लागले. त्यामुळे रामविलास पासवान यांच्या शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे. पासवान हे २००० सालाच्या आसपासचे महान सेक्युलर नेते आहेत. आज देशातले सर्व धर्मनिरपेक्ष नेते, पक्ष व विचारवंत जातीयवादी नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखण्याच्या गर्जना करीत आहेत. पण त्याची सुरूवात करणार्‍या महापुरूषाचे नाव रामविलास पासवान होते, याची त्यापैकी किती पत्रकारांना जाणीव आहे? २००२ सालात जेव्हा गुजरातची दंगल पेटली, तेव्हा पहिला सेक्युलर नेता दंड थोपटून मोदीविरुद्ध उभा ठाकला आणि ज्याने मोदींच्या हाकालपट्टीची मागणी करीत आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा फ़ेकला; त्याचे नाव होते पासवान. तेव्हा पासवान देखील नितीशकुमार यांच्याप्रमाणेच एनडीएच्या वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. पण नितीश आपल्या रेल्वेमंत्री पदाचा घट्ट चिकटून बसले आणि पासवान यांनी आपल्या मंत्रीपदासह एनडीएची साथ सोडली होती. त्यामुळेच मग त्यांचे भव्य स्वागत लालूंनी केले आणि सोनिया गांधी तर पासवानांच्या घरी अभिनंदन करायला गेल्या होत्या. त्यातून बिहारची नवी सेक्युलर आघाडी उदयास आलेली होती.

   आज सर्व क्षेत्रातले सेक्युलर धर्मनिरपेक्ष मोदींच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यासाठी सहा महिन्यांपुर्वीच नितीशनी एनडीए मोडण्यापर्यंत मजल मारली होती. वास्तविक ‘देरसे आये दुरुस्त आये’ म्हणत लालू व पासवान यांनी नितीशचे स्वागत करायला हवे होते. पण तेव्हा पासवान यांनी नितीशची खिल्ली उडवत रेल्वेमंत्रीपद कशाला सोडले नाही, असा सवाल केला होता. दुसरीकडे लालूंनीही तशीच टवाळी करीत नितीशना ढोंगी ठरवले होते. लालू पासवान मैत्रीसमोर मोदी टिकणार नाहीत आणि नितीशचा पर्दाफ़ाश होईल अशी ग्वाही दिलेली होती. अलिकडेच तुरूंगातून जामीन मिळाल्यावर कॉग्रेस पासवान यांच्या मदतीने लालू सेक्युलर आघाडीची डागडुजी करण्यात गर्क होते. इतक्यात आता त्याच आघाडीतून निसटलेले पासवान भाजपाच्या आश्रयाला निघाले असल्याच्या बातम्या आहेत. ज्यांना अकरा वर्षापुर्वी मोदी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून धोकादायक वाटत होता आणि त्यासाठीव वाजपेयींच्या मंत्रीमंडळात रहाणेही अशक्य झाले होते; तेच पासवान आता मोदींना पंतप्रधान करायला निघालेत काय? आणि त्यात तथ्यच असेल, तर त्या धर्मनिरपेक्षतेचे काय? मोदी आता धर्मनिरपेक्ष झालेत काय? अजून पासवान यांच्या मोदीप्रेमाची जाहिर घोषणा झालेली नाही. पण इन्कारही कुठून झालेला नाही. त्यामुळेच धर्मनिरपेक्ष विचारांची नेमकी व्याख्या व व्याप्ती काय, असा सवाल ऐरणीवर आलेला आहे, मुद्दा अर्थातच नवा नाही आणि व्याख्याही नव्या नाहीत, आपल्या देशाच्या राजकारणात सर्वच विचारधारा आणि त्यांच्या व्याख्या निवडणूकीत मिळू शकणारी मते, येणारे निकाल व सत्तावाटपातील मांडणी; यानुसार बदलत असतात. सहाजिकच पासवान यांची धर्मनिरपेक्षता वेळोवेळी बदलत असेल, तर त्याला सैद्धांतिक भूमिकाच म्हणायला हवे.

   २००४ च्या निवडणूकीत सत्तेसाठी लालू पासवान व कॉग्रेस एकत्र आले होते. पण नंतर विधानासभा निवडणुकीत वेगवेगळे लढताना त्यांची ताकद क्षीण झाली. पुढल्या लोकसभेत लालू पासवान यांनी कॉग्रेसला टांग मारली आणि त्याचा लाभ मिळवत नितीश भाजपाने बाजी मारली. त्यातून मग धर्मनिरपेक्ष पक्षांना बिहारमध्ये उतरती कळा लागली. आता नितीशनीही भाजपाची साथ सोडली आहे आणि देशात मोदींची लाट आलेली दिसू लागली आहे. अशावेळी लालूंनी पासवान यांना अवघ्या पाच जागा देऊ केल्या आहेत. मागल्यावेळी बारा जागा लढवून एकही जागा पासवान यांना मिळालेली नव्हती. आता वाटप करताना कॉग्रेसला सामावून घ्यायचे, तर लालू पाचच जागा देऊ इच्छित आहेत आणि पासवान यांना किमान नऊ जागा हव्या आहेत. तिथेच धर्मनिरपेक्षतेचे घोडे अडलेले आहे. शिवाय पाचपैकी कोणी निवडून येण्य़ाची शक्यता नाहीच. पण मोदी लाटेत पाच जागा मिळाल्या, तरी त्यातल्या तीनचार जिंकता येतील असा सोपा सेक्युलर हिशोब आहे. भाजपानेही एकटे लढताना पासवान सोबत आल्यास किरकोळ मतांनी पडणार्‍या चारपाच अधिक जागा आपल्या पदरात पडतील हा जातिय हिशोब मांडला आहे. पासवान यांचा सेक्युलर व भाजपाचा जातीय हिशोब निवडणूकीचे समिकरण साधणारा असल्याने, मग पासवान यांची सेक्युलर व्याख्या बदलली तर नवल कुठले? कारण भाजपा निवडून येण्य़ाची शक्यता अधिक व जागाही जास्त मिळाल्यास सातपैकी पाच नक्कीच येऊ शकतात. पासवानांची सेक्युलर विचारधारा अशी कार्यरत झाली आहे. त्यात मग त्यांनी गुजरात दंगलीतील मोदींचे पापक्षालन करून दिले; तर थक्क होण्याचे कारण काय? सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांचे असेच वैचारिक झोके घेणे चालू असते. पासवान त्यापैकीच एक सेक्युलर असल्यावर वेगळे काय व्हायचे?

   मात्र यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला मिळणारी प्रसिद्धी कमी होईल आणि त्यात त्यांची मुकेश अंबानी विरोधातील आरोपबाजी बाजूला वा अडगळीत पडण्याची दाट शक्यता आहे. तसे झालेच तर पासवान यांनाही मुकेश अंबानी यांनीच पैसे मोजून भाजपाच्या गोटात आणून सोडल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला, तर नवल वाटायचे कारण नाही. उलट देशच मुकेश अंबानी चालवतो, त्यामुळे त्यांच्यावरही असे भन्नाट आरोप करायला आपल्याला मुकेशनेच पैसे दिलेत आणि आम आदमी पक्षही अंबानीच चालवतो, असाही आरोप केजरीवाल कधीतरी करू शकतात. हा देश जादूटोण्य़ाचा आहे, असे पाश्चात्य लोकांना का वाटायचे, त्याचा केजरीवाल हा मोठाच पुरावा आहे.

No comments:

Post a Comment