Tuesday, February 18, 2014

देखो... सैया बेईंमान

 
    आपणच काय ते इमानदार असा सातत्याने डंका पिटणार्‍यांचे पितळ आता नित्यनेमाने उघडे पडू लागले आहे. डिसेंबर महियात चार विधानसभांची मतमोजणी होऊन कॉग्रेसचा दारूण पराभव झाला, तेव्हा दिल्लीत नवखा आम आदमी पक्ष पहिल्याच फ़टक्यात मोठ्या संख्येने निवडून आलेला होता, तो पराभव मान्य करताना कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपणही या नव्या पक्षाकडून शिकणार आहोत असे जाहिरपणे सांगितले होते. पुढल्या काळात त्या नवख्या पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आपणही या जुन्या पक्षांना राजकारण शिकवू अशा डरकाळ्या फ़ोडल्या होत्या. पण आता दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावर बघता हाच नवा इमानदार पक्ष त्या जुन्याजाणत्या पक्षांकडून बेईमानी शिकला आहे. इतकेच नव्हेतर त्यांनाही लाजवील इतकी बेशरमी बिनदिक्कतपणे करू लागला आहे. आजवरचे मुरलेले राजकीय नेते निदान उजळमाथ्याने बेइमानी करीत नव्हते. या नव्यांनी राजरोस बदमाशीचा धडाकाच लावला आहे. लोकपालसाठी आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग केल्याचे ढोल वाजवणार्‍या केजरीवाल यांनी पंधरा दिवसांपुर्वीच सरकारी प्रशस्त घर मिळवले होते. त्यानंतर दहाबारा दिवसातच पदाचा राजिनामा दिला. मात्र त्यानंतर कोणी विचारण्याआधीच आपण इतक्यात सरकारी घर सोडणार नाही असे त्यांनी सांगून टाकले. याला इमानदारी म्हणतात. लालूंची पत्नी राबडीदेवी यांचेही मुख्यमंत्रीपद गेल्यावर त्यांनीही झटपट मुख्यमंत्री निवास सोडायला नकार दिला होता. केजरीवालांचा निकष लावायचा तर मग राबडीदेवी सुद्धा मोठ्याच इमामदार म्हणायला हव्यात. कदाचीत त्यांना पराभूत करणारे नितीशकुमारच आम आदमी पक्षाच्या नियमानुसार भ्रष्टाचाराचे बिहारमधले शिरोमणी असायला हवेत ना?

   इमानदारीचा सर्वात मोठा निकष असतो, तो उक्ती आणि कृतीतल्या साम्याचा. केजरीवाल व त्यांच्या पक्षाने ज्या गोष्टी बोलून दाखवल्या, त्यापैकी बहूतेक गोष्टी व निकष प्रत्येकवेळी पायदळी तुडवले आहेत. कोणाचा पाठींबा न घेण्यापासून सरकारी बंगला, गाड्या न घेण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनी आपल्याच शब्दाची पायमल्ली केलेली आहे. जनता दरबार भरवून पळ काढला आणि कालपरवाच लोकपाल विधेयकाचा मसूदा शेवटपर्यंत आमदारांपासून लपवण्याला पारदर्शक कारभाराचे नाव दिले. असे कुठले नियम त्यांनी बनवले आणि पाळले, त्याचा भिंग घेऊनच शोध घ्यावा लागेला, अशीच एकूण स्थिती आहे. त्यातलाच ताजा नमूना म्हणजे लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा. मोठ्या बहुतेक पक्षाची धोरणे व निर्णय बंद खोलीत भिंतीआड होतात. जनतेला अंधारात ठेवून भूमिका ठरवल्या जातात, हा केजरीवाल यांचा आवडता नामजप होता. पण आता त्यांच्याच पक्षाच्या अंतर्गत कारभारात कुठलीही लोकशाही नसून मुठभर नेत्यांची हुकूमशाही चालते, असा आरोप होत राहिला आहे. आधी बिन्नी नावाच्या आमदाराने त्याविरुद्ध आवाज उठवला होता. आता त्याचेच पडसाद लोकसभेचे वीस उमेदवार जाहिर होताच उमटू लागले आहेत. पंजाबच्या लुधीयानापासून महाराष्ट्रातल्या नागपूरपर्यंत तीच तक्रार ऐकू येते आहे. आमच्या पक्षात हायकमांड संस्कृती नाही. आपापल्या भागातले सदस्य व जनताच आमचे उमेदवार ठरवते, असे छातीठोकपणे सांगणार्‍यांनी पक्षाच्या स्थानिक शाखा व सदस्यांना अंधारात ठेवून परस्पर उमेदवारांची घोषणा केल्याची तक्रार समोर आली आहे. किंबहूना आजवरच्या तमाम भ्रष्ट पक्षात जे काही व्हायचे, त्याच आजाराची लक्षणे आम आदमी पक्षातही दिसू लागली आहेत. पण तरीही त्यांची इमानदारी पक्की आहे.

   पंजाबच्या लुधियानामध्ये अग्रवाल नावाच्या व्यक्तीने आधीपासून पदरमोड करून पक्षाचे कार्यालय थाटले आणि पक्षाचे काम सुरू केले. त्याला अंधारात ठेवून फ़ुलका नावाच्या वकीलाला उमेदवार बनवण्य़ात आले आहे. २५ लाख रूपये घेऊन त्या वकीलाला पक्षाची उमेदवारी विकण्यात आल्याचा आरोप त्या अग्रवालने केला आहे. पण त्याला विचारतो कोण? इकडे नागपूरात रुपा कुलकर्णी नावाच्या समाजसेविका पहिल्यापासून पक्षाची बांधणी करण्यात राबल्या. त्यांनाही उमेदवारी हवी होती. स्थानिक सदस्यांनी त्यांचेच नाव पुढे केले होते. पण आता मुंबईच्या अंजली दमाणियांना नागपुरातली उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे रुपा कुलकर्णी संतापल्या आहेत. पक्षाच्या नावातच आम आदमी आहे बाकी इथे खास आदमीचाच दबदबा आहे, असा त्यांचा आरोप आहे. त्याखेरीज पुण्यातही सुभाष वारे यांना उमेदवारी मिळाल्याने अरूण भाटिया यांनी बंडाच झेंडा उभारला आहे. थोडक्यात इतर कुठल्याही बेइमानदार भ्रष्ट पक्षात आढळतील, अशीच लक्षणे अल्पावधीतच आम आदमी पक्षातही दिसू लागली आहे. पण त्यांनी पहिल्यापासून कुठला तरी रामबाण डोस घेतला असल्याने असे घडत असूनही तो पक्ष इमानदार आहे. इमानदारी केजरीवाल यांच्या जनानखान्यातली कोणी दासी आहे काय, अशी मग शंका येऊ लागते. कारण सातत्याने बेइमानदारीचे नमूने समोर येत असतात आणि तोंडाने मात्र आपणच काय ते इमानदार, असा त्यांचा नामजप सतत चालू असतो. अशा या शंभर नंबरी इमानदारीच्या सोन्याचे पितळ लोकसभा निवडणूकीचे मतदान संपेपर्यंत पुरते उघडे पडल्याशिवाय रहाणार नाही. अर्थात त्यामुळे त्यांच्या पातिव्रत्याला बाधा येण्याची शक्यता नाही. कारण रोजच्या रोज आपली पाठ थोपटण्यापलिकडे दुसरे काही त्या पक्षाला अजून तरी साधलेले नाही. देवानंदच्या ‘गाईड’ चित्रपटातले गाजलेले लताचे गाणे आठवते.....

मोसे छल किये जाय
देखो...  सैया बेईंमान

1 comment: