Tuesday, February 11, 2014

अभावक्षेत्रातील प्रभावक्षेत्र



  कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही. पण माणुस कुत्र्याला चावला तर ती बातामी असते. असे नेहमी पत्रकारीतेचा अभ्यास करणार्‍याला शिकवले जाते. पण आज झपाट्य़ाने विस्तारलेल्या माध्यमाच्या उद्योगात कितीजणांना हे सुत्र माहित आहे किंवा आठवते, याचीच शंका येते. कारण एकूणच खळबळजनक बातम्यांचा सूर बघितला, तर नित्यनेमाने चावणारे भटके कुत्रे मोकाट वावरत असतात आणि कुठला कुत्रा कुणाला चावला, त्याची रसभरीत वर्णने करण्यात पत्रकार दंग असतात. मात्र जिथे खरी बातमी असते, तिथे त्यांनी पाठ फ़िरवलेली दिसते. त्यामुळे खर्‍या बातमीपासून लोकांना वंचित रहाण्याची वेळ येत असते किंवा सोशल मीडियातून बातम्या मिळवायचा प्रयास करावा लागतो. किंबहूना माध्यमांच्या याच बेफ़िकीरीने सोशल मीडियाचे महात्म्य वाढवले आहे. गेल्याच आठवड्यात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांनी दक्षिणेत तळ ठोकला होता. नेहमी निवडणूकीच्या विषयावर चर्चा सुरू झाली, मग दक्षिणेत मोदी किती व कशा जागा मिळवणार; असा सवाल अगत्याने विचारला जातो. पण मग त्याच दक्षिणेत त्यांनी सभा घेतली तर तिचा प्रभाव किती पडला; तोही तपासणे आवश्यक नाही काय? कारण प्रभावक्षेत्रापेक्षा अभावक्षेत्रामध्ये दिसणारा पाठींबा महत्वाचा असतो. केरळ असेच दक्षिण भारतातील भाजपाचाठी अभावाचे राज्य आहे. तिथे आजवर भाजपाचा कुठलाही नेता आपला प्रभाव किंवा लोकप्रियता दाखवू शकलेला नाही. शिवाय इथे हिंदूंच्या तुलनेत अल्पसंख्यांक जवळपास तुल्यबळ आहेत. त्यामुळेच भाजपाला दिर्घकाळ प्रयत्न करूनही त्या राज्यात आपला पाय रोवता आलेला नाही. अशा केरळात मोदींनी मोठी सभा घेतलीच, पण बिगर हिंदुंमध्ये घुसखोरी केली आहे.

   ज्या माणसाला गेल्या बारा वर्षात कडवा हिंदूत्ववादी किंवा अल्पसंख्यांकांचा शत्रू म्हणून रंगवण्यात आले, त्याने अल्पसंख्यांक मानल्या जाणार्‍या ख्रिश्चन समाजात चंचूप्रवेश केला असेल, तर ती बातमी होत नाही काय? नसेल तर गोष्ट वेगळी. पण ही बातमी होत असेल, तर मग कुठल्याही राष्ट्रीय वाहिनीवर ती प्रसिद्ध कशाला झालेली नाही? केरळच्या विविध भागात जाहिर व कार्यकर्त्यांच्या सभा मोदींनी घेतल्याच्या बातम्या आल्या. पण त्याच दौर्‍यात मोदी यांना केरळातल्या ख्रिश्चन समाजा धर्मगुरूंनी आशिर्वाद देण्याचाही एक मोठा सोहळा पार पडला. त्याची कुठेच वाच्यता कशाला होऊ नये? केरळात विविध ख्रिश्चन पंथ अस्तित्वात आहेत आणि त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन मोदींशी चर्चा केली. या केरळी ख्रिश्चन समाजात प्रामुख्याने कॉग्रेसचे प्राबल्य आहे. म्हणूनच त्या राज्यात कॉग्रेसला ख्रिश्चनांचा पक्ष, तर मार्क्सवाद्यांना हिंदूचा पक्ष संबोधले जाते. अशा राज्यात कडवा हिंदूत्ववादी मानल्या जाणार्‍या मोदींचे ख्रिश्चन समाजाचे धार्मिक नेते स्वागत करीत असतील; तर ती मोठी चर्चेची बातमी असते. कारण केरळात व्यापार व उद्योगात पुढे असलेला ख्रिश्चन समाज लोकसंख्येतही पुढे आहे. इथे लोकसभेच्या २० जागा असून त्यातील किमान पाचसहा जागी ख्रिश्चन मतांचा प्रभाव पडतो. एकूण लोकसंख्येत हिंदू ५७ टक्के तर मुस्लिम २५ आणि ख्रिश्चन १९ टक्के आहेत. त्यामुळेच मोदींना एका मोठ्या बिगर हिंदू समाज घटकात मान्यता मिळणे, स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारे ठरू शकते. पण ही बातमी होऊ शकली नाही किंवा त्यावर फ़ारशी चर्चाही झाली नाही. याला निरपेक्ष पत्रकारिता म्हणता येईल काय? कुणा मुस्लिम धार्मिक नेत्याचे मोदीविरोधी वक्तव्य अगत्याने दाखवणार्‍यांनी, ही बातमी दडपण्याचा अर्थ काय लावायचा?

   पक्षपाती पत्रकारिता हा वेगळा विषय आहे. पण इथे पक्षपातही नाही तर राजकीय पक्षपात होताना दिसतो. केरळात ख्रिश्चनांनी मोदींना पाठींबा दिल्याचे दिसले, तर त्याचा देशाच्या इतर भागात जनमतावर परिणाम होईल; म्हणून ही बातमी लपवली जात असावी. इतर दुसरे काही कारण दिसत नाही. कारण जे लोक अगत्याने निकाल वा मतचाचण्यांची समिकरणे मांडतात, ते लोक दक्षिणेत भाजपाच्या जागा बोटावरही मोजत नसतात. इतके बारकाईने अभ्यास करणारे मग केरळातल्या ख्रिश्चनांच्या मोदीप्रेमाकडे बोट कशाला दाखवत नाहीत? गुजरातमध्ये मोदींनी स्थानिक ख्रिश्चनांना उद्योग रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याचे केरळचे धर्मगुरू बोलून दाखवतात आणि म्हणूनच मोदी पंतप्रधान व्हायला सदिच्छाही देतात, तेव्हा त्याचा प्रभाव तिथल्या ख्रिश्चन मतदारावर पडणारच आहे. मग दक्षिणेत म्हणजे केरळात काय होईल? कॉग्रेस व डावे यांच्यातच वाटून घेतलेल्या केरळात नवा राजकीय चेहरा समोर येऊ शकेल काय? खरे तर बातमीदाराने याचा उहापोह केला पाहिजे. पण त्याचा कुठेही मागमूस दिसत नाही. अर्थात त्यामुळे मोदींचे काहीही बिघडलेले नाही. म्हातारीने कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा कधीच थांबलेला नाही. पण यातून भारतीय पत्रकारितेचा हिडीस पक्षपाती चेहरा मात्र समोर आलेला आहे. तो भाजपापेक्षा केरळच्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी आणावा, याला अधिक महत्व आहे. जेव्हा आणखी तीन महिन्यांनी याचे परिणाम दिसतील, तेव्हाच मग दक्षिणेत भाजपा व मोदी यांचे बळ काय, विचारणार्‍यांना उत्तर मिळणार आहे. तोपर्यंत त्यांनी आपल्या सुप्तावस्थेमध्ये स्वप्नरंजन करायला आपण तरी व्यत्यय कशाला आणायचा? सोशल मीडिया वा अन्य मार्गाने खर्‍या बातम्या शोधायला आपल्याला तरी कोणी रोखले आहे?

No comments:

Post a Comment