Wednesday, February 19, 2014

नेपोलियन म्हणतो



  मंगळवारी लोकसभेत तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे विधेयक गदारोळात संमत झाले. त्याबद्दल बहूतेक कॉग्रेसेतर पक्षांनी राग व्यक्त केला आहे. त्याला पाठींबा देऊनही घडल्या प्रकाराबद्दल भाजपानेही नाराजी प्रकट केली आहे. मग हा भाजपाचा दुटप्पीपणाच नाही काय? कारण भाजपाच्या पाठींब्याशिवाय ते विधेयक लोकसभेत संमतच होऊ शकले नसते. मग आधी पाठींबा देऊन नंतर त्यावर नाराजी व्य्क्त करण्यात काय तथ्य आहे? अर्थात भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांच्या निर्मितीचे समर्थन केलेले आहे. त्यांच्या हाती देशाची सत्ता असताना भाजपाने उत्तराखंड, छत्तीसगड व झारखंड अशा तीन राज्यांना जन्माला घातले. तेव्हा तर खंदे भाजपा विरोधक लालूप्रसाद यादव बिहारमध्ये सत्तेवर होते. पण त्यांनाही विश्वासात घेऊन भाजपाने तीन राज्यांची निर्मिती केली. कॉग्रेसला खरेच असे करायचे असते, तर त्यानेही सहमतीचा मार्ग चोखाळला असता. त्यासाठी दहा वर्षे टाळाटाळ केली नसती. तेव्हा भाजपाने या तेलंगणा स्थापनेला तत्वत: पाठींबा दिल्याचा दावा खोडून काढता येणार नाही. पण दुसरीकडे त्या पक्षाने मग नाराजी व्यक्त करण्यापेक्षा कॉग्रेसला लोकसभेत धरसोड करण्याबद्दल धारेवर धरून विधेयक रोखायलाही हरकत नव्हती. भाजपाने यापैकी काहीच केले नाही. एकीकडे विधेयकाला सभागृहात पाठींबा देऊन ते मंजूर होण्यास हातभार लावला आणि दुसरीकडे गोंधळाबद्दल नराजीही व्यक्त केली. त्यामुळे दुटप्पीपणा दिसतो, पण धोरणात्मक कारणासाठी त्या पक्षाला आपमतलबीही ठरवता येत नाही. असे त्या पक्षाने कशाला वागावे? त्यामागे राजकारण असणार, यात शंकाच नाही. कुठलाही पक्ष राजकारणात साधू संत म्हणून आलेला नसतो. भाजपाही नाही. पण मग त्यातून भाजपाने साधले काय, तेही समोर यायला नको काय?

   भाजपाने तेलंगणा निर्मितीला पाठींबा देण्यामागे त्याचे स्वार्थी राजकारण आहे, हे कोणी नाकारू शकणार नाही. कारण त्या राज्यात तो पक्ष दुबळा आहे व तोच कॉग्रेसचा मोठा बालेकिल्ला होता. मागल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसप्रणित युपीएची सत्ता पुन्हा प्रस्थापित व्हायला, मोठा हातभार आंध्रप्रदेश याच राज्याने लावला होता. तेव्हा तेलंगणाची मागणी धुडकावून जनतेला सामोरे जाण्याची हिंमत दाखवणारा राजशेखर रेड्डी नावाचा नेता कॉग्रेसपाशी होता आणि त्याने विधानसभेसह लोकसभेसाठी मोठे यश मिळवून दाखवले होते. पण निकालानंतर लौकरच त्याचे अपघाती निधन झाले आणि त्यानंतर कॉग्रेस आंध्रात जवळपास पोरकी झाली. रेड्डी यांच्या पुत्राने, जगनमोहन याने पित्याचा वारसा चालविण्याचा हट्ट केला होता. तो कॉग्रेस श्रेष्ठींनी धुडकावून लावला. त्याच्यावर पक्ष सोडून जाण्याची पाळी आणली आणि त्यानेही वेगळा प्रादेशिक पक्ष काढून आपला प्रभाव सिद्ध केला. पण श्रेष्ठींच्या अहंकाराने त्याला परत कॉग्रेसमध्ये आणायला नकार देऊन तेलंगणा समितीचे नेते चंद्रशेखर राव यांच्याशी छुपा समझोता केला. त्यातून आजची स्थिती उदभवली आहे. तेलंगणा मिळाल्यास समिती कॉग्रेसमध्ये विसर्जित करण्याचा सौदा झाला होता. त्या़ही पुर्तता अजून राव यांनी केलेली नाही आणि कदाचित करणारही नाहीत. त्यामुळे तेलंगणा हे वेगळे राज्य देऊनही कॉग्रेस तिथे लोकमत गमावणार आहेच. पण आंध्रच्या जनतेला दुखावल्याने तिथेही कॉग्रेसच मार खाणार आहे. भाजपा दोन्हीकडे दुबळा आहे. त्यामुळेच त्याला कुठल्याही बाजूने लाभ मिळण्याची शक्यता नव्हतीच. पण प्रमुख प्रतिस्पर्धी दुबळा व्हायला हातभार लागणे हासुद्धा भाजपासाठी राजकीय लाभच म्हणायला हवा. तोच डाव भाजपा खेळला हे सत्य आहे.

   दक्षिणेत भाजपा दुबळा आहे आणि मागल्या दोन्ही लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला सत्तासंपादनात आंध्रानेच हात दिला होता. तिथे कॉग्रेस खिळखिळी होणे भाजपाच्या पथ्यावर पडणार आहेच. पण दुसरीकडे जगनमोहन व नाराज मुख्यमंत्री किरण रेड्डी काढत असलेल्या प्रादेशिक पक्षात कॉग्रेसची शक्ती विभागली जाणार आहे. त्याखेरीज चंद्राबाबूंचा तेलगू देसम पक्ष म्हणजे लोकसभेसह विधानसभेच्या होणार्‍या निवडणूका बहुरंगी होऊन त्यात भाजपाचा बांधील निष्ठावंत मतदार किमान असला, तरी मोजक्या जागी निर्णायक ठरू शकतो. त्याचाच मोठा राजकीय लाभ भाजपाला मिळू शकतो. चार प्रमुख प्रादेशिक नेत्यांमध्ये राजकारण विभागले जाऊन कॉग्रेस सर्वत्रच नामशेष होईल आणि त्यातला कोणीही प्रादेशिक नेता भाजपाच्या सोबत आला, तरी निवडणूकीत त्याचा अल्पशा जागा जिंकायला हातभार लागू शकणार आहे. त्यामुळे तत्वत: भाजपा छोट्या राज्यांचे समर्थन करतो, हे कितीही सत्य असले; तरी तेलंगणा प्रकरणी त्याची खेळी निवडणूकीत कमी मतांवर मोठी खेळी पदरात पाडून घेण्य़ाची आहे. अशावेळी कॉग्रेस आत्महत्येलाच धावत सुटली असेल, तर त्याला भाजपाने हातभार लावला, इतकेच आहे. नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, ‘आपला शत्रू आत्महत्येला उतावळा झालेला असेल, तर त्यात हस्तक्षेपाचा मुर्खपणा करू नये.’ भाजपाने साळसूदपणे नेमकी तीच चलाखी तेलंगणा राज्यनिर्मितीच्या बाबतीत केली आहे. मात्र त्याला तत्वाचा मुलामा चढवून पुन्हा संसदेत कॉग्रेसला शांततेने काम उरकता येत नाही, असाही नाराजीचा मानभावी सूर लावला आहे. अर्थात राजकारणात कोणी साधूसंत नसतात. सगळेच आपापल्या मतलबांना उदात्त रंगरंगोटी चढवत असतात. भाजपा त्यापैकीच एक आहे, हे यातून सिद्ध झाले.

No comments:

Post a Comment