दहा वर्षापुर्वीची सेक्युलर जमवाजमव
गेल्या दोनतीन दिवसात राजकीय पक्षात लपंडाव आणि पळापळीचा खेळ सुरू झाला आहे. अर्थात जसजसे उमेदवारी अर्ज भरायचे दिवस संपत जातील, तसतशी ही पळापळ अधिकच वेगात होणार आहे. त्या निमित्ताने प्रत्येक नेता व पक्षाच्या राजकीय वैचारिक निष्ठांचे खुल्या बाजारात लिलाव मांडले जाणार आहेत. त्याची सुरूवात बिहारचे सेक्युलर दलितनेते रामविलास पासवान यांनी केली आहे. रविवारीच त्यांनी युपीएची साथ सोडून भाजपा व एनडीएच्या गोटात दाखल होण्याची बातमी आलेली होती. पण बुधवारपर्यंत पासवान कुठे दडी मारून बसले होते, त्याचा थांगपत्ता कुणाला लागत नव्हता. लालू तर म्हणाले, की फ़ोनसुद्धा पासवान उचलत नाहीत. पण बुधवारी पत्रकारांसमोर येऊन पासवान यांनी आपण अजून सेक्युलरच आहोत, याची ग्वाही दिली. आपल्या सेक्युलर असण्यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगताना पासवान यांनी, सेक्युलर युपीएमध्ये आपली ससेहोलपट झाल्याचे सांगून टाकले. आपला पक्ष लहान असून निवडणूका लढवण्याची खुप आधीपासून आपल्याला तयारी करावी लागते. मोठ्या पक्षांप्रमाणे ऐनवेळी आपण मैदानात उतरू शकत नाही. म्हणूनच लालूंपासून सोनिया गांधींपर्यंत सर्वांचे दार ठोठावून आपण कंटाळलो, असे पासवान म्हणाले. आपला पक्ष छोटा असल्याने देतील त्या जागांवर समाधान मानावे, अशी हीन वागणूक मिळत होती आणि त्यालाच आपल्या पक्षाचे कार्यकर्ते कंटाळले, असा पासवान यांचा दावा आहे. सहाजिकच पक्ष सेक्युलरच राहिल. पण निवडणूकीत (जातिय) भाजपाशी आपण समझोता करू शकतो, असे त्यांनी सांगून टाकले. मुद्दा इतकाच, की सेक्युलर वा जातियवाद हा चर्चेचा विषय आहे आणि निवडणूका त्यापेक्षा व्यवहार्य विषय आहे.
निवडणूका लढवणे आणि जिंकून सत्तेत भागिदारी मिळवण्याचा सेक्युलर असण्याशी संबंध नाही, इतकेच म्हणायचे पासवान यांनी बाकी ठेवले. त्यांचा पक्ष भाजपाच्या बाजूला जात असतांना फ़क्त बिहारच्या राजकारणात कल्लोळ माजला आहे असे मानायचे कारण नाही. कॉग्रेस नेते आणि परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी मोदींच्या विरोधात दिलेल्या असंसदीय प्रतिक्रियेने वादळ उठलेले आहे. उच्चशिक्षीत खुर्शिद यांची भाषा चकीत करणारी आहे. अत्यंत सुसंस्कृत अशी त्यांची ओळख आहे. पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोश चढावा, म्हणून नेत्याला भडक भाषा वापरावीच लागत असते. त्यामुळेच त्यांनी मोदींवर इतकी भडक टिका केली. त्याचे आणखी एक महत्वाचे कारण आहे. संपुर्ण उत्तर भारतात सध्या मोदींच्या लोकप्रियतेची लाट आलेली असून त्यात कॉग्रेसची सत्ताच वाहून जाणार आहे. त्यामुळे खुर्शिद यांच्यासारख्या नेत्यांचा धीर सुटला असेल, तर नवल नाही. मग त्या नुकसानाला कारणीभूत असलेल्या नेत्याच्या विरूद्ध शंख नाही तर दुसरे काय करणार? पक्षाचे वाटोळे करणार्या राहुलना शिव्या देण्याची सोय नसेल तर खुर्शिद यांनी वड्याचे तेल वांग्यावर या उक्तीप्रमाणे मोदींवर राग काढला तर चुकले कुठे? पासवान यांच्याप्रमाणे उठून भाजपात जाण्याची खुर्शिद यांना मुभा नाही. त्यांना भाजपात प्रवेशही मिळणार नाही. अन्यथा त्यांनी शिवीगाळी करण्यापेक्षा पासवान मार्ग चोखाळलाच असता. त्यांचेच उत्तरप्रदेशातील दुसरे सहकारी जगदंबिका पाल सिंग यांनी तसे प्रयास उगाच चालविले आहेत काय? अनेक वाहिन्यांवर गेल्या दोनचार वर्षात सोनिया व राहुल यांच्या आरत्या ओवाळण्यासाठी हजेरी लावणारे जगदंबिका पाल सेक्युलर म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनीही भाजपाचे दार ठोठावल्याच्या बातम्या आहेत.
गुजरातपासून थेट बिहार ओरिसापर्यंत उठलेले राजकीय वादळ एकाच गोष्टीची चाहुल देणारे आहे, ती चाहुल आहे मोदी लाटेची. संसदेतील अर्ध्याहून अधिक जागांच्या या प्रदेशात उठलेले वादळ सर्वच पक्षांना भेडसावते आहे. त्यामुळे मग नविन पटनाईक तिसर्या आघाडीच्या बैठकीला गैरहजर रहातात. लालूंच्या पक्षात दुफ़ळी माजते आणि तिकडेच सत्ताधारी जदयुमध्ये चार लोकसभा सदस्यांना हाकलण्य़ाची पाळी पक्षावर येते. भाजपा वगळता प्रत्येक पक्षात काहुर माजलेले आहे आणि सगळीकडेच राजकीय लपंडाव जोरात सुरू झालेला आहे. मतदानाचे दिवस जसे जवळ येत जातील, तसा हा लपंडाव आणि पळापळीचा खेळ अधिक वेगवान होत जाईल. प्रत्येक सेक्युलर पक्षातल्या अनेकांना आता हिंदूत्वाचे व मोदींच्या विकासाचे आकर्षण वाटू लागले; तर नवल नाही. कारण पासवान यांनी मांडलेला सिद्धांत समजून घेतला पाहिजे. शेवटी सेक्युलर वा जातिय राजकारण यशस्वी करण्यासाठी, आपापले नेतृत्व आणि पक्ष जगवणे आवश्यक असते. पक्ष तग धरून राहिला, तरच त्याला जातियवादी वा सेक्युलर असता येते. पक्षच टिकला नाही, तर त्याच्या विचारधारा वा तत्वज्ञानाला काही किंमत नसते. डावे सेक्युलर पक्ष मागल्या दहा वर्षात धाराशायी होऊन गेलेत. भाजपा व त्याचा जातियवाद संपवण्यासाठी त्यांनी स्वत:चा बळी देऊन कॉग्रेसला जीवदान दिले आणि आता त्यांच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे. सेक्युलर विचार वाचवायचा, की स्वत:ला वाचवायचे असा सवाल उभा आहे. त्यातून मग हा राजकीय लपंडाव सुरू झालेला आहे. किती सेक्युलर नेते आणि पक्ष त्यात आपले सत्व टिकवतात ते दिसेलच. मोदींनी बहूमताचा पल्ला गाठलाच, तर निवडणूक निकालानंतर आपल्या देशात कुठला पक्ष स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेईल किंवा नाही, याचीच शंका आहे.
भाजपाने पासवानांना जवळ केल्याने भाजपाला काय फायदा
ReplyDeleteमोदींनी बहूमताचा पल्ला गाठलाच, तर निवडणूक निकालानंतर आपल्या देशात कुठला पक्ष स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेईल किंवा नाही, याचीच शंका आहे.
ReplyDeleteGreat .......