गुढी पाडव्याला अनेकजण नवे मुहूर्त करतात. भारतीय संस्कृतीमध्ये तशी एक परंपरा आहे. सहाजिकच राजकारणातही तसे अनेकजण आपल्या नव्या मोहिमा किंवा कार्यक्रमांना त्या दिवशी आरंभ करतात. चार वर्षापुर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातून उखडले गेलेले राज ठाकरे यांना पुन्हा नव्याने आपल्या राजकारणाचा पाया घालणे अगत्याचे झाले आहे. कारण २००९ च्या लोकसभेपासून उदयास आलेला त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष, आज अडगळीत जाऊन पडला आहे. आरंभीच्या पाच वर्षात जितक्या वेगाने हा नेता व त्याचा पक्ष मराठी राजकारणात उदयास आला, तितक्याच वेगाने त्याची नंतरच्या पाच वर्षात घसरण झाली. खरेतर नव्याने आरंभ करण्यापुर्वी राज ठाकरे यांनी आपल्या अपयशाचे आत्मचिंतन करायला हवे होते. कारण त्यांच्यापाशी राजकीय पात्रता व लोकप्रियता आहे. म्हणूनच आरंभापासून लोक त्यांच्याकडे अपेक्षेने बघत होते. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा वेगळा पक्ष उभा केला आणि अल्पावधीतच लोकसभा व विधानसभा या निवडणूकात आपला प्रभावही दाखवला होता. अगदी बाळासाहेब ठाकरे वा शरद पवार यांनाही आरंभी जितके लोकसमर्थन मिळू शकले नव्हते. तितकी मजल राज ठाकरे यांनी मारली याचे कौतुक करावेच लागेल. पण तात्काळ मिळणारे यश नेह्मीच घातक असते. ते यश पचवता यावे लागते, अन्यथा त्याचीच नशा होऊन ते आत्मघाताला कारणीभूत होत असते. मनसेच्या बाबतीत तसेच काहीसे झाले आहे आणि आता त्यातून पुन्हा सावरून उभे रहाण्याची गरज आहे. त्यासाठी नव्याने काही करण्याची गरज आहे तशीच नवे काही करण्याची गरज आहे. पण पाडव्याला राज ठाकरे यांचे भाषण ऐकता, तसे काही नवे करण्यासाठी त्यांच्यापाशी उरले नाही, अशी शंका येते. शिवाजी पार्कात त्यांची जंगी सभा झाली. पण ती लोकमताला प्रभावित करायला किती लाभदायक ठरू शकेल?
मोदीमुक्त भारत अशी घोषणा राज यांनी दिली आहे आणि त्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. अर्थात तसे आवाहन करणारे राज एकटेच नाहीत. मागल्या दोनतीन वर्षापासून तशा घोषणा व आवाहने अनेक नेते व पक्षांनी केलेली आहेत. पण त्या दिशेने कुठलीही हालचाल होऊ शकलेली नाही. पण कोणी त्या दिशेने ठामपणे विचार करताना किंवा पावले उचलताना दिसला नाही. उत्तरप्रदेशात डिपॉझीट गमावणार हे ठाऊक असतानाही, राहुल गांधींनी तिथे उमेदवार उभे केले आणि सपा-बसपा यांना अपशकून केला होताच. त्याचा कुठला खुलासा त्यांना द्यावा असे वाटलेले नाही. महाराष्ट्रात असलेली आघाडी विधानसभेच्या वेळी दोन्ही कॉग्रेसनी मोडली. पण त्यानंतरही दोघांना एकत्र यावे असे वाटलेले नाही. युती मोडल्यापासून शिवसेना भाजपाच्या नावाने बोटे मोडते आहे. पण सत्तेतही सहभागी होऊन नांदते आहे. देशाच्या कानाकोपर्यात शेकडो लहानमोठे पक्ष आहेत आणि आपापल्या परीने त्यांनी भाजपाला शह देण्यासाठी राजकारण चालविले आहे. पण त्यातला कोणीही थोडीफ़ार झीज सोसून मोदीमुक्त भारतासाठी काही करायला राजी दिसत नाही. त्या सर्वांच्या तुलनेत मनसे हा राज ठाकरे यांचा प्रादेशिक पक्ष नगण्य आहे. शिवाय त्या पक्षाची आपली अशी काही भूमिका इतर अनेक पक्षांना त्याच्या जवळपास येऊ देत नाही. म्हणूनच देशातल्या तमाम बिगरभाजपा पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन करताना राज ठाकरे यांनी गंभीर विचार केला आहे, असे वाटत नाही. देशातील विरोधी राजकारणात आळवला जाणारा सूर त्यांनीही पाडव्याच्या सभेत आळवला आहे. इतरांचे सोडून द्या. महाराष्ट्रात तरी भाजपा सोडून इतर पक्षांशी मनसे कितपत एकजुटीचे डावपेच खेळू शकते? नसेल तर मोदीमुक्तीची नुसतीच गर्जना करून काय साध्य होईल? सभेसाठी आलेल्या लोकांचे मनोरंजन करण्याच्या पलिकडे काय साध्य होणार आहे?
आजही राज ठाकरे यांना ऐकायला इतक्या मोठ्या संख्येने लोक जमतात, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे आणि तिचा राजकारणात पुन्हा उभे रहाण्यासाठी कोणत्या पद्धतीने वापर करून घेता येईल, याचा विचार त्यांनी म्हणूनच करणे अगत्याचे आहे. अशा सभांना गर्दी जमवण्यासाठी त्यांचे उरलेसुरले निष्ठावान कार्यकर्ते राबलेले आहेत आणि त्यातले अनेकजण अजूनही कसल्याही अपेक्षेशिवाय पक्षाची नवी उभारणी करण्यासाठी कटीबद्ध असणार. तर त्यांच्यातल्या उर्जेचा उपयोग पक्षबांधणीसाठी होण्याला प्राधान्य असले पाहिजे. मध्यंतरी एकामागून एक सहकारी राजना सोडून गेले. तरीही त्यांच्या पाठीशी अनेक कार्यकर्ते उभे आहेत आणि त्यातून त्यांची राजच्या नेतृत्वावरील निष्ठाच व्यक्त होत असते. ती उर्जा वापरून जनमानसात आपल्या पक्षाविषयी नव्या अपेक्षा निर्माण करणे अगत्याचे असते. त्या अपेक्षा विरोधकांच्या गुळगुळीत झालेल्या मागण्या व घोषणांनी निर्माण होऊ शकत नाहीत. त्यासाठी काहीसा तरी वेगळेपणा मनसेमध्ये आढळून येण्याची गरज आहे. पाडव्याच्या सभेतील भाषण व घोषणा यातून तसे कुठलेही वेगळेपण समोर आलेले नाही. समजा उद्या देशभरच्या विरोधकांनी मोदीमुक्त भारतासाठी एकजुटीचा पवित्रा घेतला, तरी त्यात मनसेला कोणते स्थान असणार आहे? लालू, ममता किंवा मायावती, अखिलेश यांच्यासह कॉग्रेस वा डावे पक्ष मनसेला आपल्या सोबत घेऊ शकतील काय? नसतील तर मोदीमुक्त राजकारणात मनसेचे स्थान कोणते असणार आहे? त्याचा विचार अशी घोषणा देण्यापुर्वी केला आहे काय? या सभेनंतर पश्चीम उपनगरात गुजराथी फ़लक व दुकानांवर हल्ले झाल्याची बातमी आली आहे. तेच मनसेविषयी उत्तर भारतीय वा बंगाली वगैरे परप्रांतियांचे दुखणे आहे. अशा स्थितीत मनसेच्या सोबत कोण येऊ शकतात, याला मर्यादा आहेत. आणि महाराष्ट्रातही अन्य पक्ष सोबत येण्याची शक्यता नाही. मग मोदीमुक्तीचा अर्थ कसा लावायचा?
राज ठकरे सेनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी स्वप्नातील महाराष्ट्राची कल्पना मांडली होती. तिचे पुढे काय झाले? त्यांच्याकडे महाराष्ट्रातील तरूण पिढी अपेक्षेने बघायला लागली होती. पण दहा वर्षात ती नवलाई मागे पडली असून, मनसेची स्थिती शेकाप वा जनता दलासारखी होऊन गेली आहे. म्हणून थेट मोदीमुक्तीची गर्जना करण्याचे कारण नव्हते. त्यापेक्षा महाराष्ट्राला गवसणी घालण्याचा मनसुबाही खुप आशादायक ठरला असता. कॉग्रेस पक्षाकडे आजही लोकांचा काही प्रमाणात ओढा आहे. पण त्या पक्षाकडे राज्यातले समर्थ नेतृत्व नाही. राष्ट्रवादीपाशी शरद पवार आहेत, तर विश्वासार्हतेचा दुष्काळ आहे. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांच्या डरकाळ्या फ़ोडत असते. सहाजिकच राज्यात विरोधी पक्षाची वानवा आहे आणि तीच पोकळी भरून काढण्याचा पवित्रा राज ठाकरे घेतील, अशी अपेक्षा वावगी मानता येणार नाही. महाराष्ट्राला नुसता बिगरभाजपा समर्थ पक्षच नको आहे, तर तळागाळापर्यंत पोहोचलेला पर्यायी पक्ष हवा आहे. भाजपा नको, तर पर्याय म्हणून लोकांना त्याच्याकडे आशेने बघता आले पाहिजे. तीन दशकांपुर्वी डाव्या पुरोगामी पक्षांनी नाकर्तेपणा दाखवला, तेव्हा ज्या अपेक्षेने लोक शिवसेनेकडे आले; तशीच पोकळी आज मराठी राजकारणात तयार झाली आहे. तेव्हा डाव्या पुरोगामी पक्षांच्या पंगतीला जाऊन शिवसेना बसली नव्हती, म्हणून ती राजकीय पर्याय बनुन पुढे आली. आजची शिवसेना नेमकी काय भूमिका घेऊन उभी आहे, त्याचा जनतेला थांग लागत नाही आणि कॉग्रेस राष्ट्रवादी हे पक्ष विकलांग झाल्यासारखे निष्क्रीय आहेत. त्यांनी जणू मनसेसारख्या पक्षाला पोकळीच निर्माण करून दिलेली आहे. पण राज ठाकरे यांनी तिकडे वळूनही बघायचे नाही असे ठरवलेले असावे. अन्यथा त्यांनी पाडव्याचा मुहूर्त असा वाया घालवला नसता. या सभेतून त्यांनी काय सांगितले, त्याचा उलगडा त्यांच्याच अनुयायांना कितीसा झाला, ते शोधावे लागेल.
भाऊ, mns ची ही गत त्यानी स्वतः करुन घेतली आहे ठाकरे कोणीही असोत मुंबईत गर्दी होणारच छोटी शहरे सोडा पण मोठ्या शहरातही mns आपला प्रभाव टाकू शकाली नाही याला कारण म्हणजे शिवसेनेतील टाकाऊ नेते जे mns मधे गेले ते इतर धंदयातून वेळ मिळाला तर उपकार म्हणून mns चे काम करतायत ही वस्तुस्थिती आहे,पक्ष संघटना नाही जी आहे नागरिक त्याना गुंड म्हणून ओळखतात चांगली माणसे गोळा करुन संघटन उभे करण्याशिवाय राजसाहेबाना पर्याय नाही
ReplyDeleteभाऊ नितांत गरजेचे होते हे विश्लेषण. विशेषतः शेवटचा परिच्छेद अतिशय महत्त्वाचा आहे. खूप आवडला. विश्वासार्हता- सर्जनशीलता आणि टीका करण्याबरोबरच नवीन पर्याय देण्याची क्षमता ही राज यांची ताकद सध्या ते वापरताना दिसत नाहीत. खूप सुंदर लेख दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. :)
ReplyDeleteअगदि योग्य पध्दतिने विश्लेषण केले आहे. ज्यांनी शक्य आहे त्यांनी त्यावर विचारपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे. भाजपाची मूळ ताकद संघशक्ती ही आहे. तिला प्रचलित राजकारणांपासून अलिप्त ठेवून ह्या राजकारणा व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या समाज उपयोगी कामात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे एकीकडे समाजाची नस पकडणे व वेळ पडलीच तर राजकिय कामात तेव्ह्ढ्या पुरताच उपयोग करून घ्यायचा हे धोरण ठेवलेले दिसते. उद्या खरचंच भाजप मुक्त भारत करायचे म्हणून करायला गेले तरी संघमुक्त भारत ही कल्पनाही अशक्य वाटते.
ReplyDeleteराज साहेबांनी अशी एखादी संघटना बांधण्याला चालना दिली असती तर लगेच नाही पण पाचपंचवीस वर्षांनी ती उपयोगात आणणे शक्य झाले असते.
I suppose someone from MNS might be reading your blogs I have strong request to Shri Raj Thakre, that he sould contest LOKSABHA election, after wining I am sure he will, he should talk that will make sense
ReplyDeleteनवनिर्माण करता करता ' नवनिर्माल्य ' कधी झाल याचाच या ना अजून पत्ता लागलेला नाहीं. बारामती आकाशवाणी केन्द्राचे ' निवेदक ' झालेत नुसते.' जाणता राजा ' म्हणे या ना ताकद देऊ इच्छितो.....?? कशात काय अन्.....
ReplyDeleteHa ha ha ha छान उपमा दिलीत
Deleteफार सुंदर भाऊ
DeleteJagata pahara ek vishishta gat ch roj vachato, follow karto. Pramukhyane tyat brahman varg jast asato bhau.
ReplyDeleteToh jar khup lokanparyant gheun jata ala tar bara hoil
भाऊ शेअर करतोय.आताच आपल्या या लेखाची लिंक एका मनसे कार्यकर्त्यास शेअर केली...मतपरिवर्तन झाले त्यांचे....मला वाटते हीच आपल्या लेखाची ताकत आहे.आपला लेख त्या प्रत्येक युवकांनी वाचावा ज्यांनी राजसाहेबांच्या खळळ ख...क च्या नदी लागून दोन चार गुन्ह्यांचा ससेमिरा मागे लावून घेतला..
ReplyDeleteराज ठाकरे आपली सगळी शक्ती वयक्तिक टीका करणे, बिनबुडाच्या बातम्या सांगणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे ह्या गोष्टींवर खर्च करत आहेत...
ReplyDeleteआपले अस्तित्व धोक्यात आल्यामुळे सगळे दुर्गुण भाजप मध्ये आहे अशी भाषणे देऊन काही उपयोग नाही.... हा सगळं राष्ट्रवादी बरोबर चूल मांडायचा प्रयत्न आहे
भाऊ एक प्रश्न आहे
ReplyDeleteआज काल जो उठतो तो मोदी हटाव म्हणतोय. सगळ्याच पक्ष्याचे लोक मोदींच्या हात धुऊन मागे लागलेत.
नक्की मोदी यांनी काय केलय किंवा काय करतील अशी सर्व पक्षातील लोकांना भीती आहे.
भाऊंचे मत खरे असेलही पण मनसे कडे पैसे नसताना महाराष्ट्रातील जो समाज गर्दी करतो त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थित राहून समर्थनाचा विचार करायलाच हवा. भाजपने १९८२ ला २ खासदार असताना सुद्धा पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहिलीच होती. येणारा काळ सर्व ठरवेल
ReplyDeleteMaharashtra nav nirman kay Raj karu shaknar nahi tho ek ayash rajkarni ahe tyachi aukat nahi
ReplyDelete