Sunday, March 18, 2018

माफ़िनाम्याचे चक्रीवादळ

kejriwal cartoon kureel के लिए इमेज परिणाम

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आपल्याच सापळ्यात फ़सलेले आहेत. मागल्या पाच वर्षात भारतीय राजकारणाला नवी दिशा व नवा आशय देण्यासाठी अवतार घेतलेल्या या पक्षाची अवस्था, अन्य कुठल्याही भ्रष्ट वा नाकर्त्या पक्षापेक्षाही दयनीय झाली आहे. अर्थात इतर पक्ष नालायक आहेत असा आमचा आरोप नाही, तर केजरीवाल आणि टोळीने तसा आरोप करीत सहा वर्षापुर्वी लोकपाल आंदोलन छेडले होते. त्यातूनच या नवा राजकीय पक्षासह नेत्याचा अवतार झालेला होता. आरंभापासून केजरीवाल व त्यांच्या घोषणा व आश्वासनांचे आज काय झाले? ते त्यांनाही आठवणार नाही, अशी स्थिती आहे. हायकमांड व पक्षश्रेष्ठींची मनमानी हा राजकारणातला सर्वात घाणेरडा आजार असल्याचे सांगत पारदर्शी राजकारण करायला केजरीवाल आले. यांना आता त्यांच्याच श्रेष्ठी या अवतारातून बाहेर पडताना नाकी दम आलेला आहे. एकाट्या दिल्लीत काही स्थान असलेल्या या पक्षाला चार वर्षे पंजाबात सत्ता संपादन करण्याचे वेध लागलेले होते. पण गतवर्षीच्या निकालांनी त्यांना दणका दिला आणि आता तर त्याही राज्यातली पक्षाची शाखा नेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा घेऊन उभी राहिलेली आहे. कारण त्याच पंजाब प्रचाराच्या दरम्यान केजरीवाल यांनी केलेले बेताल आरोप अंगाशी आलेले आहेत. त्यातून आपले शेपूट वाचवण्यासाठी त्यांनी चक्क माफ़िनामा लिहून दिला आहे. त्याच माफ़िनाम्याने पंजाबातील त्यांचे नेते आमदार पिसाळलेले असून, त्यांनी पक्ष सोडण्याची सामुहिक धमकी दिलेली आहे. अशी वेळ केजरीवाल यांच्यावर कशाला यावी? खरेतर एकूणच या पक्षाने व त्यांच्या नेत्यांनी त्यावर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ते केले नाही म्हणून अशी नामुष्कीची वेळ वारंवार येत असते आणि नजिकच्या काळात केजरीवालना आणखी माफ़िनामे लिहून द्यायचे आहेत. त्याचे काय?

केजरीवाल आणि त्यांच्या टोळीचे राजकारणातील सर्वात मोठे योगदान म्हणजे बिनबुडाचे बिनपुराव्याचे बेताल आरोप करून प्रसिद्धी मिळवणे एवढेच आहे. त्यामुळेच आताही त्याच सापळ्यात ते फ़सलेले आहेत. दिल्ली वगळता त्यांना मोठे यश फ़क्त पंजाब प्रांतात मिळाले. जिथे आम आदमी पक्षाचा मुळात भक्कम पाया होता, तिथे दिल्लीत चार वर्षापुर्वी त्या पक्षाला एकही खासदार लोकसभेत पाठवता आला नाही. पण ज्या फ़क्त चार जागा देशभरातून मिळाल्या, त्या सर्व पंजाबमधल्या होत्या. मात्र त्याचे काडीमात्र श्रेय केजरीवाल किंवा त्यांच्या दिल्लीतील टोळक्याला नव्हते. फ़ार कशाला पंजाबातून निवडून आलेल्या खासदारांनाही आपल्या यशाचे गमक उलगडले नव्हते. पंजाबला अंमली पदार्थाच्या विळख्याने घुसमटून टाकलेले आहे. त्यासाठी काम करणारे व १९८४ च्या दंगलीसाठी लढणारे जे स्वयंसेवी लोक होते, त्यांनी या पक्षामध्ये सहभागी होण्याचा पवित्रा घेतला; त्याचे ते यश होते. या दोन्ही बाबतीत भाजपा, कॉग्रेस वा अकाली कुठलाही ठाम निर्णय धोरण घ्यायला राजी नव्हते. सहाजिकच जे लोक त्यासाठी एकाकी लढत होते, त्यांच्यासाठी पंजाबच्या जनमानसात आपुलकी होती. त्याचेच प्रतिबिंब लोकसभेच्या मतदानात पडलेले होते. पण केजरीवाल किंवा त्यांच्या पक्षाने तो आपल्यावरला विश्वास मानला आणि तिथून गडबड सुरू झाली. पुढे मागल्या वर्षी विधानसभेची निवडणूक आली, तेव्हा तोच धागा मजबूत करताना अंमली पदार्थ विषयात केजरीवाल यांनी बेताल आरोपांचा सपाटा लावला होता आणि मजिठीया नावाच्या अकाली नेत्याच्या विरोधात जोरदार आरोप केलेले होते. त्यांनी कोर्टात धाव घेऊन बेअदबीचा खटला दाखल केला. त्यात काही तथ्य नसल्याने आपल्या गळ्यात फ़ास आवळला जात असल्याचे भान केजरीवालना आता आले आहे. म्हणून त्यांनी बिनशर्त माफ़िनामा लिहून दिला आणि पक्षातच त्यांच्या विरुद्ध वादळ उठलेले आहे.

ज्या आरोपात तथ्य नसते, त्याच्या विरोधात खटला भरला जाणे स्वाभाविक आहे. पण कोर्टकचेर्‍या करण्यात वाया दवडायला लोकांना वेळ नसतो. म्हणून बहुतेक प्रसंगी आरोप खपून जातात. किंवा अनेकदा काही खरे व काही खोटे आरोप असे भेसळ करून फ़ेकले जातात, की त्याच्या विरोधात कोर्टात दाद मागण्यातून आरोपी गोत्यात येण्याची शक्यता असते. म्हणूनही अनेकजण कोर्टात जात नाहीत. इथे मजिठीया किंवा अन्य काहींनी केजरीवाल यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली, कारण आरोपात पुरेसा दम नव्हता. किंवा निसटण्याची सुविधाही आरोपकर्त्यांनी ठेवली नाही. त्यामुळे केजरीवाल गोत्यात आले. नेमके तसेच प्रकरण नितीन गडकरी व अरुण जेटली या दोन केंद्रीय मंत्र्यांच्याही बाबतीत व्हायचे आहे. त्यांच्यावरही केजरीवाल यांनी आरंभीच्या काळात काही बेताल आरोप केलेले आहेत. तिथेही माफ़िनामाच सुटका करू शकेल. अर्थात जेटली यांच्या बाबतीत केजरीवाल यांना त्यांच्या वकीलानेच गोत्यात आणल्याचे प्रकरण अलिकडले आहे. जेठमलानी हे जुने भाजपाचेच नेते असून त्यांचा जेटली यांच्यावर डुख आहे. म्हणूनच दिल्ली क्रिकेट संघटनेच्या संदर्भात केजरीवालनी जेटलींवर आरोप करताच खटल्याची वेळ आली आणि जेठमलानी थेट केजरीवालांचे वकील झाले. त्यांना सरकारी खजिन्यातून एक कोटी रुपयांची फ़ी देण्यापर्यंतही या मुख्यमंत्र्याने मजल मारली होती. पण एका प्रसंगी जेठमलानी यांनी आपला राग काढताना कोर्टात असे शब्द वापरले, की आणखी एका खटल्याची टांगली तलवार डोक्यावर आली. सहाजिकच केजरीवाल यांना वकील बदलायची पाळी आली. आरंभी तर गडकरी याच्या खटल्यात समन्स आल्यावर त्यालाच अन्याय म्हणत केजरीवाल यांनी मोठा तमाशा केला व जामिन देणे नाकारले होते. थोडक्यात नौटंकी हा त्यांचा उपजत गुण आहे आणि तीच त्यांनी भारतीय राजकारणाला दिलेली भेट आहे.

तर अशा केजरीवाल यांना मजिठीया प्रकरणात नाक मुठीत धरून माफ़िनामा द्यावा लागला आणि आपलेच आरोप गिळावे लागले. पण त्या माफ़ीनाम्यात आपल्याच आरोपात तथ्य नसल्याचे केजरीवाल यांनी कबुल केल्याने, त्यांच्या पक्षाचा पंजाबातील पायाच हादरला आहे. ज्या आरोपांच्या पायावर पंजाबात पक्ष उभा राहिला किंवा त्याला इतके यश मिळाले, तो पायाच या माफ़िनाम्याने उखडून टाकला आहे. कारण मजिठीया यांचा अंमली पदार्थ व्यापाराशी संबंध नसल्याची ग्वाही आपच्या सर्वश्रेष्ठ नेत्याने लिखीत स्वरूपात दिल्यावर, त्याच्या पंजाबातील कार्यकर्ते नेत्यांनी अकाली वा तत्सम नेत्यांच्या विरोधात बोलायचे काय? त्याविषयी बोलले तर सामान्य लोकच केजरीवालांचा माफ़िनामा तोंडावर फ़ेकणार ना? म्हणून मग त्या राज्यातील आपनेते व कार्यकर्ते आमदार पिसाळले आहेत. पण इथे त्यांची नाराजीच विचारात घेऊन चालणार नाही. त्यांना विश्वासातही न घेता केजरीवाल माफ़िनामा देऊन मोकळे होतात, ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. बाकीच्या पक्षात एकाधिकारशाही चालते व नेते कार्यकर्त्यांना विश्वासातही घेत नाहीत. ही भूमिका घेऊन केजरीवाल राजकीय आखाड्यात उतरले होते आणि आज तेही त्यापेक्षाही अधिक मनमानी करीत असतात. कार्यकर्त्याने नेत्यासाठी आपले शब्द व आरोप निमूट गिळावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे. दोषी ठरण्याची व दंडशिक्षेची भिती केजरीवालांना माफ़िनामा लिहून द्यायला कारण ठरली आहे. त्यातून हा नेता किती शेळपट आहे आणि त्याचे लढण्याचे नाटक किती तकलादू आहे, त्याचा साक्षात्कार त्याच्याच अनुयायांना घडला आहे. आता जर पंजाबातील हे वादळ वेळीच शमले नाही, तर उरलेल्या दिल्लीतही बंडाचे ढग घोंगावू लागतील आणि २०१९ येईपर्यंत या पक्षाचा अवतारच संकटात सापडेल. एकूण देशाचे राजकारण शुद्ध पवित्र करायला आलेले केजरीवाल, स्वत:च किती खातेर्‍यात लोळत आहेत, त्याचा हा नमूना आहे.

2 comments:

  1. या सर्वात मजा म्हणजे 19 तारखेला आपच्या नेत्यांनी दिलेले स्पष्टीकरण. सीएम साहेबाना कट करून कोर्टात अडकवले आहे व त्यामुळे दिल्लीतील जनतेसाठी वेळ देता येत नाही म्हणून माफी मागून यातून बाहेर पडणे जनतेला वेळ देणें असे या मागचे स्पष्टीकरण आहे.
    वा काय अजब स्टेटमेंट आहे ! निर्लज्जपणाचा कळस आहे. कपिल सिब्बल, त्यांचे पुत्र व नितीन गडकरींनी हे माफीपत्र पाहून आपापले दवे काढुन घेतल्याचे कळते. आता प्रश्न आहे सीएम साहेबांचा कोणता चेहरा परत जनते पुढे जाऊन मत मागेल ? का ही पार्टी संपली !

    ReplyDelete
  2. केजरीवाल यांचा माफीनामा, हे तर आपले सामूहिक अपयश !!
    ''अरविंद केजरीवाल यांच्या माफिनाम्या मुळे 'आप' धर्मसंकटात''--एक मराठी वृत्तपत्र... हेडिंग तर लक्षवेधी आहे! ...सामान्य माणूस सिस्टिम समोर झुकतो तेव्हा तो हतबल असतो, 'सामान्य' म्हणजे ज्याच्याकडे वेळ नाही, पैसा नाही आणि ब्लैक मेल ज्याचा धर्म नाही असा माणूस.
    फडणवीस , ठाकरे,अजित दादा , राणे आणि इतर जेव्हा ,तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका अन्यथा आम्ही विरोधकांच्या गोष्टी बाहेर काढू असा दम देत असतात तेव्हा ही 'ब्लैकमेल किंवा गुन्हेगारास मदत ' अश्या हेडिंग ची बातमी दिसते का ?
    ही प्रकरणे बाहेर काढणे हा पत्रकारितेचा धर्म असेल ना?लोकशाही मजबूतीसाठीचा 'खांब' आपला धर्म कधीच विसरला आहे.
    मजेठिया ,वड्रा, अंबानी, खडसे ,भुजबळ आणि तत्सम महाराष्ट्रातील किती प्रकरणे 'वृत्तपत्रानी' बाहेर काढली? ते सोडा, 45000 मुलांचे भवितव्य अडचणीत आणणाऱ्या सिंहगड टेक सोसायटी चे आर्थिक व्यवहार कुणी वृत्तपत्रानी बाहेर काढले का ? बिचारे शिक्षक आर्थिक गुन्हे विभागाच्या चकरा मारत आहेत.
    खटले भरून कोर्ट कचेरीत अड़कवणे, हे तर मान्यताप्राप्त राजकीय तंत्र आहे.
    आता अरविन्द ने माफ़ी मागितली तर ती का मागितली हे समजून घ्यायचे असेल तर इथल्या सिस्टिम मधील दमना चे हजारो प्रकार डोळे उघडे ठेऊन बघा , बघा आपल्याला त्यावर एक दगड मारण्याचे धाडस होते का , बघा आपण कधी अश्या लढतीत बाजू घेतली का . ...
    ..अरविंदचा माफीनामा, हे तर आपले सामूहिक अपयश !!
    ( सोबत माहिती साठी अरविन्द चे तारीखवार कोर्ट शेड्यूल )

    ReplyDelete